आहारानुरूप आचारसंहिता, व्यवस्था आणि आहारसवयींचे मुद्रांकन

Submitted by भरत. on 17 January, 2018 - 00:20

मुंबईच्या आय आय टी नामक कुठल्याश्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आहाराची सोय करून दिली. त्यांच्या आवडीचा आहार करायचे स्वातंत्र्य दिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या आहारानुरूप ताटवाट्या इत्यादीचीही व्यवस्था केली. "आय आय टीच्या संकुलातील सर्व भोजनगृहांत देण्यत येणारे मुख्य जेवण हे शाकाहारी असून ते मोठ्या ताटामध्येच देण्यात येते. या व्यतिरिक्त ज्यांना मटण, अंडे यांसारखे मांसाहारी जेवण हवे असल्यास ते बाजूला वेगळ्या ताटामध्ये दिले जाते. मात्र विद्यार्थी मुख्य ताटामध्येच मांसाहारी जेवण घेत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी भोजनगृहाला केली. त्यानंतर मांसाहारासाठी नेमलेली ताटेच वापरावीत, मुख्य ताटांमध्ये मांसाहार करू नये, अशी सूचना भोजनगृहातून विद्यार्थ्यांना ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली."

इतकी साधीशी गोष्ट. पण राईचा पर्वत करणे , खोडसाळपणा, उगा आग आग म्हणून ओरडणे अशा सवयी लागलेल्या कुणा फुरोगामी टाइप विद्यार्थिनीनीने या निर्णयाबद्दल समाजमाध्यमांत आक्षेप घेतला. समाजमाध्यमांच्या सहज उपलबधतेमुळे आजकाल कोणीही उठतो, काहीही लिहितो आणि त्याला उगाच हवा दिली जाते. (हा लेखही त्याच प्रकारातला असल्याची टिप्पण्णी अपेक्षित.) मुळात विद्यार्थ्यांचं काम शिकणं हे आहे, त्यांनी आपलं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीत केंद्रित केलं पाहिजे. पण विद्यार्थी आजकाल अभ्यासाव्यतिरिक्त अन्य गोष्टींतच अधिक रममाण होतात, हे आपण कन्हैयाकुमार प्रकरणात पाहिलेच आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी असलेले नियम पाळलेच पाहिजेत. शिस्तीनेच राष्ट्र मोठ्ठे होते; शिशुवर्गापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी शिस्त पाळली गेलीच पाहिजे, हे आदर्णीय राम माधव यांनी नुकतेच ठणकावून सांगितलेच आहेच.
असो , तूर्तास आपण आहारसवयींबद्दल विचार करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या आहारासाठी त्या त्या प्रकारच्या प्लेट्स वापरणे हे खरे तर अत्यंत सोयीचे आहे. आपल्या वेदांत त्याबद्दल उल्लेख असेलच. पण हीच गोष्ट पुढे नेऊन आणखीही काही नियम केले पाहिजेत असे मला वाटते. ते पुढीलप्रमाणे.
१. शाकाहार्‍यांच्या वस्तीत मांसाहार्‍यांना घरेच देऊच नयेतच; हे तर आता बहुतांश लोकांना मान्य झाले आहेच.
२. आपण कोणा मांसाहार्‍याकडे पाहुणे म्हणून जात असू तर शाकाहार्‍यांनी आपली ताटवाटी सोबतच घेऊनच जावेच.
३. भोजनालये, उपाहारगृहे ही एकतर शुद्ध शाकाहारी किंवा शुद्ध मांसाहारी अशीच असावीतच; नसल्यास त्यात मांसाहारींच्या बसण्याची आणि अर्थातच भांड्यांची व हात- तोंड धुण्याची सोय वेगळीच असावीच. शाकाहारी स्वयंपाकघर आणि मांसाहारी स्वयंपाकघर वेगवेगळीच असावीतच आणि एकमेकांपासून पुरेशी लांबच असावीतच.
४. विमान , दूर पल्ल्याच्या रेल्वे आणि बसेसमध्ये आहारनुरूप सीट्स दिल्याच जाव्यातच. म्हणजे शाकाहारींना मांसाहाराचे दर्शन, गंध ,नाद यांचा उपद्रवच होणारच नाहीच).
५. आधार कार्डावर व्यक्ती शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंद केलीच जावीच. तंत्रज्ञान प्रगत होईल, तसे आपण काय काय खाल्ले त्याची माहितीही आधारच्या महासंगणकातच साठवलीच जावीच.
६.शाकाहारी आणि मांसाहारींच्या पासपोर्टच्या जाकिटांच्या किनारीचे डिझाइन वेगवेगळेच ठेवावेच. (अन्य गोष्टींसाठी वेगवेगळे रंग वापरून संपल्याने हा पर्याय)
७. आय आय टी मुंबई व तत्सम उच्च शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्रांत विद्यार्थी शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंदच असावीच. शाकाहारी विद्यार्थ्यांंच्या उदात्त, उज्ज्वल, सुंदर, मंगल, सुकोमल भावनांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन व्हावे याकरिता त्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मांसाहारबहुल देशांतच जाऊच देऊच नयेच. बहुतेक प्रगत देश या देशांच्या दुर्दैवाने मांसाहारबहुल आहेत. पण विश्वगुरू हिंदुस्तान आपल्या महान संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार जगभर करतोच आहेच. लवकरच जगातले बहुसंख्य देश मांसाहारच सोडूनच देतीलच. त्याचीच सुरुवात झालीच आहेच.)

