आठवणीतलं पुणं

Submitted by चिनूक्स on 27 March, 2017 - 03:17

गेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.

जुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या पुण्याच्या आठवणी घसेटी पूलावरिल वाड्याच्या आहेत. येथे डेक्कन च्या आसपपाची मंडळी जास्त दिसते. मी धुळ्याची, प्रत्येक ऊन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी पुण्याला यायचे. हि गोष्ट ६५ च्या आसपास. मग मामेभावाबरोबर रोज कधी पर्वती तर कधी पेशवे उद्यान. चतुर्शृंगीला जायचे म्हणजे सण असायचा. दर सुट्टीत एकदा तरी आजोबांच्या ओळखीचे मामा बैलगाडी आणायचे आणि देवीची यात्रा घडायची.
तसेच मामांचे दुकान कँपात होते घसेटी पूलावरुन तीथवर चालत जायाचो. मग एम जी रोडवर भटकायला मजा यायची.
५० वर्ष लोटली.....

चतु:शृंगी यात्रेच्या अनेक मस्त आठवणी आहेत लहानपणीच्या. आम्ही तेथे जवळच राहायचो. गणपती ची धमाल झाली की लगेच सेनापती बापट रोड वर खुणा दिसू लागायच्या. तंबू/पाले वगैरे. मग ते पाळणे वगैरे उभारणे सुरू व्हायचे. घटस्थापने पर्यंत शिवाजी हाउसिंग सोसा. चौकापासून ते तो रस्ता वळून गणेशखिंड रस्त्याला (विद्यापीठ रस्ता) मिळतो तो भाग सर्व भरून जायचा विद्यापीठ गेट पर्यंत.

मग त्या १०-१२ दिवसांत जत्रेला रात्री जायचो आम्ही. चालत १५-२० मिनीटे लागत. सेनापती बापट रस्त्याचा सिम्बायोसिस कडून येणारा उतार संपून पुन्हा चढ सूरू होतो त्या वेताळबाबा चौकापासूनच "जाग' दिसत असे. देवीला रोजच्या वाजत गाजत नेल्या जाणार्‍या "माळा" असत. प्रत्यक्ष पायथ्यापाशी जत्रेचा सर्वात जोर असे. आमची मुख्य आकर्षणे म्हणजे पाळणा, विविध मेरी-गो-राउण्ड्स, मौत का कुआ, ते चित्रविचित्र आरसे, चित्रपटांच्या ५-१० मिनीटांच्या क्लिप्स दाखवणारे सिनेमे, आजूबाजूला मिळणारे अगम्य खाद्यपदार्थ. तेथील साखरेचे कव्हर असलेली पण आत काहीतरी लालसर पदार्थ असलेली 'गाठी" का काहीतरी असे ती मला प्रचंड आवडत असे.

रात्री देवीच्या दर्शनाला प्रचंड लाइन असे. त्यामानाने दिवसा सोपे होते बहुधा. पण मला यात्रेच्या दिवसांत दर्शनाला गेल्याचे फारसे आठवत नाही.

आमच्या जवळच्या एका घरात "देवी" बसत असे. दरवर्षी काहीतरी डेकोरेशन करून ते बसवत. मग रोज तेथे मोठी आरती वगैरे असे. दिवसा गोंधळ वगैरे ही. रात्री त्यांच्याकडे मोठी घंटा वाजू लागली, व त्याबरोबर येणारा "अनादि निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी" ऐकू येउ लागले- म्हणजे आरती सुरू झाली- ही लहानपणची एक मोठी रिकरिंग आठवण आहे.

मग दसर्‍यानंतर यात्रेचे वातावरण ओसरू लागे. पण तोपर्यंत दिवाळीचे वेध लागत. मधली एक सहामाही परीक्षा सोडली तर सगळे मस्त होते Happy

घसेटी पूल शब्द बर्‍याच दिवसांनी पाहिला. मला अजूनही तो पूल कोठे आहे ते पटकन आठवत नाही.

तो लाल महालावरून अपोलो थिएटर कडे जाणारा रस्ता आहे त्यावर पुढे (रास्ता पेठेजवळ) एक पूल लागतो. त्याचे नावही विसरलो.

