लवकर रिटायरमेंट साठी किती पैसे पुरेसे?

Submitted by कोहंसोहं१० on 1 November, 2019 - 22:10

माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही. आई वडील आहेत परंतु खर्चासाठी याच्यावर अवलंबून नाहीत आणि म्हातारे असले तरी पुढेही सधन असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्याच्यावर अवलंबून नसतील असे त्याचे म्हणणे आहे.

पुण्यात स्वतःचे loan free घर आहे. हा व याची पत्नी अगदी frugal नसले तरी गरजेइतकाच पैसा खर्च करतात व त्यात समाधानी आहेत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा महिन्याचा सर्व खर्च पकडून सध्या २०-२५००० इतका होतो. तो सध्या वय वर्षे ४७-४८ म्हणजे २-३ वर्षात रिटायरमेंटचा प्लॅन करतोय. रिटायरमेंट नंतर आर्थिक कारणासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार नाही. पूर्ण वेळ छंदासाठी देणायचा त्याचा मानस आहे. आई वडील हयात असेपार्ट्यांत पुण्यातच राहण्याचा प्लॅन आहे. त्याने मला एवढेच सांगितले की त्याची शेयर आणि म्यूचूअल फंड मध्ये साधारण २५ लाख गुंतवणूक आहे आणि येत्या २-३ वर्षात शेअर मधील गुंतवणूक सोडून टोटल १ करोड होतील (राहत्या घराची किंमत सोडून....दुसरे घर नाही) त्यानंतर रिटायरमेंट चा प्लॅन आहे. त्याचे गणित असे की १ करोड वर येण्याऱ्या ६०-७०% व्याजावर घरखर्च चालवायचा आणि ३०-४०% सेव्ह करायचे आणि गुंतवायचे. शेयर आणि फंड मधील गुंतवणूक ही पुढील अनेक वर्षे तशीच ठेवायचा मानस आहे आणि अगदीच वेळ अली तर emergency म्हणून वापरायची.

त्याच्या म्हणण्यानुसार शेयर मधील गुंतवणूक आणि १ करोड रुपये उरलेले आयुष्य त्यांच्या जीवनशैलीनुसार जगण्यासाठी त्याला आणि पत्नीला पुरतील. पुढे काही वर्षांनी वडिलोपार्जित संपत्ती देखील मिळू शकते परंतु टी तो यामध्ये पकडत नाही. कदाचित आई वडील वयोवृद्ध असल्यामुळे पुढे ती संपत्ती त्यांच्या मेडिकल साठी लागू शकते असा विचार असावा. मला ते फारसे पटले नाही. वाढलेली life expectancy पाहता साधायची रक्कम अजून ४५ वर्षे (९०-९२ वर्षे जगेल असे धरून चालू) पुरणे अवघड वाटते. महागाई दर, कमी झालेल्या ठेवीवरील किमती, आणि प्रामुख्याने उतारवयात होणार मेडिकल चा खर्च पाहता पैसे पुरवणे सोप्पे नाही. परंतु त्याचे म्हणणे असे आहे की महागाई दार जरी वाढत असला तरी त्याची आणि पत्नीची जीवनशैली गेल्या अनेक वर्षांपासून साधी आहे आणि ती तशीच राहील किंबहुना रिटायरमेंट नंतर अजूनहि फ्रुगल होईल त्यामुळे आयुष्याच्या बेसिक गरजा पुरवण्यासाठी आणि जीवनशैलीसाठी ते पुरेसे आहेत. मेडिकल खर्चाचा माझा मुद्दा त्याला पटला परंतु व्याजातून मिळणाऱ्या पैशात होणारी बचत आणि शेयर आणि म्यूचूअल फंड मधील पैसा (जो लॉन्ग टर्म मध्ये वाढत जाईल) पाहता फार चिंता करायची गरज नाही. मी त्याला financial planner कडे जाण्याचा सल्ला दिला परंतु त्याला त्याची गरज वाटत नाही.
तुम्हाला काय वाटते? १ कोटी आणि वरील काही असलेली रक्कम काय पुरेशी राहील? नसल्यास दोघांसाठी किती रक्कम लागेल?
एक विनंती: कृपया नोकरी बदल, पार्ट टाइम नोकरी यावर चर्चा नको. मी त्यावर २ तास वाद घातला पण पट्ठ्याने रिटायरमेंट चे नक्की केले आहे या निष्कर्षाप्रत आलो. त्याने हा विचार २-३ वर्षे आधी सुरु केला आणि तो अजूनही ठाम आहे आणि जसेजसे पैसे साठत जातील तसा रिटायरमेंट चा विचार अधिकच प्रबळ होत जाईल एवढे नक्की. त्यामुळे चर्चा पॆसा पुरेल का आणि नसल्यास किती लागतील यावरच मर्यादित राहिल्यास उत्तम.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

