सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - 14

Submitted by Suyog Shilwant on 18 August, 2017 - 18:11

दुपारच्या तळपत्या सुर्यप्रकाशाने जंगल अगदी लख्ख झाले होते. कपिलशी सामना केल्या नंतर सुयुध्दने निलमध्वज व अश्वध्वजच्या गटाला सामन्यात पुढे न्यायचे काम योग्य पार पाडले होते. दोन्ही गटातील सोबत्यांनी जबरदस्ती टाकलेल्या विश्वासाने त्याच्यावरची जबाबदारी आणखीणच वाढली होती. त्याने सांगितलेल्या प्रत्येक इशाऱ्याचे ते सर्व जण तंतोतंत पालन करत होते.

समीर, हर्षद, अभिषेक, भरत आणि सुयुध्द पुढे राहुन सावधपणे मार्ग कापत चालले होते. त्यांचा गट आता 26 जणांचा होता. त्यामुळे त्यांना जंगलाच्या झाडाझुडपातुन लपत छपत जावे लागत होते. इतक्या मोठ्या गटाला एकसाथ एकाच वेळी नेणे योग्य नाही हे सुयुध्दला आधीच समजले होते. म्हणुन त्याने छोटे छोटे तीन गट करुन घेतलेले. एक गट जो तलवारी घेऊन पुढे जाऊन पुढचा मार्ग सुरक्षित आहे का ह्याची खात्री करेल. त्यानंतर दुसरा गट पुन्हा थोडं पुढे जाईल मग तिसरा. असं करत त्यांनी थोडं थोडं करुन पुढे जायचं ठरवलं होतं.

सुयुध्द आणि समीर एका झाडापाशी थांबले. पुढे दुर अंतरावर सुयुध्दला एक टेकडी दिसत होती. त्याने समीरला बाकिच्यांना आहे त्याच ठिकाणी थांबण्यास सांगितले. खात्री करताच कि इथे आपल्याला कोणताही धोका नाही. त्याने समीरशी बोलायला सुरुवात केली.

" ती जी दुर टेकडी आहे. त्याच्या पार आपल्याला जायचं आहे. पण मला एक शंका वाटते रे समीर"

"काय…? कसली शंका वाटते?" समीर पटकन म्हणाला.

सुयुध्दने त्या टेकडीची रुपरेशा पाहिली व समीरला म्हणाला. "टेकडीवर फारशी झाडं नाहीत. ज्याने आपल्याला लपत वर जाता येणार नाही. जर आपण ह्या मार्गाने गेलो तर शक्य आहे कि आपण दुसऱ्या गटाला दिसु. ज्याने आपल्याला त्यांच्याशी लढा द्यावा लागेल. त्यात आपला वेळ ही जाईल. "

" खरं आहे पण ह्या टेकडीवर चढल्याने आपल्याला पुढे किती अंतर जायचं आहे हे तरी कळेल." समीरने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला.

" हं.… ते तर आहेच. तरीही मला शंका वाटते." सुयुध्दने गंभिर होत म्हंटले.

ते बोलत असताना भरत ही त्यांच्या जवळ आला होता. त्याला जाणून घ्यायचं होतं कि थांबण्याचं नक्की कारण काय आहे.
त्या दोघांचं थोडं फार बोलणं त्याने ऐकलं होतं.

"माझ्या मते आपण ह्या टेकडीवरुन जायला हवं. आपल्याकडे धनुर्धर आहेत. जर काही झालंच तर आपली संख्या ही जास्त आहे. आपण सहज कोणत्याही गोष्टीवर मात करु." भरत मधेच म्हणाला.

"हो.. मला ही हेच वाटतं." समीरने भरतच्या बोलण्याला दुजोरा दिला.

सुयुध्दला जाणं योग्य वाटत नव्हतं तरीही त्याने त्यांचं ऐकायचं ठरवलं.
"तुम्ही दोघं म्हणत असाल तर जाऊयात मग…" सुयुध्द म्हणाला.

सुयुध्दच्या इशाऱ्याने पुन्हा सर्व जण पुढे जाण्यास निघाले. सुयुध्द ने मनातल्या संशयाला बाजुला सारत त्यांच्या सोबत जायचा निर्धार केला. पहिला गट जो पुढे होता त्यात सुयुध्द स्वत: खबरदारीने लक्ष देऊन सर्वांना एक एक करत झाडांच्या आडोशातुन इशारे देत हळु हळु पुढे सरकवत होता. अगदी जसे बुध्दीबळातल्या पटावर आपण प्यादे पुढे सरकवावेत तसे. त्याने त्याच्या गटातील निलिमाला व इतर धनुर्धरांना अशा ठिकाणी ठेवले होते जेणे करुन जर एखादा हल्ला झाला तर दुरुन येणाऱ्या गटास धनुर्धर सहज निशस्त्र करु शकतील. त्याच्या योजनेचा दुसरा भाग हा होता कि दुसरा गट जो पुढे जाईल तो आपल्या ढालींनी मागे असणाऱ्या इतर 10 जणांचे सहज रक्षण करु शकेल. सर्वात शेवटी त्याने तलवार बाजांचा गट ठेवला होता जो दुसऱ्या पक्षास सहज लढुन बंदी बनवु शकेल. अशा रितीचे युध्द शास्त्र तो आश्रमात आता पर्यंत शिकला होता. ज्याचा उपयोग त्याला आता आपली तल्लख बुध्दी वापरुन करायची योग्य संधी मिळाली होती. हवेचे अधुन मधुन येणारे झुळुक त्याला सुखावत होते. मध्यान होऊन आता एक तास तरी उलटुन गेला होता.

