सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग -13

Submitted by Suyog Shilwant on 5 August, 2017 - 05:21

आजचा सामना सुयुध्दला जिंकायचा होता. त्याच्या गटाला दिशा दाखवायचे महत्वाचे काम तो आज करत होता. त्याच्या मनात आज हा सामना कसा जिंकता येईल ह्याचेच विचार घोळत होते. निलमध्वजने पाच ते सहा गट केले होते आज त्यांना गरुडध्वजला हरवायचेच होते. त्याच सोबत इतर गट पुढे पोहचणार नाहीत ह्याची ही खबरदारी त्यांना घ्यायची होती. सुयुध्द सोबत त्याच्या गटात 14 जणं होती ज्यात 4 मुली आणि 10 मुलं होती. झाडांच्या आडोशातुन लपत छ्पत एक-एक जण बरोबर सर्वीकडे नजर ठेवत पुढे जात होता. त्यांना तलावापासुन जंगलाच्या आत येऊन नुकतीच 20 मिनिटं झाली होती. त्याचे कपडे तलाव पार करताना भिजले होते. सुयुध्दने सर्वांवर एकवार नजर टाकली सगळ्यांचेच कपडे भिजलेले होते. त्याने मागे वळुन आजुबाजुला जमिनीकडे पाहिले. ओले असल्यामुळे त्याच्या कपड्याचे पाणी खाली पडत होते ज्याने जमिनीवरचा पाला पाचोळा भिजत होता व ते कुठे आहेत हे देखिल दाखवत होता. सुयुध्दच्या मनात पटकन एक विचार आला. त्याने सर्वांना त्याच्या जवळ बोलावले. सगळे जवळ येताच तो म्हणाला.

" आपले कपडे अजुनही ओले आहेत. ज्याने इतर गटांना आपले स्थान कळणे सोपे होईल. अग्नीतत्वाचा वापर करुन तुम्ही सगळे आपले कपडे सुकवुन घ्या. ज्याने आपल्याला ओल्या कपड्यांचा त्रासही होणार नाही आणि आपले स्थानही कळणार नाही."

समीर त्याच्या बाजुलाच उभा ऐकत होता. तो पटकन म्हणाला.
" मला तसाही ह्या ओल्या कपड्यांचा त्रास होतच होता. तु बरोबर बोलतोयस. चला रे पटापट आपले कपडे सुकवुन घ्या."

समीरने सांगितल्यावर लगेच सगळे एकमत होत आपले कपडे अग्नितत्वाचा वापर करुन सुकवु लागले. सुयुध्दने क्षणाचाही विलंब न लावता त्याचे कपडे शरीरातील अग्नितत्व वाढवुन सुकवुन घेतले होते. समीरला जसे त्याचे म्हणणे पटले तसेच इतरांना ही ते पटले होते. जेव्हा प्रत्येकाने सांगितल्याप्रमाणे केले तेव्हा पुन्हा ते सर्वजण परत पुढे जाण्यास निघाले. जंगलात झाडांच्या सावल्या गाठत ते हळु हळु पुढे सरकत होते. इतक्या आत येऊन सुध्दा अजुन त्यांना कोणाचे नामोनिशाण दिसत नव्हते. सुयुध्दने आजुबाजुला पाहिले अजुन कोणत्याही दिशेने कुठलाही आवाज येत नव्हता. सगळे गट आपल्या पुढे आहेत का अशी शंका त्याला वाटु लागली. अचानक त्याला तो जिथे उभा होता तिथुन पुढे काही अंतरावरुन चिमण्यांचा आवाज ऐकु आला. त्याला शंका वाटली म्हणुन त्याने झाडाच्या आडुन डोकावुन पाहिले. पुढे काही अंतरावर एका झाडाच्या फांदीवर काही चिमण्या चिवचिवाट करत होत्या. त्याने समीरला लगेच त्या दिशेने बोट दाखवुन पाहण्याचा इशारा केला. समीरने पाहीले व म्हणाला.

" चिमण्या आहेत..दुसरं काय?"