>>रिस्क स्मार्टली मॅनेज केल्यास आणि होल्डिंग पिरिअड तासापेक्षाही कमी ठेवल्यास ऑप्शन ट्रेडिंग एका ट्रान्झॅक्शनमध्ये लहान लहान असे (१०००-२००० रुपये) अनेक रिटर्न बट्स चटकन देऊ शकते. >> ह्म्म. नॉट माय कप ऑफ टी असं वाटून मी जात नाही त्यावाटेला. काही पुस्तकं/ लिंका नोव्हॉईससाठी रेकमेंडेड असतील तर दे.

<<< त्यामुळेच ऑप्शन्स आणि ईतर डेरिवेटिव्ज शिवाय खरेच काही पर्याय ऊरत नाही. >>>

काय सल्ला आहे. Lol Rofl

In our view, however, derivatives are financial weapons of mass destruction, carrying dangers that, while now latent, are potentially lethal. - Warren Buffett 2002 Chairman's Letter to Shareholders

बफे साहेबांनी हे २००२ मध्ये हे म्हंटल्यापासून OTC Derivatives मार्केट फार नाही फक्त ४ पटींनी वाढलं आहे आणि त्याची नोशनल वॅल्यू ७ पटींनी (५५० ट्रिलिअन्स) Proud
बफे साहेब श्रीमंत होण्यासाठी स्वतः हे वेपन मुक्तहस्ते वापरतात हे तुम्हाला माहित नसेलच. Wink

While Buffett has decried these sorts of deals, he has defended his use of the derivatives as a way to get capital quickly, which he can then use to invest elsewhere. During the financial crisis, Buffett sold options on various stock indices, and many of those still remain on the books.

ऐकीव माहितीने घाबरून जाऊन संधी दवडू नये तर दुसरे घाबरलेले असतांना आपण अजून माहिती मिळवून शहाणे व्हावे आणि संधीचा लाभ घ्यावा. पण ज्याच्या त्याच्या तब्येतीला हे वेपन मानवणारे नाही हे खरे त्यामुळे ते वापरायलाच पाहिजे असेही काही नाही.
तुम्ही १ करोड रुपये बँकेत सेफ ठेवले तरी बँक ते ऑप्शन आणि डेरिवेटिव्जमध्येच वापरणार आहे आणि मास डिस्ट्र्क्शन झाले की १ लाख रुपये परत देणार आहे, तेव्हा निश्चिंत असा. Proud

उपाशी बोका, तुम्ही पुढच्या महिन्यात निवृत्त होणार म्हणालात. तुमच्या अनुभवाबद्दल आणि प्रवासाबद्दल वाचायला आवडेल. तुम्ही वेळेपूर्वीच निवृत्त होताय का? असेल तर तुमच्या प्लॅनिंग बद्दल थोडे सांगू शकाल का?

कोहंसोहं प्रत्यक्ष पहाण्यात अशी उदाहरणे आहेत का? या केसेस हायपोथेटीकल असतात किंवा पश्चात विश्लेषण असतात---->
प्रकाशजी, माझ्या माहितीमध्ये तरी असे कोणी नाही की ज्यांनी १५-२० वर्षे एसआयपी सुरु ठेवली. परंतु असे काही म्यूचूअल फंड अजूनही टिकून आहेत जे २०-२५ वर्षांपूर्वी सुरु झाले होते. मुळातच फंड बाबत आणि एसआयपी बाबत आपल्याकडे awareness २००४-०५ नंतर सुरु झाला. त्याआधी मोजकेच फंड निघायचे आणि २००० च्या काळात ज्यांनी गुंतवणूक केली त्यांचे रिटर्न चक्रवाढीने १५-२०% टक्के आहेत.
खालील लिंक मध्ये जुने फंड आणि त्यांचे रिटर्न यांची माहिती मिळेल. एसआयपी चा रिटर्न थोडा वेगळा असू शकतो.
https://www.quora.com/Which-is-the-oldest-mutual-fund-in-India-and-what-...

