अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे...बाप रे..असं हऊ शकत?..कारण माझा अजिबात विश्वास नाहीये या गोष्टीवर्..पण प्रत्यक्षात अनुभवलेली घटना म्हणावी तरी अनुभव फडतरेंचा.. नक्की काय असेल??

विश्वास १००% आहे. पण अनुभव शून्य. अनुभव घायची इच्छा ही आहे. आहेत का कुणाकडे हुकमी जागा ?

फडतरेंवर भितीचा अंमल असल्यामुळे त्याला ते चेहरे त्या डेथ बॉडींसारखे वाटत असतील, कारण... पहिली गोष्ट म्हणजे स्वप्न आपल्याला म्हणावी तशी स्पष्ट दिसत नाहीत, आणि आपल्याला ती कळतात याचे कारण, आपण ओळखत असलेली लोकं, ठिकाण, वस्तु, हे जर स्वप्नात दिसले तर आपल्या लक्षात राहते, पण अनोळखी काही असेल तर आपल्याला आठवत देखील नाही
ते म्हणतात ना 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' त्यातील हा प्रकार असेल

वैभव, असं नाहिये. अनोळखी गोष्टी पण लक्षात रहातात. हा स्वानुभव आहे. सर निकोला टेस्लांचे चरित्र वाचल्यास बर्‍याच गोष्टी जाणवतील.

आणि हो शिवणयंत्राच्या सुईचा शोध स्वप्नामुळेच लागला. संशोधक नेहमीची शेपटीला भोक असलेली सुई बसवायचा प्रयत्न करत होता, त्याला एक राक्षस पुढे भोक (नेढे) असलेल्या भाल्याने टोचत असल्याचे स्वप्न पडलं आणि त्याने हि सुई डिझाईन केली.

बादवे हे उदाहरण तुमच्याच म्हणण्याला पूरक आहे. Wink

विषयांतराबद्दल क्षमस्व.

माझ्या नवर्याचा अनुभव असाच आहे...पुण्यात शिक्षणासाठी असतांना ते ज्या घरात रहायचे तिथला...

रात्री खुप उशिरा अभ्यास करुन झोपायची माझ्या नवर्याला सवय असल्याने कुणीही रुममेट त्याच्या खोलीत झोपत नसत. एके दिवशी रात्री झोपला असतांना कोण्या छोट्या मुलाने त्याच्या हाताला कडकडुन चावा घेतला असं त्याला वाटलं आणि तो जागा झाला. जागा झाल्यावर त्याला जवळच एक हिरवी साडी नेसलेल्या बाई दिसल्या...त्या कोण आहेत हे पहायला तो थोडा समोर गेला तर त्या अजुन थोड्या दूर गेल्या...लाईट लावल्यावर गायब झाल्या.

घरमालकाला ही सग्ळी हकीकत सांगितल्यावर ते म्हणाले की त्या घरात पूर्वी नायडू कुटुंब राहत असे.. त्यांना हे घर खुप हलाखीच्या परिस्थितीत असल्याने विकायला लागलं.. नायडू काकुंचा त्या घरावर फार जीव होता आणी तिथेच त्यांचा नातूही रहायचा त्यांच्यासोबत..पुढे त्या काकुही वारल्या आणि तो लहान मुलगाही....

या प्रसंगानंतर त्या घरात कुणीच एकटं राह्यलं नाहि...पुढे मात्र काही त्रास झाला नाहि...

आमचा सिंगापूरच्या एका हॉटेल रूमचा असाच अनुभव आहे. खरं तर त्या रुंममध्ये आमचा टूर गाईड रहाणार होता पण आमची रूम साफ व्हायची होती म्हणून त्याने आपली रूम आम्हाला दिली. आत आल्या आल्याच आमच्या बॅगेची चावी तुटली, मग कसं तरी करून बॅग उघडली. त्यात आमची खूप चिडचिड झाली.

