वृद्धाश्रम, वृद्धाश्रमात पाठवलेले गेलेले वॄद्ध, अतिवृद्ध, त्यामागची कारणे इत्यादी

Submitted by वेल on 15 January, 2016 - 08:34

अनेक जण आपल्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवतात. किंवा कधी कधी वृद्ध स्वतःच तिथे जाऊन राहतात.
मुलांची, वृद्ध पालकांची विचारसरणी, दोघांचे प्रॉब्लेम्स, बिहेवोरियल प्रॉब्लेम्स.
कुठे कुठे वृद्धाश्रम आहेत, ते कसे आहेत. त्यांचे चार्जेस काय आहेत.
वृद्धाश्रमात वृद्धांना कशी वागणूक मिळते. वृद्धांना घरी कशी वागणूक मिळते, ती का मिळते. वृद्ध जसे वागतात तए का वागतात.

अशा अनेक प्रश्नांवर इथे चर्चा करुया.

आज आपण सुपात असलो तरी कधी न कधी जात्यात जाणार आहोतच, म्हणजे वृद्ध होणारच आहोत. सो त्याआधी जरा मानसिक तयारी करु

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैत्रेयी, पोस्ट आवडली.

माझ्याबाबतीत वृद्धाश्रम हा शब्द पहिल्यांदा ऐकला तेव्हा ५-६वर्षांची होते. बाबांच्या चुलत घरातील काकी वृद्धाश्रमात रहायला गेल्या तेव्हा. राहता फ्लॅट असताना केवळ वेगळे रहायचेय म्हणून मुलासुनेने वेगळा फ्लॅट घेतला. एकटे कुठे रहाणार म्हणून आईने मुलाला सांगितले की मला वृद्धाश्रमात ठेव. त्या काकी बराच काळ तिथे होत्या. तो काळ काहीसा विचित्र होता. बहुतेक कुटुंबात आजी आजोबा असत. मात्र तरीही समृद्धी असेल तर वेगळा फ्लॅट्/बंगला बांधून तिथे रहायला जाणे, आई-वडील आणि भावंडे जुन्या घरात हे देखील होत असे. जागेची खूप अडचण असेल तर दुषणे देणे व्हायचे नाही पण तसे नसेल तर सुनेला दुषणे देणे व्हायचे. आमच्या घरात वृद्धाश्रमामुळे संबंधही दुरावले.

त्यानंतर पुन्हा वृद्धाश्रमाचा विषय निघाला तो माझ्या आईबाबांसाठी आणि माझ्या काकीच्या बाबतीत. काकाकाकी दोघेच. मात्र माझ्या आतेभावाच्या शेजारीच रहायचे. इतर आतेचुलत भावंडे देखील गावात. सगळे मिळून हवे नको बघायचे. मात्र काकीची तब्येत ढासळायला लागल्यावर ती भ्रमिष्टासारखे वागे. माझे कझिन्स ६५+ आणि काका ८५+ . सतत लक्ष ठेवणे कठीण झाल्यावर वृद्धाश्रम्/नर्सिंग होम पर्याय निवडावाच लागला.

