सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - १०

Submitted by Suyog Shilwant on 12 January, 2017 - 15:27

मैदानात जमा झालेल्या मुलांच्या घोळक्यात सुयुध्द लढत असलेल्या त्या दोन शिष्यांना अतिशय एकाग्रतेने पाहत होता. ते दोन्ही शिष्य एक गरुडध्वज तर दुसरा निलमध्वज गटाचे होते. गरुडध्वजच्या शिष्याच्या हातात तलवार होती तर निलमध्वज शिष्याच्या हातात भाला होता. अतिशय कुशलतेने ते दोघे एकमेकांशी लढत होते. प्रत्येक वार प्रत्येक डाव विचार करुन आणि वारंवार सराव केल्याने अचुक होता. त्या दोघांना लढताना पाहुन सांगणं कठिण होतं की नक्की कोण जिंकेल. सुयुद्ध अगदी बारकाईने त्यांच्या प्रत्येक हालचाली कडे लक्षपुर्वक पणे पाहत होता. ते करत असलेल्या हालचाली सुयुध्द एकेक करुन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या मनात युध्दकलेत प्राविण्य मिळवण्यासाठी हुरुप येत होता. अखेर घटकाभराने गरुडध्वजच्या शिष्याने निलमध्वज च्या शिष्यास हरवले. मल्हारी गुरुजींनी एकेक करुन प्रत्येक गटातील शिष्यांचे युध्दाभ्यास आटोपले. जुन्या शिष्यांना विश्रांती घेण्यास सांगुन ते नव्या शिष्यांना काही शस्त्रांची माहीती देण्यास एका बाजुस ठेवलेल्या शस्त्रसाठ्या नजिक घेऊन गेले.

मल्हारी गुरुजींनी त्या सर्वांना एका ठिकाणी उभे करुन शस्त्र ओळखण्यास सांगितले. जमलेल्या काही शिष्यांपैकी समीर, महेश वाघ, संदिप लिमेकर हे आता बऱ्यापैकी शस्त्रांशी परिचित झाले होते. त्यांनी शस्त्रांची नावं व उपयोग सांगितले. सुयुध्दने ती सगळी माहिती लक्षात ठेवली. मल्हारी गुरुजी सुयुध्दला एका वेगळ्याच नजरेने पाहत होते. त्यांच्या मनात काय चालु आहे हे सुयुध्दला कळले नाही पण एक गोष्ट मात्र नक्की होती कि त्याचे सवंगडीच नाही तर शिक्षकांची सुध्दा त्याच्यावर नजर होती. मल्हारी गुरुजी त्याला पाहत असताना मधेच म्हणाले.

" सुयुध्द तुला जर लढाईत ह्या शस्त्रांपैकी एक शस्त्र निवडण्यास सांगितले तर तु कोणते निवडशील?"

अचानक विचारल्यामुळे त्याने खाली ठेवलेल्या शस्त्रांवर नजर टाकली. विचार करायला त्याने दोन क्षणांचा अवधी घेतला. तो विचार करु लागला कि जर मी लढाईत असेन तर कोणते शस्त्र जास्त उपयोगी पडेल. तलवार, भाला, काठी, धनुष्यबाण ह्या पैकी काय आहे जे मी जास्त सक्षमपणे वापरु शकेन. त्याला दानवाबरोबर केलेली लढाई आठवली. त्यावेळी त्याने न जाणता काठीचा वापर केला होता. ती अदभूत काठी त्याच्या मनाजोगे पाहिजे त्या शस्त्रात बदलु शकत होती. पण ते शस्त्र तर तो आजोबांपाशी सोडुन आला होता. मग असे कोणते शस्त्र आहे जे तो वापरु शकेल. तलवार… हो तलवारच. कारण दानवाला मारण्यासाठी त्याच्या काठीने तलवारीत रुपांतर केले होते. अजुन एक क्षणाचाही विलंब न करता तो म्हणाला.

" तलवार"

हे ऐकुन मल्हारी गुरुजींच्या गालात एक स्मित हास्य झळकले.
त्यांनी शस्त्राच्या ढिगाऱ्यातुन एक चमकती तलवार त्याला दाखवुन उचलण्यास सांगितली. त्याने ती उचलली अगदी हलकी अशी तलवार सुयुध्दच्या हातात पडता त्याला नवलच वाटले. कारण पितळेच्या म्यानात असलेली ती तलवार हातभर लांब होती आणि वजनदार असल्यासारखी दिसत होती. सुयुध्दने त्या तलवारीला निरखुन पाहिले. पितळेच्या म्यानिवर सुबक नक्षिकाम केले होते. तलवारीची मुठ काळ्या चामड्याने सज्ज केलेली होती. तलवार दोन्ही हातात आडवी पकडुन त्यास मस्तकी लावुन त्याने नमस्कार केला.

" आज पासुन ही तलवार तुझी झाली."
मल्हारी गुरुजी खुश होत म्हणाले.

सुयुध्दला कळाले नाही कि ते असे का म्हणाले. बाजुला उभा समीर त्याला भलताच खुश दिसला. त्या मागचे कारण काय हे मात्र सुयुध्दला कळाले नाही. मल्हारी गुरुजींनी त्याला तलवार म्यानातुन काढण्यास सांगितले. तलवारीची मुठ पकडुन तो तलवार बाहेर काढण्यास तयार झाला. अगदी सहज त्याने तलवार बाहेर काढली. चमकदार धातुची ती तलवार अगदीच हलकी आणि अर्ध चंद्राकार आकाराची होती.

सुयुध्दला ती तलवार हाती घेऊन आपल्या अंगात बळ आल्या सारखे वाटत होते. तलवारीला सुयुध्द एका अजब मनमोहावणाऱ्या तऱ्हेने पाहत होता. मल्हारी गुरुजी त्याच्या हावभावाला पाहुन अजुनच खुश दिसत होते. जवळ उभ्या सर्व शिष्यांना तर एक आश्चर्याचा धक्काच बसला होता. आज तागायत मल्हारी गुरुजींनी कोणाही शिष्याला असे शस्त्र देऊ केले नव्हते. त्यात विशेष म्हणजे एखाद्या नव्या शिष्याला तर ते एक दोन मास चांगला सराव केल्या शिवाय तलवारीस हातही लावु देत नसत. जवळ उभ्या कपिलने हे पाहिले व तो पटकन त्यांच्या जवळ आला. रागने त्याने सुयुध्दला पाहिले व मल्हारी गुरुजींना म्हणाला.

" काका…तुम्ही त्याला ही तलवार का दिली? मी किती वेळा तुमच्या कडे ही तलवार मागितली पण मला दिली नाहीत."
द्वेष भरलेल्या नजरेने कपिल मल्हारी गुरुजींना बघत राहीला.

" मेघराज ने त्याला स्वतः निवडले आहे. मी त्याला ती तलवार देऊ केली कारण तोच आता तिचा स्वामी आहे. तु कितीही प्रयास करुन सुध्दा तुला ती तलवार उचलता आली नाही. ना म्यानातुन काढता आली." मल्हारी शांतपणे कपिलकडे पाहत म्हणाले.

कपिल काही न बोलता त्यांच्या समोरुन रागारागाने निघुन गेला. सुयुध्दने तलवार म्यान केली व शिष्यांच्या जमलेल्या गराड्यातुन बाहेर येत मल्हारी गुरुजीं जवळ आला.

" गुरुजी…आशिर्वाद द्यावा"
खाली वाकुन पाया पडत सुयुध्द म्हंटला.

" आयुष्यमान भवः | यशस्वी भवः | आज पासुन तु मेघराज चा स्वामी आहेस."
गुरुजी आशिर्वाद देत म्हणाले.

