सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - ९

Submitted by Suyog Shilwant on 23 December, 2016 - 19:02

चॅप्टर चौथा " नवे मित्र "

पहाटेचे 4 वाजत होते. सुयुध्द तयार होऊन चैतंन्यची वाट पाहत बसला होता. त्याला अस्वस्थ वाटत होतं कारण आजपासुन त्याची रवानगी वसतिगृहात होणार होती. घरातुन असं अचानक आल्यामुळे त्याचे दोन चार कपडे आज्जीने एका गाठोड्यात बांधुन आणले होते. कायाने पहाटेच त्याला उठवायच्या आधी तो डोळे मिचकत जागा झालेला. कालचा दिवस त्याने आपल्या घरच्यां सोबत घालवला होता. त्यांच्यासोबत त्याने खुप गप्पा मारल्या होत्या. त्यांच्या बरोबर शेवटचा दिवस म्हणुन त्याने आई आणि आज्जी कडुन खुप लाडही करुन घेतले होते. पण आता त्याला त्यांच्या पासुन वेगळं राहायला जाव लागणार होते. याच गोष्टींचा विचार तो खाटेवर बसुन करत होता की तेवढ्यात दारावर थाप ऐकु आली. सगळे उठुन तयारी करुनच बसले होते. सुयुध्दच्या आईने दरवाजा उघडला बाहेर अगदी मिट्ट काळोख होता. चैतंन्य दाराशी कंदिल घेऊन उभा होता. त्याला पाहताच सुयुध्दला कससंच झालं. आता तो त्याच्या परिवारापासुन वेगळा राहणार हा विचारच त्याला काही सहन होईना. जड मनाने कपड्याचे गाठोडे हातात घेऊन तो आपल्या आईला पाहु लागला. तिला भलतंच आठवणार होता तो वसतिगृहात. जाता जाता त्याला राहवेना म्हणुन कायाला तो घट्ट मिठी मारत बिलगला आणि मगच घराबाहेर पडला.

मागे वळुन वळुन त्याने आईला पाहिलं होतं. दाराशी उभी असलेली ती अंधुकशीच दिसली होती. बाहेरच्या काळोखात त्या कंदिलाच्या प्रकाशाशिवाय बाकी सर्वत्र अंधारच होता. एखादा अश्रु पुसत तो अंधारात चैतन्य सोबत वसतिगृहाकडे निघाला.

" ब्रह्ममुहुर्ता वर उठने तुझा रोजचा दिनक्रम व्हायला हवा."
चैतंन्य त्याच्याकडे पाहत म्हणाला.

सुयुध्दने मान डोलावुन होकार दिला. पहाटेची बोचरी थंड हवा त्याला स्पर्श करत होती. अजुन कसलीच हालचाल त्याला आश्रमात दिसत नव्हती. अचानक टेकडीवरच्या मंदिरातली घंटा त्याला ऐकु आली. एव्हाना ते चालत चालत अर्ध अंतर कापुन प्रशिक्षणकेंद्रा पर्यन्त पोहचले होते. बाजुलाच वसतिगृहाच्या घरांच्या रांगा होत्या. पहाटेच्या काळोखात घरामधल्या दिव्यांचा प्रकाश हे दर्शवत होता कि शिष्य तयारीला लागले असावेत. चैतंन्य वसतिगृहाकडे बोट करत त्याला म्हणाला.

" सुयुध्द हे आहे शिष्यांचं वसतिगृह. आज पासुन तुला इथेच रहायचे आहे. काल सांगितलेले नियम लक्षात आहेत ना तुझ्या.."

" हो लक्षात आहेत. पण ह्या पैकी कोणत्या खोलीत मी राहणार.."
उत्सुकतेने त्याने चैतंन्यकडे बघत विचारले.

चैतंन्य जागिच थांबला अन कंदिल सुयुध्दच्या चेहऱ्या जवळ नेत म्हणाला.
" हे बघ सुयुध्द तु आश्रमात नविन आहेस तसेच आणखिन काही नविन शिष्य सुध्दा आहेत आश्रमात. तु त्यांच्या सोबत त्या खोलीत राहशील.."

त्याने लांब एका दगडी घराकडे बोट करत दाखवले. तिथे एकाच रांगेत पाच घरं होती. त्यातल्या शेवटच्या टोकावर असलेल्या घराकडे त्याने इशारा केला होता. सुयुध्दला अजुनही काही विचारायच होतं. पण चैतंन्यने तो काही बोलायच्या आत त्याच्या हातात एक जुनाट जाडसर कागद सोपवला होता. सुयुध्दने कागदाच्या त्या पुरचुंडी कडे बघत पटकन चैतंन्यला विचारले.

" हे काय आहे? "

" हे तुझे वेळापत्रक आहे. आपल्या आश्रमात ह्याच नुसार सगळे शिक्षण दिले जाते आणि हो…हे जपुन ठेव." चैतंन्य त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.

सुयुध्दने उत्सुकतेने ती कागदाची परचुंडी उलघडली आणि आत काय लिहिलंय ते पाहीलं.

विश्वेश्वर गुरुकुल आश्रम

शिष्य प्रशिक्षण वेळापत्रक.

वेळ : 5 ते 6
शिक्षक : वेदांत कुलकर्णी.
विषय : योगसाधना, आंतरिक शक्तीचा विकास.
स्थान : योगकेंद्र.

6 ते 7 न्याहरी

वेळ : 7 ते 8
शिक्षक : नारायण शास्त्री.
विषय : शास्त्र, वेद, संस्कृत पठन.
स्थान : प्रशिक्षणकेंद्र, कक्ष क्रमांक 1.

वेळ : 8 ते 10
शिक्षक : मल्हारी सुर्यवंशी.
विषय : युध्दकला, शस्त्र प्रशिक्षण.
स्थान : आश्रमाचे मैदान.

वेळ : 10 ते 12
शिक्षक : अजिंक्य गरुड.
विषय : मायवी शक्तीचा विकास
स्थान : प्रशिक्षण केंद्र, कक्ष क्रमांक 3.

12 ते 1 भोजन.

वेळ : 1 ते 2
शिक्षक : चैतंन्य गरुड.
विषय : रुपांतर कला, पंचतत्वविद्या.
स्थान : प्रशिक्षण केंद्र, कक्ष क्रमांक 2.

वेळ : 2 ते 3
शिक्षक : समिधा वैद्य.
विषय : वनस्पती शास्त्र, आयुर्वेद.
स्थान : प्रशिक्षणकेंद्र, कक्ष क्रमांक 4.

वेळ : 3 ते 4
शिक्षक : शालिनी अग्निहोत्री.
विषय : उपचारक शक्ती.
स्थान : प्रशिक्षणकेंद्र, कक्ष क्रमांक 5.

वेळ : 4 ते 5
शिक्षक : जगदिश अडसुळे.
विषय : पशु शास्त्र, भुमिज्ञान.
स्थान : प्रशिक्षणकेंद्र, कक्ष क्रमांक 6.