माझ्या आईबाबांचे हयात असलेले मी एकटेच अपत्य. त्यात वास्तव्य परदेशात. तसे तर ठरवून दोनच मुली म्हटल्यावर म्हातारपणी काळजी कोण घेणार हा प्रश्न त्यांनी नेहमीच ऐकलेला. अ‍ॅरेंज मॅरेज पद्धतीत देखील मुलीला भाऊ नाही तेव्हा आईबाबांची जबाबदारी.....या प्रश्नापाशी गाडी अडणे हे ९९% स्थळांबाबत मी देखील अनुभवलेले. दोन्ही आईबाबांची जबाबदारी आपली दोघांची या विचारांचा मनासारखा जोडीदार असल्याने दुर राहून वेळोवेळी जबाबदार्‍या निभावणे केले/करत आहोत. आईबाबांचे वाढते वय लक्षात घेवून १५ वर्षांपूर्वी आम्ही त्यांना पुण्याहून ठाण्याला हलवले. पुण्याची जागा वन रुम किचन , लिफ्ट नसलेली बिल्डिंग आणि इतर बाबतीत गैरसोयीची होती. नवर्‍याने माझ्या नावावर लिफ्ट असलेल्या बिल्डिंगमधे पहिल्या मजल्यावर वनबीएचके घेतला. हा फ्लॅट घेताना गाव/परीसराचा चॉइस आईबाबांना दिला होता. त्यांनी त्यांच्या नात्यातली प्रेमाची मंडळी जवळपास आहेत या दृष्टीने निवड केली. नव्या ठिकाणी त्यांनी छान जमवून घेतले आणि मोकळा, मदत करण्याचा स्वभाव असल्याने माणसेही जोडली. मुलीच्या अकाली निधनाचे दु:ख पचवले. रडत न रहाता सोसायटीतल्या मुलांसाठी आजीआजोबा झाले. सोसायटीतल्या अनेक कुटुंबांशी जिव्हाळ्याचे संबंध जोडले. कामाला येणार्‍या बाईंच्या मदतीने त्यांचे ठीक चालले होते. पण तब्येतीचे एक-दोन वेक अप कॉल झाल्यावर त्यांच्यासाठी पर्याय शोधणे सिरीयसली सुरु केले. आईबाबांची मनाची तयारी असल्याने वृद्धाश्रमांचा शोध सुरु केला. तसे एकदा ते आणि शेजारचे काकाकाकू एका ठिकाणी आठवडाभर ट्रायल म्हणून राहूनही आले होते. मायबोलीकरांनी आणि दुसर्‍या मराठी संकेतस्थळावरील मैत्रीणींनी याबाबत खुप मदत केली. त्यांची मी ऋणी आहे. भारत भेटीत प्रत्यक्ष पहाणी केली. मात्र आमचा विचार कळल्यावर आईबाबांच्या शेजार्‍यांनी या गोष्टीला विरोध केला. एकंदरीत उपलब्ध पर्याय बघून माझ्या सासरची मंडळी आणि इतर नातेवाईकांचाही विरोध झाला. त्यामुळे त्यांना त्यांच्या परीचयाच्या जागेतच राहू द्यावे असे ठरले. आता स्वयंपाकाच्या विश्वासू बाई, सोबतीला आणि इतर वरकामाला एक विशीतली मुलगी, धुणेभांडेपोछावाली बाई अशी व्यवस्था केलेय. गरज पडेल तसे यात ब्युरोचे दादा/ताई वगैरे मदत घेतली जाईल. शेजारी सतत चौकशीला येत असतात. सेक्रेटरींनी पोलीसात नाव नोंदवल्याने पोलीसताई देखील चौकशीला नियमित येतात. विल केले आहे. गावातील नातेवाइकांना पॉवर ऑफ अ‍ॅटॉर्नी वगैरे केले. त्यांचे साठीच्या पुढेमागे असलेले भाचे -पुतणे -सुना जमेल तसे भेटायला येत असतात. बाईंच्या मदतीने याही वयात आई त्यांच्या आवडीचा खाऊ आवर्जून करत असते. सुनांसाठी सोडे,घरची भाजणी , मोरावळा वगैरे असतेच. गंमत म्हणजे माझी ८५ + वयाची आत्या देखील ८-१० दिवस चेंज म्हणून रहायला येते. स्वयंपाकाच्या बाईंची मुलगी पण नातीप्रमाणे माया करते. तिच्या कॉलेजच्या शिक्षणाची जबाबदारी आईबाबांनी घेतलेय. स्वतःचे नातवंड जवळ नाही मात्र नात्यातली इतर नातवंडे येतात त्यांचे लाड -कौतुक होते. माझ्या मुलाशी स्काईपवर गप्पा मारणे चालते. फोन -स्काईप वापरुन मी संपर्कात असते. आम्ही अजूनही चांगल्या वृद्धाश्रम/ नर्सिंग होम पर्यायासाठी ओपन आहोत. कारण सध्याचे पर्याय कितीकाळ वर्क आऊट होतील हे माहित नाही.

आईबाबांसाठी वृद्धाश्रमाचा पर्याय शोधताना काही गोष्टी जाणवल्या.
१.बर्‍याच वृद्धाश्रमात शेवटपर्यंत संभाळत नाहीत. बेड रिडन झाले की नर्सिंग होमची सोय किंवा ब्युरोची माणसे येणे ही सोय नाही. स्वतःचे स्वतः करता येत नसेल तर वृद्धाश्रमातून हलवावे लागते.
२. बर्‍याच ठिकाणी हॉस्पिटल्स जवळ नाहीत.
३ निसर्गरम्य / शांत परीसर असेल तर बर्‍याचदा सेलफोनची रेंजचा प्रॉब्लेम येतो.
४. काही ठिकाणी सेलफोन, लॅपटॉप वगैरे ठेवायला परवानगी नव्हती.
३. इंटरनेटची सोय नसणे.
४. कॉमन रुम टिव्ही. एक्स्ट्रा चार्ज भरुन खोलीत टिव्ही याला परवानगी नसणे.
५ काही वृद्धाश्रम फक्त स्त्रीयांसाठीच . कपलसाठी खोली असे नाही.