समीर एवढ बोललाच असेल की त्याच्या दिशेने एक बाण आला. समीर ज्या झाडाआड लपला होता त्या झाडाच्या बुंद्यात तो रुतला. सुयुध्दने त्याला गप्प राहण्याचा इशारा केला व त्याच्या पासुन जवळ उभ्या निलिमा देसाईला त्याने झाडावर चढुन पाहण्याचा इशारा केला. ती पटकन आवाज न करता झाडावर चढली. त्याचे लक्ष बरोबर तिच्यावर होते. ज्या दिशेने बाण आला होता. त्या दिशेला कोणीही नसल्याचे तिने सांगितले. सुयुध्दने पुन्हा एकदा वाकुन पाहिले पुढे कोणीच नव्हते. त्याने निलिमाला त्या दिशेला नजर ठेवण्यास सांगितले व स्वतः झाडाच्या आडुन बाहेर आला. त्याच्या हातात त्याने मेघराज तलवार घेतली होती. कोणी बाण मारला असेल असा विचार करत तो समोर पाहत होता. त्याला कोणीच दिसलं नाही त्याने दोन तिनदा खात्री केली. मागुन एक एक करुन समीर व अभिषेक ही त्याच्या सोबतीला तलवार घेऊन बाहेर आले. समीर सुयुध्दच्या बाजुला येऊन उभा राहिला व म्हणाला.

" कोणी दिसलं का तुला? कोणी मारला असेल रे बाण? मी जर त्या झाडाच्या आड नसतो तर तो बाण नक्कीच मला लागला असता."

" पण असं बाण मारण्याची तर परवानगी नाहीये ना."
अभिषेक म्हणाला.

" तुला मारण्यासाठी तो बाण मारलाच नव्हता. आपल्याला घाबरवून मागे थांबवण्यासाठी ते केलं होतं. ज्याने कोणी हे केलय तो नक्कीच हे जाणुन असणार की आपण तिथे लपलो आहोत."
सुयुध्द विचार करत समीरला म्हणाला.

" मग आता?" समीरने त्याला विचारलं.

" जाऊयात पुढे. कारण आपला जो कोणी प्रतिस्पर्धी आहे तो नक्कीच पुढे निघुन गेला आहे." सुयुध्द आजुबाजुला पाहत म्हणाला.

त्यांनी पुन्हा पुढे जायला सुरुवात केली. ह्यावेळी ते जास्त खबरदारी घेत पुढे जात होते. एका उतरनीला ते जसे लागले तसं सुयुध्दला पुढे एक दाट गवताने भरलेलं गोलाकार मैदान दिसलं. मधल्या भागात थोडाफार चिखल होता ज्यावर अजिबात कोणतही गवत नव्हतं. मैदानाजवळ ते पोहचलेच होते की एक डुक्कर धावत त्या मैदानाकडे गेलं. बारीक गवत खायला म्हणुन ते मैदानात शिरलं होतं. सुयुध्द अगदी लक्षपुर्वक हे बघत होता. अचानक ते डुक्कर जोरजोराने ओरडु लागले. त्याचे पाय आत धसत चालले होते. जसजसा त्या डुकराने बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तसतसं तो अजुनच आत जात होता. त्या डुकराला बघुन त्यांना एक गोष्ट कळली होती. समोर जे मैदान दिसत आहे ती एक दलदल आहे. सुयुध्दने सर्वांना थांबवले व म्हणाला.

" समोर दलदल आहे. तेव्हा इथेही आपल्यावर लपुन हल्ला होऊ शकतो. समीर तु ह्या सर्वांना आपापली जागा घ्यायला सांग."

समीरने एकेकाला आपापली शस्त्र तयार ठेवण्यास सांगितले. सुयुध्दने तोवर भुमिज्ञान विद्येचा वापर करुन दिशा पाहिली. ते योग्य दिशेने जात होते. त्यांच्या पुढे ही दलदल पहिली बाधा होती. हिला कसे पार करावे हे सुयुध्दला कळत नव्हते. तेव्हा त्याला आठवतं की समीरने त्याला एकदा दलदलीचा किस्सा सांगितला होता. त्याने समीरला जवळ बोलावले व म्हणाला.

" समीर तु ह्या आधी ही दलदलीचा वापर शंखध्वज गटाला अडकवण्यासाठी केला होतास ना?"

" हो. मग त्याचं काय इथं?" समीर हे म्हणालाच असेल की तो हसु लागला आणि म्हणाला.
" अच्छा…लक्षात आलं माझ्या. जर मी दलदल बनवु शकतो तर ह्या दलदलीला पंचतत्व विद्या वापरुन आपण कडक सुध्दा करु शकतो. ज्याने आपल्याही ही दलदल पार करता येईल. "

" हो. मग करुयात का आपण?…" सुयुध्द हसतच त्याला म्हणाला.