हळु करत त्यांनी बरेच अंतर कापले. टेकडी आता थोडीच दुर होती. सुयुध्दने आजुबाजुला पाहिले टेकडी जवळच्या परिसरात लहान मोठी गर्द झाडी होती मधेच कुठे लहानशी जागा त्या झाडीतुन दिसत होती ज्याच्या पलिकडचा परिसर मोकळाच वाटत होता. अचानक त्याची नजर जवळच हलणाऱ्या एका झुडपावर गेली. त्याने सगळ्यांना थांबण्याचा इशारा केला. तसे सर्व जागीच थांबले. त्याने निलिमाला जिथे हालचाल होत आहे त्या ठिकाणी दगड मारण्यास सांगितले. निलिमाने जमिनीवरचा एक दगड उचलुन त्या झुडपाकडे भिरकावला. मागुन काहिच हालचाल किंवा कोणी असल्याचे वाटले नाही तसे सुयुध्दने अश्वध्वजच्या एका मुलाला त्या जागी जाऊन पाहणी करण्यास सांगितले. भाला घेऊन तो मुलगा त्या झुडपाकडे गेला. बाकिच्यांनी सावध होत त्या ठिकाणी काय असेल ह्यावर नजर लावली. धनुर्धर तयारीत आपले बाण प्रत्यंचेवर चढवत निशाणा धरुन बसले. मुलगा आपला भाला घेऊन पुढे गेला त्याने तो भाला झाडीच्या आरपार केला. पण मागे कोणीच नव्हते. त्याने वाकुन झाडीआड पाहिले अचानक त्याला कोणी तरी आत खेचले. सगळे जण सावध झाले. आपली शस्त्र त्यांनी हातात धरली. अचानक चारी दिशेने मिथुनध्वज गटाच्या शिष्यांनी एकसाथ हल्ला केला होता. सुयुध्दच्या व अश्वध्वज च्या गटातले सर्वजण तयारीतच असल्याने त्यांनी येणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांशी लढायला सुरुवात केली. सुयुध्दच्या जवळ येईस तोवर निलिमाने तीन चार जणांना निशस्त्र केले होते. समीर आणि अभिषेक दोघेही त्याच्या बाजुला आपली तलवार घेऊन सज्जच होते. सुयुध्दने मेघराज वरची आपली पकड मजबूत केली आणि ढालींच्या संरक्षणाच्या पलिकडे आलेल्या दोन जणांवर तलवार घेऊन धावला. त्याची तेजी इतरांना वारंवार चकीत करत होती. त्याने अगदी क्षणार्धात दोन्ही मिथुनध्वजच्या योध्दांना निशस्त्र करुन जमिनीवर पाडले. अभिषेक ही एका सोबत आपले युध्दकौशल आजमावत होता. सुयुध्दला पाहताना त्याने हसुन मज्जा येत असल्याचे दर्शवले. सुयुध्दने तशीच आपली नजर डावी कडे लढत असलेल्या समीर वर फिरवली. समीर नक्कीच मिथुनध्वजच्या त्या मुलावर भारी पडत होता जो त्याच्याशी युध्द करत होता. आजुबाजुला फक्त युध्द कल्लोळ माजला होता. सगळीकडे तलवारी एकदुसऱ्यावर आपटण्याचेच आवाज येत होते. कित्तेक जण युध्द स्पुरण चढल्याने जोशात लढत होते.

सुयुध्दला अचानक त्याच्या समोरुन कोणाच्या ओरडण्याचा आवाज आला. आवाज ओळखीचा असल्याने त्याने पटकन तिकडे पाहिले. तो हर्षद होता त्याच्या मागे लागलेल्या तलवार बाजापासुन वाचण्यासाठी तो ईकडे तिकडे पळत ओरडत होता. सुयुध्दने पटकन त्याच्या दिशेने धाव घेतली. कमालीच्या तेजीने हर्षद आणि त्या मिथुनध्वजच्या मुला मधे जाऊन तो उभा राहीला. मधे येऊन सुयुध्दने मिथुनध्वजच्या मुलाला आश्चर्यात पाडले. त्या मुलाने आपली गती न थांबवता सुयुध्दवर धाव घेतली. पण सुयुध्द अचानक बाजुला झाला व त्याचा वार विफल केला. लगेच मागे फिरुन सुयुध्दने त्याच्या तलवारीची मुठ त्या मुलाच्या पाठीवर मारली तसा तो मुलगा कळवळत खाली कोसळला. एव्हाना धावणारा हर्षद थांबुन हे सर्व पाहत होता. त्याने जवळ जाऊन त्या मुलाच्या पेकाटात एक लात घातली आणि व्यंग करत म्हणाला.
" मला मारायला येतोस…आता मा….मा…मा…..मार…."

