आहारानुरूप आचारसंहिता, व्यवस्था आणि आहारसवयींचे मुद्रांकन

Submitted by भरत. on 17 January, 2018 - 00:20

मुंबईच्या आय आय टी नामक कुठल्याश्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आहाराची सोय करून दिली. त्यांच्या आवडीचा आहार करायचे स्वातंत्र्य दिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या आहारानुरूप ताटवाट्या इत्यादीचीही व्यवस्था केली. "आय आय टीच्या संकुलातील सर्व भोजनगृहांत देण्यत येणारे मुख्य जेवण हे शाकाहारी असून ते मोठ्या ताटामध्येच देण्यात येते. या व्यतिरिक्त ज्यांना मटण, अंडे यांसारखे मांसाहारी जेवण हवे असल्यास ते बाजूला वेगळ्या ताटामध्ये दिले जाते. मात्र विद्यार्थी मुख्य ताटामध्येच मांसाहारी जेवण घेत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी भोजनगृहाला केली. त्यानंतर मांसाहारासाठी नेमलेली ताटेच वापरावीत, मुख्य ताटांमध्ये मांसाहार करू नये, अशी सूचना भोजनगृहातून विद्यार्थ्यांना ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली."

इतकी साधीशी गोष्ट. पण राईचा पर्वत करणे , खोडसाळपणा, उगा आग आग म्हणून ओरडणे अशा सवयी लागलेल्या कुणा फुरोगामी टाइप विद्यार्थिनीनीने या निर्णयाबद्दल समाजमाध्यमांत आक्षेप घेतला. समाजमाध्यमांच्या सहज उपलबधतेमुळे आजकाल कोणीही उठतो, काहीही लिहितो आणि त्याला उगाच हवा दिली जाते. (हा लेखही त्याच प्रकारातला असल्याची टिप्पण्णी अपेक्षित.) मुळात विद्यार्थ्यांचं काम शिकणं हे आहे, त्यांनी आपलं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीत केंद्रित केलं पाहिजे. पण विद्यार्थी आजकाल अभ्यासाव्यतिरिक्त अन्य गोष्टींतच अधिक रममाण होतात, हे आपण कन्हैयाकुमार प्रकरणात पाहिलेच आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी असलेले नियम पाळलेच पाहिजेत. शिस्तीनेच राष्ट्र मोठ्ठे होते; शिशुवर्गापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी शिस्त पाळली गेलीच पाहिजे, हे आदर्णीय राम माधव यांनी नुकतेच ठणकावून सांगितलेच आहेच.
असो , तूर्तास आपण आहारसवयींबद्दल विचार करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या आहारासाठी त्या त्या प्रकारच्या प्लेट्स वापरणे हे खरे तर अत्यंत सोयीचे आहे. आपल्या वेदांत त्याबद्दल उल्लेख असेलच. पण हीच गोष्ट पुढे नेऊन आणखीही काही नियम केले पाहिजेत असे मला वाटते. ते पुढीलप्रमाणे.
१. शाकाहार्‍यांच्या वस्तीत मांसाहार्‍यांना घरेच देऊच नयेतच; हे तर आता बहुतांश लोकांना मान्य झाले आहेच.
२. आपण कोणा मांसाहार्‍याकडे पाहुणे म्हणून जात असू तर शाकाहार्‍यांनी आपली ताटवाटी सोबतच घेऊनच जावेच.
३. भोजनालये, उपाहारगृहे ही एकतर शुद्ध शाकाहारी किंवा शुद्ध मांसाहारी अशीच असावीतच; नसल्यास त्यात मांसाहारींच्या बसण्याची आणि अर्थातच भांड्यांची व हात- तोंड धुण्याची सोय वेगळीच असावीच. शाकाहारी स्वयंपाकघर आणि मांसाहारी स्वयंपाकघर वेगवेगळीच असावीतच आणि एकमेकांपासून पुरेशी लांबच असावीतच.
४. विमान , दूर पल्ल्याच्या रेल्वे आणि बसेसमध्ये आहारनुरूप सीट्स दिल्याच जाव्यातच. म्हणजे शाकाहारींना मांसाहाराचे दर्शन, गंध ,नाद यांचा उपद्रवच होणारच नाहीच).
५. आधार कार्डावर व्यक्ती शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंद केलीच जावीच. तंत्रज्ञान प्रगत होईल, तसे आपण काय काय खाल्ले त्याची माहितीही आधारच्या महासंगणकातच साठवलीच जावीच.
६.शाकाहारी आणि मांसाहारींच्या पासपोर्टच्या जाकिटांच्या किनारीचे डिझाइन वेगवेगळेच ठेवावेच. (अन्य गोष्टींसाठी वेगवेगळे रंग वापरून संपल्याने हा पर्याय)
७. आय आय टी मुंबई व तत्सम उच्च शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्रांत विद्यार्थी शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंदच असावीच. शाकाहारी विद्यार्थ्यांंच्या उदात्त, उज्ज्वल, सुंदर, मंगल, सुकोमल भावनांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन व्हावे याकरिता त्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मांसाहारबहुल देशांतच जाऊच देऊच नयेच. बहुतेक प्रगत देश या देशांच्या दुर्दैवाने मांसाहारबहुल आहेत. पण विश्वगुरू हिंदुस्तान आपल्या महान संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार जगभर करतोच आहेच. लवकरच जगातले बहुसंख्य देश मांसाहारच सोडूनच देतीलच. त्याचीच सुरुवात झालीच आहेच.)