>>> त्यावर पुढे (रास्ता पेठेजवळ) एक पूल लागतो. <<< तो दारुवाला पुल, तिथेच एक मशिद आहे, उजवी कडे वळले तर आर्यांग्ल आयुर्वेद कॉलेज, दुधभट्टी, तांबट आळी वगैरे.....

घसेटी पुल मलाही नीटसा आठवत नाही, पण एकेकाळी पत्ता सांगण्याचि खूण होता,
बहुधा लक्ष्मीरोडवर सोन्यामारुन चौकाकडून कँपकडे बरेच पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक थेटर होते , बहुधा अल्पना, पुढे नानापेठेतील गाड्यांच्या सुट्ट्यासामानाची दुकाने.., तर तिथेच कुठेतरि तो पुल असावा, जाणकारांनी खातरजमा करुन द्यावी....

सुमंगल तुमच्या ही भरपूर आठवणी लिहा.

पुण्यातलं हे पुणं फार कमी वेळा लिखित स्वरुपात वाचायला मिळालयंय

मी नोकरी निमित्ताने पुण्याच्या बाहेर असताना पुणे स्टेशन ला पहाटे / सकाळी पोहोचायचो. त्यावेळी ४ नंबर , ७१ नंबर आणि ७४ नंबर अशा तीन बसेस डेक्कन करता होत्या. ४ नंबर स्टेशन ते स्वारगेट डेक्कन शिवाजीनगर मार्गे धावायची. ७१ नंबर डेक्कन अप्पा बळवंत चौक लाल महाल, आगरकर विद्यालय जिल्हा प रिषद अशा मार्गे जायची पण ७४ नंबर कॅम्पाच्या बाजूने अजूनच आतल्या पेठांमधून जायची त्या मार्गावर बहुदा घसेटी पूल भवानी / नाना / गणेश पेठेत असावा.
७४ नंबर ला तिकीट जरा जास्त होतं पण त्या बाजूला जास्त जाणं होत नसल्याकारणाने नंतर आवर्जून तीच बस घ्यायचो.

पुणेही पहिल्यापासून कॉस्मो असल्याचा निदर्शक रूट होता ७४नंबरचा

मी कुस्रो वाडीया कॉलेजातून डिप्लोमा केला (१९८७ ते १९८९) त्यावेळी आमच्या स्थापत्य विभागाचे प्रमुख नगरकर सर हे धोतर टोपी कोट अशा वेषात येत असत तर भरुचा नावाच्या शिक्षिका फ्रॉकमधे. माझ्या मागच्या बॅच ला प्रवेश घेतलेली एक मुलगी (दहावी नंतर डिप्लोमाला प्रवेश) ग्रामीण भागातून आली होती ती परकर पोलका घालूनच आलेली होती. यथावकाश (म्हणजे साधारण महिनाभरात) तिनेही पंजाबी ड्रेस शिवले पण तोवर कोणीही तिची खि ल्ली वगैरे उडवल्याचे आठवत नाही.

त्या सुमारास वाडीयाला पन्नास वर्षे पुर्ण झाली त्याबद्दल एक माजी विद्यार्थी / शिक्षक यांचे स्नेहसंमेलन झाले होते त्यावेळी असाच (आताच्या काळात फॅन्सी ड्रेस वाटतील) सर्व प्रकारच्या वेशभुषांचा समुदाय जमला होता.