सुयुध्दला क्षणभरासाठी कळले नाही ते कोणाबद्दल बोलत आहेत. त्याच्या डाव्या हातातल्या तलावरीला पाहुन त्यांनी ते नजरेने स्पष्ट केले. तेवढ्यात टेकडीवरच्या मंदिरातुन पाच घंटा नाद ऐकु आले. मल्हारी गुरुजींना त्याला तलवार परत करायची होती पण त्याचा चौथा तास आता सुरु होणार होता. मल्हारी गुरुजी त्याच्या पुढ्यातुन निघुन गेले होते. ह्या तलवारीचे काय करावे त्याला कळत नव्हते की समीरने त्याच्या पाठीवर थाप मारत म्हंटले.

" वाह रे पठ्ठ्या…तु तर खरच सरस निघालास. पहिल्याच दिवशी मेघराज तलवार मिळवलीस."

" मला खरंच नाही माहित. गुरुजींनी मला ही तलवार का दिली."
सुयुध्द स्पष्टीकरण देत म्हणाला.

" ही काय साधी तलवार नाही…बरं ते सगळं असु दे…आपला चौथा तास सुरु होईल चल आता लवकर."
समीर घाईने त्याला ओढत म्हणाला.

बाकी धावपळ करणाऱ्या शिष्यांसोबत सुयुध्द प्रशिक्षण केंद्राच्या आत शिरला होता. धावत पळत ते एका दारा समोर येऊन थांबले होते. कक्ष क्रमांक 3 आत बरीच मुलं -मुली भिंतीच्या तिन्ही कडेला लावलेल्या बाकांपाशी उभी होती. समोर अजिंक्य गरुड गुरुजी येणाऱ्या मुलांची हाताची घडी घालुन वाट पाहत होते. दिसायला चैतंन्य सारखे असले तरीही त्यांच्यात फरक होता. चैतंन्यचे मोठे भाऊ अजिंक्य उंचीला सहा फुट होते. त्यांचा वेष निळ्या कपड्यांचा होता. डोक्यावर काळेभोर दाट केस व गौरवर्ण असल्याने ते दिसायला एका तडफदार तरुणासारखे होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर गंभिरता थारा धरुन होती. सुयुध्दकडे पाहताना त्यांच्या डोळ्यात एक अजब माया दिसत होती. जणू काही ते त्याच्या मनातली प्रत्येक गोष्ट वाचु शकतील अशी. समीरने आत येण्यास परवानगी मागताना त्यांनी मान हलवुन होकार दर्शविला. समीर आणि सुयुध्द एका बाजुस जाऊन मुलां मध्ये उभे राहिले. अजिंक्य गुरुजींनी सर्व मुलं आत आल्यावर बोलायला सुरुवात केली.

" आज आपण एक अशी माया शिकणार आहोत ज्यात आपल्याला समोर दिसणाऱ्या कोणत्याही दृश्य वस्तुला मायावी शक्ती वापरुन अदृश्य करता येईल. आपल्यात आज काही नविन शिष्यही आहेत त्यांना ही माया लवकर जमणार नाही पण जर त्यांनी लक्ष देऊन प्रयत्न केले तर त्यांना ही ते लवकरच शक्य होईल."

एवढे बोलुन अजिंक्य गुरुजी मागे टेबलावर ठेवलेली एक वस्तु उचलुन घेऊन आले. त्यांच्या हातात एक लाकडी ठोकळा होता. ठोकळा तळहातावर धरुन ते मंत्र म्हणु लागले आणि एका क्षणात तो ठोकळा नाहीसा झाला. सुयुध्द ते बघतच राहिला. अजिंक्य गुरुजींनी पुन्हा एकदा मंत्र म्हंटला आणि तो ठोकळा पुन्हा परत त्यांच्या हातावर दिसु लागला. अजिंक्य गुरुजी मुलांकडे गंभिरपणे बघत होते. सुयुध्द आश्चर्य करत गुरुजींना बघत राहिला. अजिंक्य गुरुजी सर्वांना गांभिर्याने पाहत होते. त्यांनी ठोकळा पुन्हा टेबलावर नेऊन ठेवला व म्हणाले.

" मी जो मंत्र म्हणेन तो लक्षात ठेवा आणि माझ्या मागे म्हणा. दृश्य कर्तुम् अदृश्य |"

सुयुध्द सोबत इतर मुलांनी एका सुरात तो मंत्र म्हंटला.

" आता वेळ आहे मंत्राचा प्रयोग करायची. हा मंत्र म्हंटल्यावर तुम्हाला जी वस्तु अदृश्य करायची आहे त्याचा मनात विचार करा व त्या वस्तु कडे बघा. सुरुवातीला तुम्हाला हा मंत्र उच्चारावा लागेल. आणि त्यानंतर त्या वस्तुला पाहत तो मंत्र त्या वस्तुशी विचारने जोडावा लागेल. योग्य उच्चार व स्थिर मनानेच हे शक्य आहे."
अजिंक्य गुरुजी शिष्यांना म्हणाले.

गुरुजींनी मागे फिरुन आपल्या टेबलावरच्या झोळीतुन बरेच ठोकळे बाहेर काढले व जवळ ऊभ्या एका शिष्याला ते सर्वांना वाटायला सांगितले.

" तिच वस्तु पुन्हा दृश्य करण्यासाठी तुम्हाला हा मंत्र म्हणावा लागेल. माझ्या मागे म्हणा. प्रदर्शयति |" अजिंक्य गुरुजी म्हणाले.

शिष्यांनी पुन्हा एकसुर लावत तो मंत्र म्हंटला. सर्वांच्या हातात प्रत्येकी एक ठोकळा होता. सुयुध्दने आपला ठोकळा निट निरखुन पाहिला. अजिंक्य गुरुजींनी त्यांना दिलेल्या ठोकळ्यावर मंत्रप्रयोग करण्यास सांगितले.

सुयुध्दने ठोकळा आपल्या उजव्या हातात धरला व मनात त्याचे चित्र उमटवत त्या ठोकळ्याकडे बघुन मंत्रोच्चारण करु लागला. एका क्षणात तो ठोकळा अदृश्य झाला. त्याला आपल्या हाताकडे बघुन विश्वासच होईना. त्याने उजविकडे मान वळवुन पाहीले तर समीर मंत्र बोलताना आपला हात हलवुन ठोकळ्याला अदृश्य करण्याचा अथक प्रयत्न करत होता. पण समीरला ते काही जमेना असेच दिसत होते. सुयुध्दने विचार केला कि त्याला जमले तेही पहिल्याच प्रयत्नात… मग समीरला का जमत नाहीये? त्याने मनाशी ठरवत पुन्हा एकदा आपला अदृश्य ठोकळा दृश्य करण्याचे ठरवले. त्याने उजवा हात सरळ पुढे धरुन मंत्र म्हंटला. काय अचंबा त्याच्या हातावर पुन्हा ठोकळा प्रकट झाला होता. सुयुध्दने जर स्वतः हा प्रयोग केला नसता तर त्याला खरंच विश्वास बसला नसता. पण आपल्याला हि विद्या अगदी सहज जमते हे मात्र सुयुध्दला स्पष्ट कळले होते. स्वतः शीच हसत त्याने पुन्हा समीरकडे पाहिले पण त्याचा प्रयत्न इतक्यात सफल होणार नाही असेच दिसत होते. त्यात समीरच्या तोंडावर निराशेची छटा स्पष्ट दिसु लागली होती. अजिंक्य गुरुजींनी प्रत्येक शिष्यावर बारीक नजर ठेवली होती. त्यांना सुयुध्दच्या प्रथम यशस्वी प्रयोगाचा नजारा काही चुकला नव्हता. बऱ्याच मुलांना ही अवघड मायावी विद्या इतक्यात अवगत करता येणार नव्हती. अजिंक्य गुरुजी मागे असलेल्या एका बाका जवळ जाऊन उभे राहीले व म्हणाले.