मायबोलीकर या सूचनांमध्ये भरच घालतीलच. त्यांचे संकलन करून त्या सूचना केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय, महाराष्ट्रा शासनाचा शिक्षण विभाग व आदर्णीय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय यांना पाठवायचाही विचार आहेच.

धन्यवादच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला स्वतःला वेगळी ताटे असण्यात फार गैर वाटले नाही. हा मोअर ऑफ ताटं कीती चांगली/कोणत्या साबणाने धुतली जातात वाला मुद्दा आहे.
(मेस मध्ये खाणे वाढणे या कन्व्हिनियन्स ने सरळ दोन्ही वर्गाना एका हिरवे प्लस्टिक ताट एकाला लाल प्लॅस्टिक ताट असे करता येईल्,वाढणार्‍यांन पण पटकन कळेल.प्लास्टिक ताटं लहान आहेत हाही नॉन व्हेज इटर्स चा मुद्दा आहे.दोन्ही ताटे सारख्या(आणि चांगल्या) क्वालिटीची असावी.)

(माझ्या समोर/बरोबर ची लोक मांसाहार खातात.हरीण आणि ओक्टोपस पण.उद्या माझ्या मुलीला/नवर्‍याला/अन्य कोणाला खाणे चालू करायचे असेल तर ते माझ्या घरी बाहेरुन ऑर्डर करु शकतील.मला बनवता येणार नाही.पण ते धार्मिक वगैरे कारणांनी नसून त्यातल्या कॉम्प्लेक्सिटि मुळे.) व्हेज नॉन व्हेज हॉटेल मध्ये किचन वेगळे/कुकिंग ची भांडी वेगळी असणे अपेक्षित आहे(तेही कितपत पाळले जाते याबद्दल शंका आहे.पण आवडत्या हॉटेल ला टिम बरोबर जाताना हे विचार डोक्यात आणून डोक्याचं भजं करत नाही. ऑफिसात आलेले बड्डे केक एगलेस नसले तरी खाते.गोव्याहून आलेला बेबिंका आवडीने एग असले तरी खाते.)
पण बाहेर खाणावळीत भांडी नीट घासली जात नसतील.भांड्यांना अंड्याचा/चिकन चा उग्र वास धुतल्यावर पण राहत असेल.सेम वे विथ व्हेज खाण्यातले लसूण्/शेपू इत्यादी उग्रवासी पदार्थ.अश्या भांड्यात जेवायला मला आवडणार नाही.

