सारख्या अर्थाचे पण वेगळी छटा दर्शवणारे मराठी/ इंग्रजी शब्द

Submitted by सिम्बा on 22 November, 2016 - 11:10

काही दिवसा पूर्वी मुलीबरोबर बाहेर चाललो होतो डोक्यावरून पक्ष्यांचा थवा चिवचिवत गेला,
मुलगी म्हणाली “बाबा तो बघ पक्ष्यांचा थवा” इंग्लिश मीडियम च्या ६ वर्षांच्या मुलीने बरोबर शब्द वापरलेला ऐकून मलाच बर वाटलं. पण लगेच आपण मुलीचा मराठीशी संपर्क तुटू दिला नाही आहे म्हणून स्वत: भोवती आरती ओवाळून घेण्याची अनिवार इच्छा झाली आणी तिला पुढचा प्रश्न विचारला ” पक्ष्यांचा थवा, तसा फुलांचा..???” उत्तर आला “सडा” खरतर उत्तर चुकलं नव्हते, पण मला “फुलांचा गुच्छ” अपेक्षित होते.
फुलांचा सडा आणी फुलांचा गुच्छ यातला फरक सांगताना अजून शब्द समोर आले
१) सडा- गळून पडलेली फुले/ वस्तू, जिचा मूळ झाडा / बॉडी बरोबर संबंध संपला आहे, बकुळीचा सडा/ खूप केस गळले तर केसांचा सडा
२) गुच्छ:- साधारण सारख्या गोष्टींचा समूह, पण या गोष्टी मुळ बॉडी पासून दूर केली आहेत (वेग वेगळी फुले तोडून गुच्छ बनवला)
३) ताटवा :- एकत्रित असलेली जिवंत फुले.
४) घोस:- शक्यतो झाडावर असलेली सजातीय फुले.
५) हारा :- रचून ठेवलेली तोडलेली फुले. (नुसताच हारा म्हणजे ढीग बहुतेक)

हे सगळे तिला समजावून सांगणे माझ्या कुवतीबाहेरचे काम आहे हे मला समजले.
मात्र मराठीत इतक्या बारकाईने शब्द प्रयोग करणारे आपण इंग्लिश मध्ये फक्त बुके, किंवा बंच ऑफ फ्लॉवर म्हणून वेळ निभाऊन नेतो हे सुद्धा कळले.
परवा तिच्या वाचनालयातून आणलेले grolier सेरीज चे पुस्तक पहिले आणी परत हा इंग्लिश बद्दलचा न्यूनगंड जागा झाला, कारण त्यात काही शब्दांच्या बर्याच छटा त्यांनी दाखवल्या आहेत.
जसे jump – hop- pounce- bounce- leap
fly- flutter- glide- hover- swoop
असे अर्थवाही इंग्रजी शब्द आणी त्यांचे नेमके मराठी प्रतिशब्द यांचा संग्रह करण्या साठी हा धागा.
प्रतीसादामध्ये ब्रोड्ली सारखा अर्थ मात्र वेगळी छटा दाखवणारे शब्द लिहावेत, (मराठी अथवा इंग्रजी) अर्थ माहित असल्यास तो हि लिहावा, जाणकार आपल्याला सुधारणा सुचावतीलच.

असा धागा आधीच असेल तर मला सांगा हे डिस्कशन तिकडे करू या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'आसव' हा प्रकार जो आहे त्यात देखिल मद्द्यार्क निर्मिती होते.

आमचा एक शाळासवंगडी होता डांगाणातला राजाराम नावाप्रमाणेच राजा माणूस! त्याने मोहा फुलापासून कसे मद्य बनवितात ह्याची कृती वर्गात मस्त फळ्यावर चित्र काढून सांगितलेली!

सिम्बा, विषयन्तराबद्दल क्षमस्व एकदम आठवण आली त्याची ह्या चर्चेत! Happy

कृष्णा , खरंय .
आसवांमध्येही C2H5OH हे १-२ % असतं .

आपल्या त्या ह्यांनीही मोहाच्या फुलापासून दारुबद्दल एक छान लेख लिहिला होता.
देईन लिंक नंतर.

वाह, मस्त धागा _/\_ 'क्लासिक' मराठी किती दिवसांनी ऐकलं Happy

दचकणे, घाबरगुंडी, भय,
startled/started, panicked, alarmed,

भिती, धडकी, धास्ती, दहशत,
horror/scare, jitter, mortify(?) , terror

हाय खाणे: याला समानार्थी नाही बुवा सापडत

दरारा, जरब, वचक
awe, command(?)

