आहारानुरूप आचारसंहिता, व्यवस्था आणि आहारसवयींचे मुद्रांकन

Submitted by भरत. on 17 January, 2018 - 00:20

मुंबईच्या आय आय टी नामक कुठल्याश्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आहाराची सोय करून दिली. त्यांच्या आवडीचा आहार करायचे स्वातंत्र्य दिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या आहारानुरूप ताटवाट्या इत्यादीचीही व्यवस्था केली. "आय आय टीच्या संकुलातील सर्व भोजनगृहांत देण्यत येणारे मुख्य जेवण हे शाकाहारी असून ते मोठ्या ताटामध्येच देण्यात येते. या व्यतिरिक्त ज्यांना मटण, अंडे यांसारखे मांसाहारी जेवण हवे असल्यास ते बाजूला वेगळ्या ताटामध्ये दिले जाते. मात्र विद्यार्थी मुख्य ताटामध्येच मांसाहारी जेवण घेत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी भोजनगृहाला केली. त्यानंतर मांसाहारासाठी नेमलेली ताटेच वापरावीत, मुख्य ताटांमध्ये मांसाहार करू नये, अशी सूचना भोजनगृहातून विद्यार्थ्यांना ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली."

इतकी साधीशी गोष्ट. पण राईचा पर्वत करणे , खोडसाळपणा, उगा आग आग म्हणून ओरडणे अशा सवयी लागलेल्या कुणा फुरोगामी टाइप विद्यार्थिनीनीने या निर्णयाबद्दल समाजमाध्यमांत आक्षेप घेतला. समाजमाध्यमांच्या सहज उपलबधतेमुळे आजकाल कोणीही उठतो, काहीही लिहितो आणि त्याला उगाच हवा दिली जाते. (हा लेखही त्याच प्रकारातला असल्याची टिप्पण्णी अपेक्षित.) मुळात विद्यार्थ्यांचं काम शिकणं हे आहे, त्यांनी आपलं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीत केंद्रित केलं पाहिजे. पण विद्यार्थी आजकाल अभ्यासाव्यतिरिक्त अन्य गोष्टींतच अधिक रममाण होतात, हे आपण कन्हैयाकुमार प्रकरणात पाहिलेच आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी असलेले नियम पाळलेच पाहिजेत. शिस्तीनेच राष्ट्र मोठ्ठे होते; शिशुवर्गापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी शिस्त पाळली गेलीच पाहिजे, हे आदर्णीय राम माधव यांनी नुकतेच ठणकावून सांगितलेच आहेच.
असो , तूर्तास आपण आहारसवयींबद्दल विचार करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या आहारासाठी त्या त्या प्रकारच्या प्लेट्स वापरणे हे खरे तर अत्यंत सोयीचे आहे. आपल्या वेदांत त्याबद्दल उल्लेख असेलच. पण हीच गोष्ट पुढे नेऊन आणखीही काही नियम केले पाहिजेत असे मला वाटते. ते पुढीलप्रमाणे.
१. शाकाहार्‍यांच्या वस्तीत मांसाहार्‍यांना घरेच देऊच नयेतच; हे तर आता बहुतांश लोकांना मान्य झाले आहेच.
२. आपण कोणा मांसाहार्‍याकडे पाहुणे म्हणून जात असू तर शाकाहार्‍यांनी आपली ताटवाटी सोबतच घेऊनच जावेच.
३. भोजनालये, उपाहारगृहे ही एकतर शुद्ध शाकाहारी किंवा शुद्ध मांसाहारी अशीच असावीतच; नसल्यास त्यात मांसाहारींच्या बसण्याची आणि अर्थातच भांड्यांची व हात- तोंड धुण्याची सोय वेगळीच असावीच. शाकाहारी स्वयंपाकघर आणि मांसाहारी स्वयंपाकघर वेगवेगळीच असावीतच आणि एकमेकांपासून पुरेशी लांबच असावीतच.
४. विमान , दूर पल्ल्याच्या रेल्वे आणि बसेसमध्ये आहारनुरूप सीट्स दिल्याच जाव्यातच. म्हणजे शाकाहारींना मांसाहाराचे दर्शन, गंध ,नाद यांचा उपद्रवच होणारच नाहीच).
५. आधार कार्डावर व्यक्ती शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंद केलीच जावीच. तंत्रज्ञान प्रगत होईल, तसे आपण काय काय खाल्ले त्याची माहितीही आधारच्या महासंगणकातच साठवलीच जावीच.
६.शाकाहारी आणि मांसाहारींच्या पासपोर्टच्या जाकिटांच्या किनारीचे डिझाइन वेगवेगळेच ठेवावेच. (अन्य गोष्टींसाठी वेगवेगळे रंग वापरून संपल्याने हा पर्याय)
७. आय आय टी मुंबई व तत्सम उच्च शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्रांत विद्यार्थी शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंदच असावीच. शाकाहारी विद्यार्थ्यांंच्या उदात्त, उज्ज्वल, सुंदर, मंगल, सुकोमल भावनांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन व्हावे याकरिता त्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मांसाहारबहुल देशांतच जाऊच देऊच नयेच. बहुतेक प्रगत देश या देशांच्या दुर्दैवाने मांसाहारबहुल आहेत. पण विश्वगुरू हिंदुस्तान आपल्या महान संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार जगभर करतोच आहेच. लवकरच जगातले बहुसंख्य देश मांसाहारच सोडूनच देतीलच. त्याचीच सुरुवात झालीच आहेच.)