बाकी फक्त शाकाहारी माणसांनाच बिल्डिंग मध्ये राहू देणे वगैरे अती शुद्ध मुर्खपणा आहे.आमचे भाडेकरु आधी ख्रिश्चन आणि आता मुस्लिम आहेत आणि ते बीफ्/पोर्क्/बाकी काय आवडेल तो सजीव खाऊ शकतात.त्यांनी घर स्वच्छ ठेवणे, भिंतीवर सिगरेट चे डाग न पाडणे, ड्रेन मध्ये उदबत्तीची राख आणि काड्या न टाकणे, भिंती खरवडणारा पेट न ठेवणे (ठेवल्यास नंतर भींती रंगवून देणे) हे ते काय खातात्/पितात या पेक्षा जास्त महत्वाचे आहे.

हा नॉन व्हेज वाल्यांना वेगळे काढण्याचा मुद्दा नसून मोअर ऑफ अमुक फ्लेवर अमुक लोकांना चालत नाहीत म्हणून वेगवेगळी भांडी असे असावे. यात फार गैर नाही.

जेवणासाठीचे वेगळे ताट समजतो... पण जेवण तयार करताना वापरलेल्या भान्ड्यान्चे काय ? ते पण वेगळे असायला हवे. नाही तर आज श्रीखन्ड आणि उद्या त्याच्यातच चिकन असा प्रकार होता कामा नये.

मी_अनु, जर जेवणाची ताटे नीट स्वच्छ केली जात नसतील, तर त्यावरचा उपाय : ती नीट स्वच्छ करा हा असायला हवा ना? अगदी फक्त शाकाहारी जेवणाची ताटवाटी नीट स्वच्छ केली नसतील , तर त्याला बुरशी, रोगजंतू लागेल, हा फार पुढचा भाग. पण तो स्वच्छ न झालेला अन्नकण पुन्हा तेच ताट वापरणार्‍याच्या जेवणाचाही भाग होईल.

Lol

भारी लेख आहे भरतराव. आवडला.

बाकी भावना फक्त काहींच्याच दुखावल्या जाणे मान्य आहे, इतरांच्या नाही ही संकल्पना ठळकपणे वर आलीच.

नीट स्वच्छ (प्रिल सुगंधी लिक्वीड सोप) केलेल्या स्टील च्या ताटात कोणीही काहीही खायला हरकत नाही. पण हे नीट स्वच्छ वाले मॉनिटर कोण करणार? रोज या इन्स्पेक्शन वर लक्ष कोण घालणार?
आमच्या मावशींना ताट धुवायला ते व्हिजीबली खराब लागते(म्हणजे आपण पाण्याचे ग्लास घासायला देतो ते नुसते फर्र पाण्याखाली फिरवून ट्रे मध्ये आपटले जातात.यावर उपाय म्हणजे रोज ४ वाक्ये बोलणे/बाई बदलणे/ग्लासाला पिवळ्या फोडणी तेलाचे बोट व्हिजीबली फासून ठेवणे/प्रिल पाणी घालून खळखळून धुवायला ठेवणे.)

<< हा मोअर ऑफ ताटं कीती चांगली/कोणत्या साबणाने धुतली जातात वाला मुद्दा आहे.>>
------- ताटे अस्वच्छ असणे हे कारण असेल तर ते कारण दुर करणे जास्त परिणाम साधेल.

आमच्या ऑफिस मध्ये डबे गरम करण्यासाठी वेगवेगळे मावे आहेत पण प्लेट्स काटे चमचे सारखेच आहेत,

काही हॉटेल्स मध्ये (मी गोवा पोर्तुगीझा मध्ये पाहिलेले) व्हेज आणि नॉनव्हेज लोकांना वेगवेगळ्या बॉर्डर डिझाईन च्या (ब्राऊन आणि ग्रीन) प्लेट्स देतात . पण ते त्यांच्या वेटर्सच्या सोई साठी असते, कुठे नॉनव्हेज वाढायचे नाही हे कळण्यासाठी.

बाकी काही हॉटेल्स "आमची व्हेज नॉनव्हेज किचन आणि भांडी वेगवेगळी आहेत " असे भिंत रंगवून सांगतात (बहुतेक KfC , नक्की आठवत नाही)

जो पर्यंत हा राजीखुशीचा मामला असतो, यो पर्यंत वांदा नसतो,
पण जेव्हा हे बंधनकारक होऊ लागते तेव्हा कुठे तरी काहीतरी चुकते आहे असे नक्की समजावे.

