अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरवात माझ्या अनुभवापासून करतो. मी तेव्हा लहान होतो. नऊ दहा वर्षाचा असेन. आम्ही नुकतेच नवीन घरात शिफ्ट झालो होतो. हे घर जरा विचित्र होतं.म्हणजे अधूनमधून घरात कोणीतरी वावरतंय असा भास व्हायचा. रात्रीच्या वेळी कोणीतरी दार वाजवतंय, हाका मारतंय असं वाटायचं. अमावास्या पौर्णिमेच्या रात्री हे प्रकार जास्त व्हायचे.हे घर तीन खोल्यांचं होतं. एकदा आमच्याकडे काका काकी आले होते. दोन दिवस राहिले आणि तिसऱ्या दिवशी दुपारी गेले. ते गेल्यानंतर आई आणि बाबा बाजारात भाजी आणण्यासाठी गेले होते. मी एकटाच घरी होतो. मी मधल्या दाराला कडी लावून पहिल्या खोलीत बसलो होतो. इतक्यात अचानक मधलं दार वाजू लागलं. मी गोंधळून गेलो कारण घरी कोणीच न्हवतं. मी विचारलं कोण आहे? तसा पलीकडून आवाज आला 'अरे मी काकी आहे. दरवाजा का बंद केलास. आम्हाला निघायचं आहे. उघड दार.' मी समजून गेलो ही एक दुष्ट आत्मा आहे. मी दरवाज्याजवळ जाऊन मारुती स्तोत्र बोलायला सुरवात केली तशी ती आत्मा जोरात किंचाळायला लागली आणि थोड्या वेळाने सगळं शांत झालं.

https://www.maayboli.com/node/71923
अमानवीय ३चालू झालाय

Submitted by पाथफाईंडर on 8 February, 2020 - 09:54
>>>>
बोकलत भौ,

वरची लिंक मी २ नंबरवर टाकली होती.
या तुमच्या धाग्याचे बारसे "अमानवीय बोकलत भाग१" असे कराल का? दोन समान नावाचे धागे नको.

त्याला काय धागा म्हणतात. अगोदरच्या धाग्याची लिंक नाही काही नाही, फक्त येऊ द्या इकडे किस्से लिहिलंय त्या धाग्यावर. जे वाचक काही वर्षांनी वाचतील त्यांना अगोदरच्या धाग्यांची लिंक मिळायला हवी म्हणून हा धागा काढला. मी अमानवीय 2 वर मेसेज केला होता की कोणीतरी काढा व्यवस्थित धागा पण कोणीच पुढाकार न घेतल्याने मला काढायला लागला.

आत्मा स्त्री-पुरुष-इतर कोणाचाही असो 'तो' असतो. मराठीत आत्मा पुल्लिंगी शब्द आहे

आत्मा स्त्री-पुरुष-इतर कोणाचाही असो 'तो' असतो. मराठीत आत्मा पुल्लिंगी शब्द आहे>>>>हे कागदोपत्री अगदी बरोबर आहे, पण मी आत्म्यांच्या दुनियेत वावरत असताना मला एक जाणवलं कि स्त्री आत्म्याला तो म्हणून संबोधलं कि राग येतो. मी त्यांचा आदर करत असल्याने स्त्री आत्म्याला ती आत्मा संबोधतो.

बऱ्याच वर्षांपूर्वी मी भाड्याच्या घरात रहात होतो. मी तिथे राहायला जायच्या आधी वर्षभर तिथे कुणी रहात नव्हते.
तिथे राहायला लागल्या पासूनच मला वेगळाच अनुभव येऊ लागला. अंधार पडला की घरात गुंई गुंई असा आवाज सुरू होई जणू काही घरात डासांनी आक्रमण केले आहे.
पण शोधून एक डास सुद्धा डोळ्यांनी दिसत नसे, की चावतही नसे. नखशिखांत पांघरूण घेऊन झोपलो तरी पांघरूणात डास शिरल्याचा भास होई आणि कानात गुणगुण करत.
मग मी नवीन मच्छरदाणी लावली, तरी आत डास असल्याचा भास होई आणि कानाशी रात्रभर गुणगुणने सुरू असे त्यामुळे माझी झोप होत नसे. मी दिवा लावुन बघायचो पण डासांचा नुसता आवाज यायचा पण एक तरी डास दिसेल तर शपथ.
चावत नसल्यामुळे त्रास त्यांचा आवाजाचाच होता.