मग रात्री आम्ही झोपलो आणि अचानक आईला आपल्या बेडच्याजवळ कोणी एक छोटा मुलगा उभा आहे आणि आपल्या हाताला धरून हलवतो आहे असं दिसलं. सत्य का स्वप्न हे तिला अजून सांगता नाही येणार. गंमत ही की तो मुलगा इंडियन नव्हता, ब्लाँड केसांचा होता. आता आपल्या स्वप्नात सहसा फॉरेनर्स येत नाहीत. म्हणजे निदान माझ्या तरी नाही येत कधी:-) बरं त्या अख्ख्या टूरमध्ये आम्ही ब्लाँड केसांचा कोणी मुलगा पाहिला नव्हता. त्यामुळे ती खूप घाबरली पण कोणाला उठवायचं नाही म्हणून तशीच झोपून राहिली.

सकाळी ती काही बोलायच्या आतच मी तिला म्हटलं की मला रात्री डोळे बंद करायला खूप भीती वाटत होती. बरं असंही नाही की आम्ही पहिल्यांदा परदेशात हॉटेलमध्ये होतो. पण मला ही जाणीव सारखी होत होती की मी डोळे उघडले तर मला समोर कोणीतरी दिसणार.

आणि मग आमच्या लक्षात आलं की आई आणि बाबा ह्या दोघांनाही सारखं बाथरूममधल्या टबमध्ये कोणीतरी आंघोळ करतंय असा आवाज आलाहोता रात्री. त्यांनी वेगवेगळ्या वेळी जाऊन पाहिलं पण. शेजारच्या रुममधून आवाज येतो म्हणावं तर बाथरूममध्ये गेल्यावर आवाज नाही. आम्ही सकाळी फ्रंट डेस्कवर त्या रूमबद्दल चौकशी केली पण त्यांनी तसं काही नाही असं (अर्थात!) सांगितलं.

दुसरी रूम मिळणं कठिण त्यामुळे दुसरी रात्र कशीतरी काढली आणि तिसर्या दिवशी सुदैवाने निघालो.

खूप वर्षांपूर्वी डीडीवर "होनी अनहोनी" नावाचा एक प्रोग्राम लागायचा. त्याच्या टायटल साँगमध्ये शब्द होते - ना कोई समझे ना कोई जाने आंखोसे जिसने देखी वोही माने" हेच खरं आहे. Happy

तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मुग्धा आणि स्वप्नाचा अनुभव पण सॉलिड आहे.
आता त्या घटनेविषयी.. त्या रात्री फडतरेला खरोखरच तेच दिसले असावेत असे मानावे लागेल कारण उमेशच्या म्हणण्यानुसार फडतरेने त्या दोघांचे वर्णनही केले होते काहींनी ते नीट ऐकले नाही पण एकाच्या मते ते वर्णन त्या डेड्बॉडीजशी जुळत होते. अर्थात हा निव्वळ योगायोगही असू शकतो किंवा ऐकणार्‍यांच्या मनाचे खेळ.

सही आहे..
असुदे सारखी मीही काही दिवस झाले वेगळे अनुभव शोधतेय..
म्हणजे असे अनुभव की जे योगायोग ह्या गटात मोडणार नाहीत.. ज्याकरता कुठलंच स्पष्टीकरण देता येणार नाही..
दोन + दोन = चार इतके clear अनुभव जे रोजच्या जगात बसणार नाहीत..
असतील कुणाकडे तर प्लीज पोस्ट करा..

माझा आत्ताचा अनुभव अशाप्रकारचा..

आम्ही आत्ताच सिमला - कुलु - मनालीला जाऊन आलो. ३ कुटुंब - मी, नवरा, लेक ! आई - बाबा - बहीण ! भावजी आणि बहीण क्र. २ (दिद्स)!

सिमल्याच्या हॉटेलमध्ये २ रात्री नीट गेल्या. आमचे पिलू पण मजेत होतं.

