सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - ११

Submitted by Suyog Shilwant on 19 January, 2017 - 18:28

चैतंन्य, अजिंक्य आणि मल्हारी गुरुजींना सुयुध्दने गुरु विश्वेश्वरांच्या घरात घुसताना पाहिले व तो ही त्यांच्या मागे मागे घरात शिरला. गुरु आतल्या खोलित ध्यानस्थ होते. जेव्हा ते तिघे आत शिरले ते सरळ गुरुंच्या खोलीकडे गेले होते. सुयुध्द्ने माजघरात कोणी नाही हे पाहुन खोलीकडे जाण्याचे ठरवले. खोलीच्या दाराशी जाऊन तो थांबला. आत चैतंन्य गुरु विश्वेश्वरांना काही सांगत होते. त्याने कानेसा घ्यायला म्हणुन दाराशीच उभे राहुन ते काय बोलत आहेत हे ऐकण्याचा प्रयत्न केला. चैतंन्य गुरुजी बोलत होते. तो त्यांचा आवाज ओळखत होता.

" गुरुदेव आपल्या आज्ञेनुसार मी प्रवेशद्वाराची सुरक्षा मंत्रांनी वाढवली आहे. त्या दैत्यांना आता त्रिनेत्रींच्या मागावर इथे येणे शक्य नाही."

त्यांच बोलुन झाल्यावर लगेच अजिंक्य गुरुजी म्हणाले.
"गुरुदेव मी आश्रमाच्या भुलभलैयाला सुध्दा परिवर्तीत मंत्राने सुरक्षित केले आहे."

सुयुध्दची शंका खरी ठरली होती. त्याने विचार केल्याप्रमाणे ते दैत्य त्याचाच शोध घेत इथवर येऊन पोहचले होते. त्याला अजुनच भिती वाटली. काय करावे त्याला सुचेना झाले. त्याचे लक्ष नव्हते पण मल्हारी गुरुजी त्याला पाहत बाजुला उभे राहिले होते. त्यांनी सुयुध्दचा हात पकडला व त्याला ओरडत म्हणाले.
" तु इथे काय करतोयस..?"

अचानक असे त्याला पकडल्याने तो घाबरला व गप्प राहिला. पुढचा आवाज गुरु विश्वेश्वरांचा होता.

" थांब मल्हारी. त्याला आत घेऊन ये."

मल्हारी गुरुजींनी पुढे काही न बोलता त्याला आत घेतले. गुरु विश्वेश्वर त्याला पाहत होते. सुयुध्द मान खाली घालुन उभा होता. तो गप्प अपराध्या सारखा उभा आहे हे पाहून गुरु विश्वेश्वर त्याला म्हणाले.

" बाळ सुयुध्द तुझ्या मनात हिच शंका आहे ना कि तु आणि तुझा परिवार इथे सुरक्षित आहे का नाही?"

गुरुंच्या ह्या प्रश्नाने सुयुध्द दचकला. खाली घातलेली मान वर करत तो गुरुंना बघु लागला. गुरुंनी त्याच्या मनातील ओळखणे त्याला आश्चर्यात टाकणारे होते. तो काही बोले ना हे पाहुन गुरु पुन्हा एकदा शांत स्वरात बोलले.

" बाळ. तु चिंता करु नकोस. मी तुला ओरडणार नाही. बोल."

सुयुध्दने हिम्मत करत हो म्हंटले.

" तुझी चिंता निरर्थक आहे. आज पर्यंत ह्या आश्रमात कोणीही दैत्य, दानव, राक्षस प्रवेश करु शकला नाही आणि करु ही शकणार नाही. तु निश्चिंत रहा. तुम्ही इथे सुरक्षित आहात. तु आपल्या प्रशिक्षणावर लक्ष दे."
गुरु विश्वेश्वर त्याला म्हणाले.

गुरुंच्या बोलण्याने त्याला थोडा धीर वाटत होता. पण गरुडाने सांगितलेल्या वेदना त्याला अजुनही आठवत होत्या तो गुरुंना हात जोडून म्हणाला.

" पण गुरुदेव…तो गरुड…"

"मला सर्व काही ज्ञात आहे बाळ. त्या गरुडाला तु आपल्या शक्तीने बरे केलेस तेव्हा त्याच्या वेदना तुला कळल्या. पण तो आता तुझ्या मुळे पुर्ण बरा झाला आहे. तेव्हा घाबरण्याचे काही कारण नाही. तु जा आता आणि कसलीही काळजी करु नकोस."
त्याच वाक्य पुर्ण होण्या आधीच गुरु त्याला टोकत म्हणाले.

