शब्दवेध - पर्यायी मराठी शब्द

Submitted by हर्पेन on 15 March, 2016 - 06:37

२०१६ च्या मराठी भाषा दिवसा निमित्त आयोजित उपक्रमांचा भाग म्हणून शब्दवेध नावाचा एक उपक्रम राबवला होता.
http://www.maayboli.com/node/57867
अर्थातच मभादि निमित्त असा उपक्रम चालवण्याला कालावधीची सीमा होती. पण तरीही हा उपक्रम निरंतर चालू रहावा असे वाटल्याने हा धागा काढत आहे. (विशेषतः नवीन / समकालीन) इंग्रजी शब्दास अथवा शब्दसमुहास पर्यायी मराठी शब्द शोधून काढणे हा ह्या धाग्याचा हेतू आहे.

इथून पुढचा भाग तिकडूनच चिकटवला आहे. ज्यायोगे ह्या उपक्रमाची नीट कल्पना येईल.

नमस्कार,

हल्ली 'मराठी भाषा ही मरणपंथाला लागलेली भाषा आहे' पासून 'जोवर मराठीत नाटकं, पुस्तकं, कविता आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या व्यक्ती जन्मास येतील तोवर मराठी भाषेला मरण नाही' पर्यंतच्या टोकाच्या प्रतिक्रिया आपण ऐकत असतो. भाषा जर नवीन पिढीला शिकवली जात नसेल, तर भाषेचा अंत दूर नाही, हे तर आपण जाणतोच. भाषा अद्ययावत राहण्यासाठी आणि नवीन पिढीला आपलीशी वाटण्यासाठी कालसुसंगत बदल, नवनवीन शब्दांना सोपे, सुटसुटीत प्रतिशब्द निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे.

आपण रोज बोलताना, मायबोलीवर लिहिताना कितीतरी अन्य भाषांतले (बहुतांश इंग्रजी) शब्द वापरतो. आपल्यापैकीच काही लोक कटाक्षानं इंग्रजी शब्दांचा वापर टाळून, प्रसंगी नवीन मराठी शब्दाला जन्माला घालून मराठीतच लिहिण्याचा आग्रह धरतात. त्यातले काही शब्द अगदी शब्दशः भाषांतरित असतात, तर काही मूळ अर्थाचे आणि आपल्या भाषेचा / संस्कृतीचा मुलामा चढवून आपलेच वाटणारे असतात. यातला कुठलाही प्रकार श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असा नसतोच. असे अनेक शब्दश: भाषांतरित शब्द आपल्या इतके अंगवळणी पडलेले असतात की, मधुचंद्र किंवा उच्चभ्रू हे अनुक्रमे हनिमून आणि हाय-ब्रो या शब्दांची अगदी शब्दशः भाषांतरं आहेत, हे जाणवतसुद्धा नाही. असे नवे शब्द वाचताना अनेकदा, 'अरे, काय मस्त शब्द कॉइन केलाय... आपलं जन्माला घातलाय' अशी आपली प्रतिक्रिया होते, तर काही वेळेला हा फारच जगडव्याळ शब्द आहे, किंवा याचा हुबेहूब अर्थ जाणवत नाहीये, अर्थाची एखादी छटा कमी पडतेय, असं वाटतं. असं झाल्यावर आपण स्वस्थ थोडीच बसतो! त्या शब्दाचा कीस पाडणं चालू होतंच. मग शब्दार्थ, शब्दाचे बरोबर रूप असे बाफ वाहायला लागतात.

तर या उपक्रमात आम्ही असेच काही इंग्रजी शब्द देणार आहोत. त्या शब्दांना त्यांच्या अर्थाच्या जवळ जाणारा सोपा, सुटसुटीत मराठी प्रतिशब्द तुम्ही सांगायचा आहे. या शब्दांना एकच एक उत्तर अर्थातच असेल, असं नाही. कदाचित काही शब्दांना यंदाच्या मराठी भाषा दिनाच्या काळात प्रतिशब्द सुचणारही नाहीत, पण तुम्ही प्रयत्न कराल, याची खात्री आहे.

आतापर्यंत अचूक आणि सोपे वाटलेले शब्द एकत्र..
१) Brain Storming : मनावर्त, विचार मंथन,कल्पना विस्फोट, मेंदूवादळ, कल्पनामंथन
२) Pace : गती,वेग
३) Bib : बिल्ला, धावक क्रम निर्देशक
४) Dilatory : संथ,विस्फारक, कूर्मगती(ने वागणारा)
५) Polite Reminder : विनम्र आठवण, मृदु स्मरण, आठवणीकरता टिचकी, स्मरणविनंती
६) paradigm : संस्थिती, नमुना/ वानगी,ठोकळेबाज / मूलभुत संकल्पना
७) Spoiler alert : रसभंग सूचना,रहस्यभेद इशारा
८) Martinet : शीस्ताग्रही
९) Indefatigable : अथक, अम्लान,अदम्य,अविरत
१०)naive : भोळा/ भोळी, अपरिपक्व,भाबडा अननुभवी, अजाण
११) unplugged : वग़ळलेला / काढुन टाकलेला,
१२) Blurb : सारांश,गोषवारा

तर मग होऊ दे कल्पना विस्फोट येऊ देत नवनवीन शब्द मराठी मधे....

