आठवणीतलं पुणं

Submitted by चिनूक्स on 27 March, 2017 - 03:17

गेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.

जुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेशवेपार्कपाशी जिथे आता पुतळा बसविला आहे, तिथुन खरे तर पुढपर्यंत रस्ता होता व त्यास आंबिल ओढ्यावर पूलही होता, व तोच रस्ता आम्ही पर्वतीस जाण्यास वापरत असू. खरे तर तेव्हा अभिनव कॉलेजच्या चौकानंतर सुनसानच असायचे सगळे. पेशवेपार्कच्या रस्त्यावर तेव्हा एक भेळीचे "दुकान" पहिल्यांदाच झाले अन्यथा हातगाड्या असायच्या. पेशवेपार्कच्या सध्याच्या पार्किंगच्या जागेशेजारी तेव्हांचे पुण्यातील पहिले "पावभाजी" चे दुकान थाटले गेले होते, ज्यास आम्ही नाके मुरडत असू.
पर्वतीचा फ्लायओव्हर खुप नंतरचा. निलायम थेटर बांधले त्यांनंतर फ्लायओव्हर झाला, का दोनही थोड्याच काळाने झाले ते आठवत नाही.

स्वीट होम ची इडली सांबार आणि शेव हे विशेष होते. तशीच पेशवाई (कुमठेकर रस्ता) मधली "सेपरेट" नावानी ओळखली जाणारी मिसळ आमची आवडती खाद्ये होती.

हो, आणि खरं भेळ खायला जायचं तर ते शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणावर. मस्त सतरंज्या अंथरलेल्या असायच्या. त्यावर बसून गप्पा मारत मारत अंगत पंगत करून खायची. आईस्क्रीम खायचं कावरेमधे किंवा गणू शिंदे. किंवा मग द्वारकात. विजय टॉकिजकडून अलका कडे जायला लागलं की उजवीकडे होतं. सपे त राहायला आल्यावर भेळ खायची तर कल्पनाची असं समीकरण झालं. अगदीच कधीतरी नवरंग. इडली कायमच वाडेश्वरची. पॅटिस ग्रीन किंवा हिंदुस्थानचे.

पेशवेपार्कच्या सध्याच्या पार्किंगच्या जागेशेजारी तेव्हांचे पुण्यातील पहिले "पावभाजी" चे दुकान थाटले गेले होते, ज्यास आम्ही नाके मुरडत असू. > जयश्री का? फार फेमस होत की ते.

ना ग गोरे अगदी शाळेजवळ राहायचे. त्यामुळे त्यांना बरेच वेळा बघितलं होतं. प्र बा जोग हेही अवली व्यक्तिमत्व. त्यांची नात आमच्या वर्गात होती त्यामुळे त्यांना आम्ही एक छान मायाळू आजोबा याच भूमिकेत कायम बघितलं आहे. महादेवशास्त्री जोश्यांचं संस्कृतीकोशमंडळ होतं शनिवार पेठेत, वाघाच्या बोळात. तिथे कायम लोक ग्रंथांमधे डोकं खुपसून बसलेले असायचे आणि थोडे चिडकेच दिसायचे चेहेर्‍यावरून. शास्त्रीबुवा मात्र कायम हसतमुख असत.
सपे चा तोंडवळा ब्राह्मणी वाटत असला तरी कायमच तिथे सर्व समाजघटकांची पहिल्यापासून वस्ती आहे. लहानपणी आठवतंय तेव्हापासून सिधये तालमीपाशी दुर्गा आणि आणखी एक मांसाहारी खानावळी आहेत. त्यामुळे आता काही पेठीय जण, काय हे किती नॉनवेज हॉटेलं झालीत सपे त असं म्हणलं की हसू येतं....

चिनूक्स, मला आठवतंय तसं सारसबागेजवळ 'जयश्री' हॉटेलची पावभाजी पुण्यातली पहिली पावभाजी.
पावभाजी खायला जायचं म्हणजे इव्हेंट असायचा.