सुयुध्द, समीर, अभिषेक व दोन जणं अजुन घेऊन त्यांनी जमिनीवर हात लावले. एकेक करुन प्रत्येक जण मंत्राचा जाप करत होता. हळुहळु दलदलीचा चिखल जमिनीत रुपांतरीत झाला. गवताच्या दलदलीजवळ अडकलेला तो डुक्कर आता ओरडायचा थांबला होता. काही शिष्यांनी जाऊन त्याच्या बाजुच्या मातीत आपले भाले रोवले आणि त्या डुकराची सुटका केली. दलदलीचा तो भाग आता चालण्यास योग्य होता हे सिध्द झाले होते. सुयुध्दने समीरला टाळी देत पुढे जायचे ठरवले. दलदलीचं ते मैदान त्यांनी पार केलं तेवढ्यात त्यांच्या मागुन त्याला कोणाच्या बोलण्याचा आवाज ऐकु आला. कदाचित दुसऱ्या गटाचे शिष्य आपल्या मागे आहेत हे त्यांना कळलं. त्यांनी पटापट मैदान पार केलं आणि झाडाच्या मागे लपले. सुयुध्दने झाडाच्या आड लपुन पाहिलं मागे शंखध्वज गटाचे काही शिष्य होते. पण ते दलदलीच्या मैदानात येणाऱ्या उतरनीवर आलेच नाही ते सरळ दुसरी कडे निघुन गेले. सुयुध्द सोबत इतरांनीही सुटकेचा निश्वास टाकला व पुढे जायला ते तयार झाले. सुयुध्द विचार करत होता कि कुणी एक गट नक्कीच त्यांच्या पुढे होता.

"काय झालं एवढा कसला विचार करतोयस?"
सुयुध्दला असं विचारात पाहुन समीरने त्याला विचारले.

" मी विचार करतोय की आपल्या पुढे नक्कीच कोणीतरी आहे. पण कोण असेल ते कळत नाहीये."
सुयुध्द चालता चालता त्याला बोलला.

" कोण असणार..गरुडध्वज.. अजुन कोण असु शकणार आहे." समीर एकदम विश्वासाने म्हणाला.

" हं… मग तर आपल्याला अजुन लवकर चालायला हवं. कारण ते आपल्या पुढे आहेत आणि या वेळी त्यांना आपण जिंकु द्यायचं नाही." सुयुध्द समीरला बघत ठामपणे म्हणाला.

" हो. तु बरोबर म्हणतोस." समीर म्हणाला.

" गरुडध्वज बरोबर इतरही गट आहेत हे विसरु नका."
मधेच अभिषेक म्हणाला.

" हो. आताच आपण मागे शंखध्वज गटाला सुध्दा पाहीले."
समीर सुयुध्दकडे बघत म्हणाला. एवढ बोलुन त्यांनी पुन्हा चालायला सुरुवात केली होती.

बराच वेळ चालत चालत त्यांनी बरचसं अंतर कापलं होतं. ते सगळे थकले होते. एका मोठ्या झाडच्या सावलीत ते सर्वजण जाऊन थांबले. सुयुध्दने आकाशाकडे पाहिले सुर्य आता बराच वर आला होता. सकाळची वेळ आता सरायला आली होती तरी मध्यान होण्यास अजुन थोडावेळ बाकी होता. उन्हाची रग वाढलेय असेच दिसत होते. ज्या झाडाखाली ते थांबले होते ते एक आंब्याचे जुने झाड होते. त्या झाडाचा खोड खुपच रुंद होता आणि त्याच्या फांद्या तर चारी बाजुला पसरलेल्या होत्या. वर बघताच सुयुध्दला झाडाला काही आंबे लागलेले दिसले. त्याच्या मनात झाडावर चढुन आंबे तोडायची इच्छा झाली. बाकीचे ही काही थकल्या सारखेच दिसत होते म्हणुन सावलीत बसुन आराम करत होते. सुयुध्दने समीरला पाहिले व म्हणाला.

" ए..बघ ना. वर आंबे आहेत. मी तोडु का? मला खुप इच्छा झाली आहे."