झोप, डुलकी, वामकुक्षी, नीज, ग्लानी, पडणे, घोरणे, विश्रांती,

ह्याच्यासंदर्भात अजून शब्द

जो जो, गाई गाई, निद्रा, गाढ झोप, ढाराढूर, चुटका, कावळ्याची झोप, कुंभकर्णाची झोप, शयन (कक्ष)

त्याच्या अजून पुढे निगडीत

शय्या, गादी, पलंग, अंथरूण, बाज, खाट, खाटलं, शेज

<<जो जो, गाई गाई, निद्रा, गाढ झोप, ढाराढूर, चुटका, कावळ्याची झोप, कुंभकर्णाची झोप, शयन (कक्ष) <<
हर्पेन, 'घोडे विकुन झोपणे' अस पण काही आहे ना? Lol

मोहाच्या दारुची कृती, विश्वास पाटलांनी ( बहुतेक झाडाझडती मधे ) दिली आहे.
मोह हा शब्द फारच नागरी आहे. मव, म्हव हे लोकभाषेतले उच्चार आहे.

आपण पर्यायी शब्द का देतो आहे ? सिम्बा यांना वेगवेगळ्या अर्थछटा दर्शवणारे शब्द अपेक्षित आहेत ना ?

सुग्रास, भरपेट, रुचकर, राजेशाही, पेशवाई, घरगुति, साधेसे, स्वादीष्ट ..... !!

हो मला वेगळी छटा दाखवणारे शब्द अपेक्षित होते,

पण इतके छान शब्द येत आहेत, कि मुद्दाम समानार्थी शब्द देऊ नका म्हणणे जीवावर येत आहे
सगळ्याच शब्दांचे स्वागत आहे

हो मला वेगळी छटा दाखवणारे शब्द अपेक्षित होते,

पण इतके छान शब्द येत आहेत, कि मुद्दाम समानार्थी शब्द देऊ नका म्हणणे जीवावर येत आहे
सगळ्याच शब्दांचे स्वागत आहे

चांदण्याच्या बाबतीत शीतल ( हे अष्ट्मीच्या आधीचे आणि हिवाळ्यातले ) पिठूर ( सभोवताली पिठ सांडल्याप्रमाणे दिसणारे ) चमचम ( समुद्रावरून परावर्तीत होणारे ) आल्हाददायक ( मनाला आनंद देणारे ) असे काही शब्द आहेत पण मला सर्वात आवडलेला शब्द चिमणचेटकं ( पहाट व्हायच्या आधी चंद्र नसताना शुक्राची चांदणीचे चांदणे कधी कधी एवढे प्रखर असते कि चिमण्यांना वाटते पहाट झाली )

चांदण्यांबद्दल काय सुंदर सांगत आहात दिनेशदा!
चिमणचेटकं शब्द पहिल्यांदाच ऐकला.
अजून एक शब्द आठवला... टिपूर चांदणं! म्हणजे चांदण्यांचा सडाच असावा.

झुंजूमुंजू ... नेमका कसला आवाज असावा हा ?
पहिला कोंबडा आरवला.. अर्थातच कोंबडा आरवण्याशी संबंधित. आजच्या दिवसातही माझ्या आजोळी कोंबडा
आरवण्याला दिवस सुरु होतो.. पहाटेच्या शांत वेळी, कोंबडा आरवण्याचा आवाज खुप तीव्र आणि दूरवर जातो.

चांदण्या संबंधात अनेक शब्द शांता शेळके यांच्या लेखनातून / बोलण्यातून कळले होते.

कालवणासंबंधी देशावरचे काही शब्द

रोंबाट . साधारण ओलसर पण घट्ट असे कालवण
कोरड्यास . पाणी बहुतांशी आटवलेले. भाकरीवर घालून, बांधून नेण्यास योग्य असे.
वशाट - साधारण मांसाहारी पदार्थाला ( सहसा मटणच ) म्हणतात. हे खाल्ल्यावर हात तेलकट ( ओशट ) झाले पाहीजेत.
खदाकनं.. कदाचित कदान्न चा अपभ्रंश असेल. उरलेली भाकरी, भात आणि मटण एकत्र शिजवून करतात.
रस्सा . कोल्हापूर भागात मटणाच्या फोडीपेक्षा रस्सा जास्त आवडीने खातात. हा बराचसा पातळ असतो.

