सारख्या अर्थाचे पण वेगळी छटा दर्शवणारे मराठी/ इंग्रजी शब्द

Submitted by सिम्बा on 22 November, 2016 - 11:10

काही दिवसा पूर्वी मुलीबरोबर बाहेर चाललो होतो डोक्यावरून पक्ष्यांचा थवा चिवचिवत गेला,
मुलगी म्हणाली “बाबा तो बघ पक्ष्यांचा थवा” इंग्लिश मीडियम च्या ६ वर्षांच्या मुलीने बरोबर शब्द वापरलेला ऐकून मलाच बर वाटलं. पण लगेच आपण मुलीचा मराठीशी संपर्क तुटू दिला नाही आहे म्हणून स्वत: भोवती आरती ओवाळून घेण्याची अनिवार इच्छा झाली आणी तिला पुढचा प्रश्न विचारला ” पक्ष्यांचा थवा, तसा फुलांचा..???” उत्तर आला “सडा” खरतर उत्तर चुकलं नव्हते, पण मला “फुलांचा गुच्छ” अपेक्षित होते.
फुलांचा सडा आणी फुलांचा गुच्छ यातला फरक सांगताना अजून शब्द समोर आले
१) सडा- गळून पडलेली फुले/ वस्तू, जिचा मूळ झाडा / बॉडी बरोबर संबंध संपला आहे, बकुळीचा सडा/ खूप केस गळले तर केसांचा सडा
२) गुच्छ:- साधारण सारख्या गोष्टींचा समूह, पण या गोष्टी मुळ बॉडी पासून दूर केली आहेत (वेग वेगळी फुले तोडून गुच्छ बनवला)
३) ताटवा :- एकत्रित असलेली जिवंत फुले.
४) घोस:- शक्यतो झाडावर असलेली सजातीय फुले.
५) हारा :- रचून ठेवलेली तोडलेली फुले. (नुसताच हारा म्हणजे ढीग बहुतेक)

हे सगळे तिला समजावून सांगणे माझ्या कुवतीबाहेरचे काम आहे हे मला समजले.
मात्र मराठीत इतक्या बारकाईने शब्द प्रयोग करणारे आपण इंग्लिश मध्ये फक्त बुके, किंवा बंच ऑफ फ्लॉवर म्हणून वेळ निभाऊन नेतो हे सुद्धा कळले.
परवा तिच्या वाचनालयातून आणलेले grolier सेरीज चे पुस्तक पहिले आणी परत हा इंग्लिश बद्दलचा न्यूनगंड जागा झाला, कारण त्यात काही शब्दांच्या बर्याच छटा त्यांनी दाखवल्या आहेत.
जसे jump – hop- pounce- bounce- leap
fly- flutter- glide- hover- swoop
असे अर्थवाही इंग्रजी शब्द आणी त्यांचे नेमके मराठी प्रतिशब्द यांचा संग्रह करण्या साठी हा धागा.
प्रतीसादामध्ये ब्रोड्ली सारखा अर्थ मात्र वेगळी छटा दाखवणारे शब्द लिहावेत, (मराठी अथवा इंग्रजी) अर्थ माहित असल्यास तो हि लिहावा, जाणकार आपल्याला सुधारणा सुचावतीलच.

असा धागा आधीच असेल तर मला सांगा हे डिस्कशन तिकडे करू या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमळ - पंकज, अंबुज, उत्पल, अब्ज, सरसिज, नलिनी, राजीव, पद्म, नीरज.
याशिवाय पुंडरीक म्हणजे पांढरं कमळ (पुंडरीकविशालाक्षौ - पांढर्‍या कमळप्रमाणे विशाल नेत्र असलेल्या...)
कमलिनी म्हणजे सूर्यविकासी कमळ, कुमुदिनी म्हणजे चंद्रविकासी कमळ. कुमुद वरून कौमुदी - पौर्णिमेची शुभ्र रात्र असा शब्द आहे.

हर्पेन,
तुम्ही चौथीच्या स्कॉलरशीपला नवनीतचं गाईड वापरलेलं का?

आम्हीपण अगदी असेच पाठ केलंय.

