चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिन्मय मांडलेकर

पण चित्रपटातील कथा कितपत खरी आहे, माहीत नाही.
कारण कोंडाजी ने पन्हाळा कसा घेतला याची ठोस माहीती कुठेच नाही बहुतेक

चि मा म्हणजे चिन्मय मांडलेकर.
'फर्जंद' चांगलाच आहे. मला पण बहिर्जीला जास्त फुटेज दिल्यासारखं वाटलं.
आणि मेन हिरो 'फर्जंद' अमराठी आहे - अंकीत मोहन.

अंकित मोहनची बायको मराठी आहे रुची , मराठी हिंदी सिरीयल मध्ये काम करते, झुंज मराठमोळीमध्ये पण होती. अंकित अश्वथामा होता स्टार प्लस च्या महाभारतात. मला आठवत नव्हतं पण वाचलं परवा मग आठवलं.

फर्जंद बघितला नाही पण थोडं लिहायचं आहे इथे, ते लिहिते नंतर.

दिग्पाल लांजेकर यांनी आठ वर्षाच्या अभ्यासानंतर हा चित्रपट तयार केला, कोंडाजी फर्जंदबद्द्ल जास्त माहीती त्यांना, व्यंकोजी महाराज यांच्या पुस्तकात मिळाली. बाकी कुठे फार नव्हती. बाबासाहेब पुरंदरे यांच्या एका पुस्तकात एक पान आहे फर्जंदवर. असे अनेक अनसंग हिरोज होते शिवाजी महाराजांसाठी लढणारे. दिग्पालने हे सर्व सांगितलं. मी टीव्हीवर बघितलं.

निलेश राऊतने छान काम केलं असं आलंय पेपरमधे, गुप्तहेर म्हणून. माझे मन चा हरीश दुधाडे गणोजी आहे, तिरंदाज म्हणून. त्याचे डोळे फार तेजस्वी आहेत, नाकपण धारदार. तोही शोभला असता कदाचित महाराज म्हणून पण उंची कमी आहे त्याची. मी मुवि बघितला नाहीये पण हरीश फेसबुक फ्रेंड असल्याने फोटो आणि वाचायला बरंच मिळतं, ओळख वगैरे नाहीये हा हरीशशी, एका सिरीयलमुळे फॅन झाले, रिक्वेस्ट पाठवली त्यावेळी एवढंच . दिग्पालची मुलाखत बघितली आहे. अतुल शिधये यांची फोटोग्राफीपण उत्तम वाटतेय, फोटो बघून. बरेच दिग्गज आहेत. दिग्पाल लेखक, अभिनेता म्हणून माहीती होता. आता तर चित्रपट घेऊन आलाय. बहीणीला सांगितलं छोट्या भाचीला दाखव.

कोणी राजी पाहिला आहे का? कसा आहे? >>> हो. छानच आहे. शायनिंग थ्रू पाहणार असाल तर राझी पाहून घ्या नंतर हा पहा. साम्यस्थळे बरीच आहेत.

फर्जंद आताच पहिला,
बच्चे कम्पनी बरोबर नक्की पहा, त्यांना आवडेल.मात्र पूर्ण चित्रपटात लॉजिक लावायचा प्रयत्न करू नका.
इतिहासाची ,भूगोलाची आणि समाजशास्त्राची साले काढली आहेत या चित्रपटात.

पाहिल्यांदि चांगल्या बाजू,
1)ओव्हर ऑल इम्पॅक्ट चांगला येतो,
2)मराठी मध्ये बजेट कन्स्ट्रेनस असताना केलेले स्पेशल इफेक्ट बऱ्यापैकी चांगले आहेत.
3) गाणी चांगली आहेत, स्पेशली गोंधळ आणि शिवबा मल्हारी. लावणी फारशी लक्षात राहत नाही.
4) मराठीत इतका तगडा बॉडी वाला हिरो म्हणजे अगदीच OMG.

खटकलेल्या गोष्टी,
1) लहान सहान गोष्टींकडे (त्यासाठी काहीही बजेट लागत नाही, फक्त इच्छा शक्ती लागते) केलेले पूर्ण दुर्लक्ष, उदा महाराजांच्या एन्ट्री च्या वेळी त्यांच्या मोजड्यांवर क्लोजप आहे आणि त्यात या मोजड्यांना लावलेला रबरी सोल स्पष्ट दिसतो.