आंबे नाव ऐकले आणि समीर पटकन उठुन बघु लागला. सुयुध्दला इतकं पाहुन रहावलं नाही म्हणुन तो झाडावर चढला. मागोमाग समीर ही चढला. त्याला पाहुन गटातले काही जणही चढले. सुयुध्दने एका फांदीवर चांगले मोठे पिवळसर आंबे पाहिले. ते काढण्यासाठी म्हणुन तो पुढे सरसावला व त्याने ते चार आंबे तोडले सुध्दा. त्याच फांदीवर बसुन त्याने दोन भलेमोठे आंबे फस्त केले. आजुबाजुला नजर टाकत त्याने अजुन दोन चार आंबे तोडुन घेतले व खाली उतरला. खाली येऊन त्याने इतरांना पाहीले. झाडावर चढलेल्यां पैकी कोणीतरी बरेच आंबे खाली पाडले होते. प्रत्येकाकडे खाण्याजोगा एक तरी आंबा होता. आंबे खात खात प्रत्येकजण गप्पा मारत बसले होते. सुयुध्दला विश्वेश्वरम गावात राहात होता ते दिवस आठवले असाच तो आपल्या मित्रांसोबत गप्पा मारायचा. असाच तो झाडावर चढुन फळं तोडायचा. पण आता परिस्थिती वेगळी होती तो आता आश्रमात होता आणि त्याने आता एका सामन्यात भाग घेतला होता. त्याला हा सामना जिंकायचा होता. त्याला त्याचं प्रशिक्षण पुर्ण करायच होतं. त्याला स्वतःला सिध्द करायचं होतं. आताची परिस्थिती पुर्ण बदलुन गेली होती. आपल्याच विचारातुन बाहेर येत त्याने बाजुला आंबे खात बसलेल्या समीरला पाहिलं व म्हणाला.

" समीर…"

"हं…" आंबे खात खात समीर उदगारला.

" आपल्याला जायला हवं. आपण खुप वेळ इथे थांबलो आहोत." सुयुध्द गांभिर्याने म्हणाला.

समीरला समजले तो काय म्हणत आहे. त्याने सर्वांना आटपायला सांगितलं. आपली भुक भागवुन ते पुढे निघाले.
काट्याकुट्यातुन वाट काढत सुयुध्द त्यांना योग्य दिशेला नेत चालला होता. मध्यान झाली होती सुर्य डोक्यावर तळपत होता. जंगलाच्या झाडांचा आडोसा घेत घेत ते एका वाहत्या ओढ्याजवळ येऊन पोहचले. तहानेने व्याकुळ अनेक प्राणी त्या ओढ्यालगत आलेले. सुयुध्दला चांगलीच तहान लागली होती. त्याचे साथीदार सुध्दा तहानलेले होते. समीरने तीन जणांना आजुबाजुला नजर ठेऊन पहारा द्यायला सांगितला. बाकिच्यांना पाणी पिण्यास सांगुन तो सुध्दा पहाऱ्याला उभा राहिला. सुयुध्दने खाली वाकुन ओंजळीत पाणी घेऊन आपलं तोंड धुतलं आणि गटागटा पाणी प्यायला. तहान भागल्यावर त्याने ओढ्याच्या बाजुला एका झाडाशी आपली पाठ टेकवली. सावलीत बसुन त्याने पुढे काय करावे ह्याचा विचार करायला सुरुवात केलीच होती की त्याला पुढे काही अंतरावर झाड्यांच्या मागे हालचाल दिसली. तो जिथे बसला होता त्याच्या पुढ्यात दाट झुडपं असल्याने त्याला निट दिसलं नाही म्हणुन तो उभा राहिला. समोर काही अंतरावर गरुडध्वज गटाचे दोन मोठे शिष्य आपसात बोलत होते. त्यांच्या पासुन अजुन पुढे काही अंतरावर त्याला अजुन काही मुलं दिसली. सुयुध्द पटकन मागे वळला. त्याने समीर व बाकिच्यांना ही खबर दिली. समीरने त्याच्यांवर नजर ठेवुन ते काय करत आहेत हे पाहण्याचे सुचवले. तसे सगळे दडी धरुन बसले. त्यांच्यापासुन अगदी चाळीस फुटावर गरुडध्वजचे शिष्य पाठमोरे उभे राहुन काही बोलत होते. समीरने सुयुध्दला व अभिषेकला आपल्या सोबत घेतले आणि त्या दोन्ही गरुडध्वज शिष्यांना आपला पत्ता लागु न देता बाजुला असलेल्या एका झाडामागे जाऊन पुढे काय चाललं आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. सुयुध्दने कपिल व अश्विनी ह्या दोघांना पाहिले. समीरही त्याच्या सोबत हे सर्व दृश्य पाहात होता. दोघांनी नजरानजर करुन काय ते समजुन घेतले होते. गरुडध्वज आणि त्यांचा आता सामना होणार का असे सुयुध्दला वाटले. त्याने पुन्हा समोर उभ्या कपिलला पाहिलं तो अश्विनीशी काही बोलत होता. भली गंभिर चर्चा दोघांमध्ये चालु होती. दोन चार मिनिटं बोलल्यानंतर अश्विनी कपिलला काही सांगत एका दिशेला निघुन गेली. कपिलने त्याच्या सोबत्यांना जवळ बोलावलं आणि त्यांना एक एक करुन जागा घ्यायला सांगितली. पुढे जे झालं ते सुयुध्द डोळे फाडुन पाहतच राहिला. कपिलने मायवी शक्तीचा वापर करत एक भलामोठा भयानक असा दिसणारा वाघ प्रकट केला होता. प्रकट होताच वाघाने एक डरकाळी फोडली. सुयुध्द सोबत समीर व अभिषेकचा नुसता थरकाप उडाला होता. हा वाघ म्हणजे इतर गटांना घाबरवून मागे थांबवण्यासाठी रचलेला एक सापळा होता. सुयुध्दने त्या वाघाला पाहताच समीरला परत जाण्याचा इशारा केला. हळूहळू ते सावधानता बाळगत तिथुन निघाले. सुयुध्दला त्या वाघाच्या डोळ्यात एक भयानकता दिसली होती. आपल्या गटाच्या सवंगड्यांचा जिव असा धोक्यात न घालता त्याने समीरला त्या दिशेने न जाता दुसऱ्या दिशेने जाण्यास सुचवले होते. गटातल्या सर्वांना पुढे काय संकट आहे हे इतक्यात कळलंच होतं. सगळे सुयुध्दच्या निर्णयाशी सहमत होते. त्यांनी आपली शस्त्र पुन्हा सज्ज करुन दुसऱ्या बाजुने जायचे ठरवले. आहे त्या ठिकाणाहुन त्यांनी गरुडध्वजच्या गटाची नजर चुकवत दुसरा मार्ग निवडला. त्यांनी तेवढ्या भागास वळसा घालुन पुढे जायचे ठरवले. सुयुध्दने हा सल्ला देण्याचे कारण फक्त एकच होते कि अश्विनी ध्वजखांबा पर्यंत पोहचण्या आधी त्यांना पुढे जात राहणे भाग होते. जर ते ह्याच मार्गाने गेले असते तर त्यांना त्या वाघाशी व कपिलशी सामना करावा लागणार होता ज्यात त्यांचा अमुल्य वेळ वाया जाणार होता.

