वृद्धाश्रम, वृद्धाश्रमात पाठवलेले गेलेले वॄद्ध, अतिवृद्ध, त्यामागची कारणे इत्यादी

Submitted by वेल on 15 January, 2016 - 08:34

अनेक जण आपल्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवतात. किंवा कधी कधी वृद्ध स्वतःच तिथे जाऊन राहतात.
मुलांची, वृद्ध पालकांची विचारसरणी, दोघांचे प्रॉब्लेम्स, बिहेवोरियल प्रॉब्लेम्स.
कुठे कुठे वृद्धाश्रम आहेत, ते कसे आहेत. त्यांचे चार्जेस काय आहेत.
वृद्धाश्रमात वृद्धांना कशी वागणूक मिळते. वृद्धांना घरी कशी वागणूक मिळते, ती का मिळते. वृद्ध जसे वागतात तए का वागतात.

अशा अनेक प्रश्नांवर इथे चर्चा करुया.

आज आपण सुपात असलो तरी कधी न कधी जात्यात जाणार आहोतच, म्हणजे वृद्ध होणारच आहोत. सो त्याआधी जरा मानसिक तयारी करु

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेल, चांगला धागा.
गंमत म्हणजे आत्तापर्यंत आपल्या नातेवाईकांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवलंय असं मी एकच कुटूम्ब पाहिलंय फक्त.
त्यांचं कारण म्हणजे घरतल्या सगळ्या सूनाच साठीच्या होत्या आणि काहीना काही स्वतःचे आजार असलेल्या.
या आज्जीबाई अत्यंत खाष्ट होत्या. तिन्ही सूनांशी आणि मुलांशीही पटत नसे पहिल्यापासून.
त्या एका चांगल्या आश्रमात रहात होत्या लोणावळ्याजवळ, डिटेल्स आठवत नाहीत.
मात्र अगदी बारिकश्या आजारांतदेखिल मुले त्यांना हिंदुजात अ‍ॅडमिट करून स्वतः थांबून ट्रीटमेंट करून देत.
घरीच का घेऊन येत नाही या प्रश्नाला - सहा महिन्यातून एकदा तीन चार दिवस सेवा केलेली परवडली पण कायमचं घरात ठेवून कटकट सहन करणं नको. असं होतं.

वेल,

तुमच्या धाग्यामध्ये उल्लेखलेले मुद्दे बघितले तर अतिशय व्यापक विषय होईल हा. अशी विनंती आहे की तुम्ही क्रमवार एकेक मुद्दा हेडरमध्ये घ्यावात. म्हणजे एक क्रमांकावर वृद्धाश्रमात ठेवली जाण्याची कारणे, दोन क्रमांकावर वृद्ध स्वतःहून का जात असावेत, वगैरे असे.

तसे केले की एकेकाला एकेक मुद्याबाबत लिहिणे सोपे होईल बहुतेक. (ही केवळ एक सुचवणी)

बाकी माझ्यापुरतं म्हणाल तर मी वृद्धाश्रमात रहाणार नाही.
अगदी जख्खड म्हातारी झाले तरी.
Happy

त्यापेक्षा म्हातारपणी वावरायला सोपी अशी घरातच सोय करून ठेवेन.
मला ग्रूपमध्ये रहायला आवडत नाही. आणि तिसर्‍याच कुणाशी अ‍ॅडजस्ट्मेंट करून रहायला तर अज्जिबात नाही.

स्वतःच्या आईवडिलांना किंवा सासू सासर्‍यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा प्रश्नच नाही. कारण त्यांच्या दृष्टीने तसं करणं हे मुलांच्या नालायकपणाचं आणि त्यांच्यावरचं प्रेम कमी झाल्याचं लक्षण आहे.
त्यांनाही इंडिपेंडंट किंवा वसतीगृहात रहाण्यापेक्षा स्वतःच्या मालकीच्या घरात रहायला आवडतं.

जर त्यांच्यातल्या कुणाला अशी वृद्धाश्रमांत रहायची इच्छा झाली तर मात्र जास्तीत जास्त सुविधा असणारी जागा बघेन.
पण तो त्यांचा निर्णय असावा.