मायबोलीकर या सूचनांमध्ये भरच घालतीलच. त्यांचे संकलन करून त्या सूचना केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय, महाराष्ट्रा शासनाचा शिक्षण विभाग व आदर्णीय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय यांना पाठवायचाही विचार आहेच.

धन्यवादच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समोसे जिलब्या यांवर माशा बसत नाहीत की ते खाद्यपदार्थ बाहेर पर्यंत आलेले नसतात?

ऋ,
जास्त फी आकारून हवे ते ताट देणे हा विचार चांगला आहे. किंवा स्वतःचे ताट स्वतः आणणे.

आयुष्य इतकं काँप्लिकेटेड करायची गरजच काय असा प्रश्न कोण विचारतंय तर ज्यांना वेगळं किचन, वेगळी खायची जागा, वेगळं ताट असं सगळं वेगळं हवंय ते.

चोराच्या उलट्या बोंबा

>>आयुष्य इतकं काँप्लिकेटेड करायची गरजच काय असा प्रश्न कोण विचारतंय तर ज्यांना वेगळं किचन, वेगळी खायची जागा, वेगळं ताट असं सगळं वेगळं हवंय ते.>> नाही हो, ते मी म्हटलंय पण मी वेगळं किचन, खाण्याची वेगळी जागा आणि वेगळी ताटं हव्वीत्तच असा हट्ट केलेला नाही.

प्रिल सुगंधी लिक्वीड सोप चांगलं आहे का ग? मी नेहमी विम वापरते.>>>>>
प्रिल आणि विम दोन्ही जवळपास सारखेच आहेत, लिंबाच्या सुगंधाचे. पण 'Henko' या वाॅशिंग पावडरसोबत बऱ्याचदा 'प्रिल' ची बाटली मोफत मिळते!!! Happy

आता मूळ विषयाकडे:
बाकी आयआयटीच नाही तर सर्वच हॉटेल आणि सार्वजनिक आहारगृहे (अगदी Pure Veg असली तरीही) यांना जेवण्याची ताटे धुण्यासाठी 'Ultrasonic cleaning machine' बसविणे सक्तीचे करावे.
https://www.youtube.com/watch?v=yGZ5Ol2fAog