मायबोलीकर या सूचनांमध्ये भरच घालतीलच. त्यांचे संकलन करून त्या सूचना केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय, महाराष्ट्रा शासनाचा शिक्षण विभाग व आदर्णीय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय यांना पाठवायचाही विचार आहेच.

धन्यवादच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुद्दामून 'हे खा.त्यात काय होते? तुला चालेल' म्हणून देणे यावर आक्षेप. >>>>
हे तर शाकाहारी पदार्थांबद्दल हि होते की. जास्त तीखट, जास्त मसाला, जळजळीत पदार्थ यात देखील अभिमान बाळगणारे आणी दुसर्याला कमी लेखणारे असतातच की.

शाकाहाराला जास्त ग्लॅमर आहे असे वर कोणीतरी म्हटले आहे त्याच्याशी सहमत आहे. अपवाद सोडले तर साहित्यात, नाटकसिनेमात मांसाहाराचे उल्लेख आढळत नाहीत किंवा ताटात एखादा मांसाहारी पदार्थ दिसत नाही. कदाचित मांसाहार हा हीन आणि असात्त्विक अशी पूर्वापार धारणा बनलेली/बनवलेली असावी आणि जे हीन ते कशाला दाखवायचे असा काहीसा विचार यामागे असावा. किंवा मांसाहार ही चोरून करायची गोष्ट आहे असेही काहींना वाटत असावे. किंवा टीवीच्या पडद्यावर, रंगमंचावर असे दाखवले तर लोकांच्या (काहींच्या नव्हे, बहुसंख्यांच्या, कारण टी आर पी मोजताना बहुसंख्या महत्त्वाची.) भावना दुखावल्या जातील असा समज असावा किंवा तो बळंच करून दिलेला असावा. किंवा रंगमंचाचे पावित्र्य भंग पावत असावे.
किंवा,मांसाहार करणार्‍यांच्या जीवनशैलीचे प्रतिबिंब यातल्या कुठेच पडत नसावे कारण मांसाहार्‍यांचे या माध्यमांवर प्रभुत्व नाही, किंवा हे लोक पुरेशा सशक्तपणे आपल्या जीवनशैलीबाबत अद्याप व्यक्त होत नाहीत, आजपर्यंत झाले नाहीत, त्यांना व्यक्त होता येत नाही किंवा त्यांच्या अभिव्यक्तीला मार्केट वॅल्यू नाही.

अनु,
हे तुमच्या प्रतिसादाशी संबंधित असले तरी तुम्हाला उद्देशून नाही.तुमची इकडची भूमिका खूपच सहिष्णू आणि लॉजिकल आहे.

कुठेही डिस्क्रिमीनेशन बद्दल (विधवा बायका -हळदी कुंकू, दलित/मुस्लिम - वेगळी वागणूक इत्यादी ) धागा असेल तर 2 3 ids तरी आम्ही हे करीत नाही, आम्हाला हे चालते आशा अर्थाच्या पोस्ट हिरीरीने करतात,
तुम्ही हे करता हे ग्रेट आहेच, पण तुम्ही किंवा काही मोजकी इतर लोक वैयक्तिक पातळीवर करतात (आणि त्याच वेळी संस्थात्मक पातळीवर याच्या विरुद्ध वातावरण असते ) त्याने समाज बदलणार नाहीये, म्हणजे फरक पडेल हे मान्य पण दृश्य फरक पडायला काही दशके जायला लागतील.

या उलट संस्थात्मक पातळीवर जर थोडे जास्त सहिष्णू आणि पुरोगामी निर्णय घेतले गेले तर फरक जास्त लौकर पडेल हे मान्य होण्यास हरकत नसावी.

आता, संस्थात्मक पातळीवर याच्या विरुद्ध प्रयत्न होतात असे मी का म्हणतो?
एक उदाहरण देतो.
भारतात 60% किंवा जास्तच लोक मांसाहार करतात,
आर्थिक दृष्टया गरीब वर्गातील लहान मुले पोषक आहारासाठी अंगणवाडी, शाळा इकडे मिळणाऱ्या मध्यान्ह भोजनावर अवलंबून असतात,
अशावेळी मध्यान्ह भोजनात अंडी देणे हा पोषण मूल्य वाढवायचा सोपा मार्ग असतो. तामिळनाडू, केरळ, ओरिसा, बंगाल ही राज्ये हा मार्ग अवलंबत आहेत.
मात्र राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, अगदी UP आणि बिहार सुद्धा हा मार्ग हेतुपुरस्पर टाळत आहेत. (इकडे पक्षाचा संबंध लावू नये, कुठल्या राज्यात व्हेज/ नॉनव्हेज कुठली लॉबी प्रभावशाली आहे त्याचा संबंध आहे)

आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये अंडी देण्यास विरोध करताना एक शाकाहारी मुखमंत्री म्हणतात " मी खुर्चीत असे पर्यंत, मध्यान्ह भोजनात अंडी दिली जाणार नाहीत"
याचा अर्थ सरकार , ते चालवणाऱ्या लोकांच्या खाण्या पिण्याच्या वैयक्तिक सवयीना अनुसरू बाकीच्या राज्यासाठी निर्णय घेत आहे.

यालाच मी शाकाहारी लोकांची दादागिरी म्हणतो.

