सारख्या अर्थाचे पण वेगळी छटा दर्शवणारे मराठी/ इंग्रजी शब्द

Submitted by सिम्बा on 22 November, 2016 - 11:10

काही दिवसा पूर्वी मुलीबरोबर बाहेर चाललो होतो डोक्यावरून पक्ष्यांचा थवा चिवचिवत गेला,
मुलगी म्हणाली “बाबा तो बघ पक्ष्यांचा थवा” इंग्लिश मीडियम च्या ६ वर्षांच्या मुलीने बरोबर शब्द वापरलेला ऐकून मलाच बर वाटलं. पण लगेच आपण मुलीचा मराठीशी संपर्क तुटू दिला नाही आहे म्हणून स्वत: भोवती आरती ओवाळून घेण्याची अनिवार इच्छा झाली आणी तिला पुढचा प्रश्न विचारला ” पक्ष्यांचा थवा, तसा फुलांचा..???” उत्तर आला “सडा” खरतर उत्तर चुकलं नव्हते, पण मला “फुलांचा गुच्छ” अपेक्षित होते.
फुलांचा सडा आणी फुलांचा गुच्छ यातला फरक सांगताना अजून शब्द समोर आले
१) सडा- गळून पडलेली फुले/ वस्तू, जिचा मूळ झाडा / बॉडी बरोबर संबंध संपला आहे, बकुळीचा सडा/ खूप केस गळले तर केसांचा सडा
२) गुच्छ:- साधारण सारख्या गोष्टींचा समूह, पण या गोष्टी मुळ बॉडी पासून दूर केली आहेत (वेग वेगळी फुले तोडून गुच्छ बनवला)
३) ताटवा :- एकत्रित असलेली जिवंत फुले.
४) घोस:- शक्यतो झाडावर असलेली सजातीय फुले.
५) हारा :- रचून ठेवलेली तोडलेली फुले. (नुसताच हारा म्हणजे ढीग बहुतेक)

हे सगळे तिला समजावून सांगणे माझ्या कुवतीबाहेरचे काम आहे हे मला समजले.
मात्र मराठीत इतक्या बारकाईने शब्द प्रयोग करणारे आपण इंग्लिश मध्ये फक्त बुके, किंवा बंच ऑफ फ्लॉवर म्हणून वेळ निभाऊन नेतो हे सुद्धा कळले.
परवा तिच्या वाचनालयातून आणलेले grolier सेरीज चे पुस्तक पहिले आणी परत हा इंग्लिश बद्दलचा न्यूनगंड जागा झाला, कारण त्यात काही शब्दांच्या बर्याच छटा त्यांनी दाखवल्या आहेत.
जसे jump – hop- pounce- bounce- leap
fly- flutter- glide- hover- swoop
असे अर्थवाही इंग्रजी शब्द आणी त्यांचे नेमके मराठी प्रतिशब्द यांचा संग्रह करण्या साठी हा धागा.
प्रतीसादामध्ये ब्रोड्ली सारखा अर्थ मात्र वेगळी छटा दाखवणारे शब्द लिहावेत, (मराठी अथवा इंग्रजी) अर्थ माहित असल्यास तो हि लिहावा, जाणकार आपल्याला सुधारणा सुचावतीलच.

असा धागा आधीच असेल तर मला सांगा हे डिस्कशन तिकडे करू या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दर, मूल्य, किंमत, शुल्क हे मराठीत

दर हा काही बेसिक युनिट मागे ठरवलेला असतो. केळ्यांचा दर २० रु. डझन , कापडाचा दर १०० रु मीटर, वाहतुकीचा दर ६ रु किमी., मूल्य म्हणजे त्या वस्तूचे सेवेचे एकूण मूल्य. ५ डझन केळ्याचे मूल्य १०० रु. पेन मूल्य ५० रु. किंमत म्हणजेच मूल्य. तो मराठी शब्द नाही. उर्दू/अरेबिक्/पर्शियन . शुल्क म्हणजे व्यावसायिक सेवेसाठीचे प्रदान उदा: परवाना शुल्क, परिक्षा शुल्क ,( फी) , ज्यात वस्तु विनिमय नसतो .

अजून ड्युटी, टॅक्स असेही भेद आहेत Happy

आपल्याकडे पैठणीच्या बाबतीत सोनसळी, कोनफळी, मोरपिशी, गुलबक्षी, कुसुंबी, आमसुली, डाळिंबी, अंजीरी असे अनेक शब्द आहेत.>>वाह! किती सुंदर वाटतं ऐकायला! एक कविता होती ना बहुतेक बोरकरांची, फुलपाखरांवर..त्यात पण फुलपाखरांच्या रंगांचं वर्णन करायला असेच खूप सुंदर शब्द होते.