2) वेशभूषेकडे केलेले दुर्लक्ष- निधप नि हा चित्रपट पाहिला तर जीव तळमळेल,
-सगळे सरदार छान प्रिंटेड कापडाचे अंगरखे घालून फिरतात,
-सगळे मावळे स्वच्छ पांढरे रिन की सफेदि वाले कपडे घालतात.
-बायका नवऱ्याला दूध द्यायला जाताना आणि 100 एक भाकऱ्या थापताना सुद्धा अंगभर दागिने घालतात.
-तमासगिरीण पैठणी नेसून, प्लास्टिक चा गजरा माळून नाचते
-पाळेगारांना ट्रॅप करायला प्रवास करताना पण पूर्ण नाचाच्या वेशभूषेत फिरते,
-राजांचा चुण्याच्या बाह्यांचा अंगरखा शिवलेल्या प्लिट्स च्या बाह्या लावून येतो.

3) भूगोला कडे आणि जागांच्या अंतरांकडे पूर्ण दुर्लक्ष,
- पहिल्या प्रसंगात राजांकडे रायगडावर तक्रार घेऊन आलेला माणूस म्हणतो काल पन्हाळ्याखाली हा प्रकार घडला, म्हणजे हा जखमी म्हातारा कोल्हापूर ते रायगड एका दिवसात आला?
- पन्हाळ्याबद्दल बोलताना स्वराज्याच्या पश्चिमेकडील गड असे म्हणाले, ते मला काही झेपले नाही, स्वराज्य अगदी पुणे धरले, तरी कोल्हापूर त्याच्या पश्चिमेला नक्की येत नाही
- कोकणातुन पळवलेल्या बायका कोल्हापूर मार्गे जंजिऱ्यावर पाठवतात असा उल्लेख आहे, कोकण-देश-कोकण प्रवास कशासाठी ते काही झेपले नाही.
[06/06, 23:43] Simba: - मोहिमेची तयारी रायगडावर चालू असताना मध्येच कोंडाजी सिंहगडावर दिसतो,

4) ऐतिहासिक गोष्टींकडे /व्यक्तिरेखांकडे दुर्लक्ष
- सुरवातीला सिंहगडावर लँड झाल्यावर तानाजी पुढे हल्ला कसा करायचा ते शेलारमामा आणि साथीदारांना सांगतात, सिरिअसली?? ग्राउंड झिरोवर जाऊन आता हल्ला कसा करायचा याच्या सूचना??

-किल्ला ही एक अतिशय secured जागा असायची, त्याच्या वाटेवर 2 -3 चेकपॉइंट्स असतात, महाद्वारा वर काय काम आहे याची माहिती घेऊन आत सोडले जाते,

राजमहाल किंवा राजांची सदर तर हाय सिक्युरिटी झोन म्हणायला हवा, अशा ठिकाणी तमासगीर थेट सदरेपर्यंत येऊन हुज्जत घालतो, कडकलक्ष्मी थेट राजासमोर येते असल्या गोष्टी बालिश वाटतात.

- शेवटच्या लढाईत, किल्ल्यावर हल्ला झाला आहे, शत्रू शिंग फुंकून लोकांना जागे करत आहे, आपला भाऊ मारला गेला आहे.बाहेर आपल्या माणसांचे नेतृत्व करायला कोणी नाही, याचे कुठलेही टेन्शन किल्लेदाराला दिसत नाही, कोंडाजी ला मारणे ही एकच प्रयोरिटी असल्यासारखा खेळ चालू होता.
आणि कोंडाजी ला मॅक्सिमम फुटेज मिळावे म्हणून क्लायमॅक्स उगाच लांबवला आहे असे वाटते.

- पन्हाळ्याच्या लढाईत महाराज नव्हते, पण स्टोरीत महाराज आहेत आणि त्यांना कलायमॅक्स मध्ये आणले नाही असे कसे होईल, म्हणून त्यांना पण आणले आहे.