सुयुध्दला हे पाहुन हसु आवरले नाही. पण स्थितीचे भान राखत त्याने हसतच हर्षदला म्हंटले.
" हर्षद ह्याला बंदी बनवुन ठेव. मी आलोच."

इतकं वोलताच तो पुन्हा मागे वळुन त्याच्या गटाची युध्द स्थिती पाहु लागला. पाहिले ते दृश्य अजबच होते. एव्हाना अश्वध्वजच्या व त्याच्या गटाने मिथुनध्वजचे बरेच योध्दा निशस्त्र केले होते. निश्चितच त्यांची संख्या सुयुध्दच्या गटापेक्षा कमी होती. सुयुध्दच्या गटाची स्थिती आता वरचढ होती. पण मिथुनध्वजचा गटनायक अजुन काही हार मानण्यास तयार दिसत नव्हता. केवळ पाच सात जण त्याच्या गटात लढत होते. सुयुध्दला स्थिती योग्यच दिसत असल्याने त्याने मिथुनध्वजच्या उरल्या सुरल्या धनुर्धरांच्या मुसक्या आवळायचे ठरवले. कारण मधेच कोणातातरी बाण त्यांच्या दिशेने येई. मेघराज तलवार दोन्ही हातात धरत डोळे मिटुन सुयुध्दने मंत्र म्हंटला व तलवार धनुष्यबाणात रुपांतरीत झाली. अगदी मना योग्य संतुलित वजनाचा तो धनुष्य सुयुध्दच्या हातात होता. त्याने बाणाचा भाता आपल्या पाठिस बांधला व लांब एका झाडावार चढुन बसलेल्या धनुर्धरावर निशाणा साधला. त्याला फक्त त्या धनुर्धरास निशस्त्र करायचे होते. कारण स्पर्धेचे तसे नियमच होते. योग्य तो निशाणा धरताच सुयुध्दने बाण सोडला व त्या धनुर्धरास निशस्त्र केले. त्याने पुन्हा आजुबाजुला पाहिले. त्याची नजर जवळ एका झाडाच्या आड उभी असलेल्या निलिमा देसाई वर गेली. त्याने पाहिले कि तिने कोणावर तरी निशाणा साधला आहे. त्याने निशाण्याच्या दिशेने पाहिले. दुर एका बाजुला झाडाच्या पानांचा सहारा घेत कोणी लपले होते. त्या दिशेने बरेचसे बाण त्याच्या गटाच्या योध्दांना निशस्त्र करायला निशाणा बनवत होते. निलिमा त्या दिशेला बाण मारणार एवढ्यात सुयुध्दने तिला जाऊन थांबवले आणि तिला म्हणाला.

" थांब…तु बऱ्याच जणांना निशस्त्र केलं आहेस… हा नेम मीच साधणार.." तिला हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळच हास्य होतं. त्याला हा सामना फारच रोचक वाटत होता कदाचित म्हणुन असावं.

" बरं तु मार आणि निशस्त्र कर…" निलिमाने लगेच त्याचे ऐकुन दुसरे कोणी सावज भेटतं का हे पाहण्यास सुरुवात केली.

सुयुध्दने निरखुन त्या पानांनी भरलेल्या झाडाच्या फांदीकडे पाहिले. त्याला कुठे निशाणा साधायचा होता हे कळले होते. पाठिवरच्या भात्यातला एक बाण काढत त्याने बाण प्रत्यंचेवर चढवला व निशाणा धरुन बाण सोडला. निशाण्याच्या ठिकाणाहुन एक तुटलेला धनुष्य खाली पडला. सुयुध्द गालातच हसला. त्याचा नेम अगदी अचुक लागला होता. बाजुला उभ्या निलिमा ते पाहुन म्हणाली.

" वाह…!!! अचुक निशाणा… तुझा नेम पाहुन वाटत नाही कि तुला आश्रमात एकच महिना झाला आहे. अशी कला शिकण्यास निदान 1 वर्षाचा सराव तरी हवाच."

" धन्यवाद निलिमा" हसतच तो तिला म्हणाला.

