शब्दवेध - पर्यायी मराठी शब्द

Submitted by हर्पेन on 15 March, 2016 - 06:37

२०१६ च्या मराठी भाषा दिवसा निमित्त आयोजित उपक्रमांचा भाग म्हणून शब्दवेध नावाचा एक उपक्रम राबवला होता.
http://www.maayboli.com/node/57867
अर्थातच मभादि निमित्त असा उपक्रम चालवण्याला कालावधीची सीमा होती. पण तरीही हा उपक्रम निरंतर चालू रहावा असे वाटल्याने हा धागा काढत आहे. (विशेषतः नवीन / समकालीन) इंग्रजी शब्दास अथवा शब्दसमुहास पर्यायी मराठी शब्द शोधून काढणे हा ह्या धाग्याचा हेतू आहे.

इथून पुढचा भाग तिकडूनच चिकटवला आहे. ज्यायोगे ह्या उपक्रमाची नीट कल्पना येईल.

नमस्कार,

हल्ली 'मराठी भाषा ही मरणपंथाला लागलेली भाषा आहे' पासून 'जोवर मराठीत नाटकं, पुस्तकं, कविता आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या व्यक्ती जन्मास येतील तोवर मराठी भाषेला मरण नाही' पर्यंतच्या टोकाच्या प्रतिक्रिया आपण ऐकत असतो. भाषा जर नवीन पिढीला शिकवली जात नसेल, तर भाषेचा अंत दूर नाही, हे तर आपण जाणतोच. भाषा अद्ययावत राहण्यासाठी आणि नवीन पिढीला आपलीशी वाटण्यासाठी कालसुसंगत बदल, नवनवीन शब्दांना सोपे, सुटसुटीत प्रतिशब्द निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे.

आपण रोज बोलताना, मायबोलीवर लिहिताना कितीतरी अन्य भाषांतले (बहुतांश इंग्रजी) शब्द वापरतो. आपल्यापैकीच काही लोक कटाक्षानं इंग्रजी शब्दांचा वापर टाळून, प्रसंगी नवीन मराठी शब्दाला जन्माला घालून मराठीतच लिहिण्याचा आग्रह धरतात. त्यातले काही शब्द अगदी शब्दशः भाषांतरित असतात, तर काही मूळ अर्थाचे आणि आपल्या भाषेचा / संस्कृतीचा मुलामा चढवून आपलेच वाटणारे असतात. यातला कुठलाही प्रकार श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असा नसतोच. असे अनेक शब्दश: भाषांतरित शब्द आपल्या इतके अंगवळणी पडलेले असतात की, मधुचंद्र किंवा उच्चभ्रू हे अनुक्रमे हनिमून आणि हाय-ब्रो या शब्दांची अगदी शब्दशः भाषांतरं आहेत, हे जाणवतसुद्धा नाही. असे नवे शब्द वाचताना अनेकदा, 'अरे, काय मस्त शब्द कॉइन केलाय... आपलं जन्माला घातलाय' अशी आपली प्रतिक्रिया होते, तर काही वेळेला हा फारच जगडव्याळ शब्द आहे, किंवा याचा हुबेहूब अर्थ जाणवत नाहीये, अर्थाची एखादी छटा कमी पडतेय, असं वाटतं. असं झाल्यावर आपण स्वस्थ थोडीच बसतो! त्या शब्दाचा कीस पाडणं चालू होतंच. मग शब्दार्थ, शब्दाचे बरोबर रूप असे बाफ वाहायला लागतात.

तर या उपक्रमात आम्ही असेच काही इंग्रजी शब्द देणार आहोत. त्या शब्दांना त्यांच्या अर्थाच्या जवळ जाणारा सोपा, सुटसुटीत मराठी प्रतिशब्द तुम्ही सांगायचा आहे. या शब्दांना एकच एक उत्तर अर्थातच असेल, असं नाही. कदाचित काही शब्दांना यंदाच्या मराठी भाषा दिनाच्या काळात प्रतिशब्द सुचणारही नाहीत, पण तुम्ही प्रयत्न कराल, याची खात्री आहे.

