सारख्या अर्थाचे पण वेगळी छटा दर्शवणारे मराठी/ इंग्रजी शब्द

Submitted by सिम्बा on 22 November, 2016 - 11:10

काही दिवसा पूर्वी मुलीबरोबर बाहेर चाललो होतो डोक्यावरून पक्ष्यांचा थवा चिवचिवत गेला,
मुलगी म्हणाली “बाबा तो बघ पक्ष्यांचा थवा” इंग्लिश मीडियम च्या ६ वर्षांच्या मुलीने बरोबर शब्द वापरलेला ऐकून मलाच बर वाटलं. पण लगेच आपण मुलीचा मराठीशी संपर्क तुटू दिला नाही आहे म्हणून स्वत: भोवती आरती ओवाळून घेण्याची अनिवार इच्छा झाली आणी तिला पुढचा प्रश्न विचारला ” पक्ष्यांचा थवा, तसा फुलांचा..???” उत्तर आला “सडा” खरतर उत्तर चुकलं नव्हते, पण मला “फुलांचा गुच्छ” अपेक्षित होते.
फुलांचा सडा आणी फुलांचा गुच्छ यातला फरक सांगताना अजून शब्द समोर आले
१) सडा- गळून पडलेली फुले/ वस्तू, जिचा मूळ झाडा / बॉडी बरोबर संबंध संपला आहे, बकुळीचा सडा/ खूप केस गळले तर केसांचा सडा
२) गुच्छ:- साधारण सारख्या गोष्टींचा समूह, पण या गोष्टी मुळ बॉडी पासून दूर केली आहेत (वेग वेगळी फुले तोडून गुच्छ बनवला)
३) ताटवा :- एकत्रित असलेली जिवंत फुले.
४) घोस:- शक्यतो झाडावर असलेली सजातीय फुले.
५) हारा :- रचून ठेवलेली तोडलेली फुले. (नुसताच हारा म्हणजे ढीग बहुतेक)

हे सगळे तिला समजावून सांगणे माझ्या कुवतीबाहेरचे काम आहे हे मला समजले.
मात्र मराठीत इतक्या बारकाईने शब्द प्रयोग करणारे आपण इंग्लिश मध्ये फक्त बुके, किंवा बंच ऑफ फ्लॉवर म्हणून वेळ निभाऊन नेतो हे सुद्धा कळले.
परवा तिच्या वाचनालयातून आणलेले grolier सेरीज चे पुस्तक पहिले आणी परत हा इंग्लिश बद्दलचा न्यूनगंड जागा झाला, कारण त्यात काही शब्दांच्या बर्याच छटा त्यांनी दाखवल्या आहेत.
जसे jump – hop- pounce- bounce- leap
fly- flutter- glide- hover- swoop
असे अर्थवाही इंग्रजी शब्द आणी त्यांचे नेमके मराठी प्रतिशब्द यांचा संग्रह करण्या साठी हा धागा.
प्रतीसादामध्ये ब्रोड्ली सारखा अर्थ मात्र वेगळी छटा दाखवणारे शब्द लिहावेत, (मराठी अथवा इंग्रजी) अर्थ माहित असल्यास तो हि लिहावा, जाणकार आपल्याला सुधारणा सुचावतीलच.

असा धागा आधीच असेल तर मला सांगा हे डिस्कशन तिकडे करू या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिली सुरवात मीच करतो

१) असूया :- स्वत: ला न मिळालेली गोष्ट दुसर्याला मिळाली कि वाटणारी नकारात्मक भावना. पण तीव्रता अगधीच कमी
२) मत्सर :- जास्त तीव्रतेची असूया, जास्त negative फीलिंग
३) द्वेष :- मत्सराची जास्त गडद शेड,

मला तरी या सगळ्या साठी Jealous आणी envy हे २च शब्द माहित आहेत. बहुतेक सारख्याच तीव्रतेचे.

संतापणे/रागावणे/भडकणे/तीळपापड होणे

चढ्या अर्थाने !
Wink

इंग्रजीत angry ते pissed off च्या रेंजमध्ये किंवा मागेपुढे किणते शब्द येतात ते माहित नाही.