नारळासंबंधी काही शब्द

सोडणं - नारळ सोलल्यावर वरचे साल निघते ते. याचा एक त्रिकोणी तूकडा जात्याजवळचे पिठ गोळा करायला वापरत.
हेच बंबासाठी जळण म्हणून वापरत शिवाय यापासूनच काथ्या करतात. काथ्याकूट हा शब्द पण यास संबंधात ( ही सोडणं खाडीच्या पाण्यात कुजवून मग खुप कुटावी लागतात.)

चव / सोय ./ चून नारळाचे खवणलेले खोबरे. ( विदर्भात चून म्हणजे झुणका )
नारळाच्या दूधाला शिरे आणि आपशिरे असे दोन शब्द आहेत. शिरे म्हणजे पातळ दूध तर आपशिरे म्हणजे, पाणी न घालता काढलेले दूध.

नारळाचा करवंटी पासून चमचे करतात त्यांना डवली किंवा कुलेर असा शब्द आहे ( कुलेर हा पोर्तुगीज शब्द आहे ) पण जर दोन समसमान तुकडे केले तर त्याला भकलं म्हणायचे.

देशावर पुर्वी नारळ ( दुर्मिळ म्हणून ) फार शुभ मानत आणि नारळ कधीही फोडत नसत तर वाढवत असत.

कालवणासंबंधी आणखी काही शब्द

वशाट - साधारणपणे मटणाचा तेलकट रस्सा. हा खाल्ल्यावर हात तेलकट ( ओशट ) व्हावेत हि अपेक्षा

कोरड्यास - परतून पाणी पुर्णपणे आटवलेला रस्सा. भाकरीवर टाकून बांधला तर भाकरी दमट होणार नाही, इतपत कोरडा.

खदाकनं - कदाचित कदान्न चा अपभ्रंश. शिळी भाकरी, भात आणि मटण, एकत्र शिजवून केलेला प्रकार.

रोंबाट - खुप शिजवून, आतले घटक विरघळून एकत्र झालेला रस्सा.

रस्सा - हा फार घट्ट नाही आणि फार पातळ नाही असा प्रकार. कोल्हापूर भागात मटणातील फोडींपेक्षा रस्सा जास्त आवडीने खातात.

हो ना!
आणि इंग्रजीत रुपांतर करताना हे फक्त थिक ग्रेवी/थिन ग्रेवी असंच करावं लागेल किंवा डिस्क्रिपहन लिहावं लागेल.

ग्रेवीऐवजी सॉस असा शब्दही वापरताना पाहिलाय.
आणि सॉस हा रस्सा आणि डीप अशा दोन्ही अर्थांनी वापरलेला पाहिलाय.

पाशाच्त्य पदार्थात सहसा सॉस वेगळा शिजवून मग वेगळ्या भाजलेल्या / तळलेल्या / शिजवलेल्या मुख्य पदार्थावर घालून खातात. हा सॉस प्रत्येकाने आपापल्या चवीप्रमाणे घालून घ्यावा, अशी अपेक्षा असते. थेट सॉस मधे क्वचितच पदार्थ शिजवतात. गेव्ही / करी हा प्रकार आपल्याकडे आलेल्या वसाहतवाद्यांनी तिकडे नेला.

पण आपल्याकडे रंगाबाबत मात्र शब्दांची कमतरता ( खास करुन छटांसाठी ) जाणवते मला.

उदा. इंग्लीश मधे जांभळ्यासाठी पर्पल, मॉव्ह, लॅव्हेंडर असे अनेक शब्द आहेत. लेमन येलो, सनसेट येलो, अवाकाडो येलो.. असेही काही शब्द आहेत.

अपवाद कदाचित कपड्याच्या खास करुन साड्यांच्या रंगांचा असेल.
आपल्याकडे पैठणीच्या बाबतीत सोनसळी, कोनफळी, मोरपिशी, गुलबक्षी, कुसुंबी, आमसुली, डाळिंबी, अंजीरी असे अनेक शब्द आहेत. आणि हा नेमका कुठला रंग हे फक्त बायकांनाच कळते, भावजींना पण नाही.