आतापर्यंत अचूक आणि सोपे वाटलेले शब्द एकत्र..
१) Brain Storming : मनावर्त, विचार मंथन,कल्पना विस्फोट, मेंदूवादळ, कल्पनामंथन
२) Pace : गती,वेग
३) Bib : बिल्ला, धावक क्रम निर्देशक
४) Dilatory : संथ,विस्फारक, कूर्मगती(ने वागणारा)
५) Polite Reminder : विनम्र आठवण, मृदु स्मरण, आठवणीकरता टिचकी, स्मरणविनंती
६) paradigm : संस्थिती, नमुना/ वानगी,ठोकळेबाज / मूलभुत संकल्पना
७) Spoiler alert : रसभंग सूचना,रहस्यभेद इशारा
८) Martinet : शीस्ताग्रही
९) Indefatigable : अथक, अम्लान,अदम्य,अविरत
१०)naive : भोळा/ भोळी, अपरिपक्व,भाबडा अननुभवी, अजाण
११) unplugged : वग़ळलेला / काढुन टाकलेला,
१२) Blurb : सारांश,गोषवारा

तर मग होऊ दे कल्पना विस्फोट येऊ देत नवनवीन शब्द मराठी मधे....

माझा प्रयत्न राहील की असे मायबोलीकरांनी सुचवलेले पर्यायी शब्द मी महिन्यातून एकदा तरी इथे मुख्य धाग्यामधे लिहून, धागा अद्ययावत करेन.

मार्च महिना

१. जी पी एस = वैश्विक स्थलनिर्देशक प्रणाली
२. रिसेट करणे = निरस्त करणे, मूळपदावर आणणे , पुर्वपदावर आणणे
३. थॅक यू इन अँटीसिपेशन = आधीच आभार मानतो /ते
४. डिव्हाईस = Device = साधन, उपकरण, युक्ती
५. गॅजेट = Gadget = साधन, अवजार
६. अपग्रेड = स्तर उद्धरण, दर्जावर्धन , श्रेणीवर्धन
७. हार्डवेअर = संगणकीय साहित्य, सामुग्री
८. सॉफ्टवेअर = संगणकीय कार्यप्रणाली
९. एप्स (ऍप्लिकेशन्स) = उपायोजने
१०. स्क्रीन, डिस्प्ले = पडदा, पटल, दर्शन, दर्शनी पटल
११. डिस्प्ले पिक्चर = दर्शनचित्र
१२. Strategy व्यवसाय विषयी - धोरण
१३. Strategy युध्द विषयी - व्युहरचना
१४. Strategy वैद्यकीय संदर्भाने - उपाय योजना, उपचार
१५ ग्रेव्ही- रस्सा
१६ डिप - बुडूक / डुबकावणं
१७ पेस्ट - वाटण
१८ मॅरिनेट - मुरमाखवणं
१९ शॅलो फ्राय- तेलावर परतणे
२० रॉक सॉल्ट - दगडी मीठ, काळे मीठ, सैंधव, शेंदेलोण
२१ detergent - निर्मलक
२२ file( of papers) - धारिका
२३ res. flat - सदनिका
२४ row house जोडघर
२५ कोवर्कर्/कलीग - सहकारी
२६ Mutually exclusive - परस्परवर्ज्य

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अपग्रेडने दर्जा वृद्धी होतेच असं नाही, त्याने फक्त प्रणाली अद्ययावत होते. >>> अमित, हे सॉफ्टवेअरच्या क्षेत्रापुरते खरे असेल पण इन जनरल बर्‍याच ठिकाणी दर्जा देखील वाढतो. उदा. विमानातील सीटींगचे अपग्रेड

शुगोल, दर्जा वाढतो पेक्षा वाढवायचा उद्देश सगळीकडेच नक्की असतो. म्हणूनच अद्ययावतीकरण किंवा अद्ययावत केलं जास्त सुटसुटीत वाटलं.

अद्ययावत = up-to-date
त्यामुळे अद्ययावत हा शब्दही बरोबर नाही.
Example: I upgraded my OS from 7.1 to 8.1 ( while version 10 is also available)
मी एक श्रेणी वर गेलो पण up-to-date नाही.