आईला सांगते या बाफाबद्दल. बदाबदा आठवणी सांगेल ती. पानशेतच्या पुराच्या वेळी आई १४-१५ वर्षांची होती, आणि तेव्हाच्या नूमवि को-एडच्या पहिल्या बॅचची, आणि सरकारच्या ११वी मॅट्रिकच्या शेवटच्या बॅचची विद्यार्थिनी. बुधवारात घर होतं.

आठवतंय तेव्हापासून सिधये तालमीपाशी दुर्गा आणि आणखी एक मांसाहारी खानावळी आहेत. त्यामुळे आता काही पेठीय जण, काय हे किती नॉनवेज हॉटेलं झालीत सपे त असं म्हणलं की हसू येतं....}}}
अगदी. नागपुरी देखील अनेक वर्षांपासून बघतोय.

तुळशीबागेतील "दवे स्वीट" आठवतंय का कुणाला? महाब्यांकेच्या मेंनगेट समोर होते. अप्रतिम ढोकळा व पापडी मिळायची. पापडीसीबत मिळणारेर तशी चटणी परत चाखली नाही. ते पण आता काळाच्या पडद्याआड गेले.

तुळशीबागेतील "दवे स्वीट" आठवतंय का कुणाला? >>>> दवे स्वीटवरून अनोखा केंद्र आठवले. मंडईकडे जाणार्‍या रस्त्यावर होते. अजूनही आहे बहुतेक. तिथेच जवळ शनिपारच्या चौकात मुरलीधर रसवंती होते. आता त्याचे ऑलमोस्ट रेस्टॉरंट झालेय :ड

आणी मग जक्कल-सुतार आणी कंपनीनं पुणं हादरवून सोडलं!! लोक भर दुपारी बाहेर एकटे पडायला घाबरायचे...!!
काही काही कोडी सुटलीच नाही....
त्या बिचार्‍या अलूरकरांचा शेवटही असा धक्का देउन गेला...!!
त्यांचे दुकान, कँपातलं एक्स्प्रेस बुक स्टॉल (एथे शास्त्रिय संगिताच्या कॅसेट्सचा खजिना होता), कँफे ना.ज, गुडलक कँफे, कँफे डिलाइट (वाडिया कॉलेजसमोर), पूना गेस्ट हाउस, जनसेवा, सुवर्णरेखा डायनिंग हॉल, मंडईतील शाल्मली, मार्जोरिन चटनी सँडविच......विरंगुळ्याची ठिकाणे...
(तानसेन नसलो तरी कानसेन असल्याने) सवाई गंधर्वच्या रात्रींची जागरणं (बिसमिल्लाहजींचे वादन पहाटे पहाटे समोर मांडी घालून बसुन ऐकण्याचा योग - त्यांच्या वादनाला रसिकांन्नी भरभरून दिलेली दाद - व त्यावर त्यांची 'गाना - बजाना-और पूना..म्हणून टिप्पणी ) करून पुन्हा दुसर्या दिवशी 'फुल टाईम' ड्युटी,
गेले ते दिन गेले.....

माझ्या आठवणीतल्या पुण्यात (१९७०) कर्वे रोड नळ स्टॉपला संपायचा >>> करिष्माचा रस्ता वगैरे काही नव्हतं तेव्हा. ८२-८३ साली शेतं होती तिथे. सध्याचा गिरिजा शंकर विहार, पोतनीस परिसर इथे सुद्धा शेतं होती. २-३ च सोसायट्या होत्या त्यातही प्रत्येक सोसायटीत जेमतेम ५-७ घरं.

नवसह्याद्री सिंहगड रोड ला जोडलेलं नव्हतं तेव्हा. नदीच्या पात्रात उतरूनच पलिकडे जाता यायचं तिथून. Happy आत्ताच्या चंद्रलोक गार्डनच्या मागे जे शंकराचं मंदिर आहे ते पडझड झालेलंच होतं तेव्हा. एकदम गूढ वगैरे वाटायचं तिथे. शिवाय नवसह्याद्रीमधे पण १-२ छोट्या छोट्या प्लॉट्समधे शेतं होती. डीपी रोड नव्हता.