अचानक कोणाचा तरी जोराचा ओरडण्याचा आवाज आला.
" नाही….मी हार मानणार नाही…"
तो आवाज मिथुनध्वजच्या गटनायकाचा होता. अश्वध्वजचा गटनायक भरत त्याच्याशी लढत होता. पण मिथुनध्वजचा गटनायक काही हार मानत नव्हता. त्याचे सर्व साथी एव्हाना बंदी केले गेले होते. सुयुध्द झाडाजवळच उभा राहुन हे पाहत होता. त्याने भात्यातला एक बाण काढला आणि मिथुनध्वज गटनायकाच्या तलवारीवर निशाणा धरुन बाण मारला. काय आश्चर्य बाण अगदी अचुक मिथुनध्वज गटनायकाच्या हाताला लागला. वर उगारलेली त्याची तलवार खाली पडली. मोक्याचा फायदा घेत भरतने लगेच त्याचा हात पाठीमागे पिरगळत त्याला बंदी बनवले. सुयुध्द धावतच त्या दोघां जवळ गेला. मिथुनध्वजचा गटनायक कळवळत होता. ज्या हातात त्याची तलवार होती त्याच्या अंगठ्याला बाण घासुन गेल्याने त्याला इजा झाली होती. भरतने त्याच्या जवळच्या एका दोरीने त्याला एका झाडाला बांधले. बांधताना तो गटनायक त्याला भोचक शब्दात दगा केल्याचे बोलु लागला.
हे ऐकताच समीर रागात त्याला बोलला.

" का…? तुमचे धनुर्धर जसे काय आमच्यावर विशेष कृपाच करत होते बाण मारुन."

" हे बघ तुला आम्ही योग्यरित्या निशस्त्र केलं आहे. तु हार मान्य कर अगर नको करुस..आता त्याचा काहीच उपयोग नाही." सुयुध्द स्पष्ट आणि कठोरपणे त्याला म्हणाला.

" हार तर मी मान्य करतो. पण मला व माझ्या गटाला असं बांधुन जाऊ नका." मिथुनध्वजचा गटनायक म्हणाला.

सुयुध्दने एक नजर त्याला पाहिले व पाठी फिरला. त्याच्या सोबत समीर व भरतही फिरले. मागे मिथुनध्वजचा गटनायक ओरडत राहीला पण सुयुध्दने मागे न फिरण्याचे ठरवले होते. सुयुध्दने त्याच्या गटातील सर्वांना एकत्र केले व कोणाला काही दुखापत झाली आहे का ह्याची खात्री केली. कोणालाच काही झाले नव्हते. हा अचानक झालेला हल्ला त्यांनी अगदी सोप्या रितीने जिंकला होता. सुयुध्दने सर्वांना आपापले निर्देश दिले व ते टेकडीच्या दिशेने निघाले. जाताना सुयुध्दला अजुनही मिथुनध्वज गटनायकाचा शिव्याशाप देत ओरडण्याचा आवाज येत होता. पण त्याने लक्ष दिलं नाही व पुढे चालत राहिला.

टेकडीवर चढताना बऱ्याच जणांना थकवा आला होता. आता ते सर्वजण टेकडीवर पोहचले होते. थोड्याच वेळा पुर्वी त्यांनी थकवणारे युध्द केले होते म्हणुन काहीजण झाडाच्या सावलीत बसुन आराम करत होते तर काही पहारा देत होते. आळीपाळीने त्यांना आराम करायचा होता. त्यांना अजुन पुढे जायचे होते त्यासाठी आराम हवाच. थोडा वेळ विश्रांती घेतल्यावर सुयुध्द उठला व आजुबाजुला नजर फिरवत पाहु लागला. त्याच्या मागोमाग समीर, हर्षद, अभिषेक व भरतही उठले. सुयुध्दने समोर टेकडीवरुन दिसत असलेल्या खालच्या घनदाट झाड्या व उंच झाडांकडे पाहीले. नजर जाईल तिथ पर्यंत जंगलच दिसत होते. कुठे काहिच हालचाल किंवा दुसऱ्या कोणत्या गटाचे निशाण दिसत नव्हते. सुयुध्दने झाडांकडे पाहता पाहता त्या चौघांना म्हंटले.

" आपल्याला ह्या समोरच्या झाड्यांमधुन जावं लागेल" समोर बोट दाखवत तो म्हणाला.

" हो. जाऊयात पण बाकिच्यांची विश्रांती तर पुर्ण होऊ दे. पाहऱ्यावरच्यांनी अजुन आराम घेतला नाही." समीर पटकन म्हणाला.

" स…स….स….सुयुध्द… मला त्या मुला पा..पा…पासुन वाचवल्या बद्दल आभार…" हर्षद मध्येच म्हणाला.

" अरे हर्षद आपण मित्र आहोत. आभार कसले त्यात..?" सुयुध्दने हसतच त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटले.

" पण तु असा धावत का होतास त्याच्या पासुन" अभिषेक म्हणाला.

" अरे…त…त….त….तो… मागे कसा ल…ल..लागला होता माझ्या…"हर्षद म्हणाला.