आणि जर एखादी (शाकाहारी) व्यक्ती स्वतःचे वेगळे ताट घेऊन येऊ इच्छित असेल किंवा जादा पैसे मोजून Disposable plate विकत घेऊ इच्छित असेल तर त्यास आडकाठी नसावी. (फक्त Disposable plate मध्ये कागदी प्लेट किंवा पत्रावळी अशा पर्यावरण पूरक पर्यायांचा समावेश असावा.) (मुंबईत अनेक उसाच्या रसविक्रेत्यांकडे २-३ रुपये जास्त मोजून Disposable glass मध्ये रस विकत घेता येतो तसेच)

असे नखरे करणाऱ्यांनी मांसाहारी लोकांकडे जेवायला जाऊ नये. गेलात तर स्वतः चे ताट वाटी चमचे आणि हो जेवणाची भांडी घेऊन जावेत आणि तिथे घासफूस शिजवून खावा

>>नाही हो, ते मी म्हटलंय पण मी वेगळं किचन, खाण्याची वेगळी जागा आणि वेगळी ताटं हव्वीत्तच असा हट्ट केलेला नाही.

वादाच्या भरात माझा गोंधळ झाला ताई, दिलगिरी व्यक्त करतो

शाकाहाराला 'घासपूस' असे हिणवणाऱ्यांना काही भाबडे प्रश्न:
केवळ मांसाहाराचे सेवन करता येऊ शकते का? म्हणजे सोबत भात, भाकरी, पोळी (चपाती) वगैरे काहीही नाही.
चिकन, मटण शिजवताना त्यात कांदा, लसूण, आले, कोथिंबीर व इतर मसाले यांचा वापर नाही. कारण हे सर्व पदार्थ 'घासपूसच' आहेत!

माझी एक कलीग होती. ती बरोबर प्लास्टिक sheets बाळगायची. Closing ला वैगेरे जेव्हा बाहेर जेवायला नेतात तेव्हा ती हॉटेलच्या प्लेटवर स्वतः ची प्लास्टिक sheet अंथरून मग त्यात जेवायची. बरोबर प्लास्टिक चे काटे, चमचे आणि नाईफ पण ठेवायची. ती शाकाहारी1 होती का कसं ते कधी विचारले नाही. तेव्हा महानगरपालिकेने नो1 प्लास्टिक वैगेरे आणले नव्हते. ग्रीन team volunteers पण अजून मोकाट1 सुटले नव्हते.

काय विक्षिप्त नुसते बोलल्यावर मिरची लागली.
वर तर मांसाहार करणाऱयांना तर घर देणार नाही ,पदार्थ उघड्यावर का भावना दुखतात, ताट वेगळी घ्या वगैरे वगैरे जो भेदभाव चालू आहे ते चालते?

मी तर बोलणारच घासफूस खाणारे..

आयआयटी बाँबे मध्ये कित्येक वर्षे (कमीतकमी गेली १५ वर्षे. कायमच म्हणणार होतो पण माझ्याकडे प्रुफ नाही) मेस मध्ये नॉन व्हेज जेवणाला वेगळं टेबल असतं. तुम्ही नॉर्मल टेबलवर बसलात आणि जर त्या टेबलवर बसलेल्या कोणी आक्षेप घेतला तर उठून नॉन व्हेज टेबलवर बसणे हा पर्याय रहातो. जनरली तुम्ही तुमच्या ग्रुप बरोबर जेवता आणि कोणी आक्षेप घेत नाही, रादर घेतला तर त्याला वेड्यात (आणि कदाचित ग्रुपमधून बाहेर) काढतील. हे टेबल मला आठवतं त्याप्रमाणे नॉन व्हेज साठीच असतं, प्युअर व्हेज साठी वेगळं टेबल नसतं.

