निसर्गाच्या गप्पा (भाग ३२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2017 - 05:46

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,

"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "

खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,

" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "

अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्‍या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्‍याला भिजवणं. अनंत आठवणी!

"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्‍या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्‍या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्‍या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. Happy सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,

"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "

निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.

वरील मोगर्‍याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सायुरी मस्त हिरवेगार फोटो.

आज छान उन पडल्याने सगळी फुले टवटवीत ऊमलली आहेत. असे दोन फुलले आहेत.
20170901_070512.jpg

टिना मस्त आहेत ग फुले. गावठी गुलाबांचा गुलकंद घरी करुन पहायचा आहे. तसेच गुलाबाच्या पाकळ्या सुकवूनही हल्ली त्याचा खाद्य पदार्थात उपयोग करतात त्यासाठीही सुकवून पहाय्ला हव्यात.

हा माझ्याकडील एक छोटा गावठी गुलाब.
20150702_075650.jpg

इथल्या गप्पा परत थंडावल्या की! देशी गुलाब मस्तच!

पुण्या़पासून साधारण २५ किमी अंतरावर पानशेतच्या रस्त्याला श्री प्रमोद नारगोळकर यांनी बनवलेलं एक जंगल आहे - इथे जमीन विकत घेऊन श्री नारगोळकरांनी तिथे देशाच्या वेगवेगळ्या भागातली झाडं आणून लावलेली आहेत. दुर्दैवाने २००४च्या त्सुनामीमध्ये निकोबारमधील टर्टल आयलंड बेटावर गेलेले नारगोळकर बेपत्ता झाले. त्यांच्या पत्नी नयना नारगोळकर हे जंगल सांभाळत आहेत. या जंगलाविषयी मागे ऐकलं होतं, पण नेमका पत्ता / फोन नंबर वगैरे नव्हते. गेल्या महिन्यात फेसबुकवर याविषयी वाचनात आलं, आणि या आठवड्यात अचानक इथे जायची संधी मिळाली. साधारण १२ - १५ एकराची तरी जागा असेल ही. शेंदूर, दक्षिण मोह, उत्तर मोह, रिठा, वावळ, समुद्रफळ, समुद्री अशोक / कुंभी, रुद्राक्ष, मोरावळा, पळस, पांढरा पळस, पळस पांगारा, कृष्णवड, मुचकुंद (मुचकुंदाचं रान झालंय!), रोहितक, पुत्रंजिव, चंदन, काळा कुडा, टेंभुर्णी, पारस पिंपळ, किनई, मोठ करमाळ, कांचन, आपटा, मोहोगनी, शिसव, साग, रामफळ, सिताफळ अशी केवढी तरी झाडं भेटली इथे. लेकीला आणि तिच्या आजीला हे जंगल दाखवायचं होतं. त्यामुळे माझे दोन्ही हात बांधलेले होते, फोटो काढायला फारसा वाव नव्हता. अगदी मोजके फोटो काढलेत त्यामुळे. ते अपलोड झाले की इथे लिंक देते.
जरा शांतपणे गेलं, तर भरपूर पक्षी आणि फुलपाखरंही बघायला मिळतील. या जागेविषयी थोडी माहिती इथे आहे:
http://www.mid-day.com/articles/the-real-forest-gump/157982
आम्ही गेलो तेंव्हा तिथे नयनाताई होत्या. त्यांनीच थोडक्यात माहिती सांगितली, चहा झाला. मग साधारण २ तास आम्ही त्यांच्या माणसासोबत जंगलात फिरत होतो. "तिथे असणारी ७५% झाडं मला ओळखता येतात, मी सर होते तेंव्हापासून इथे काम करतोय." असं तो म्हणाला. कुठल्याही झाडाची माहिती सांगतांना त्याची फुलं, फळं असे फोटोही लगेच त्याला मोबाईलवरून दाखवता येत होते. त्यामुळे फिरायला खूपच मजा आली. इथे पूर्वसुचना देऊन गेलं तर जेवायची सोयही होऊ शकते. (जातांना अंगभर कपडे घालून आणि ओडोमॉस लावून जायची खबरदारी मात्र घ्यायला हवी - जंगल, त्यात पक्ष्यांसाठी जागोजाग पाण्याची सोय, त्यामुळे भरपूर डास होते! )

धन्यवाद वर्षा.
इथे तुमचे अनुभव तर शेयर कराच पण इतर ठिकाणी मिळालेली, वाचलेली माहीतीही शेयर करुया.

सगळेच फोटो मस्त..

जागुले, पक्षी तुझ्याचसाठी पोझ देऊन बसतात असं वाटत मला नेहमी.. हा फोटो इपिक आहे..
मस्त फोकस केलयस गं..
तो चिमणा त्या शुष्क चाफ्याच्या काडीवर मान वळवून बघताना मस्त वाटतोय..अन त्या चाफ्याच्या चार फुलांनी तर चार चांद लावलेयत..
चुम्मेश्वरी एकदम..
वॉटरमार्क टाक यावर आठवणीने..
फांदीच्या खाली टाक आणि जरा ट्रान्सपरंट टाक म्हणजे फोटोची मजासुद्धा येईल आणि तो चोरीलापन जाणार नाही..