तेव्हा कर्वेनगरमधे खूपदा लाइट जायचे. पण सहवास सोसायटी मधले लाइट्स कधीच जायचे नाहीत. आम्हाला तिथे राहाणार्‍या लोकांबद्दल एक छुपी असूया वाटायची तेव्हा Proud

आम्ही ८० साली कोथरुड ला रहायला गेलो तेव्हा कोथरुड म्हणजे कुठल्याकुठे गावाबाहेर असंच होतं. डेक्कन किंवा लक्श्मी रोड वरून रिक्षावाले तिथे यायला नाही म्हणायचे! आम्ही आताच्या कर्वे पुतळ्याच्या डावीकडे राहूलनगर जवळ रहायचो. कर्वे पुतळा, राहूल नगर हेही नव्हते तेव्हा तिथे. सगळा परिसर इतका मोकळा होता की आम्हाला वारज्याकडून कोथरुड ला येणारी जोडबस लांब दिसायची, तिने कर्वे नगर च्या टेकडीला वासा घातला की आम्ही पळत जाऊन कोथरूड च्या बस स्टॉप वर ती बस पकडलेली आहे कितीदा!! तेव्हा आताच्या कर्वे पुतळ्याकडून वारज्याला जाणारा मोठा रस्ताच नव्हता!! कर्वे रोड सरळ येऊन लोढा हॉस्पिटल, एक म्युनिसिपाल्टीची शाळा आणि शिवाजी पुतळा आहे तिथे जायचा. शिवाजीपुतळ्याजवळ कोथरुड बस स्टँड होता. तिथून गावात जायला एकमेव १४४ नंबर ची बस होती.
निवांत दिवस होते ते!

>>आणी मग जक्कल-सुतार आणी कंपनीनं पुणं हादरवून सोडलं!! लोक भर दुपारी बाहेर एकटे पडायला घाबरायचे...!!
काही काही कोडी सुटलीच नाही....

कोणती कोडी?

बेस्ट धागा!!

वरदा, "रेणुका स्वरूपमधे सवाई व्हायचा त्यामुळे मध्यरात्रीनंतर बराचसा ऐकू यायचा घरी." - सवाई गंधर्व चं माहीत नाही, पण भावसरगम व्हायचा रेणुकास्वरूप च्या ग्राऊंड वर. शेजारच्या सहा मजली ईमारतीत मित्राच्या मावशीच्या फ्लॅट च्या बाल्कनीमधून तो बघितल्याचा आठवणी आहेत.

"शिवाजीपुतळ्याजवळ कोथरुड बस स्टँड होता. तिथून गावात जायला एकमेव १४४ नंबर ची बस होती." - त्या १४४ नंबर ने बरेच वेळा मी शाळेतून आजीकडे जायचो. विश्रामबागवाडा स्टॉप होता.

मी खुप वर्ष "खडकमाळ आळी" मध्ये होतो राहायला... तिथुन जवळच हिराबाग चौक आहे ( खडकमाळ कडुन सारसबागेकडे जाताना ) जिथे सकाळी ठराविक वेळी एक स्टॉल लागायचा "पोहे आणि सांबरचा"...

काय अप्रतीम चव... (तो स्टॉल एक तास चालायचा फक्त, कारण सगळ संपायच त्याच एक तासात... ) एवढ जग फिरलो पण त्या पोहे आणि सांबरची चव ना विसरताआली ना परत कुठे सापडली...!!!!

मस्त धागा!

१४४ नं ची बस म्हणजे पीएमटी ने नंबर्स बदलले त्यानंतरची असावी. आधी फार फार तर दोन आकडी असत. डेक्कन जिमखान्यावर जुन्या डेमलर बेन्झ चा लोगो असलेल्या पीएमटी बसेस पाहिलेल्या लक्षात आहेत. टाटा मधे जेव्हा आम्हाला टाटाचा जुना बेन्झशी संबंध कळला तेव्हा त्या लोगोचे कारणही कळाले.