स्वाती२, या इंटरनेट, टीव्हीच्या अडचणी आपल्या पिढीला फार जाणवणार आहेत.
बेड रिडन झाल्यावर जर आश्रम बघणार नसतील तर काय उपयोग ?

मला एक कल्पना सुचलीय कि निराधार मूले, तरुण तरुणी आणि वृद्ध यांनी एकाच आश्रमात रहायचे. मूलांच्या शिक्षणाचा काही भाग वृद्ध संभाळतील, लागणारे मनुष्यबळ तरुण तरुणी पुरवतील. नुसते वृद्धाश्रम चालवायचे म्हंटले तर सेवा घेणारे नेहमीच जास्त असणार, त्या तुलनेत सेवा देणारे फारच कमी.

हे लिहिणे कदाचित काही लोकांना आवडणार नाही, पण देहदानाचाही विचार व्हायलाच हवा. एकाकी राहणारे वृद्ध असतील तर त्यांच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कारांची व्यवस्था करणे फार जिकीरीचे होते. असे दान केले असेल तर त्या संस्थेची माणसे येऊन मृतदेह घेऊन जातात. ( माझ्याच एका नातेवाईकाच्या बाबतीत अनुभव आला, म्हणून लिहितोय. कुणाला गैर वाटल्यास सांगा )

सेक्रेटरींनी पोलीसात नाव नोंदवल्याने पोलीसताई देखील चौकशीला नियमित येतात. >>>>>स्वाती२, हे नाव नोंदविणे कशासाठी असते जरा सांगाल का?

दधिची देहदान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार आणि माहितीतल्या दोन केसेसवरून, म्रुतदेह संबंधित हॉस्पिटलकडे मयताच्या नातलगांनी पोचवावा लागतो. त्याचा खर्च परत मिळतो. तसंच याला कालमर्यादाही असते.ः मुंब ईत एकट्या राहणार्या ज्ये ना नी पोलिस स्टेशनला नोंद केली तर पोलिस ठराविक काळाने विचारपूस करून जातात. अलीकडे हाउसिंग सोसायटीजकडून यासाठी डेटा गोळा केलेला.

देवकी, महाराष्ट्र पोलीसांचा उपक्रम आहे एकटं रहाणार्‍या जेष्ठ नागरीकांच्या सुरक्षेसाठी. आम्हाला माहिती नव्हती. सोसायटीच्या सेक्रेटरींनीच याबाबत पुढाकर घेतला आणि स्वतः आईबाबांना नेवून नोंदणी केली. परीसरातील पोलीस स्टेशनला आईबाबांचा फोटो, पत्ता, फोन नं., मेडीकल हिस्ट्री/कंडीशन, जवळचे नातेवाईक, काम करणारी माणसे वगैरे सगळी माहिती दिली आहे. त्यांनी आईबाबांना एक कार्ड दिले आहे. अडचणीच्या काळी ते दाखवून ते कुठल्याही पोलीसाकडे मदत मागू शकतात आणि लगेच मदत मिळते हा अनुभव आहे. तसेच त्यांनी संपर्कासाठी फोन नंबरही दिला आहे. त्यावर फोन केल्यावरही मदत मिळते. एका पोलीसताईंकडे त्यांची फाईल आहे त्या नियमित चौकशीला येतात. पोलीसताईचे बॉस बदलले तेव्हा चार्ज घेतल्यावर नव्या बॉसनी देखील घरी जावून परीसरातील नोंदणी केलेल्या जेष्ठ नागरीकांची भेट घेतली.

>>स्वाती२, या इंटरनेट, टीव्हीच्या अडचणी आपल्या पिढीला फार जाणवणार आहेत.>>

दिनेशदा, आपल्या पिढीला जाणवणार आहेतच पण माझ्या आईच्या पिढीलाही आता या गोष्टींशिवाय रहाणे कठीण जाते. शहरातील ट्रॅफिक, फूटपाथची स्थिती बघता बाहेर पडणे फारसे होत नाही त्यामुळे करमणूकीचे साधन म्हणजे टिव्ही असे झाले आहे. आई, मामी वगैरे मंडळींंनी लॅपटॉपशी मैत्री केलेय, स्काइप, युटुब वापरणे शिकून घेतलेय. नातवंडांना स्काइपवर भेटणे, लेकीसुनांशी गप्पा मारणे त्यांच्यासाठी मोठाच आनंदाचा सोर्स झालाय. जोडीला त्यांच्या पिढीतल्या मंडळींशी , भावंडांशी फोनवरही गप्पा चालतात, एकटेपणा वाटत नाही. त्यामुळे सेलफोन, इंटरनेट नाही म्हणजे सगळ्यांशी संपर्कच तुटला असे झाले आहे.