माझा प्रयत्न राहील की असे मायबोलीकरांनी सुचवलेले पर्यायी शब्द मी महिन्यातून एकदा तरी इथे मुख्य धाग्यामधे लिहून, धागा अद्ययावत करेन.

मार्च महिना

१. जी पी एस = वैश्विक स्थलनिर्देशक प्रणाली
२. रिसेट करणे = निरस्त करणे, मूळपदावर आणणे , पुर्वपदावर आणणे
३. थॅक यू इन अँटीसिपेशन = आधीच आभार मानतो /ते
४. डिव्हाईस = Device = साधन, उपकरण, युक्ती
५. गॅजेट = Gadget = साधन, अवजार
६. अपग्रेड = स्तर उद्धरण, दर्जावर्धन , श्रेणीवर्धन
७. हार्डवेअर = संगणकीय साहित्य, सामुग्री
८. सॉफ्टवेअर = संगणकीय कार्यप्रणाली
९. एप्स (ऍप्लिकेशन्स) = उपायोजने
१०. स्क्रीन, डिस्प्ले = पडदा, पटल, दर्शन, दर्शनी पटल
११. डिस्प्ले पिक्चर = दर्शनचित्र
१२. Strategy व्यवसाय विषयी - धोरण
१३. Strategy युध्द विषयी - व्युहरचना
१४. Strategy वैद्यकीय संदर्भाने - उपाय योजना, उपचार
१५ ग्रेव्ही- रस्सा
१६ डिप - बुडूक / डुबकावणं
१७ पेस्ट - वाटण
१८ मॅरिनेट - मुरमाखवणं
१९ शॅलो फ्राय- तेलावर परतणे
२० रॉक सॉल्ट - दगडी मीठ, काळे मीठ, सैंधव, शेंदेलोण
२१ detergent - निर्मलक
२२ file( of papers) - धारिका
२३ res. flat - सदनिका
२४ row house जोडघर
२५ कोवर्कर्/कलीग - सहकारी
२६ Mutually exclusive - परस्परवर्ज्य

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे, विकेंडला विकांत म्हणतात ते मराठी नाही होय! इतक्यांदा लोक वापरतात की ते मराठीच वाटू लागलंय.
बरं तुम्ही 'सप्ताहांत' म्हणा किंवा सप्ताह अखेर.

कोवर्कर्/कलीग ला सहकारी हा शब्द सर्रास वापरतात. हा जुनाच वापर आहे.

गिल्टफ्री- कानकोंडे न होता

कॉनकॉल- दूरसंमेलन

सांतरसभा असा एक शब्द सूचतोय. म्हणजे अंतरासहितही एकत्र सभा.

म्युच्युअली एक्स्क्लुजिव्हला एक शब्द अगोदरच आहे काहीतरी. गणिताच्या पुस्तकात असायचा.

विकेंडला विकांत म्हणतात ते मराठी नाही होय! काय हे साती Happy

मॅरिनेट्ला - मुरमाखणे / माखमुरवणे असा शब्द कसा वाटतो ?
कोवर्कर्/कलीग ला सहकारी हा शब्द सर्रास वापरतात होय की सहकर्मचारी पण योग्य आहे.

कॉनकॉल- दूरसंमेलन
सांतरसभा असा एक शब्द सूचतोय. म्हणजे अंतरासहितही एकत्र सभा.
ह्यात फोनचा संदर्भ यायला हवा ना
पण मस्त आहेत दोनही शब्द Happy

Guilt free - विनाअपराध / अपराधी वाटून न घेता
Mutually exclusive - एकसमयवच्छेदकरुन (बहुतेक बरोबर लिहिलाय) असा काहीसा शब्द आहे ज्याचा अर्थ एकाच वेळी घडणाऱ्या गोष्टी असा होतो. याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे mutually exclusive असेल.
Con call - चर्चा संवाद?
Marinate साठी मुरवणे जास्त योग्य वाटतो कारण मुरवताना माखण्याची क्रिया (थोडीफार) होतेच की.

सांतरसभा भारी शब्द आहे साती!
वीकेंडला आठवडा अखेर (महीना अखेर सारखं) म्हटलं तर आअ असं लघूरुप वापरता येईल!

जिज्ञासा , एकसमयवच्छेदकरून म्हणजे सायमल्टेनियसली. अ‍ॅट द सेम मोमेंट.
मुरवायला माखायची गरज नाही.
मी लिहीलंय ना उदाहरण खारातले आवळे.
मुरवलेले असतात पण माखलेले नसतात.

साती, Mutually exclusive म्हणजेच ज्या गोष्टी एकाच वेळी घडू शकत नाहीत अशा ना?

हो.

संच संकल्पनेत शिकवलेला तो शब्द अगदी ओठांवर आहे पण आठवत नाही आहे.