" आज तुम्ही सर्वांनी आपापले ठोकळे तुमच्याकडेच ठेवा. आजचा दिवस त्याचा सराव करा. तुमच्यापैकी आज ज्यांना जमले नाही त्यांना मी एक सल्ला देतो तो करुन पहा. तर कोणताही मंत्र प्रयोग करण्या आधी तुम्ही श्वासावर 2 क्षण लक्ष केंद्रीत करा आणि मगच मंत्र प्रयोग करा. तुमचं मन एकाग्र नसेल तर तुमच्या मंत्राला ती शक्ती किंवा उर्जा मिळणार नाही जी हवी आहे. हा सल्ला लक्षात ठेवा. चला पुन्हा एकदा प्रयोग करुन बघा तुम्हाला जमतंय का?"

सर्व शिष्य पुन्हा एकदा प्रयोगात मग्न झाले. सुयुध्दने याही वेळी पहिल्या प्रमाणे एकाच प्रयत्नात आपला ठोकळा अदृश्य केला. समीरला अजिंक्य गुरुजींच्या सल्ल्याचा फायदा झाला होता. त्यानेही आपला ठोकळा यशस्वी रित्या अदृश्य केला होता. सयुध्दने इतर शिष्यांकडेही आपली नजर वळवली. सगळ्यांना बऱ्यापैकी जमलं होतं. मात्र हर्षदला अजुन काही जमलेले दिसत नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर एक दृढता होती करुन दाखवण्याची. अजिंक्य गुरुजी त्याच्या जवळ जाऊन उभे राहिले व त्याला म्हणाले.

" थांब. डोळे बंद कर. आपल्या श्वासावर मन एकाग्र कर..
आता मनात तुझ्या ठोकळ्याची आकृती तयार कर. आता डोळे उघड आणि मंत्रोच्चारण कर."

" दृश्य कर्तुम् अदृश्य |" हर्षद न अडखळता म्हणाला.

त्याच्या हातातला ठोकळा अदृश्य झाला.

" शाब्बास" अजिंक्य गुरुजी पाठ थोपटत त्याला म्हणाले.

खालचा ओठ दाताखाली दाबत हर्षद हसला. अदृश्य मंत्र सफल झाला याचं सुख त्याचं हसु सांगु शकत होतं. गुरुजी मागे हटत त्याच्याकडे बोट करत म्हणाले.

" बघा. प्रयत्न केले आणि विश्वास ठेवला तर सर्व शक्य आहे. हेच मी तुम्हाला सांगत होतो. स्वतःवर विश्वास असणं फार गरजेचं आहे."

अजिंक्य गुरुजींनी प्रत्येकाला आपल्या विद्येचे महत्व समजावले होते. त्यांनी हर्षद प्रमाणेच इतर काही शिष्यांना विद्येचा योग्य वापर कसा करावा हे सांगितले होते. बराच वेळ त्यांनी मंत्र प्रयोगाबद्द्ल माहिती दिली होती. अजिंक्य गुरुजी दरवाजा जवळ निघाले आणि मंदिरातील घंटानाद सुरु झाले. सहा घंटानादा नंतर एकही शिष्य कक्षा मधे थांबला नव्हता. सर्व आपापली तंद्री धरत प्रशिक्षण केंद्राच्या बाहेरील बाजुस असलेल्या भोजनालयात स्थिरावले होते. समीर हर्षद व सुयुध्द तिघे पंक्तीमध्ये मांडीला मांडी लावुन भोजनाचा आस्वाद घेत होते. दुपारचा मध्यान प्रहर झाला होता. समीरला दुपारच्या जेवणातली खीर खुप आवडत असे त्यामुळे त्याचे खीर वर ताव मारणे चालु होते. हर्षद शांतपणे आपले भोजन ग्रहण करत होता. खीरने भरलेली बोटं चाटत समीर म्हणाला.

" सुयुध्द तुला कसं रे सगळ पटकन जमतं? तुला तुझ्या आजोबांनी पहिलच सर्व विद्यांचं प्रशिक्षण दिलं आहे का?"

" नाही रे बाबा..आता किती वेळा सांगु तुला हे सगळं नविन आहे माझ्यासाठी. पण मलाच लवकर का जमतं. ते काही मला माहीत नाही. " सुयुध्द चिडत म्हणाला.

" एक गोष्ट नक्की सांगतो. तु नविन आहेस खरा पण कोणतीही विद्या अवगत करण्याची तुझी गती मात्र जास्त आहे. काही तरी गडबड आहे." समीर डोळे बारीक करत म्हणाला.

" अरे नाही रे बाबा…काही गडबड नाही." सुयुध्द म्हणाला.

" पण..मी..क..क..काय म्हणतो..सस्स...सुयुध्द? तुला खरंच आधी….मम..माहीत नव्हतं कि तु कक…कोणत्या शुरविर घराण्याचा आहेस…?" हर्षद म्हणाला.

" मला जर माहित असतं तर मी पहिलेच इथे आलो नसतो का? हर्षद …"

हातातला घास अर्ध्यातच रोखत समीर त्याला म्हणाला.
"अरे तुझ्या आजोबांनी आधीच सांगायला पाहिजे होतं."

"हो…पण गुरु विश्वेश्वरांच्या आदेशा नुसार त्यांना योग्य वेळीच मला सांगायचं होतं." सुयुध्द म्हणाला.

" हं… " समीर तोंडात घास असल्याने होकारार्थी उदगारला.

सुयुध्द जेवता जेवता विचारात हरवला होता. का मला आजोबांनी हे आधीच नाही सांगितलं? जर आधी सांगितलं असतं तर कदाचित मी लवकर तयार झालो असतो. गुरु विश्वेश्वर म्हणाले तसं सगळं जर योग्य वेळी होणार होतं तर मी ह्या गोष्टींचा इतका विचार करायला नको. पण मला ह्या विद्या लवकर का जमत आहेत. आपल्याच विचारात हरवलेला सुयुध्द पत्रावलीत हात घालुन शुन्यात पाहत होता. समीरने खीर संपवुन सुयुध्दकडे पाहिले. पत्रावळीत हात घालुन सुयुध्द एकटक विचारात हरवला होता. बाजुला बसलेल्या हर्षदला त्याने खुणावले. हर्षदने त्याला मान हलवत माहित नाही असा इशारा केला. समीरने कोपराने सुयुध्दला धक्का दिला तसा सुयुध्द भानावर आला.

" अरे एवढा कसला विचार करतोयस?"
समीर म्हणाला.

" नाही…काही नाही." सुयुध्द पटकन बोलला.

" अच्छा मला एक सांग. तुला जर आधी हे काहीच माहित नव्हतं मग इतके दिवस तुला का नाही सांगितलं अस तु तुझ्या आजोबांना का नाही विचारलंस?"
समीर सुयुध्दला म्हणाला.

" कारण आजपर्यंत आमच्या घरात असं वातावरण कधीच नव्हतं. मला सुरुवातीला जेव्हा त्यांनी हे सगळं सांगितलं तेव्हा ती गोष्टच वाटली. पण आमच्या घरावर जेव्हा दैत्यांनी हल्ला केला. तेव्हा मला खात्री पटली की ही गोष्ट नसुन एक सत्य आहे. तेव्हा माझ्याकडे इतका वेळच नव्हता कि मी त्यांना काही विचारेन."
समीर व हर्षद कडे बघत तो म्हणाला.