सगळ्यात पहिलं 'आई, माता, जननी, माय'

Happy

मस्त/छानवरून आठवलं, प्रतिक्रिया देताना ही शब्दांची चणचण, टंचाई, कमतरता खूप जाणवते.
प्रामुख्याने मस्त, छान, सुरेख, सुंदर, वा!, अप्रतिम, भारी, असे चांगले ह्या अर्थाचे वेगवेगळ्या छटेचे मोजके शब्दच आठवतात किंवा वापरले जातात.

बापरे!!! कमळाची एव्हढी नांवे आहेत हे माहीतच नव्हतं!

विष्णूलाही सहस्त्र नामें आहेत. (पण मी येथे लिहू शकत नाही. Wink )

दिनेश, नलिनी म्हणजे कमळफूल नव्हे. तर कमलाचा देठ. हा आतून पोकळ आणि सच्छिद्र असतो. नळ, नलिका, नलिनी हे साधारणत: समानार्थी शब्द आहेत.
तो श्लोक असा आहे :
रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम्
भास्वान् उदेष्यति हसिष्यति पङ्कजश्री
इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे
हा हन्त हन्त! नलिनीं गज उज्जहार!
हे उदाहरण संस्कृताच्या व्याकरणामध्ये 'सति-सप्तमी'चे उदाहरण म्हणून दिले जाते. म्हणजे एक क्रिया घडत असताना दुसरी घडते तो प्रसंग. घडत असतानाच्या क्रियेसाठी कर्त्याची विभक्ति सप्तमी असते.(विचिन्तयति कोशगते द्विरेफे.)इथे कमलकोशात अडकलेला भुंगा असे मनोरथ करीत असतो की उद्या सकाळ होईल,सूर्य उगवेल, कमळ फुलेल आणि आपली सुटका होईल. पण हाय दैवा, त्याचा असा विचार सुरू असतानाच हत्तीने ती कमलवेल उखडून टाकली.

झंपी ,
मराठीत सांगा पाहू?
अभोर = ? तिटकारा
ईंट्रोस्पेक्ट = ? अंतर्मुख
कन्सेसस =? परस्पर सहमती, एकमत

साती,
तुम्ही चौथीच्या स्कॉलरशीपला नवनीतचं गाईड वापरलेलं का?
>>>
नाही. म्हणजे आठवत नाही पण नसावंच कारण त्यावेळी गाईड्चं प्रस्थ बोकाळलं नव्हतं तितकसं

छान धागा आहे. कमळाची नावं वाचताना मला सुद्धा चौथीची स्कॉलरशिप आठवली.
गेल्याच महिन्यात लेक हिंदी साठी एका अर्थाचे अनेक शब्द वाचत होता. त्यावेळी पाण्यासाठी जल,नीर, वारि, अम्बु असे शब्द सांगून त्यावरून कमळासाठी पंकज, अंबुज, वारिज / ढगासाठी जलद, जलधर, वारिद/ समुद्रासाठी नीरधि, वारिधि, अम्बुधि कसे बनतात हे सांगितले होते.

समाधान, सार्थक, कृतकृत्य(ता), साफल्य, धन्य(ता), स्वप्नपुर्ती, परिपुर्ती, भरून पावणे

ह्या शब्दांना Contentment, satisfaction शिवाय इंग्रजीत प्रतिशब्द कोणते

कुमार गंधर्वांच्या 'ऋणानुबंधांच्या चुकुन पडल्या गाठी' ह्या गाण्यामधल्या, भेटीत 'तुष्टता' मोठी असा जो शब्द आहे ( आधी सांगा हाच शब्द आहे ना?) त्याचा पण अर्थ 'समाधान' ह्याच छटेतला आहे का?

कौतुक हे 'कार्य' पाहुन केले जाते तर 'स्तुती' ही कर्ता पाहुन !
कौतुक हे कार्याची पोचपावती असते त्यामुळे कार्यप्रवणता वाढु शकते तर स्तुती ही कर्त्याला त्याच्या महानतेची आठवण करुन देण्यासाठी असते त्यामुळे स्तुतीने कर्तेपणाचा अभिमान वाढु शकतो.