परंपरागतरित्या, अभिजन वर्ग, जो सत्ताधारी किंवा सत्ताधाऱ्यांच्या निकट आहे तो उच्चवर्णीय राहिला आहे, त्यामुळे या वर्गाला स्वीकार्हय वाटणाऱ्या गोष्टीचे नियम होऊन बहुजन वर्गास ते पाळावे लागतात (नियम करणाऱ्या हिंदू लोकांना (जे मोस्टली उच्चवर्णीय आहेत) गाय पवित्र वाटते, म्हणून प्रत्यक्ष गाय पाळणाऱ्या हिंदू लोकांना (मोस्टली बहुजन) नुकसान सोसूनही ते पावित्र्य जपावे लागते, हे एक उदाहरण).
बंगाल सारख्या ठिकाणी जिकडे उच्चवर्णीय भद्र लोक मांसाहार करतात तिकडे हे बायस दिसत नाही. (तीकडे कदाचित वेगळ्या मुद्द्यावर डिस्क्रिमीनेशन होत असेल)

जसे मी म्हंटले इन्फ्लुएंशीअल लोक veg असल्याने , त्यांनी सहिष्णुता दाखवल्या शिवाय समाज बदलणार नाही.

सिम्बा यांचा १९-०१-१८, ०२:५७ हा प्रतिसाद अतिशय आवडला. हेच स्पष्ट करण्यासाठी लिहायचे मनात होते. पण हे सर्व उत्कृष्टपणे मांडले आहे त्यामुळे आता लिहीत नाही.

Submitted by सिम्बा on 19 January, 2018 - 02:57 >>>>>>>>>>>> गुड पोस्ट . आणी अशा लोकांना वेळिच विरिध नाहि केला तर हे वाढतच जाते - जसे आता बीफ बद्दल चालु आहे, मग मुलींनी जीन्स घालण्याबद्दल येते.
त्यामुळे हा केवळ व्हेज - नोन व्हेज मुद्दा नाहिये, ही प्रव्रुती आहे समाजात फुट पाडणारी ज्यांना काहितरी विषय काढुन फुट पाडायची आहे. नाहितर स्वच्छ धुतलेल्या प्लेटस मधुन नंतर शाकाहारी खाउ शकत नाहित हा मुद्दाच होउ शकत नाहि.

घ्या
मला माझ्या किचेन मध्ये काय चालते आणि मित्रांच्या किचन मध्ये काय चालते याची 100% खात्री आणि विश्वास आहे.

पण तुमच्या किचन मध्ये काय चालते याचा काडीचा अंदाज नाही

---

लिहिले तुमच्या मनासारखे ... खुश का आता Wink

>>आणी अशा लोकांना वेळिच विरिध नाहि केला तर हे वाढतच जाते - जसे आता बीफ बद्दल चालु आहे, मग मुलींनी जीन्स घालण्याबद्दल येते.
+४२

{ हॉटेल च्या डिस्प्ले एरिया मध्ये काय ठेवावे आणि कश्या पद्धतीने ह्यावर guide lines असायला हरकत नाहीत कारण ते लोकांना दिसते त्यांना डोळे मिटून रस्त्यावरून जा हे म्हणणे म्हणजे त्यांच्यावर तुमचा प्रेफेरेन्स लादणे हे आहे.आता बोला}

हेच आर्ग्युमेन्ट बायकांनी तोकडे कपडे घालण्यासंदर्भात केलं (कारण ते लोकांना दिसते त्यांना डोळे मिटून रस्त्यावरून जा हे म्हणणे म्हणजे त्यांच्यावर तुमचा प्रेफेरेन्स लादणे हे आहे.आता बोला) की त्यातल्या त्रुटी चटकन कळतात

"तुमची इकडची भूमिका खूपच सहिष्णू आणि लॉजिकल आहे."
(आंतरजालावर एक (चांगलीच) भूमिका मांडणे, त्याच्याशी इन लाईन पोस्ट नेहमी पाहिजे तितका रिअ‍ॅक्शन टाईम घेऊन लिहीणे सोपे असते.प्रत्यक्ष माणूस बराच कटकटा असू शकतो Happy - संदर्भ 'आंतरजालीय जीवनोन्नतीचे सहा सोपान' संत अन्वानंद Happy )
"जसे मी म्हंटले इन्फ्लुएंशीअल लोक veg असल्याने , त्यांनी सहिष्णुता दाखवल्या शिवाय समाज बदलणार नाही."
हे एकदम खरे.पूर्ण प्रतिसादाशी सहमत.

"हे तर शाकाहारी पदार्थांबद्दल हि होते की. जास्त तीखट, जास्त मसाला, जळजळीत पदार्थ यात देखील अभिमान बाळगणारे आणी दुसर्याला कमी लेखणारे असतातच की."
याबद्दलही सहमत. तेही चुकीचेच आहे. (हे कमी तिखट खाणार्‍या घरातून 'झणझणीत' घरात आलेल्या सुनांबद्दल हमखास होतेच.)

हेच आर्ग्युमेन्ट बायकांनी तोकडे कपडे घालण्यासंदर्भात केलं (कारण ते लोकांना दिसते त्यांना डोळे मिटून रस्त्यावरून जा हे म्हणणे म्हणजे त्यांच्यावर तुमचा प्रेफेरेन्स लादणे हे आहे.आता बोला) की त्यातल्या त्रुटी चटकन कळतात>>>>

व्यत्यय हे लॉजिक वापरू नका, लोन्जरी मधल्या स्त्री प्रतिमा डिस्प्ले वर ठेवण्यास बंदी आहे पूर्वी पासून Happy

http://www.firstpost.com/mumbai/to-fight-sex-crimes-bmc-clears-proposal-...