तेव्हा शाळेत सायकलने जाउ लागायच्या आधी बसने भरपूर फिरल्याने बसेस "ओळखीच्या" झाल्या होत्या. साधारण एका रूट वर त्याच दोन तीन बसेस असल्याने बस लांबून पाहून सुद्धा "आपली" आहे का कळत असे. पीएमटी ने बस च्या बॉडी मधे केलेले थोडेफार फेरफरक सुद्धा आमच्या लक्षात असत. त्या वेळेला इन्टरेस्टिम्ग वाटत.
-अगदी जुन्या बेन्झ चा लोगो वाल्या
-सर्वसाधारण नवीन टाटा चा (म्हणजे आता टाटा चा जुना लोगो असलेल्या, कारण टाटाचा लोगो ही गेल्या १५ वर्षांत बदलला आहे)
- आपण येथे Proud काढतो तसा तोंडवळा असलेल्या
- पुढे व मागे रूट नंबर असलेल्या
- मागे च्या ऐवजी मागच्या दाराच्या वर ती खिडकी असलेल्या. या मागून "टकल्या" दिसत Happy
- वेगळी बॉडी असलेल्या, साइज ने लहान असलेल्या नवीन बसेस
- जोडबस. नक्की कोणत्या रूट्स वर होत्या लक्षात नाही, पण अनेकदा गेलेलो आहे.
- वेगळी ड्रायव्हर कॅब वाल्या ड्बल डेकर्स - या फक्त कॉर्पोरेशन लाच दिसत
- बिन कॅब च्या डबल डेकर्स

सवाई गंधर्व रमणबागेच्या ग्राऊंडवर व्हायचा मला आठवतंय तसं. नंतर रेणुका स्वरूपला व्हायला लागला का? का आधी तिकडे व्हायचा?
आम्ही आधी पानमळ्यात राहायचो. महाराष्ट्र बँकेची सोसायटी समोर होती. उजवीकडे आंबील ओढा. नंतर ७८ मधे सहकारनगरला मूव्ह झालो. एकदम गावाबाहेर. घरामागून तळजाई डोंगरावर जाता यायचं. पहाटे मोराचा आवाज यायचा. मोरही दिसायचे कधी कधी. तिथला ठुबे बंगला भूत बंगला म्हणून प्रसिद्ध होता. कधी हिंमत झाली नाही बंगल्याजवळ जायची. लांबून घाई घाईनं तळजाईकडं जायचो. तळजाईचं पिटुकलं देऊळ, तिथे राहणारा पुजारी, मागचं तळं - एकदम निवांत होतं सगळं. आता बरीच वर्षं झालीत, तळजाईला गेले नाहीये. पर्वतीला जायला शाहू कॉलेजच्या मागून शॉर्टकट होता. तुळशीबागवाले कॉलनीतून जायचो तिकडे.

लहानपणी पाहिलेले व नंतर गायब झालेले काही लॅण्डमार्क्स व पॅटर्न्स

- विद्यापीठ गेट चे कारंजे
- गुडलक चौकातील कारंजे
- अलका टॉ़कीज चौकातला पुतळा. येथेही कारंजे होते का? लक्षात नाही.
- अलका कडून कुंटे चौकाकडे वाहतूकीची दिशा असलेला लक्ष्मी रोड. दुहेरी कुमठेकर रोड.
- डेक्कन जिमखान्यावरचा फाटा आहे तेथे भुयारी मार्ग होण्याआधीचा चेहरा
- डेक्कन व संभाजी पार्क जवळचे ते कॉजवे
- रेल्वे स्टेशन समोरचा या बांधकामाच्या आधीचा भाग
- नटराज, डेक्कन, भानूविलास, श्रीनाथ, जुने राहुल,
- बांधकामे होण्याआधीची मोकळी पीवायसी, डेक्कन वगैरे ग्राउण्ड्स
- दोन्ही बाजूला पूर्ण मोकळी जमीन असलेला सेनापती बापट रस्ता. बालभारती, सिम्बायोसिस, शेती महामंडळ नंतर तुरळक एखाद दोन घरे व कमर्शियल बिल्डिंग्ज होत्या फक्त पार चतु:शृंगी पर्यंत. आता जेथे मेरियट वगैरे आहे तेथे क्रिकेट मॅचेस खेळल्याचे आठवते.