टिपुर चांदणं असा शब्दप्रयोग मला वाटतं पान क्र. ४/५ वर आला आहे. टिपुर हा शब्द त्रिपुर पौर्णिमा किंवा त्रिपुरारि पौर्णिमा या तिथीवरून आला आहे. कार्तिक महिन्यात पावसाळा पूर्णपणे संपलेला असतो. आकाश निरभ्र असतं. शिवाय रात्री मोठ्या होत चाललेल्या असतात. त्यामुळे या महिन्यातल्या पौर्णिमेचा चंद्रप्रकाश प्रदीर्घ,अतिशय स्वच्छ आणि अधिक लखलखीत वाटतो. टिपुर चांदणं म्हणजे त्रिपुरारि पौर्णिमेला असतं तसं स्वच्छ प्रकाशमय चांदणं. मला वाटतं वसंत बापटांची (?)एक कविता आहे, त्यात 'चांदनं टिपुर पुनवेचं अन लाजर्‍या मुलींनी लाजायचं' अशी ओळ आहे. कार्तिकाच्या महिन्यापासून सुगी सुरू होते. पिकं घरात येतात. सर्वत्र आबादी आबाद असते. मध्यम थंडी असते, अशा वेळी पूर्वी शेतकरी खळ्यात जमून लेझिमाच्या तालावर भलरी गाणी गात असत. आदिवासी लोक आजही तारपा किंवा इतर वाद्यांसह समूहाने नृत्यगायन करतात. पौर्णिमेला हा उत्साह टिपेला पोचतो.

मूल्य मराठी शब्द नाही?
>>
सम्पूर्ण वाक्य कृपया पहावे. किंमत म्हणजेच मूल्य. तो मराठी शब्द नाही. उर्दू/अरेबिक्/पर्शियन .

किंमत हाशब्द मराठी नाही असे म्हणायचे होते

खरं आहे.
किंमत मराठी शब्द नाही.
कीमत आहे मूळ शब्द.

एक चूटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेशबाबू!
Happy

अरुण, सूर्य, मार्तंड

अरुण - सूर्योदयापूर्वी जो लालिमा दिसतो तो (अरुण म्हणजे रामायण फेम जटायूचा भाऊ आणि सूर्याचा सारथी)
मार्तंड - तापदायी असा माध्यान्हीचा सूर्य

<<<'अस्मिता' , अभिमान', 'स्वाभिमान', अहंकार ' 'गर्व', 'ताठा', 'माज' या शब्दातला फरक ही सान्गा कुणीतरी.
त्यात्ल्या त्यात 'माज' म्हणजे गर्वाचे अत्युच्च टोक आणि अगदीच नकारात्मक छटा असलेला अस समजतय.<<

हे मी पान नम्बर २ वर विचारल होत! याबद्दलही सान्गा प्लिज!

मार्तंड - तापदायी असा माध्यान्हीचा सूर्य >>
चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन , ते सर्वाही सदा सज्जन याच्या बाबत मी ऐकले होते की मृत अंड पासून मार्तंड अशी व्युत्पत्ती आहे. हिवाळ्यात ( तेही कदाचित आर्क्टिक सर्कल मधल्या ) उन असले तरी उष्णता नसते. सुर्य फिकट पिवळसर दिसतो म्हणून अशा सूर्याला मार्तंड म्हणतात

हे मी पण वाचलं होतं आणि मागे इथे माबोवरच एकदा शब्दार्थाच्या धाग्यावर लिहिलं होतं.
पण हे फार फेच्ड स्पष्टीकरण आहे असे उत्तर मला मिळाले होते.
'चंद्रमे जे अलांच्छन , मार्तंड जे तापहीन' असे मूळ विधान आहे.
चंद्रमा अलांछन असा (म्हणजे बाकी सगळे गुण अधिक अलांछन असल्याने अधिकचा - प्रत्यक्षात नसलेला एक गुण),
मार्तंड जे तापहीन (म्हणजे सूर्याचे बाकी सगळे गुण त्यात तापहीन असा अधिकचा- प्रत्यक्षात नसलेला एक गुण)

असे बेटर दॅन द बेस्ट सज्जन आपले सोयरे व्हावेत.

असा याचा अर्थ आहे असे मी अजून एका ठिकाणी किंवा इथेच माबोवर वाचलेय.

चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन >>> चंद्रावर डाग असतो. तो डाग नसलेल्या चंद्राचे सौंदर्य ; सूर्य ताप देतोच. पण तो ताप नसलेला प्रकाश. दोन्ही कल्पनाच - अत्युच्च दर्जा दर्शवण्यासाठी वापरलेल्या.