आठवड्यातून फक्त एक (एकच) दिवस नॉन व्हेज असतं. ते ही लवकर गेला नाहीत तर चांगले पीसेस संपतात. याबाबत मात्र कायम ओरड असते.
मेस मध्ये भांडी स्वच्छ धुतात. एकदाही प्लेट अस्वच्छ आठवत नाही.
कदचित मांसाहार आणि गुलाबजाम (हा एकाच खाण्यालायक गोडाचा पदार्थ मिळतो तिकडे... ) एकाच दिवशी करत असतील आणि मांसाहारी मंडळी दोन्ही दरडींवर पाय ठेवत असतील. जर असं असेल तर मी पण आवाज उठवला असता. अन्न सुरक्षा म्हणून काही आहे का नाही!!! Happy हे विनोदाने लिहिलं आहे. हे ही लिहिण्याची वेळ आल्येय. Happy

विमान प्रवास आणलाच आहे तर: गेल्या इंडिया ट्रीपला शेजारी गुज्जू ज्ये ना बसलेले. मुलाकडे व्हिजीट करून परत जात होते. माझ्याशी छान बोलले, आणि परत परत बोलायची संधी शोधत होते. टेक ऑफ केला आणि समोर ठेवलेल्या भल्या मोठ्या पिशवीतून सेंग निघाली. मी आणि बायकोनी एकमेकांकडे कटाक्ष टाकले आता काय काय बाहेर निघेल या पोतडी मधून!! चरा लेको दिवसभर.
जेवण आलं तसं मी आधी AVM सांगितलेल ते खाल्लं. त्यांनी पण तेच सांगितलं असावं. पण मला आणखी भूक होती आणि केबिन क्रु आग्रह करत होता तर नाही कसं म्हणायचं म्हणून मग चिकनपण खाल्लं. काही बोलले नाही ते, पण नंतर काहीच बोलले नाही फारसं. चिकन प्लेट मध्ये भारी पेस्ट्री आणि आईसक्रीम होतं. ते त्यांना हवं होतं. हे ते कृ ला कन्वे करायचा प्रयत्न करत होते पण मी पण ढिम्म मदत केली नाही.

पूर्वीच्या हापिसात वेगळे मावे न्हवते, पण झाकण ठेवून गरम करावं असा नॉर्म होता.
उग्र दर्प असलेल कोरिअन/ चायनीज जेवणाचा वास असेल तर मला ही कधी कधी असह्य होतं. इथल्या लोकांना (इथल्याच कशाला...मलाही बरेचदा) देसी जेवणाच्या वासानेही तसच होतं.

सर्विंग प्लेट वेगळ्या हा मूर्खपणा आहे. बदलतील बहुतेक हा नियम.

अहो, ते लोकांना दिसावे हाच तर उद्देश आहे.
उद्या कोणीही उठेल आणि मला बघवत नाही म्हणून तक्रार करेल. कोणाला लटकवलेल्या साड्या बघून भ्रष्ट भावना वाटेल>>>हो डिस्प्ले वरच्या साड्या आणि कापलेल्या प्राण्यांचे मुंडके शेपूट मास हे नुसते लॉजिक पाहता सारखेच.आणि ह्या सोबत लॉजिक पाहता डिस्प्ले वर आणखीन बरेच काही येऊ शकते विशेषतः ओपन culture असेल तर.

