वृद्धाश्रम, वृद्धाश्रमात पाठवलेले गेलेले वॄद्ध, अतिवृद्ध, त्यामागची कारणे इत्यादी

Submitted by वेल on 15 January, 2016 - 08:34

अनेक जण आपल्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवतात. किंवा कधी कधी वृद्ध स्वतःच तिथे जाऊन राहतात.
मुलांची, वृद्ध पालकांची विचारसरणी, दोघांचे प्रॉब्लेम्स, बिहेवोरियल प्रॉब्लेम्स.
कुठे कुठे वृद्धाश्रम आहेत, ते कसे आहेत. त्यांचे चार्जेस काय आहेत.
वृद्धाश्रमात वृद्धांना कशी वागणूक मिळते. वृद्धांना घरी कशी वागणूक मिळते, ती का मिळते. वृद्ध जसे वागतात तए का वागतात.

अशा अनेक प्रश्नांवर इथे चर्चा करुया.

आज आपण सुपात असलो तरी कधी न कधी जात्यात जाणार आहोतच, म्हणजे वृद्ध होणारच आहोत. सो त्याआधी जरा मानसिक तयारी करु

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक काय, काही केले तरी बोलतातच ! त्यांची कशाला पर्वा करायची ?

बी, तू म्हणतोस तश्या सोयी अनेक देशांत मी बघितल्यात. पण भारतातली गर्दी आणि नियोजनाचा अभाव बघता ते कितीसे जमणार ? नाना नानी पार्क हि अगदी अलिकडच्या काळातली सुधारणा. ती पण किती अपुरी आहे ते बघतोच आहोत.

भरत, माझ्या भावाच्या बाबतीत नेत्रदान केले होते, त्यांना फोन केल्यावर ती माणसे घरी आली होती. आणि जरी समजा देह हॉस्पिटलमधे पोहोचवायचाच असेल, तरी ते कमी जिकीरीचे आहे. आपल्याकडे जो घोळ घातला जातो, त्यापेक्षा बराच सुसह्य !

आपण वृद्धापकाळ आणि त्यानंतर येणारा मृत्यू सहज स्वीकारत नाही. आसक्ती काही जात नाही. नातू बघितला, कि नातसून बघायची असते. ती बघितली कि पतवंडे बघायची असतात.
सगळे माझ्याच मनासारखे व्हावे. माझ्याच आवडीचे व्हावे हा हेका सुट्त नाही. मग एवढ्या तेवढ्यावरून वाद घातले जातात.

खरेच, मला वाटते कि या बाबतीत आपले संत आणि धर्म जरी बरेच काही सांगत असले तरी ते आपल्या पचनी पडलेले नाही.

>>त्यांना मुलीच्या ऐवजी मुलगा असता तर असाच विचार केला असता का? किंवा मुलाने जर परत येण्याचा केला नाहीतर त्याला दोष देण्यात येतो किंवा त्याला (मुलाला) जबाबदारीच त्याला दडपण असू शकत ना ?>>
मंजूताई माझा कझिनही एकटाच आहे. तो देखील परदेशातच स्थाइक झालाय. मामामामी दोघेच रहातात. माझ्या आजोळी आजीआजोबा आजी हयात होती तोवर मोठ्या घरी एकटेच रहायचे. मुलांना घरे बांधायला आधीच जवळ जागा घेतली होती. तिथे दोघा मामांचे स्वतंत्र बंगले, दोघे मामा नोकरी निमित्ताने शहरात स्वतंत्र असे होते. विभक्त कुटुंब हे आधीच्या पिढीतच असल्याने नव्या पिढीने आपल्या जवळच रहावे हा हट्ट नाहीये. कामाला माणसे ठेवून स्वतःच्या घरात किंवा चांगला वृद्धाश्रम अशी काळजी घेतली जावी एवढीच अपेक्षा आहे. आईच्या माहेरची सगळीच वृद्ध मंडळी स्वतंत्र रहातायत. आजारपणात मदत घेतली जाते पण एरवी स्वतंत्र संसार.