अनु, पुन्हा एकदा. तुम्हाला ताटं अस्वच्छ असलेली चालतील (निरुपाय म्हणून का होऊना) पण त्या ताटात आधी मांसाहार झालेला चालणार नाही; असा अर्थ निघतोय.

ऑ?
असा अर्थ कसा निघतो? आमच्या कामवाल्या मावशी आम्ही ऑफिस ला गेल्यावर येतात. भांडी नीट लिक्वीड सोपात भिजवली तर चांगली घासतात, जी थोडी खराब असतात ती वापरताना एकदा पाण्याखालून घालूनच वापरतो.प्लॅस्टिक चांगले घासत नाहीत, ते आम्ही वापरणे सोडलेय.हा 'चालण्याचा' मुद्दा नसून 'मावशी बदलायच्या नाहीयेत, रोज बोलण्यात एनर्जी घालवायची नाही, काहीही करु शकत नाही' चा मुद्दा आहे.
आधीच्या उग्रवासी खाण्याचा (शेपू लसूण कांदा चिकन पोर्क मटन बीफ) वास येत नसलेली, डोळ्याला स्वच्छ दिसणारी प्लेट खायला चालेल हा मुख्य कंटेक्स्ट.
भारतातले कोणतेही लेबर मॉनिटर करणे सोपे नसते.(बाकी देशांचा अनुभव नाही.) रोज ४ मुलं 'प्लेट ला वास येतोय' म्हणून बोंबा मारत येणे/भांडी धुणार्‍या बाईला रोज सवयी लावाव्या लागणे/भांडी वेगळी ठेवणे यातला कोणता पर्याय एखाद्या मोठ्या इन्स्टिट्युशन ला जास्त सोयीचा जाईल?
वेगळ्या प्लेट मुद्द्याचा इश्यु केला जातोय.
बाकी वेगळी घरे/वेगळे टेबल वगैरे सर्व बाबी मुर्खपणाच्या आहेत आणि कधीही इंपोज केलेल्या नाहीत.

पुढचा नियम,
- लोकलच्या लगेज डब्यातून मासे न्यायला बंदी.
- मासे विक्री फक्त बंद दुकानातूनच व्हावी, थंड नजरेने पाहणारे मासे उघड्यावर पाहून आमच्या भावना दुखावतात

>>>>>
पण बाहेर खाणावळीत भांडी नीट घासली जात नसतील.भांड्यांना अंड्याचा/चिकन चा उग्र वास धुतल्यावर पण राहत असेल.सेम वे विथ व्हेज खाण्यातले लसूण्/शेपू इत्यादी उग्रवासी पदार्थ.अश्या भांड्यात जेवायला मला आवडणार नाही.>>>>
मुद्दा कळला,
स्वच्छ धुतले आहे की नाही, हे मॉनिटर करणे कठीण आहे हे सुद्धा मान्य.
मात्र भरत यांनी जे उदाहरण दिले आहे ते लग्नाचा हॉल की व हॉटेलचे नाहीये, ते IIT मेस चे आहे, जिकडे हे quality कंट्रोल करणे सहज शक्य आहे, लोकांना वेगळी ताटे वापरा सांगण्यापेक्षा.

१. दुस-यांचा कोणताही नैसर्गीक हक्क डावलला जात नसताना, शाकाहारी व्यक्तींच्या मताचा व आवडी निवडीचा आदर करण्यात गैर काय आहे?

२. दुस-यांचा हक्कच काढुन घ्या किंवा बंदीच घाला असे तर आय.आय.टी मधले शाकाहरी म्हणत नाहीयेत ना?

>>पण हे नीट स्वच्छ वाले मॉनिटर कोण करणार?
ताटं आरोग्याच्या दृष्टीने नीट स्वच्छ केलीच पहीजेत. यात मांसाहाराचा संबंध नाही.
आणि एकदा का नीट स्वच्छ झाली की त्या नीट स्वच्छ (प्रिल सुगंधी लिक्वीड सोप) केलेल्या स्टील च्या ताटात कोणीही काहीही खायला हरकत नाही.