हो, हे पुणं फारसं 'दिसत नाही याबद्दल सहमत.
मी आणि अकु प्राकृत शिकायला नानापेठ भाजी मंडईमधे सन्मती तीर्थ नामक एक जैन संस्थेची जागा होती तिथे जात असू (किंवा ती त्यांनी भाड्याने घेतली असेल). जैन साध्वी आणि मुनि तिथे राहत असत अधूनमधून. दर शनिवारी दुपारी तास असायचे. जाताना रिक्षाने जात असू आणि येताना बसने मंडईपर्यंत आणि पुढे चालत घरी... कधीकधी आतल्या रस्त्यारस्त्यावरून रमतगमत बस न घेता चालतच घरी
क्लासमधे बहुतांशी मारवाडी जैन बायका असत कारण ती त्यांची धर्मभाषा. नुसता रस आहे म्हणून शिकणारे आमच्यासारखे तुरळकच..
ती भाजी मंडई प्रचंड गलिच्छ वाटायची. रस्त्याच्या कडेने चिखलात गटारात पोती टाकून भाजी विकायला असायची. त्यात हार्डवेअर, स्पेअर्स आणि अशीच कसली छोटी दुकानं. सवय व्हायला जरा वेळच लागला... पण त्या निमित्ताने त्या भागाची जरा ओळख झाली.
तसंच स्टेशनकडे जाताना लागणारा पंधरा ऑगस्ट चौक येऊन जाऊन माहित होता पण नाव बरंच उशीरा कळलं.
मग एकदा काही मित्रमैत्रिणी नरपतगीर चौक परिसरात तिथल्या गिरीगोसावींच्या समाधी बघत हिंडलो होतो. गोसावी समाजातल्या घराघरातून अशी समाधी मंदिरे आहेत तिथे. एक आख्खी रविवार दुपार तो भाग पिंजून काढला. मग तिथून त्रिशुंड्या गणपती करून निवांत घरी परतलो

नरसोबाच्या देवळात आईचे काका, गोखले हॉल समोर मामा आणि केळकर म्युझियमच्या बाजुला बाबांची आत्या राहायची. गणेशखिंड शेतकी महाविद्यालयाच्या विरुध्द जे माझे काका राहायचे त्यांचं घर खूपच लांब पडतं असं म्हणायचे. लहानपणी दरवेळेस ह्या पैकी एकाकडे मुक्काम असायचा. एखादा रिक्षावाला रात्रीच पकडून ठेवायचा सकाळी सिंहगड एक्स्प्रेस ला सोडायला. गेल्या पुणे भेटीत वाडेश्वरच्या इथे रिक्षा मिळाली नाही म्हणून चालत चालत नवरा, मुलगा, पुतणे अशी वरात तुळशीबागेकडे चाललो होतो. अचानक समोर आजोबांच्या नावाची पाटी. नवऱ्याला म्हंटले हे माझ्या मामा आजोबांचं घर आहे. कधीतरी २०एक वर्षमपूर्वी शेवटची आली असणार आईबरोबर. वर जावं की नाही विचारात पाच मिनिटे घरासमोर थांबले, शेवटी आत न जाताच तसेच पुढे गेलो. काय ओळख द्यायची, ते ओळखतील का आणि अचानक असं कसं टपकायच?

जत्रेच्या आठवणी मस्त आहेत. आम्हाला जत्रेवेळी इन्टरेस्ट असे तो प्लॅस्टिकच्या मण्यांच्या माळांमध्ये आणि हेअरपिनांमध्ये. पिपाण्या, गॉगल हे तोंडी लावायला. पाळण्यात बसायला जाम थ्रिलिंग वाटायचं- त्या मिनी पाळण्यात. जत्रेच्या दिवसात आम्ही देवीदर्शनाला कधीच जायचो नाही, म्हणजे आजी जाऊ देत नसे. भयंकर गर्दी असायची आणि मुलं हरवायची, पळवली जायची शक्यता असायची म्हणून. पायथ्याशी हा टीपी अलाऊड होता. मला वाटतं दाणे आणि भेळभत्ता असा खाऊही मिळायचा विकतचा. बसने यायचो-जायचो. किती लांब वाटायची चतुर्श्रुंगी तेव्हा! Happy