सुयुध्दने त्यांना नमस्कार केला. गुरु विश्वेश्वरांनी आशिर्वाद देऊन चैतंन्यला त्याला बाहेर घेऊन जाण्यास सांगितले. चैतंन्यने त्याला घराबाहेर आणुन सोडले व पुन्हा आत निघुन गेले. सुयुध्दने बाजुच्या घराकडे नजर टाकली. त्याची आई काया त्याला पाहत घरा बाहेर उभी होती. एक क्षण तिथेच थांबुन त्याने आपल्या आईला हसताना पाहिले. तिला अस हसताना बघुन त्याला मनापासुन खुप बरे वाटले. आईने त्याला हाताने इशारा करत जवळ येण्यास सांगितले. कशाचाही विचार न करता तो पटकन तिच्या कडे धावला.
जवळ जाताच त्याने आईला मिठी मारली. आईने त्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याला विचारले.

" काय रे वेडोबा काय झाले? असा पळत तु गुरुंच्या घरात का गेलास?"

आई त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत होती. पण तो काही बोलत नव्हता. घरातुन त्याची आज्जी बाहेर आली त्याला पाहुन ती खुप खुश झाली. त्याच्या आज्जीच्या तो पाया पडला. तसं आज्जीने त्याला आशिर्वाद दिला. आवाज देऊन तिने आत बसलेल्या त्याच्या आजोबा व बाबांना बाहेर बोलावले.

" काय रे सुयुध्द. कसा होता तुझा पहिला दिवस?"
आज्जी म्हणाली.

" मस्त होता. आईने बोलावले म्हणून मी आलो."
सुयुध्द आज्जीला पाहत म्हणाला.

आजोबा बाहेर आले तसं सुयुध्दने त्यांच्या पाया पडून आशिर्वाद घेतला.

" बाळा. जा आता इथे जास्त वेळ थांबू नकोस. परवानगी शिवाय भेटने आश्रमाच्या नियमांचे उलंघन करणं आहे."
आजोबा त्याला खडसावुन म्हणाले.

आजोबांनी सांगितल्या प्रमाणे तो लगेच तिथुन निघुन मैदानात त्याच्यासाठी थांबलेल्या समीर व हर्षद जवळ आला होता. ते दोघे त्याला चिंतीत नजरेने पाहत होते. मैदानात जास्त मुलं नसल्याने त्याला आपल्या परिवाराला भेटताना फारसे कोणी पाहिले नव्हते. हर्षदने त्याला जवळ येताच विचारले.

" तु…तु असा गुरुजींच्या म…म..मागे का पळालास?

" काही नाही." सुयुध्द त्याला म्हणाला.

समीरला राहवले नाही त्याने आपला राग बाजुला सोडुन सुयुध्दला म्हंटलं.

" मग तिकडे काय माशा मारायला गेला होतास. तुला नाही सांगायचं असं म्हण की."
हे बोलताना त्याचं फुगलेलं तोंड बघुन सुयुध्दला हसुच आले.
त्याला हसताना पाहुन हर्षद ही हसु लागला. दोघे बराच वेळ हसले. न राहवुन समीर ही त्यांना सामिल झाला.

" आता तरी सांग काय झालं ते.." समीर म्हणाला.

" ठिक आहे बाबा सांगतो."

सुयुध्दने सगळा घडला प्रकार दोघांना सांगायला सुरुवात केली. कसं गरुडाने त्याला दैत्यां विषयी सांगितले आणि कशी त्याला त्याच्या सुरक्षेचे शंका वाटू लागली. मग त्याने चैतंन्य गुरुजींना असं अचानक धावत जाताना पाहीलं म्हणुन त्याला अजुनच भिती वाटली. तो आत गेल्यावर गुरुदेव काय म्हणाले. सर्व काही त्याने हर्षद व समीरला सांगितले. ते दोघे तोंडात बोट घालुन तो जे काही सांगत होता ते ऐकत होते. समीरचा त्याच्या बद्दल गैरसमज झाला होता हे आता स्पष्ट झाले होते. समीरने त्याला म्हंटले.

" मला माफ कर सुयुध्द. मला खरच असं वाटलं कि तु खोट बोलत आहेस. पण आता तु जे सांगितलस त्यावरुन एक गोष्ट मात्र नक्की झाली की तु मला खरं सांगत होतास…"

" अरे काय समीर…एवढ्याशा गोष्टीचा मला राग नाही आला. माफी कशाची हे असं होतं कधी कधी."
सुयुध्द हसतच म्हणाला.