कोर्टात आव्हान दिले जात नाहि म्हणुन असली इलिगल बंदी चालते, नाहितर पद्मावत बाबत पडले तसे फटके पडतात कोर्टा कडुन

व्यत्यय,

हेच आर्ग्युमेन्ट बायकांनी तोकडे कपडे घालण्यासंदर्भात केलं (कारण ते लोकांना दिसते त्यांना डोळे मिटून रस्त्यावरून जा हे म्हणणे म्हणजे त्यांच्यावर तुमचा प्रेफेरेन्स लादणे हे आहे.आता बोला) की त्यातल्या त्रुटी चटकन कळतात>>>>

तुम्ही जे म्हणत आहात ते माझ्या डोक्यात आले नाही आणि दुकानदारांना restrict करायच इंटेनशन ही नव्हतं.
माझ्या डोक्यात वेगळी गोष्ट होती -
मी वर जेंव्हा म्हणाले की प्राण्यांचे मुंडके,शेपूट,मास लटकवायचे ते आत डिस्प्ले एरिया मध्ये ठेवा ह्याचे कारण ह्या गोष्टी डोक्यात होत्या.ह्यात दुकांदारावर सक्ती करता येणार नाही कारण त्याचा तो बीजीनेस आहे.पण व्यत्यय तुम्ही म्हणताय तसा विचार की उद्या बायकांना उघडे बघवत नाही म्हणून त्यांना कपडे घाला असे सांगाल का हा विचार डोक्यात आला नाही.बायकांनी कपडे घातले नाहीत तर ते स्वतःच्या मर्जीने खुशीने, प्राण्यासारखे त्यांच्या मर्जी विरुद्ध केल्या जात नाही.तसे मेल्या नंतर त्यांचे काहीही केले तरी काय फरक पडतो म्हणा. मला बऱ्याच वेळेला 'humanity' ही गोष्ट फक्त माणसांपर्यंत सीमित का राहते आणि प्राण्यां पर्यंत येत नाही ह्याचे आश्चर्य वाटते.

प्राणी मारले जातात आणि मी आधी म्हंटले तसे कोंबड्या,बकरी,कुत्रा,गाय,म्हैस ह्या प्राण्यांना भीती, वेदना जाणवतात कारण त्यांची physiology वेगळी असते आणि त्यांना nervous system असल्या मुळे त्यांना मारायला नेताना किंवा मारताना त्यांना ह्या गोष्टी जाणवतात.हे प्लांट्स च्या बाबतीत होत नाही, they dont feel fear pain etc.
आधी ठरावीक प्रमाणात नॉन व्हेज खाल्ल्या जायचे साधारण जिथे व्हेज सहज available नव्हतं तिथे त्यामुळे हे प्राणी मारल्या गेले तरी त्याला काही तरी सीमा असायची.आता प्रमाण त्या मानाने बरच वाढलंय त्यामुळे हे प्रपोर्शन balanced राहिलेलं नाही.industrialization झालं आहे जिथे त्यांना नॉर्मस flout करून अतिशय चुकीच्या पद्धतीने treat केल्या जाते,मारल्या जाते.हल्ली बरेच न खाणारे लोक ह्या गोष्टींचा विचार न करता मित्र म्हणाला नवरा म्हणाला म्हणून नॉन व्हेज खाऊ लागतात.मी ही लागले होते.मग पुढे ती सवय होते.सुरवातीच्या स्टेजला जेंव्हा ती सवय झाली नसते तेव्हा ते सोडणे सोपे मग सवय झाले की तो आहाराचा भाग होतो आणि ह्या कडे वेगळ्या पद्धतीने पाहायला जाते.कुणी खावं खाऊ नये हा त्याचा वयक्तिक प्रश्ण आहे पण awareness create करायला तर allowed आहे ना? (ह्याला काहीही moralistic high ground नाही आहे).जे आहेत ते व्हेज होणार नाही पण निदान काही लोक नॉनव्हेज होण्या पासून वाचतील आणि हे प्रमाण आणखीन वाढणार नाही.demand supply chain बघता ह्या अव्हेरनेस मुळे हे प्रमाण वाढले नाही किंवा कमी झाले तर बरेच आहे. हे too far fetched आहे हे आहेच पण हळू हळू प्रयत्न सुरु ठेवले तर फरक पडू शकतो.काही जणांना हे खरंच सोडणे शक्य नाही कारण त्यांची त्यावर निर्भरता आहे कारण इतर पर्याय अव्हेलेबल नाहीत पण बरेच जणं taste साठी खातात.अर्थात त्यांना फ्रीडम आहे सक्ती अजिबातच नाही.पटलं तर करावं वाटलं तर करावं.प्राण्यांना मारले नाहीतर त्यांची संख्या वाढेल हे आहे पण आधीच्या काळी demand कमी होता त्या मुळे हे gross industrialization झाले नव्हते आणि प्राणी कमी प्रमाणात जन्मत होते आणि मरत ही.आता तसे नाही , आता हळू हळू दुसरे टोक गाठल्या जात आहे.

एकदा मिस्टरांना चिकन खायचे होते म्हणून आम्ही चिकन मारणाऱ्याकडे गेलो.तसे तो मला पुढे करू लागला की तू घेऊन ये, तर मी म्हणाले की तुला खायचे आहे तर तू आण मी बनवून देईन.तसे तो थोडा आत गेला आणि परत तसाच बाहेर आला आणि म्हणाला जाऊदे आत्ता नको.हा किस्सा बरच काही सांगून जातो.