समीरला हे ऐकताच हसु आवरले नाही तो जोरात हसु लागला. त्याच्यासोबत अभिषेकही हसु लागला.

" म…म…म….म….मला हसताय तुम्ही…" हर्षद तोंड पाडुन त्यांना म्हणाला.

" ए…बस करा रे. नका करु त्याची मस्करी.." सुयुध्द दोघांना थांबवत म्हणाला.

" बरं. सुयुध्द तु बाकी कमाल निशाणा लावलास त्या धनंजयवर. ऐन वेळी त्याची तलवार पाडलीस." भरतने म्हंटले.

" हो…मला करावच लागलं. तो हार मानायला तयारच दिसत नव्हता." सुयुध्दने त्याच्याकडे वळत म्हंटले.

" बरं आता निघुयात का आपण?" भरत त्या सर्वांना म्हणाला.

" हो..जर सगळ्यांचा आराम झाला असेल तर निघुयात." सुयुध्द बोलला.

समीरला सुयुध्दने बाकीच्यांना गोळा करायला लावले. एक नजर समोरच्या झाडीकडे पाहत त्याने खाली जायचं ठरवलं. खाली ऊतरुन त्यांनी झाडांच्या घनदाट परिसरात प्रवेश केला. भर दिवसा कडक उन्हात त्या झाडांनी बरीच सावली केली होती. जमिनीवर झाडांच्या खोडापासुन मुळं बाहेर वाढुन वाकडी तिकडी आलेली. चालताना बारिक सारीक काड्या त्यांच्या पाया खाली तुटत होत्या. सुयुध्दने आजुबाजुला पाहिले कोणत्याही जनावराचे निशाण ह्या जंगलाच्या भागात दिसत नव्हते. त्या सावलीत बराच थंडावा त्यांना मिळत होता. हवा ही अधुन मधुन त्यांना शिवुन जात होती. अगदीच शांतता होती त्या परिसरात. ना कोणत्या पक्ष्याचा आवाज ना काय. एक चितपाखरु सुध्दा नाही. फक्त हवेने हलत्या झाडांच्या पानांची सळसळ तेवढी होती. सुयुध्दला जरा अजबच वाटले. त्याने सर्वांना थांबायला सांगितले. समीरला जवळ बोलवुन तो म्हणाला.

" समीर इथे काहीतरी गडबड वाटते मला."

" गडबड…? कसली रे…?" समीरने चटकन विचारले.

" तु पाहिलं नाहीस का ? ह्या भागात कोणत्याही पक्ष्याचा आवाज नाही." सुयुध्दने वर सर्व बाजुला नजर फिरवत म्हंटले.

" नसतील इथे पक्षी मग त्याचं काय ?"

" अरे इथल्या जागेत कोणत्या जनावराचे येण्या जाण्याचे हि निशाण नाहीत. "

समीरने आजुबाजुला निरखुन पाहिले त्याला ही तेच जाणवले जे सुयुध्दला वाटतं होते. तो गंभीर भाव करत म्हणाला.
" हो. नाहीयेत हे खरं आहे तुझं.."

एव्हाना भरत त्यांच्या जवळ पोहचला होता. सुयुध्दने आपली शंका भरतला सांगितली. त्याने हमी भरली कि तो आधी ही ह्या भागातुन पुढे गेला आहे. तेव्हा इथलं वातावरण आधीपासुन असचं आहे हे खात्रीने त्याने सांगितलं. सुयुध्दने हे ऐकताच बाकीच्या शंकेला दुर्लक्षित केलं अन पुन्हा पुढे सरकण्यास सुरुवात केली. या ही वेळी त्याने तिन गट केले होते. पहिले धनुर्धर, दुसरे ढालधारी व शेवटी तलवारबाज. हळु हळु करत ते पुढे सरकत राहिले.