मी कानात कापुस ठेवून बघितला, हेडफोनवर झोप येणारे राग लावून बघितले पण डास जणु काही हेडफोन मध्ये घुसुन ओरडत लावलेल्या रागाच्या चौपट आवाजात. कुणी म्हणाले की तुला कर्णनादाचा त्रास होतोय, डॉक्टर कडे जा.
पण मला हा त्रास फक्त रात्री होत असे. मी जर रात्री घराबाहेर गेलो तर अजिबात आवाज येत नसत. मग एकदा माझा मित्र गावाहून आला आणि माझ्याकडे दोन दिवस राहिला तर त्यालाही माझ्याप्रमाणेच डासांचे आवाज येत. तेव्हा ही कुठली वैद्यकीय अथवा मानसिक समस्या नव्हे हे उघड होते.

माझा मित्र खरंतर आठवडाभर रहाणार होता पण या प्रकाराने घाबरून दोन दिवसांत एका लॉजवर राहायला निघुन गेला. तिथे त्याला कसलाही त्रास झाला नाही. त्याने मला ताबडतोब ते घर सोडण्याचा सल्ला दिला, पण मी घाबरणाऱ्यातला नाही हे त्यालाही चांगलेच ठाऊक होते.

माझ्या पश्चात तो एका मांत्रिकाला घेऊन आला आणि त्या मांत्रिकाने तिथे कुणी आत्महत्या केली आहे का, खाली काही पुरले आहे का इत्यादी चौकशा प्रयोग मंत्रांच्या द्वारे केल्या पण त्याच्या हातीही काहीच आले नाही, आणि त्यानेही ती वास्तू सोडण्याचा सल्ला दिला. पण मी राहायला घेतलेली वास्तू स्वतःच्या इच्छेशिवाय कधीच सोडत नाही, आपले हे एक तत्व आहे.

तसेही एव्हाना जे काय समजायचे ते मी समजलो होतो आणि येणाऱ्या अमावस्येची वाट पहात होतो.

क्रमशः

बदला घ्या.
पण बोकलतला आनंदच होईल.

Lol चित भी मेरी, पट भी मेरी.
सिरियस किस्से ह्या धाग्यावर नकोत. >>> तुम्ही म्हणत असाल तर वेगळा धागा काढतो सिरीयस किस्यांकरता.

मी त्यावेळी खूपच लहान होतो. आमच्या गावाच्या बाहेर एक नदी होती. त्या नदीवर आम्ही सगळे दुपारी पोहायला जायचो. एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही सगळे नदीवर पोहायला गेलो होतो. पाच सहा जणं असू आम्ही. साधारण अर्धा तास आम्ही नदीत पोहल्यावर आमच्या लक्षात आलं की आमच्यातला एकजण गायब आहे. आम्ही सगळीकडे शोधलं पण कुठेच सापडला नाही. ती नदी अमानवीय अनुभवांसाठी कुप्रसिद्ध होती. अनेक जण अनुभव सांगताना सांगायचे की नदीत उतरल्यावर कोणीतरी पाय खेचतं. त्यामुळे जो गायब झाला होता त्याला नदीतल्या शक्तीने खेचला अशी आमची समजूत झाली. आम्ही घाबरत पळत गावात आलो. त्याच्या घरी सांगायला गेलो तर आई बाहेर भांडी घासत होती. आम्ही धीर करून तिला काही बोलणार इतक्यात तीच बोलली. जा मेल्यानो घरी, दुपार बिपार काय नाय का तुम्हाला. जेऊन झोपलाय तो संध्याकाळी या खेळायला. तर त्याच असं झालं होतं की ज्याला आम्ही गायब झालेला समजत होतो त्याच्या घरी पाहुणे आले होते आणि दुपारी मस्त मटणाच जेवण जेवण्यासाठी आम्हाला टाकून घरी आला होता. संध्याकाळी खेळायला आल्यावर सगळ्यांनी त्याला चांगलाच धुतला.

अमावस्येच्या दिवशी मी मत्स्यालयात जाऊन चार जिवंत मासे आणि एक कासव मत्स्यपात्रातुन घेऊन आलो. त्यांना छान खाऊ पिऊ घातले. कासव दुपार पर्यंत घरभर फिरत होते पण नंतर मी त्याला आणि माशांना शांतपणे झोपू दिले. दरम्यान मी ग्लोव्ह्ज घालुन एका बरणीत डबक्यात अनेक महिने साचलेले पाणी घेऊन आलो.

रात्री नेहमी प्रमाणे डासांच्या आवाजाचा थयथयाट सुरू होता.