हल्ली भरमसाट फंड निघतात आणि त्यातला कोणता चालेल हे सांगणे अवघड असते. भारतीय मार्केट सुद्धा हळूहळू mature होत आहे त्यामुळेआधिसारखे रिटर्न मिळणे अवघड आहे. परंतु दीर्घकाळात (१५-२० वर्षे) ११-१२% मिळू शकेल असे वाटते.

हेज्ड कॉल्स/पुट्स, बिअर/बुल स्प्रेड्स अशा लिमिटेड लॉस स्ट्रॅटेजीज वापरा. त्यात नफा झाला की मी हेजिंग केले नसते तर ...दुप्पट /तिप्पट फायदा झाला असता अशा मोहात पडु नका. म्हणजे मास डिस्ट्रक्शन होणार नाही.

पण भारतीय मार्केट मध्ये यात लिक्विडीटी असणारे / टाईट स्प्रेड असणारे मोजकेच स्टॉक्स आणि दोनच इंडायसेस आहेत, माझ्यामते.
इतर स्टॉक्समध्ये फक्त ऍट द मनी ऑप्शन्स मध्ये जरा बरा स्प्रेड असतो आणि ते इन/आउट ऑफ द मनी गेले की स्प्रेड एवढा वाईड होत जातो की त्यामध्येच ५०% पर्यंत नफा निघून जातो किंवा नुकसान असेल तर ते ५०% पर्यंत ने वाढु शकते. (हे दोन हजार रिस्क, चार ते दहा हजार नफा या रेंज मध्ये ट्रेड करत असु तर. ) तेव्हा एन्ट्री घेण्यापुर्वी स्प्रेड्स नीट तपासून पहावे लागतात.
FNO ला स्टॉपलॉस फक्त दिवसभराकरताच लावता येतो.
दुसऱ्या दिवशी स्टॉक मोठ्या गॅपने ओपन झाला तर मोठा फटका बसु शकतो परत स्टॉपलॉस लावण्या पूर्वीच. हे अजून एक कारण स्टॉपलॉस ऐवजी हेजिंग करण्याचे.

आपण ज्येनांबद्दल नाही तर अकाली निवृत्ती घेणाऱ्यांबद्दल बोलत आहोत ना, पन्नाशी पर्यंतचे.
ज्येना आधी पासूनच ट्रेडिंग करत असतील तणावाशिवाय तर करू शकतील पण तेव्हा रिस्क फार कमी घ्यावी किंवा टाळावे.

Any bank can go bankrupt.
पण RBI त्यातल्या त्यात nationalized बँकांच्या कामकाजावर करडी नजर ठेऊन असल्याने आजवर कोणी दिवाळे काढले नाही हे खरे. आणि समजा भविष्यात कोणी काढलेच तर RBI आणि पर्यायाने Govt. ची जे ह्या बँकांवर ultimate control ठेऊन असते त्यांची तिला बुडू न देणे ही moral responsibility बनते.
ह्याचा अर्थ मोठा फ्रॉड वगैरे होऊन बँक insolvent झाली तर Govt कडून तुमचे पैसे लगोलग आणि जेवढ्यास तेवढे मिळतीलच असे नाही. अनेक महिन्यांची कोर्ट कचेरी झाल्यावरच कोर्ट liquidation protocol आणि creditors ची उतरंड ठरवेल.

मानव ऑप्शन spread आणि ते ट्रेड करतांना अति महत्त्वाच्या bid-ask spread बद्दल आणि त्या अनुषंगाने स्ट्रॅटेजी बद्दल चांगले लिहिले आहे.
आता हा धागा एवढा तांत्रिक होत चालला आहे की मला माझे black-Scholes option pricing model डोक्यात घण घालून उतरवतानाचे दिवस आठवून नॉस्टॅल्जिक झाले. Proud

Heisenberg please write more on options and derivatives . I can put a small trial sum just to learn the basics . Write on separate thread. Practical ghya.