>>>कोणाला गाडी चालवताना दुकानातील चालू टीव्ही बघून लक्ष विचलित होईल, कोणाला मिठाईच्या दुकान बाहेर उकळणाऱ्या दुधाच्या वासाने मळमळेल, कोणाला चामड्याच्या चपला बघून मेलेले प्राणी आठवतील; या सगळ्यांवर तुम्ही प्रेफरन्स लादणार का? उगाच कायतरी अर्ग्युमेंट करायचं म्हणून करायचं>>>>
तुम्हीच करताय. ह्या सगळ्यासाठी कुठला समाज गाऱ्हाणं घेऊन आलाय हो? .इथे आपण एखाद्या कम्युनिटी च्या खान पान काय चालत काय नाही ह्या प्रेफेरनसेस विषयी बोलत आहोत.ते लॉजिकल आहे की नाही ह्या बाबत नाही.असे बरेच धर्म,समाज,जाती,culture आहेत ज्यांचे प्रेफरन्सेस , त्यांच्या धर्मात काय चालतं काय नाही ह्याचा विचार करून काही गोष्टी allow केल्या जातात काही सोयी,पर्याय मार्ग काढून. ह्यात त्या logical आहेत की नाही हा विचार नसतो.(फक्त प्रथा पद्धती प्रेफरन्सेस जाचक घातक नाहीत ना हे पहिल्या जाते ,कधी तर असे असताना देखील त्या समाजाचे ऐकल्या जाते.इथे तसे करा असे म्हणत नाहीये मी).
बरोबर की चूक , लॉजिकल हा मुद्दा नाहीये. तसे बघितल्यास चुकीचेच वाटेल.

>> व्हेज वाल्यांसाठी किचन सहज वेगळे ठेवणे शक्य असेल
पुन्हा तेच. सहज की कठीण हे कोण ठरवणार?>>>
तो owner .त्याला सक्ती करा असे म्हणत नाहीये मी.त्याला सहज शक्य असेल आणि तयाने स्वतः तसे ठेवले तर काहीही हरकत नसावी असे म्हणते आहे.

बाकी प्राणी खाण्यासाठी इतर पर्याय असताना मारावेत का आणि त्या उपर ते टांगवेत का (अर्थात नॉन व्हेज लोकांचे प्रेफेरेन्स म्हणून हा फ्रीडम आहेच पण तात्पुरता हा मुद्दा सोडून)ह्याचा लॉजिकल debate करायचे असेल तर करूयात नंतर.

अरे देवा. हे हॉस्टेल ११ ने केलंय. H११ म्हणजे एम टेक/ पीएचडी वाल्या मुलींचे हॉस्टेल.
डोसा (डीन ऑफ स्टुडंट्स अफेअर) म्हणालाय की वेगळ्या प्लेट सगळ्याच हॉस्टेल मध्ये आहेत अशी मेल H११ ने आत्ताच का पाठवली कोण जाणे. ही मेल स्टुडंट काउंसिलने (मेस सेकीने) पाठवली आहे. हा काही इंस्टीट्युटने घेतलेला निर्णय नाही. पुढच्या मीटिंगला बदलेले निर्णय. थोडं फार डोंगराला आग लागली वाटतंय आता.

काल एका मराठी सिरीअलमध्ये (राधा प्रेम रंगली वगैरे काहीसे नाव आहे) तर त्यात दाखवले होते की दुष्ट सून आपल्या सासूला त्रास द्यायला त्यांच्या सात्विक घरात हॉटेलातून चिक्कन लॉलीपॉप आणि चिक्कन फ्राईड राईस ऑर्डर करते.
पण ऐनवेळी घरातली एक बाई दारातच ती ऑर्डर कलेक्ट करून ते अन्न कचर्‍यात फेकून देते आणि घराचे पावित्र्य जपते.
त्यानंतर ती सून उपाशीच राहते की भांडते की आणखी काही याची कल्पना नाही. माझी चहा संपली आणि मी उठून आत गेलो..