मनालीला जरा साईडीच हॉटेल होतं आणि ४ रात्रींचा स्टे. मला आणि दिद्स ला असा मिळून एक स्वीट मिळाला. २ स्वतंत्र बेडरूम्स आणि अ‍ॅटॅच बाथरूम्स! आमच्या खोलीतून बाहेरचे छान डोंगर वै. दिसत होते.. पण बाथरूम आणि बेडरूम ह्यांच्या कॉमन भिंतीला, हॉलच्या छताला ओल दिसत होती. बाथरूमध्येतर छत, भींत सगळीकडेच भयंकर ओल. खोली अत्यंत "ग्रे" होती, अस्वच्छ वाटत होती.. काहीच प्रसन्न वाटत नव्हतं! आम्हाला वाटलं - संध्याकाळ आहे त्यामुळे असेल. पण दिद्सची बाजूचीच रूम नीट वाटत होती. आई बाबांची रूम पण नीट होती.

पहिल्या रात्री सगळे नीट झोपी गेलो. लेक थोडीशी चळवळत होती त्यामुळे मध्येच थोडीशी जाग येत होती. तेंव्हा बाथरूममध्ये फडफड ऐकू आल्यासारखी वाटली.. पण मी लाईट लावून आत गेले तर काही हालचाल नाही. मग मी झोपी गेले.

दिवस दोन - आमची सगळ्यांचीच दुपारची विश्रांती, लेकीची नियमीत झोप सगळे नीट झाले. रात्री झोपताना मी आठवणीने बाथरूमातला दिवा चालू ठेवला की वटवाघळं असतील तर येणार नाहीत. लेकीला झोपवलं, नवरा झोपला मी पुस्तक वाचत होते. थोड्यावेळाने दात घसून येऊन मी दिवा बंद केला. आणि लग्गेच लेक रडत उठली आणि काही म्हटल्या थांबेच ना! नवर्‍याने नीट थोपटून थोपटून झोपवलं. हुंदके देतच झोपली. गादीवर ठेवलं की परत रडं, दिद्स, आई सगळे त्यांच्या रूम मधून आमच्याकडे का रडतेय? म्हणून! सगळे उपाय झाले. भूक लागली म्हणून दूध पाजून बघीतलं, पाणी? नको!
खेळणी दाखवली, गाणी लावली, पोटात दुखत असेल म्हणून औषध पाजून झालं, नाही म्हणजे नाही. रूमच्या बाहेर नेईपर्यंत रडं! शेवटी रात्री २:३० ला मी बाथरूमचा लाईट काढल्यावर कधीतरी झोपली. झोपेत चळवळणं होतच थोडसं!

दिवस ३ - परत तीच कथा. तरी काल काही तरी चावलं असेल म्हणून रूम स्वच्छ करून घेतलेली, गाद्या झटकून, नविन चादरी वै. सगळं करून झालं! शेवटी आईने दृष्ट काढली, नो ईफेक्ट! अंगारा लावला, थोडी शांत - पण परत गादीला टेकली रडं! शेवटी नवर्‍याने रिसेप्शनला रिक्वेस्ट करून हॉटेल बाहेर नेलं आणि झोपल्यावर खालीच रिसेप्शनला झोपवलं, तो ही तिथेच तिला मांडीवर घेऊन झोपला.

दिवस ४ - आईने सुचवलं की रूम बदलून बघा म्हणून आईबरोबर रूम बदलली आणि ती नीट झोपली. आई, बाबा, मला, नवर्‍याला त्या रूममध्ये काहीही त्रास जाणवला नाही.

आता मुलगी १.८ वर्षे असल्याने काय होतय ते सांगू शकत नाही. पण तिचं काही तरी बिनसलं होतं आणि ते बाथरूममधल्या लाईटशी आणि आवाजाशीच संबधीत होतं कारण दार लावल्यावर रूममध्ये प्रकाश येत नव्हता की ज्याने झोपमोड व्हावी. मनालीत एकूणच ती चिडचिडी झाली, खाणं नीट असूनही दमल्यासारखी, कोमेजलेली होती. जरा पुढे चंदीगढ, दिल्ली कुठेच रडारड नाही. तिथे आणि सिमल्याला ती फ्रेशही होती.