साती
i can understand.

माझी आजी, आईची आई १९९७ किंवा ९८ पासून २००७ पर्यंत आणि मग २००८ पासून पुन्हा ८ महिने वृद्धाश्रमात होती. मग आमच्या घरी होती. पण त्यामागेही बरीच कारणे होती.

सुखासुखी कोणी आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवत नाही ह्यावर माझा विश्वास आहे.

खरं आहे.
शहरासारख्या ठिकाणी नवरा बायको दोघंच घरात असणं, दोघांचेही फुल्ल टाईम जॉब्ज असणं यात उलट वृद्धांची हेळसांड होऊ शकते.
त्यातही बर्‍याचदा ऐन उमेदीच्यावेळी सूनेवर घरच्यांकडे बघण्यासाठी जॉब प्रोफाईल लो ठेवायचं बर्डन येतं.
मग तो राग धूसफुशीतून निघतो.
त्यापेक्षा काही प्रॅक्टीकल डिसीजन घेतलेला चांगला.

पैसे देऊनही २४ तास योग्य केअर टेकर मिळतीलच असे नाही.

हे वृद्धांच्याच का , लहानांच्या बाबतीतही.
सध्या मी दिवसातून ३-४ दा घरी येते म्हणून २४ तासांची एक बाई मला मुलांसाठी ठेवायला मानसिक दृष्ट्या परवडते.
नाहीतर कायम टेंशन असलं असतं, बाई आणि मुलं घरात काय करत असतील याचं.
पण समजा असा जॉब नसता तर १०-१२ तास मुले पूर्ण एखाद्या बाईच्या भरवशावर टाकण्यापेक्षा मी त्यांना पाळणाघरात टाकून स्वतःचे वर्किंग अवर्स रेस्ट्रिक्ट केले असते.

थोडा विचित्र वाटेल पण माझा असा व्हुव्ह आहे कि माणसाने धडधाकट आहोत तोपर्यंत घरी राहावे एकदा लक्षात आले कि आता शरीर साथ देत नाहीये तर सरळ औषधे बंद करून लवकर सगळ्यांनाच सोडवावे. माझ्या घरात मी खूप विचित्र आजार आणि शेवटपर्यंत प्रयत्न करून जगवणे प्रकार केले आहेत आणि पहिले आहेत. त्यातून त्या माणसाला त्रास होतोच पण बाकीचे पण नाहक अडकले जातात असे स्वच्छ मत झाले आहे. जगण्याची आस सगळ्यांच असते आणि त्यात चूक नाहीये पण कधी कधी वाटते पूर्वीचे बरे होते माणसे लवकर जात होती. फार थोडे लोक ६० नंतर जगात असत. घरेही मोठी असल्याने सांभाळणे शक्य होते आता आधीच घरात फारतर २ तरणी माणसे आणि १-२ लहान मूल किंवा २-४ म्हातारी माणसे असा प्रकार होऊ लागला आहे. कोणालाही हे अतिशय क्तृघ्न आणि प्रेम नाही वगैरे असे वाटेल पण मी ह्याच निष्कर्षाला आलो आहे. जी माणसे शेवटच्या स्टेजला असतात आणि अंथरुणाला खिळून असतात त्यांचे कितीही आवडीने केले तरी त्यांना जो त्रास होतो तो होतोच. उगाचच जागवून काय करायचे हा प्रश्न मला स्वतःला पडला होता. उगाचच ऑपरेशन्स वर ऑपरेशन्स नाहीतर मग बेड्सोर्स नाहीतर सतत क्याथेटर लावल्याने होणारे युरीनल इन्फेक्शन हे पाहून त्या माणसाची अवस्था बघवत नाही. औषधाने जीव जातहि नाही आणि उगाचच अजून हलत खराब होत जाते. फक्त डॉक्टर किंवा हॉस्पिटलचे बिल तेवढे वाढते आणि आपल्याला दुहेरी त्रास ना धड त्या माणसाचे हाल आपण कमी करू शकत आणि ना धड आपण स्वतः जगू शकत. एखाद वर्ष नक्कीच ट्राय मारवा कधी कधी चांगला परिणाम होवून पुढे काही रिकव्हर होतानाही पहिले पण एक वेळ अशी येते कि त्या माणसालाहि कळते कि आता इथून हे काही खरे नाही तेंव्हा बस करावे.