चिन्मय मांडलेकर हा माणूस कुठल्याही कोनातून शिवाजी महाराज वाटत नाही
ओघळलेली शरीरयष्टी, पडवळासारखे आर्म्स फार केविलवाणे दिसतात. शेवटच्या फाईट सिक्वेन्स मध्ये तर हसू येते इतके पथेटिक चित्रीकरण आहे..

राजकुमार कसा स्टाईल मध्ये एखादीच फाईट मारायचा, तशा पद्धतीत राजे लढतात, म्हणजे एकाच्या पोटात तलवार खुपसली की ती बाहेर काढायची नाही, त्या मेलेल्याच्या हातातील तलवार घेऊन दुसऱ्याला मारायचे, दुसऱ्याची तलवार घेऊन तिसर्याला.. असे अटलिस्ट 3 वेळा केलेय त्यांनी.

आपण लीड करत असलेली मोहीम यशस्वी झाली की नाही हे पाहता कोंडाजी गायब होतो ये बात हजम नही हुई,

बऱ्याच ठिकाणी बाहुबली चा स्पष्ट प्रभाव जाणवतो, विशेषतः रायगड चे प्रथम दर्शन, कोंडाजी चे कडा चढणे या ठिकाणी.

कलायमॅक्स ला एडिटिंग ची गडबड आहे, म्हणजे एका सीन मध्ये केशर जखमी होऊन पडली आहे ,आणि तिच्या बाजूला 3 4 सैनिक तलवारी घेऊन पुढे येत आहेत असा सीन कट होतो,
पुढे दुसरीकदची लढाई दाखवतात, परत कॅमेरा केशर कडे येतो तेव्हा बाई तुरुंगाचे दार उघडत असतात, मध्ये काय झाले ते आपण तर्काने जाणून घ्यायचे.

मध्येच आवाज न करणारी पायताने बनवणारा चांभार येऊन जातो, त्याचा सिग्निफिकन्स कळला नाही, किल्ल्यावर गेल्यावर चालताना आवाज होऊ नये असे काही असेल तर वर गेल्यावर मराठे शिंग फुंकून शत्रूच्या लोकांना उठवतात, मग चपलेच्या आवाजाने काय घोडे मारले होते?
कदाचित त्याच्या वरचा एखादा सीन एडिटिंग मध्ये उडाला असेल.

लिहावे तितके थोडे आहे.

काहीही अपेक्षा आणि बेसिक इतिहास भूगोल घरी ठेऊन गेलो असतो तर कदाचित आवडला असता, थिएटर मधील बाकी जनता एन्जॉय करत होती, माझ्या रांगेत 2 3 लहान मुले होती , फुल्ल excited होती, बहिरजीच्या वेशांतरला दाद देत होती.
पण माझ्या या चित्रपटकडून अपेक्षा जास्त होत्या, तुटनते 8 वर्षं रिसर्च वगैरे वाचून अजून वाढल्या होत्या ,तो फुगा फटकन फुटला. यातल्या कुठल्याही चूका बजेट नाही म्हणून झालेल्या नाहीत, स्क्रिप्टवर अपुरे काम, डेडिकेशन चा अभाव, चलता है अटीत्यूड ही मुख्य कारणे.

इतक्या त्रुटी आहेत का. मी बघितला नाही पण तुम्ही छान मुद्देसूद मांडले आहे, सिम्बा.

लहान मुलं एन्जॉय करतील हे चांगलं, भाचीने बघावा असं वाटतंय. फार मटेरीअल पण नव्हतं त्यामुळे काही कल्पनाविलास असेलच. लढाई जास्तीतजास्त खरी वाटावी असा प्रयत्न केला असं वाचलं.

overall one time watch हरकत नाही. मला जमेल सध्या असं वाटतंही नाही. टीव्ही वर बघेन. कलेक्शन छान झालं असं बघितलं.

आणी ते राहील कि ...
तानाजी पडल्यावर त्याचे डोळे झाकताना रत्नाच्या अंगठ्या घातलेला हात. लढाईला कुठला मावळा अंगट्या घालून जाइल?

