सारख्या अर्थाचे पण वेगळी छटा दर्शवणारे मराठी/ इंग्रजी शब्द

Submitted by सिम्बा on 22 November, 2016 - 11:10

काही दिवसा पूर्वी मुलीबरोबर बाहेर चाललो होतो डोक्यावरून पक्ष्यांचा थवा चिवचिवत गेला,
मुलगी म्हणाली “बाबा तो बघ पक्ष्यांचा थवा” इंग्लिश मीडियम च्या ६ वर्षांच्या मुलीने बरोबर शब्द वापरलेला ऐकून मलाच बर वाटलं. पण लगेच आपण मुलीचा मराठीशी संपर्क तुटू दिला नाही आहे म्हणून स्वत: भोवती आरती ओवाळून घेण्याची अनिवार इच्छा झाली आणी तिला पुढचा प्रश्न विचारला ” पक्ष्यांचा थवा, तसा फुलांचा..???” उत्तर आला “सडा” खरतर उत्तर चुकलं नव्हते, पण मला “फुलांचा गुच्छ” अपेक्षित होते.
फुलांचा सडा आणी फुलांचा गुच्छ यातला फरक सांगताना अजून शब्द समोर आले
१) सडा- गळून पडलेली फुले/ वस्तू, जिचा मूळ झाडा / बॉडी बरोबर संबंध संपला आहे, बकुळीचा सडा/ खूप केस गळले तर केसांचा सडा
२) गुच्छ:- साधारण सारख्या गोष्टींचा समूह, पण या गोष्टी मुळ बॉडी पासून दूर केली आहेत (वेग वेगळी फुले तोडून गुच्छ बनवला)
३) ताटवा :- एकत्रित असलेली जिवंत फुले.
४) घोस:- शक्यतो झाडावर असलेली सजातीय फुले.
५) हारा :- रचून ठेवलेली तोडलेली फुले. (नुसताच हारा म्हणजे ढीग बहुतेक)

हे सगळे तिला समजावून सांगणे माझ्या कुवतीबाहेरचे काम आहे हे मला समजले.
मात्र मराठीत इतक्या बारकाईने शब्द प्रयोग करणारे आपण इंग्लिश मध्ये फक्त बुके, किंवा बंच ऑफ फ्लॉवर म्हणून वेळ निभाऊन नेतो हे सुद्धा कळले.
परवा तिच्या वाचनालयातून आणलेले grolier सेरीज चे पुस्तक पहिले आणी परत हा इंग्लिश बद्दलचा न्यूनगंड जागा झाला, कारण त्यात काही शब्दांच्या बर्याच छटा त्यांनी दाखवल्या आहेत.
जसे jump – hop- pounce- bounce- leap
fly- flutter- glide- hover- swoop
असे अर्थवाही इंग्रजी शब्द आणी त्यांचे नेमके मराठी प्रतिशब्द यांचा संग्रह करण्या साठी हा धागा.
प्रतीसादामध्ये ब्रोड्ली सारखा अर्थ मात्र वेगळी छटा दाखवणारे शब्द लिहावेत, (मराठी अथवा इंग्रजी) अर्थ माहित असल्यास तो हि लिहावा, जाणकार आपल्याला सुधारणा सुचावतीलच.

असा धागा आधीच असेल तर मला सांगा हे डिस्कशन तिकडे करू या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खाणे

इंग्रजी - eat, devour, chew, dine, swallow, graze, bite, feed, nosh/breakfast/snack, cram, gorge/glut/binge/gormandize, gulp (swallowing without biting)
संस्कृत (धातु/शब्द) - खाद्, ग्रस्, चर्व्, भोजन, गिलन (गल् धातु), चर्, खर्द्/अभिदश्, भक्ष्, अल्पाहार, (क्रॅमला सुयोग्य शब्द नाही), (सुयोग्य शब्द नाही), कवल्-कवलय् (१० गण, याचा आपण सोयीस्कर कवळ करून टाकला)
मराठी - खाणे, ग्रास घेणे, चर्वण/चघळणे, जेवण, गिळणे, चरणे, चावणे, भक्षण करणे, नाश्ता (हा खरे तर उर्दू आहे पण याचा वापर सर्रास होतो), बकाबका खाणे, अधाशा सारखे तुटून पडणे, न चावता गिळणे

आत्ता एवढेच आठवत आहेत Happy

नाश्ता (हा खरे तर उर्दू आहे पण याचा वापर सर्रास होतो), >>> न्याहारी हा शब्द बोलायला जड जातो बहुधा म्हणून हा सोयीचा पडत असावा.
मी ऑफिसच्या पँट्रीला अल्पोपहारगृह म्हणतो. आता आमच्या सेक्शनमधील सर्वांच्याच तोंडी हा शब्द बसलाय. नेहमीच्या प्रचलित ईंग्रजी शब्दांना असा एखादा मध्येच मराठी शब्द नाटकीय उच्चारात म्हणायला मजा येते. हा खरे तर वेगळ्या धाग्याचा विषय झाला.