संचांचे प्रकार आठवतायत का?
सांत संच , अनंत संच, या यादीत पुढे होता तो प्रकार.

दोन संचांना एकही घटक सामाईक नसेल तर त्यांना विभिन्न वा विभक्त संच म्हणतात.
पण आपण विभक्त हा शब्द वेगळे होणे यासाठी वापरतो.
Mutually exclusive ला परस्परवर्ज्य असा शब्द मिळाला.

कानकोंडे या शब्दात मूळ शब्दाचा भाव व्यक्त होतो. इथे टोचणीमुक्त असाही शब्द घेता आला असता. पण शब्दशः भाषांतरात मजा नाही.

Mutually exclusive ला परस्परवर्ज्य हा शब्द मस्तच आहे.

अरे वाह, छानच धागा आहे हा, आत्ता पहाण्यात आला.
एक अगदी साधाच शब्द आहे, ज्याला योग्य मराठी शब्द काय असू शकेल कळत नाहीये.
कम्पनी = सोबत या अर्थाने नाही तर कम्पनीत नोकरी करत आहे या अर्थाने
मंडळी हा पर्यायी शब्द कसा वाटतो. उदा. गोरे आणि मंडळी

@महेश : कंपनी मोठी असेल तर 'उद्योग' चालेल ?

MoU साठी ' सामंजस्य करार' हा सुंदर पर्याय आहे. नुकताच असा करार महाराष्ट्र शासन व टाटा यांच्यात झाला आहे.

अरेरे - एप्रिलात काहीच नाही हालचाल ह्या धाग्यावर

व्हायरल ह्या शब्दाला लोकसत्तेत सैरावैरा असा शब्दप्रयोग केलेला आढळतो. अजून समर्पक श ब्द सुचतोय का कुणाला?

व्हायरल करता वणव्यासारखी असे म्हणता येईल. एखादी बातमी वा व्हिडियो व्हायरल झाला ह्याला अमुक एक बातमी वणव्यासारखी पसरली असे काहीतरी म्हणता येईल. अर्थात ते इतके चपखल बसत नाही. पण एक प्रयत्न.

Meta (from the Greek preposition and prefix meta- (μετά-) meaning "after", or "beyond") is a prefix used in English to indicate a concept which is an abstraction from another concept, used to complete or add to the latter.

https://en.wikipedia.org/wiki/Meta

याला मराठीत काय म्हणता येईल?

२२ file( of papers) - धारिका>>>>>> धारिणी,शासकीय शब्दकोशात आहे
.Disclaimer = अस्वीकरण.

मेटा ह्या इंग्रजी उपसर्गाकरता उत्तर असा प्रत्यय वा उपसर्ग वापरता येतो ज्याचा अर्थ तसाच आहे.
उदा. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ. किंवा उत्तराधिकारी,

१९ शॅलो फ्राय- पृष्ठतळण

मला नाही पटला हा शब्द. त्या जागी, तव्यात परतणे हा सहज समजण्याजोगा शब्दप्रयोग आहे. कढईत तळणे किंवा भर तेलात तळणे याच्या विरुद्ध अर्थाने. ( परतणे च्या जागी आजकाल सर्रास परतवणे असा शब्द वापरतात तोही मला पटत नाही )

२० रॉक सॉल्ट - दगडी मीठ

यासाठी काळे मीठ, सैंधव, शेंदेलोण असे शब्द आहेत कि. दगडी लिहिलेत तर न विरघळणारे असे काही तरी वाटेल. हे मीठ खाणीतील दगडापासून मिळवत असले तरी ते विद्राव्यच असते.

डिप - बुडूक / डुबकावणं..

हे देखील मला पटलेले नाही. डिप हे खाण्यासंदर्भात आहे ना, मग आपल्या चटणीशी त्याचे साधर्म्य आहे. अश्या प्रकारे केलेल्या आपल्याकडच्या चिंचेच्या चटणीला आपण चटणीच म्हणतो ( इंग्रजी डिप प्रमाणे, ती देखील वाटून करावी लागत नाही. )

मराठीकरण करताना अति मराठी आणि अति संस्कृतही टाळले पाहिजे. तरच ते शब्द रुढ होतील. आणि मग यासाठी बोलीभाषेचा आधार का घेऊ नये ? अगदी ताजे उदाहरण द्यायचे, तर सैराट. हा शब्द आता सहज रुढ होईल.

डीपसाठी रोंबाट हा शब्द वापरतात कोकणात Happy

Strategy वैद्यकीय संदर्भाने - उपाय योजना,

उपचार योजना, जास्त ठिक राहील. खरं तर योजना हा शब्द नकोच. उपचार (अनेक वचन ) हेच ठिक.
उपाय समस्येवरचे असतात. उपचार , आजारावरचे.

डीपसाठी किंवा डिपच्या उद्देशाने केलेल्या पदार्थांना गुळवणी, मिरवणी, जिरवणी असे शब्द वापरात आहेत ना?
म्हणजे गुळवणीत बुडवून घावणे किंवा शिरवळ्या खायच्या.

Pages