समीरने विचार करत पुन्हा जेवणाकडे लक्ष घातले. हर्षदला काही बोलायचे होते पण तो बोलला नाही.

तिघे आपलं जेवण आटपुन भोजनालयाच्या बाहेर आले. त्यांची मगासची झालेली चर्चा सुयुध्दला आपल्या परिवाराची आठवण आणुन देणारीच ठरली. बाहेर आल्यावर तो लांबवर पिंपळाच्या झाडाखाली बसलेल्या आई बाबा व आजोबांना पाहत उभा होता. आश्रमाचा नियम होता एक महिन्याच प्रशिक्षण पुर्ण झाल्याशिवाय तो आपल्या परिवारास भेटु शकत नव्हता. आईला आपल्याकडे बघताना पाहुन त्याच्या मनात खुप इच्छा आली की धावत तिच्याकडे जावं. पण तो गेला नाही. तसाच प्रशिक्षण केंद्रा समोर मैदानात उभा राहुन तो तिला पाहत राहिला. त्याची आई त्याला बघुन हातवारे करत होती. त्याला विचारत होती कि तो ठिक आहे ना. सुयुध्दला ते कळत होते. मनात चाललेल्या घालमेलीला शांत करत. तो ओरडला.

" मी ठिक आहे…तुम्ही काळजी घ्या."

समीरला हे बघुन भरुन आलं. सहाजिकच होतं कि तो ही आपल्या परिवाराला भेटला नव्हता त्याला कळतं होतं कि सुयुध्दला कसं वाटत असेल. सुयुध्द आईला पाहुन मनाशी एक निश्चय पक्का करु लागला होता. त्याला हे प्रशिक्षण आपल्या परिवाराच्या रक्षणासाठी पुर्ण करायचेच होते. आजोबांचा आणि बाबांचा आपल्यावर विश्वास आहे त्यांच्या अधुऱ्या कार्यास आता त्यालाच पुर्ण करायचे होते. हर्षद बाजुला उभा राहुन दोघांना पाहत होता. समीरने सुयुध्दच्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाला.

" सुयुध्द काळजी करु नकोस. चल आता वेळ झाली आहे आपला वर्ग आहे. मला माहित आहे तुला कसं वाटतयं आम्ही आहोत ना तुझ्या सोबत."

" हो..आम्ही आ….आहोत ना. आणि तु तु...तुझे आई बाबा इथेच तर आहेत. तु तु…. तु केव्हाही त्यांना पाहु शकतोस."
हर्षद त्याच्या जवळ येऊन अडखळत त्याला म्हणाला.

सुयुध्दने एक क्षण दोघांकडे पाहिले. ते सांगत होते ती गोष्ट खरीच होती. तो केव्हा ही त्याच्या परिवाराला पाहु शकत होता. मनाशी समाधान बाळगत तो आपल्या नव्या मित्रां सोबत प्रशिक्षण केंद्राकडे वळला.

कक्ष क्रमांक 2 मधे जवळ जवळ सगळे शिष्य जमले होते. सात घंटानाद झाले होते. सुयुध्द इतर शिष्यांप्रमाणेच वाट पाहत दरवाजा कडे नजर लावुन होता. भगवे वस्त्र परिधान केलेले गुरुजी दारातुन आत आले. भटाप्रमाणे दिसणारे चैतंन्य गुरुजी अगदी तरुण होते. टक्कल, कपाळावर चंदनाचा तिन बोटांनी ओढलेला आडवा नाम साध्या भिक्षु प्रमाणे दिसणारे व चेहऱ्यावर तेज असे त्यांचे रुप होते. चैतंन्य गुरुजी हे पंचतत्व विद्या आणि रुपांतर कला ह्याचे अध्यापक होते. हातातली काठी बाजुला ठेवत त्यांनी बोलायला सुरुवात केली.

" पंचतत्व विद्या म्हणजे काय?"

आल्या आल्या त्यांनी शिष्यांना प्रश्न केला. दोन चार मुला-मुलींनी आपले हात वर केले होते. त्यापैकी गुरुजींनी एका मुलीला उभे राहण्यास सांगितले.

" अग्नि, वायु, आकाश, पृथ्वी, जल ह्या पंच महाभुतांचे गुणधर्म समजुन त्यांना कोणत्याही वस्तुचे आपल्या इच्छेनुसार स्वरुप देणे म्हणजे पंचतत्व विद्या होय."

त्या मुलीने अगदी योग्य उत्तर दिले असे समजुन चैतंन्य गुरुजींनी तिला खाली बसण्याचा इशारा केला. त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली.

" आज आपण पंचतत्व विद्येचा अत्यंत महत्वाचा अध्याय शिकणार आहोत. आज मी तुम्हाला वायु ह्या तत्वाचे महत्व सांगणार आहे. वायु हा सर्व व्यापी आहे. जगात कुठेही तो उपलब्ध आहे. वायु नसेल तर जिवन नष्ट होईल. वायु हेच जिवन आहे. वायुमध्ये इतकी शक्ती आहे कि तो सुक्ष्म ही आहे आणि सर्व व्यापी ही आहे. ऋतुचा बदल हा फक्त आणि फक्त वायुच करु शकतो. वायुला जर तुम्हाला अधिन करायचे असेल तर तुम्हाला वायुदेवांचे ध्यान करावे लागेल त्यांचा आशिर्वाद घ्यावा लागेल. महाबली हनुमान हे सुध्दा एक वायुपुत्र म्हणुन जाणले जातात. त्यांच्या अपरंपार शक्तीची आजवर ह्या जगात तुलना नाही. वायु हे गतीचे प्रतिक आहे. तेव्हा मी जो तुम्हाला श्लोक सांगेन तो निट ध्यान देऊन ऐका.

त्व नमस्ते वायो, त्वमेव प्रत्यक्षं ब्राह्मासि,
त्वमेव प्रत्यक्षं ब्राह्म वदिष्यामि।
तन्मामवतु, मारुतं शरणं प्रपद्ये ||

अर्थात- नमस्कार वायु देव, तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा समान आहात. तुम्हालाच मी प्रत्यक्ष ब्रह्म म्हणेन. तुम्हीच आमची रक्षा करा. वायुदेव मी तुम्हाला शरण आलो आहे.

हा श्लोक म्हंटल्यावर वायुदेव प्रसन्न होऊन तुम्हाला आशिर्वाद देतील. त्यानंतर तुम्ही वायुतत्वाच्या विद्येचा वापर करु शकता."

सुयुध्द मन लावुन चैतंन्य गुरुजी सांगत असलेल्या सर्व गोष्टी ऐकत होता. चैतंन्य गुरुजींनी एक मंत्र म्हंटला व त्याच्या हातात एक पितळेचा कलश प्रकट झाला. त्यांनी कलश आपल्या हातात धरुन शिष्यांना तो पहायला सांगितला. सर्वांनी तो निरखुन पाहिला.

" हा कलश माझ्या हातात कसा आला?" सगळे गप्पच राहिले कारण कोणालाच उत्तर माहित नव्हते. तसे गुरुजी पुन्हा बोलले.