नो लाईफ सपोर्ट, नो हेरॉईक मेझर्स - असे एक विल परदेशात केले जाते. आपल्याकडे असे काही असते का?

हल्ली डॉक्टर्स मात्र नातेवाईकांना सांगताना आढळतात की आता उपचार थांबवा व रुग्णाला शांतपणे जाऊदेत.

(हा वेगळाच विषय आहे गुमास्ते, धाग्याचा विषय वेगळाच आहे. असो.)

जवळचे कधी कोणी वृधाश्रमात राहिलेल पाहिले नाही.
वडिल ८२ वर्ष आई ७५.सासरे ९० वर्ष साबा ८२
मुल-सुना नातु सगळे सोबत राहतात.सगळे मिळुन आजी आजोबांना सांभाळतात आम्हीच नोकरी निमित्ताने वैगेरे लांब लांब राहिलो
हेवा वाटतो कधी-कधी त्यांचा आई सुनांची गार्‍हाणी सांगत असते पण त्यात आईचाच सासुपणा जास्त वाटतो.

आमची वृधाअवस्था यांच्या सारखी नसणार आहे एवढे नक्की.
मुले नातेवाईक यांना त्रास देण्यापेक्षा

चिंग माय च्या वृद्धाश्रमा सारख्या ठिकाणी रहायला आवडेल.

वृद्धाश्रम कसे असणार आहे यावर बर्‍याच गोष्टी अवलंबुन असतील.

आमच्या जवळच्या नात्यात एक वृद्धा स्वखुशीने वृद्धाश्रमात राहत आहेत. त्यांना पन्नाशीच्या आतबाहेरच्या दोन मुली आहेत. एकीचा स्वतंत्र संसार आहे, ती आईला स्वतःच्या घरी नेऊन सांभाळू शकते. दुसरीचे सासरे वारले आणि ह्या बाईंचे यजमानही वारले तेव्हा तिच्या सासूबाईंनी सुचवले की तुम्ही आता मुलीकडेच या. आपण एक खोली शेअर करुन गुण्यागोविंदाने राहू. तिचे घर भरपूर मोठे आहे. दोघींचे पटतही असे पण ह्यांनी नकार दिला. मुलींशीही कायम उत्तम रॅपो आहे. नवरा असेपर्यंत दोघंजण मुलीच्या जवळच घर घेऊन राहत होते.
आत्ता माझ्या भावाच्या लग्नात मुलींबरोबर आल्या होत्या. अतिशय आनंदी दिसत होत्या.

मात्र इतके सगळे असून मुलींना आडून आडून टोमणे ऐकावे लागतात की वृद्ध आईला वार्‍यावर सोडले.

माझ्या माहितीत स्वखुशीने, कुटुंबीयांशी चांगले संबंध असूनही वृद्धाश्रमात राहणारी ही एकच व्यक्ती.

माझ्या वहीनीचे मामा, बडोद्याला एका वृद्धाश्रमात स्वखुषीने रहात होते. आर्थिक भार वहिनीने उचलला होता पण तो नाममात्रच होता.

त्यांची वेगळीच कथा. त्यांनी उतारवयात लग्न केले. मूलबाळ नव्हतेच. पुढे दोघांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला, पण मामी गेल्या आणि मामा वाचले. तेव्हापासून ते वृद्धाश्रमात होते. आजारी होते पण हिंडतेफिरते होते. आमच्या घरी अधून मधून येत. वहिनीही जात असे. त्यांच्या आजारपणामूळे ते फार जगणार नाहीत हे त्यांनाही माहित होते.
पण शेवटपर्यंत अलर्ट होते. बेडरिडन नव्हते.