लढाई जास्तीतजास्त खरी वाटावी असा प्रयत्न केला असं वाचलं. >>> मला पण लढाई दाखवताना टॉलीवूड इम्पॅक्ट जाणवला. जुन्या मराठी चित्रपटात दाखवायचे तलवारबाजी ती भारी वाटायची

पहिल्यांदाच मोठ्या अपेक्षेने Super Star रजनीचा सिनेमा थिएटर मधे पाहिला.. काला !
पहाटे ४ चा पहिला हाउसफुल्ल शो, रजनीच्या कट आउटला दूधाचा अभिषेक, आरती.. सगळं वाचून काय असतं काय असं त्याच्या सिनेमात हे पाहण्यासाठी मुद्दाम पाहिला. खरं सांगतो नजिकच्या काळात इतका मोठा आणि संथ सिनेमा नाही पाहिला.. (हो मी बाहुबली सलग बसून अजूनही नाही पाहिला, पहावासा नाही वाटला)
स्टोरी सगळीकडे आलेली आहे, त्यामुळे त्याबद्दल काही सांगत नाही.

लक्षात राहिलेल्या (चांगल्या-वाईट दोन्ही) गोष्टी (पुढचं स्पॉयलर असू शकतं काही जणांकरता) -
* मारामारी - फक्त हात, पाय, लाठी काठी, कोयते वगैरे पारंपारिक हत्यारं, अगदीच क्वचित प्रसंगीच पिस्तुल वापरलेली दिसली. टिपीकल साउथ इंडियन स्टाइल. एका प्रसंगात रजनी एकटा मारामारी करणार असा प्रसंग उभा राहतो आता हातपाय चालवणार असं वाटेपर्यंत त्याचा सिनेमातला मुलगा आणि साथीदार येऊन त्याच्यावर स्वतः मारामारी करण्याची वेळ येऊ देत नाहीत. लगेच थोड्या वेळात परत एकदा एकटा रजनी मारामारी करणार असा प्रसंग येतो ! आता मात्र खरंच एकटा मारामारी करतो.. कशाने ? छत्रीने ! तेच ते हवेत इकडे तिकडे माणसं उडवत वगैरे !
* गाणी, पार्श्वसंगीत - "टेलिफोन बूथमें (की धून पें !) हसने वाली, मेलबोर्न मछली मचलने वाली " मध्ये यमक तरी जुळवलंय, या सिनेमातल्या गाण्यात ते ही जुळवायचा प्रयत्न नाही. एक रॅप साँग आहे, ते जरा बरं जमलंय त्यातल्या त्यात. पण हाइट म्हणजे, रॅप गाणारा हा ५-७ जणांचा हिप्पी ग्रुप, एका श्रद्धांजली सदृश कार्यक्रमात पण श्रद्धांजलीचं रॅप साँग गातो Happy
* संथपणा - सगळ्या सिनेमाभर संथपणा भरलाय. रजनी, नाना वगैरे प्रमुख पात्रं कायम स्लो मोशनमध्येच ये जा करतात. कर्कश्य पार्श्वसंगीताच्या तालात ! ठिगळं लावल्यासारखा वाटतो त्यामुळे सिनेमा, एकसंध नाही वाटत. सिनेमाशी कनेक्ट नाही होता आलं त्यामुळे कदाचित.
* कलाकार- अर्थात रजनी! मुख्य पात्र, सुपरस्टार त्यामुळे सतत कॅमेरा रजनीवरच! मध्यांतरानंतर नाना दिसतो. तो असलेले प्रसंग जरा बरे वाटले. पण परत तेच.. संथ, स्लो मोशन मधे बरेचदा ! नाना-रजनी सामना पण फारसा रंगला नाही, डायलॉगबाजी वगैरे फारशी खुलली नाही असं वाटलं. सयाजी शिंदे ला फारसं काम नाही. तेच रवि काळे च्या बाबतीत ही.
याच लांबलेल्या (३ तास फक्त) सिनेमातल्या रजनीच्या डान्सवर , एंट्रीवर, फाइट्सवर , डायलॉग्सवर , स्लो-मो वर साउथ च्या थिएटर्स मधे पब्लिक ने काय दंगा केला असेल ह्याची कल्पना मात्र आहे !