हाब, जर ऑप्शन बद्दल लिहायला घेतलेच तर ट्रेडिंग च्या काही महत्वाच्या कमी जोखमीच्या परंतु बऱ्यापैकी चांगला नफा मिळवून देणाऱ्या स्ट्रॅटेजी बद्दल २-३ लेखांची एक लेखमाला लिहा असे सुचवेन. काही ट्रेडिंग टिप्स देता आल्या तर उत्तमच.
एक ट्रेडिंग रुल टिप्स बद्दल चांगला विडिओ नुकताच पाहण्यात आला तो इथे देत आहे....एकूणच ऑप्शन ट्रेडिंग बद्दल एका वेगळ्या धाग्यावर सविस्तर चर्चा करायला, वाचायला, आवडेल. जाणकारांनी मनावर घ्याच
https://www.youtube.com/watch?v=MDyFZZl5Gz8

अमा, स्टॉक इंट्रा डे ट्रेडिंगचा चांगला अनुभव नसेल तर त्या भानगडीत पडू नका.

मायबोलीच्या मागच्या जन्मी केदार ने स्टॉक ट्रेडिंग बद्दल बरेच काही लिहीले होते. त्यात options आणि futures बद्दल पण आहे.
https://www.maayboli.com/node/14289
तिथेच पुन्हा चर्चा सुरू करू शकतो.

माझे black-Scholes option pricing model डोक्यात घण घालून उतरवतानाचे दिवस आठवून नॉस्टॅल्जिक झाले >> बाप रे! Proud
मी ते असतं एक इक्वेशन असं म्हणुन बाजूला सारले आणि डेल्टा थेटा शिवाय जास्त काही बघितले नाही.

तुम्ही लिहीणार आहात तर छान माहिती मिळेल.

> नोकरी सोडताना खरेच खूप विचार करावा. दिवसाचे 24 तास आणि आयुष्यतली पुढची तीस ते चाळीस वर्षे काय करणार आहात, कशाला वाहून घेणार आहात हे मनाशी पक्के करूनच जॉब सोडावा. > याच्याकडेदेखील लक्ष द्या.
फक्त तुम्ही काय करणार याचा विचार न करता तुम्ही काय नाही करणार याचे नियमदेखील आखून घ्या.
ब्रेडविनरच्या 'रात्री झोपायला घरी येणारा माणूस' रुटीनची बाकीच्यांना सवय झालेली असते. गृहिणी-(या केसमधे नाहीयत पण)मुलं-मोलकरणी यांचं आपापसात रॅपो बनून गेलेलं असतं. तिथे तुम्ही लुडबूड करायला जाऊन सगळी समीकरणं बिघडवू शकता. त्यामुळे निवृत्त होऊन घरात बसणार आहात की घराबाहेरच (बोंबलत!) फिरणार आहात ते आधीच ठरवा. घरात बसणार असाल तरी फर्निचरसारखे चुपचाप बसून रहा, आपापली पुस्तकं वाचत किंवा सिनेमा-मालिका बघत. सांगितल्याशिवाय 'मदत' करायला जाऊ नका Wink

उत्तम चर्चा. वाचतोय.
बरेच उपयोगी मुद्दे मिळाले.
लवकर निवृत्त व्ह्यायचं हे स्वप्न सार्वत्रिक असावं.

थोडेसे अवांतर - वैद्यकीय उपचारांवरील खर्च हा एक मोठाच मुद्दा मांडला जातोय तर सरकारी दवाखाने /इस्पितळामधून उपचार घेणे हे ही खूप महाग असते का विचारातही न घेण्याइतके खराब प्रतीचे?

भारतभूमीच्या इतिहासात एकच मनुष्य व्यवस्थित रिटायर झाला

खुदा का नेक बंदा , आलमगीर औरंगजेब
1. वय 88 वर्षे
2. प्रॉपरटी : अर्धा अखंड हिंदुस्तान

हे दोन्ही क्रायटेरिया जो पूर्ण करत नाही, त्या पामराने स्वतः स रिटायर मानू नये, किमान एक क्रायटेरिया तरी पूर्ण करावा.