असं स्पष्ट अक्षरात आणि योग्य पद्धतीत लिहुन त्याला दिलं होतं. हे सर्व वाचल्यावर त्याने चैतंन्यकडे आश्चर्याने पाहिलं अन म्हणाला.

" तुम्ही पण शिक्षक आहात?"

" होय. काय झालं? मी शिक्षक वाटत नाही का?" कपाळाला आठ्या पाडत त्याने विचारले.

सुयुध्दला जरा नवलच वाटलं. कारण चैतंन्यचा वेष एखाद्या साधू सारखा होता. त्याला हे वाचेपर्यंत कळलंच नाही कि हा सुध्दा एक शिक्षक असु शकतो. मान हलवत तो उत्तरला.

" नाही मला असं नव्हतं म्हणायचं..मला माहित नव्हतं ना. म्हणुन विचारलं. "

"बरं..तुला आणखिन काही विचारायचं आहे का? " चैतंन्य शंका विचारत म्हणाला.

"नाही" सुयुध्द पटकन बोलला.

" बरं ठिक आहे.. चल मी तुला खोलीपर्यंत सोडतो."
चैतंन्य वळतच म्हणाला.

सुयुध्दने तो कागद सांभाळुन आपल्या खिशात ठेवला आणि चैतंन्याच्या मागेमागे चालु लागला. खोलीजवळ पोहचल्यावर त्याला आतुन हालचालींचे आणि बोलण्याचे आवाज येऊ लागले होते. चैतंन्यने खोलीच्या दारावर थाप मारली. एक दोन क्षणांनी ते दार एका मुलाने उघडलं. दार उघडताच ते दोघे आत शिरले. दार उघडणारा मुलगा त्या दोघांकडे बघत उभा होता. आत पाच सहा मुलं सकाळची तयारी करण्यात व्यस्त होती. खोलीच्या आत असलेल्या दोन खांबांवर कंदिल लटकत होते. मुलं चैतंन्यला आणि सुयुध्दला आत येताना पाहताच थांबली. आपल्या हातातली कामं सोडुन ती खोलीच्या मध्यभागी येऊन उभी राहिली. काहींचे गणवेश घालुन झाले होते तर काहींचे घालायचे होते. सुयुध्दने सर्वांकडे एक कटाक्ष टाकला. त्याच्या वयाचे एक दोन शिष्य त्या गलक्यात दिसत होते. चैतंन्यने सुयुध्दकडे पाहिले आणि म्हणाला.

" आजपासुन हिच तुझी खोली. हे जे शिष्य आहेत ते तुझे सोबती आहेत. ह्यांच्याशी ओळख करुन घे."

सुयुध्दने त्या सर्व मुलांकडे पाहिलं. कंदिलाच्या प्रकाशात त्यांचे चेहरे अगदी स्पष्ट दिसत होते. एका कुतुहलाने ती सर्व मुलं त्याला पाहत होती. आपली ओळख कशी करुन द्यावी किंवा काय बोलावे हे सुयुध्दला सुचत नव्हते. चैतंन्यला ते जाणवले असावे तसा त्याने सुयुध्दच्या खांद्यावर हात ठेवला अन शिष्यांकडे बघत म्हणाला.

" हा सुयुध्द चिरंतर त्रिनेत्री. आज पासुन हा तुमच्या सोबत राहणार आहे. तेव्हा तुम्ही सर्व त्याला आपल्या आश्रमात केल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात मदत करा."

" होय. गुरुजी. " सर्व मुलं एका सुरात म्हणाली.

" सुयुध्द थोड्या वेळात तुला ह्या सर्वांसोबत मैदानात यायचे आहे. ठिक आहे. मी आता निघतो. तुला जर काही शंका असेल तर तुझ्या ह्या नव्या सवंगड्यांना विचार." असं म्हणत तो खोलीतुन निघुन गेला.

सगळी मुलं सुयुध्दला एकटक पाहत होती. तसा त्यातला एक मुलगा पुढे येत त्याला म्हणाला.

" सुयुध्द त्रिनेत्री म्हणजे तु महाशुर सुमन्यु त्रिनेत्रींचा खापर पंतु आहेस का ?"

" हो." आश्चर्यित होत सुयुध्द म्हणाला.

सर्व मुलांनी अचंबित होत एक मोठा श्वास घेतला. त्याला विचारणारा मुलगा पटकन त्याच्या जवळ आला आणि त्याला हात जोडत म्हणाला.

" नमस्कार. माझ नाव समीर चंद्रकांत राजगुरु. माझे आजोबा आणि तुझे आजोबा या आश्रमात एकत्रच शिकले होते. माझ्या आजोबांनी मला तुझ्या खापर पंजोबांच्या बाबतीत खुप काही सांगितलं होतं. ते खुप महान होते. त्यांच्या सारख्या योध्दयाच्या घराण्याशी आज माझा संबंध आला. हे माझं भाग्यच."

सुयुध्दने त्याला हात जोडत नमस्कार केला. समीर एक करड्या डोळ्यांचा साधारण अंगकाठीचा गोरा मुलगा होता. त्याच्या बोलण्यातुन सुयुध्दला अस वाटत होतं कि तो मनमोकळा असावा. कारण पहिल्याच भेटीत तो अगदी सहजपणे त्याच्याशी बोलत होता. जिथे इतर मुलं अजुन त्याला टक लावुन पाहत होती. तसा समीर त्या मुलांना बोलला.

" अरे बंधुन्नो बघताय काय? आपआपली ओळख करुन द्या."

निलेश नाईक, विनित नांगरे, महेश वाघ, संदिप लिमेकर अशी त्या चौघांनी आपली ओळख दिली. महेश वाघ तो जाडा मुलगा होता ज्याने दार उघडले होते. अचानक सुयुध्दची नजर एका कोपऱ्यातल्या खाटेकडे गेली. एक लुकडासा मुलगा साधारण सुयुध्दच्या वयाचा असावा त्या सर्वांकडे पाहत गप्प उभा होता. सुयुध्दने त्याच्याकडे बोट करत समीरला विचारलं.

"तो कोण आहे?"
बाकिची मुलं निघुन गेली व परत आपल्या तयारीत व्यस्त झाली. समीरने वळुन कोपऱ्यात उभ्या त्या मुलाला पाहिले आणि म्हणाला.

" तो हर्षद आहे. "

हाक मारत त्याने हर्षदला जवळ बोलावले.
सुयुध्दला जरा वेगळंच वाटलं. सगळी जणं येऊन आपली ओळख देत होती मग हा का नाही आला.

" अरे त्याला आपली ओळख करुन दे. " समीर हर्षदला बघत म्हणाला.

" नननमस्कार…मी…..माझं नाव…हर्षद नननामदेव पाठारे…"
अडखळत अडखळत तो म्हणाला.