"मी विद्येचा वापर करुन वायुतत्वा पासुन हा कलश प्रकट केला. तुम्हाला ही जमेल पण योग्य अभ्यास आणि प्रशिक्षण केल्यावर. तुम्ही मी जो सांगेन तो मंत्र लक्षात ठेवा आपण त्याचा प्रयोग करणार आहोत आणि मी पाहणार आहे कोणकोणाला ते जमते. मंत्र बोलण्याआधी तुम्हाला काय मिळवायचे आहे काय प्रकट करायचे आहे ते निट जाणुन घ्या. कोणतीही अशी वस्तुची इच्छा करु नका जी तुम्हाला आणि इतरांना नुकसान पोहचवेल. ठिक आहे …
तुम्हाला असाच कलश प्रकट करायचा असेल तर बोला.

कलशः आवाहन करोति| "

सगळ्यांनी मंत्र एकदा बोलुन पाठ केला. चैतंन्य गुरुजींनी सर्वांना वायुदेवाचा श्लोक म्हणण्यास सांगितला. त्यानंतर गुरुजींनी शिष्यांना आवाहन मंत्राचे उच्चारण करण्यास सांगितले. शिष्यांनी मंत्राचे उच्चारण केले. दहा बारा मुलांच्या हातात कलश प्रकट झाला. नवल म्हणजे सुयुध्दच्या व समीरच्या हातातही कलश प्रकट झाला होता. पहिल्याच प्रयत्नात यश आल्याने सुयुध्द खुश होता. चैतंन्य गुरुजींनी इतर शिष्यांकडे आपले लक्ष वळवले ज्यांना कलश प्रकट करायला जमले नव्हते त्यांना गुरुजींनी योग्य ते मार्गदर्शन केले. चैतंन्य गुरुजींचा वेळ सर्वांकडुन यशस्वी प्रयोग करुन घेण्यात जात होता. अखेर सर्वांना जमले असे पाहुन मग त्यांनी पुन्हा कलश अदृश्य करण्याचा मंत्र सांगितला.

" हाच कलश पुन्हा परत घालविणासाठी म्हणा.
अनुविनश्यति | "

सगळ्यांनी मंत्र लक्षात ठेवला व म्हंटले. तसे एकेकाचे कलश पुन्हा अदृश्य झाले. तास बरोबर वेळेत सन्पला आणि टेकडीवरच्या मंदिरातील घंटेचे आठ नाद ऐकु आले. चैतंन्य गुरुजी क्षणाचाही विलंब न करता कक्षातुन निघुन गेले. पुढचा तास सुरुच होणार होता. सुयुध्दने आपले वेळापत्रक बाहेर काढले व पाहिले. पुढचा तास समिधा वैद्य यांचा कक्ष क्रमांक 4 मध्ये होता. तो कक्ष क्रमांक चार मधे आपल्या नविन मित्रांसोबत आत शिरला.

समिधा वैद्य कक्षामधे आधिच हजर होत्या. सुयुध्दने आत यायची परवानगी मागितली. तो आणि त्याचे नविन सवंगडी आत जाऊन जमिनवर असलेल्या सतरंजी वर बसले. समिधा वैद्य तीशी पस्तीशीतल्या असाव्यात. श्वेत रंगाची साडी परिधान करुन अगदी साधरण अशा दिसणाऱ्या समिधा गुरुवर्या सर्व शिष्य आत येऊन बसल्याची खात्री करुन मग स्मित हास्य करत म्हणाल्या.

" आज आपल्यात नविन शिष्य आहेत. सर्वप्रथम मी आयुर्वेद म्हणजे काय हे सांगणार आहे. म्हणजे आपल्या विषयाची त्यांना ओळख होईल."
सर्व शिष्यांकडे एक नजर फिरवत त्यांनी सुयुध्दला पाहुन पुन्हा बोलायला सुरुवात केली.

" आयुर्वेद या शब्दाची फोड करूयात. आयु आणि वेद. आयु म्हणजे शरीर , इंद्रिय, मन, आत्मा यांचा संयोग. वेद म्हणजे ज्ञानप्राप्तीचे साधन. जुन्या पिढीतील लोकांना नमस्कार केला तर ते आशीर्वाद देताना हमखास म्हणतात ‘ शतायुषी हो, सुखी हो ‘ या आशीर्वादातच आयुर्वेदाची व्याख्या दडलेली आहे.
माणसाचे दीर्घायुष्य अधिकाधिक सुखकारक आणि व्याधीमुक्त व्हावे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम रहावे. बल वाढावे रुजा कमी व्हावी. आयु, आयुष्यास हितकारक, अहितकारक द्रव्यांचे, आहाराचे, सवयींचे ज्ञान व्हावे. झालेल्या रोगांची ‘अपुनर्भव ‘ चिकित्सा करून व्यक्तीचे, समाजाचे स्वास्थ्य टिकून रहावे यासाठी जे शास्त्र कटिबद्ध आहे त्यास आयुर्वेद म्हणावे.

आचार्य चरक आयुर्वेदाची व्याख्या करतात.
”हिताहितं सुखं दु:खं आयु तस्य हिता हितं
मानं च तत्र यत्रोक्त आयुर्वेदस उच्च्यते ”
हित आयु, अहित आयु, सुख आयु , दु:ख आयु याचे वर्णन. आयुसाठी हितकर-अहितकर गोष्टी, आयुष्याचे प्रमाण व लक्षण यावर जो भाष्य करतो तो आयुर्वेद.

साध्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या आयुष्याच्या स्वास्थासाठी जे ज्ञान आपण घेतो ते ज्ञान म्हणजे आयुर्वेद.

आज आपण आपल्या आश्रमा लगतच्या जंगला मधुन पाच औषधी वनस्पती शोधणार आहोत. त्या कदाचित तुमच्या परिचयाच्या असतील. कडुलिंब, तुळस, अडुळसा, कोरफड आणि कुडा. चला तर बाहेर जावुयात."

इतकं बोलुन समिधा वैद्य कक्षा बाहेर पडल्या. सगळे शिष्य उठुन बाहेर त्यांच्या मागे गेले. सुयुध्द बरोबर प्रशिक्षण केंद्राच्या बाहेर पडताना हर्षद खुप खुश होता कारण आयुर्वेद त्याचा आवडता विषय होता. कक्षा बाहेर येताना त्याने हे सुयुध्दला सांगितले देखिल होते. समीर पण ह्या विषयात इतका वाईट नव्हता. सुयुध्दला आज आश्रमाचा आवार पहायला मिळला होता. आश्रमाच्या टेकडिच्या बाजुला एक तलाव होता. नजिकच झाडांनी भरलेले चारी बाजुला नजर जाईल असे हिरवेगार घनदाट जंगल होते. दुपारचे दोन वाजत होते. बाहेरच ऊन चटका देणार होतं. पण आश्रमाचे वातावरण फारच सुंदर होते. तलावाच्या पाण्यातले बदकांचे झुंड पाहुन सुयुध्दला फार बरे वाटले. टेकडीच्या बाजुचा तलाव जस जसा जवळ आला तसे ते एका ठिकाणी जंगलाच्या जवळ येऊन स्थिरावले. समिधा गुरुवर्यांनी त्यांना टेकडीच्या बाजुला असलेल्या उंच आणि विस्तारलेल्या एका वडाच्या झाडाजवळ नेऊन उभे केले होते. सुयुध्दने त्या झाडाच्या अनेक फांद्यावरुन लटकत्या पारंब्या पाहिल्या. झाड खुप विशाल व पसरलेलं होतं. त्याच झाडाच्या सावलीत सगळे शिष्य उभे राहीले. समिधा वैद्य यांनी सर्वांना एका ठिकाणी उभे करुन बोलायला सुरुवात केली.