इंडस्ट्री सोडून 2 वर्षे झाली की पुन्हा इंडस्ट्रीत कुणी घेत नाही , किंवा खाली जावे लागते. दर 5 वर्षांनी पे स्केल बदलतात , एकदा सगळे सोडले की फक्त व्याज एके व्याज

थोडी अधली मधली चर्चा वाचली
धडकी भरवणारी आहे.
किमान तीन चार करोड हातात हवेत नाहीतर म्हातारपणी तुमचे हाल कुत्रा खाणार नाही असा सूर दिसला.
आपल्या देशात किती टक्के लोकांकडे ईतका पैसे असावा हा प्रश्न पडला.
ज्यांच्याकडे नाही ती लोकं कश्याच्या भरवश्यावर जगत आहेत याची चिंता वाटली.

पण मुळात मला हे समजत नाही की तिथे तो अमिताभ आजही पोटापाण्यासाठी काम करत असताना त्याच्या निम्या वयाची लोकं पैसे कमावणे बंद करायचा विचार का करत आहेत?

जर छंद जोपासण्यासाठी कोणी काम करणे बंद करत असेल तर तुम्ही एक चूक आजवर करत आला आहात की छंद आणि पर्सनल लाईफची काशी करून आजवर पैश्यामागे धावत होताय.
आणि आज पहिली चूक सुधारायला दुसरी चूक करत आहात.

आपण पैसा कमावतो तो काहीतरी काम करून. आणि ते काम करून तुम्ही समाजाच्या, देशाच्या, मानवजातीच्या प्रगतीला हातभार लावत असता. आपल्यातर्फे काहीतरी भर टाकत असता.
आणि आता हातपाय धडधाकट असूनही काही न करता फक्त तुकडे तोडत जगायचे. आपल्यातर्फे समाजाला काहीच द्यायचे नाही. छे, जीवनाला काय अर्थ उरला मग, कसले डोंबलाचे छंद मग आनंद देणार.

माझं म्हणाल तर जेव्हा माझ्या हातापायात एकही पैसा कमवायची शक्ती उरणार नाही तो माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल किंवा तो आयुष्याचा शेवटचा दिवस ठरावा अशी देवाकडे प्रार्थना राहील. भले मग आधीच्या आयुष्यात अरबो रुपयांची सेव्हिंग का असेना.

@मानव पृथ्वीकर
डेट फंडाबद्दल चाललंय हे लक्षात राहिल नाही.
STCG म्हणजे शेअरबद्दल हे एवढ डोक्यात बसलय की.
असो.
माझी चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.
_/\_

Any bank can go bankrupt.
पण RBI त्यातल्या त्यात nationalized बँकांच्या कामकाजावर करडी नजर ठेऊन असल्याने आजवर कोणी दिवाळे काढले नाही हे खरे.>>

तांत्रिक माहिती बरोबर आहे. पण प्रत्यक्षात Nationalised Bank बुडू शकत नाही. हे सिद्ध झालेले आहे. पंजाब नॅशनल बँकेचे स्कँडल झाले तेव्हा, बँकेची किंमत १/३ ने कामी झाली. शेअर्स अगदी तळाला पोचले. ज्यांनी ज्यांनी ते शेअर्स खरेदी केले त्यांचा अफाट फायदा झाला; कारण सरकारने ती बँक बु डू दिली नाही.

पण मुळात मला हे समजत नाही की तिथे तो अमिताभ आजही पोटापाण्यासाठी काम करत असताना त्याच्या निम्या वयाची लोकं पैसे कमावणे बंद करायचा विचार का करत आहेत? >> प्रश्न rhetorical आहे हे समजलं आहे तरी थोडा उहापोह करते.