असूया, मत्सर याबरोबर हेवा? जळफळाट?
हेवा- दुसर्याकडे असलेली वस्तू/ दुसर्याचे यश आपल्याला मिळावे असे वाटणे.
जळफळाट - याचीच तीव्र छटा.
द्वेषासाठी इंग्लिशमधे hate हा शब्द आहे.

attraction/fascination/fetish

आकर्षण/ अवास्तव (कल्पनाच करता येईल असं?) आकर्षण्/लैंगिक आकर्षण

एक प्रयत्न करून पाहिला.

इंग्रजीत थिसॉरस नावाची एक संकल्पना आहे.

अनेक शब्द एकाच अर्थी वापरतात, तसेच, एकाच शब्दाचे अनेक अर्थ होणे हेदेखिल नॉर्मल आहे.

अधिक नंतर.

आमच्या संस्कृत शिक्षकांनी एकदा कमळाच्या विविध नावांत असणार्‍या सूक्ष्म अर्थच्छटांचे विवेचन करणारा एक श्लोक शिकवला होता.
पण तो काही आठवत नाहीये.

त्यात
नीरज- (कुठल्याही संथ) पाण्यात जन्मलेले
सरोज- सरोवराच्या पाण्यात जन्मलेले
पंकज- चिखलात/दलदलीत जन्मलेले
राजीव- याचा अर्थ पण बहुतेक चिखलात जन्मलेलं (नक्की माहित नाही) पण निळ्या कमळासाठी वापरतात.
कमल- याची उपपत्ती पण माहित नाही पण शक्यतो लाल्/गुलाबी कमळासाठी वापरतात.

संस्कृतात असे समानर्थी शब्द एका श्लोकात लिहून मग त्यातले बारिकसे फरकही त्या किंवा पुढच्या श्लोकात द्यायची पद्धत आहे. काहीतरी म्हणतात या प्रकारच्या श्लोकांना पण ते आठवत नाही.

असे सगळे समानार्थी शब्द आणि त्यांचे बारिकश्या फरकासह असणारे अर्थ माहित असणार्‍यास (माहित कसलं जल्लं बाय हार्ट असणार्‍यास ) 'वाचस्पति' म्हणतात असेही सरांनी सांगितलेले आठवते आहे.

सिंबांचा धागा आम्हाला वाचस्पति करून सोडणार!
Happy

ईंटरेस्टींग धागा आहे. मी काही यात भर टाकू शकलो तर मला स्वतःचेच कौतुक वाटू लागेल.

बायदवे, कौतुक आणि स्तुती, हे या विषयाअंतर्गत येतील ना.. अजून काही येतील या मालिकेत?

कौतुक काही चांगले काम केल्यावर होते.
स्तुती उगाचंच चढवायला होते.

praise आणि flattery यात फरक आहे की नै!

स्तुती उगाचंच चढवायला होते. >>> स्तुती हा शब्द नेहमीच असा चढवणे या अर्थानेच वापरला जातो याबद्दल शंका वाटते.
हिंदीमध्ये दोन्हींसाठी तारीफच का?

कौतुका कौतुकात पण फरक आहे.

आई मुलाचे मायेने करते ते कौतुक- कोडकौतुक (मी ऋबाळाचे करते तसे)
कुणी यश मिळवले तर करतो ते अभिनंदनपर कौतुक. (ऋबाळाने कधी खूपच छान लिहिले की बाकीचे माबोकर करतात ते)
आणि 'तुमची कौतुकं सांगू नका' यातलं हेटाळणीपर कौतुक. ( मी ऋबाळाचे कौतुक करायला लागल्यावर इरिटेटेड माबोकर म्हणतात ते!)