हा नेमका कुठला रंग हे फक्त बायकांनाच कळते, भावजींना पण नाही.>>> हो ना! त्या एका चटणी कलरचाही गोंधळ आहे. नेमका कुठला रंग काही समजत नाही. कारण चटणी ज्या पदार्थाची बनवाल त्या रंगाची चटणी होईल. मग चटणी कलर म्हणजे नेमका कोणता रंग समजायचा? Biggrin

शुचिर्भूत - cleansed (क्लेन्झ्ड. क्लीन्स्ड नाही)
शुचिर्भूत बर्‍याचदा धार्मिक प्रसंगी वापरतात म्हणून शुद्धि या अर्थाने कदाचित प्युरिफाईड सुद्धा चालू शकेल पण क्लेन्झ्ड मला अधिक बरोबर वाटतो. क्लीन आणि क्लेन्झ मध्ये महत्त्वाचा फरक असा कि इतर कुठल्याही वस्तुची स्वच्छता/शुद्धि होत असेल तर क्लीन (क्लीन द फ्लोर) आणि जर स्वतःची (शारिरिक किंवा आत्मिक) स्वच्छता/शुद्धि होत असेल तर क्लेन्झ (क्लेन्झ सिन्स फ्रॉम द सोल, क्लेन्झ पॅलेट - जीभेवरची चव घालवणे/जीभ स्वच्छ करणे, क्लेन्झ स्किन इ.)

साती यांनी म्हटल्याप्रमाणे स्तुती हा शब्द चढविण्यासाठी वापरतात हे चूक आहे. अशा खोट्या प्रशंसायुक्त स्तुतीला व्याजस्तुती असा स्वतंत्र शब्द आहे. स्तुती म्हणजे गुणवर्णनच. आरत्यांच्या वगैरे स्वरूपात ही स्तुती केली जाते त्याला कुठल्याही स्वरूपाचा ' वास मारत ' नाही
देवादिकांची स्तुती या स्वतंत्र रचनाही आहेत
उदा:

॥ नारायणस्तुती ब्रह्मोक्त नरसिंहपुराणे ॥

नारद उवाच
किं तञ्ज्ञानं परं देव कश्च योगः परस्तथा ।
एतन्मे तत्त्वतः सर्वं त्वमाचक्ष्व पितामह ॥

ब्रह्मोवाच
यः परः प्रक्ऱृतेः प्रोक्तः पुरुषः पञ्चविंशकः ।
स एव सर्वभूतानां नर इत्यभिधीयते ॥

पण ' शिष्ट ' शब्दाला जसा उपहासात्मक अर्थ रूढ झाला आहे तसे स्तुतीच्या बाबतीत सातींचे झाले आहे. Happy

अहो, कितीही गुण गा,
शेवटी देवांची स्तुती केल्यावर काहितरी आशीर्वादाचीच अपेक्षा असते.

मात्र तुमच्याशी सहमत!
स्तुती शब्दाला पॉझिटिव अर्थ आहे.

शिवस्तुती वगैरे वाचलेले आहे.
स्तुतीसुमने तर सगळ्या सत्कार समारंभात पॉझिटिवलीच उधळली जातात.

मात्र राजाच्या दरबारी स्तुतीपाठक (भाट) हे पगारीच ठेवलेले असायचे.

रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम्
भास्वानुदेष्यति हसिष्यति पंकजश्रीः।
इति विचारयति कोषगते द्विरेफे
हा हंत हंत नलिनीं गज उज्जहार॥

एक भुंगा मध चाखण्यासाठी कमळात जाऊन बसतो. मात्र सूर्यास्तानन्तर कमळाच्या पाकळ्या बंद होऊन तो भुंगा त्यात बंदिस्त होतो. त्यावर तो वरील प्रमाणे विचार करतो .' रात्र जाईल्,सकाळ होईल्,सूर्योदय होईल , कमळ पुन्हा उमलेल,आणि माझी सुटका होईल असा कोषातील द्विरेफ (दोन पंखावाला) म्हणजे भुंगा विचार करीत असतो. पण हाय रे दुर्दैवा , तळ्यात शिरलेल्या हत्तीने सोण्डेने कमळाचे झाडच उपटून टाकले "

फुलांचा सडा बहुतांश पारिजातकाच्या संदर्भात (च) वापरातात. गुलाबाचा अथवा झेंडूचा सडा असे कोणी लिहीत नाही. बहुधा आपोआप गळून पडणार्‍या फुलांना वापरतात. उदा चाफा.बकुळ आणखी जसे जांभळाचा, बोरांचा सडा. गुलाबाचे ताटवे शेवंतीचे रान.

Pages