असो हे लॉजिकल नाही आणि माझ्या मुलालाच हे घरी मी सांगितले तर पटत नाही.त्याला चिकन खूप आवडते. तो मला सांगतो - आई आपण खाल्ले नाही तरी इतर खाणारच आणि कोंबडी मरणारच त्यामुळे आपण खाऊ.
त्यामुळे हे विशेष कुणाला पटेल असे अजिबात वाटत नाही.मला आपले वाटत राहते.

वर विक्षिप्त सारखी लोक जर एखाद्याला तुझे जेवण बघून मला मळमळते असे बोलतात तर एखाद्याच्या घरी गेल्यावर त्याला अपमानजनक वाटेल असे वरील प्रश्न देखील विचारू शकतात. >>>>

अत्यंत धा दां त खोटे विधान. माझ्या कोणत्याही प्रतिक्रियेत असे विधान आले असल्यास दाखवून द्यावे. उलट मी आधी जिथे नोकरी करत होतो तिथे बुधवारी आणि बहुदा शुक्रवारी काही जण मांसाहार घेऊन येत असत. तेव्हा मी त्या दिवशी त्यांच्या आधी जेवायला जात असे किंवा त्यांचे जेवून झाल्यावर तासाभराने जात असे, पण त्यांना कधीही काही बोललो नाही. आता त्या वेळी जर मला कोणी विचारले, “आज जेवायला नाही आलास? भूक नाही लागली का?” किंवा “आज लवकर जेवलास? तब्येत वगैरे ठीक आहे ना?” तर मात्र मला नाईलाजाने का होईना पण त्यांना सांगणे भाग आहे की, “मला non-veg बघून मळमळते.” त्या वेळी त्याने “काय नखरे करतो” वगैरे बोलून हिणवू नये इतकीच माफक अपेक्षा असते. (जर असे नाईलाजाने सांगणेही मान्य नसेल तर अशा वेळी काय उत्तर द्यावे हे कृपया सांगावे.) (त्या कंपनीत lunch time fix असा नव्हता, दुपारी १२ ते २-२:३० दरम्यान जो तो आपल्या सोयीप्रमाणे जेवायला जात असे.)

इतका मूर्ख विचार फक्त कट्टर लोकच करू शकतात कोणी न धुता कसे देईल? उलट तीच कढई का वापरतील दुसरी कढई वापरण्याचा कोमनसेन्स लोकांना असतो.. आणि असेच 100% लोक करतात. शाकाहारी आहे म्हणून त्याला मुद्दामून मटण मसाल्यात पनीर टाकून देत नाहीत.>>>> या वाक्याशी अंशतः सहमत. मित्राच्या, नातेवाईकाच्या घरी कढई स्वच्छ धुतली जाईल. नुसती धुतलीच काय अगदी ४-४ वेळा तारेच्या scrubber ने घासली जाईल, याची खात्री आहे. पण व्यावसायिक ठिकाणी हे होते का? घरातली स्त्री मग ती आई, मुलगी, बहिण, बायको, सासू-सून कोणीही असेल, ती जितक्या आपुलकीने अशी स्वच्छता राखेल तितकीच स्वच्छता हॉटेल, मेसमधले कंत्राटी कामगार पाळत असतील का? चहाच्या टपरीवरचे किंवा उसाच्या रसाच्या गुऱ्हाळातील ग्लासेस (यात शाकाहार-मांसाहार हा मुद्दाच येत नाही.) केवळ विसळले जातात, धुतले जात नाहीत. चायनीजच्या गाडीवर तर एकाच कढईत चिकनचे पदार्थ आणि मग तीच कढई फक्त पुसून घेऊन त्यातच शाकाहारी पदार्थ केले जातात, हे मी स्वतः डोळ्याने पहिले आहे. त्यामुळेच आय.आय.टी. मधील शाकाहारी विद्यार्थ्यांनी ताटाचा मुद्दा उपस्थित केला असेल. कदाचित हेच शाकाहारी विद्यार्थी सुट्टीच्या काळात वगैरे आपल्या मांसाहारी मित्रांच्या घरी जाऊन जेवतही असतील, आपल्याला (तुम्हाला किंवा मला) काहीच माहिती नाही! म्हणूनच मी Ultrasonic Cleaning Machine बसवावे असे सुचवले होते (कारण माणूस कामचुकारपणा करु शकतो, मशीन नाही!) अर्थात यालाही ‘नखरे’ म्हणणाऱ्यांना काय म्हणावे??? वास्तविक आय.आय.टी. च्या विद्यार्थ्यांना Ultrasonic Cleaning Machine बनवणे हा एक प्रोजेक्ट सुद्धा होऊ शकला असता!

वर्षानुवर्षे ओळख, विश्वास असलेल्याला मुद्दाम 'भांडं वेगळं घेतलं आहेस का' वगैरे प्रश्न विचारणे हाही तितकाच उद्धटपणा.>>>> १००% सहमत. आमच्या सर्व नातेवाईकांना माहित असल्याने ते स्वतःहून सांगतात, “तुमी काय भट लोका! तुमका डाळ-भातच लागतलो.” (प्रत्यक्षात आम्ही ब्राह्मण नाही!) त्यामुळे आम्ही कोणालाही असे प्रश्न विचारत नाही. पण ज्यांच्याशी नवीनच ओळख झाली आहे, आणि पहिल्यांदाच त्यांच्याकडे जेवायला जात असू तर त्यांना आपण शाकाहारी असल्याची पूर्वकल्पना देणे आणि प्रत्यक्ष जेवणापूर्वी एकदा “वेज आहे ना?” असं एकदाच विचारून खात्री करून घेणे याला आक्षेप नसावा. कारण घाईगडबडीत माणूस विसरू शकतो. (ही भाजी वेज आहे ना?, ती आमटी वेज आहे ना? अळूवड्यांना माशाचे तेल वापरले नाही ना? असे विचारून समोरील बाईला irritate करणे सर्वस्वी चूकच आहे.) पण सुरवातीस एकदा विचारण्यास हरकत नसावी, नाही का?

