सारख्या अर्थाचे पण वेगळी छटा दर्शवणारे मराठी/ इंग्रजी शब्द

Submitted by सिम्बा on 22 November, 2016 - 11:10

काही दिवसा पूर्वी मुलीबरोबर बाहेर चाललो होतो डोक्यावरून पक्ष्यांचा थवा चिवचिवत गेला,
मुलगी म्हणाली “बाबा तो बघ पक्ष्यांचा थवा” इंग्लिश मीडियम च्या ६ वर्षांच्या मुलीने बरोबर शब्द वापरलेला ऐकून मलाच बर वाटलं. पण लगेच आपण मुलीचा मराठीशी संपर्क तुटू दिला नाही आहे म्हणून स्वत: भोवती आरती ओवाळून घेण्याची अनिवार इच्छा झाली आणी तिला पुढचा प्रश्न विचारला ” पक्ष्यांचा थवा, तसा फुलांचा..???” उत्तर आला “सडा” खरतर उत्तर चुकलं नव्हते, पण मला “फुलांचा गुच्छ” अपेक्षित होते.
फुलांचा सडा आणी फुलांचा गुच्छ यातला फरक सांगताना अजून शब्द समोर आले
१) सडा- गळून पडलेली फुले/ वस्तू, जिचा मूळ झाडा / बॉडी बरोबर संबंध संपला आहे, बकुळीचा सडा/ खूप केस गळले तर केसांचा सडा
२) गुच्छ:- साधारण सारख्या गोष्टींचा समूह, पण या गोष्टी मुळ बॉडी पासून दूर केली आहेत (वेग वेगळी फुले तोडून गुच्छ बनवला)
३) ताटवा :- एकत्रित असलेली जिवंत फुले.
४) घोस:- शक्यतो झाडावर असलेली सजातीय फुले.
५) हारा :- रचून ठेवलेली तोडलेली फुले. (नुसताच हारा म्हणजे ढीग बहुतेक)

हे सगळे तिला समजावून सांगणे माझ्या कुवतीबाहेरचे काम आहे हे मला समजले.
मात्र मराठीत इतक्या बारकाईने शब्द प्रयोग करणारे आपण इंग्लिश मध्ये फक्त बुके, किंवा बंच ऑफ फ्लॉवर म्हणून वेळ निभाऊन नेतो हे सुद्धा कळले.
परवा तिच्या वाचनालयातून आणलेले grolier सेरीज चे पुस्तक पहिले आणी परत हा इंग्लिश बद्दलचा न्यूनगंड जागा झाला, कारण त्यात काही शब्दांच्या बर्याच छटा त्यांनी दाखवल्या आहेत.
जसे jump – hop- pounce- bounce- leap
fly- flutter- glide- hover- swoop
असे अर्थवाही इंग्रजी शब्द आणी त्यांचे नेमके मराठी प्रतिशब्द यांचा संग्रह करण्या साठी हा धागा.
प्रतीसादामध्ये ब्रोड्ली सारखा अर्थ मात्र वेगळी छटा दाखवणारे शब्द लिहावेत, (मराठी अथवा इंग्रजी) अर्थ माहित असल्यास तो हि लिहावा, जाणकार आपल्याला सुधारणा सुचावतीलच.

असा धागा आधीच असेल तर मला सांगा हे डिस्कशन तिकडे करू या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दम जोम शक्ती ताकद जोश उत्साह स्फुर्ती दमसास

विशिष्ट जाहिरातींमधले बरेच शब्द एकत्र आलेत असं मला अचानकच जाणवलंय ! Proud

टण्या..

कसा लांबरुंद पिकला बिभा, त्याची कुठवर ठेवशील निगा ?
सुरेख वस्तू म्हणजे आवडणार जगा.
याला कुंपण घालशील किती, जात चोराची लई हिकमती
आपली आपणच धरावी भिती
अर्ध्या राती, घालतील घाला...... कोल्हा !!!!!

इंग्रज जगभरात अनेक ठिकाणी गेले. त्या त्या ठिकाणच्या भाषा, संकल्पना, शब्द त्यांनी आपल्या भाषेत सामावून घेतले आणि ती भाषा समृद्ध केली. आज त्याच्या भाषेतले बहुतांश शब्द परकीय आहेत मनोरंजन म्हणून इंग्रजीत सामावले गेलेले काही भारतीय शब्द पाहू. –

ह्यातले काही फारसी आहेत, कारण राज्यव्यवहाराची भाषा म्हणून फारसी भाषा अनेक वर्षे प्रचलित असल्याने सर्वच भारतीय भाषांवर फारसीचा प्रभाव होता.