तिथे थोडेफार नियम होते ( म्हणजे रात्री ठराविक वेळी लाईट बंद करायची, लिफ्टचा वापर मर्यादीत वगैरे ) पण ते जाचक नव्हते. तिथे अनेक जण धर्मादाय म्हणून अन्नदान करत असत, त्याचा त्यांना मानसिक त्रास होत असे, म्हणून ते खात नसत. वहीनी वरकड खाऊ, दर महिन्याला नेऊन देत असे.

त्यांना शेवटी वेगळ्याच कारणांनी त्रास होत होता. त्या वृद्धाश्रमातली सभासदांची संख्या कमी कमी होत गेली, याचाच त्यांना ताण येत असे.

धागा जरी तिशी चाळीशीतल्यांनी आपल्या घरातल्या 'म्हातार्‍यां'बद्दल काढलेला असला, तरी मी सुपातून जात्यात जायच्या वयाचा असल्याने हा माझा थोडा अवांतर नव्हेत, पण समांतर म्हणावासा प्रतिसाद.

आपल्या तारुण्यात व 'उमेदीच्या' उर्फ कमावत्या काळात घरावर 'राज्य' केल्यानंतर रिटायरमेंट वयात मुलांच्या घरात रहायला मला तरी नको वाटेल.

मुलांवर 'आजी आजोबांचे संस्कार' हवेत या गोंडस नावाखाली जेवून खावून राहून घर सांभाळणारा एक हक्काचा केअरटेकर मिळेल, अशी(ही एक) कन्सेप्ट बहुतेक ठिकाणी असते. ही कन्सेप्ट/भूमीका ऑल्मोस्ट ऑल्वेज आजीच निभावून नेऊ शकते. आज आजोबा असलेले बहुतेक पुरुष त्यांच्या 'आदर्श भारतीय पती' संस्कारांमुळे घरकामे वा बेबीसीटिंग करण्यास नालायक आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे. (जिथेही असे आजी आजोबा आहेत, तिथे ती आजी; नातवंडे, नवरा अन लेक/सून किंवा लेक/जावाई काँबोसाठी -इन दॅट ऑर्डर- राब राब राबत असते, हे माझे ऑब्जर्वेशन आहे.)

वयाच्या साठीपर्यंत तरी ठीकेय, सत्तरीतले आजी/आजोबा स्वतःचे आजार, अन जीव सांभाळतील की तूफानी एनर्जीवाल्या नातवंडापाठी धावतील, हाही प्रश्न आहेच. शिक्षणं, करियरमुळे उशीरा लग्ने करून त्याहूनही उशीरा आईबाबा होणारी आजकालची मुले, अन त्यांच्या जगावेगळ्या बिझी लाईफस्टाईल्स याच्या बॅकग्राउंडला ६०-६५+ वयातलेच आजीआजोबा आहेत.

पूर्वी एकत्र कुटुंबे असताना पंचविशी-तिशीतल्या, २-५ वर्षे वयाच्या मुलांचे आईबाप असलेल्या जोडप्यांच्या पाठी पन्नाशीतले आईवडील अन सत्तरीतले आजीआजोबा घरात असत. त्यावेळी म्हातार्‍यांचे घरात असणेही खपून जात असे, कारण त्यांना मधे एक फिफ्टी-इश वयाच्या पिढीचे बफर होते. हे आजही गावातून अनेक ठिकाणी असते. शहरांत फार कमी. गेल्या २०-३० वर्षांत न्यूक्लिअर फॅमिलीज तयार होणे सिग्निफिकंटली वाढलेले आहे.

त्यामुळे, खर्‍याखुर्‍या वृद्धांसाठी व त्यांच्या मध्यमवयीन मुलांच्या लहान मुलांचीही योग्य प्रकारे 'सोय' होईल अशी सपोर्ट सिस्टीम सिरियसली तयार होणे गरजेचे झालेले आहे.

(मुलांच्या सोयीची पाळणाघरे हा इथला टॉपिक नाही. पण वृद्धाश्रमात आईबापांना ठेवणे पाप वगैरे कन्सेप्ट असतील, तर पाळणाघरात मुलांना ठेवणेही तितकेच, किंबहुना अधिक भयंकर पाप आहे, असे नमूद करतो.)