ही काही फारशी जुनी आठवण नाही, पण आता ते नामशेष झालंय, त्यामुळे जुन्या पुण्यात धरायला हरकत नाही- लक्ष्मी रस्त्यावरचं 'जनसेवा दुग्धालय'! 'खरवस आहे' आणि 'खरवस संपला' या पाट्यांवर जनसेवेनं बस्तान बसवलं असं म्हटलं तर वावगं होऊ नये Happy तिथे बर्फी, पेढे आणि इतर मिठाईही असे, पण चितळे असताना तिथून ते पदार्थ कशाला घ्यायचे? खरवस हीच त्यांची पेशालिटी. मस्त मिळे, मऊसूत असे आणि मुख्य म्हणजे चिकाच्या दुधाचाच मिळे. (त्यामुळेच 'संपला'ची पाटी तयार केली होती बहुतेक :)) अनेकानेक वेळा खाल्ला आहे. त्याच्या बरोब्बर समोर हिन्दुस्थान बेकरी होती. तिथे पॅटीससाठी लाईन असे रविवारी. इतर दिवशी पॅटीस मिळत होते का कल्पना नाही, कारण मधल्या दिवशी विकतचं खाणं हा प्रकारच अस्तित्वात नव्हता ना! त्या पॅटीसचा फार भारी वास यायचा लायनीत उभं असताना. जनसेवाचंच बघून हिन्दुस्थानवाल्यांनी 'पॅटीस संपले'ची पाटी केली का काय नकळे! उलटही असेल! नंतर जनसेवा काळाबरोबर बदललं. ते 'उपहारगृह' झालं. साबुदाणा खिचडी, ढोकळा वगैरे मिळायला लागलं. सगळ्या पदार्थांना एक मस्त घरगुती चव होती. इन्टिरिअरही आधुनिक केलं होतं. आणि एक दिवस अचानक ते बंदच झालं Sad पुढच्या पिढीला ते चालवण्यात इन्टरेस्ट नव्हता म्हणे. फार म्हणजे फारच वाईट वाटलं होतं. हिन्दुस्थाननेही बस्तान हलवलं, ते आता विजयच्या बोळात आहे, पण आहे तरी अजून, हेही काय कमी आहे!

जनसेवा आणि पाट्यांबद्दल, अगदी अगदी. मला एकदम नॉस्टॅल्जिकच झालं Happy
हिंदुस्थान आहे की. आता तर बाजीराव रोडला पण सरस्वती मंदिरसमोर आहे. इतरत्रही शाखा आहेत (चक्क).
हिंदुस्थानसारखेच ग्रीन बेकरीचे पॅटिस, क्रीमरोल आणि पट्टी सामोसे, दवेंचा खाकरा, स्वागत भांडारमधली चित्राची बिस्किटं (ती बंद केली त्यांनी विकणं असं गेल्या पुणे भेटीत कळलं) आणि खचाखच भरलेल्या गोळ्यांच्या बरण्या, काजूकंदाच्या थप्प्या आणि अनेकानेक प्रकारची बिस्किटं. खाऊवाले पाटणकर आणि समोरचे बेहेरे आंबेवालेंकडे मिळणारा हरतर्‍हेचा खाऊ. कोपर्‍यावरचं मुरलीधर रसवंती गृह, जरा पल्याड गेलं की पुष्करणि आणि नवरंग भेळ, जवळ असलेलं श्री उपहारगृह (खिचडी आणि मिसळफेम), तुबा तलं श्रीकृष्ण (मिसळफेम) आणि जुनं नवं कावरे, नंतर झालेलं पण अगदी सोयीचं अगत्य
तुबा त आत बाबू गेनू चौकाच्या दिशेला असलेलं गोकुळदासचं दुकान. तिथून कायम तुपासाठी लोणी आणलं जायचं. तिथला काष्ठौषधी आणि अशाच खच्चून भरलेल्या मालाचा संमिश्र वास...

चतु:शृंगी यात्रेच्या अनेक मस्त आठवणी आहेत लहानपणीच्या. >> +१११ फारेण्डा मस्त आठ्वणी. आम्ही चिंचवडवरुन येत असू नवरात्रीत. विद्यापीठ सर्कल पाशी बांबुच्या काठ्या लावून तात्पुरते बस स्टॉप उभे करत आणि तिथुन चिंचवड, निगडी, भोसरी अशा ठिकाणी बसेस सुटत (मोस्टली पी सी एम टी च्या). ६/६.३० ला चिंचवडवरून निघायचे यात्रेत दोन एक तास धमाल करायची आणि परत निघायचे. ते मोठे पाळणे, चक्र, आणि खाउ काय अप्रूप असायचे. तिथे एक वैभव हाटेल पण होते आणि यात्रेला गेल्यावर त्या हाटेलात डोसा खाणे म्हणजे एक पर्वणी असायची. Happy