मूळात आता अमिताभसाठी पैसा हे साध्य (गोल) किंवा साधन नसावे. पैसा हे त्याला बाय-प्रॉडक्ट आहे. जीवघेणा आजार झाला, कोट्यावधीचे कर्ज झाले इ इ तरी जे त्याला आवडतं, ज्यात तो तरबेज आहे, ज्या कलेची लोकांनाही गरज आहे ते ते तो करत रहातो. सर्वसाधारण माणूस पैसा साध्य का साधन अस तळ्यात-मळ्यात खेळण्यात आयुष्य घालवतो. FIRE (Financially Independent Retire Early) Movement बद्दल मला फार भक्ती नाही कारण तिथे पैसा हे आधी साध्य व नंतर साधन मानले आहे. इतकं आखीव जगता येतं का? ह्याची विश्वसनीय आकडेवारी उपलब्ध नाही. पन्नाशी पर्यंत पोहोचता पोहोचता आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे नोकरी गेली तरी हरकत नाही अशी परिस्थिती यावी पण ती आली म्हणून लोकांनी निवृत्त व्हावे असे वाटत नाही.

[अर्थात मला तशी संधी आली तर मी निवृत्त होईनच .... मी ही माणूसच आहे, तेव्हा असे डबल स्टँडर्ड ठेवणे चालते... Wink Happy ]

अमिताभ त्याला जे क्षेत्र मनापासून आवडत होते, ज्याची पॅशन होती त्या क्षेत्रात उतरला, त्यात यश, पैसा, मान मिळणार की नाही याची जराही चिंता न करता. त्याने भरभरून काम केले, सोबत यश, पैसा, मान सगळे कमावले, लोक आजही त्याला स्वतःहून बोलावतात.

बाकीची आम जनता स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेऊन ज्यात यश, पैसा व मान मिळेल असे त्यांना किंवा त्यांच्या पालकांना वाटले त्यात घुसली/घुसवली गेली. ह्याच क्षेत्रात काम करायचे, हीच माझी पॅशन ही निर्णयक्षमता तेव्हा होती की नाही त्यांचे त्यांनाच ठाऊक. आता हवे तितके यश, मान, पैसा कमावल्यावर किंवा निर्णयक्षमता आल्यावर त्यांना यातून बाहेर पडायचे आहे.

कदाचित हे कारण असेल, अमिताभ आजही तेच काम करतोय जे त्याला त्याच्या पंचविशीत करायला आवडत होते. आणि सामान्य जनतेतील काहीना पंचविशीत केलेल्या कामाचा कंटाळा आलाय.

आणि मग तरुण म्हणतात की हे म्हातारे किंवा काम__करु__की__नको विचारात असलेले लोक केव्हा बाजूला होतील?

पण मुळात मला हे समजत नाही की तिथे तो अमिताभ आजही पोटापाण्यासाठी काम करत असताना त्याच्या निम्या वयाची लोकं पैसे कमावणे बंद करायचा विचार का करत आहेत? >>>>>>> खरे तर आपल्याला अमिताभच्या वैयक्तिक गरजा उद्दिष्टे, आवड याबद्दल फार काही माहित नाही त्यामुळे तो नक्की कशासाठी काम करतो ते काळाने अवघड आहे. कदाचित आवड म्हणूनही करत असेल किंवा त्याची लाइफस्टाइल जपण्यासाठी, सोशल प्रेशर म्हणून, बाकीच्या अनेक उद्योगात, इन्व्हेस्टमेंट मध्ये झालेला तोटा भरून काढण्यासाठी (यांचे बरेच बाकीचे उद्योग/इन्व्हेस्टमेंट असतात असे वाचले होते) , किंवा मुलाचे आणि सुनेचे इन्कम बंद झाल्यामुळे कुटुंबाची जीवनशैली चालवण्यासाठी सुद्धा काम करत असेल. सांगणे अवघड आहे कारण आपल्याला नाण्याची दुसरी बाजू ठाऊक नसते.
समजा अमिताभ केवळ आवड म्हणून ना की पैश्यासाठी, पोटापाण्यासाठी काम करत असेल आणि उद्या त्याला फक्त तरुण्पणी मारल्या तश्या उड्या मारायला, धावायला, अतिश्रमाचे काम किंवा ऍक्शन सीन करायचे काम आले आणि बाकी काहीच नसेल तर तो ते करेल का? तोदेखील असाच विचार करेल की आयुष्यात गरजेपुरते कमावले आहे आता असह्य त्रास करून घेऊन काम करत बसण्यापेक्षा कोठेतरी थांबावे किंवा वेगळा छंद जोपासावा. सामान्य माणसाचे देखील तसेच आहे की.