*

ही सिस्टीम स्वत:साठी आपणच तयार करावी असाही एक विचार मनात आहे व त्या दृष्टीने पावलेही उचलत आहोत. व्हिलेज फॉर एल्डरली विथ अ हॉलिडे होम फॉर यंग प्लस अ कम्युनिटी किचन/रेस्राँ/मॅरेज लॉन्स इ. एकत्र. गावाबाहेर, तरीही गावा जवळ. सोबतच एक मोठे हॉस्पिटल कम टर्मिनल केअर सेंटरही. गेटेड कम्युनिटी, विथ प्रॉपरली पेड स्टाफ. अशी आयडिया फार स्वस्तात बनवता येते. कशी, ते डीट्टेलवार लिहीनच. यासाठी किमान २०-३० चांगले मित्र हवेत. (माझ्यापाठी एक अख्खी असोसिएशन आहे Wink ) सत्तरी गाठेपर्यंत नक्कीच तिकडे शिफ्ट होता येईल Lol

*

वय वर्षे २०-३० = तरुण, ५०-६० = प्रौढ, ७०+ = म्हातारे.

अशी संबोधने आहेत. म्हातारा हा शब्द आवडत नसेल, तर वृद्ध, एल्डरली, क्रोनोलॉजिकली डिफरंटली एनेबल्ड वगैरे शब्दप्रयोग आपापल्या गळवांनुसार वापरून घ्यावेत.

*

अजून बरंच लिहिण्यासारखं आहे. अजून पैलतीरी नेत्र लागले नसले, तरी अधून मधून पैलतीराबद्दल विचार येण्याचं माझं वय नक्कीच आहे. तेव्हा जमेल तशी भर घालीनच.

धागा उत्तम आहे.
मला माझ्या बाबांना(आई नाहीये) किंवा साबासाबुंना वृद्धाश्रमात ठेवायला जमणार नाही. आम्हाला मूलबाळ नसल्याने त्यांना सांभाळण्यासाठी वगैरे मुद्दाच नाही.

>>> बाकी माझ्यापुरतं म्हणाल तर मी वृद्धाश्रमात रहाणार नाही.
अगदी जख्खड म्हातारी झाले तरी.
त्यापेक्षा म्हातारपणी वावरायला सोपी अशी घरातच सोय करून ठेवेन.
मला ग्रूपमध्ये रहायला आवडत नाही. आणि तिसर्‍याच कुणाशी अ‍ॅडजस्ट्मेंट करून रहायला तर अज्जिबात नाही.<<<
याबाबतीत सातीला अनुमोदन.
आत्ताही केवळ समान वय हा क्रायटेरिया धरून ग्रुप असेल तर त्यात फार मन रमेल असे नाही. तर मग वय झाल्यावर नुसता वयोगट समान आहे म्हणून एका ठिकाणी रहायचे हे जमण्यासारखे नाही.

असं काहीतरी स्वतःच उभं करावं जिथे समविचारी, समान आवडिनिवडी असलेली, समान पॅशन असलेली विविध वयाची माणसे कायमची वा तात्पुरती राहायला येतील अशी एक महत्वाकांक्षा आहे. बघूया..

बाकी माझ्यापुरतं म्हणाल तर मी वृद्धाश्रमात रहाणार नाही.अगदी जख्खड म्हातारी झाले तरी. मला ग्रूपमध्ये रहायला आवडत नाही. आणि तिसर्‍याच कुणाशी अ‍ॅडजस्ट्मेंट करून रहायला तर अज्जिबात नाही..>>>>>अगदी अगदी! माझ्या मनातले विचार स्वछच मांडले कीतुम्ही.अर्थात पुढे काय होईल माहीत नाही.

२०११पासून माझी आई एकटीच रहाते.बैठ्या घरात ,म्हातारी बाई एकटीच रहातेम्हणून रात्री अपरात्री काही धोका नको म्हणून २ पेईंग गेस्ट्स ठेवल्या आहेत.हेतू हाच की घरात तिघिंचा वावर आहे.एक तिच्या घरी गेली तरी दुसरी आईसोबत राहील.त्यांची रूम आणि बाथरूम वरच्या मजल्यावर सेपरेट असल्याने उभयपक्षी आपआपली स्पेस सांभाळून मजेत आहेत.
आईने जोडलेली माणसे,सहज चांगलेपणानी वागून जाणारी माणसे, माळ्याच्या मदतीने उभारलेली बाग,पुस्तके यामुळे आई खरंच समाधानी आहे.माझ्याकडे आली तरी परत स्वतःच्या घरी जायचे वेध लागतात.