पी एम टी च्या डबल डेकर बसेस ह्या बहुदा उपनगरासाठीच (लाँग रुट) होत्या. चिंचवड ते म न पा भवन १२२ नं ची बस असायची. ती केबिन वाली डबल डेकर फारच रटाळ असायची. बिनाकेबिनवाल्या डबल डेकरने प्रवास करताना मजा यायची खासकरून वरच्या डेक वरून पहिल्या सीट्वर बसून. आता आहेत तसे बसचे भरमसाठ मार्ग पण नव्हते. बी एम सी सीला असताना बरेचदा यु. सर्कलला उतरुन सेनापती बापट रोड पर्यंत पायपीट करावी लागायची. परिक्षेच्या वेळी फारच हाल व्हायचे मग बाईक असणारे सिटीमध्ये राहणारे काही मित्र यु. सर्कलला सोडत Happy

मला जनसेवा उपहारगृह म्हणूनच आठवते आहे. जनसेवाकडे पियुष नावाचे एक पेय मिळायचे. खूप भारी लागायचे. जनसेवा बंद झाल्यावर प्रचंड वाईट वाटले होते. पुण्याची संस्कृती नष्ट होत चालली आहे अशी तेव्हा प्रकर्षाने जाणीव झाली होती Sad

हिंदुस्थान बेकरीत फक्त रविवारी पॅटीस मिळायचे. तेव्हा रविवारचा नाश्ता पॅटीसवरच होत होता. हल्ली रोज मिळतात बहुतेक.

बहुतेक अजून डेक्कनवरच्या संतोष बेकरीचे नाव घेतले नाही कोणी. ताजा ताजा गरम गरम ब्रेड मिळायचा तेथे. आता आहे की नाही काही कल्पना नाही.

बहुतेक अजून डेक्कनवरच्या संतोष बेकरीचे नाव घेतले नाही कोणी. ताजा ताजा गरम गरम ब्रेड मिळायचा तेथे. आता आहे की नाही काही कल्पना नाही. >> आहे अजून. तिथे पण पॅटीस मस्त मिळतात. मध्ये रिनोवेशन चालू होते. तिथले सारेच बेकरी पदार्थ चांगले असत्तात. फार शांत रस्ते होते हे कधीकाळी आपटे रोड, वैशालीच्या बाजूचा रोड.. आता खूप गर्दी असते..

रानडेच्या समोर २ मोठी झाडे होती आणि पी एम टी चा छोटासा बसथांबा. ईतके शांत वाटायचे तिथे. पालिकेने तोडली ती झाडे Sad आघारकर रोड तर ईतका शांत असायचा आता तिथे पण खूप वर्दळ आणि वाहने असतात.

संतोष बेकरी अजुन चालु आहे. गरम गरम पदार्थ खायला तिथे गर्दी दिसते. वडिल नेहमी घेउन जायचे. आता जाण होत नाही.

लक्ष्मी रस्त्यावरचं 'जनसेवा दुग्धालय'! ........खरवस हीच त्यांची पेशालिटी.>>>>>>>>.काल बसमध्ये एका काकूंनी अगदी हेच वर्णन केलं. तूच तर नव्हे ती? ( ह. घे.) Proud

हिन्दुस्थाननेही बस्तान हलवलं, ते आता विजयच्या बोळात आहे, पण आहे तरी अजून, हेही काय कमी आहे!>>>>..पण गेल्या बर्‍याच वर्षात पॅटीसची चव व रूप दोन्ही बदललय. Sad

पुण्याजवळील पाले येथील जैन लेणे
-माझे दुर्गभ्रमण - नवीन मध्यलोक 1
1 नवीन Mar 31 2017 - 4:03pm

पुण्याच्या आसपासची गवतफुले....
शांकली 34
3 नवीन Mar 31 2017 - 4:00pm

आठवणीतलं पुणं
-पुणे चिनूक्स 135 Mar 31 2017 - 3:59pm

पुणेकर लैच आठवणी काढुन रायले

सुंदर माझं पुणं
http://www.maayboli.com/node/45033

इथल्या प्रतिक्रियांमधून सहकार नगर भागातल्या पुण्याचे वर्णन वाचायला मिळेल.