"आणि आता हातपाय धडधाकट असूनही काही न करता फक्त तुकडे तोडत जगायचे. आपल्यातर्फे समाजाला काहीच द्यायचे नाही." >>>>>>>> छंद जोपासताना त्याचा समाजाला काहीच उपयोग होत नाही हा समाज चुकीचा आहे. छंद हा वैयक्तिक पातळीवर आनंद देणारा असला तरी लोकोपयोगी पण असू शकतो. जसे की समाजसेवा, गरीब मुलांच्या शाळेत शिकवणे, त्यांची शिकवणी घेणे, शेती, किंवा चित्रकला, संगीत चांगले जमत असेल तर ते शिकवणे, हॉस्पिटल, बँक मध्ये गरजूंना फॉर्म भरून देणे इत्यादी. काहीच न करता कोणीच जास्त वेळ राहू शकत नाही खास करून मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय कारण त्यांना कामाची सवय झालेली असते असे मला वाटते. मग कोणीही सुरुवातीला काहीही म्हणोत. काही महिन्यानंतर कंटाळा येतोच.
"छे, जीवनाला काय अर्थ उरला मग, कसले डोंबलाचे छंद मग आनंद देणार." >>>>>> जीवनाचे उद्दिष्टच मुळी आनंद मिळवणे हे आहे. उपजीविका सोडली तर पैसा आनंद मिळवण्याचे साधन आहे. उलट ते काम करणे ज्यात खरा आनंद मिळतो खासकरून तेंव्हा जेंव्हा मनाविरुद्ध पैश्यासाठी काम करायची गरज संपते, त्याच जीवनाला खरा अर्थ असे मी म्हणेन.

"माझं म्हणाल तर जेव्हा माझ्या हातापायात एकही पैसा कमवायची शक्ती उरणार नाही तो माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल किंवा तो आयुष्याचा शेवटचा दिवस ठरावा अशी देवाकडे प्रार्थना राहील">>>>>> फक्त पैसा कमावणे हाच छंद आणि तो कमवण्यातच ज्याला खरा आनंद मिळत असेल तर त्याने तो आनंद जरूर उपभोगावा. परंतु प्रत्येकाचे छंद आणि आनंद वेगवेगळे असतात.

मलाही आधी तुमच्यासारखेच वाटायचे. परंतु मित्राशी बोलल्यावर नाण्याची दुसरी बाजूही पटली. मनाविरुद्ध शरीर आणि मनावर अयोग्य परिणाम होईल असे काम करत राहण्यापेक्षा जे आवडेल ते करणे खास करून पैश्याची गरज नसताना यात मला त्याचे काही चुकीचे वाटले नाही.

हे समद वाचून प्रशांत महासागरात एकाद्या बेटावर मासे पडकून उदर निर्वाह करावा असा वाटू रहायले!!