जागुताई मला फुले खुप आवडतात, जाण नाही आहे ईतकी पण तरीही खुप प्रसन्न वाटते फुलांना बघुन.

गुलाब अन पारीजात जास्त आवडतात.

माझ्या रोजच्या वाटेत एक पारीजात , तगर अन डबल तगर चे झाड आहे, दररोज सकाळी तगर आणी पारीजातचा ईतका सुंदर सडा पडलेला असतो ना.
खुप छान वाटते त्यांच्यामुळे, मजा तर तेव्हा येते जेव्हा खुप फुले खाली पडलेली असतात अन त्यांच्यावर पाय न टाकता चालायचा प्रयत्न असतो . तरीही खास या फुलांना बघायला मी पायी जाते कितीही ऊशिर झाला तरी

अन हो टीनाने सांगीतल्या प्रमाणे वॉटर मार्क टाका वरच्या फोटोत, खुप सुंदर आलाय तो

वर्षा तू लिहीलेल वाचताना डोळ्यासमोर दृश्य उभ राहील आणि छान वाटल. तू पहिल्यापासून धागे वाचलेस तर तुला बर्‍याच झाडांची ओळख होईल.
वॉटरमार्क दिला.

कऊ माझे काही लिखाण ह्या ब्लॉग मधे आहे.
http://prajaktamhatretarangmaniche.blogspot.in/

हा एक रानफुलांवरचा ब्लॉग. ह्यात अजून बरच अपडेट करायच आहे.
http://ranfulanchyaranvatevar.blogspot.in/

एकदा डाळींबाचे रात्रभर उघडेच राहीलेले दाणे एका कुंडीत टाकले होते. ते खाण्यासाठी आलेली खारूताई.

सुप्रभात.
आज जेवण करताना खिडकी समोर जरा लांब एका दांडीवर खंड्या बसला होता. त्याच्या चोचीमध्ये काहीतरी कडक होते. बहूतेक खेकडाच असावा. तो त्या दांडीवर जोर जोरात आपटून त्याला मारून खात होता. इतक्या जोरात मारत होता की आवाज येत होता. मला झालेला उशीर आणि त्यात कॅमेरा वरच्या रूमच्या कपाटात त्यामुळे मी काही कॅमेर्‍यात फोटो काढले नाहीत. थोड्या वेळाने अजून काहीतरी भक्ष होत. ते सॉफ्ट होत बहुतेक. ते त्याने पटकन खाऊन टाकल.

सुप्रभात जागुताई,

आज आमच्याकडे सुद्धा एक वेगळीच मजा आली.

झाले काय, काल रात्री कधीतरी एक चिमणा-चिमणीची जोडी आमच्या बेडरुम मध्ये येऊन बसली होती अन आम्हाला कळले ही नाही.

सकाळी त्यांची बाहेर पडायची धडपड चालु झाली पण खिडकी बंद असल्या मुळे त्यांना निघताच येत नव्हते, बिच्चारे.

आमची फ्रेंच विंडो आहे , मग हळुच मी बाल्कनी मध्ये गेले अन सगळ्या खिडक्या ऊघडल्या, बाल्कनी मध्ये सुकत घातलेले कपडे बाजुला केले म्हणजे बाहेरचे स्पष्ट दिसेन त्यांना. मग बेडरुमचा दरवाजा बंद करुन बाहेर गेलो.

बास लगेच २ मिनिटात ती जोडी खिडकीच्या बाहेर गेली, बरे झाले कारण खुपच घाबरले होते दोघे , आम्हाला बघताच जरा कुथे आडोसा शोधुन लपायचा प्रयत्न करीत होते.

खुप गमतीशीर प्रकार होता तो , हे सगळे जवळ्पास दहा मिनीटे चालु होते पण फोटो घ्यायचे काही सुचले नाही.

पण या सगळ्याने अन त्यांना काही ईजा न झाल्याने (नशीब पंखा बंद होता) दिवसाची सुरवात मात्र प्रसन्न झाली अन आज प्राजक्ताचा सडा सुद्धा भरपुर पडला होता
सो खुप छान वाटतेय

वर्षा मस्त अनुभव.

आमच्याकडे सगळे पक्षी येतात फक्त चिमणीच येत नाही. अगदी चिमुकले सूर्यपक्षी, शिंपी पण येतात पण चिमणीच येत नाही.

आमच्याकडे सगळे पक्षी येतात फक्त चिमणीच येत नाही. अगदी चिमुकले सूर्यपक्षी, शिंपी पण येतात पण चिमणीच येत नाही. >>> आमच्या कडे कबुतर, चिमणी अन साळुंखी खुप येतात.

एकदा कबुतराने एका कुंडीत अंडी घातली, आम्ही सगळे हौशी ना खुप खुश झालो
अगोदर खुप मजा येत होती पण नंतर त्यांनी केलेली घाण पाहुन कंटाळा यायला लागला.

पण तो पर्यंत पिले बाहेर आली होती सो केले सहन पण त्यादिवशी पासुन कुणालाही न घरटे बांधु दिले बाल्कनीत ना अंडी घालु दिली
हा पण दाणे अन पाणी मात्र ठेवतो, खास करुन ऊन्हाळ्यात तर नक्कीच

Pages