सुयुध्दने त्याला नमस्कार केला. त्याला कळालं कि सगळे बोलत असताना हा एकटाच कोपऱ्यात का उभा होता. त्याला वाईट वाटलं. त्याने हर्षदला वरपासुन खाल पर्यंत पाहिलं. त्याचाही गणवेष सुयुध्द सारखाच नविन होता. सुयुध्द त्याला म्हणाला.

" तु सुध्दा आश्रमात नविन आहेस? "

हर्षदने मान डोलावली. सुयुध्दने पुन्हा समीरकडे बघत विचारलं.

" समीर तु कधी पासुन आहेस आश्रमात? "

समीर त्याच्या खाटेवर जाऊन बसला आणि समोरच्या खाटेकडे हात करत म्हणाला.

" ये ना. बस इथे सांगतो."

सुयुध्दने हातातलं गाठोडं खाटेवर टाकलं आणि बसुन घेतलं. हर्षद त्याच्या बाजुला जाऊन उभा राहीला.

" मला एक वर्ष झालं. मी इथे आहे. सुरुवातीला मला आई बाबांची आठवण यायची पण नंतर सवय झाली. गेल्या महिन्यात माझे आई बाबा आले होते मला भेटायला. तुझे आजोबा इथे आल्यात हे जर माझ्या आजोबांना कळालं तर माझे आजोबा लगेच येतील त्यांना भेटायला. तेवढिच माझी आजोबांशी भेट होईल." समीर हसतच बोलला.

समीरचं बोलन ऐकुन पटकन सुयुध्दला त्याच्या घरच्यांची आठवण आली. आत्ताच थोड्यावेळा पुर्वी तो त्यांच्या सोबत होता. त्याला आता नेहमी सारखं त्यांना भेटता येणार नव्हतं पण दररोज त्यांना लांबुन पाहु शकणार होता. यातच काय तो आनंद त्याला वाटला. सगळ्यांशी ओळख होता मग त्याने स्वतःसाठी समीरच्या बाजुचीच खाट निवडली होती. समीर खुपच बोलका होता. त्यालाही अशाच कोणाची तरी गरज होती. कारण एकच होतं ह्या नविन मित्रांमुळे त्याला आपल्या घरच्यांपासुन वेगळ असल्या सारखं तरी वाटणार नव्हतं.

बराच वेळ समीर आणि हर्षदशी गप्पा मारुन झाल्यानंतर त्याला आश्रमातल्या सगळया गोष्टींबद्दल थोडीफार माहिती मिळाली होती. आश्रमाचे नियम अगदी तसेच होते जसे चैतंन्यने त्याला सांगितले होते. त्याचे सोबती एक एक करुन तयार होऊन बसले होते. सुयुध्दला काही खास अशी तयारी करायची नव्हती कारण जे काही त्याचं होतं तो आपल्या सोबत घेऊन आला होता. त्याला उत्सुकता होती कि आज तो काय काय शिकणार आहे. खासकरुन काल त्याने पाहिलेल्या युध्दकलेच्या प्रशिक्षणाची तो आतुरतेने वाट बघत होता. विचार करत तो समीरच्या बाजुच्या खाटेवर बसला होता की काहीसा विचार करुन झाल्यावर त्याने आजुबाजुला पाहिले आणि समीरला विचारले.

" अरे समीर. किती वाजल्यात?"

समीर जो बसुन एक वहीवर हाताने चाळे करत बसला होता. मान वर न करता त्याला म्हणाला.
" तुला बाहेर जायची घाई आहे मला माहित आहे. पण अजुन आश्रमाची घंटा वाजली नाही."

मगाशीच समीरने त्याला आश्रमाच्या घंटे बद्दल सांगितल होतं. आश्रमात पहिली घंटा चार वाजता होत असे. सुयुध्दला आठवतं कि तो जेव्हा विश्रामगृहातुन बाहेर पडला होता त्याने टेकडी वरच्या मंदिरातुन एका घंटेचा आवाज ऐकला होता. अजुन कशी घंटा वाजत नाही म्हणून त्याची बेचैनी वाढत होती पण जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी सुयुध्दला अजुनच अस्वस्थता वाटु लागली.

" चल वेळ झाली आहे. आपण बाहेर जाऊयात." अचानक समीर त्याला म्हणाला.

सुयुध्दने पाहिलं कि बाकिचे सर्व ही उठुन दाराजवळ जाऊ लागले होते. तो पटकन उठला आणि समीर सोबत जाऊन उभा राहिला.

" हं….चल…" उत्सुकतेने भरलेल्या चेहऱ्याने तो समीरला म्हणाला.

समीरने त्याच्याकडे पाहिलं अन हसला.

"काय झालं. हसतोयस का?" सुयुध्द म्हणाला.

" अरे…काय ही उत्सुकता..तुला बघुन ना मला. मी जेव्हा पहिल्यांदा आश्रमात आलो होतो. त्याची आठवण झाली. बरं असु दे चल आता. बाकीचे बाहेर गेले सुध्दा."

सुयुध्द त्याच्या सोबत धावतच बाहेर आला आणि बाकीच्या सोबत्यां बरोबर चालू लागला. आजुबाजुच्या खोल्यांमधुन सुध्दा शिष्यांचे घोळके बाहेर येत होते. मगाशी असलेली आश्रमाची शांतता आता मुलांच्या आवाजाने भंग झाली होती. सर्वजण येऊन मैदानात थांबले. एक एक करुन सगळ्या शिष्यांनी रांगेत एकामागोमाग एक ऊभे रहायला सुरुवात केली. सुयुध्द ही समीरच्या मागे ऊभा राहिला. एवढ्यात टेकडीवरच्या मंदिरातुन दोन घंटा नाद ऐकु आले. सगळी मुलं शांतपणे सावधान स्थितित ऊभी झाली होती. समोरुन एक भटासारखा दिसणारा माणुस एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात काठी घेऊन आला ज्याला घुंगरु बांधले होते. सुयुध्दने त्यांना पाहुन समीरला विचारले.

" हे कोण आहेत? "

" हे वेदांत कुलकर्णी आहेत आपले गुरुजी .." बारीक आवाजात तो तोंडाच्या कडेला हात ठेवत म्हणाला.

