माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल बिघड्लेले शन्कर् पाळे सुधरवले. मस्त झाले. मनापासुन धन्यवाद. ( खरच काल सकाळ पर्यन्त पिट फेकुन देन्यास मनाचि त्यारि करत होते.)

मी मागच्या महिन्यात बीडाचा तवा आणलाय तो गॅसवर ठेऊन तेल टाकुन तयार केला ़ ़ ़ काल त्यावर धिरडि केली तर सगळी चिकटली ़ काय चुकतय Sad

माझे फोडणीचे पोहे मागचे दोन्ही वेळेला चांगले झाले नाहीत (पहिल्या वेळेला असं बाकीचे लोक म्हणे आणि दुसर्‍या वेळेला माझ्याही मते .. पहिल्या वेळेला कौतुकाने खाऊ घातलेल्या लोकांनीं नाउमेद केलं तर आता जवळ जवळ ८-१० महिन्यांनीं मी परत पोहे करण्याचा घाट घातला ..)

तर पोहे भिजवण्यात काहीतरी गडबड होतेय .. ज्या पद्धतीने पोहे करायला मातोश्रींकडून शिकले तसंच करत आलेय .. सगळं चिरून/कापून तयारी करून ठेवायची मग तेल तापत ठेवायचं आणि एका बाजूला पोहे धुऊन (हलकेसे चोळून ओले होतील व्यवस्थित) ठेवून द्यायचे निथळत .. मग फोडणी करून कांदा, बटाटा परतून शिजत ठेवायचा कव्हर करून .. इकडच्या बटाट्यांनां कधी कधी जास्त वेळ लागतो शिजायला असा माझा अनुभव आहे .. तसा वर लिहीलंय त्याप्रमाणे दुसर्‍या वेळेस लागला) .. मग फोडणीतले पदार्ठ शिजले की पोहे मीठ, साखरेसकट घालायचे त्यावर आणि परतून चांगली वाफ काढायची .. परत एकदा परतून गॅस बंद करून दोन मिनीटं परत झाकून ठेवायचे की सर्व्ह करायला तयार ..

पहिल्या वेळी खाणारी लोकं म्हणे टसटशीत , कोरडे झालेत .. मला तसं वाटलं नाही पण ते जाऊ दे .. आणि दुसर्‍या वेळी बटाटा शिजेपर्यंत थोडा जास्त वेळ गेला तर पोह्यांचा गचका गोळा! :|

तर माजं काय चुकतंय? (की पोह्यांच्या ब्रँडवर दोष ढकलून द्यावा? Wink

हो मला तरी पोह्याच्या ब्रँड चा प्रॉब्लेम वाटत आहे. मला असे अनुभव आलेत पूर्वी. अचानक नविन पॅक आणल्यावर पोहे जमेनासे झालेत का हे आठवून पहा. तुझे पोहे आधी जमत असतील आणि विनाकारणच जमेनासे झाले असल्यास सरळ एक नवा लहान पॅक आण आणि करून बघ.

माझी फोडणीचे पोहे करायची पद्धत अशी-
पहिल्यांदा बटाटा चिरून (युकॉन गोल्ड) पाण्यात घालून ठेवायचा. बाकी जिन्नस- कांदा, कोबी, मिरच्या, कोथिंबीर इ. चिरून ठेवायचे. मग फोडणीत हे सगळं टाकायचं. शिजत आलंय असं वाटल्यावर मगच जाडे पोहे धुवून (भिजवून नाही) घ्यायचे. हाताला मऊसर/ओलसर लागत असतानाच फोडणीत टाकायचे. पोह्यांचा ब्रँड कोणताही असतो.

स्वादचे थिक पोहे एकदा धुवून निथळत ठेवायचे आणि मग कांदा-बिंदा चिरायला घ्यायचा. ते झालं की फोडणी करायच्या आधी पुन्हा एकदा पोहे धुवून निथळत ठेवायचे. मग फोडणी-दाणे-इ. सोपस्कार करायचे. पोहे सुटे पण मऊ होतात. आणि तेल चमचाभर जास्त घाल Happy

तू थिन पोहे आणतेस का?