शर्करा हा मूळ संस्कृत शब्द अनेक रुपात फिरून शुगर म्हणून इंग्रजीत स्थिरावला. (शक्कर- फारशी, झुकेर– इटालियन, त्सुकर – जर्मन इ.) अल किंवा एल अशा तुकड्यांनी सुरु होणारे बरेच इंग्रजी शब्द मूळचे फारसी किंवा भारतातून फारसीत जाऊन मग इंग्रजीत गेले आहेत. राम बाण उपाय ह्या अर्थाने वापरला अक्सीर इलाज मधला अक्सीर हा इंग्रजीत Elixir म्हणजे अमृत म्हणून वापरला जातो. रसायनशास्त्र पूर्वी भारतात प्रचलित होते, जादू सारख्या वाटणाऱ्या ह्या क्रियांना सामान्य लोक किमया समजतं. तीच अरबांनी अल( दैवी) किमया केली आणि इंग्रजीत त्याची Alchemy झाली.

पूर्वी व्यापार करताना इकडून तिकडे नेताना बराचसा माल खराब होत असे. अशावेळी चांगला राहिलेला माल आणि खराब झालेला माल ह्यांची सरासरी काढून दर ठरवतं . खराब माल म्हणजे आवारा माल त्याची आणि उरलेल्या चांगल्या मालाची सरासरी म्हणजे average.

बंगला म्हणजे बैठे घर, हा भारतीय शब्द पण इंग्रजीत two stored bungalow कुणी चूक मानत नाही. शोरबा म्हणजे काढा किंवा अर्क त्यावरून syrup आला तर चंपी वरून shampoo. Tamarind म्हणजे चिंच! व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या अरबांना त्यांच्या खजूर आणि आपल्या चिंचेत काय साम्य जाणवले कुणास ठावूक? पण भारताचा खजूर असे तिचे त्यांनी तमार-इ-हिंद असे नामकरण केले, त्याची इंग्रजीत Tamarind झाली. कापूर (Camphor), चंदन (Sandal), पिप्पली-मल्याळी (Pepper), इंजीयर-मल्याळी(Ginger), असे कितीतरी इंग्रजी शब्द मूळ भारतीय आहेत.

बनिया, शिपाई, गुरु, बझार,कुली,असे शब्द तर जसे च्या तसे इंग्रजीत वापरले जातात. आपण भारतीय म्हणून आपल्याला हे माहित आहे पण Window, porch, portico, mango हे शब्द मूळचे पोर्तुगीज आहेत हे आपल्याला फारसे माहिती नसते. एव्हढच कशाला, आपण एखाद्या गोष्टीला काडीचीही किंमत देत नाही ह्या अर्थी इंग्रजी मध्ये I care a damn असे जे म्हणतो त्यातील damn हा चक्क भारतीय मराठी शब्द आहे. दाम हे पूर्वी अत्यंत हलके नाणे किंवा चलन होते. छदाम म्हणजे ६ दाम म्हणजेच अर्धा पैसा इतके हलके, तेवढीहि किंमत आपण कशाला देत नाही ह्या अर्थी तो I care a damn वापरला जातो.

आदित्य, चांगली माहिती.

अरेबिक ते इंग्लिश असा प्रवास केलेले दोन नित्याचे शब्द सांगतो :
१. अल कुहल चे alcohol
२. अल जिब्र चे algebra.

@ अदित्य श्रीपद, छान माहिती दिलीत. मी फार प्रभावित झालो आहे. आपणांकडे असलेल्या ज्ञानाला माझा नमस्कार.

आदित्य,
छान माहिती..

कॅमेरा हा शब्द पण अल कमरा या फारशी शब्दावरून आलाय. कमरा म्हणजे खोली / रुम ! एका अंधार्‍या खोलीच्या भिंतीला लहानसे छिद्र पाडून तिच्या विरुद्ध बाजूच्या भिंतीवर प्रतिमा मिळवायचा प्रयत्न.

मारेकर्‍यांना हशीश देऊन, त्यांच्याकडून करवल्या जाणार्‍या हत्या... त्यावरुन असासीन.. हा शब्द आलाय.