सुयुध्दने त्यांना आधी ही पाहीले होते. काल जेव्हा तो आश्रमात दाखल झाला होता. मुलांना योगसाधना शिकवत असताना त्याने त्याच्या ह्या नविन गुरुजींना पाहिले होते. अचानक गुरुजींनी काठी जमिनीवर आपटली. सगळी मुलं हात वर करुन कवायत करु लागली. जसे जसे गुरुजी काठी आपटत मुलं आपले प्रकार बदलत. सुयुध्दला दुसऱ्यांकडे बघुन बघुन आपली कवायत करावी लागली. त्याला हे सर्व नविनच होते. बराच वेळ कवायत करुन झाल्यावर समोर ऊभ्या गुरुजींनी काठी आपटने थांबवले. मोठी मुलं एका बाजुला झाली जी एकाच वयाची होती. असे करता करता मुलांचे विभाजन खुप गटांमधे झाले. सुयुध्द आणि त्याचे सोबती एकत्र ऊभे असताना सुयुध्दची नजर अचानक एका बाजुला गेली. तिथे मुली ही होत्या. त्यातल्या एका मुलींचा गट सुयुध्दच्या जवळ येऊन ऊभा राहीला. सुयुध्दला आश्चर्य वाटले कारण काल त्याने कोणत्याही मुलींना आश्रमात पाहिले नव्हते. त्याला असे वाटले होते कि आश्रमात फक्त मुलंच आहेत. पण सर्वात मोठ्या मुलांच्या दोन गटांना सोडलं तर बाकी सर्वीकडे मुली प्रत्येक गटात दिसत होत्या. त्याने बाजुला उभ्या समीरला जवळ खेचले आणि म्हणाला.

" समीर…इथे मुली ही शिकतात? "

" हो…का रे..? अस का विचारलंस?" समीर डोळे मोठे करत म्हणाला.

" काल मी जेव्हा आलो तेव्हा एकही मुलगी मला इथे दिसली नव्हती म्हणुन विचारलं."

"आजपासुन त्यांच वेळापत्रक बदललं आहे. पहिले त्यांना शिकवण्याची वेळ मुलांपासुन वेगळी होती. काल जेव्हा तु आलास तेव्हा आम्ही बाहेर मैदानात होतो आणि मुली प्रशिक्षणकेंद्रात होत्या." समीर त्याला समजावत म्हणाला.

"अच्छा. असं आहे का? " सुयुध्दने बाजुला ऊभ्या मुलींकडे पाहिले.

त्यांचे गणवेश वेगळे नव्हते. मुलांनी घातलेले तसेच सारख्या रंगाचे कपडे त्यांनीही घातले होते. फरक एवढाच की मुलांनी वेगवेगळ्या रंगाचे टि शर्ट घातले होते आणि मुलींनी गुडघ्या पर्यंत येणारे झालरदार शिर्ष आणि पायजमे घातले होते. गुरुजींनी काही सांगण्या आधीच सगळे शिष्य वेगवेगळया गटात मुलं-मुली असे एकत्र उभे होते. वेदांत गुरुजी सुयुध्दच्या गटा जवळ आले आणि त्यांना म्हणाले.

" माझ्या मागे या."

सुयुध्द सोबतचे सगळे शिष्य एकत्र त्यांच्या मागे निघाले. गुरुजींनी त्यांना एका गोल दालनात नेऊन बसवले जे एक योगकेंद्र होते. सर्व शिष्यांना रांगेत बसवुन झाल्यावर ते म्हणाले.

" आपला पहिला अभ्यास तुम्हा सर्वांना माहित आहे. जे नविन आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो. डोळे मिटुन आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. हा अभ्यास केवळ पंधरा मिनिटे केला जाईल. तोवर मी बाकिच्या शिष्यांना पुढचे योगाभ्यास सांगुन येतो. चला सुरुवात करा."

एवढं बोलुन वेदांत कुलकर्णी इतर शिष्यांकडे निघुन गेले होते. सुयुध्दने पाहिले कि त्याच्यासोबतचे बाकिचे शिष्य गुरुजींच्या आज्ञेनुसार आपापले डोळे मिटुन ध्यानस्थ झाले आहेत. तसे त्याने ही आपले डोळे मिटले.

योग अभ्यासाच्या ह्या तासात त्याला नविन असं काही अनुभवायला मिळाल होतं तर ते म्हणजे शांत एका ठिकाणी बसुन चिंतन करणे. त्याला काल घडलेल्या सगळ्या घटना दिसु लागल्या होत्या. जस जसं त्याने आपल्या श्वासांवर लक्ष एकवटले त्याचे मन घडलेल्या गोष्टींपासुन हटु लागले. तो चांगलाच ध्यान मुद्रेत मग्न झाला होता. समीरने त्याला बराच वेळ हलवुन सुध्दा तो काही ध्यानातुन बाहेर येत नव्हता. ज्या क्षणी त्याचे ध्यान भंग झाले सगळी मुलं त्याच्या आसपास जमा झाली होती. गुरुजी त्याच्या समोर बसुन त्याला ध्यानपुर्वक न्याहाळत होते. त्याने डोळे उघडताच गुरुजींना आपल्याकडे पाहत असलेले पहिले. समीरने त्याला चिंताग्रस्त होत विचारले.

" सुयुध्द तु ठिक आहेस ना."

" हो. का रे…काय झालं? " सुयुध्दने आश्चर्यीत होत त्याला विचारले.

समीर काही बोलायच्या आत वेदांत गुरुजी म्हणाले.
" अतिशय उत्कृष्ठ… आजपर्यंत अशी एकाग्रता मी कोणत्याही शिष्यामधे पाहिली नव्हती. बरं…आता उठ. आपला वर्ग सन्पला आहे. गेल्या 30 मिनिटांपासुन तुझा हा मित्र तुला ध्यानातुन बाहेर आणण्याचा प्रयत्न करत होता. जा न्याहरीची वेळ झाली आहे."

सुयुध्दने आजुबाजुला पाहिले सर्व शिष्य त्याला एका अजब नजरेने पाहत होती. कदाचित त्यांना जे जमले नव्हते ते त्याला पहिल्याच वेळी सहज जमले असावे म्हणून. तो जागेवरुन उठला आणि गुरुजींना नमस्कार करुन समीर बरोबर चालता झाला. इतर मुले त्याला अजुनही एकटक पाहत होती. समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला अन म्हणाला.

" तुला कसं काय जमलं?"

" काय जमलं ?" सुयुध्दने आश्चर्याने विचारले.

" अरे बाबा...तु कसला चमकत होतास. एक सोनेरी तेज तुझ्यातुन येत होता. तुला काहिच जाणवलं नाही का?"
समीर उत्साहित होत त्याला म्हणाला.

सुयुध्दला कळले तो काय म्हणत आहे पण असं काही झालंय याची त्याला कल्पना सुध्दा नव्हती. त्याला खरंच काही माहीत नव्हतं कि तो हे कसं करु शकतो. त्याने समीरला पाहिले समीर त्याच्याकडे अचंबित होऊन पाहत होता.

" मला नाही माहित रे. " सुयुध्द म्हणाला.

"खरंच नाही माहित की तुला सांगायचे नाही." समीर भुवयी वर करत म्हणाला.

सुयुध्दला स्वतःलाच माहित नव्हत काय आणि कसं झालं तर तो त्याला काय उत्तर देणार होता.

" अरे खरंच नाही माहित मला आणि असं ध्यानाला मी कधीच बसलो नाही. " सुयुध्द त्याला समजावत म्हंटला.

" बरं बरं ठिक आहे. चल.. आपल्याला भोजनालयात जायला हवं आता न्याहरीची वेळ आहे." असं म्हणत समीर त्याला भोजनालयाकडे खेचत घेऊन गेला.