>>जर जेवणाची ताटे नीट स्वच्छ केली जात नसतील, तर त्यावरचा उपाय : ती नीट स्वच्छ करा हा असायला हवा ना?
+४२

आय आत्रटीच्या भोजनालयातला स्टाफ भांडी स्वच्छ घासतो की नाही, ते कळलेले नाही. त्याबद्दल तक्रार नसे ल तर घासत असावा.
म्हणजेच तक्रार आहे ती , मी जेवतेय त्या ताटात आधी कोणीतरी अंडंबिंड खाल्लं असेल. , ई.....

मुळात त्या आधीपासूनच्यया नियममामागचं लॉजिक काय आहे?
भांडी व्यवस्थित स्वच्छ असणं पुरेसं नाही का?
शाकाहारी भांडी.स्वच्छ करायला.सोपी आणि मांसाहारी कठीण किंवा याउलट असतं का?

अभिनव, शाकाहारींनी कोणत्यि प्रकारच्या ताटात जेवावं है मांसाहारी सांगत नाहीएत. मांसाहारींनी वेगळ्या प्रकारच्या ताटात जेवावं हा काही शाकाहारींचा आग्रह आहे.
मत आणि आवड स्वतः करायच्या गोष्टींबद्दल असतं, दुसऱ्याच्या नाही. ते मांसाहारी आपलं अंडं शेजारच्या शाकाहारी विद्यार्थ्याच्या ताटात तर वाढत नाहीत ना?

इथे प्रश्न भावना दुखावणे टाइप आहे. "या ताटात कोण्या मेल्याने आधी काय काय खाल्लं असेल रे देवा!" ज्यामागे कोल्ड लॉजिक दिसत नाही.ज्यांना असा त्रास खरंच होतो, त्यांच्या भल्यासाठीच मी नियम सुचवलेत..
प्रत्येक विद्यार्थ्याचं ताट वेगळं मार्क करावं, ज्याने त्याने आपल्याच ताटात जेवावं , हा नियम वाढवतो. यात वेळ आणि पैसा लागला तरी चालेल. भावना महत्त्वाच्या.
कल्पना करा, एअरपोर्टमधल्या सामानासारखे लोक आपल्याच ताटाची शोधाशोध करताहेत.

मांसाहारींनी वेगळ्या प्रकारच्या ताटात जेवावं हा काही शाकाहारींचा आग्रह आहे.
>>
शाकाहारी लोकांना स्वतःला वेगळे ताट हवे. यात उरलेल्या लोकांना जे शाकाहारी नाहीत, त्यांना तेह ताट सोडुन दुसरेच ताट वापरावे लागणार हे आपोआप घडणारे शास्त्र आहे. लादणे कुठे आहे यात?

फुरोगाम्यांमुळे २१ शतकात एखाद्या समुहाला - दुसर्याचे कोणतेही नुकसान न करता किंवा हक्क न डावलता - स्वतःच्या हक्कांचे संरक्षण करणेही अवघड झाले आहे.

"या ताटात कोण्या मेल्याने आधी काय काय खाल्लं असेल रे देवा!" ज्यामागे कोल्ड लॉजिक दिसत नाही.
>>
तुम्हाला लॉजीक दिसावे म्हणुन केले जात नाही आहे ते.
असे तर दिवसभरातल्या हजारो गोष्टींमधे लॉजीक नसते.

आवड निवड व वयक्तीक प्राधान्ये जपणे हा स्वतंत्र भारतातल्या व्यक्तीला दिलेला घटनात्मक अधिकार आहे.

आमच्या ऑफिस मेस मध्ये शाकाहार मांसाहार कोणीही कोणतेही ताट घेतो.कोणालाही ऑब्जेक्शन नसते.
उपासाच्या दिवशी पब्लिक फुड स्टॉल वाल्याला अंडे वाली सुरी फळ कापायला वापरु नका सांगतं, तो ऐकतो.(फळ अंडं कापलेल्याच चॉपिंग बोर्ड वर कापतो,त्याच्याकडे एकच आहे बोर्ड. त्यामुळे उपास प्लेट घेणार्‍यांना बघून आजूबाजूच्या पब्लिक च्या चेहर्‍यावर स्मितहास्य उमटते.)
पण एखाद्या इन्स्टिट्युट ला किंवा एखाद्या मेस ला ताटं वेगळी करावी वाटत असेल तर तो त्यांचा लॉजिस्टिक चॉइस आहे.
त्यावर इतके ऑब्जेक्शन का यावे?
(आमचा दाक्षिणात्य मॅनेजर बंगलोर हुन आला होता त्याला मात्र अंडाकरी आणि व्हेज सेम स्टॉल वर वाढणे अजिबात रुचले नाही.)