साडे अकराच्या सुमारास मी खोलीत मध्यभागी चौरंग ठेवुन त्यावर डबक्यातले पाणी भरलेली बरणी ठेवली आणि मत्स्यपात्रावर पंचा टाकून ते झाकले आणि त्यावरच बसून प्लॅंचेटची तयारी सुरु केली. खड्या आवाजात मंत्र म्हणत मी त्याला आव्हान करत होतो. बरोबर बारा वाजता बरणीतून ओंजळभर पाणी काढून ते परत बरणीत टाकत अधिकार वाणीने त्याला आव्हान केले आणि काही क्षणातच डासांचा वेताळ डंखासुर त्या बरणीतून अंड्यातून बाहेर येणाऱ्या डासाप्रमाणे बाहेर येऊ लागला. त्याचा आकार प्रचंड मोठा होता. बघता बघता त्याचे डोके छताला टेकले आणि तो बरणीतून पूर्णपणे बाहेर आला. त्याची सोंड हस्तिदंता एवढी मोठी होती, डोळे टरबूजाएवढे होते आणि त्यात टोमॅटो सारखी लालबुंद बुबुळे तळपत होती.
त्याने खोलीत एक वळसा घातला आणि रक्त पिण्यास माझ्याकडे सरकु लागला. हस्तिदंता एवढ्या सोंडेच्या एका दंशानेच माणसाचे काय हाल होत असतील या विचाराने माझ्या अंगावर एक शहारा आला आणि मी लगेच उठून मत्स्यपात्र काढले, जमिनीवर मांडी घालुन बसलो, कासवाला माझ्या मांडीवर ठेवले आणि मत्स्यपात्रातले मासे बरणीत टाकले.
हे मी एवढ्या चपळाईने केले की काय होते आहे हे कळायला डंखासुराला जरा वेळच लागला.

जेव्हा कळले तेव्हा त्याची अवस्था बघण्यासारखी होती.
माझ्या मांडीवर कासव टकमका त्याच्याकडे बघत होते आणि डंखासुर आता मला काही करू शकत नव्हता. आणि बरणीत मी टाकलेले मासे गप्पी मासे होते त्यामुळे त्याचा आता परतीचा रस्ताही बंद झाला होता.

रागाने लालबुंद होत त्याने प्रचंड मोठा गुंईनाद केला पण शेवटी हतबल होऊन तो मला शरण आला. आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे मुकाट्याने देऊ लागला.

त्याच्याकडुन मला कळले की या घरात आधी एक चीनी जोडपे रहायला आले. त्यांना पाहुन त्या घरातल्या डासांना आनंद झाला होता. पण त्या जोडप्याने आल्या दिवशीच सर्व डासांचा निर्घृणपणे खातमा केला आणि त्या डासांची चायनीज सेवनाची इच्छा अतृप्त राहीली आणि त्यांचे आत्मे त्या घरात भटकत होते.
त्याच घरात चायनीज रक्त सेवन केल्यावरच ते तृप्त होणार होते. मी त्याला सांगितले की मी त्यांची इच्छा पूर्ण करेन. चायनीज रक्त म्हणजे त्यांना चायनीज माणसांचे रक्त अपेक्षित होते. पण मी अशा गोष्टींत मुरलेला होतो. मी डंखासुराकरवी त्यांच्याकडुन कबूल करून घेतले की ज्या रात्री मी त्यांना चायनीज रक्ताची मेजवानी देईन त्या रात्रीच त्यांनी वास्तू कायमची सोडली पाहिजे.
ते तयार झाले.

मग मी बरणीतून गप्पी मासे काढुन परत मत्स्यपात्रात टाकले आणि डंखासुर मला धन्यवाद देऊन आल्या मार्गे परत गेला.

दुसऱ्या दिवशी मी पुढच्या कामाला लागलो.
चँग नावाचा माझा एक चायनीज मित्र आहे, तेव्हा तो अविवाहित होता आणि चुई त्याची गर्लफ्रेंड होती. मी गावी गेलो तर एकांता करता त्यांना माझे घर हवे होते तसे त्यांनी मला दोन तीन वेळा सांगितले होते. पण तिथे घडणाऱ्या प्रकारामुळे मी स्वतः नसताना कुणालाच तिथे राहू देत नसे. माझ्या या निर्णयाचे मी स्वतःच आता कौतुक केले, अन्यथा त्या दोघांवर काय प्रसंग ओढवला असता कल्पनाही करवत नाही.

तर चँग आणि चुई एक आठवड्या करता चीनला निघाले होते. मी त्यांना म्हणालो की ते परत येतील तेव्हा मी गावी गेलो की त्यांना माझ्या घरात रहाण्यास परवानगी देत जाईन पण एका अटीवर. चीनहून येताना त्यांनी माझ्यासाठी प्रत्येकी एक एक चिनी मेंढी आणली पाहिजे.

कां कूं करत ते तयार झाले. आपापला पाळीव प्राणी असे सांगून आठवड्याने दोघेही एक एक मेंढी घेऊन आले. मी त्यांना सांगितले की येत्या अमावस्ये नंतर मी दोन दिवसांकरता गावी जाणार आहे तेव्हा ते माझ्या घरी राहु शकतात. दोघांनाही आनंद झाला.