सुयुध्द समीर सोबत धावत प्रशिक्षणकेंद्रात गेला. बाहेर सकाळच्या उगवत्या सुर्याची किरणे पडली होती. सुयुध्दच्या प्रशिक्षणाचा पहिला तास अदभुत ठरला होता. कारण भोजनालयात पंगत घालुन बसलेले सर्व शिष्य सुयुध्दला पाहुन काही तरी कुजबुजत होते. बरीच मुलं त्याला आश्चर्यजनक नजरेने न्याहाळत होती. काही जण त्याच्याकडे बोट करुन आपल्या बाजुच्या सवंगड्याला काही सांगताना हसत होते. मुली तर त्याला आरपार नजरेने पाहत होत्या. न्याहरी करताना सुयुध्दला जरा अस्वस्थ वाटत होतं. कारण सगळ्यांच्या चर्चेचा विषय एकच होता " तो ". न्याहरी कशीबशी संपवुन त्याने बाजुला बसलेल्या समीर आणि हर्षदला खुणावले कि तो बाहेर जात आहे. पुढ्यात असलेली पत्रावळी तो उचलणार एवढ्यात एक मुलगा त्याच्या समोर येऊन ऊभा राहिला. तो मुलगा त्याच्यापेक्षा थोडा उंच होताव वयाने ही सुयुध्दपेक्षा चार एक वर्ष मोठाच असावा. मजबुत अंगकाठी असल्याने तो रुबाबदार होता. गव्हाळ वर्णिय, काळ्या डोळ्यांचा तो मुलगा सुयुध्द समोर ऊभा राहुन त्याला एकटक पाहत होता. जणु तो सुयुध्दबदल काही कयास बांधत असावा.

" नमस्कार…मी कपिल यशवंत सुर्यवंशी…मी गरुडध्वज गटात आहे. माझे काका त्या गटाचे प्रमुख आहेत. तु जर माझ्या गटात आलास तर मला फार आनंद होईल." गांभिर्याने तो सुयुध्दला बोलला.

सुयुध्दला सुरुवातीला काही कळले नाही. गरुडध्वज गट म्हणजे काय? असा त्याला विचार आला. त्याने समीरकडे पाहिले. समीरला त्याच्या डोळ्यातला प्रश्न कळाला होता तसा तो चटकन बोलला.

" युध्दकलेच्या प्रशिक्षण वर्गात युध्द गट आहेत. त्यात गरुडध्वज हा गट सर्वश्रेष्ट मुलांसाठी आहे. कपिल त्या गटाचा गटनायक आहे व सर्वात चांगला योध्दा आहे. तुला तो त्या गटात सामील होण्याचे आमंत्रण देत आहे."

" होय. हा जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे. तुझ्या बद्दल गुरुजींनी मला सांगितले आहे कि इथे येताना तु मोठ्या दानवाला एका झटक्यात मारले होतेस. त्याचमुळे मी तुला आमंत्रण द्यायला आलो आहे. आमच्या गटात येऊन तुला सर्वोत्तम प्रशिक्षण दिले जाईल. हा माझा शब्द आहे." गंभिरपणे कपिल सुयुध्दला बघत म्हणाला.

सुयुध्दला कळत नव्हते काय करावे म्हणुन तो शांतपणे विचार करुन म्हणाला.
" मला विचार करावा लागेल कारण माझा हा पहिलाच दिवस आहे. "

" ठिक आहे. तुला पाहिजे तेवढा वेळ घे. मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन." असं म्हणत कपिल त्याच्या समोरुन निघुन गेला.

सुयुध्दने आपली पत्रवली उचलली. समीर आणि हर्षदचे सुध्दा आटोपले होते ते सगळे एकत्रच उठले. आपापल्या पत्रावळ्या भोजनालयातल्या एका कोपऱ्यात असलेल्या टोपलीत टाकुन तिघेही बाहेर आले. सुयुध्दच्या मागे त्याच्या ह्या नविन मित्रांसोबत आणखिन काही मुलं मैदानात जमा झाली होती.
निलेश नाईक, विनित नांगरे, महेश वाघ, संदिप लिमेकर आणि तशीच सम वयाची आणखिन काही मुलं सुयुध्दच्या आसपास उभी होती. न्याहरी केल्यावर वेद शास्त्राचा तास होता. त्यानंतर युध्दकलेचा अभ्यास सुरु होण्यास अजुन बराच अवकाश होता. गटाचे काय रहस्य आहे हा विचार सुयुध्दला शांत बसु देत नव्हता. ते जाणण्यासाठी सुयुध्दने समीरला विचारले.

" समीर हे गटाचे काय रहस्य आहे?"

समीर हसतच म्हणाला.
" रहस्य कसले काय? थांब मी सांगतो. युध्दकलेच्या गुरुजींनी शिष्यांचे पाच गट केले आहेत. गरुडध्वज, शंखध्वज, निलमध्वज, अश्वध्वज आणि मिथुनध्वज. सर्व गटांना एकसारखेच प्रशिक्षण दिले जाते. फक्त युध्दकलेत ह्या गटांचा एकमेकांशी सामना होतो. दर आठवड्यात एकदा असे सामने घेतले जातात. आता पर्यंतच्या प्रत्येक सामन्यांमधे गरुडध्वज सर्वोत्तम गट ठरला आहे. त्यांना आता पर्यंत कुठलाही दुसरा गट हरवु शकला नाही. तो जो मुलगा तुला भोजनालयात भेटला होता तो गरुडध्वज गटाचा सर्वोत्तम योध्दा आहे. "

सुयुध्दला हे सर्व ऐकुन अजुनच उत्सुकता वाटली. त्याला ह्या सामन्यांबद्दल अजुन जाणुन घ्यायचे होते. म्हणुन त्याने पुन्हा समीरला विचारले.
" ह्या सामन्यांमधे असे काय विशेष केले जाते?"

समीर म्हणाला.
" हे बघ..ह्या पाच गटांना एक विशेष कसोटीला समोरे जावे लागते. प्रत्येकाला आपल्या गटाचा ध्वज दिला जातो. तो घेऊन प्रत्येकाने कसोटीमध्ये असलेल्या बाधांना पार करत आपला ध्वज जंगलाच्या आत असलेल्या एका खांबावर लावुन फडकवायचा असतो. जो गट सर्व बाधा पार करुन आपला ध्वज सर्वात पहिले फडकवेल तो विजेता."

त्याच बोलणं मधेच थांबवत सुयुध्द बोलला.
" बस इतकच ना…"

" हे काय सोप नाही. प्रत्येक गटाचा योध्दा दुसऱ्याला अडवत असतो. ह्याला एक युध्दच समझ. कारण हे दिसतय तितकं सोप नाही मित्रा. तुला कळेलच एकदा पाहिल्यावर." हसता हसता समीर त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटला.