" तु…तु काळजी क..ककरु नकोस सुयुध्द. मी ऐकल्या प…प..प्रमाणे ह्या आश्रमात आ…आजपर्यंत कोणतीही दुष्ट श…श..शक्ती येऊ शकली नाही."
हर्षद म्हणाला.

" हो. गुरुदेवांनी सांगितल्या नंतर आता मला कसलीही चिंता नाही. मी उगाच घाबरत होतो." सुयुध्द म्हणाला.

"बर…आता चिंता नाही ना…मग नाश्ता करायला जाऊयात का?"
समीर त्या दोघांना म्हणाला.

दोघांनी मान हलवुन सहमती दर्शवली आणि ते भोजनालयाच्या दिशेने निघाले.

सुर्य आता अस्ताला आला होता. आकाश भगव्या छटांनी भरुन आले होते. आश्रमाच्या मैदानात काही मुलं खेळत होती. काही ठिकाणी मुली आपल्या गप्पांमध्ये रंगल्या होत्या. सुयुध्द व त्याच्या नव्या मित्रांची गट्टी मस्त जमुन आली होती.
आश्रमातला पहिला दिवस सुयुध्दला खुप आवडला होता. नाश्ता करुन झाल्यावर तो समीर व हर्षद सोबत तलवाच्या काठाशी असलेल्या परीसरात हिरव्या गवतावर बसुन गप्पा मारत होता. गप्पा मारता मारता सुर्य अस्त होताना सुयुध्द पाहत होता. हळुहळु क्षितिजावरुन सुर्य नाहीसा झाला. नव्या मित्रां सोबत बसुन त्याने बऱ्याच गप्पा मारल्या होत्या. त्याने समीर व हर्षदला त्याच्या जुन्या सवंगड्या बरोबर केलेल्या मजा मस्ती च्या गोष्टी सांगितल्या होत्या. समीरने ही त्याला आश्रमात असताना त्याने काय काय मजा केली हे सांगितले होते. हर्षदला आश्रमात एकच महिना झाला होता म्हणून त्याच्याकडे मनोरंजक असं सांगण्यासारख काही नव्हतं. अंधार पडायची वेळ आली तसे तिघे तलावाच्या काठावरुन उठले आणि वसतीगृहाकडे निघुन गेले. आजच्या दिवसात सुयुध्दला बरच काही शिकायला भेटलं होतं. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली तसा तो आपल्या सोबत्यां बरोबर भोजनालयातुन जेवून आला होता.

जेवण करुन सगळे जण आपापल्या खोलीत जाऊन बसलेले होते. रात्रीचे नऊ वाजत आले होते. सुयुध्द त्याच्या खोलीतल्या सवंगड्यांसोबत गप्पा मारण्यात व्यस्त झाला होता. निलेश नाईक, विनित नांगरे, महेश वाघ, संदिप लिमेकर, समीर राजगुरू, हर्षद पाठारे व सुयुध्द अशी सात जणं त्या खोलीत होती. निलेश, विनित आणि महेश एका खाटेवर बसुन आपसात काही बोलत होते. रात्र झाल्यावर खोलीत कंदिल लावले जात असत. दोन खांब खोलीच्या मध्य भागात असल्याने त्याला कंदिल लटकत होते. ज्याचा प्रकाश त्या खोलीत सर्वत्र पसरला होता. संदिप, समीर व हर्षद एका खाटेवर बसुन सुयुध्दशी बोलत होते. ते त्याला आश्रमात होणाऱ्या सामन्यांबद्द्ल सांगत होते. तसे सुयुध्दने त्यांना विचारले.

" समीर आज सकाळी तु मला सांगत होतास ते सामने नेहमी होतात का?"

" हो. पहिले महिन्यातुन एकदा हे सामने घेतले जात पण आता आठवड्याला होतात. आश्रमात एकुण पाच गट आहेत. त्या गटांमधे नविन भरती झालेल्या शिष्यांची परिक्षा घेऊन निवड केली जाते. हे पाचही गट एकमेकांशी सामना करतात. ह्या सामन्यात आत्ता पर्यंत गरुडध्वज हा गट नेहमीच विजयी होत आला आहे. त्यांच्याकडे सगळे योध्दा अगदी कुशल आहेत. इतर गटांना ते जिंकुनच देत नाहीत." समीर सुयुध्द्ला समजावत म्हणाला.

"अच्छा…म्हणुन तो कपिल मला त्यांच्या गटात सामील होण्याचे आमंत्रण देत होता." सुयुध्द म्हंटला.