कोहंसोहं१०,
तुमच्या मित्रावर मुलाबाळांची जबाबदारी नाही मात्र त्याचवेळी एल्डरकेअर संबंधी भविष्यातील गरजांसाठी प्रत्येक वेळी पैसे देवून सेवा घेणे होईल तेव्हा अधिक पुंजी लागेल.
आईवडील सधन आहेत आणि पैशासाठी अवलंबून नाहीत हे उत्तम. त्यांच्याशी मोकळेपणी बोलणे झाले आहे का? त्यांच्याशी देखील अर्थिक नियोजनाबाबत मोकळेपणी बोलावे म्हणजे त्या बाजूने कटू सरप्रायझेस टाळता येतील. मध्यंतरी बर्‍याच जेष्ठांचे आयुष्याचे सेविंग चुकीच्या ठिकाणी ठेव म्हणून गुंतवल्याने बुडाले. आपण रिटायर झाल्यावर जर जेनांबाबत अशी काही सरप्रायझेस आली तर सावरताना दमछाक होते. त्यामुळे त्या फ्रंटवर सगळे खरेच आलबेल आहेना हे पहावे.
पुण्यासारख्या शहरात स्वतःचे लोन फ्री घर आहे ही जमेची बाजू. रेंटल उत्पन्नासाठी अजून एक घर घेण्याची ही वेळ नाही, मात्र आहे त्याच घरात पेइंग गेस्ट म्हणून एक व्यक्ती ठेवणे शक्य झाल्यास ते फायद्याचे ठरेल. जोडीला एक वेळचे जरी जेवण पुरवले तर फायदा वाढेल. सध्याची महिन्याच्या खर्चासाठीची गरज तशी माफक आहे. मात्र गरज ठरवताना त्यात नेहमी एक बफर असावा. निम्मी आर्थिक गरज सिझनल गृहउद्योग, अर्धवेळ काम, फ्रीलान्सिंग असे करुन ६० व्या वर्षापर्यंत भागवता येइल का? तसे झाल्यास जमापु़ंजीला वाढायला अजून १० वर्षे मिळतील. त्यानंतर व्याज वगैरे धरुन वार्षिक उत्पन्नातले निम्मे उत्पन्न वापरायचे आणि निम्मे बचत करुन गुंतवत रहायचे असे केल्यास पुंजी पुरावी. डाऊनसाईझ करुन लहान शहरात रहायला जायचा विचार केल्यास हे घर विकू नये, भाड्याने द्यावे आणि दुसरीकडे लहान कमी भाड्याचे घर घ्यावे. वय वाढते तशा गरजा बदलतात. जेनांसाठी आरोग्य विषयक आणि इतर आधार देणार्‍या सेवा पुण्यासारख्या शहरात मिळतील तश्या लहान शहरात मिळणे कठीण जावू शकते. तसे झाल्यास किंवा इतर काही कारणाने उद्या विचार बदलल्यास परत येता येइल. रिवर्स मॉर्ट्गेज वापरुन पैसे उभे करणे हा शेवटचा पर्याय ठेवावा. तुमच्या मित्राला शुभेच्छा!

५० व्यावर्षी रिटायर झालेली व्यक्ती माझ्या नात्यात आहे. मात्र यासाठी आधीपासुन आर्थिक नियोजन लागते. इतरांशी तुलना करण्याचा स्वभाव नाही, मुळचे रहाणीमान साधे. का रिटायर होणार हे स्वतःसाठी क्लिअर होते आणि मोकळा वेळ कसा घालवणार याचेही योग्य नियोजन होते. काम करणे पूर्ण थांबवले नाही मात्र कामाचे स्वरुप बदलले. अर्ली रिटायरमेंटनंतर सरकारी महागाईसुसंगत पेन्शन आणि जोडीला अर्धवेळ फ्रीलान्सिंग असे करुन घरखर्च भागवला आणि त्यातही काही प्रमाणात बचत करुन पैसे बाजूला टाकले. साठी पर्यंत जमापुंजीला हात न लावता ती वाढू दिली. वडीलोपार्जित संपत्तीकडे एक कस्टोडियन म्हणून बघितले आणि ती नियोजनात धरली नाही. त्यामुळे ते सेफ्टीनेट वेगळे, सुरक्षित आहे. जेनांची काळजी घेणे आणि गंभीर आजारातून उठलेल्या जोडीदारासोबत आनंदात दिवस घालवणे, छान आठवणी गोळा करणे एवढेच ध्येय होते. आज मागे वळून बघता त्या व्यक्तीला जे आत्मिक समाधान आहे ते अमुल्य आहे. या व्यक्तीचे व्यावसायीक जीवन यशस्वी होते मात्र त्यांची आयडेंटीटी त्यातच गुंतलेली नव्हती. त्यामुळे हुद्दा सोडल्यावर काहींना जे 'सामान्य' असणे जड जाते तसे झाले नाही. घरकामाची आवड आणि पूर्वीची सवय होतीच. व्यक्तीमत्वात एक लवचिकता असल्याने त्यांचे नोकरी सोडून घरी रहाणे इतर सदस्यांसाठी सुखावह झाले. बागकाम, वाचन, गायन ऐकणे, फोटोग्राफी, पेंटिंग करणे असे स्वान्त सुखाय छंद आहेत. चौफेर वाचन, नव्यातले चांगले खुल्या मनाने स्विकारायची वृत्ती यामुळे त्यांच्या स्वतःच्या ५ वर्षाच्या नातीपासून माझ्या २०+ मुलापर्यंत सगळ्यांना हे आजोबा फार प्रिय आहेत.

Pages