वर तर मांसाहार करणाऱयांना तर घर देणार नाही ,पदार्थ उघड्यावर का भावना दुखतात, ताट वेगळी घ्या वगैरे वगैरे जो भेदभाव चालू आहे ते चालते???>>>>>
शाकाहारी व्यक्तींनी मांसाहाराचा (मांसाहार करणाऱ्या व्यक्तींचा नाही) द्वेष करण्याचे कारण की, ते काही धार्मिक वा अन्य कारणास्तव मांसाहार करु शकत नाही (करु इच्छित नाही) परंतु जवळपास मांसाहार असल्यास त्याचा वास मात्र नाकात जातो त्यामुळे मळमळते. (Passive Smoking च्या धर्तीवर आपण याला Passive Consumption म्हणू शकतो!)
मांसाहार करणाऱ्या व्यक्ती मात्र मांसाहारात कांदा, लसूण, आले, खोबरे, कोथिंबीर आदी पदार्थ वापरतात शिवाय तयार झालेला पदार्थ भात, भाकरी, पोळी यांसोबतच खातात वर आणखी शाकाहाराला 'घासपूस' असे का म्हणतात हे अनाकलनीय आहे!
थोडक्यात, मांसाहारी व्यक्ती शाकाहारी पदार्थ खाऊ शकते पण शाकाहारी व्यक्ती मांसाहारी पदार्थ खाऊ शकत नाही. हे म्हणजे स्त्रिया ट्रेनच्या कोणत्याही (महिलांसाठी आरक्षित वा सामान्य/ जनरल) डब्यातून प्रवास करु शकतात मात्र पुरुष स्त्रियांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करु शकत नाहीत तसेच आहे.

आता मांसाहारी व्यक्तींना सोसायटीमध्ये flat नाकारले का जातात किंवा वरील प्लेटचा मुद्दा का उद्भवतो? तर केवळ मांसाहारी पदार्थांच्या वासामुळे. (शाकाहारातील कांदा, लसूण यांना उग्र वास असले तरी मांसाहारी व्यक्तींना हे पदार्थ लागतातच, त्यामुळे हा मुद्दा येथे येऊ शकत नाही.)
मांसाहारी व्यक्तींनी घरात जरी मांसाहार शिजवला तरी त्याच्या वासाचा त्रास वरील मजल्यावर राहणाऱ्या शाकाहारी व्यक्तींना होऊ शकतो. अगदी चिमणी लावली असेल तरी. कारण चिमणीचे duct हे त्याच मजल्यावर खिडकीच्या आजूबाजूस कोठेतरी बाहेर काढलेले असते. जर एखाद्याने चिमणीचे duct पूर्णपणे वर नेऊन गच्चीवर काढले असेल तर अशा मांसाहारी व्यक्तीस कोणी आडकाठी घेणार नाही. अर्थात बाजारातून मांसाहारी पदार्थ आणतानासुद्धा व्यवस्थित पॅकबंद पिशवीतून आणले गेले पाहिजेत, नाहीतर इमारतीच्या लिफ्ट, कॉरिडॉरमध्ये वास पसरतो. (कांदा, लसूण आणताना वास येत नाही, ते सोलल्यावर वास येतो, शिवाय मगाशी म्हटले तसेच हे पदार्थ मांसाहारात वापरतातच!)

आमच्या बिल्डींगपासून जवळच (अंधेरी RTO जवळ) 'भुदरगड' नावाची एक सोसायटी आहे. त्यात शाकाहारी, मांसाहारी सर्वच प्रकारचे लोक राहतात. पण त्या सोसायटीचा एक नियम आहे. मासेवाली त्या सोसायटीत प्रवेश करत नाही. ती बाहेर फुटपाथवर थांबते आणि आवाज देते. ज्यांना मासे खरेदी करायचे असतात ते पैसे (आणि काही वेळेस भांडी) घेऊन खाली येतात आणि मासे खरेदी करतात. त्यामुळे इमारतीमध्ये माशांचा वास येत नाही. अशा रीतीने थोडेफार शिस्तीचे पालन होणार असेल तर कदाचित मांसाहारी व्यक्तींना कोणी flat नाकारणार नाही.

वास घरात येत असेल तर घर बंद करून ठेवावे
खालच्यनि शिजवूच नये हा कोणता नियम? तुम्हाला वास येतो तर दार बंद करून बसा वास गेल्यावर चालू करा
पण आम्ही दरवाजा बंद करणार नाही आणि तुम्ही तुमच्या घरात शिजवू नका असे जर बोलत असेल तर का खपवून घ्यायचे?