धाग्याची कल्पना आवडली... इंग्रजीतले बारीक बारीक अर्थछटा बदलणारे शब्द वाचायला आवडतील.

ऋन्मेष,
म्हणायचं तर 'अल्पोपाहारगृह' म्हण.
उपहार म्हणजे भेट/गिफ्ट.
उपाहार म्हणजे मुख्य जेवण सोडून इतरवेळचे खाणे. उदा. न्याहारी/नाश्ता/टिफीन(साऊथ इंडीयन).

झोप, डुलकी, वामकुक्षी, नीज, ग्लानी, पडणे, घोरणे, विश्रांती,

स्लीप, नॅप, शटआय, स्लंबर, रेस्ट, हायबरनेट, डॉर्मन्ट

{{व्यवहारातले अर्थ वेगळे असू शकतात.
उदा. स्पीड.. फिजिक्स मधे स्पीड म्हणजे कायम दिशा आणि वेग असे असते ( असे शाळेत वाचल्याचे आठवतेय ) आणि आपण व्यवहारात ज्याला स्पीड म्हणतो ती असते व्हेलॉसिटी}}

दिनेश, इथे तुमचा गोंधळ झालाय. स्पीड दिशेवरती अवलंबून नसतो. स्पीड इज स्केलार. व्हेलॉसिटी ला दिशा असते (व्हेक्टर)

नेहमीच्या प्रचलित ईंग्रजी शब्दांना असा एखादा मध्येच मराठी शब्द नाटकीय उच्चारात म्हणायला मजा येते.>>> मलाही!!! पण जेव्हा सगळे रोखून बघतात ना कि मग मला चोरल्यासारखे होते. आपल्या मराठीतच बोलायची आपल्याला चोरी!!!

हा खरे तर वेगळ्या धाग्याचा विषय झाला.>>> मग वाट कसली पहाताय. येऊ द्या की!!!

Flock of birds पक्ष्यांचा थवा
Pride of lions - कळप?
Pack of wolves/ dogs झुंड? कळप?
Convocation of eagles मराठीत??
Herd of cattle खिल्लार?

मराठीत गरूडांच्या थव्याला काही वेगळे नाव असेल असे वाटत नाही.
मूळात भारतात आणि भारतीय साहित्यात गरूड एकट्याने रहातो अशी संकल्पना आहे.

'थव्याने तर कावळे रहातात, गरूड नेहमी एकटा रहातो' असे भारी भारी डायलॉग्ज जुन्या मराठी/संस्कृत साहित्यात आहेत.

धाग्याची कल्पना फारच आवडली.

ईथे नेहमीच यायला, वावरायला, फेरी घालायला, चक्कर टाकायला आवडेल.

कुंचा, झाडू, केरसुणी, खराटा, हीराची झाडू, बुतारा...
सगळे झाडायला उपयोगी. कशापासून बनवले आणि कसे बनवले त्याप्रमाणे शब्द..

हो साती , मलाही गरुडांचा थवा ही संकल्पना अनोळखी वाटली होती. English मधे असं वेगळं नाव असण्याचं काय कारण असेल?

English मधे असं वेगळं नाव असण्याचं काय कारण असेल?>>> कदाचित, एखाद्या मृत भक्ष्याला खाण्याकरिता सर्व गरुड एकाचवेळी तुटून पडतात, (त्या दृश्याला पाहून) म्हणून असेल.

कदाचित, एखाद्या मृत भक्ष्याला खाण्याकरिता सर्व गरुड एकाचवेळी तुटून पडतात, म्हणून असेल.
>>>
गरुड है की गिधाड?

मलाही गरुड असे कळपाने / थव्याने राहतात हे माहिती नव्हते. मी राहतो इथे जे गरुड आहेत ते एक एकटेच आयुष्य जगतात. त्यांची घरटी म्हणजे ट्री-हाउसच असते. वर्षानुवर्षे त्याच जागी ते घरटे मोठे मोठे करत जातात. हिवाळ्यात कॅनडातून दक्षिणेला येतात व उन्हाळ्यात उत्तरेला पुन्हा परततात. एक असे अजस्त्र घरटे माझ्या घराजवळच्या एका झाडावर आहे. तिथे बराच वेळ बसले की तो गरुड दिसतो काहीतरी पकडून आणताना बरेचदा.
इथे थोडी अजून माहिती मिळेल. https://www.nationaleaglecenter.org/