>>मला पण लढाई दाखवताना टॉलीवूड इम्पॅक्ट जाणवला. जुन्या मराठी चित्रपटात दाखवायचे तलवारबाजी ती भारी वाटायची

त्या सगळ्या तलवारी तद्दन खोट्या दिसतात. मुख्य पात्रान्च्या हाती तरी खर्‍या तलवारी दिल्या पाहिजे होत्या. खर्‍या आणणं शक्य नसेल तर कमीत कमी स्टील च्या तरी द्यायच्या होत्या.

रजनीचा सिनेमा संथ होता? मी तर त्याचा फक्त रोबोट पाहिलाय आणि मला तो सिनेमा आवडला.
जेव्हा जेव्हा लागतो तेव्हा तेव्हा मी पाहते जरूर.

Jurassic World-Fallen Kingdom पण पाहिला. ज्युरॅसिक च्या पठडीतलाच अजून एक सिनेमा. ( म्हणजे काही चांगले लोक, काही डायनोसोर्सचा आपल्या फायद्याकरता वापर करु पाहणारे लोक, हे सर्व लोक आणि डायनोसोर्स यांच्यातला संघर्ष)
काही प्रसंग खरंच अ आणि अ आहेत, तरी एकदा मोठ्या स्क्रीन वर पाहण्यासारखा नक्कीच आहे.
...नंतर कितीही सिक्वेल्स आले, तरी स्पिलबर्गचा ज्युरॅसिक पार्क पाहताना मजा येते . पुढे काय होणार आहे हे आता माहित असलं तरी उत्सुकतेने अजूनही पहावासा वाटतो.

...नंतर कितीही सिक्वेल्स आले, तरी स्पिलबर्गचा ज्युरॅसिक पार्क पाहताना मजा येते . पुढे काय होणार आहे हे आता माहित असलं तरी उत्सुकतेने अजूनही पहावासा वाटतो. >>>>> +++१११११११

माधुरी दीक्षितच्या बकेट लिस्ट ने मोठा भ्रमनिरास केल्यावर काल विरे दि वेडिंग बघायला का ही ही अपेक्षा न ठेवता गेले पण सिनेमा चक्क बरा वाटला!!!! म्हणजे त्या चौघींचे वागणे, भाषा अगदी पटलेच असे नाही पण त्यामागचा मुळ लग्न या विषयाचे आपल्या समाजात असलेले अवास्तव महत्व वगैरे हे मात्र पटले. शेवटी सिनेमाने बहुजन समाजाला पटेल असा गोड शेवटही केला पण ते असो!

थोडक्यात, फारश्या अपेक्षा न ठेवता मैत्रिणींबरोबर मजा म्हणून विरे दि वेडिंग एकदा बघायला हरकत नाही...
किमान माधुरीवर उतारा म्हणून तरी बघाच Wink

काही प्रसंग खरंच अ आणि अ आहेत>> काय खर नाही.. मागच्या हफ्त्यापासुन तोंड लपवून फिरतेय मी.. चल चल चल म्हणुन किर्र करुन सिनेमाच्या चॉईस मधे उच्च अभिरुची असणार्‍या एका मित्राला घेऊन गेली अन स्वतःच हस झाल म्हणुन दातपन काढता येईना तरी खुप हसली मी पिच्चर पाहताना... अरेरे काय फाल्तुपणा करुन ठेवला माया स्पिलबर्गच्या फाउंडेशनचा..
स्पॉयलर :
त्या ज्वालामुखीचा सिन बघुन तर आता इथुन उठुन जावं कि काय असं झालेलं मला.. यापेक्षा २०१५चा तरी झेलेबल होता पण हा हद्द आहे.. जिकडे तिकडे तोडफोड करत फिरणारा तो पोरीच्या रुम मधे पद्धतशीर कडी उघडून काय शिरतो.. हात तिच्या चादरीपर्यंत नेल्यावर हिरो आल्यावर परत ५मीटर मागे सरकवलेला काय दाखवतो.. काहिही म्हणजे काहिही.. मधेच त्या डॉ झोलाला बघुन हेल हाय्ड्रा म्हणावंस वाटल मला.. Biggrin

‘Sully' नेटफ्लिकस वर पहिला. मस्त. Tom हँक्सचा अप्रतिम अभिनय. २००९ च्या सत्य घटनेवर आधारित.