तसेही हल्ली फ्लॅट संस्कृतीत लोकं आपले वाढदिवसही दार बंद करूनच साजरे करतात. तिथे हा नियम पाळणे जड जाऊ नये.

ते तंबाखूची मशेरी भाजणार्‍यांसाठी देखील असे नियम बनवायला हवेत.>>>> अगदी बरोबर!

खालच्यनि शिजवूच नये हा कोणता नियम? तुम्हाला वास येतो तर दार बंद करून बसा वास गेल्यावर चालू करा>>>> सध्यातरी आम्ही हेच करतो, बिल्डींगमध्ये मासेवाली आल्यावर अर्धातास तरी बाहेर पडत नाही, बाहेरून आत यायचे असेल तरीही असेच. अशावेळी बिल्डींगमधील कुत्र्याशी खेळण्यात छान वेळ जातो. तातडीचे काम असेल तर मात्र रुमालावर एखादा डिओ मारून नाकावर रुमाल लावून बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे मला त्या 'भुदरगड' सोसायटीचे कौतुक वाटते. (रच्याक, दार 'चालू' नाही करत, तर 'उघडतात'!!!)

खालच्यनि शिजवूच नये हा कोणता नियम? >>>>>> खालच्याने दार बंद करून शिजवावे हा नियम असावा>>>>> दार बंद करण्याची पण आवश्यकता नाही, फक्त चिमणी बसवून त्याचे duct गच्चीपर्यंत घेऊन जावे. बाकी प्रत्येक वेळी मांसाहारासाठी काही 'शे' रुपये खर्च करणाऱ्यांसाठी एकदाच हा खर्च करायला काहीच हरकत नाही!

पण आम्ही दरवाजा बंद करणार नाही आणि तुम्ही तुमच्या घरात शिजवू नका असे जर बोलत असेल तर का खपवून घ्यायचे?>>>>
पण आम्ही मांसाहार सोडणार नाही, किंवा इतरांना वास येणार नाही याची काळजी घेणार नाही आणि तरीही आम्हाला शाकाहारी लोकांच्या बिल्डींग /वस्तीमध्ये flat हवा असे बोलत असेल तर का खपवून घ्यायचे/??

थोडक्यात बोलायचे तर दोन्ही बाजूंनी बोलता येते, त्यापेक्षा सामंजस्याचा मार्ग महत्वाचा!

>>अर्थात नॉन व्हेज लोकांचे प्रेफेरेन्स म्हणून हा फ्रीडम आहेच पण तात्पुरता हा मुद्दा सोडून

तोच तर मूळ मुद्दा आहे. मी काय खावं हे दुसऱ्याने सांगायचा प्रश्नच येत नाही.

{, ते काही धार्मिक वा अन्य कारणास्तव मांसाहार करु शकत नाही (करु इच्छित नाही) परंतु जवळपास मांसाहार असल्यास त्याचा वास मात्र नाकात जातो त्यामुळे मळमळते. (Passive Smoking च्या धर्तीवर आपण याला Passive Consumption म्हणू शकतो!)}

काही धार्मिक वा अन्य कारणास्तव स्त्रियांनी तोकडे कपडे घालू नयेत. त्यामुळे इतरांच्या भावना चाळवतात. आपण याला पॅसिव्ह कंझमप्शन ऑफ सॉफ्ट पॉर्न म्हणू शकतो.
आशा आहे की या उदाहरणावरून तुम्हाला तुमच्या अर्ग्युमेंट चा फोलपणा कळला असेल. दुसऱ्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्याचा अट्टाहास करणं अनैतिक आहे. खाण्याच्या सवयी वरून डिस्क्रिमीनेशन बेकायदेशीर देखील आहे.