प्रत्येक विद्यार्थ्याचं ताट वेगळं मार्क करावं, ज्याने त्याने आपल्याच ताटात जेवावं , हा नियम वाढवतो. यात वेळ आणि पैसा लागला तरी चालेल. भावना महत्त्वाच्या.
>>
काही वेगळा वेळ लागत नाही. तेवढाच वेळ लागतो ती सर्व भांडी धुवायला.

कल्पना करा, एअरपोर्टमधल्या सामानासारखे लोक आपल्याच ताटाची शोधाशोध करताहेत.
>>
विषय काये? विमानतळ हा विषय आहे का? मुद्याचे बोला? आणि विशिष्ट रंगाने किंवा नक्षीने मार्क केलेली ताट शोधायला ज्यांना एवढे अवघड जाते त्यांना स्वतःचे विमान कुठले ते तरी कळते का? जावेच कशाला विमानाने? सरळ उंट भाड्याने घेउन रमत गमत वाळवंटातुन "आपेष्टांना" भेटत भेटत जावे! हा.का.ना.का.

मी अनु, प्रिल सुगंधी लिक्वीड सोप चांगलं आहे का ग? मी नेहमी विम वापरते.
>>
विषयला धरुनची पहिली पोस्ट.
अभिनंदन. Light 1

व्हिम पण चांगले आहे, प्रिल चा वास मला आवडतो म्हणून प्रिल.
डेटॉल किचन लिक्वीड विशेष चांगले नाही.क्वांटिटि जास्त लागते.रामदेव बाबा लिक्वीड अजून वापरले नाही.टॉयलेट क्लिनर हल्ली हार्पिक पेक्षा पतंजली प्रिफर करते.
(अवांतराबद्दल क्षमा)

पुढला नियम, मांसाहारी ताटे धुण्यासाठी वेगळे स्पेशालिस्ट साबण हवेत. जसे तेलकट भांड्यांसाठी असतात.
परामदेवबाबांसाठी आयडिया. साबण अभिमंत्रित करायचा. पुढल्या वेळी ताट घेणाऱ्याची मांसाहाराची वासनाच मेलीच पाहिजेच.

पुढला नियम, मांसाहारी ताटे धुण्यासाठी वेगळे स्पेशालिस्ट साबण हवेत. जसे तेलकट भांड्यांसाठी असतात
>>
आय.आय.टी. जाणारे एवढे हुशार नक्कीच असतात की असा वेगळा साबण गरजेचा नाही, हे समजतील.

उद्या एखादे विशिष्ट प्रकारचे नवे मांसाहारी खाद्य आले, ज्याला खरंच वेगळ्या पद्धतीचा साबण लागत असेल, तर तो अंगीकारणा-या सुरुवातीच्या लोकांत आय.आय.टीवालेच असतील.

"ह्या ताटात आधी मांसाहारी पदार्थ खाल्ले गेले असतील तर मला हे ताट नको" असं ज्यांना खरंच वाटतं (मग ते स्वच्छतेच्या शंकेमुळे असो वा अजून काही), त्यांच्यासाठी वेगळी ताटं ठेवावीत (तशी पाटीच लावावी सरळ). म्हणजे कुठल्याच बाजूचं सरसकटीकरण होणार नाही. असे लोक प्रत्यक्षात कमी निघतील असं वाटतंय.

मग आय आय टी वाल्यांना स्वच्छ धुतलेल्या ताटात आधी कोणी काय खआल्ल याने फरक कआ पडतो?
तसंच ते परदेशात , गेलाबाजार एमेनसीत गेले ,तर काय करतील?
आधी वेगळ्या ताटाचं कोल्ड लॉजिक मांडा.

Bagz +1

Pages