ही रिक्षा नाही. एका जागी संकलन व्हावे म्हणून(च) इकडे देत आहे Proud नोंद घ्यावी कृपया धन्यवाद Happy

छान आहे हा धागा. दिसला कसा नाही इतके दिवसांत ?
अमा, रावी, लिंबूटिंबू, सचिन काळे, कांदापोहे यांनी लिहीलेल्या जुन्या आठवणी आवडल्या.
अंकु, इन्ना यांच्या पोस्ट्सही मस्तच.

हर्पेन, शोभा १, अदिति, राजसी ... छान शेअरिंग.

खरेच छान आहे हा धागा. विशेषतः माझ्या सारखी साठी.
घसेटी पूल म्हणजे मंडईहुन कस्तुरी चौक आणि पुढे सरळ खाली स्वारगेट कडे.
नागझीरी नाला लागतो तेथे. आता वाडा गेला. २०१५ जाने. आले होते तेव्हा कळाले.

खरेतर सुट्टीत येणे थांबले. त्यानंतर निवांतपणे १९९० मधे आले. माझ्या दोन्ही मुलिंना सेंट हेलेनात
टाकले होते. अ‍ॅड्मिशन मिळावी म्हणुन हॉस्टेलला ठेवले. पण ६ महिने जेमतेम काढले. खाण्याचे आबाळ म्हणुन मग प्रभात रोडवर १ रुमची भाड्याची जागा घेतली. तेव्हा आसपास खुप भटकायचे.

सकाळी लवकर चितळ्याकडुन दुध आणायचे. मग थेट मंडई पर्यंत भाजीसाठी जायचे. अगदी कस्तुरी
चौकातील जैन मंदिरापर्यन्त भट्कंती असायची.छान दिवास होते ते.

पुन्हा २०१५त आले आणि सगळेच बदलले होते. आता पुन्हा ह्या वर्षाअंती २ महिने येउन रहायच म्हणते.
बघु......

मै देवी - त्या 'एक रिळ चार ट्रिपांना' जपून वापरायच्या काळात रस्त्याचे फोटो काढले असण्याची शक्यता कमीच.
त्यापेक्षा आपण चित्रच का काढत नाही Happy

फोटो वरून आठवलं डायमंड वॉच कंपनीच्या बाजूच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर नंदकिशोर फोटो स्तुडियो होता. तिथे गरवारे भुयारी मार्ग होण्याअगोदरच्या गरवारे यांनीच सांभाळलेले त्रिकोणी बागेचा फोटो बघीतल्याचे आठवते आहे. ती त्रिकोणी बाग मला अगदीच अंधूक आठवत आहे. नटराज सिनेमा हॉल मधल्या नटराजाच्या मुर्ती प्रमाणे.

हर्पेन Happy आय विश ! इतकी पावर नाय ना माझ्या हातात!
बाकी मीही गरवारे - कुस्रो वाडिया. त्यामुळे तू लिहिलेले नगरकर सर, भरुचा मॅम सगळे आठवून नॉस्टॅल्जिक झाले!

"त्या 'एक रिळ चार ट्रिपांना' जपून वापरायच्या काळात रस्त्याचे फोटो काढले असण्याची शक्यता कमीच." - सहमत. बरेच वेळा फोटो काढल्यापासून तो डेव्हलप होऊन येईपर्यंत ईतका काळ मधे जाई की तो फोटो कधी काढला होता ते सुद्धा आठवत नसे. अर्थात ती शक्यता सुद्धा फार कमीच म्हणा, कारण मुळातच फोटोज काही विशिष्ट कारणपरत्वेच निघत. फोटोफास्ट ने डेक्कन जिमखान्यावर १ तासात फोटोज डेव्हलप करून द्यायला जेव्हा सुरूवात केली तेव्हा त्या 'इन्स्टंट टेक्निक' चं प्रचंड अप्रूप वाटलं होतं. कुठल्या तरी एका कार्यात २-३ रोल्स फोटोज काढून लगेच प्रिंट करून संध्याकाळी ते फोटोज बघितले होते तेव्हा 'हा आज दुपारचाच आहे' हे फिलिंग अफलातून होतं.