विलायत, मैदान, हवा, तारीख, ईसम, तफसील, खर्बान, शराब ( वेगळ्या अर्थाने ) असे कितीतरी ओळखीचे शब्द आजच्या अरेबिक मधे पण आहेत.

आदित्य छान माहिती.

पण banglow म्हणजे इंग्रजीतसुद्धा बैठे घरच. घराला दोन मजले असतील तर त्याला banglow म्हणत नाहीत सरळ two storey house म्हणतात.

@सिम्बा - हा धागा दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.
फारच उत्तम धागा आहे हा! यातली काही माहिती नवीन आहे. ज्ञानात भर पडली.
समविचारी धागे एकमेकांशी जुळावे म्हणून माझा एक लेख इथे अर्कायव्हलसाठी सामील करतो आहे. https://www.maayboli.com/node/64723

डेरा म्हणजे रांजण आणि डेरेदार वृक्ष म्हणजे गोलाकार, रांजण आकारातील झाड. शक्यतो वड, पिंपळ, आंबा
बाभूळ कशी डेरेदार आहे असे म्हणत नाहीत
घेरा हा आकारमान दर्शवतो
उदा. साडीचा घेर किती आहे?
डेरा हा आकार दर्शवतो
डेरेदार, घाटदार, बाकदार हे सर्व आकार आहेत

नवीन Submitted by आशुचँप on 7 June, 2018 - 13:52

डेरा म्हणजे केवळ रांजणच नव्हे. डेरा म्हणजे मोठे पोट. डेरा म्हणजे देवळाचा घुमट. डेरा म्हणजे मोठा तंबू. आपल्याला डेरी, ढेरी हे शब्द माहीत आहेत. ढेर हा हिंदी शब्द सुद्धा माहीत आहे. डेरा टाकणे म्हणजे तंबू ठोकणे, तळ टाकणे. इन फॅक्ट डेरा सच्चा सौदा किंवा डेरा बाबा नानक ही नावेसुद्धा देवळाच्या घुमटावरून आली असावीत.

इन फॅक्ट डेरा सच्चा सौदा किंवा डेरा बाबा नानक ही नावेसुद्धा देवळाच्या घुमटावरून आली असावीत. >> नाही.

डेरा हा मूळचा पश्तूनी/पख्तुनी भागात उगम पावलेला शब्द आहे. तो पश्तो - उर्दू - पंजाबी असा प्रवास करत इतर भारतीय भाषांत रुढ झाला. त्याचा शब्दशः अर्थ तात्पुरती केलेली वसाहत. डेरा डालना हा हिंदीतला वाक्प्रचार त्याचा अर्थ सुयोग्य अर्थाने वापरतो. पंजाबीत त्याचा अर्थ किंचित बदलून माणसांनी एकत्र येऊन चर्चा करण्याची (स्थिरावण्याची, घटकाभर विसावण्याची) जागा असा झाला. डेरा बाबा नानक म्हणजे जिथे बाबा नानक (गुरु नानक) स्थिरावले ती जागा. किंवा डेरा सच्चा सौदा म्हणजे जिथे सच्चा सौदा पंथाची लोकं एकत्र येऊन चर्चा करू शकतात, जिथे त्यांचे व्यासपीठ आहे ती जागा. यावरूनच डेरेदार वृक्ष हा शब्दप्रयोग येतो कारण डेरेदार वृक्षाचा घेर इतका मोठा असतो की त्याच्या सावलीत पांथस्थ विसाव्यासाठी थांबू शकतात.

मूळ भाषेत डेरा हा तंबू टाकलेल्या तात्पुरत्या वसाहतीकरता वापरला जात असल्यामुळे तंबू खासकरून पख्तुनी/अफगाणी घुमटाकार, कळस असलेल्या तंबूसाठीही वापरला जाऊ लागला. त्यामुळे तशाच आकारांच्या आपल्या देवळांसाठी, खासकरून त्यांच्या घुमटांसाठी हा शब्द रुढ झाला असावा.

मलाही हीच शंका होती. मधे इराक की अफगाणिस्तानातील बातम्यांमधे जे नकाशे असत त्यात एक 'डेरा इस्माइल खान' दिसे.

मत - आपले दुस-याबद्दल बरे वाईट होते ते या अर्थी
मत - निवडणुकीत देतात ते (व्होट या अर्थाने)
मत (हिं) - नको या अर्थाने.

मत मत देना.
मत देऊ नका

Pages