आणि बिगेस्ट नॉस्टॅल्जिया - चतु:शृंगी ची जत्रा!

फा, तुझा क्रिकेट चा उल्लेख आणी सहकारनगर, तळजाई वरून तळजाई वर सकाळी सकाळी खेळलेल्या क्रिकेट च्या मॅचेस आठवल्या. तसच ते एक SCG (सहकारनगर क्रिकेट ग्राऊंड) होतं. तिथेही भरपूर क्रिकेट खेळलोय. स्ट्रेट बाऊंड्री च्या बाहेर एक मोठी विहीर होती.

तळजाई च्या भूत बंगल्यापाशी लहानपणी नाही, पण ईंजिनियरींग ला असताना बरेच वेळा जायचो.

अंजली, सवाई गंधर्व आधी रेणुका स्वरुपला होत असे. आता ते रमणबागेत होते. रेणुका स्वरुप हे नाव यायच्या आधी शाळा मुलींचे भावेस्कूल म्हणून ओळखली जायची.

वरदा म्हणते त्या लिमयेवाडीतल्या शंकराच्या देवळाबद्दल वाचून अगदी नॉस्टॅल्जिक झालं. इतकं साधं आणि नितांत शांत असं ते मंदिर फार आवडायचं.

राहुल थिएटरच्या बाजूला (आता संचेती वगैरे आहे तिथे) सगळं मोकळंच होतं. स्टारवॉर्स (वरिजिनल) बघायला गेलेलो असताना बाहेर धुवांधार पाऊस झाला होता. मग रिक्षा मिळेना तेव्हा टांग्यात बसून घरी आलो होतो. राहुलला नियमाने चार्ली चॅप्लिन, लॉरेल हार्डी इ. च्या सिनेमांचे लहान मुलांसाठी सुट्टीत फेस्टिवल्स होत असत. अगदी नियमाने बघायला जायचो. तेव्हा वेस्टेण्ड दुरुस्तीसाठी म्हणून बंदच होतं किती वर्षं.

फेरफटका - तळजाई -- अरे.... काय आठवणी आहेत तिथल्या... मस्तच... मला तळजाई खुपच आवडते.. आम्ही केव्हा केव्हा पर्वती ते तळजाई अस भटकत जायचो.. मोर वगेरे दिसायचे ...

वरदा राहुल थिएटर -- च्या आठवणीने तर मन हरखुन गेल.. मित्रांच्या ग्रुप सोबत किती सिनेमे पाहिले तिथे...

( अत्ता विमान पकडुन परत याव वाटत.. नको या धाग्यावर परत यायला... तुम्ही सगळे मन कासाविस करणार लिहीताय !! )... Happy

मी पुण्यात डेक्कनला प्रभात रोड गल्ली क्र. ४ मधे रहात होतो. फर्ग्युसन रोडला ओफिस होते. ब्रिटिश लायब्ररी समोर किर्लोस्कर कन्सल्टंट. Those were the best days of my life पण फक्त पगार खुप कमी होता म्हणुन पुणे सोडल. Happy