मै - गरवारे माहित होते, कुस्रो वाडीयापण म्हणजे भारीच की
ह्या कॉम्बिनेशनचे विद्यार्थी तसे कमीच... डेक्कन वरून पार वाडीया पर्यंत जाणे टाळलेच जायचे.

पण याचमुळे सायकलिंग जबरी तगडे झाले. गियर तर जाऊच दे मी तर माझ्या आईची लेडिज सायकल वापरायचो. रॅले नावाच्या कंपनीची एक्दम मजबूत सायकल होती. थोडी फार डागडुजी करावी लागलेली पण खूप ताब्डवलेलं त्या सायकलीला. वाडीया कॉलेजात वर्कशॉपचा तास खर्‍याखुर्‍या दोन तासांचा असायचा कधी ऑफ मिळालाच तर कुठे मुंढव्याला मित्रा कडे, वानवडीला शिंदे छत्री, नदी पलीकडे आगाखान पॅलेस असे भटकायचो एकदा पौड फाट्यावरून घाटासारख्या रस्त्याने पाषाणकडे आणी मग विद्यापीठातून खडकीला लागून शिवाजी नगरला लागून परत घरी आलेलो त्यावेळी हे घरी-दारी सांगताना फुललेली छाती आणि लकाकलेले डोळे आठवतात. एकदा कात्रजच्या घाटात बोगद्यापर्यंत जाऊन परत आलेलो. कात्रज, मुंढवा, वानवडी, शाषाण, हिंगणे ही रीतसर दुसरी गावेच होती.

नळस्टॉपला बसचा शेवटचा स्टॉप (मला आठवत नाही, पण तो) मेहेंदळे गॅरेज पर्यंत गेला तेव्हा तिकडे राहणार्‍या नातेवाईकांनी आता तरी या आमच्याकडे अगदी घरापर्यंत बस येते असे सांगीतल्याचे आठवते आहे. त्यांचे घर लांब (!) म्हणून म्हणे नातेवाईकांचे जाणं व्हायचं नाही त्यांच्याकडे.

इतक्या सगळ्यांनी लिहिलेलं वाचून जुनं किती काय काय आठवतं सगळ्यांना, मला तर काहीच आठवत नाहीये असे म्हणत म्हणत आता मलाही आठवायला लागलंय एकेक Proud

रानडेच्या समोर २ मोठी झाडे होती आणि पी एम टी चा छोटासा बसथांबा. ईतके शांत वाटायचे तिथे. पालिकेने तोडली ती झाडे Sad
लंपन - हो हो ती दोन्ही झाडे पुर्ण पदपथ व्यापल्या जाणार्‍या भल्यामोठ्या बुंध्यांची वडाची झाडे होती. राष्ट्रकूल स्पर्धांच्या वेळेस केलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या वेळी त्यांची कत्तल केली गेली. Sad
(त्याच्या बरोबर मागेच हर्डीकर टायपिंग इंस्टीट्युट होते. जे त्या काळी खूपच नावाजलेले आणि प्रसिध्ह्द होते.)

पुण्यात झालेली दंगल (!) नाही का आठवते कुणाला

कोणत्या तरी मिरवणुकी नंतर लकी रेस्टॉरंट, कॅफे गुडलक आणि नटराज समोरचे कॅफे सनराईज ही जाळली होती. काही मित्र त्यावेळच्या धांदलीत सामील होऊन गोळ्या बिस्किटे लूटून आणल्याच्या फुशारक्या मारायचे. त्या जाळपोळीनंतर तावून सुलाखून ही सगळी ठिकाणं परत नव्या जोमाने चालूही झाली होती.

पण नंतर मात्र लकी सनराईज बंदच पडली. लाँग लिव्ह गुडलक Happy

Herdikar typing institute. My friend learnt typing there. It also had a lot of old trees. The footpath wS never straight. All sorts of roots . Right in the chowk there was is batvia medico. My friend lived in the lane next to vaishali. Bungalow right at the dead end. Amazing location.