Happy

http://sanskritdocuments.org/doc_z_misc_amarakosha.html

हे घ्या यावर दिसत आहेत. आजोबांनी शिपट्या घेउन वदवून घ्यायचे प्रयत्न केले तरी माझ्या मंदबुद्धीसमोर त्यांचे काहिही चालले नाही. त्यामुळे महिम्न, रुद्र, अमरकोश हे शब्द ऐकले की संस्कृत न आठवता मारच आठवतो Proud

माझ्या बाबतीतः
इंग्रजी शब्द बरेचदा माहिती असतात. मात्र संभाषणात ते झटकन तोंडात येत नाहीत. हे विशेषतः सामान्य रोजच्या आयुष्यात घडणार्‍या गोष्टींबाबतच्या संभाषणात होते. कामाच्या संदर्भातील संभाषणात ही अडचण येत नाही.
उदाहरणार्थः पाय वाजवत उड्या मारू नको हे मी कदाचित डोन्ट मेक नॉइझ वा डोन्ट जम्प सो मच वा डोन्ट जम्प सो हार्ड असे काहीतरी म्हणुन जातो. मात्र ओळखीतला एक बालवाडीतला देशी पालकांचा अमेरिकेत वाढणारा मुलगा पटकन डोन्ट स्टॉम्प असे म्हणतो.

मस्त धागा आहे. तुम्ही दिलेल्या फुलांच्या उदाहरणाविषयी,

माझ्या माहितीत तरी फुलांचा सडा याला सुयोग्य इंग्रजी शब्द नाही. पण बुके या शब्दाच्या छटा असलेले अनेक शब्द इंग्रजीत आहेत.
१) corsage/boutonniere - एक मोठ्या आकाराच्या फुलाभोवती (बहुतांशी वेळा गुलाब) छोट्या फुलांची आकर्षक रचना केलेला बुके म्हणजे कोर्साज किंवा बटनेअर. कोर्साज मुली लग्नात गाऊनवर किंवा मनगटावर लावतात. तर बटनेअर मुलगा कोटाच्या बटनाच्या जागी लावतो.
२) festoon - शब्दशः फुलांचे तोरण. सणासमारंभांच्या प्रसंगी लावले जाणारे तोरण
३) wreath - अनेकदा पाश्चात्य देशांत दारावर जी फुलांची गोलाकार रचना असते
४) nosegay - भेट देताना जो छोटा बुके वापरतात. यालाच posy किंवा tussie-mussie असेही म्हणतात. कधी कधी हा केसातही माळला जातो.

मस्त धागा आहे :).

ती नीरज/पंकज वगैरे माहिती आणि सडा/ताटवा वगैरे तसेच पायस चे शब्द आवडले. सडा/ताटवा ई बर्‍यापैकी असेच माहीत होते पण इतर नव्हते.

स्तुती - नेहमी चढवायलाच होते असे नाही. चांगल्या उद्देशाने केलेली सुद्धा असू शकते पण बहुधा कौतुक आणि त्यात फरक हा असेल की कौतुक हे वयाने किंवा अनुभवाने किंवा (त्या क्षेत्रातील) अधिकाराने मोठ्या व्यक्तीकडून नवख्या व्यक्तीचे होते, पण स्तुती ही साधारण बरोबरीच्या लोकांची केली जाते.

टण्या - :). हो माझेही होते कधीकधी. कॉलेजातील मराठी ग्रूप्स मधून नोकरी मधे बहुभाषिक ग्रूप्स मधे आलो तेव्हा तर नेहमी व्हायचे. असे आता कमी झाले आहे पण एखादी गोष्ट पूर्वी कधीच इंग्रजीतून व्यक्त केली नसेल तर अजूनही होते. बहुधा इंग्रजी मातृभाषा नसलेल्या सर्वांचेच कमी-अधिक प्रमाणात होत असेल. पूर्ण इंग्रजी माध्यमातून व वातावरणातून (कॉन्व्हेण्ट्स किंवा पब्लिक स्कूल्स) शिकलेल्यांबद्दल कल्पना नाही.

मस्त धागा. असा विचार कधी केला नव्हता.

पण पहिल्याच प्रतिसादात पण.... लिहितोय Wink

ताटवा फुलांचा म्हटलं तरी तो फुलझाडांचा असतो असं मला वाटतं
असूया, मत्सर, हेवा यांत दुसर्‍याकडे काहीतरी आहे , पण द्वेषाला त्याची गरज नसावी (असं मला आतापर्यंत वाटत होतं. शब्दकोशात पाहिलं तर द्वेषचा एक अर्थ मत्सर, हेवा आणि दुसरा वैर, अप्रीति, इ. असा दिलाय; म्हणजे दोन्ही अर्थांनी वापरतात असं दिसतं.)