सुयुध्दला उत्सुकता वाटली. त्याने पुन्हा समीरला विचारले.
" अरे पण एवढं काय त्यात म्हणजे गरुडध्वज प्रत्येक वेळी जिंकतात आणि बाकिचे नाही असं का? "

" कारण गरुडध्वज गटात सर्व योध्दा उत्कृष्ट आहेत. त्याच्या गटातल्या प्रत्येकाला सर्व विद्या अगदी चांगल्या जमतात."

" अच्छा…बरं ते सगळं असु दे. तुम्ही कोणत्या गटात आहात? "
सुयुध्दने आजुबाजुला पाहिले आणि आसपास जमलेल्या बाकिच्यांना विचारले.

समीर त्याच्या टि शर्ट वरचे चिन्ह दाखवत म्हणाला.
" हे बघ ना. मी निलमध्वज गटात आहे."

त्याचा टि शर्ट निळ्या रंगाचा होता त्यावर ब्रम्हचक्रा सारखे चिन्ह होते. ते पाहुन सुयुध्दने इतरांच्या टि शर्ट वर सुध्दा नजर फिरवली. प्रत्येकाच्या टि शर्ट वर कसले ना कसले चिन्ह होते आणि चिन्हा सोबत त्यांच्या टि शर्टचे रंग ही वेगवेगळे होते. लाल टि शर्टवर गरुडाचे चिन्ह, पिवळ्या टि शर्टवर सफेद शंखाचे चिन्ह, निळ्या टि शर्टवर ब्रम्हचक्राचे चिन्ह, मातकट रंगाच्या टि शर्टवर सफेद अश्वाचे चिन्ह, हिरव्या टि शर्टवर उगवत्या रोपाचे चिन्ह. मुलींच्या गणवेषातही तसंच होतं. त्याचा आणि हर्षदचा टि शर्ट मात्र सफेद रंगाचा होता. इतर काही शिष्यही होते ज्यांचा गणवेश सफेद रंगाचा होता. पण अगदी मोजकिच जणं होती त्या वेषात. त्याने आपल्या टि शर्ट कडे पाहत समीरला विचारले.

" समीर माझा टि शर्ट ह्या रंगाचा का आहे? "

" कारण तुला अजुन कोणत्याही गटात निवडले गेले नाहीये." समीर त्याला बघुन बोलला.

हर्षद मधेच समीरला अडवत बोलला.

" ते बघ…ग…ग…ग…गुरुजी आले."

सुयुध्दने पटकन वळुन पाहिले आणि समीरला विचारले.
" ते कोण आहेत? "

" मल्हारी सुर्यवंशी. आपले युध्दकलेचे गुरुजी…" आवाज जाड करत समीर म्हणाला.

काल दिसलेला उंच धिप्पाड माणुस मैदानात हातात काही शस्त्र घेऊन येत होता. त्याच्या मागे काही मोठी मुलं ही त्यांच्या हातात शस्त्राचे सामन घेऊन येत होती. मैदानात एका ठिकाणी त्यांनी आपली सर्व शस्त्रे ठेवली. अचानक टेकडीवरच्या मंदिरातुन तीन घंटा नाद ऐकु आले. ह्याचा अर्थ असा होता कि त्यांचा दुसरा प्रशिक्षणाचा तास सुरु झाला होता आणि न्याहरी करुन झाल्यावर आरामाची वेळ आता संपली होती. समीर पटकन सुयुध्दला बोलला.

" अरे चल..आपल्याला प्रशिक्षण केद्रात जायला हवं. दुसरा तास नारायण गुरुजींचा आहे."

सुयुध्द समीर आणि बाकीचे उरलेले शिष्य पटापट प्रशिक्षण केंद्राकडे पळत सुटले. सुयुध्दची ही पहिलीच वेळ होती आत जायची. आत घुसताच समीरने त्याला एका कक्षा समोर थांबवले. आत काही मुलं मुली खाली जमिनीवर मांडी घालुन बसले होते. गुरुजी समोर उभे राहुन उरलेल्या शिष्यांची वाट बघत होते. डोक्यावर शेंडी शिवाय बाकी काही नव्हते. पांढरा शुभ्र सदरा आणि खाली धोतर असा त्यांचा पेहराव होता. चेहऱ्यावर जाडसर सफेद मिशी, टोकदार लांब नाक, कपाळावर आडवा चंदनाचा टिळा ज्यावर लाल नाम ओढला होता. नारायण शास्त्री साधारण साठ वर्षाचे होते. हाताची घडी घालुन ते दाराकडे बघत उभे होते. सुयुध्द आणि समीर त्यांना बघुन पटकन आत शिरले आणि आपली जागा धरुन खाली बसले. काही उरली सुरली मुलंही येऊन एव्हाना बसली होती ज्यात हर्षदही होता. सगळे जण येऊन बसल्याची खात्री झाल्यानंतर गुरुजींनी बोलायला सुरुवात केली.

" आज मी तुम्हाला क्षत्रिय धर्म काय शिकवतो हे सांगणार आहे. त्या आधी आपल्या सोबत आज एक नविन शिष्य आला आहे त्याचं आपण स्वागत करुयात. " एवढ बोलुन त्यांनी सुयुध्दकडे पाहिलं आणि म्हणाले.
" ये बाळ इकडे ये."

सुयुध्दने बाजुला बसलेल्या समीर कडे पाहीले. समीरने हसुनच त्याला उठुन पुढे जायचा इशारा केला. तसा सुयुध्द पटकन उठुन समोर गेला. गुरुजींनी त्याला एका ठिकाणी उभे रहायला सांगुन आपली ओळख देण्यास सांगितले. पण आता पर्यन्त त्याची ओळख जवळपास सगळ्याच शिष्यांना झाली होती. योगसाधनेच्या प्रशिक्षणा दरम्यान त्याच्या कडुन झालेल्या प्रकारामुळे सगळे शिष्य त्याला बऱ्यापैकी ओळखु लागले होते. सुयुध्दने एक नजर सर्वांकडे बघत बोलायचे ठरवले.

" नमस्कार मी सुयुध्द चिरंतर त्रिनेत्री."
हात जोडत तो म्हणाला. बाकी शिष्यांनी नमस्कार करत प्रतिसाद दिला. नारायण गुरुजींनी त्याला नविन असल्यामुळे काही उपदेश केले.
" हे बघ बाळ. तु नविन आहेस आज तुझा गुरुकुलात पहिला दिवस आहे. तर तुला काही नियम मी सांगतो ते निट ऐक आणि त्यांचे पालन कर. तर पहिला नियम आहे. माझा वर्ग सुरु असताना गप्पा मारणे चालणार नाही. दुसरा नियम शिकवताना तुला जर काही समजले नसेल तर ते लगेच विचारायचे नंतर मी समजवणार नाही. तिसरा नियम वर्गात उशिराने येणाऱ्यास मी शिक्षा करतो. तर हे तिन महत्वाचे नियम आहेत हे लक्षात ठेव आणि त्यांचे पालन कर."