सशल मी पोहे एक २ मिनिटे ठेवते पाण्यात आणि मग चाळणीत निथळत ठेवते. ब्रँड प्रमाणे बदलू शकत ग हे. दुसरा ब्रँड आणुन बघ.

हो सशल मला ही एकदा असाच अनुभव आला होता. एक पॅकच खराब (?) होते. पोहे भिजवण्यामधे अ‍ॅडजस्ट करावे लागेल.

मला सध्या मटकीच्या उसळीमधे प्रॉब्लेम येतोय. मोड येण्याआधीच उसळ आंबतेय. काय चुकत असेल?

पोहे टचटचित कोरडे वाटले तर मी सरळ पाण्याचा हबका मारुन मावेत गरम करते. जास्त भिजून गिच्चा होण्यापेक्षा मावेतून काढणे बरे पडते.

>> तू थिन पोहे आणतेस का?

नाही जाड पोहेच वापरते पोहे करण्याकरता ..

आता अजून एकदा फार फारतर दोनदा ट्राय करेन आणि तरिही कुरबुरी ऐकल्या कोणाकडून तर पुढच्या वेळी फक्त आणि फक्त स्वार्थाकरता, नो परमार्थ .. Wink

धन्यवाद सगळ्यांनां .. Happy

आदिति, मटकी एकदा भिजवायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायची. आणि मग मोड आणण्यासाठी ठेवतानाही परत धुवायची. मोड आणण्यासाठी जास्त वेळ ठेवत असाल तर परत एकदा हलक्या हाताने धुवायची.
त्यासाठी वापरयाचे भांडे, चाळण व फडके सगळेच एकदा चांगले धुवून वाळवून घ्या.

मटकी धुताना त्या पाण्यात किंचीत व्हीनीगर टाकले व नंतर स्वच्छ धुवून टाकले तर आंबणार नाही.

आंबतेय म्हणजे काय होतेय? बुरशी येते का त्यावर? कोमट पाण्यात भिजवत असाल तर चिकट होत असेल मटकी.

सशल, हे ब्रँडवरच अवलंबून आहे. मी चाळणीत पोहे कधीच निथळवत नाही. पातेलीतच ठेवते. दरवेळी जाडेच पोहे असले तरी कधी लगेच पूर्ण पाणी काढून टाकून ठेवले तर चांगले होतात तर कधी किंचित पाणी त्यात ठेवावं लागतं तर फोडणीला घालेपर्यंत ते त्यात मुरुन पोहे मऊ होतात. नवीन पाकीट आणले की एकदा अंदाज घेत जा.
शिवाय भाज्या हव्या तेवढ्या शिजल्यावरच पोहे घालायचे.एकदा पोहे घालून ढवळले की गॅस फार चालू ठेवायचा नाही. तसे केले तरी वातड होतात.

जाडे पोहे चाळणीत धुऊन निथळत ठेवायचे. कांदा-बटाटा शिजत आले की पोह्यांवर मीठ + साखर घालून फोडणीत पोहे घाला.गॅस मंद आचेवर ठेवून १ वाफ आणा.
जाड्या पोहयातही दोन प्रकार असतात.एक नेहमीचे, वरीलप्रमाणे केल्यास नीट होतात.दुसरे पोहे हातात घेतल्यास त्यांचा थिकनेस जाणवतो .ते पोहे भांडयात १० मिनिटे भिजवावे लागतात.नंतर मुठीने पिळून निथळ्त ठेवावे लागतात. हे पोहे थोडे घेतले,तरी पुरेसे होतात आणि टेस्टी लागतात.

दिनेशदा, भांडे, चाळण बदलुन बघितल. हल्ली थंडी मुळे मोड आणण्यासाठी जास्त वेळ ठेवावे लागते. मधे एकदोन्दा धुउन घेते. पण तरी आंबट वास राहातोच. व्हीनीगरच करुन बघते.

सिंडरेला, भिजवतांना मी कोमट पाण्यातच भिजवते. आधीही भिजवायचे पन हा प्रॉब्लेम आता रिसेन्ट्ली सुरु झालाय. आधी मस्त १/२, १ से. मी. चे मोड यायचे. :((
बुरशी नाही आली अजुन पण थोडी आंबाय्ला लागली की मी मोड न येउ देताच भाजी करुन टाकते.