स्वाती२, उपयुक्त माहिती व आईवडिलांचे कौतुक व शुभेच्छा! आपण ह्याकडे एक केस म्हणून पाहू. त्यांना मुलीच्या ऐवजी मुलगा असता तर असाच विचार केला असता का? किंवा मुलाने जर परत येण्याचा केला नाहीतर त्याला दोष देण्यात येतो किंवा त्याला (मुलाला) जबाबदारीच त्याला दडपण असू शकत ना ?

.

स्वाती२, चांगली माहिती दिलीत.
कालच्या माझ्या पोस्टवर सातीने दिलेल्या पर्यायाची तपासणी आज करू. (थेट बँक अकाऊंटमधून पैसे वजा करणे).
वृध्दाश्रमात तीन दिवसांच्या वर आजारपण असल्यास घरी घेऊन जायला सांगतात. हा नियम पहिल्यांदाच स्पष्ट करतात.
आमच्या त्या आजींसाठी एका सेवा केंद्राची माहिती कळली आहे. कदाचित ते आपलं घर च असेल. पण तिथे खूप व्यवस्थित सांभाळ केला जातो आजारी व्यक्तींचा. दर आठवड्याला डॉ येऊन बघून जातात.
आणखी एक प्रश्न असा आहे की समजा आपल्या ओळखीत एखादी व्यक्ती म्हातारी असेल व त्यांची नीट सोय व्हावी असे वाटत असेल परंतु त्यांना काहीही मिळकत नसल्याने दरमहा वृध्दाश्रमाचे पैसे परवडण्यासारखे नसतील तर काय पर्याय आहेत? सध्या त्या व्यक्तीचा सांभाळ करणारी व्यक्तीचीच तब्येत तोळामासा आहे. विमा वगैरे काही नाही. सरकारी दवाखान्यात जे उपचार होतील तसे करून घेतात. निवारा, माऊली या ठिकाणी 'वेटींग लिस्ट' आहे. शिवाय ते म्हणतात, तुम्ही आहात ना! आम्ही खरोखरीच निराधार व्यक्तींना सांभाळतो. पण हे शक्य नाही. घरोघरी अडचणी वेगळ्या असतात. खूप विचार केला की अशा केसेसमधे एकदम डोळ्यापुढे अंधारच दाटून येतो.

बापरे!!! आज काल माबो वर जास्त येणे होत नाही. हा धागा लई जोर्रात धावतो आहे......

व्रुद्धाश्रमात घालणे चुक का बरोबर ह्या पेक्षा सिच्युएशन काय आहे, ह्याला महत्व द्यावे ह्या मताची मी आहे.

१. सिच्यु. १= मुलगा, सून, नातवंड, सासु. असे चौकोनी कुटूंब. सून पर जातीमधली. त्या मुळे साबांनी त्यांच्या भरीच्या काळात तिचे व तिच्या माहेरच्यां चे बरेच अपमान करुन ठेवले होते. आता त्या आजारी असतात. सगळी सेवा सून करते. त्या फक्त टॉयलेट ला जाण्या पूरत्या उठतात. ही परिस्थीती गेले ५ वर्ष आहे. गेल्या पाच वर्षात आजींना एकटे टाकुन मुलगा-सून एकही रात्र बाहेर गेलेले नाहीत. नात कॅनडात मास्टर्स करते आहे. तिची शेवटची सेमिस्टर आहे. आई-बाबांना मुलीच्या कॉन्व्होकेशन साठी कॅनडाला ऑगस्ट मधे जायचे आहे. व कॅनडा फिरुन १ महिना राहुन यायचे आहे.
आजींची मुलगी जी त्याच शहरात रहाते ती आजीं कडे बघायला तयार नाही. तिला शक्य आहे कारण तिला सासू-सासरे नाहीत. घरी फक्त ती आणि नवरा असतो. दोघेही तुलनेने तरुण आहेत. नवरा लेक्चरर आहे ती ग्रुहिणी आहे. पण तिने भावाला निक्षुन सांगितले की हा तुझा प्रोब्लेम आहे, तू पहा !!!! आई ची जबाबदारी १ महिना घ्यायला ती तयार नाही. ह्यांनी आजींना विचारले की घरातच तुझी सोय लावुन देवु का? म्हणजे पूर्ण वेळ बाई व स्वयंपाकाच्या काकु तर आहेतच. आजींनी सरळ नाही सांगितले. मग तूला महिन्या भरा साठी व्रूद्धाश्रमात ठेवु का ह्या प्रश्नावर आजींनी घरात खुप तमाशा केला. मुलीला फोन करुन सूनेची खरडपट्टी काढली. ( आजींचे वय ७५ आहे. मुलीचे ४५ व मुलगा सून ५०, ४८). त्या कोणत्या ही अ‍ॅडजेस्ट्मेंटला तयार नाहीत. घर मुलाचे आहे. आजींची इस्टेट काहीही नाही.