" ज्या पाच वनस्पति मी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला इथे सहज भेटतील. ज्यांना माहित नाही त्यांना इतर शिष्यांनी मदत करा. पाचही वनस्पती गोळा करुन इथे आणा. त्यानंतर मी तुम्हाला त्यांचे गुण आणि उपयोग सांगेन. ठिक आहे. आपल्या सोबतीला कोणाला घ्या आणि लवकर त्या वनस्पती आणा जा. "

सगळे शिष्य आपापले सोबती घेऊन कामाला लागले. सुयुध्दने समीर व हर्षद सोबत वनस्पती शोधायला सुरुवात केली. दोन वनस्पती सुयुध्दला अगदी ओळखीच्या होत्या तुळस आणि कडुलिंब आजुबाजुला पाहता त्याला सहज त्या दोन्ही सापडल्या होत्या. हर्षदला उरलेल्या वनस्पती कुठे भेटतील ह्याची माहिती होती. जंगलाच्या आत शिरत ते कोरफड शोधु लागले. सुयुध्द हर्षदला पाहत होता. त्याला हा विषय खरच मनापासुन आवडत होता असे हर्षदने त्याला जंगालात घुसताना सांगितले होते.

" तुला हा विषय इतका का आवडतो हर्षद?"
सुयुध्दने हर्षदला विचारले.

" कक… कारण मला झाडं खुप आ…आवडतात. कि…किती चांगली आहेत ती. आ…आपल्याला श्वास घ्यायला प्राणवायू देदे…देतात. फळं देतात, सावली देतात आ…आणि बरच काही देदे…देतात. त्यांच्या पासुनच माणुस अ..अन्न मिळवतो. औषधं मिळवतो…खरं तर ही झाडं नन..नसती तर आपण जगुच शकलो नसतो. त्या बदल्यात ते आपल्या कडुन काहीच मागत नाहीत फक्त दे….देतात. मला हि असच ह्याच्या सारखं खुप काही द्यायच आहे त्यांच्या पासुन खुप कक..काही शिकायचं आहे म्हणुन मम… मला हा विषय आवडतो."
हकलत-हकलत बोलताना हर्षदचा चेहरा आनंदाने झळकत होता.

सुयुध्दला त्याचं हे उत्तर ऐकुन फारच बरं वाटलं होतं. हर्षदच्या मनातलं खर कारण त्याला आता कळालं होतं. समीरने एका बाजुला खाली वाकुन कोरफडाचा एक तुकडा तोडला व सुयुध्दला दाखवत म्हणाला.

" हे बघ. हे कोरफड आहे."

"हं" असे म्हणत सुयुध्दने त्याच्या हातातला तो तुकडा आपल्या हातात घेतला व पाहिला.

"आता ते अडुळसा आणि कुडा कुठे भेटेल..?"
समीर हर्षदकडे बघत म्हणाला.

" चल…" हर्षद हाताने त्या दोघांना मागे या असा इशारा करत एका दिशेला निघाला. काही शिष्य अडुळस्याची पानं हातात घेऊन जाताना त्यांना दिसली.

"मागच्या वेळेस आपण आलेलो तेव्हा तिकडच्या एका कोपऱ्यात मला कुडाच झाड दिसलं होतं."
समीर बोटाने उजव्या बाजुला इशारा करत म्हणाला.

हर्षदने अडुळशाची काही पानं सोबत घेतली. दोघांना थोडी थोडी पानं देऊन त्याने आपल्या झोळित ठेवण्यास सांगितली. आणि कुडाच्या झाडाचा शोध घेत ते निघाले. हर्षदने अखेर सफेद मुगऱ्यासारख्या दिसणाऱ्या एका झाडाजवळ थांबा घेतला. त्या झाडाला निट पाहुन लगेच ओळखले कि हेच कुडाचे झाड आहे. त्याने पटकन फुलं तोडली व समीरला दिली खाली वाकुन त्याने झाडाची साल सुध्दा काढून घेतली.

" अरे त्याची साल का काढतोयस?"
सुयुध्द पटकन म्हणाला.

" ह्या झाडाची फफ…फुलं आणि साल दोन्ही अ…औषधी आहेत"

" अच्छा"

सुयुध्दने झाड पाहिले व चांगले लक्षात ठेवले. त्यांना जे हवे होते त्या पाचही औषधी त्यांनी सोबत घेतल्या होत्या. ते तिघे परत वडाच्या झाडाकडे निघाले.

" हर्षद आज तु होतास म्हणुन मला ह्या वनस्पती भेटल्या. मी जर एकटा असतो तर तुळस आणि कडुलिंब सोडता बाकिच्या वनस्पती शोधुन सुध्दा सापडल्या नसत्या." सुयुध्द हसतच म्हणाला.

" हो. मला पण कुडाच झाड काही सापडलं नसतं हर्षद.."
भुवया वर करुन तोंडाचा चंबु करत समीर म्हणाला.

" अ…अरे.. त्यात काय एवढं.."हर्षद समिरच्या खांद्यावर हात ठेवुन म्हणाला.

बोलता बोलता ते पुन्हा विशाल वडाच्या झाडाजवळ आले होते. शोध कामात त्यांचा अर्धा तास गेला होता. सगळ्यांनी आपापल्या आणलेल्या वनस्पती समिधा गुरुवर्यांना दाखवल्या. सर्वांनी जमा केलेल्या वनस्पती वैद्य बाईंनी आपल्या जवळ घेतल्या. एक एक करुन त्यांनी पाचही वनस्पतींचे गुणधर्म आणि औषधी गुण बराच वेळ सर्व शिष्यांना समजावुन सांगितले. तास आटोपता घेत वैद्य बाई पुन्हा प्रशिक्षण केंद्राच्या दिशेने परतल्या.

मैदानात येऊन सुयुध्द आणि त्याचे मित्र उभे राहुन काही मोठ्या शिष्यांना मैदानात युध्दाभ्यास करताना पाहत होते. मंदिरातुन नऊ घंटानाद ऐकु आले. तस सुयुध्दने समिरला विचारले.

" अरे आता कोणाचा तास आहे?"

" अग्निहोत्री गुरुवर्यांचा उपचारक शक्ती प्रशिक्षणाचा आहे.."
समीर तोंड पाडून म्हणाला.

" अरे पण मग अस तोंड पाडुन का सांगतोयस?"

"त्याला उपचारक श…श…शक्ती अजुन अवगत करता नाही आ….आली ना…त्यामुळे."
हर्षद म्हणाला.

" अच्छा…म्हणून त्याला हा तास पसंत नाही का?"टिंगल म्हणुन हर्षदला डोळा मारून सुयुध्द म्हणाला.

" हो" फुगवलेल तोंड वर करुन समीर त्या दोघांना म्हणाला.

तेवढ्यात अभिषेक ने सुयुध्दला हाक मारली.

" अरे सुयुध्द चल पटकन आपला वर्ग प्रशिक्षण केंद्रात नाही…
उपचार केंद्रात आहे."

अभिषेक अग्निहोत्री सुयुध्दचा युध्दाभ्यास सोबती होता. सकाळीच मल्हारी गुरुजींनी त्या दोघांना सोबत युध्दाभ्यास करायला लावला होता. अभिषेकला बघुन समीरने हळुच सुयुध्दच्या कानात काही सांगितलं. सुयुध्दला धक्काच बसला. त्याने उपचार केंद्राकडे जाणाऱ्या अभिषेक कडे पाहिले व म्हंटला.

" काय…? हा अग्निहोत्री बाईंचा मुलगा आहे."

"हो" समीर म्हणाला.

" बर..आ...आता चल. आपला व..वर्ग सुरु होईल. अ..अ..अग्निहोत्री बाई फार क…क..कडक शिस्तीच्या आहेत."
हर्षद हसतच म्हणाला..