त्यांनी एक दिशा निवडली व त्या दिशेने ते निघाले. गटातले काही जण घाबरले होते पण समीरने त्यांना धीर दिला. तो आणि सुयुध्द मागे राहुन पाहनी करतील असे सांगितले होते. काही अंतर कापल्यानंतर त्यांना मागुन कोणाचा आवाज ऐकु आला. समीरने सगळ्यांना लपण्यास सांगितले. सुयुध्दने एका झाडामागे लपुन मागे कोण येत आहे हे पाहिले. त्याला काही अंतरावर अश्वध्वज गटाचे शिष्य दिसले. हा तोच गट होता ज्यात हर्षदही होता. अगदी 7-8 जणांचा तो गट त्याच दिशेने चालला होता जिथे गरुडध्वजने खतरनाक सापळा रचला होता. सुयुध्दला हर्षद त्या दिशेला जाताना पाहुन राहावले नाही. तो इतरांना काही न बोलता त्या दिशेने धावत गेला. समीरने हे पाहिले व तो ही त्याच्या मागे धावला. ज्या ओढ्याजवळ त्यांनी पाणी पिले होते त्याला पार करुन अश्वध्वजचा गट सापळ्यात पुर्णत: अडकला जाणार होता. धावत धावत सुयुध्द त्यांच्या अगदी जवळ पोहचला व तो ओरडुन त्यांना सावध करणार इतक्यात समीरने त्याचे तोंड दाबुन त्याला खाली पाडले. एका झाडामागे सुयुध्दला पकडून त्याने बसवले व आवाज मोठा होणार नाही अशा स्वरात तो सुयुध्दला म्हणाला.

" तु वेडा आहेस का?"

सुयुध्दने त्याला बाजुला ढकलले व म्हणाला.
" अरे पण हर्षद आपला मित्र आहे. त्याला काही झाले तर.."

" मला माहित आहे. पण सुयुध्द हा सामना आहे. इथे मित्र शत्रु याची परिभाषा वेगळी आहे. तो गट आपला नाही. प्रत्येकाला आपला सामना स्वतः लढायचा आहे." समीर त्याला समजावत म्हणाला.