बराच वेळ चालत चालत त्यांनी खुप अंतर कापलं होतं. आजुबाजुच्या झाडांची उंची आणि घनता आता बरीच वाढली होती. झाडं लगोलग अगदी जवळपास उगवल्याने त्यातील अंतर फारच कमी होते. आतलं वातावरण अजुनही जरा थंड आणि शांतच दिसत होतं. अधुन मधुन येणारी उन्हाची किरणं डोळ्याला दिसेल असा जाळीदार प्रकाश पांनांच्या फटीतुन सोडत होती. मधेच एका दिशेने सुयुध्दला पाण्याच्या ओखळ वाहण्याचा आवाज आला. त्या पाण्याच्या आवाजान्र त्याच्या घश्याला पडलेली कोरड अचानक त्याला जाणवु लागली. आवाजाचा वेध घेत तो आवाजाच्या दिशेने निघाला. त्याच्याच सारखा सगऴ्यांना तो आवाज आला असावा कारण आपोआपच सर्वांची पावलं त्या दिशेला वळली होती. चालत धावत सुयुध्द पटापटा त्या दिशेला गेला. झाडाच्या पार त्याच्या डोळ्यांनी त्याने तो वाहता ओढा हेरला होता. पटकन जाऊन तो पाणी पिऊ लागला. पहिला तो ओढ्या जवळ पोहचला पण मागुन येणारे सर्व जण अगदी त्याच तहानेनी अगाशा सारखे पाणी पिऊ लागले. समीरने तर आपले पुर्ण तोंडच पाण्यात बुडवले. सर्वांची तहान भागताच त्यांना पुढे निघायचे होते. पण सुयुध्दने एका बाजुला बांबुची झाडं पाहीली. त्याला मनात एक विचार आला. तो पटकन त्या बांबुच्या झाडां जवळ गेला. आपली मेघराज तलवार बाहेर काढुन त्याने एक बांबु तोडला. त्याचे पोकळ खाच्या वर भाग केले. एक बाजु बंद असल्याने त्या पोकळ भागाचे एक भांडे जसे तयार झाले होते. तोडलेले 4-5 तुकडे गोळा करुन त्याने ओढ्याजवळ आणले आणि त्यात पाणी भरु लागला. पाणी भरल्यावर त्याच्या लक्षात आले की जर त्या पोकळ बांबुच्या तोंडाला बुच बसवले नाही तर त्यातुन पाणी सांडुन जाईल. त्याने ऊरलेल्या 2-3 बांबुत पाणी भरलं आणि बुच बनवायला त्या बांबुच्या झाडांपाशी गेला. एक बांबु तोडुन त्याने त्याची 4-5 बुचं बनवली. आता त्याचे काम झाले होते. त्याचे साथी हा सर्व प्रकार पाहत होते. समीर त्याच्या जवळ जाऊन त्याला म्हणाला.

"हे काय रे…पुढेही आपल्याला कुठे ना कुठे पाणी भेटेलच…मग ही बांबुची बाटली बनवायची काय गरज आहे. "

" अरे समीर आपल्याला परत जर पुढे पाणी शोधावं लागलं तर त्यात आपला वेळ नाही का वाया जाणार."

" हं.. खरं आहे. मग तर मी पण अशी दोन तीन बनवुन पाण्याने भरुन घेतो."

समीरला त्याची कल्पना फारच पटली होती. त्याने लगेच जाऊन बांबु तोडायला सुरुवात केली. त्याचे अनुकरण म्हणुन इतरानी सुध्दा तसेच केले. सुयुध्दने ओढ्या जवळच्या परिसराचा आढावा घेतला. तिथे जवळ एका झाडाला वेली होत्या. जरा वेगळ्याच वेली होत्या त्या काळपट आणि बारीक. त्याने अशा वेली पहिले कधीच पाहिल्या नव्हत्या. जवळ जाऊन त्याने त्या वेलींना पाहिले. इतर मुलं आपल्या बांबु बाटल्या तयार करण्यात अजुन मग्नच होते. सुयुध्दने ओढ्याच्या पलीकडचा परिसर पाहिला ज्या वेली त्याने पाहिलेल्या अशाच वेलींनी पुढचा सगळा परिसर भरला होता. कदाचित ह्या भागाला ह्याच झाडांनी भरुन टाकले होते. तो पुढे जाऊन पाहणार इतक्यात त्याला समीरने आवाज दिला. तो तसाच मागे वळला आणि समीर जवळ पोहचला.

" चल आता निघायला हवं" समिर त्याला म्हणाला.

" हो तुमचं झालं असेल तर निघुयात." सुयुध्दने इतरांना विचारत म्हंटले.

" अरे झालंच आहे म्हणुन तर म्हंटलो निघुयात." समीर पटकन बोलला.

सुयुध्द गुडघा टेकवुन खाली जमीनीवर वाकला. आपला हात त्याने जमिनीला लावला आणि डोळे मिटुन दिशा शोधु लागला. डोळे ऊघडताच तो उठला व उजवीकडे हात दाखवत म्हणाला.

" आपल्याला ह्या दिशेला जायचं आहे. आपण ध्वजखांबाच्या जवळ आहोत."

" चला रे…! आता जास्त उशीर इथे थांबलो तर गरुडध्वज बाजी मारेल." समीरने जोरात सर्वांना म्हंटले.