हम्म. मान्य.
श्रेणीवर्धन. मग गोळ्यांनी दिलेला स्तर-उद्धरण जास्त बरोबर होईल. पण हे दोन्ही संस्कृतप्रचुर/ पुस्तकी/ तोंडात रुळायला कठीण वाटतात Sad

माझ्या ताईने display picture/ profile picture ला दर्शनचित्र हा शब्द सुचवला होता. आम्हाला तरी तो आवडला.

सॉफ्टवेअर = तंत्रांश आणि हार्डवेअर = यंत्रांश कसे वाटतायेत?
संगणक ज्या तंत्रायोगे चालतो प्रत्येक सॉफ्टवेअर त्याचा एक अंश/भाग आहे म्हणून तंत्रांश आणि त्याच प्रमाणे प्रत्येक हार्डवेअर हा संपूर्ण यंत्राचा एक अंश म्हणून यंत्रांश.

संस्कृतप्रचूर टाळायचे आहेत मान्य पण हे सुद्धा बघा पटत आहेत का,
अपडेट - अद्यतन (अद्य = आज, पण तन प्रत्यय कुठला 'आज' सांगत नाही. थोडक्यात नव्या आवृत्तीला गेलो पण ती अद्ययावत असेलच असे नाही, जी अद्ययावत मध्ये यावत् ने स्पष्ट होते)
अपग्रेड - संवर्धन

Strategy ला काय शब्द आहे? संदर्भ : व्यवसाय, युध्द , वैद्यकीय
यात तिन्ही वेगळे शब्द असू शकतात.

display picture/ profile picture ला दर्शनचित्र हा शब्द >>> आवडलाय Happy

रिसेट केले - पुर्वपदी आणणे

Strategy ला काय शब्द आहे? संदर्भ : व्यवसाय, युध्द , वैद्यकीय
यात तिन्ही वेगळे शब्द असू शकतात.

माझ्या मते (सहज सुचलेले)
Strategy व्यवसाय - धोरण
Strategy युध्द - व्युहरचना
Strategy वैद्यकीय - उपाय योजना

व्यवसायातील स्ट्रॅटेजीत ....नुसतेच धो रण नसते, त्यात योजना, मार्ग, अन्वेषण सर्वच असते , त्या मुळे अचूक पर्यायी शब्द मला तरी अजून सापडला नाही

हार्डवेअर = यंत्रणा

साफ्टवेअर = मंत्रणा

मोबाइल = चलभाष

landline = स्थिरभाष

छान धागा आणि प्रतिसाद!
रेव्यु, धोरण म्हणजे केवळ योजना नाही ना, धोरणी माणूस म्हणजे जो strategy आखू शकतो असा. त्यामुळे strategy ला पर्यायी शब्द म्हणून धोरण योग्य वाटतो.

कृपया खालील शब्दांचे पर्यायी शब्द सुचवावेतः
डेटा
सर्विलियंस
मास सर्विलियंस
बायोमेट्रीक डेटा
रेटीना स्कॅन
स्कॅन / स्कॅनींग

डेटा : विदा
सर्विलियंस : पाळत
बायोमेट्रिक : शरिरखुणांचा विदा
रेटीना स्कॅन : दृष्टीपटल चित्रण
स्कॅन : चित्रण

स्कॅन : चित्रण तितकंस समर्पक वाटत नाही आरपार भेदून जाणारे (पुर्णतः यथार्थ नसलेले) चित्रण आहे ते
स्कॅन - (छायचित्राच्या धर्तीवर) भेदचित्र सारखे काहीतरी हवं

धन्यवाद.
विदा म्हणजे काय? विदा म्हणजे डेटा. पण विदा म्हणजे काय? हा मुळ मराठी / संस्कृत / प्राकृत शब्द होता की असाच रँडम शब्द आहे?

तसेच, रँडमसाठी चपखल पर्याय काय होई शकेल?

रँडम : स्वैर, मुक्त, बेबंद,
>>
रँडम नंबर तयार करा, यात या पैकी कोणताही शब्द योग्य वाटत नाही.

Pages