आणि हो चुकून एखादा चिकनचा छोटा पीस खाल्ला गेला तर काही आभाळ कोसळून त्या इसमास हार्टअटक येत नाही.>>>> असेच एकदा एका व्यक्तीकडे गेलो असताना त्यांनी कोणतातरी पदार्थ पहिल्यांदाच बनवला होता आणि तो आम्हाला चव चाखण्यासाठी दिला. नंतर तो पदार्थ कसा बनवला हे विचारले असता कळले की त्यांनी त्यात ‘चिकन मसाला’ (चिकनचे तुकडे नव्हे) वापरला होता. इतके कळल्यावर माझ्या बहिणीला तिथेच उलटी झाली. आम्ही दोघे सख्खे बहिण-भाऊ असूनही मला काहीच झाले नाही पण तिला मात्र उलटी झाली. तेव्हा शाकाहारी माणसाने चुकून मांसाहार केला तर काय परिणाम होतील हे व्यक्तीसापेक्ष आहे. कृपया सरसकट विधान करु नये, ही विनंती.

आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये अंडी देण्यास विरोध करताना एक शाकाहारी मुखमंत्री म्हणतात " मी खुर्चीत असे पर्यंत, मध्यान्ह भोजनात अंडी दिली जाणार नाहीत">>>>> शासकीय धोरण मुलांना अंडी द्यायचे असेल आणि हे मंत्रीमहोदय असे म्हणत असतील तर ते चूकच आहे. शासकीय धोरणाप्रमाणे मुलांना अंडी देण्यात यावीत. पण जर काही मुलांना ठराविक वारी किंवा रोजच अंडी खाण्याची इच्छा नसेल तर मात्र केवळ शासकीय धोरण राबवायचे म्हणून धाकदपटशा दाखवून किंवा मारून-मुटकून त्यांना अंडी खावयास लावली जाऊ नयेत.

थोडक्यात सांगायचे तर मांसाहारी व्यक्तींचे मांसाहारी असणे आम्ही स्वीकारले आहे त्याचप्रमाणे आमचे मांसाहारापासून दूर राहणे त्यांनी स्वीकारावे. मांसाहारी व्यक्ती जशा मांसाहाराशिवाय राहू शकत नाहीत तसेच शाकाहारी व्यक्ती मांसाहाराचा वास सहन करु शकत नाहीत. उगाच “एकदा खाऊन बघ, काहीही होत नाही”, “तब्येतीला चांगलं असतं”, “किती नखरे करतोस?”, “तू काय कुठल्या बाबाच्या नादी लागला आहेस का?” किंवा “तू मालवणला कलंक आहेस!”, “तुला non-veg खाणारीच बायको मिळाली पाहिजे” (मला नेहमी ऐकावे लागणारे डायलॉग) असे बोलून आग्रह करु नये.

राहता राहिला प्रश्न मांसाहारी व्यक्तींना घर नाकारण्याचा.
आता जे घरमालक अशा रीतीने मांसाहारी व्यक्तींना घर नाकारतात त्यांना घर विकत घेण्यासाठी मी ‘फुटक्या कवडीची’ ही मदत केली नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयात ढवळाढवळ करण्याचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा कोणताही नैतिक अधिकार मला नाही.
मी फारतर असे सुचवेन की, मांसाहारी व्यक्तींनीही एखादे घर घेऊन त्यावर ‘केवळ मांसाहारी लोकांना घर भाड्याने मिळेल’ अशी पाटी लावावी आणि हिशेब चुकता करावा!
(... पण तुमचे हात केळी खायला गेलेत का तुमच्या घरांत सांडपाणी, घाण नाहीये! त्यांच्यावर टाकायला?’ या प्रतिक्रियेच्या धर्तीवर)

वर विक्षिप्त सारखी लोक जर एखाद्याला तुझे जेवण बघून मला मळमळते असे बोलतात तर एखाद्याच्या घरी गेल्यावर त्याला अपमानजनक वाटेल असे वरील प्रश्न देखील विचारू शकतात. >>>>
हे वाक्य पाहून ‘देवीचा रुग्ण दाखवा आणि १००० रुपये मिळवा’ च्या धर्तीवर 'माझी (विक्षिप्त_मुलगा या आयडीची) मांसाहारी व्यक्तींचा अपमान / तिरस्कार करणारी पोस्ट दाखवा आणि १००० रुपये मिळवा!' अशी बक्षीस योजना सुरु करावीशी वाटते!

अवांतर:
समस्त मांसाहारप्रेमींना आग्रहाचे निमंत्रण
आमच्या येथे, अंधेरी पश्चिम येथे वर्सोवा मेट्रो स्टेशनशेजारील मैदानात आज दिनांक १९ जाने. पासून 'वर्सोवा महोत्सव २०१८' सुरु झाला आहे. आजच राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले असून हा महोत्सव २८ जाने. पर्यंत असणार आहे. कार्यक्रमाचे पोस्टर आणि अशा कार्यक्रमांचा इतिहास पाहता या कार्यक्रमात non-veg व त्यातही खासकरून sea food ची रेलचेल असणार हे नक्की. जर आपण येथे येणार असल्यास आपली भेट होऊ शकेल. (मी त्या कार्यक्रमस्थळापासून २-३ मिनिटांच्या अंतरावर राहतो.)