अमेरिकेत एका विमानाला उड्डाणा नंतर अवघ्या 4 मिनिटात पक्षी धडकतात. त्यामुळे त्याची दोन्ही इंजिने निकामी होतात. परत फिरणे शक्य नसते. मग Sully हा वैमानिक धाडसी निर्णय घेऊन विमान हड सन नदीवर उतरवतो. न्यूयॉर्क च्या सर्व आपत्कालीन यंत्रणा वेगाने तिथे पोचतात आणि अवघ्या 24 मिनिटात सर्व 155 प्रवाशांची सुखरूप सुटका होते.

सर्वच थरारक ! अत्यंत वास्तवदर्शी चित्रीकरण.

चित्रपटाचा बराच भाग वैमानिकांच्या चौकशीच्या समितीच्या कामावर घेतला आहे. समिती आधी साशंक असते पण शेवटी त्यांना वैमानिकांचे कौतुक करावे लागते.
Sully व त्यांच्या कुटुंबाची घालमेल मस्त दाखवली आहे.
जरूर पाहण्यासारखा.

Sully मलापन बघायचा आहे..

मी काल Hotel Transylvania ३ बघुन आली.. मला मज्जा आली..
अ‍ॅनिमेटेड चित्रपट सहसा बोर करत नाहीच मला.. अपवाद माय लिट्ल पोनी..

माझे बुकिन्ग होते त्या फ्लाईट चे. प्रत्यक्षात मी एक आठवडा आ धी गेले.
ऑफिसमधल्या एकाची बाय को होती त्या फ्लाईट्मधे. त्यान्ची रियुनियन वगैरे झाली एक वर्ष झाल्या वर.
थरारक!

फायनली काल टीव्हीवर 'रंगून' बघितला.
पण टीव्हीवर पाहिल्यामुळेच असेल, मला ठीकठाक वाटला.

मलिक आणि ज्युलिया प्रेमात पडतात ते नातं प्रेमात पडण्याच्या स्टेजपर्यंत नीट फुललेलं, इन्टेन्स वाटलंच नाही.
शेवटची तलवारीसाठीची झुलत्या पुलावरची मारामारी जरा कै-च्या-कैच वाटली. मुळात ती तलवार आझाद हिंद फौजेपर्यंत पोहोचवणे यामागचीही गरज, इन्टेन्सिटी नीट पोचली नाही.

कामं सर्वांची छानच. रूसीचा मित्र असलेला तो ब्रिटिश अधिकारी, त्याच्या तोंडचं हिंदी, त्याचा वापर चांगला करून घेतला आहे.
वातावरणनिर्मितीही छान.

मलिक आणि ज्युलिया जेव्हा जेव्हा विविध कारणांनी चिखला-मातीत लोळतात, तेव्हा ज्युलियाचा चेहरा कायम गोरापान, स्वच्छ राहतो; त्याची मजा वाटली Lol

ज्युलियाचा ट्रूप ट्रेनमधून उतरून नदीकाठी येतो, ती आणि मलिक वेगळ्या राफ्टवरून निघतात, वरून विमानं हल्ला करतात, राफ्ट बुडतो, पुढे ज्युलिया एकटीच वाहत वाहत एका खडकाला लागते, तिथून शुद्धीवर येऊन जंगलात शिरते, मग ते तीन जपानी सैनिक, मग मलिक येऊन तिला वाचवतो, एका जपानी सैनिकाला बंदी बनवून ते आपल्या सोबत घेतात, आणि मग एकदम एका सकाळच्या प्रसंगात ज्युलियाच्या कॉस्च्युमसोबतची मोठी वेताची डिझायनर हॅट तिच्याजवळ दिसते. Lol ती हॅट आणि ज्युलियाचा चेहरा कायम स्वच्छ !!

आय एम कलाम बघितला काल नेफ्लि वर. एक हुशार पण पैशाअभावी शाळेत न जाऊ शकलेला मुलगा राजस्थान मध्ये हवेलीच्या शेजारच्याच धाब्यावर काम करतो.. तो अंगच्या हुशारीने काय काय करतो याची गोष्ट. मुलगा क्युट दाखवलाय.
सेट इट अप पण बघितला. नेफ्लि ओरिजिनल रोम्यांटिक कॉमेडी आहे. मस्त आहे.

Pages