वा ! माझं पुणं......मस्त आठवणी,

वाड्यातली घरं, सकाळी साडेदहा अकरालाच चिंचगुळाच्या भाजीचा आमटीचा दरवळ.
१. भानुविलास टॉकीजपशी मिळणारी कोहिनूर किंवा नवरत्न भेळ
२. रात्री दहानंतर सामसूम झाल्यानंतर बालगंधर्व पुलावर पेटी-तबला वगैरे शिस्तीत मांडून जमवलेली गाण्याची मैफल,
गणपतीतले केसरीवाड्यातले व दगडुशेठचे गाण्याचे कार्यक्रम
३. मथुराची पाव भाजी रु. ११, सुजाता मस्तानी रु ६ फक्त
४. दर रविवारी वडिलधार्‍यांबरोबर मंडईतली चक्कर, कावरे/ गणु शिंदे/बुवा/स्वीट होम/जनसेवाचे आइस्क्रीम
५. राजा आइसेस, अनुपमचा काजुकंद
६. शनि-नारा मधे सासवडकरकडचे पुजा साहित्य, केशवलक्ष्मी प्रसाधन उर्फ केप्रचे दुकान, बोधेचे लंगोटाचे दुकान (दुकानाबाहेर लंगोट टांगलेले असत ), शनिवारात एक स्टोव्ह रिपेअरचे दुकान व त्याच्याकडचा बोलणारा पोपट
७. बालगंधर्वच्या आतल्या तिकीट-विक्रीच्या बाजूच्या डिसप्ल्रेच्या काचेला नाक लावून तल्लीन होऊन पहिलेले एन्टर्टेनर्स व तत्सम ऑर्केस्ट्राचे फोटो. अनेक वर्षे तेच फोटो तिथे होते पण आम्ही ते तितक्याच मजेने बघायचो.
८. अष्टभुजेच्या कॉजवेवर बायका धुणे धुवायच्या. त्यांच्या काचेच्या बांगड्यांचे खूप तुकडे तिथे असायचे. आम्ही ते कॅलिडिओस्कोपसाठी गोळा करून आणायचो.
९. रमणबागेच्या बाहेर मिळणारी सूर्यकांत कुल्फी
१०. सुट्टीत शनिवार वाड्यात रोज सकाळी ७ ला जावून वेचलेली बकुळीची फुले
११. ३० पैशाला कोणतीही पालेभाजी
१२. ५ पैसे प्रत्येकी कोथिंबीर व मिरचीचा वाटा
१३ अक्षर भांडारमधे बसून वाचलेली अनेक पुस्तके
१४. गोखले हॉल - तेव्हा तिथे सदा न कदा प्रदर्शने नसत.
१५. एक फेमस कोडे होते आम्चे - अ आणि ब टिळक रोड वरून चाललोय. आणि त्यांनी पैज लावली व ब ती हरला, तर अ कोणते गाणे म्हणेल?( उत्तर - बहरला पारिजात दारी, पक्षी:पारिजात डिपार्टमेंटल स्टोअर्स)
१६. स. प. कॉलेजसमोरचा पम्मू हलवाई, सुट्टीत रोज सकाळी सकाळी पर्वती....
१७. भरत नाट्य मधली बालनाट्ये, जयंत तारे आणि मंडळींची
१८. आई/आत्या/मावश्या/माम्यांबरोबर डोळे पुसत पुसत पाहिलेले प्रभात व लि. ना. चिं. मं मधील मॅटीनी शोज (मराठी सिनेमे)
१९. भटांच्या बोळाच्या बाहेर दिवसा क्ल्हई चे व रात्री भज्यांचे दुकान
२०. पळी- पंचपात्री घेऊन पुजेसाठी जाताना-येतान दिसणारे गुरुजी
२१. आघाडा- दुर्वा- फुलं ची आरोळी

मला रिक्षाचं भाडं किमान ८० पैसे होतं ते आठवतं आहे. वाढून एक रु. वीस पैसे झालं म्हणून किती वाढवले पैसे असंही लोक म्हणत ते आठवलं Proud

मी मुंबईचा. माझी सासुरवाडी पुण्याची. त्यामुळे पुण्याला नेहमी जाणं झालंय. पुण्याचं एक मला नेहमी आश्चर्य वाटत आलंय कि तेथील दुकानांची नावे हि त्याच्या मालकांच्या आडनावावरून असतात. उदा. चितळे, कावरे, गाडगीळ, बुधानीचे वेफर्स इ. मोठी दुकाने तर राहू द्या. अगदी पिठाची गिरणीवाल्या दुकानाचं नावही 'कचरे पिठाची गिरणी' त्यावरूनही नेहमी एक विनोद ऐकू यायचा. "अरे जा रे! जरा बघून ये, तो 'कचरे' उघडा आहे का ते!!!!" Rofl

Pages