सुयुध्दने सांगितल्या प्रमाणे धनुर्धर, ढालधारी व तलवार बाज असा गट पुन्हा सज्ज झाला. एक एक करत पुन्हा त्यांनी लपत छपत पुढे जायला सुरुवात केली. सुयुध्द ढालधारी गटच्या अगदी मागे होता. तो पुढे सरकणाऱ्या दोन्ही गटांवर नजर ठेवुन होता. दाटीवाटीच्या झाडाझुडपांतुन ते योग्य दिशा धरुन चालले होते. समीर ह्या वेळी हर्षदच्या जवळच राहिला होता. त्याला माहीत होत की हर्षदला आपली रक्षा निट करता येणार नाही. सुयुध्दने पुढुन येणाऱ्या बारीक सारीक आवाजांवर आपलं लक्षं केंद्रीत केलं होतं. त्याला लवकर ध्वजखांबा जवळ पोहचायचं होतं. कारण ह्या वेळी त्याने गरुडध्वजला पुर्णपणे हरवायचा निश्चय केला होता. कपिल ने हर्षद सोबत जे केले होते त्याचा राग अजुन त्याच्या मनात उफाळत होता. आपल्या रागाला तो जिंकण्यासाठीचे बळ म्हणुन वापरत होता. मधेच त्याला निलिमाने इशारा केला तसे सर्व जण थांबले. तो लगेच निलिमा जवळ गेला. तिने पुढे काय आहे हे सुयुध्दला दाखवले. पुढे पाहताच सुयुध्दला आश्चर्य वाटले. त्याने मगाशी ओढ्या जवळ पाहिलेल्या वेली सगळीकडे दिसत होत्या. त्या एकमेकांत इतक्या दाट आणि जाड वाढल्या होत्या कि त्या मार्गाने जाने त्यांना अशक्यच होते. सुयुध्दने आजुबाजुला सगळीकडे पाहिले अचानक त्याला एका ठिकाणी वेली कापल्या सारख्या दिसल्या. तो पटकन त्या दिशेला निघाला. एक माणुस जाईल इतकी जागा वेल कापुन कोणी तरी केली होती. त्याच्या सोबत आलेल्या निलिमा आणि भरतने हे पाहिले.

" नक्कीच आपल्या आधी इथुन कोणी गेलं आहे." भरत म्हणाला.

" हं." सुयुध्दने विचार करत त्या कापलेल्या वेलीकडे पाहिले आणि म्हणाला.

" इथुन आताच थोड्यावेळ पुर्वी कोणी गेल्ं असावं." निलिमा ती कापलेली जाडसर वेल हातात घेऊन म्हणाली.

" आपणही ह्याच मार्गाने जाऊयात. निलिमा तु बाकिच्यांना बोलव." सुयुध्दने मेघराज हातात घेत म्हंटले.

निलिमाने बाकिच्यांना इशारा करत जवळ बोलावले. सुयुध्दने त्या कापलेल्या वेलीला दोन जण सहज जातील असे कापले व जागा केली. तो मागे वळला व बाकिच्यांना ऐकायला जाईल ईतक्या मोठ्या आवाजात म्हणाला.
" आपल्या पैकी तलवार असलेले दोन जण मला पुढे हवेत. आपल्याला ह्या वेली कापुन पुढे जावे लागणार आहे. तेव्हा 2 जणं पुढे या."

समीर पुढे आला त्याच्या सोबत अश्वध्वजचा एक जण घेऊन त्यांनी दोघांनी वेली कापायला सुरुवात केली. त्याच्यामागे सुयुध्दने ढाल असलेले दोन जण पाठवले त्यामागे त्याने दोन धनुर्धर पाठवले. बाकी तलवार बाजांना त्यानी त्यामागे पाठवले. ढाल व बाकी धनुर्धरांना तो मागे ठेवुन स्वत: तलवार बाजांसोबत पुढे गेला. थोडंच अंतर त्यांनी कापलं असेल कि पुढे समीर ओरडु लागला. पुढे काय झाले हे सुयुध्दला कळत नव्हते त्याने जोरात समीरला हाक मारली. समीर ओरडतच होता कि एक एक करत त्याच्या गटाचे पुढे असलेले 2-4 जण ओरडु लागले. समीर जोरात ओरडुन म्हणाला.

" मागे चला पटकन ह्या वेली जिवंत आहेत ह्या आपल्याला आवळुन इथेच मारुन टाकतील. त्या माझ्या हाताला व पायाला आवळु लागल्या आहेत."

सुयुध्दने हे ऐकताच सर्वांना मागे फिरण्यास सांगितले. पण त्याची नजर मागे जाताच तो अवाक झाला. मागे तोडलेल्या वेली आता सापासारख्या आपोआप हलु लागल्या होत्या. गटातल्या मुलींनी जोरात किंचाळी मारली. एक एक करत सर्व जण त्या वेलींच्या सापळ्यात अडकले होते. सुयुध्दच्या पायाजवळच्या एका वेलीने त्याच्या डाव्या पायाला विळखा घातला. त्याने तलवारीने त्या वेलीला कापले. तडफडत्या सापा सारखी ती वेळ झटपटुन दुर झाली. सुयुध्दला काय करावे कळत नव्हते. त्याच्या जवळचे सर्व जण झपाझप वेली कापत होते. पण कापल्याने त्या वेली अजुनच आक्रमक होत होत्या. सुयुध्दने आजुबाजुला पाहिले. सगळीकडे त्याच सळसळत्या वेली दिसत होत्या. त्याच्या पायाला परत धरणाऱ्या दोन तिन वेली त्याने कापल्या आणि वर पाहिले. वर त्या वेली नव्हत्या वर झाडांच्या मधे मोकळी जागा होती.