"होय गुरुजी."
असे चटकन तो म्हणाला.

" ठिक आहे चला विद्यार्थ्यांनो आता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अध्यायाची सुरुवात करुयात. जा बाळ आपल्या जागी जाऊन बस."

हे ऐकताच सुयुध्द आपल्या जागी जाऊन बसला. त्या कक्षामध्ये समोर भिंतीवरच्या फळ्या व्यतिरिक्त बाकी काही नव्हते. गुरुजी शिष्यांकडे पाठ फिरवुन फळ्यावर काही लिहु लागले. सुयुध्दची नजर समोर फळ्यावर लिहल्या जाणाऱ्या अक्षरांकडे वळली. गुरुजींनी लिहुन झाल्यावर शिष्यांकडे वळुन बोलण्यास सुरुवात केली.

"तर मुलांनो क्षत्रिय धर्म म्हणजे काय?

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश देताना गीतेच्या तेराव्या अध्यायात सांगितले आहे.

शौर्यतेजा धृतिर्दाक्ष्यं युध्दे चाप्यपलायनम् |
दानमीश्वरभाववश्रच् क्षात्रं कर्म स्वभावजम ||

अर्थात - शूरवीरता, तेज, धैर्य, चतुरता आणि युध्दातुन पलायन न करणारा, दानधर्म करणारा व स्वाभिमान जपणारा खरा क्षत्रिय आहे. हेच त्याचे कर्म आहेत.

त्यांची उत्पत्ती कशी झाली ?

ब्रम्हदेवाच्या शरिरातून मानवाची उत्पत्ती झाली आहे. ज्याचे चार वर्ण पडले. ब्राम्हण जे ब्रम्ह देवाच्या मस्तका पासुन तयार झाले. क्षत्रिय जे ब्रम्हदेवाच्या बाहुं पासुन तयार झाले. वैश्य जे ब्रम्हदेवाच्या जाघांपासुन तयार झाले व अखेरीस शूद्र जे ब्रह्मदेवाच्या पायांपासुन तयार झाले. चारीही वर्ण त्यांच्या कर्मांना धरुन योजिले होते. वर्ण तयार केल्यानंतर सामाजिक व धार्मिक रक्षणाचे कार्य हे क्षत्रिय वर्णावर सोपविण्यात आले.

सुर्यदेव आणि त्यांची पत्नी सरण्यु देवी यांचा पहिला पुत्र मनु पहिला क्षत्रिय राजा झाला. त्याच मनु राजाचे वंशज रघुकुलात जन्मलेले सुर्यवंशी पुरुषोत्तम भगवान रामचंद्र होते. पुढे त्याच कुलाचे वंशज महाभारतातले पांडव व कौरव देखिल होते. अगदी पुरातन काळापासुन क्षत्रिय वंशाचा ऱ्हास व उदय ही झाला. तिन्ही वर्णांचे व ह्या जगताच्या रक्षणाचे, पालनाचे कार्य ते युगोनयुगे करत आलेले आहेत. कालांतराने हि प्रथा लोप पावली पण काही क्षत्रिय वंशांनी एकनिष्ठ व कर्तृत्ववान पणे कर्तव्यपूर्ण राहुन हे कार्य आजतागायत केले.

त्याचे महत्व काय?

जर क्षत्रियांनी धर्माचे व जगाचे रक्षण केले नसते तर आज मी आणि तुम्ही इथे नसता. युगोनयुगे क्षत्रियांनी आपल्या जिवाची पर्वा न करता वारंवार ह्या जगाचे अनेक दैत्य, दानव आणि राक्षस अशा दुष्ट शक्त्यांपासुन संरक्षण केले आहे. "

हे बोलुन झाल्यावर नारायण गुरुजी थांबले आणि त्यांनी सुयुध्दकडे पाहिले. सुयुध्द त्यांची सांगितलेली एकुनएक गोष्ट अगदी मन लावुन ऐकत होता. त्याच्याही मनात गुरुजींच्या उपदेशाने काहुर माजले होते. नारायण गुरुजी सुयुध्दला पाहुन खुश दिसत होते. काही मनाशी ठरवत गुरुजी पुन्हा बोलु लागले.

" अगदी जवळपासचे उदाहरण द्यायचे झाले तर सुमन्यु त्रिनेत्री ह्यांचे उदाहरण देता येईल. तिन शतकांपुर्वी त्यांनी कालाशिष्ट या राक्षसाशी युध्द करुन त्याला पराजित करत नर्कात धाडले होते. आपले भाग्य थोर की आज त्यांच्याच खापर पंतु आपल्या सोबत आहे. ज्याने काही दिवसांपुर्वी एका महाकाय दानवास झुंज देऊन पुन्हा एकदा त्याच्या कुळाचे व परिवाराचे नाव गौरविले आहे."

गुरुजी इतकं बोलताच सर्व शिष्य सुयुध्दला पाहु लागले.
सुयुध्दला अशा रोखत पाहणाऱ्या नजरांची सवय नव्हती. पण एक गोष्ट त्याला नक्की कळली होती कि अशा नजरांचा सामना त्याला पुढे अजुन काही दिवस करावा लागणार आहे. गुरुजींनी पुढे सरकता त्यांना बऱ्याच श्लोक व पुराणांचे हवाले दिले. ज्यात वेळोवेळी क्षत्रियांनी धर्माचे, समाजाचे व जगाचे रक्षण कसे केले हे सांगितले. ज्यावेळी टेकडी वरच्या मंदिरातुन चार घंटानाद ऐकु आले तेव्हा नारायण गुरुजींचा तास संपवुन सुयुध्द पुन्हा मैदानात समीर व हर्षद बरोबर बाहेर आला. तेव्हा सुर्यनारायण बऱ्यापैकी वर आला होता. आठ वाजले होते.

उंच धिप्पाड माणुस मैदानाच्या मध्य भागी आला आणि म्हणाला.

" नविन शिष्यांनी पटापट पुढे या."

त्याचा आवाज अगदी भारदस्त आणि जाड होता. दिसायला तर तो अगदी एखाद्या पैलवाना प्रमाणेच होता. बाह्या नसलेल्या कफनीतुन त्याचे हात अगदी पिळदार दिसत होते. त्याच्या दंडावर बऱ्याच ठिकाणी जखमेचे निशाण होते. या आधी युध्दात त्याला ते मिळाले असावेत असं सुयुध्दला वाटले. शिष्यांच्या घोळक्यातुन नऊ दहा शिष्य पुढे आले ज्यात सुयुध्द आणि हर्षदही होते. दोन मुलींना सोडुन बाकी कोणीही नविन शिष्या मुलींमधे नव्हत्या. सगळे त्या उंच माणसा समोर जाऊन ऊभे राहीले. त्या माणसाने एक नजर सर्वांकडे पाहिले आणि शस्त्र ठेवलेल्या ठिकाणी वळला. त्या शस्त्रांच्या ढिगाऱ्यातुन त्याने काही काठ्या काढल्या आणि परत येऊन नविन शिष्यांकडे पाहिले व म्हणाला.