आता हे आमच्या मनाचेही खेळ असतील, पण अनुभव असा होता हे नक्की. Sad आम्हाला ह्या घटनेने संभ्रमीत केलं आहे.

Happy

हा लेख परत वाचावा म्हणुन शोधला.........पण सापडेनाच की.....
पण मी घाबरलो नाही..... मग अमानवीय सर्च केलं

असले स्वतःला आलेले अनुभव हे स्वतःजवळच ठेवायचे असतात. कारण दुसर्‍याला सांगायला गेलो कि " काय पकवतोय " असच कानि येत.

सुनिल, इथे तुम्हाला कोणी " काय पकवतोय " असं म्हणणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे बिनधास्त लिहा काही अनुभव असतील तर. शेवटी "आंखोसे जिसने देखी वोही माने" हेच खरं आहे. ज्याला अनुभव आला त्यालाच ठाऊक.

जाईजुई, रिसेप्शनमध्ये रूमबद्दल चौकशी केलीत का? अर्थात ते काही सांगणार नाहितच. आम्हालासुध्दा सिंगापूरला ताकास तूर लागू दिली नाही त्यांनी. Sad मी खूप हॉटेल्समध्ये राहिलेली आहे. आईच्या अनुभवाबद्दल माहित नाही. पण मला त्या रात्री डोळे बंद करायला भीती वाटत होती हे सत्य आहे - असं आधी कधीच झालं नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही भुताखेतांच्याबद्दल काहीही बोलत नव्हतो ज्यामुळे भीती वाटली असेल.

माझ्याबाबत म्हणाल तर वर लिहिलेल्या अनुभवाखेरीज मला कधी अनुभव आला नाही आणि येऊ नये असंच वाटतं Happy

खतरनाक अनुभव आहेत सगळ्यांचे...

जाई च्या छकुलीला किती त्रास झाला असेल ईतक लहान बाळ काही बोलु पण शक नाही Sad ...तीच्या साठी गोड शुभेच्छा Happy

हम्म.. खरंय.. ज्याला अनुभव येतो तोच हे मानतो.
हे असे अनुभव तर घाटात, टेकड्यांवर जिथे भीषण अपघात झाले आहेत बस दरीत कोसळून , रेल्वेच डबे घसरुन नदीत पडतात ..तिथे तर हमखास येतात. कारण तिथे निष्पाप जीवांचे अकारण बळी गेलेले असतात त्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळी घाटातून जाताना मध्येच गाडी थांबवू नये, पटकन वस्तीत पोहोचावं असं माझी आजी सांगायची.

ह्म्म्म्म्!!मला स्वतःला जरी कधीच अनुभव आला नसला तरी ही गोष्ट अमान्य नाही.. पुष्कळ नातेवाईकांनी,मित्रमैत्रीणींनी सांगितले आहेत त्यांचे अनुभव..
जकार्ताला ज्या शाळेत काम करत होते त्या शाळेत तर माझ्या कलिग्सना खूपसे अनुभव आले. एकदा माझी कलीग शाळेच्या प्रसाधनगृहात आरशात पाहून केस विंचरत होती तर तिला मागूनच खूप गोड आवाजात क्रिसमस कॅरोल्स म्हटलेले ऐकू आले.तिने झटकन मागे वळून पाहिले तर कुणीच नव्हते.. अजून एक मैत्रीण शाळा सुटल्यावर गणिताचे जादा तास घेत असताना बाहेर वार्याचा मागमूस नसतांना अचानक व्हेन्टीलेटर जोरजोरात खडखडू लागले.. तिने शिकवणे बन्द केल्यावर आवाज थांबला ,सुरु केल्यावर परत तोच प्रकार..( ते जे कुणी असेल त्याला बहुतेक गणित हा विषय आवडत नसावा Happy ) ती आणी तिच्या तिसर्या वर्गातील पोरं जाम घाबरली होती त्या दिवशी..
ते म्हणतात ना आपल्यात कि मनुष्य गणाच्या लोकांना भुतेखेते दिसतात आणी त्यांना या गोष्टीचा त्रास ही होतो, देव गणाच्या लोकांना दिसतात पण त्रास होत नाही आणी राक्षस गणाच्या लोकांना दिसतही नाहीत आणी त्यांच्यापासून त्रास ही होत नाही.. (मला पक्की खात्री पटलीये कि माझा राक्षस गणच असावा Wink )