आता सून मुलाने काय करावे? त्यांच्या एकुलत्या एक मुलीची इच्छा आहे की गेल्या ५ वर्षात आई-बाबा कुठेही बाहेर गेलेले नाहीत, तर त्यांनी आपल्या कॉन्व्होकेशन साठी यावे. ह्यांच्या घराण्यात कोणीही परदेशी नाही व येवढे शिकलेली हीच मुलगी आहे.......

आता विचार असा आहे, की सून एकटी जाणार कॅनडला..... मुलगा इथेच रहाणार आई जवळ...... अश्या सासू बद्दल सुनेला का ममता वाटावी?

२. सिच्यु: २ =
आई वडिल ( वय ७५ व ७३) दोन मुलगे सूना.....
पहिला मुलगा व सून आधी लंडनला होते. तिकडेच त्यांना पहिल नातू झाला. सासु सासरे २ महिने लंडनला होते. तेंव्हाच सुनेशी पटेनासे झाले. मुलगा सून नंतर भारतात आले. इकडे ते साबा साबुं पासुन वेगळे रहात होते. काही वर्षांनी ते परत अमेरिकेला गेले.

दुसर्‍या मुलाने ह्यांच्या मनाविरुद्ध साबांच्या बहिणीच्या मुलीशी ( म्हणजे त्याच्या मावस बहिणीशी लग्न केले). जे ह्यांना अजिबातच आवडले नाही. तो लग्न झाल्यास अमेरिकेलाच आहे गेली १७ वर्ष.

आता हे दोघेही व्रुद्ध एकटेच खुप मोठ्या फ्लॅट मधे रहातात. फ्लॅट मोठ्या मुलाचा आहे. त्यांचा स्वतः चा फ्लॅट दोन इमारती सोडुन आहे व तो भाड्याने दिले ला आहे. दादर ला ही घर आहे. आर्थिक सुबत्ता आहे. दोघेही अतिषय आजारी असतात. अत्ता पर्यंत २ वेळा दोघांनाही अ‍ॅडमिट करायची वेळ आली होती. प्रत्येक वेळी भाचे कंपनीच्या जीवावर वेळा निभावुन नेल्या. मोठा मुलगा इकडे येतो अधुन मधुन. धाकटा १७ वर्षात फक्त एकदा आला.

सगळे भाचे कंपनी जी आता स्वतःच्या आई-वडिलां ना ऑलरेडी सांभाळत आहेत( व स्वतः ही ५०+ आहेत). त्यांनी वुद्ध जोडप्याला व्रुद्धाश्रमात रहायचा सल्ला दिला. कारण त्या म्हातार्‍या बाई काठी शिवाय चालु शकत नाहीत. घर सांभाळु शकत नाहीत. घर अतिशय घाणेरडे ठेवलेले आहे. स्वच्छता नीट नाही. त्यांच्या स्वभावा मुळे नोकर टिकत नाहीत. ड्रायव्हर्स सोडुन जातात. दोघेही ऐकायला तयार नाहीत.
भाचे कंपनी तोडुनही टाकु शकत नाही... आणि निभवताना त्रास होतो. भाचे कंपनी दादर- ठाण्याला आणि हे जोडपे कांदिवलीला........ दोन टोके.....

हा ह्या जोडप्याचा आडमुठेपणा नाही का???