मी मेंढ्या घेऊन आलो घरा समोरील अंगणात त्यांच्या करता गोठा बांधला आणि आठवडाभर त्यांना छान खाऊ पिऊ घालून धष्टपुष्ट केले, त्यांच्या सर्व इच्छा तृप्त केल्या, एकही इच्छा अतृप्त रहाणार नाही याची पूर्ण काळजी घेतली.

अमावस्येच्या रात्री मी त्यांना घरात बांधले आणि परत मागल्या अमावस्ये प्रमाणे डंखासुराला पाचारण केले आणि मेंढ्याकडे बोट दाखवुन मी केलेले वचन पूर्ण केल्याचे सांगितले. तो संतापला म्हणाला हे तर चिटिंग आहे. पण मी त्याला बरोबर शब्दात पकडले होते. मेंढ्यांचे रक्त चीनी होते आणि आता त्याला आपला शब्द पाळणे भाग होते. डासांच्या आत्म्यांशी संवाद साधून त्याने त्यांना समजावले आणि निघुन गेला. मग डासांचे आत्मे दोन्ही मेंढ्यावर तुटुन पडले. त्यांची संख्या एवढी प्रचंड होती की अर्ध्या तासात दोन्ही मेंढ्या रक्तहीन होऊन निपचित पडल्या. आणि त्याच क्षणी डासांचा आवाज एखाद्या म्युझिक सिस्टमचे बटन बंद करावे त्याप्रमाणे बंद झाला आणि घरात पहिल्यांदाच भर रात्री शांतता पसरली.

मी मेंढ्याना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या शरीरात बहुतेक रक्ताचा थेंबही शिल्लक नव्हता, त्या गतप्राण झाल्या होत्या, याचे मला वाईट वाटले.
तिथेच अंगणात मी त्यांच्यावर शास्त्रोक्त अंत्यसंस्कार केला.

पुढे चँग आणि चुई यांचे लग्नही थाटामाटात पार पडले.

वर्षभराने मी स्वतःचे घर घेतले. त्या भाड्याच्या घर मालकाने ते जुने घर पाडून तिथे एक हॉस्टेल बांधले आणि त्याचे नाव ठेवले मेंढे हॉस्टेल.

:समाप्त

माझ्या घराच्या रस्त्यावर एक कौठाचं खूप मोठं झाड आहे. तिथे खैस (खविस) राहतो हे सगळेजण बोलत. अनेकांना त्यानं मुरथाळून मारलं आहे असं लोक बोलायची. रात्रीच्या वेळी तिथून जायची कुणाला हिंमत झाली नाही.
एक दिवस मी बाहेर गावाहून आलो. खूप उशीर झाला होता. कौठाजवळ येता येता बारा वाजले. पौर्णिमेची रात्र होती. देवाचं नाव घेत घेत खाली पहात चाललो होतो.
अचानक गुर गुर ऐकू आली. पाहतो तर दहा बारा फूट उंच खैस लाल लाल डोळे रोखून माझ्या कडे खाऊ की गिळू अशा नजरेने पहात होता.
तो मला धरणार तोच घोड्यांच्या टापा ऐकू आल्या. हातात टेंभे धरलेले घोडेस्वार, मध्ये पालखीत बसलेले म्हसोबा महाराज , म्हसोबाचे भोई व त्यांचे निशाण घेऊन एक घोडेस्वार असे भरपूर स्वार व इतर मंडळी होती.
मी घाईघाईत पालखीला हात लावला व पालखी बरोबर निघालो. म्हसोबा महाराजांचं मंदिर माझ्या घराजवळच आहे. तिथं आल्यावर सगळी मंडळी पालखीसह गायब झाली. मी पळत घरी आलो. जोर जोराने घरातल्या लोकांना हाका मारु लागलो.
मी जागा झालो तेव्हा घरातले लोक माझ्या तोंडावर पाणी मारत होते व काय झाले, कसलं स्वप्न पडलं हे विचारत होते.

असू शकतं. आपण जी स्वप्न पाहतो ती खरी असून आपला आत्मा त्या जागेत प्रत्यक्ष प्रवास करून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी एकदा स्वप्नात घनदाट अरण्यात शिरलो होतो. तिथे बाभळीच्या झाडावर चढताना माझा हात खरचटला. सकाळी उठलो पाहतोय तर खरोखरच हात खरचटला होता. मी या विषयावर अजून खोलात संशोधन करत आहे. लवकरच डिटेल रिपोर्ट तुमच्यासमोर सादर करेन.

Pages