त्यामुळे हे विशेष कुणाला पटेल असे अजिबात वाटत नाही.मला आपले वाटत राहते.>> दुहेरी ताई, असे वाटणार्या आपण एकट्याच नाही. बाकी प्राणीप्रेम व शाकाहार श्रेष्ठ की मांसाहार यावरुन रणकंदन होण्याआधी धाग्याच्या विषयावर येतो. Wink
कोणत्याही प्रायवेट संस्थेला स्वतःचे नियम असतीलच परंतू याला शासनमान्यता अथवा जबरदस्ती चूकच आहे. शाकाहारींमधे माझ्यामते पुढचे २ प्रकारचे लोक आढळतात.
१) यांना मांस-मच्छीच्या नुसत्या वासाने अथवा पाहून मळमळते हे खरे आहे (याला नेहमीच धार्मीक वा पारंपारिक कारणे असतीलच असे नाही). परंतू हे लोक म्हणजे काही फालतू व कट्टरपंथीय नव्हेत की ज्यांना मांसाहारी लोकांवर दबाव टाकायचा असतो म्हणून खुसपटं काढतात. तर यांना जेन्युईन्ली त्रास होतो.
२) या शाकाहारी व्यक्ती स्वतः मांसाहार करत नाहीत परंतू त्यांना शेजारी बसून खाल्लेलं, शिजवलेलं चालतं. यातले काही लोक्स स्वतः शिजवतातही.
वरील २ प्रकारातल्या पहिल्या प्रकारच्या लोकांनाच काय तो मांसाहार अथवा मांसाहारींचा उपद्रव वाटू शकतो. आता माझ्या मते तरी अशा लोकांनी मांसाहारी निमंत्रणांचा स्वीकार विचार्पूर्वक करणेच योग्य. तसेच सार्वजनीक ठिकाणी अशा प्रकारामुळे त्रास व्हायची शक्यता दिसत असल्यास ती खबर्दारी स्वतः घेतलेलीच चांगली. त्यासाठी नियम बनवणे योग्य वाटत नाही.

दुहेरी: तुम्ही पुन्हा भूतदया या ट्रॅक वर गाडी वळवली. या धाग्याचा तो विषय नाही. वेगळा धागा काढा मी तिकडे फुगड्या खेळायला येतो.

मी काय खावं हा माझा वैयक्तिक चॉईस आहे. मी माझ्या आवडीनिवडी दुसर्‍यांवर लादत नाही. दुसर्‍यांच्या आवडीनिवडी जरी मला पटत नसल्या तरी माझ्यामुळे त्यांच्यावर बंधने येऊ नयेत ही काळजी मी घेतो. माझ्यावर दुसर्‍यांनी बंधने घालु नयेत ही माझी साधी अपेक्षा आहे.

>>हा किस्सा बरच काही सांगून जातो.
रच्याकने आमच्या घरी कोंबड्या पाळायचे. मी सोत्ताच्या हाताने कोंबड्या मारुन सोलल्या आहेत. तुमचा अनेक्डोटल किस्सा फक्त तुमच्या बुडबुड्याच्या सीमा दाखवतो.

{माझ्या मते तरी अशा लोकांनी मांसाहारी निमंत्रणांचा स्वीकार विचार्पूर्वक करणेच योग्य. तसेच सार्वजनीक ठिकाणी अशा प्रकारामुळे त्रास व्हायची शक्यता दिसत असल्यास ती खबर्दारी स्वतः घेतलेलीच चांगली. त्यासाठी नियम बनवणे योग्य वाटत नाही}

+१

{उगाच “एकदा खाऊन बघ, काहीही होत नाही”, “तब्येतीला चांगलं असतं”, “किती नखरे करतोस?”, “तू काय कुठल्या बाबाच्या नादी लागला आहेस का?” किंवा “तू मालवणला कलंक आहेस!”, “तुला non-veg खाणारीच बायको मिळाली पाहिजे” (मला नेहमी ऐकावे लागणारे डायलॉग) असे बोलून आग्रह करु नये}

+१

{मांसाहारी व्यक्ती जशा मांसाहाराशिवाय राहू शकत नाहीत तसेच शाकाहारी व्यक्ती मांसाहाराचा वास सहन करु शकत नाहीत.}
त्यामागचं कारण जीवशास्त्रीय की भावनिक? कारण वास इतका भयंकर असेल तर बहुसंख्यांना मळमळलं पाहिजे. अगदी मांसाहारींनाही.

स्वतः म़ांसाहार न करणाऱ्या पण ते रांधणाऱ्या व्यक्ती मला माहीत आहेत.

अंड्यांच्या शालेय सक्ती/बंदीबद्दल : दिला जाणारा आहार नाकारण्याचा पर्याय वापरतात की मुलं.
एके ठिकाणी माध्यान्ह आहार शिजवणारी दलित महिला होती, तिच्या हातचं कोणीही खात नसे.
आदिवासी मुलं शाकाहार, मांसाहार यात फरक करत असतील का आणि वार पाळत असतील का याची मात्र कल्पना नाही.

@विमु, तुमच्या वरच्या तीनही पोष्टींना अनुमोदन. त्यातल्या त्यात घर नाकारणार्या वरील पोष्टीला +१११. आपले घर भाड्याने कोणाला द्यावे हे ज्याचे त्याचे मत. तसेच शेजार्यानेही आपल्या घरात काय शिजवावे हा ही त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे.

>> आपले घर भाड्याने कोणाला द्यावे हे ज्याचे त्याचे मत.