बहुतेकांचे नियोजन असेच दिसत आहे. एक तर अशी व्यवस्था निर्माण करायची ज्यात आपलीही आपोआप काळजी घेतली जाईल आणि आपणही इतरांसाठी काही करू शकू किंवा मग उत्तम आर्थिक परिस्थिती, विमे, मेडिकल सेवांची खात्री वगैरे!

नातवांसाठी आजी आजोबा असावेत हे माझे म्हणणे केवळ 'संस्कार' ह्या एकाच विषयापुरते आहे. त्यात नवरा बायकोंचा स्वार्थ किंवा आजी आजोबांचा वापर वगैरे मला अभिप्रेत नव्हते. असले काही इन्टरेस्ट्स असले तर आजी आजोबांनी अजिबात स्वतःचा वापर होऊ देऊ नये असेच म्हणतो.

नातवांसाठी आजी आजोबा असावेत हे माझे म्हणणे केवळ 'संस्कार' ह्या एकाच विषयापुरते आहे. त्यात नवरा बायकोंचा स्वार्थ किंवा आजी आजोबांचा वापर वगैरे मला अभिप्रेत नव्हते. असले काही इन्टरेस्ट्स असले तर आजी आजोबांनी अजिबात स्वतःचा वापर होऊ देऊ नये असेच म्हणतो.

<<

तुम्हाला काउंटर करण्यासाठी तो मुद्दा नव्हता बेफी.

जस्ट अ स्टेटमेंट ऑफ फॅक्ट आहे ते.

आयुष्यभर नोकरी-धंद्याचा घाणा फिरवल्यानंतर कुठेतरी रिटायर झाल्याबरोब्बर हाऊसकीपर-बेबीसिटर जॉब, तोही बिन पगारी अन फुल्ल जबाबदारी असा गळ्यात पडतो. आपलं काही करावं, आपल्याच वयाच्या नातेवाईक - मित्र- भावा बहिणींना भेटायला जावं, ४ दिवस रहावं म्हटलं तरी मुला/मुलीची सासू तिथे येउन रहावी लागते. कारण त्या दोघांना सुट्या नसतात अन मुलांची पंचाइत होते. नोकरी असली तर रजा टाकून जाता तरी येतं. इथे सगळा इमोशनल कोंडमारा...

असो.

उत्तम आर्थिक परिस्थिती, विमे, मेडिकल सेवांची खात्री वगैरे
<<
कितीही उत्तम आर्थिक परिस्थीती असली तरी अडल्या घडीला उचलून दवाखान्यात घेऊन जाईल असा विश्वासू माणूस सोबत असणे गरजेचे असते.

त्यामुळेच ती 'व्यवस्था' निर्माण करणे, ज्यात जेरिअ‍ॅट्रिक केअर हाच जॉब प्रोफाईल असलेल्या एबल बॉडीड व्यक्ती पुरेश्या रिम्युनरेशनवर सामावलेल्या असतील, व केअर गिव्हर्स व बेनिफिशरीज यांचा इंटरडिपेंडन्स डेवलप होईल. अथश्रीचे मॉडेल चांगले आहेच, पण फक्त होस्टेल टाईप न करता, ३-४ स्टेप्सची कम्युनिटी डेवलप करायची अशी कन्सेप्ट आहे.

माझे आई- बाबा(आई नाहीये) किंवा सासु-सासरे वृद्धाश्रमात गेले नाहित. सासु-सासरे गावात एकत्र कुटूंम्ब पद्ध्तीत राहात असल्याने वृद्धाश्रमात जायचा प्रश्नच नाही.