समीरला असं बोलताना पाहुन सुयुध्दला खुप राग आला होता. त्याला कळत नव्हते तो असं का बोलत आहे.

" हे बघ सुयुध्द तुला जर खरच असं वाटतं की आपण हा सामना जिंकावा तर आता माझ्यासोबत परत चल. ते बघुन घेतील त्यांचं.." समीरने त्याला म्हंटले.

सुयुध्द समीरकडे थक्क होऊन पाहत होता. अचानक त्याला मागुन वाघाच्या डरकाळीचा आवाज आला. सुयुध्दने वळुन पाहिले हर्षद सोबतच बाकिचे त्या वाघाच्या व गरुडध्वज च्या तावडीत आयतेच सापडले होते. समीरचे ही त्याकडे लक्षं गेले. सुयुध्दने पाहिले कि वाघ त्या अश्वध्वजच्या गटाला खुनशी नजरेने पाहत त्याच्या जवळ जात होता. अश्वध्वजच्या त्या घाबरलेल्या मुलांचे चेहरे हे स्पष्ट सांगत होते कि त्यांना वाघाचा सामना करता येणार नव्हता. अचानक त्या भयानक दिसणाऱ्या वाघाने एक जोरदार डरकाळी फोडली. तसे ते घाबरलेले शिष्य सैरावैरा पळु लागले. कोणी झाडावर चढले तर कोणी लपायला जागा शोधू लागले. हे कमीच होते की काय त्यात भर म्हणुन गरुडध्वज गटाने त्यांच्यावर हल्ला चढवला. बावचळलेले ते सर्व समजुच शकले नाहीत कि काय झाले. सुयुध्द झाडा आडुन हे सर्व पाहत होता. समीरने त्याचा हात जोरात पकडून ठेवला होता. सुयुध्दला काय करावे हे सुचत नव्हते त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट घोळत होती की त्या वाघाला हरवुन हर्षदची सुटका करायची. हर्षदच्या सोबत त्याच्या साथीदारांना सुध्दा कपिलने एव्हाना एका झाडाला दोरीने बाधुन बंदी केले होते. अचानक त्याने हर्षदला समोर उभ्या वाघाच्या समोर ढकलले तो खाली पडला. सुयुध्दला रहावले नाही तो रागाने उठला पण समीर त्याच्या आधी धावत पुढे गेला होता. धावत धावत समीर हर्षद जवळ पोहचला. त्याला असं जाताना पाहुन सुयुध्द आहे त्याच जागी आश्चर्य करत बघत राहीला. समीर तर त्याला इतका वेळ थांबवत होता मग आता का तो असा वागला सुयुध्दला कळले नाही. समीरच्या असं अचानक जाण्याचा कपिलला फायदाच झाला. कपिलने कुत्सितपणे हसत त्या दोघांना पाहिले व वाघा कडे पाहिले. अचानक वाघाने आक्रमक होत एखाद्या सावजावर झडप मारतो तशी हर्षदवर मारली. हर्षद घाबरुन जोरात ओरडला. समीरने हर्षदला वाचवण्यासाठी हातातल्या तलवारीने वाघावर वार करण्याचा प्रयत्न केला पण हर्षदला लागेल कि काय म्हणुन हात थांबता घेतला. आता वाघाने हर्षादच्या छातीवर पाय ठेवला होता. हर्षद अक्षरश: कापत होता. कपिल व त्याचे साथी हे सर्व पाहुन जोरजोरात हसत होते. हे पाहुन सुयुध्दला आपला राग अनावर झाला व तो थेट त्यां दोघांना वाचवायला पुढे सरसावला. त्याच्या निळ्या डोळ्यात जशी काय आग भरली होती. सुयुध्दने धावत पुढे जाऊन त्या वाघाला एक जोरदार धडक दिली वाघ उडतच बाजुला जाऊन पडला. अचानक त्याच्यावर कपिलने तलवारीने हल्ला केला. पण सुयुध्दने आपली कमरेला लटकती मेघराज तलवार तेवढ्यात बाहेर काढुन त्याचा वार अडवला होता. सुयुध्दच्या मेघराजचा एक जोराचा फटका कपिलच्या तलवारीने झेलला व त्याची तलवार तुटली. कपिलने आश्चर्याने आपल्या तुटलेल्या तलवारीकडे पाहिले. त्याला विश्वास बसत नव्हता असं कसं काय घडलं. दुसऱ्याच क्षणी सुयुध्दने कपिलच्या मानेवर तलवार धरली होती. कपिलने हातातली तुटलेली तलवार खाली टाकली व हात वर केले. सुयुध्दच्या डोळ्यात भरलेला राग पाहुन कपिल हळुहळु मागे सरकत एका झाडाला टेकला. अजुनही सुयुध्दची तलवार त्याच्या मानेवरच होती. सुयुध्दने रागात त्याला म्हंटलं.