कौतुक करताना कौतुक करणार्‍याला कमीपणा घेत नाही. याउलट स्तुती करणारा स्तुतीपाठक स्वत:कडे कमीपणा घेत आसतो.

कौतुक हे वाचिक असु शकते तर 'कोडकौतुक' हे वाचिक, मानसिक, कायिक असते.

आभार हीरा..

यु म पठाण यांच्या पुर्वी सुमन बेलवलकर पण भाषेसंबंधी लिहित असत..

त्यांनी अनेक नावे कशी चुकिची आहेत याबद्दल लिहिले होते. ( उदा. सुचिता, अनिता ! )

त्यांनीच सचिन या नावाबद्दल पण लिहिले होते. शचि हि इंद्राची पत्नी. शचि आणि इंद्र मिळून शचेंद्र.. त्याचा बंगाली उच्चार शोचेंद्र आणि मग त्याचा अपभ्रंश.. सचिन.

अजारीसूतसारथी -- या शब्दाची फोड पण अशीच कुठेतरी वाचली होती.. अज म्हणजे पर्वत, आरी म्हणजे शत्रु..
पर्वतांचा शत्रु तो इंद्र ( याचा संदर्भ नीट आठवत नाही पण इंद्राला धरणे बांधणे मंजूर नव्हते. बांधलेली धरणे तो फोडून टाकत असे ) त्याचा सूत म्हणजे अर्जून आणि त्याचा सारथी तो कृष्ण..

हे बरेचसे विषयांतर झाले.... आता मूळ विषयाकडे.

पावसाचे वर्णन करताना आपण काही विशेषणं वापरतो. रिमझिम ( हलकासा पाऊस, साधारण असा आवाज करणारा ) मुसळधार ( मुसळाएवढ्या धारा असणारा.. ! ) धुवांधार ( धुराप्रमाणे भासणारा ) शिरवे ( श्रावणातला
हळूवार ) टपटप ( परत आवाज ) वादळी ( वादळासकट येणारा ) हलक्या सरी, गारपिट, मृगाचा पाऊस,
आखाड्सासरा, सळासळा ( याबाबतीत नक्षत्राचा काही संदर्भ आहे, मामंजी तूम्ही पळा पळा, आम्ही येतो सळा सळा, असे बघुतेक मघा नक्षत्र म्हणते )

पण हे सर्व नागरी संदर्भ झाले. शेतकर्‍यांची वेगळी शब्दकळा मी कुठेतरी वाचली होती. मिळाली तर बघतो.

कौतुक हे 'कार्य' पाहुन केले जाते तर 'स्तुती' ही कर्ता पाहुन !>>>

बरोबर!

आणि कौतुक हे निष्काम असते तर स्तुती ही सकाम!

ह्यात 'काम' हा शब्द कामना, इच्छा, हेत, अपेक्षा इत्यादी अनेक कंगोरे असलेला! Happy

दिनेश, माफ करा. तुमच्या सुंदर प्रतिसादात मी खुसपटे काढणे योग्य नाही. पण भाषाविषयक आहे म्हणून राहावले नाही. आपण शचि+इंद्र =शचेंद्र असे लिहिले आहे ते बरोबर नाही. तो संधि शचींद्र असा आहे, व्हायला हवा.

@ दिनेश., @ हीरा, आजपर्यंत मी 'सचिन' नावाचा अर्थ शोधण्याचा पुष्कळ प्रयत्न केला होता. प्रथमच आज आपणांकडून सचिन नावाची उत्पत्ती माहित झाली. त्याबद्दल आपले धन्यवाद!

सपना तै,
वारा, अनिल , समीर , पवन हे समानार्थी शब्द आहेत.
एकाचा शब्दाच्या विविध छटा दाखविणारे नव्हे.

हवा शब्द बहुतेक परभाषिय आहे.
मराठीत हवा म्हणजे वार्‍यातील वायू.

'हवा हलली की वारा सुरू होतो.' हे लहानपणी रटलेले आहे.