'कंठी राहो नाम' या पुस्तकात श्री रवींद्र पाठक यांनी 'इच्छा' आणि 'आस' यातला फरक छान विशद करून सांगितलाय.
इच्छेमध्ये कर्तेपणा आहे. मी ते मिळवीन, मला ते हवंय ही 'इच्छा ' आहे. 'आस' या शब्दात केवळ आर्जव, काकुळती असते. मला आपण द्याल का? मी पात्र नाही, मला माहिती आहे तरी आपण मला द्या हा आर्जव या 'आस' स्थितीत असतो. तर इच्छेमध्ये, कसं मला मिळत नाही? मी ते मिळवीन, मला ते हवय. इच्छेमध्ये अहंकार आहे.पात्रता दाखवायचा प्रयत्न असतो, एका प्रकारचा अभिनिवेश असतो कि मी यासाठी पात्र आहे, हे मला मिळायला पाहिजे.
इच्छेला सबस्टीट्युट आहे. कि "हे नाही बाबा, त्याऐवजी हे घे म्हटले" तर इच्छा कदाचित तृप्त होऊ शकेल. थोडक्यात इच्छा दुसर्या पद्धतीने पूर्ण करता येऊ शकेल. पण आस ही केवळ आणि केवळ एकाच गोष्टीची असते. ती गोष्ट मिळाल्याशिवाय कधी शांत होत नाही.
सर्वात शेवटी, इच्छेला निराशेची किनार असते. इच्छा पूर्ण नाही झाली कि आपण म्हणतो बर्याचदा," काय करावं,खूप इच्छा होती, पण नाही झाली पूर्ण!"
पण 'आस' या स्थितीला किनारा नाही. ती वाहती असते. त्या स्थितीत आपण वाट बघत राहतो. त्याला त्याच्याशिवाय दुसरं काही माहीतच नसतं आणि ते जर नसेल तर दुसरं काही नकोच असत. त्यामुळे आस या स्थितीला निराशा स्पर्श करू शकत नाही. तिथं फक्त प्रतीक्षा असते. वाट पाहणं असत.
मातंग ऋषीची मानसकन्या 'शबरी' ही 'आस' या स्थितीचं उत्तम उदाहरण !

आर्या , मस्तं!

मला यावरून 'भेटीला गे जीवा, लागलीसे आस, पाहे रात्रंदिस, वाट तुझी' हा अभंग आठवला.

दचकणे, घाबरगुंडी, भय, दरारा, जरब, वचक, भिती, धडकी, धास्ती, धसका, दहशत, हाय खाणे

हाय खाणे म्हणजे नक्की काय बरे?

कृष्णा दारू हा सध्या मराठीत रूळलेला पण मूळ परभाषी शब्द आहे.
बहुदा फारसी/अरेबिक ओरिजीन असावे.

मद्य हा एकंदर धुंद करणारे पेय या अर्थाचे सामान्यनाम आहे.

मदिरा, वारूणी , सूरा हे खरेतर कुठल्या पदार्थापासून मद्य तयार केलेय, कुणी प्यायचेय, कुठल्या वेळी प्यायचेय यावरून ठरवलेली नावे आहेत.
पण मला सध्या ते इन डिटेल आठवत नाही.

कादंबरी हे सुद्धा एका प्रकारच्या दारूचेच नाव असून तिचे वर्णन केलेला /लीड रोल असलेला एक साहित्यप्रकार नंतर कादंबरी म्हणून मान्यता पावला असे शिकलेले मला आठवत आहे.

मराठी - खाणे, ग्रास घेणे, चर्वण/चघळणे, जेवण, गिळणे, चरणे, चावणे, भक्षण करणे, नाश्ता (हा खरे तर उर्दू आहे पण याचा वापर सर्रास होतो), बकाबका खाणे, अधाशा सारखे तुटून पडणे, न चावता गिळणे

ह्याच्याशी निगडीत पुढे

(अन्न) चिवडत बसणे, रवंथ करणे, ओरपणे, आडवा हात मारणे, भरपेट / पोटभरीचे / पोटाला तड लागेतोवर / घशाशी येईपर्यंत जेवणे

कादंबरी हे सुद्धा एका प्रकारच्या दारूचेच नाव असून >>>>

हो मी देखिल ही कुठे तरी वाचल्याचे स्मरतेय! Happy

खरेतर कुठल्या पदार्थापासून मद्य तयार केलेय>>> हो ह्यात देखिल अनेक मूळ घटक ज्या पासून उत्पन्न करतात वर पद्धती.. त्यानुसार देखिल ठरतात. बरोबर!

Pages