समीर त्याला हळु बोल असा हाताने इशारा करत म्हणाला.

" तो महेश वाघ त्यांच्याच गटात आहे. हळु बोल.."

" पण तुमच्या गटाला अजुन पर्यंत का नाही जिंकता आले."
सुयुध्दने हळुच विचारले.

समीरने कोपऱ्यातल्या खाटेकडे पाहीले महेश, विनित आणि निलेश त्यांना बोलताना ऐकत नाही ना हे पाहुन त्याने बोलायला सुरुवात केली.

" कारण कपिल सुर्यवंशी आणि अश्विनी देशपांडे कोणाला ध्वजापर्यंत पोहचुच देत नाहीत. सामन्यात कपिल सर्व गटांना मागे हटवत असतो आणि अश्विनी ध्वजा जवळ जाऊन त्यांचा ध्वज प्राप्त केल्यावर इतरांच्या ध्वजा भोवती नवा अडसर घालते. दरवेळी हेच होते."

" दरवेळी …" सुयुध्द चकित होत म्हणाला.

" हो दरवेळी हेच होते. आमचा गट आर्ध्या पर्यंत पण पोहचलेला नसतो तोवर ते ध्वज प्राप्त करुन परतलेले असतात. पण ह्या वेळी असे नाही होणार.."
समीर हसत म्हणाला.

" क…का?"हर्षदने विचारले.

" कारण ह्यावेळी मला असं वाटतं कि गरुडध्वज नाही जिंकणार."

संदिप लिमेकर मधेच म्हणाला.
" का? ह्यावेळी काही विशेष योजना केली आहे का निलमध्वज ने. आपला गटनायक मला असं काही बोलला नाही."

" नाही…विशेष म्हणून नाही पण बघ तु ह्यावेळी मी असं होऊनच देणार नाही."
समीर म्हणाला.

त्यांचे बोलणे महेश वाघने ऐकले होते. तो खाटेवरुन उठुन समीर जवळ आला व म्हणाला.
" बघुयात की तु काय करतोस नक्की…"

" कळेलच तुला महेश. मी काय करतो ते."
समीरने हसत त्याला म्हंटलं.

रात्री बराच वेळ सुयुध्दने गप्पा मारल्या. मध्यरात्र होईस तोवर समीर व तो बोलत होते. कधी बोलता बोलता त्याला झोप लागली कळलंच नाही.

चॅप्टर चौथा " नवे मित्र" समाप्त.
************************************************
चॅप्टर पाच " सामना"
पुढचा भाग लवकरच…

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भाग तुम्हाला कसा वाटला जरुर कळवा. पुढचा भाग २ दिवसांत सादर असेल...
आपले प्रतिसाद माझ्यासाठी अनमोल आहेत. माझ्या कथेला आत्तापर्यन्त आवडीने वाचल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार...

@प्रवीण सर,तुम्ही सुयोग सरांच्या नावावर क्लीक करा मग एक पान उघडेल त्यावर 'लेखन' या पर्यायावर क्लीक करा म्हणजे त्यांचे संपूर्ण लेखन वाचता येईल ...

ह्या भागात काहीच घडले नाही असे वाटतय. असो.. आधीचे भाग छान झाले आहेत त्यामुळे कथा वाचताना मजा येते आहे आणि उत्सुकता पण वाढली आहे. मी हॅरी पॉटर फॅन असल्यामुळे, तुमची कथा वाचताना सतत त्या कथानकाशी तुलना होते पण ही कथा पण खूप रंजक होते आहे. कथेला आलेला स्पीड जाऊ देऊ नका (ह्या भागात झालाय तसा) एवढी एकच सुचना करावीशी वाटते.
पु. ले.शु.

हे काही बरोबर नाही, सुयोग भाऊ....!!! येवढा छोटासाच भाग....??? आणि ते पण अगदी 'सुयुध्दचा सामना' सुरु होण्याअगोदरच शेवट..???

चौकट राजा आपला सल्ला मी लक्षात ठेवेन. तुमच्या प्रमाणे मी ही एक h.p फॅन आहे. त्यानेच तर प्रेरणा मिळाली मला ही कथा लिहण्याची.

अब्दुल भाऊ चॅप्टरचा शेवट झालाय कादंबरीचा नाही. आताशी त्याच्या कहानीला सुरुवात झालीये. वाचत रहा पुढचा भाग अजुनच उत्कंठावर्धक आहे. मला माहित आहे तुम्हाला पण उत्कंठा आहे पुढे काय हे जाणण्याची. लिखाण चालु आहे. मी स्वतः हरवलोय लिखाणात...