हिंदी आणि उर्दूत हवा वारा या अर्थानेही वापरला जातो.
इंग्रजीत हवा म्हणजे air आणि वारा म्हणजे wind

बाकी तुम्ही दिलेले इंग्रजी शब्द छान आहेत.

ब्रीझ - झुळूक
गस्ट/ब्लो- झोत
विंड - वारा
हरिकेन- वादळ
सायक्लोन - चक्रीवादळ
टोर्नॅडो- वातप्रपात

असावे बहुतेक!

हीरा, खुसपटं काय हो... मला हे सर्व वाचायला फार छान वाटते आहे.

साती, अरेबिक मधे हवा हाच शब्द आहे, पण तो मूळ तिथला असेल का माहित नाही.

माश्याच्या कालवणासाठी काही शब्द..

कालवण म्हणजे साधारण पातळ पण यात खोबरे बारीक वाटलेले किंवा नारळाचे दूध घातलेले
लिपतं म्हणजे अगदी कमी वाटण आणि परतल्यावर माश्याला चिकटून राहिलेले
दबदबीत म्हणाजे भरपूर वाटण ( हे वाटण बारीक नसते ) खुपदा मूळ जिन्नसापेक्षा जास्त वाटण
सुकं.. अगदी कमी वाटण. खोबर्‍यापेक्षा ईतर मसाले जास्त आणि अगदी कोरडे केलेले.
कढी म्हणजे पातळसर आणि नारळाच्या दूधात केलेली

पुळकावणी म्हणजे अगदी पाणचट आमटी ( बेचव या अर्थाने )

माझ्या ५ पैकी ३ काकांनी आंतरजातीय लग्नं केली होती त्यामूळे प्रत्येक काकीची शब्दकळा वेगळी असे.

दिनेशदा-
आम्ही हे शब्द सगळे वापरतो.
अधिक पातळसर कांदा खोबर्‍याचे वाटण आणि कोकम- सांबारं! (सांबार नाही)

आजी 'साळणं' म्हणायची.
बहुदा मुस्लिमांत सालन म्हणतात त्यावरून असेल.
आज्जीचं माहेर दालद्यांच्या गावात होतं.

शिजलेल्या भातासाठी

बोटचेपा - बोटाने सहज चेपला जाईल असा
कणीमोड - अल देन्ते चा मराठी अवतार, अर्थात कटकन आवाज येणार नाही असा
मऊसर - भरपूर शिजवलेला पण ओलसर
मोकळा - शिजलेला पण शिते न चिकटलेली
फडफडीत - शिजलेला, मोकळी शिते पण किंचीत कोरडा
गिच्च - शिते दिसेनासा झालेला
अर्धाकच्चा - पूर्ण न शिजवलेला ( बिर्याणी साठी )

साती, तो शब्द वापरला कि ताटात पडणार्‍या पदार्थाचे स्वरुप काय असणार ते सहज कळत असे.

पुर्वी पाट्यावर(च) सर्व वाटण असे त्यावेळी आई शब्द वापरत असे ते.

चांगले कुटणे - पाट्यावर पापडाचे किंवा करंजीचे पिठ कुटणे
अर्धबोबडे - आंबाडाळीसाठी भिजवलेली चण्याची डाळ
दुखवणे - मिरिदाणे वगैरे किंचीत ठेवणे
खरंगटणे - जिरे, मिरी वगैरे जाडसर कुटणे
भरडणे - कोरडी चण्याची डाळ भजीसाठी वगैरे जाडसर वाटणे
चेचणे - आले, मिरच्या वगैरे अर्धवट वाटलेल्या
ठेचणे - वरच्याप्रमाणेच
जाडसर - लसणाची चटणी असते तसे

या प्रत्येक वाटणासाठी वरवंटा धरायची पद्धत, लावायचा जोर वेगळा असे. याशिवाय वाटणाचे एक मानक होते ते
म्हणजे गंधासारखे बारीक. असे वाटण सहसा गोवन पदार्थांना लागते ( गंध म्हणजे उगाळलेले चंदन ) मालवणी, कोल्हापुरी पदार्थाना असे वाटण लागत नाही.

Pages