सगळे उपचार केंद्रात जमले होते. शालिनी अग्निहोत्री सगळ्या शिष्यांना उपचारक शक्ती कशी वापरावी हे सांगत होत्या. त्यांच्या हातात एक जखमी गरुड होता. त्या गरुडाच्या पंखांना मार लागला होता. त्याच्या जखमांमधुन रक्त वाहत होते. शालिनी अग्निहोत्रींनी त्याला एका टेबलावर ठेवले. त्याच्या जखमांच त्यांनी निरिक्षण केलं. समोर उभा सुयुध्द व बाकिचे सगळे शिष्य गुरुवर्यांना त्या गरुडाचे उपचार करताना पाहत होत्या. अचानक त्यांने सुयुध्दला पाहिले व म्हणाल्या.

" सुयुध्द तु आपल्या आईला ह्या आधी उपचारक शक्तीचा वापर करुन बरे केले होतेस ना."

त्यांच्या या प्रश्नाने सुयुध्द जरा चमकलाच. त्याला एक क्षणासाठी काय बोलवे कळले नाही. पण थोड्या वेळाने
अग्निहोत्री बाईंना पाहत तो म्हणाला.

" हो; पण मला फारस ते काही लक्षात नाही. त्यावेळी आईला बघुन मला कळत नव्हतं काय करावं. मला चैतंन्य गुरुजींनी जसं सांगितलं तसं मी केलं होतं."

"बरं ठिक आहे. मी जर ती शक्ती कशी वापरावी हे सांगितलं तर तु ह्या गरुडाला आपली उपचारक शक्ती वापरुन बरं करु शकशील का?" शालिनी अग्निहोत्री म्हणाल्या.

सुयुध्दने मान होकारर्थी डोलावली. सुयुध्दला शिष्यांच्या गलक्यातुन पुढे बोलवुन त्यांनी काय करावं ते सांगितलं होतं.
लगेच आपल्याला हे जमेल का अशी शंका सुयुध्दच्या मनात घोळत होती. त्याने त्या पिडेने विव्हळणाऱ्या गरुडाला हात लावला. तसा त्याला कोणाचा तरी आवाज ऐकु आला. तो आवाज बारीक होता. त्या आवाजात वेदना होत्या. सुयुध्दने गरुडावरचा हात बाजुला घेतला आणि घाबरुन आजुबाजुला पाहिले. हात हटवताच तो आवाज बंद झाला होता. एक क्षण त्याला काही कळालेच नाही. अग्निहोत्री गुरु त्याला बघत होत्या. त्यांनी तो असा का घाबरला म्हणून त्याला विचारना केली. पण त्याला स्वतःलाच भास झाला असेल असे गृहीत धरुन त्याने काही नाही असे सांगितले. पुन्हा त्याने जवळ जाऊन त्या जखमी गरुडाला हात लावला आणि पुन्हा त्याला वेदनेने कळवळणारा आवाज ऐकु आला. सुयुध्दला कळले कि हा आवाज कोणाचा आहे. तो जखमी गरुडाचा आवाज होता. सुयुध्दने गरुडाकडे पाहिले आणि गरुड त्याच्याशी बोलु लागला.

" आह… ह्या वेदनेतुन वाचव मला. ते दुष्ट राक्षस आपल्या शिवारात आले आहेत. त्यांच्यावर हल्ला करताना मी जखमी झालो. ते मला मारुन टाकतील त्या आधी माझ्या साथीदारांनी मला तिथुन वाचवले व या आश्रमाच्या मैदानात आणुन सोडले. ते इथे पण येतील."

सुयुध्दला त्याचे बोलणे अगदी स्पष्ट समजत होते. पण त्याने त्याकडे लक्ष न देता आपले डोळे मिटले व अग्निहोत्री गुरुंनी सांगितल्या प्रमाणे आपले लक्ष त्याला बरे करावे ह्या कडे वळवले. सुयुध्दच्या आजुबाजुला सगळे शिष्य त्याला बघत होते. सुयुध्द एका सोनेरी प्रकाशात चमकत होता. त्याच्या हातातुन निघणारा भगव्या रंगाचा प्रकाश त्या गरुडाला हळु हळु आपल्या प्रकाशात सामावुन घेत होता. जवळ जवळ दहा मिनिटं कक्षात जमा सर्व शिष्य व शालिनी अग्निहोत्री आपले डोळे विस्फारुन हे दिव्य पाहत होते. थोड्याच वेळात त्या गरुडाचे जखम बरे होऊ लागले. एकही जखमेचे निशाण आता त्या गरुडाच्या शरिरावर दिसत नव्हते. गरुड पुर्ण बरा झाला. तसं सुयुध्दची चमकती शक्ती कमी होऊ लागली. त्याने डोळे उघडले व गरुडाला पाहिले. सर्व शिष्यांमध्ये आता एकच कुजबुज चालली होती. शालिनी गुरुवर्या फारच खुश होत्या. त्यांनी हसतच सुयुध्दचे अभिनंदन केले.

" वाह..! छान…सुयुध्द तुला हे अगदी छान जमले आहे. तु इतक्या लवकर ही विद्या शिकशील अशी अपेक्षा नव्हती पण गुरु विश्वेश्वर खरच म्हणाले होते. तुझ्या कडुन अदभुत गोष्टी पाहण्याची अपेक्षा आहे. आता माझ्या डोळ्यांनी पाहिल्या वर मला खात्री आहे कि तु लवकर ह्या शक्तीत पुर्ण पारंगत होशील."

" धन्यवाद गुरुवर्या" सुयुध्द नमस्कार करत म्हणाला.

गरुडाने आपले पंख फडफडवले आणि सुयुध्दच्या जवळ जाऊन हाताला त्याचे डोके घासले. सुयुध्दने त्याच्या अंगावरुन हात फिरवला. गरुडाने त्याला बरं केल्याबदद्ल धन्यवाद केला. त्याच्याशी बोलत सुयुध्द त्याला विचारु लागला कि कुठे त्याच्यावर हल्ला झाला होता. गरुडाने त्याला सर्व तपशिल सांगितला. सगळे त्याला पाहत होते गरुड त्याच्याशी बोलत होता. पण अजब म्हणजे सुयुध्द सुध्दा गरुडासारखा आवाज काढुन त्याच्याशी संवाद साधत होता. अचानक बोलताना त्याने बाजुला पाहिले. अन सर्वांचे अवाक चेहरे पाहुन तो थांबला. त्याने समीर कडे बघुन विचारले.

" काय झालं? असं का बघताय माझ्याकडे?"

समीर त्याला डोळे विस्फारुन पाहत होता. त्याच उघडं तोंड बघुन त्याने अग्निहोत्री गुरुंकडे पाहिले व म्हणाला.

" काय झालं?"

" तु पशुपक्ष्यांशी संवाद साधु शकतोस. म्हणुन सर्व अवाक झाले आहेत. गुरु विश्वेश्वरां शिवाय दुसरे कोणीही ह्या शक्तीला अजुन शिकु शकले नाही."