@ साती, व्वा:! आपण दिलेली कमळाच्या विविध नावांसंबंधीची माहिती वाचून मी फारच प्रभावित झालोय. मी आपल्यासारख्या विद्वानांच्या सानिध्यात आलोय हे मी माझे सौभाग्य समजतो.

@ पायस, आपले इंग्रजीचे ज्ञानही कौतुकास्पद आहे.

@ सिम्बा, आमच्या ज्ञानात भर पाडणारा छान धागा काढल्याबद्दल आपले अभिनंदन!!!

अरे वा... बरेच प्रतिसाद आले की, सर्वांचे आभार,
पायस, छान प्रतिसाद. यातला एकही शब्द माहित नव्हता.

भरत. , सहमत. फुलझाडांचे, वेलींचे ताटवे असतात. वेलींचे कुञ्जही असतात. फुलांचा अनेक झाडांवरचा एकत्रितपणे फुलोरा असतो. इन्फ्लॉरेसन्स म्हणजेसुद्धा मराठीत फुलोरा. घोस म्हणजे लहडणारे, लोंबणारे गुच्छ अथवा घड. बहाव्याचे घोस असतात, द्राक्षांचे घोस असतात, केळीचे घड असतात.
@साती, छान. 'राजीव'चे अनेक अर्थ आहेत. कमळाच्या बाबतीत नीलकमल. राम हा निळ्या डोळ्यांचा आणि गोरा असावा. आपल्याकडे गुटगुटीत घोटीव सावळी मुले प्रिय होती म्हणून रामालाही 'सावळा ग रामचंद्र' बनवून टाकले असावे. कृष्ण मात्र पक्का श्यामवर्णी, कुरळ्या केसांचा, इथला गंध असणारा. तश्या 'श्याम'च्याही अनेक छटा आहेत. 'प्रियङगुकलिकाश्यामम्' म्हणजे प्रियङगु (वाघंटी)वृक्षाच्या कळीसारखा गुलबट काळसर जांभळा, थोडासा लवेंडर रंगाचा.
कमळाला आणखीही काही पर्यायी शब्द आहेत. कैरव म्हणजे श्वेतकमल. कुमुद म्हणजे सुद्धा कमळ पण छोटी कमळे, वॉटर लिली. मला वाटते कास पठारावर एक कमळवेलींनी भरलेले तळे आहे त्याचे नामकरण कुमुदिनी केले गेले आहे.(अर्थात चूभूद्याघ्या.) रात्री उमलणार्‍या चंद्रकमळालाही एक वेगळे नाव आहे. शिवाय वारिज, अम्बुज, वगैरे. पाणी आणि चिखल या नावाचे जितके म्हणून संस्कृत शब्द असतील तितक्यांना पुढे 'ज' लावला की कमळाचे नाव तयार होउ शकते. अपवाद .पानीयम्'. पण (हेही पुन्हा मला वाटते) पानीयम् हा मूळ संस्कृत शब्द नसावा. प्राकृतातले अनेक शब्द संस्कृतात शिरले आहेत. त्यातला हा एक असावा. वेदांत 'अप्' शब्द अधिक दिसतो. त्यावरून 'अब्ज'सुद्धा होउ शकेल. पण अब्ज शब्द जास्त करून पाण्यातून मिळालेल्या शंख, चंद्र, कल्पतरु, धन्वंतरी अशा वस्तूंसाठी वापरला गेला आहे.

हीरा,
मस्तं लिहिलंत.
या धाग्यावर तुम्ही लिहावं असं खूप वाटत होतं.

पंचमहाभूतांची सूची करताना पाण्याला 'आप' म्हणतात ना?

पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशी यादी घोकलेली आठवत्येय लहानपणी!

मला वाटते कास पठारावर एक कमळवेलींनी भरलेले तळे आहे त्याचे नामकरण कुमुदिनी केले गेले आहे.(अर्थात चूभूद्याघ्या.) >> करेक्ट!! त्या तळ्यात Nymphoides indica - Water Snowflake/कुमुदिनीची फुले येतात म्हणुन त्याला कुमुदिनी तळे म्हणतात.

मस्त बीबी. आवडला. Happy

Pages