तसेही ग्लोबलाझएशनच्या काळात भारतातच रहायचे ठरवूनही बदली झाली म्हणून काही काळ परदेशात, बिझनेस ट्रॅवल वगैरे गोष्टींमुळे प्रसंगी अपत्य जवळ नाही असेही होत असते. अपत्याच्या कामाच्या विचित्र वेळा, रजा घेता न येणे हे देखील आहेच. त्यामुळे आमच्याकडे लेकींच्या सासरचे, सुनेच्या माहेरचे वगैरे मंडळी, जवळपास रहाणारी नवी पिढी अणि त्यांचे जोडीदार सगळे एकमेकांना संभाळून घेतात. जमेल तशी मदत करतात. वृद्ध मंडळी देखील प्रसंगी बेबीसिटिंग, हॉस्पीटलात सोबत थांबणे, बाईच्या मदतीने डब्याची व्यवस्था वगैरे जे जमेल ते करतात. मात्र खात्रीच्या व्यावसायिक सोयी फारश्या नसल्याने एकंदरीत कठीण जाते.

आता विचारांती हे जाणवते आहे माझ्या आजी आजोबांची पिढी नशीबवान होती की शेवटपर्यंत ते नांदत्या घरात राहू शकले.
आता जे मुलाबाळांसकट परदेशात रहात आहेत त्यांना पर्याय म्हणजे जोवर शक्य आहे तोवर स्वतःच्या घरात रहाणे नाहीतर वृद्धाश्रम. भारतात राहण्याचा पर्याय आहे पण मुले इथे वाढल्यामुळे भारतामध्ये सहज वावरू शकत नाहीत त्यामुळे ती तिथे भेटायला येणेपण कठीण.

आपण आपल्या मुलांकडून अपेक्षा ठेवायला हरकत नाही पण त्या पूर्ण होतीलच असे पण नाही आणि मुलांसाठी खूप केले पण परदेशात राहिल्याने आई वडीलांसाठी खूप काही करता आले नाही, येत नाही हे शल्य पण मनात असतेच.

वयाच्या ह्या टप्प्यात असे वाटत आहे की परदेशातल्या भारतीय लोकांचे ह्या बाबतीतले प्रश्न आणि त्याची उत्तरे अधिकच गहिरी आहेत

आज मदर्स डे च्या अनुषंगाने हि पोस्ट वाचनात आली. आणि इथल्या विषयाला लागू होत असल्याने इथे पोस्ट करावीशी वाटली.

--------------------------------------------------------------------

"आईला वृद्धाश्रमात ठेवले त्याने आणि मातृदिनाच्या शुभेच्छा देत फिरतोय" प्रकारच्या स्टुपिड फॉर्वर्डस वाचनात आल्या.

१. जणू वृद्धाश्रम म्हणजे कचराकुंडी आहे. आई हे एक उचलून नेऊन ठेवायचे प्रॉडक्ट आहे.

२. "त्याने" आईला वृद्धाश्रमात ठेवले. हा "तो" फॉर्वर्डच्या एकूणच बुद्धिमत्तेवरून लग्न झालेला असणार. म्हणजे, "बायको आली घरी आणि आई गेली वृद्धाश्रमी" असले काही नकळत सुचवायचे असावे. बरे, आई ह्याची. हा आईचे म्हातारपण काढायला काय करतोय? प्रत्यक्ष किती काम रोज घरात करतो? की हलवायाच्या घरावर तुळशीपत्र सारखे दुसऱ्या घरातून आलेल्या मुलीला ह्याच्या पालकांची काळजी घ्यायची आहे? किती काळ? कोणती नेमकी? तिला काय मदत उपलब्ध होणार आहे? आर्थिक, शारीरिक? हा तिच्या आई वडिलांची किती काळजी करतो? ते समजत नाही. तिचेही आईवडील म्हातारे असू शकतात. त्यांनाही देखभाल गरजेची असू शकते. हां, त्याने लग्न करतांनाच "भाऊ असलेली मुलगी" बघितली असणार. बरोबर...तिचे आई वडील पॅकेज कटले की. केवढी हुशारी नाही?!!!!