भुतं नसतातच. माझ्या रुम वर मी खुप दिवसापासून भाताची शितं सांडून ठेवलीयेत. रोज घरी गेल्या वर चेक करतो. असतील शिते तर जमतील भुते असं म्हणतात ना. अजुन एक ही भुत आलेलं नाहीये.

असतील शिते तर जमतील भुते असं म्हणतात ना. अजुन एक ही भुत आलेलं नाहीये.>>>
धुमकेत, पण तुम्हि तर रोजच जाता ना??? Happy Light 1
just kidding, dont take it seriously...

धुमकेत, पण तुम्हि तर रोजच जाता ना???

ती म्हणी प्रमाणे जमणारी भुतं आधी स्वतःच शितं सांडतात ? मग जमतात ? मला लवकर आरसा बघीतला पाहीजे.

आशु मस्त

आपण देवाला मानतो तसच भुत पण असतात.
जे लोक आत्मह्त्या किंवा अपघातात जातात त्यांचे आत्मा अतृप्त असतो लोक म्हणजे भुत असतात.
काही त्रास देतात काही नाही.

मला पण एक-दोन अनुभव आले आहेत अश्याच प्रकारचे, पण मी ईथे नाही सान्गत आता, कारण कोणी विश्वास नाही ठेवत... Sad

स्मिता धन्स
पारिजातक..बिनधास्त लिहायचे..लोकांनी नाही विश्वास ठेवला तर तो त्यांचा प्रश्न आहे...आपण लिहून मोकळे व्हायचे...

हा माझा अनुभव आहे, मी साधारण सातवीत असेन त्यावेळेस घडलेली घटना आहे ही, एके दिवशी मी, आई आणि वडिल आमच्या गावाकडे चालत निघालो होतो, साधारण रात्री १२ ची वेळ असावी, गावाच्या बाहेर वळणावर एक वड आहे, लोकांच्या म्हणण्यानुसार तिथे एक भुताचे वास्तव्य आहे, त्या वळणावरुन जात असताना अचानक वडील तिथेच खाली बसले आणि त्यांच्या एका पायात असह्य वेदना सुरु झाल्या, काही केल्या त्यांना चालता येईना. कसेबसे मी आणि आईने त्यांना उभे केले, तेवढ्यात समोरुन दोघेजण M80 वरुन आमच्या जवळ आले आणि अचानक गाडी घसरुन पडले, हे बघताच वडीलांनी पळत जाऊन त्यांना उठ्वले, आई आणि मी हे बघतच बसलो, ज्या माणसाला काही क्षणांपूर्वी चालताही येत नव्हते त्याने पळत जाऊन त्या दोन माणसांन उठवले. पुढे आम्हि घरी आलो काही वेळ जाताच वडिलांची दातखिळी बसली, बरेच उपाय करुन त्यांना normal केले. अचानक ते जोरात ओरड्त त्या वडाच्या दिशेने पळत सुट्ले, ३-४ लोकांनांही आवरेनासे झाले, त्या रात्री ही घटना अनेक वेळा घड्ली, शेवटी त्यांना दोरीने बांधून ठेवावे लागले, पण दुसर्या दिवशी त्यांना यातले काहिही आठ्वत नव्हते.
ही घटना घडली त्यावेळी ते पिलेले होते, पण हे रोजचे होते आणि असा त्रास कधीही झाल नाही. मी पण त्या झाडाखालून बर्याच वेळा रात्रीच्या सगळ्यावेळी गेलो आहे, पण मला कधीही वेगळे जाणवले नाही. माझा भुतांवर विश्वास नाही पण ह्या घटनेची उकल मी अजुणही करु शकलो नाही.

Pages