असहमत!
कोणी ब्राह्मण कोणा दलिताला जातीच्या कारणामुळे घर नाकारत असेल तर ते चुक आहे. मी त्या घरमालकाला फुटक्या कवडीची मदत केली आहे की नाही याचा काही संबंध नाही

Any discrimination based on religion, cast, marital status, eating habits is illegal

मी काय खावं हा माझा वैयक्तिक चॉईस आहे. मी माझ्या आवडीनिवडी दुसर्‍यांवर लादत नाही. दुसर्‍यांच्या आवडीनिवडी जरी मला पटत नसल्या तरी माझ्यामुळे त्यांच्यावर बंधने येऊ नयेत ही काळजी मी घेतो. माझ्यावर दुसर्‍यांनी बंधने घालु नयेत ही माझी साधी अपेक्षा आहे.>>> बरोबर

>>हा किस्सा बरच काही सांगून जातो.
रच्याकने आमच्या घरी कोंबड्या पाळायचे. मी सोत्ताच्या हाताने कोंबड्या मारुन सोलल्या आहेत. तुमचा अनेक्डोटल किस्सा फक्त तुमच्या बुडबुड्याच्या सीमा दाखवतो.>>>सर्वांचे तसे नसते हे मान्यच आहे पण काही जणं जे खातात त्यातल्या 3-4 जणांबद्दल हे बघितलं.बाकी तुमचे मत मान्य.

Any discrimination based on religion, cast, marital status, eating habits is illegal>> हा नियम अथवा कायदा खाजगी मालमत्तेच्या बाबतीत आहे की नाही माहीत नाही. वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे घर देताना असल्या अटी टाकून कोणी लेखी करार करत नाहीत. पण एखादा माणूस जर आपल्या घरात कोणी रहावं या बाबतीत निवडक असेल. त्यामागे त्याची काहीही कारणे असू शकतात. आता ते नैतिकद्रुष्ट्या चूक असो वा बरोबर, तेवढा तरी अधिकार त्याला असण्यात मला नाही वाटत काही हरकत आहे.

Any discrimination based on religion, cast, marital status, eating habits is illegal >> अगदी बरोबर आहे. पण तुमच्या मनात जर असेल की या या माणसला जागा द्यायची नाही तर नाही म्हणायला पत्रिका जुळत नाही छाप हजार कारणे देता येतात. सटल लेव्हलवर डिस्क्रिमिनेट केलं हे कोर्टात सिद्ध करणे महाकठीण असते.
वल्ड इज नॉट फेअर.

पत्रिका जुळत नाही छाप हजार कारणे >>> Lol हो किंवा "योग नाही" Happy

खाजगी घरमालकांबाबत भारतात अधिकृत नियम काय आहे माहीत नाही. धर्म, लग्न झाले आहे की नाही हे, आणि शाकाहारी/मांसाहारी बाबत सर्रास केले जाते. जातीबद्दल (किमान उघड पणे) केले जात नसावे असे मी ४-५ वर्षांपूर्वी पुण्यात जो अ‍ॅनेक्डोटल डेटा पाहिला आहे त्यावरून. पण अनेकदा एजंटला मुळात लोक शोधताना "आपल्यातला" शोधायला सांगून हा प्रश्न निकालात काढत असतील Happy

< पण एखादा माणूस जर आपल्या घरात कोणी रहावं या बाबतीत निवडक असेल.>
अजब, हे एक वेगळ्या प्रकारचं अपर्थाईड. डिस्क्रिम्निनेशन, भेदभाव करण्यात काही गैर नाही असं वाटणं हे खरंच खेदजनक आहे.
भाडेकरूने ठरल्या वेळी ठरलेलं भाडं द्यावं, मुदत संपल्यावर घर खाली करावं, घर आहे त्या स्थितीत ठेवावं, स्वच्छता पाळावी, शेजार्‍यांना उपद्रव होईल असं वागू नये, इ. अटी बसतील. religion, cast, marital status, eating habits अशा अटी लावत असतील, तर तो भेदभावच आहे.

कोणत्याही प्रकारचा भेदभाव वाईटच हे मान्य करायला आपल्याला बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. वंशभेद वाईट हे बहुतेक भारतीयांना मान्य असतं, पण तेच भारतीय आफ्रिकी वंशाच्या लोकांशी आणि आपल्याच देशातल्या ईशान्येकडच्या राज्यांतल्या लोकांशी तसंच वर्तन करतात. तेव्हा आपण वंशभेद करतो, हे त्यांना कळतही नसतं का?

मी लेखात गंमतीने म्हटलंय आणि सायो यांनी प्रतिसादांत लिहिलंय " लिहायला जागा मिळतंय म्हणून लोक एवढ्यातेवढ्यावर लिहितात आणि त्यावर वादाचा धुरळा उडतो." पण अशा व्यक्त होण्यातून लोक विचार करायला प्रवृत्त होतात, त्यांच्या मनातले सुप्त भेदाभेद उघड होतात, हे चांगलंच आहे , असं मला वाटतं.

>>तेवढा तरी अधिकार त्याला असण्यात मला नाही वाटत काही हरकत आहे.

असहमत.

@अजब, तुम्ही म्हणता तसं ते नैतिकदृष्ट्या चूक आहेच पण बेकायदेशीरही आहे. म्हणजेच घरमालकाला हा अधिकार नाही. तरीही दुर्दैवाने अमितव आणि फारएण्ड यांनी सांगितल्याप्रमाणे सर्रास घडते जे कोर्टात सिद्ध करणे महाकठीण असते.

Pages