मृत अंड पासून मार्तंड ही व्युत्पत्ती पण बरोबर वाटतेय.

पण ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य भोवतालच्या लोकांना सहज समजतील अशाच उपमा, कल्पना वापरल्या आहेत. त्यावेळाच्या महाराष्ट्रातल्या लोकांना 'ताप नसलेला थंडीतला सूर्य' ही गोष्ट माहीत असण्याची शक्यता जवळपास नव्हतीच. त्यामुळे तुम्ही म्हणता त्या अर्थाने माउलींनी तो शब्द वापरला असण्याची शक्यता कमी आहे.

पण मग इतर ठिकाणी मार्तंड शब्द वापरला जातो तो उग्र किंवा तापट अश्या अर्थानेच ना?

उदा. मल्हारी मार्तंड, मार्तंडेश्वर इत्यादी.

मार्तंड म्हणजे तापदायक, उग्र सूर्य हाच >>>

आणि खंडोबाच्या आरतीत पण 'जय देव जय देव जय शीव मार्तंडा, अरि मर्दन मल्हारी तुची प्रचंडा' असे आहे काही
रौद्र रसातील शब्द!

तसेच सुर्याला इतर देखिल नावे.

दिनमणी- दिवसाचे रत्न ह्या अर्थी असावे..
वासरमणी- उपरोक्त अर्थानेच

हीरा,

शांता शेळके यांच्या गीतातील शब्दयोजना अशा चपखल असत.

चांदण टीपूर, हलतो वारा कि झुलतो वारा
टाकते पलंग मागल्या दारा, कि पुढल्या दारा..

गारंबीचा बापू चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेले हे गीत. ( उषा मंगेशकर ने गायलेय )

--

मार्तंड जे तापहीन.. असा अनुभत माऊलीच्या काळातील महाराष्ट्रातील लोकांना येणे शक्यच नव्हता पण असा सूर्य वाळवंटात हिवाळ्यात मी बघितला आहे. डोक्यावर सूर्य असतो, स्वच्छ पांढरा प्रकाश असतो पण उष्णता अजिबात नसते... त्यामुळे त्याचवेळी तो चंद्रही वाटत असतो.. आणि तो अलांच्छन ही असतो. पहिल्यांदा असा सूर्य बघितल्यावर याच ओळी आठवल्या होत्या.

( या सर्व पसायदानाचे सुंदर विवेचन प्रा. राम शेवाळकरांच्या आवाजात उपलब्ध आहे माझ्याकडे. )

>>मार्तंड जे तापहीन.. असा अनुभत माऊलीच्या काळातील महाराष्ट्रातील लोकांना येणे शक्यच नव्हता<<

तर मग हा केवळ कल्पनाविलास आहे हे पचायला हि कठिण जातंय. हिवाळ्यात, मुंबईत बर्याचदा सूर्य माथ्यावर असुनहि दाहक वाटत नाहि तेंव्हा तेराव्या शतकात आळंदित परिस्थिती वेगळी नसावि हा बेनिफिट आॅफ डाउट माऊलींना द्यायला हरकत नसावि...

शेतात कुठले पिक आहे त्यावरून शेतासाठी वेगवेगळे शब्द वापरतात.

मला काही माहीत आहेत ते.

१) शिवार - हा कॉमन शब्द आहे पण शक्य तो मोठी जमीन
२)बिभा - ऊसासाठी
३) मळा - द्राक्ष वगैरे
४) वाफा - भाजीसाठी

आणखीही असणार..

मस्त धागा. सध्याचा ''कल्लोळ'' सतत वाचून डोके भंजाळले असल्यास इथे यावे हे उत्तम !

आता clue & cue या दोन शब्दांची गंमत बघा. जालीय कोशांतून काढलेले त्यांचे अर्थ पाहा:

cue = संकेत, सूचना

clue = दुवा, सूचक, धागादोरा, माग, सुगावा.

थोडक्यात हे दोन शब्द तसे घोळदार आहेत. अर्थात संदर्भाने आपण योग्य तो वापरू शकतो.

दिनेश
थोडे अधि स्पष्ट
शिवारः खेड्याचे दोन भाग पडतात एकः गावठाण आणि गावठाण वगळून इतर भाग तो शिवार.
मळा: कोणत्याही बागायती शेतीला मळा म्हणण्याचा प्रघात आहे. मूळात ती मळईची जमीन म्हणजे गाळाची सुपीक जमीन असे.
अजून एक रान हाही शब्द शेतजमीनीला आहे.

Pages