सुयुध्दला अचानक एक विचार आला त्याने उडायचे ठरवले. त्याने पटकन आपले डोळे बंद केले आणि कुळदेवता शिव शंकराचे स्मरण केले. तो आता दिव्य सोनेरी प्रकाशाने चमकत होता. त्याने आपले डोळे उघडले आणि वर पाहिले. तो हळु हळु उडु लागला. मेघराज तलवार त्याच्या हातात होती. त्याने जवळ पासच्या सर्व वेलींना वरुनच कापायला सुरुवात केली. एक एक करत त्याने हवेच्या गतीने सर्व आसपासच्या वेली कापल्या. खाली पडत्या त्या तडफडत्या वेली निर्जिव झाल्या. वरुनच त्याने पुढे असलेल्या समीरला पाहिले त्याला दोन तीन वेलींनी जबरदस्त जखडले होते. त्याला अजिबात हलता येत नव्हते. तो पटकन उडत समीर जवळ गेला. पटकन त्याने समीरची सुटका केली. समीरच्या पायाला जखडलेल्या वेली मुळे त्याचा पाय पोटरी पासुन खाली निळा पडला होता. समीरला अश्वध्वजच्या मुलासोबत सोडुन तो पुन्हा उडुन वर गेला त्याने खाली पाहिले. मुली अजुनही ओरडत होत्या. सुयुध्दने त्यांच्या जवळच्या वेलींना सपासप कापुन टाकले. त्याने आजुबाजुला पाहिले व खात्री केली कि अजुन कोणी तर त्या वेलींच्या विळख्यात नाही. तसे कोणीच आता उरले नव्हते. सुयुध्दने पुढचा मार्ग वरुनच पाहिला. त्याने पुढे असलेल्या सर्व वेली कापायला सुरुवात केली. दोन मिनिटात त्याने पुढचा वेलींनी भरलेला मार्ग मोकळा केला. सर्वांना त्याने वरुनच पुढे जायला सांगितले. हवेत वर उडत असलेल्या सुयुध्दला सर्व जण अवाक होऊन पाहत होते. सुयुध्द मात्र गन्भीरपणे वरुन सर्वांना सुरक्षीत ठेवता येईल ह्याच विचारात होता. त्याला मनात खुप वाईट वाटत होते. कारण ह्या वेलींमधुन मार्ग काढत पुढे जायचा निर्णय त्याचाच होता.

त्या जिव घेण्या वेलींच्या घनदाट जाळातुन सर्वजण बाहेर येताच सुयुध्द उडत उडत खाली आला. तो सर्वात पहिले समीर जवळ गेला. अजुनही तो सोनेरी प्रकाशात चमकत होता. समीर कसाबसा एका पायाने लंगडत बाहेर आला होता. त्याच्या पायाचा निळा रंग अजुनही गेला नव्हता. सुयुध्दने काही न बोलता समीरला एका झाडाच्या बुंद्यावर बसायला लावले व उपचारक शक्तीने त्याचा पाय बरा करु लागला. हळु हळु समीरच्या पायाचा मुळ रंग परत आला. समीरचा पाय आता बरा झाला होता. एक एक करत त्याने ज्यांना ज्यांना दुखापत झालेली त्यांना उपचारक शक्ती वापरुन बरे केले.

क्रमश:….

पुढचा भाग लवकरच.…
लेखक : सुयोग शिलवंत.
_______________________×_______________________

Group content visibility: 
Use group defaults

अपेक्षेपेक्षा जास्त वेळ गेला लिहिण्यात. उशीर केल्या बद्द्ल क्षमा असावी...

मागील सर्व भागाचे लिंक खाली देत आहे. वाचुन जरुर कळवा हा भाग तुम्हाला कसा वाटला...

https://www.maayboli.com/node/58973 bhag 1

https://www.maayboli.com/node/58986 bhag 2

https://www.maayboli.com/node/59017 bhag 3

https://www.maayboli.com/node/59054 bhag 4

https://www.maayboli.com/node/59125 bhag ५

https://www.maayboli.com/node/59203 bhag 6

https://www.maayboli.com/node/59294 bhag ७

https://www.maayboli.com/node/59516 bhag 8

https://www.maayboli.com/node/61185 bhag ९

https://www.maayboli.com/node/61386 bhag 10

https://www.maayboli.com/node/61462 bhag 11

https://www.maayboli.com/node/61498 bhag 12

https://www.maayboli.com/node/63378 भाग 13

धन्यवाद संदिप, वैभवराज, रुपारेलकर आणि सखीरेखा १९ तुमचा अमुल्य प्रतिसाद मला लिहण्यास नवि प्रेरणा देत आहे.
अशीच कथा वाचत रहा.