आई साठी नंतर बदलापुरच्या वृद्धाश्रमात कधीतरी जात होती. (नाव माहित नाही). तेथिल वृद्ध लोकाची तक्रार असायची की त्याचाशी बोलायला कोणी नाही. त्यामुळे ती जेव्हा जेव्हा वेळ मिळेले तेव्हा तिथे जाउन त्याच्याशी गप्पा मारत असे.

७०+ = म्हातारे हे माझ्या ७५ वर्षाच्या वडलाबाबत तरी नाही. कदाचित ७५ = तरुण म्हणायला हरकत नाही. ते एकटे राहतात आणि, सगळी स्वताची कामे स्वता करतात. आजुनही व्यवसाय करतात. व्यवसायानिमित्त मुम्बई - नवी मुम्बई मध्ये बस , ट्रेन ने रोज फिरत असतात. ( रिक्शा - टॅक्सी , मेट्रो ह्या लोकाना लुबाडण्यासाठी असतात अशी समजुन असल्याने परिस्थिती असुनही त्यानी प्रवास करत नाहीत) जेवणासाठी सकाळचा आणि संध्याकाळी दोन वेगळ्या घरातुन डबे मागवतात.
जो पर्यन्त शक्य आहे तो पर्यन्त हे रुटिन चालु ठेवायचा त्याचा विचार आहे. जेव्हा शक्य होणार नाही तेव्हा व्यवसाय बंद करतिल. त्याना तरी वृद्धाश्रमात राहायची ईछ्छा नाही. आम्ही भारतात गेल्यास आमच्या बरोबर राहातिल.

आमच्या बाबतीत म्हटले तर बायको तर वृद्धाश्रमात राहायचे नाही असे म्हणते आहे पण ते कदाचित उतारवयात शक्य होणार नाही. मुल मोठेपणी भारतात राहाणार नाहीत आणि आम्हाला तर उतारवयात भारतात जाउन राहायचे आहे. त्यामुळे वृद्धाश्रमात राहायची तयारी करावी लागेल. पण जो पर्यन्त शक्य आहे तो पर्यन्त सिनियर सोसायटी मध्ये किंवा त्यासरख्या सुविधा असलेल्या ठिकाणी राहायला आवडेल.

दिमा तुमचे प्रतिसाद आवडले

साहिल शहा,

>>>तेथिल वृद्ध लोकाची तक्रार असायची की त्याचाशी बोलायला कोणी नाही. त्यामुळे ती जेव्हा जेव्हा वेळ मिळेले तेव्हा तिथे जाउन त्याच्याशी गप्पा मारत असे<<<

पुण्यातील बहुतेक वृद्धाश्रमांमध्ये दिसलेली गोष्ट म्हणजे खरोखर गप्पा मारायला कोणीच नसणे. त्यांना खूप काही सांगायचे असते. मे बी, आम्ही वृद्धाश्रमात राहण्यापेक्षा अधिक काहीतरी कसे आहोत हे सांगायचे असेल, पण ऐकणारे कान मिळत नाहीत ही व्यथा सर्वत्र आढळते.

(ते लोक एकमेकांनाही वैतागलेले असू शकतात)

कितीही उत्तम आर्थिक परिस्थीती असली तरी अडल्या घडीला उचलून दवाखान्यात घेऊन जाईल असा विश्वासू माणूस सोबत असणे गरजेचे असत>>>>>>>> एकदम खरे.

छान धागा, छान चर्चा.

आमचे सांगायचे तर मी ज्या घरात राहतो ते सध्या आई वडीलांच्या नावावर आहे. पुढे मागे मी माझे घर घेऊन वेगळे होऊ शकतो. नाही वेगळे झालो तर त्यांच्या सोबत त्यांच्या मालकीच्या घरात राहणार. त्यामुळे कोण कोणाला वृद्धाश्रमात पाठवेल हा एक प्रश्नच आहे Happy

पण माझ्यामते त्यांचे विचार काही वृद्धाश्रमाच्या फेवरमध्ये नाहीयेत. तर त्यांच्या हिशोबाने / आवडीने त्यांच्याबरोबर राहावे किंवा वेगळे व्हावे. आणि हे वेगळे होणे ते धडधाकट आहेत तेव्हाच करावे, जेणेकरून ते आपले स्वातंत्र्य जगू शकतील. त्यानंतर जेव्हा त्यांचे हातपाय चालायचे बंद होतील तेव्हाच त्यांना त्यांच्या सोयीनुसार आधार द्यायला जावे.