३. सिच्यु ३:

म्हातारी आई तिला चार लग्न झालेल्या मुली. आजी ८८ वय. मुली साधारण ७०,६७,६२ व ५५ वयाच्या. ७० वर्षाची मोठी विधवा मुलगी स्वतःच आपल्या मुलीच्या सासरी रहाते व आजारी असते. बाकीच्या आपापल्या घरात. आजी ला स्वतःहुन व्रुद्धाश्रमात जायचे आहे. कारण कोणत्याच मुली कडे रहाणे तिला खरेतर आवडत नाही. शेवटच्या तिन मुली एकाच गावात जवळ जवळ रहातात. पहिल्या तिघींनाही तिचे म्हणणे पटते, पण धाकटी जी तुलनेने तरुण आहे ती काही आईला व्रुद्धाश्रमात ठेवायला तयार नाही. "लोक काय म्हणतिल" ह्या प्रश्नाने तिला घेरले आहे.
आळीपाळीने आजी एकाच गावात रहणार्‍या मुलींकडे १ -१ महिना रोटेशन ने रहाते. प्रत्येकिचे वेग वेगळे प्रॉब्लेम्स तिलाही फेस करायला लागतात. कोणाचा नवरा आजारी, कोणाच्या मुलीच्या साबांना आजारपण, कोणाकडे लिफ्ट नाही म्हणुन जीने चढायला लागतात, तर कोणा कडे जागा फार कमी..... बीचारी कोकलुन सांगते मला वृद्धाश्रमात ठेवा रे !!!!! मोठ्या तिघींना पटलेले आहे, पण धाकटी हा विषय निघाला की तमाशा करते....?

आता त्या आजींनी काय करावे?

वरिल तिनही सिच्यु. मधे खुप मोठ्ठा प्रॉब्लेम मला दिसतो तो म्हणजे सामंजस्याचा!!! आपण आपल्या पेक्षा ह्या समाज रुपी प्राण्याचा किती विचार करतो? का ? कशा साठी? ती सो कॉल्ड "प्रतिष्ठा" जपण्या साठी आपण जगणे ढकलत रहातो, विसरुन जातो, फक्त "इगो" कुरवाळत बसतो.

ही तिनही उदाहरणे म्हणजे एकमेकांत नसलेल्या एकवाक्यतेचे उत्ताम प्रतिके आहेत.

मी आणि नवर्‍याने आम्हा दोघां पुरते ठरवले आहे. जेंव्हा दोघेही हयात आहोत तेंव्हा घरातच सपोर्ट सीस्टीम तयार करायची. जेंव्हा एकच राहील तेंव्हा सरळ व्रुद्धाश्रमात जायचे. म्हातार पणी पुरतिल येवढी इन्वेस्ट्मेंट आहेच. तेंव्हा आर्थिक अवलंबन ठेवायचे नाही. साधारण मुलीचे लग्न-वा ती स्थीरस्थावर झाली की साठी पर्यंत वानप्रस्थात जायचे. नंतर सन्यासात..... दोघांनाही स्पिरिच्युअ‍ॅलिटीची आवड आहे, व साधनाही आहे. त्या मुळे एकटेपणा येणार नाही. उलट अनेकदा एकटे पणा आवडतो. ह्या विषयावर मार्गदर्शन घ्यायला अनेक लोक आमच्या कडे येत असतात. अनेक संस्थांशी बांधिलकी झाली आहे. हा विषय असा आहे की अनुभवाने तो अजुन छान पिकतो. त्यामुळे जनसंपर्काची चिंता नाही. मरे पर्यंत मला व नवर्‍याला हा व्यासंग पुरणार आहे.

पुण्यातली परांजप्यांची कल्पना अप्रतिम आहे. तशीच नेरळ्ला डिग्नीटी फौंडेशन ने ही बंगल्यांची स्कीम काढलेली आहे. बदलापुरचा बोडस मोतीवाल्यांचा प्रकल्प ही ह्याच धर्तीवर आहे.

सिच्यु ४ :

एकाच इमारती मधे मुलगा+मुलगी एका घरात
मुलीचे आई वडिल एका फ्लॅट मधे
मुलाची आई एका फ्लॅट मधे असे रहातात. आधी खुप झकाझकी व्हायची. शेवटी गेले ५ वर्ष प्रयत्न करुन त्यांना मना सारखी व्यवस्थी झाली.

अशी साधारण ३ कुटूंबे मला ठाउक आहेत. ( त्यात एक माझे ही )

माझ्या पाहण्यात एक कुटुंब आहे ज्यात मुलगी जिने आत्ताच साठी ओलांडली. पती निवर्तले. दोन विवाहित मुली. वडील आहेत, आईला जाऊन दहा वर्षे झालीत. सासरे आहेत.सासूही १०-१२ वर्षांपूर्वी गेल्या. मुलींची लग्ने(की मुलींचे लग्न) झाल्यावर त्या बाई आपल्या सासर्‍यांसह आपल्या माहेरी राहतात. माहेरी राहण्याचं एक कारण घर तळमजल्यावर शांत जागी आहे. दोघे व्याही गुण्यागोविंदाने एकत्र राहताहेत.