मला सध्या मटकीच्या उसळीमधे प्रॉब्लेम येतोय. मोड येण्याआधीच उसळ आंबतेय. >>>>> हा मलाही १-२ वेळा प्रॉब्लेम आला होता. मी त्यावेळी चाळणीत ,मटकी उपसून ठेवायची.त्यावेळी मटकी बुळ्बुळीत लागायची आणि आंबूस वासही यायचा.आता नेटच्या पिशवीत भिजवलेले कडधान्य घालते.पाणी निथळले की पेपरवर ती पिशवी रात्रभर ठेवते.त्यावर काहीही झाकत नाही.

पोहे हा माझ्या बाबतीत पण कधी खुषी कधी गम प्रकार आहे.
थोडेसे केले तर मस्तं होतात. जास्तं लोकांसाठी केले की हमखास चुकतात.
त्यात प्रत्येकवेळी नव्यानव्या इनोवेटिव प्रकारे चुकतात. कधी गोळा, कधी कडक, कधी पोह्यांची मूळ चवच खराब, कधी कांदाच जास्तं शिजतो इ इ.
सध्या मी या पोहा उपमा प्रकारांना सुट्टी देवून रविवारी वेगवेगळे कटलेट्स वगैरे बनवते ब्रेकफास्टला.
सुगरणपणाची झाकली मूठ रहाते.
Happy

त्यात प्रत्येकवेळी नव्यानव्या इनोवेटिव प्रकारे चुकतात. कधी गोळा, कधी कडक, >>> साती Proud
माझ्या एका मैत्रीणीने पण पोहे करायचे सोडून दिलेय या प्रकारांपायी Happy

जाड्या पोहयातही दोन प्रकार असतात.एक नेहमीचे, वरीलप्रमाणे केल्यास नीट होतात.दुसरे पोहे हातात घेतल्यास त्यांचा थिकनेस जाणवतो .>>+१ मला हे जाणवलं आहे. इंग्रो मध्ये जे जाडे पोहे नावने मिळतात ते पण दिसायला तसे पातळच वाटतात मला... ते फारच कमी भिजवावे लागतात. जस्ट नुसते एकदा धुवून चाळनीत निथळणे..

इंदोरी पोहे मिळतात बाजारात. ते आणा( आमच्या गावचे आहेत)
कधी पोहे चुकणार नाहीत.
जरा जाडसरच असतात इतर पोह्यांपेक्षा. पण चव मस्त असते.

किसलेल्या / वाफवलेल्या भाज्या + उकडलेला बटाटा + इतर मालमसाला घालून त्याला कटलेटचा शेप देऊन रव्यात घोळवून शॅलो फ्राय करायचं. या पध्दतीने केलेले माझे कटलेट कायम आतून ओले राहतात. जास्त वेळ तव्यावर ठेवले तर रव्याचं कोटिंग जळतं पण कटलेट ओलेच राहतात, पटकन तुटून येतात. मी त्यात ब्रेडचा चुरा मिक्सरमध्ये करुन तोही घालून बघितलाय पण काही फरक नाही. माझं काय चुकतंय?

तसं माझं काही चुकलं नाहीये ( चुकीचा दुधी उचलून आणण्याव्यतिरिक्त ! ) पण प्रश्न कुठे विचारावा कळलं नाही.

आत्ता दुधीची भाजी केलीय. नेहेमीसारखी लसूण आणि दाण्याचं कूट घालून. दुधी कडू आहे निघालाय ( पहिल्यांदाच ) !
मध्ये व्हॉअ‍ॅवर कुणीतरी कडूजहर दुधीचा रस प्यायल्याने त्याला विषबाधा झाली वगैरे मेसेज फिरत होता Uhoh आता ही कडसर असलेली दुधीची भाजी सरळ टाकून द्यावी का ? दुधी कडूजहर नाही. कारल्याइतका कडू नाही पण कडवटपणा आहे.

हो अगो, टाकूनच द्यावी. विषबाधा नाही झाली तरी भयंकर त्रास होऊ शकतो.
जो कडू दूधी असतो त्याचा तर घासही तोंडात घेववत नाही.. हा कमी कडू आहे तरी रिस्क नकोच.

Pages