" पुन्हा जर तु माझ्या मित्रांबरोबर असं काही केलंस तर तुला जिवंत सोडणार नाही."

कपिलचे साथी एव्हाना पळुन गेले होते. सुयुध्दला लढताना पाहुन त्यांनी पोबारा केला होता. कपिल घाबरला व त्याला म्हणाला.

" अरे मी तर मज्जा करत होतो त्या दोघांची."

सुयुध्दने रागाने भरलेले डोळे कपिलवर रोखत त्याला विचारले.
" मज्जा...? ते दोघे तुला हसताना दिसतायेत का?"

" नाही पण मी त्यांना काही होऊच दिले नसते."

कपिल एवढं बोललाच होता की सुयुध्दने ज्या हातात तलवार पकडली होती अचानक त्यावर एक बाण येऊन आधळला. गरुडध्वजच्या धनुर्धरांपैकी एकाने लांब अंतरावरुन तो बाण मारला होता. सुयुध्दने त्या दिशेला आपली नजर वळवली. त्या दिशेने आणखीन काही बाण आले. आपल्या मेघराज तलवारीने एकेक बाण सुयुध्द अगदी सराईतपणे रोखत होता. मेघराज तलवारीच्या तिक्ष्ण धारे समोर व सुयुध्दच्या तलवारबाजी समोर ते येणारे बाण अगदीच विफल ठरले. सुयुध्दने कपिलला पाहण्यास म्हणुन आपली नजर फिरवली तर कपिल तिथे नव्हता. सुयुध्दचे लक्ष हटताच त्याने पळ काढला होता.

सुयुध्दने आपली तलवार हातात धरुन भगवान शंकराचे आभार मानले. अजुन कोणता छुपा हल्ला होत तर नाही याची खात्री केल्यावरच तो हर्षद व समीर कडे वळला. त्याने एक नजर हर्षदला पाहिले. तो अजुन भितीने कापतच होता. समीर त्याच्या बाजुला बसुन त्याला समजवत होता. ना समीरला कसली इजा झाली होती ना हर्षदला. हर्षद घाबरला होता इतकच. त्याला समीर काय बोलतोय हे देखील कळत नव्हते. समोरची परिस्थिती बघता सुयुध्दने समीरला म्हंटले.

" समीर… तु पहिले अश्वध्वजच्या मुलांना सोडव. मग आपल्या गटाला इथे बोलवुन घे."

काही न बोलता समीर चटकन उठला व बंदी केलेल्या अश्वध्वजच्या मुलांना सोडवायला गेला. सुयुध्द खाली बसला व त्याने हर्षदच्या कपाळाला हात लावला. डोळे मिटून तो "ॐ नमो शांती ही"असा जप करु लागला. अगदी थोड्याच क्षणात हर्षद शांत झाला. एव्हाना समीरने अश्वध्वजच्या मुलांची सुटका केली होती व आपल्या गटाच्या सोबत्यांनाही बोलावून घेतलं होतं. सुयुध्दने डोळे उघडले व उभा राहिला. त्याने समीर कडे पाहिले व म्हणाला.
" जा. ह्याला पाणी आणून पाज."

समीर पटकन ओढ्याच्या दिशेने गेला. अश्वध्वज गटाचा गटनायक भरत तांबडे सुयुध्दला अचंबित होऊन पाहत होता. मुलांच्या घोळक्यातुन बाहेर येत त्याने सुयुध्दशी बोलण्याचा प्रयत्न केला पण सुयुध्दने त्याला हात दाखवत थांबवले. मुलांच्या गराड्यातुन बाहेर निघत त्याने त्या दिशेला पाहिले ज्या दिशेला त्याने वाघाला ढकलले होते. जसा कपिल गायब झाला होता तसाच तो वाघ ही दिसेनासा झाला होता. गंभिरपणे त्याने मागे वळुन भरतला पाहिले. हिच योग्य वेळ असेल असे समजत भरत तांबडे पुढे येऊन त्याला हात जोडत म्हणाला.

" खुप खुप धन्यवाद आमची मदत केल्याबद्द्ल"

" मदत कसली ?.. मी तर माझ्या मित्राचा जिव वाचवण्यासाठी हे केलं."
सुयुध्दच्या गंभीर चेहऱ्यावर एक स्मित हास्य खुललं होतं.
जवळ येत भरतने त्याचे हात धरले व म्हणाला.