ही गोष्ट फार जूनी नाही पण " माघारी आलेल्या आत्याबाई " , " किंवा लग्नच न केलेले मामा " घरोघरी दिसत. घरातली माणसंच नव्हे तर नव्याने येणार्‍या सुनबाईदेखील त्यांच्या विक्षिप्तपणाशी जुळवून घेत ( अर्थात पर्याय नव्हता. ) पण त्यांना सहसा घराबाहेर पडावे लागत नसे.>>> दिनेश दा Happy

गावांत, म्हणजे जिथे एकत्र कुटुंबात एका घरात शिजवणे कव्हिनियन्स म्हणून दोन गॅस ठेवलेले ऐकले तरी 'चुली वेगळ्या झाल्या हो......' म्हणून गॉसिप होते तिथे एका बिल्डिंग मध्ये वेगवेगळ्या फ्लॅट मध्ये राहण्याची कल्पना रुचणे कठीण आहे.

दुसरा एक पॅटर्न असा:
एक सून आयुष्यभर सासू सासरे,टँट्रम्स सांभाळते, दुसरी परगावी/परदेशी असते आणि सहा महिन्यातून दोन तीन दिवस सासूला बोलावून खूप प्रेमाने वागते आणि जगाला पहिल्या सुनेचे इरिटेट होणे दिसते आणि सासू सासरे 'ती दुसरी आमच्याशी कित्ती प्रेमाने वागते बघा..आम्ही निघालो तर डोळ्यात पाणी आलं होतं तिच्या ' म्हणून येणार्‍या जाणार्‍याकडे गळा काढतात.

ज्यांचे डोळे वृद्धांच्या हालाने भरुन येतात त्यांनी ही सँपल्स पाहिली आहेत का?

'आजारी वृद्ध' आणि त्यांची सेवा ही करणेबल गोष्ट आहे, त्यांच्यापेक्षा 'मी स्मार्ट्,यंग्,सोल्युशन फाईंडर,मुलांच्या संसारात सगळ्या गोष्टीत माझं लक्ष आणि शेवटचा शब्द असलाच पाहिजे' वाले वृद्ध जास्त कठीण पडतात.

मि_अनु >> +१०००

मुळात आपण आता म्हातारे झालोत हेच बरेच जण स्विकारत नाहीत. अन नवीन येणार्या मुलीची स्वःतःच्या संसाराची स्वप्न असु शकतात हेच पटत नाही त्यांना.

समाज कुठल्याही व्यवस्थेवर नावे ठेवणारच असतो. त्यामुळे निकटवर्तीय जे उपयोगाला येऊ शकतात ते वगळता निर्णय घेताना कोण काय म्हणेल वगैरे गोष्टींना फाट्यावर मारणे हे महत्वाचे आहे.

आपल्याकडचे वृद्धाश्रम म्हणजे संपूर्ण समाजातून आऊटकास्ट केल्यासारखे असावेत त्यामुळे त्याबद्दल इतकी भिती/ निगेटिव्हिटी असेल.
वय कितीही वाढले तरी मुख्य धारेतून टाकून दिल्यासारखे निरूपयोगी आऊटकास्ट असे जगणे कुणालाही का आवडावे? मला नक्कीच नाही आवडणार.
पण आपल्याकडे सर्व प्रकारच्या नागरिकांना सोयीचे होईल असे ना घरांचे प्लॅनिंग असते ना घराबाहेरचे. (उदा. अपंगांसाठी रॅम्प्स आणि लिफ्टस वगैरे.) त्यामुळे वृद्धांसाठी कुठेही जाणे येणे अजून मुश्कील होऊन बसते.

पण आपल्याकडे सर्व प्रकारच्या नागरिकांना सोयीचे होईल असे ना घरांचे प्लॅनिंग असते ना घराबाहेरचे. (उदा. अपंगांसाठी रॅम्प्स आणि लिफ्टस वगैरे.) त्यामुळे वृद्धांसाठी कुठेही जाणे येणे अजून मुश्कील होऊन बसते.>>>