" हे घ्या. प्रत्येकाने आपला एक जोडीदार निवडा आणि जोडीने ऊभे रहा."

सुयुध्दने आजुबाजुला पाहिले. नविन शिष्यांनी पटकन एकएक करुन आपापल्या काठ्या गुरुजींच्या हातुन घेतल्या होत्या. सुयुध्द एकटाच शेवटी जाऊन त्याची काठी घेऊन आला. त्याला कळतच नव्हते कोणा बरोबर जाऊन ऊभे राहावे म्हणुन तो आहे त्याच ठिकाणी इतरांना पाहत ऊभा राहीला. नविन शिष्यां व्यतिरिक्त बाकीचे शिष्य आपापले गट करुन गुरुजींच्या आज्ञेची वाट बघत उभे होते. त्याच्या नव्या गुरुजींनी सुयुध्दला एकटं बघुन जवळ ऊभ्या नव्या शिष्यापैकी एकाला खुणावून जवळ बोलावले व म्हणाले.

" अभिषेक इकडे ये. तु आज पासुन सुयुध्दचा युध्द सोबती आहेस. ठिक आहे. "

" हो. गुरुजी. " अभिषेक पटकन बोलला.

अभिषेक साधारण अंगकाठीचा होता. सुयुध्द अन त्याची उंची सारखीच होती. त्याने सुयुध्दला पाहिले आणि म्हणाला.

" तुझं नाव सुयुध्द आहे ना?"

"हो...पण तुला कस माहीत?"आश्चर्यजनक पने सुयुध्दने विचारले.

" अरे आज सकाळ पासुन सगळीकडे फक्त तुझीच चर्चा आहे.." स्मित हास्य करत अभिषेक म्हणाला.

सुयुध्दने लक्ष न देता गुरुजींकडे पाहिले.

मल्हारी गुरुजी प्रत्येकाच्या जोडीला पाहत आपल्या हातात एक काठी घेऊन म्हणाले.

" तुमच्या हातात असलेली काठी हे एक शस्त्र आहे. त्याचा वापर जर योग्य रितीने केलात तर समोरच्या शत्रुच्या हातात कोणतेही शस्त्र असले तरीही तुम्ही त्याला हरवू शकता. तुम्हाला ह्या काठीचा शस्त्र म्हणुन कसा उपयोग करायचा हे मी आज दाखवणार आहे. तर… मी जसे करतो ते बघा आणि तसंच तुम्ही अदली बदली ने आपल्या जोडीदारा सोबत सराव करा. "

एवढ बोलुन त्यांनी मोठ्या शिष्यांपैकी एकाला त्यांच्या जवळ बोलावले. तो शिष्य आज्ञेचं पालन करत समोर ऊभा राहीला. मल्हारी गुरुजींनी नविन शिष्यांना काठीने तीन वार करणे आणि नंतर समोरच्याचे तीन वार रोखणे दाखवले. शिष्यांकडून त्यांनी एक एक करुन सराव करुन घेतला. सर्वजन बरोबर करत आहे हे पाहुन त्यांनी बोलावलेल्या शिष्याला त्यांच्या वर देखरेख करण्यास सांगितले आणि इतर शिष्यांना त्यांचे प्रशिक्षण देण्यास निघुन गेले.

अभिषेक बरोबर सराव करुन सुयुध्दला मजा येत होती. बऱ्यापैकी त्याला हे जमलं सुध्दा होते. हर्षद मात्र चुकत चुकत आपला सराव त्याच्या जोडीदारा बरोबर करत होता. त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी असलेला तो मोठा शिष्य आपले काम अगदी चोख करत होता. सुयुध्द आजुबाजुला बघत आपला सराव अगदी सहज करत होता. जसं काय त्याच्या अंगवळणीच ते पडलं असावं. अचानक अभिषेकने त्याच्या काठीच्या माऱ्याचा वेग वाढवला. पण सुयुध्दला त्याचा काही फरक पडत नव्हता. काय जाणे कुठुन एक काठी उडुन अभिषेक च्या दिशेने भिरकावली गेली. सुयुध्दने क्षणाचाही विलंब न करता आपल्या काठीने ती बाजुला सारून खाली पाडली. अभिषेक दचकुन थांबला. सुयुध्दने काठी येण्याऱ्या दिशेने पाहिले. बाजुला सराव करत असलेल्या हर्षदची काठी उडुन तिकडे आली होती.

" काय हर्षद? तुला एक महिना झाला आता. अजुन तुला काठी पकडणं जमलं नाही." अभिषेक खेकसतच म्हणाला.

" माफ कर. काठी हातातुन सटकली." हर्षद न अडखळता सलग बोलुन गेला.

सुयुध्दने आश्चर्याने डोळे विस्फारत त्याच्या कडे पाहीले.

" असं हो…हो….हो…..होतं कधीकधी..." म्हणत हर्षदने सुयुध्दला पाहिले.

" ठिक आहे. तु आपल्या सरावावर ध्यान दे. " सुयुध्द त्याला हात करत म्हंटला आणि हसुन आपल्या सरावात पुन्हा व्यस्त झाला.

थोडा वेळ सराव केल्या नंतर मल्हारी गुरुजींनी सगळ्यांना थांबण्यास सांगितले होते. त्यांनी नविन शिष्यांना इतर मोठ्या शिष्यांचं युध्द प्रात्यक्षिक पाहुन निरिक्षण करण्यास सांगितले होते. सगळी मुलं-मुली मैदानाला गोल वेढा घालुन बसली होती. काही जुने शिष्य गटानुसार एक दुसऱ्याशी सराव म्हणुन लढणार होते. गरुडध्वज आणि निलमध्वजच्या गटांना एकमेकांशी लढुन आता पर्यंतच्या सरावात जे काही शिकले ते दाखावायचे होते.

सुयुध्दला हे बघण्याची फारच उत्सुकता होती. मल्हारी सुर्यवंशी मैदानात मधोमध ऊभे होते. त्यांनी तीन-तीन मुलांचे गट करत गरुडध्वज आणि निलमध्वजच्या मुलांना मैदानात बोलावले आणि एकेकाला आपापला प्रतिस्पर्धी निवडुन त्याच्याशी लढायला सांगितले.

क्रमशः

भाग दहावा लवकरच..

________________________________________________

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही भाग टाकायला खुपच उशीर करता....!!! त्यामुळे कथेची लीन्क लवकर लागत नाही...!! यामुळे कथेतील इन्टरेस्ट आणि उत्सुक्ता टिकुन राहत नाही...!! प्लीज...., पुढचे भाग टाकायला जास्त वेळ लावु नका..!!

धन्यवाद सुर्यकांत भाग १० टाकला आहे. वाचत रहा. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. या पुढचे भाग अजुन लवकर सादर करण्याचा प्रयत्न करेन.