रच्याकने ही इंटरेस्टिंग लिंक बघा
http://m.huffingtonpost.in/2016/06/14/how-india-eats_n_10434374.html

अमित , नेमकी माहिती,
नवीन माहितीच्या उजेडात >>>>. थोडं फार डोंगराला आग लागली वाटतंय आता.>>>>हे पटतंय Happy

मात्र नॉनव्हेज खाणाऱ्यांबरीबर डिस्क्रिमीनेशन होते, आणि त्याला कायम पडतं घ्यावे लागते हे सुद्धा खरे.अँड i still stand by it

डोंगराला आग लागली हे अमितचं पोस्ट वाचून पटलंच. सोशल मिडीयाच्या इझी अ‍ॅक्सेसमुळे जरा काही खुट्ट झालं की धरा ह्या सगळ्या साईट्स वेठीला असंच चित्र दिसतंय. मिडीया आणि लोकंसुद्धा..
इकडे नॉनव्हेज खाणारी लोकं वेजिटेरियन्सना थोडं खाऊन बघा चिकन, फिश असा आग्रह करताना बघितली आहेत आणि माझ्या स्वतःच्या बाबतीत अनुभवही आहे.

दुसऱ्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्याचा अट्टाहास करणं अनैतिक आहे. खाण्याच्या सवयी वरून डिस्क्रिमीनेशन बेकायदेशीर देखील आहे.>>>ते कुणीही बदलायला सांगत नाहीये.
प्राण्यांचे मास roast करायला किंवा टांगणीला दुकानाच्या premises च्या आत डिस्प्ले एरिया मध्ये ठेवा.बाहेर रस्त्यावर नको,ओपन मध्ये नको.आणि हे नियम वेह्ज नॉन व्हेज दोघांना लागू.बाकी नॉन व्हेज फूड चे hygiene आणि व्हेज फूड च्या hygiene च्या थोड्या वेगवेगळ्या guidelines असतील त्या तश्या पाळाव्यात.एवढ्याने भागेल.

नॉनव्हेज खाणाऱ्यांबरीबर डिस्क्रिमीनेशन होते >>> सिम्बा, ही शब्दशः शेळी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड ची केस झाली Wink

पण सिरीयसली, व्यवस्थित प्लेट्स धुतल्या जात असतील तर वेगळ्याच पाहिजेत हे पटत नाही. त्यात प्रत्येकाचे "प्युअर व्हेज" चे लॉजिक वेगळे. काहींना त्या टेबलावर सुद्धा दुसर्‍या कोणी खाल्लेले चालत नाही, तर काहींना स्वतः व्हेज असले तरी जरा चिकनच्या बाजूचा नुसता रस्सा चालतो. तर काहींना मिकी माउस लॉजिक प्रमाणे त्यांना जोपर्यंत त्यांना स्वतःला ताटांत दिसत नाही तोपर्यंत चालते. म्हणजे अंडे थेट खाणार नाहीत पण केकमधून गेले तर गेले Happy

अशा वेळेस सहसा "What a reasonable person would think" चा निकष लावला जातो. सध्याच्या दिवसांत असे लोक शोधायचे म्हणजे.... Happy

मूळ लेखाबद्दल - भरत उपहास आणि एकूण टोन मस्त जमला आहे. पहिल्या वाक्यापासून लोल. आय आय टी चा उल्लेख "आय आय टी नामक कुठल्याश्या संस्थेने" पासूनच Happy

जेथे दोन्ही प्रकारचे खाणे बनवले जाते तेथे प्लेट्स व्यवस्थित धुतल्या जातात की नाही इतके बघणे, कच्च्या मांसाचा इतर पदार्थांशी संबध न येउ देणे ई. आवश्यक आहे. बाकी वैयक्तिक चॉईस चा भाग आहे त्यामुळे त्यांच्यावर हे बंधन आणणे बरोबर नाही. उद्या एखादा श्रावणात मला बाजूच्या ताटातून कांद्याचा वास नको म्हणेल. टोटल स्लिपरी स्लोप.

>>ते कुणीही बदलायला सांगत नाहीये.

तुमच्या खाण्याच्या सवयी बदला नाहीतर घर मिळणार नाही असं सर्रास सांगितलं जातं

Pages