इथे सिंगापुरमधे अपंगासाठी आणि वृद्धांसाठी जागोजागी ज्या सुविधा केल्या आहेत त्या बघून जीव थक्क होतो:
१) बसमधे चढायला एक रॅम्प असतो. आणि स्वत: बस चालक खाली उतरवून अंपग व्यक्तीला चढवून देतो.
२) हेच नाही तर अंपग व्यक्तीला नीट बसता येईल अशी राखीव जागा केलेली असते. त्याचा हात लगेच पोचाव म्हणून बेल बटन अगदी तिथेच जवळ खाली केलेले असते.
३) त्या बेलचा आवाज वेगळा असतो. ती बेल वाजली की ही बेल अंपग व्यक्तीनी वाजवली हे लक्षात येते. मग परत बस चालक त्याला खाली उतरवून देतो.
४) अपंग व्यक्ती चढे वा उतरे पर्यंत इतर कुणीही चढू उतरू शकत नाही.
५) पुल कॉस करायला दोन्ही टोकाला लिफ्ट ची सोय केलेली असते.
६) प्रेत्यक ट्रेनच्या ठिकाणी अपंग व्यक्तीसाठी खास गेट असते.
६) रस्त्यावर ठिकठिकाणी रॅम्प असतात आणि हात धरायला बार्स सुद्धा असतात.
७) प्रत्येक ऑफीसमधे, मॉल्समधे अंपग व्यक्तीसाठी खास रेस्टरुम्स असतात.
८) लायब्ररीमधे सुद्धा ह्या सोयी असतात.

समाज कुठल्याही व्यवस्थेवर नावे ठेवणारच असतो. त्यामुळे निकटवर्तीय जे उपयोगाला येऊ शकतात ते वगळता निर्णय घेताना कोण काय म्हणेल वगैरे गोष्टींना फाट्यावर मारणे हे महत्वाचे आहे.>>

वय खूप वाढले की म्हणजे ८०च्या वर गेले की आपल्या पिढीतील कुणी उरत नाही. आणि जे उरतात त्यांचीही वये झालेली असतात. ते तुम्हाला काय मदत करणार! आणि जे मदत करु शकतात त्यांचा आणि तुमचा प्रेमाचा असा काही संंबंध नसतो. त्यांच्या हृदयात तुम्हाला जागा नसते. ही जागा कुठेच आढळत नाही म्हणून वृध्दाश्रम गाठावे लागते. सुखासुखी असा मार्ग कुणी जर पत्करत असेल तर ती व्यक्ती नक्कीच चुक करते आहे.

वर काही लोकांनी सजेस्ट केले की आपल्याच घरात राहून मोलकरणी ठेवता येतात. पण मोलकरणी मिळणे काही ठिकाणी फार दुरापास्त आहे. माझ्या अकोल्याच्या कॉलणीत कुणाहीकडे मोलकरीण नव्हती. ती पद्दतच तिथे नाही. मग मी जी आजी म्हणत आहे वर तिला फार त्रास व्हायचा. मग स्वतःच्या घरात राहूनही तिला मदतील कुणी येत नसे. हे सर्व एक काळ आजींनी सहन केले नंतर खूप नकोसे झाले तर वृद्धाश्रमात नाव दाखल केले. दुसरा पर्याय नव्हताच. कारण कुणाच्याही पदरतात आजीविषयी माया नव्हती. कुणालाही आजीची जबाबदारी दीर्घकाळ उचलायची नव्हती.

जवळजवळ दोन घरं घ्यायलाही लोग क्या कहेंगे असेल तर ओल्डेज होमने लोक तोंडात शेण नाही का घालणार? आमच्या शहरात तर हे = दोन / अगदी तीन घरं शेजारी, सर्रास दिसतं. मराठी कुटुंबांत.

जवळजवळ दोन घरं घ्यायलाही लोग क्या कहेंगे असेल तर ओल्डेज होमने लोक तोंडात शेण नाही का घालणार? आमच्या शहरात तर हे = दोन / अगदी तीन घरं शेजारी, सर्रास दिसतं. मराठी कुटुंबांत.>>

माझ्या चुलत वहिनींचे घर आहे अंधेरीत चार बंगल्याला. खालच्या माळयावर मोठी मुलगी, वरच्या माळ्यावर छोटी मुलगी. मुलगा आणि सुन समोरच्या अपार्टमेन्टमधे राहतात. कुणी काहीच म्हणत नाही उलट ही व्यवस्था जास्त चांगली आहे. प्रत्येकाला आपले घर आहे म्हणजे स्वत:ची प्रायवसी आहे. शिवाय अडीअडचणीला आपले सख्खे कुणीतरी आहे हे अजून चांगले. असे जर सगळ्यांना जमले तर आयुष्य केवढे तरी सोपे होईल.

भरत बरोबर!!! अशा परिस्थितीत मुलाकडे बोट दाखवले जाते आणि ते बरोबरच असते कारण मुलाला देखील आईवडील आहेत त्यांचे काय????

Pages