हा तो कुणी नोकरदार अविवाहित असेल. कसे सांभाळणार आईला? त्याची काही अपरिहार्यता असेल.

३. आई स्वतः कमावती असू शकते की नाही? तिने स्वतःच वयाच्या पन्नाशीत वृद्धाश्रमात जायचे प्लॅन केलेले असू शकतात की नाही? भरल्या घरात राहून देखील कुणाला म्हातारपणी वृद्धाश्रमात जावेसे वाटू शकते की. जितके चांगले, अफोर्डेबल, घराजवळ आणि विविध सुविधांनी युक्त वृद्धाश्रम चटकन उपलब्ध होतील, तितके ते बरेच राहील. 'वृद्धाश्रमात गेला बिचारा/बिचारी" असली फिलिंग कशाला?

४. घरोघरी एकेकटे वृद्ध आहेत. दुकटे आहेत. अविवाहित आहेत. जोडीदार दुरावलेले आहेत. सगळ्या नात्यांच्या कॉम्बिनेशन्स आहेत. अनेक जण आर्थिक सक्षम आहेत, शहरांत तरी. आर्थिक आधार नसलेले देखील अनेक वृद्ध आहेत. त्यात काही आजारपणे चिटकलेली असतात. काही सवयी असतात. हेकटपणा असतो. घरात सत्ता गाजवायची असते. कधी केविलवाणी परिस्थिती देखील असते. कोणीही ऐकत-विचारत नाही. एक आजारी व्यक्ती घरात असणे म्हणजे किती आणि काय स्वरूपाचे काम असते घरातल्या लोकांना, किती खर्च असतो, ते समजून घ्या. त्यांना देता येणारा वेळ समजून घ्या. उत्तम तब्येत असलेले वृद्ध आहेत. वृद्ध झाले तरी तरुण बेरोजगार मुलांना पोसणारे देखील वृद्ध आहेत. काहीही असू शकते परिस्थिती. आपल्याला माहित असते का?
अशावेळी वृद्धाश्रम म्हणजे जणू कचराकुंडी असले मेसेजेस आपण फॉरवर्ड करणे टाळावे.

उलट, आपापले म्हातारपण कोणालाही फारसा त्रास होणार नाही, अशाप्रकारे कसे आंनदाने सामोरे जाता येईल, याचा चाळीशी-पन्नाशीत निदान विचार करावा. कुणाला व्यसने असतील आणि त्यातून काही व्याधी होणार असतील, झालेल्या असतील तर त्याला लागणारा खर्च किती असेल, कसे झेपेल आपल्या केअर टेकर्स ना, मुळात दुसऱ्याने आपले करावेच असा अट्टहास ठेवून काही असायला नको, आर्थिक गणित कसे असेल, आपण कुणाशी कसे वागतो, तर कुणी आपल्या म्हातारपणी आपले करावे? का करावे? असा सगळा विचार करायला हवाय. व्यसने असो की नसो. आजारपणे असो की नसो. आर्थिक स्थैर्य आता असो की नसो. त्यानुसार काही बदल करावे आणि शहाणे व्हावे आरोग्य राखायला सुरुवात करावी. जरा दूर दृष्टी बाळगावी.
इतके करून देखील "आजचे जगा, उद्याचे कुणी पाहिले" फणा काढून जगता येतेच की.
थोडेसे भान हवे भविष्याचे, इतकेच.
प्राची पाठक
घाईत लिहिले आहे. समजून घ्या. शब्दखेळ करू नका.
#Prachi_Chirpy
===
Share if you feel like...

Pages