हे ऐकुन सुयुध्दला धक्का बसला होता. ऊपचारक शक्तीचा पुर्ण तास त्याने गप्प राहुन आणि कुजबुज ऐकुन घालवला होता. सर्वजण त्याला एका वेगळ्याच नजरेने पाहत होते. वर्ग संपवुन जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याच्या सोबत बरेच मित्र मंडली जमले होते. काही मुली सुध्दा त्याला हे विचारत होत्या कि त्याला पहिल्याच दिवशी हे कसे जमले. तो ह्या आधी सर्व काही शिकला होता का? सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देता देता त्याच्या अगदी नाकी नऊ आले होते. समीरने सगळं काही पाहुन त्याच्या सोबत भांडण केले होते. त्याला वाटत होतं कि सुयुध्द सर्व विद्या पहिलेच शिकुन सुध्द्दा त्याला खोट बोलत होता. सुयुध्दने त्याला खुप वेळा हेच सांगितलं होतं कि त्याला खरच नाही माहित कि तो हे कसं करु शकतोय. पण त्याला विश्वास बसला नव्हता.

मंदिरातील दहा घंटानादांनी हे सांगितले होते कि त्यांचा शेवटच्या वर्गाची वेळ झाली आहे. शेवटचा वर्ग पशुशास्त्र आणि भुमिज्ञान ह्या विषयाचा होता. जगदिश अडसुळ त्या विषयाचे गुरुजी होते. सगळे शिष्य प्रशिक्षण केंद्रातल्या कक्ष क्रमांक सहामधे बसले होते. सदरा आणि पंचा घातलेले जगदिश अडसुळ गुरुजी त्यांना आज पशुशास्त्रातील काही पशूंची माहीती देत होते. जगदिश गुरुजी दिसायला चाळीशी तले होते. सावळ्या वर्णाचे साधारण उंची असलेले गुरुजी दिसायला जाड चेहरा, रुंद नाक व भरभक्कम अंगकाठीचे होते. त्यांची भाषा विशेषतः घाटी होती.

" तर मुलांनो, आज म्या तुमाला इशेश अशा प्राण्यांबद्द्ल सांगणार हाय. लक्ष देवुन ऐका. तुमाला हे प्राणी म्हाईत हायेत. पन त्यांच्या इशेश गुना बद्द्ल चांगली माईती न्हाई."
टेबलावर बसुन जगदिश गुरुजी शिष्यांना म्हणाले.

त्यांनी गरुड, घोडा, कोल्हा व इतर काही पशुंची ओळख करुन दिली. हा तास समीरच्या अतिशय आवडीचा होता. जगदिश गुरुजी स्वभावने अतिशय चांगले होते. त्यांची भाषा घाटी व गावठी होती पण सुयुध्दला ते आवडले होते. सुयुध्दचे मन भलतिकडेच रमले होते. त्याला गरुडाने सांगितलेल्या गोष्टी आठवत होत्या. आश्रमात येताना त्याला खात्री होती कि ते दैत्य त्याचा पिच्छा करत आश्रमापर्यंत येणार नाहीत. पण आता त्याला आपल्या परिवाराच्या सुरक्षे बद्द्ल शंका वाटू लागली होती. तास संपे तोवर जगदिश गुरुजींनी शिष्यांना बरीच महिती दिली होती. अकरा घंटानाद झाले आणि सुयुध्द हर्षद सोबत प्रशिक्षण वर्गातुन बाहेर आला. त्याला अजुन त्याच विचाराने भिडसावल होतं कि अचानक त्याची नजर धावत जाणाऱ्या चैतंन्य गुरुजींवर पडली. ते गुरु विश्वेश्वरांच्या घराकडे धावत जात होते. सोबत अजिंक्य गुरुजी व मल्हारी गुरुजी ही होते. सुयुध्दला आता आपली शंका खरी आहे का हे जाणून घ्यायचे होते म्हणून तो त्यांच्या मागे धावत निघाला.
त्याला असं अचानक निघुन जाताना बघुन हर्षदने त्याला हाका मारुन थांबण्याचा प्रयत्न केला. पण तो काही थांबला नाही.

क्रमशः ...

लेखक: सुयोग शिलवंत.
भाग अकरावा लवकरच…
________________________________________________

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाग उशीरा सादर केल्याबद्दल क्षमस्व. कामाचा जास्त ताण असल्याने लिखाण करताना इतरही काही गोष्टी पडताळाव्या लागत असतात. त्यामुळे उशीर होतो.. जितक्या लवकर लिखाण होतं तसं मी सादर करतो.

हा भाग तुम्हाला कसा वाटला जरुर कळवा.

वाह...! बऱ्याच दिवसांनी एक चांगली कथा वाचतोय..
अचानक येणाऱ्या कोणत्या संकटात सुयुद्ध अडकणार आहे का? बापरे मनाला आता घोर लागून राहीलाय...लवकर येऊद्या पुढचा भाग..
खुपच आवडली कथा. पुढिल लेखनाास शुभेच्छा...

उत्तम भाग.. सगळ्या तासांबद्दल अगदी विस्तृत माहिती दिलीत... सुरुवातीचे भाग थोडे विस्कळीत होते पण गेले दोन भाग एकदमच मस्त जमलेत.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत..

सगळ्या तासांबद्दल अगदी विस्तृत माहीती दिलीत...मी सहमत आहे हिम्सकूल शी....
मिञांचे सुद्धा काही क्षण टाकल्यात समीर आणि हकलत बोलणारा हर्षद जबर जोडी वाटली...

एकूणच सर्व संबंधित पाञाची माहीती मिळाल्याने डोळ्या समोर एक स्पष्ट चिञ उभे राहीले...

तुमच्या प्रतिसादाबदद्ल धन्यवाद हिम्सकूल आणि संदिप. कथा तुम्हाला आवडतेय हे वाचुन आनंद झाला.
पुढिल लिखाण चालु आहे. वाचत रहा. पुढील भाग लवकर टाकेन म्हणजे तुमची लिंक तुटणार नाही...

मस्तच...!! अशीच चालु राहुदे कथा...!! पण वेळेत भाग टाकत चला, म्हणजे मागील भागाची लिन्क जोडायला वेळ वाया जाणार नाही..!!

नक्कीच अब्दुल भाऊ मला पण वाटत लवकर टाकावं पण काहिही लिहुन नाही चालत...योग्य दिशेला कथा गेली पाहिजे त्यासाठी थोडाफार वेळ लिखाणास लागतोच...कथेची गरज म्हणून संस्कृत मला १ महीना शिकावी लागली. लिखाण चालु आहे. आणि आपण एक प्रामाणिक प्रतिसाद देणारे आहात वाचत रहा. आपल्या प्रतिसादाची मी उत्सुकतेने वाट पाहत असतो.

लिहण्याची प्रेरणा हॅरी पॉटर, पर्सी जॅक्सन, मॅग्नस चेस वैगरे वैगरे आणि इतर अशा अनेक कांदबऱ्या आहेत. पण या कथेचे मुळ वेगळे आहे. साम्य वाटने सहाजिक आहे. कथा तुम्हाला आवडतेय त्याचा आनंद आहे. वाचत रहा. भारतीय मुळ आणि संस्कृती ह्याच्यात सांगता राखुन कथेची बांधणी आहे.

लिहण्याची प्रेरणा हॅरी पॉटर, पर्सी जॅक्सन, मॅग्नस चेस वैगरे वैगरे आणि इतर अशा अनेक कांदबऱ्या आहेत. पण या कथेचे मुळ वेगळे आहे. साम्य वाटने सहाजिक आहे. कथा तुम्हाला आवडतेय त्याचा आनंद आहे. वाचत रहा. भारतीय मुळ आणि संस्कृती ह्याच्यात सांगता राखुन कथेची बांधणी आहे.

उद्या पर्यंत प्रतिक्षा करावी लागेल संदिपजी कथे मध्ये काही लहान सहान बदल आहेत ते करत आहे. सगळे बदल योग्य आहेत का ते निरिक्षण करुन सुधारुन उद्या दुपारनंतर कथा पोस्ट करेन.