" तु माझा आणि माझ्या सोबत्यांचा जिव वाचवला आहेस. तुझ्या जागी जर दुसरं कोणी असतं तर आम्हाला असंच सोडून पुढे निघुन गेलं असतं. तुझे हे उपकार मला आजन्म फेडता येणार नाहीत. पण त्या बदल्यात मी आणि माझा संपुर्ण अश्वध्वज गट ह्या सामन्यात आतापासुन तुझ्या सोबत आहोत."

सुयुध्दने काही बोलायच्या आत भरतने त्याच्या सोबत्यांपैकी एकाच्या झोळीतुन एक पोपट बाहेर काढला. पोपटाला संदेश देत त्याने उडवुन लावले. सुयुध्दने पहिल्यांदाच बोलका पोपट पाहिला होता. समीर ही हे सर्व पाहत होता.
सयुध्दच्या बाजुला जाऊन त्याने हळुच म्हंटले.

" खरं तर तुलाच आपल्या निलमध्वज गटाचा गटनायक असायला हवं. मी माझा पदभार आता तुलाच सोपवत आहे. आपल्या ह्या लहानशा गटाचं नेतृत्व तुच कर. आम्हा सर्वांना खात्री आहे तु योग्य मार्गदर्शन करशील."

नको नको म्हणत सुयुध्दला सर्वांनी तयार केले. आता त्यांचा गट बराच मोठा झाला होता.14 जणं निलमध्वजची आणि 12 जणं अश्वध्वजची असे मिळुन 26 जण झाले होते. अश्वध्वज गटानेही निलमध्वजच्या सोबतच पुढे जायचा निर्णय घेतला होता. हर्षदही आता बरा होता. त्याच्या चेहऱ्यावर आता जास्त आनंद दिसत होता कारण सुयुध्द व समीर ह्यांच्या सोबतच त्याला सामना पुर्ण करायला भेटत होता. सुयुध्दला मिठी मारुन हर्षदने प्राण वाचवल्या बद्दल विशेष आभार ही मानला होता.

पण सुयुध्दच्या डोक्यात मात्र पुढे कशाशी सामना करावा लागेल हेच चालले होते. दिशेची शहानिशा करुन त्याने पुढे जायचे ठरवले. सुयुध्दच्या सांगण्या नुसार सर्वांनी आपली जबाबदारी व शस्त्र सज्ज केली. हळु हळु ते मध्यान सरता पुढे जंगलात शिरले…

क्रमश: …

पुढचा भाग लवकरच…

लेखक : सुयोग शिलवंत.
________________________________________________

Group content visibility: 
Use group defaults

chan lihita, khup vat pahavi lagli भाग -13 va vachnyasathi.
pudhil bhag kadhi yenar...

पुढील दोन दिवसात पुढचा भाग सादर असेल. उशीर केल्या बद्दल क्षमा असावी. पुढिल सर्व भाग नियमित 3-4 दिवसांनी टाकत जाईन. कथा वाचत रहा...

एकंदर खूप मोठा गॅप ह्या व आधीच्या भागात असल्याने मागील सर्व भागांची ईथे सुरवतीस लिंक दिली तर नविन वाचकास कथेची पार्श्वभूमी समजून पुढील कथानकाची सुसंगता गवसेल

वेलकम बॅक
पुभाप्र

सुयुद्ध त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा

या कथेचे आतापर्यंतचे सर्व भाग इथे पोस्ट केले आहेत नविन वाचकांनी जरुर वाचा.

https://www.maayboli.com/node/58973 bhag 1

https://www.maayboli.com/node/58986 bhag 2

https://www.maayboli.com/node/59017 bhag 3

https://www.maayboli.com/node/59054 bhag 4

https://www.maayboli.com/node/59125 bhag 5

https://www.maayboli.com/node/59203 bhag 6

https://www.maayboli.com/node/59294 bhag7

https://www.maayboli.com/node/59516 bhag 8

https://www.maayboli.com/node/61185 bhag 9

https://www.maayboli.com/node/61386 bhag 10

https://www.maayboli.com/node/61462 bhag 11

https://www.maayboli.com/node/61498 bhag 12

वाह...क्या बात है...मस्त आहे हा भाग...मला खुप आवडला...लवकर येऊ द्यात पुढचे भाग.
पु. ले. शु.
पु. भा. प्र.