..

पुण्यातील बहुतेक वृद्धाश्रमांमध्ये दिसलेली गोष्ट म्हणजे खरोखर गप्पा मारायला कोणीच नसणे.
>>>>>
यावरून आठवले, मी कधी माझ्या वृद्धापकाळाबद्दल विचार करतो तेव्हा मला गप्पा मारायला जवळ कोणी असेला वा नसेल याचे टेंशन वाटत नाही. एखादा लॅपटॉप, मोबाईल आणि मायबोली सारखे संकेतस्थळ वा मायबोलीच म्हणा हवे तर, सोबत असणे पुरेसे ठरावे Happy
तर प्रत्येकाने आपला छंद ओळखून त्यानुसार तरतूद करणे गरजेचे आहे.
तसेच याबाबत नीधप यांच्या पोस्टमधील समान पॅशन असलेली माणसे एकत्र आल्यास उत्तम याला अनुमोदन.
दिमा यांच्याही पोस्ट संकल्पना आवडल्या

मी कधी माझ्या वृद्धापकाळाबद्दल विचार करतो तेव्हा मला गप्पा मारायला जवळ कोणी असेला वा नसेल याचे टेंशन वाटत नाही.>>>>>> माफ कर ऋन्मेऽऽष , पण हा तरूणपणाचा जोष बोलतो. म्हातारपणी माणसांची जाग हवीशी वाटते. आपल्या आसपास दुसरं कोणी आहे याचा दिलासा वाटतो.

नवरा, मुलगा आणि मी सध्या नवर्‍याच्या आईच्या आणि बहिणीच्या घरात त्या दोघींसोबत आणि नवर्‍याच्या आईसोबत राहातो. दोन वर्ष माझी आजीसुद्धा आमच्या सोबत राहात होती. बरे ह्यातली माझी आजी फक्त शेवटच्या क्षणापर्यंत चालती फिरती होती. घरातले बाकी तीन मेम्बर शारिरिक किंवा मानसिक रित्या अपंग आहेत. ह्यातच माझ्या आईच्या एकट्या आणि मानसिकरित्या थोडा प्रॉब्लेम असणार्‍या आत्येबहिणीला वय ७० आमच्याकडे आणून ठेवण्याची तयारी होती माझ्या नवर्‍याची. पण ते नाही होऊ शकले. (हुश्श)

हे सगळे माझा मुलगा अगदी जन्मापासून पाह्तोय. त्यामुळे एकतर तो असाच होईल किंवा ह्याच्या अगदी विरुद्ध.. सध्या तरी तो माणूसघाणा नाही. किंवा रिस्पॉन्सिबिलिटिज पासून पळणारा वाटत नाही.

आपला स्वभाव आणि आपले आरोग्य आपल्या प्रौढावस्थेत आणि म्हातारपणी कसे असेल ह्याची काहीच खात्री देता येत नाही. त्यामुळे माझी स्वतःची तरी नक्कीच इच्छा आहे की आम्ही आज ज्या आणि जितक्या जबाबदार्‍या पार पाडत आहोत तेवढ्या माझ्या मुलाच्या अंगावर पडू नयेत. मी स्वतः वॄद्धाश्रमात किंवा तत्सम ठिकाणी जाऊन राहायला तयार आहे. नवर्‍याचं माहित नाही. कधी बोललोच नाही ह्या विषयावर.

वृद्धाश्रम किंवा कोणत्याही चांगल्या सर्व्हिसेससाठी पैसे लागणार त्यासाठीचे रिटायरमेण्ट प्लानिंग सुरु केले आहे. दिमा म्हणतात तशी काही सिस्टीम असेल तर खुप बरे होईल.

(पण जर बेड रिडन व्हायची वेळ आलीच तर इच्छामरण मिळावे अशी व्यवस्था भारतात यावी हीच सध्याची इच्छा.)

बाकी बरेच लिहायचे आहे. पण सध्या इतकेच.

Pages