हो, हर्डीकरच्या इथलं झाड पाडून रस्तारुंदीकरण झालं तेव्हा मी पुण्यात नव्हते. पुढच्या भेटीत तो रस्ता बघून खूप परका वाटला. अजूनही वाटतो. ओकाबोका आणि कोर्‍या चेहेर्‍याचा. मी पाच वर्षे ज्या रस्त्यावरून रोज जात असे तो तो नव्हेच असंच वाटतं... इतरही रस्ते बदलले आहेत, झाडं गेली आहेत, वेधशाळा चौक ते मंगला टॉकिज आख्खा रस्ताच न ओळखू येण्याइतका बदलला आहे. पण या रस्त्याबद्दल उगाच दु:ख झालं

कर्वे रस्त्याच्या सुरुवातीस, दुचाकी पुलाच्या पुढे आणि एमिएस कॉलेज च्या अलीकडे (गरवारे यांनी देणगी द्यायच्या आधी व नंतरही अनेक वर्षे हे कॉलेज महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी अर्थात एम ई एस च्या नावाने ओळखले जायचे ) गवत बाजार होता (जिथे रेल्वे रिझर्वेशन सेंटर आहे) तिथे बैलगाडीतून गवताचे हारेच्या हारे आणले जात उतरवले जात विकले जात. ही शेतकरी मंडळी मुळशी, पौड अशा भागातली असायची.
त्याच्या स मोर आता सह्याद्री हॉस्पीटल झालेय तिथे रिकामी जागा होती (एरंडाची आणि इतर रानटी झाडे असलेली) आणि आतल्या बाजूला एक रहिवासी इमारत होती. गरवारे शाळेच्या कुंपणाला लागून एक लोहाराची झोपडी होती (जिथे आता बिपीन आणि इतर खादाडीची दुकाने आहेत) तिथे मी बरेचदा रेंगाळत असे. तो भाता, ते लालबुंद लोखंड, बघता बघता आपल्या समोर त्याला मिळालेला वेगळा आकार / स्वरुप हे माझ्याकरता जादू पेक्षा वेगळे नव्हते. मी एकदा तो भाता चालवूनही पाहीला होता असेही आठवते.

स्वारगेटहून सुटणार्‍या मुळशी ला जाणार्‍या एस टीचा स्टॉप ही तिकडेच आसपास होता. त्या एसटीतून सकाळी दुधाच्या पित़ळेच्या घागरी घेऊन रतीबाकरता येणारी मंडळीही भरपूर होती. हीच मंडळी आंब्याच्या मोसमात गोड गावठी रायवळ आंबे घेऊन येत ते डझनावर नव्हे तर शेकड्यामधे विकले जात.

किती सुंदर धागा आहे! केवढं भरभरून लिहिताय तुम्ही सगळे _/\_
ह्यातलं काही काही पाहिलंय म्हणून ओळखीचं आहे, कितीतरी पाहिलं नाहीये तरी तुमच्यामुळे माहिती होतंय Happy

लाँग लिव्ह गुडलक >> अगदी! कॅफे सनराईजमध्ये एग पकोडे खायला जायचो. महानाझला समोसे. दोन्ही बंद झाल्याचं अजूनही वाईट वाटतं.

माझी पुण्याची सर्वात पहिली आणि लख्ख आठवण आहे ती म्हणजे कात्रजच्या बोगद्यातून बाहेर पडताना होणा-या पहिल्या पुणे दर्शनाची. त्यातही संध्याकाळनंतरच्या. तिथून दिसणारं पुणं तेव्हासारखंच आजही मनोहर आहे. वर्षागणिक लखलखाटाची तीव्रता आणि उंची वाढत चाललीये. तेव्हा सुट्टीसाठी पुण्यात शिरताना पहिलं दर्शन झालं की जाम हरखायला व्हायचं, अजूनही होतं Happy

तुम्हा सगळ्यांमुळे एकदम आवडत्या प्रदेशात टाईम मशीनथ्रू बुडी मारल्यासारखं झालंय Happy

Pages