वृद्धाश्रम, वृद्धाश्रमात पाठवलेले गेलेले वॄद्ध, अतिवृद्ध, त्यामागची कारणे इत्यादी

Submitted by वेल on 15 January, 2016 - 08:34

अनेक जण आपल्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवतात. किंवा कधी कधी वृद्ध स्वतःच तिथे जाऊन राहतात.
मुलांची, वृद्ध पालकांची विचारसरणी, दोघांचे प्रॉब्लेम्स, बिहेवोरियल प्रॉब्लेम्स.
कुठे कुठे वृद्धाश्रम आहेत, ते कसे आहेत. त्यांचे चार्जेस काय आहेत.
वृद्धाश्रमात वृद्धांना कशी वागणूक मिळते. वृद्धांना घरी कशी वागणूक मिळते, ती का मिळते. वृद्ध जसे वागतात तए का वागतात.

अशा अनेक प्रश्नांवर इथे चर्चा करुया.

आज आपण सुपात असलो तरी कधी न कधी जात्यात जाणार आहोतच, म्हणजे वृद्ध होणारच आहोत. सो त्याआधी जरा मानसिक तयारी करु

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्त्रियांना जास्त करसवलत देऊन आपण एक नवी सुरवात केली तशीच वृद्धांसाठी असावे असे मला वाटते. >>> वर लिंका दिल्यात भारताच्या धोरणांबद्दल..

पालकांनी सांभाळ करत असतांना पाल्याला त्यांच्या मनाप्रमाणे वागायला लावलेले असते. आणि त्याबद्दल कुरबुर करण्याची.. तक्रार करण्याची कोणतीही सोय अव्हेलेबल नव्हती. (एक्स्ट्रीम केसेस वगळता) कोणतीही तक्रार फिक्रार ऐकुन घेतली जायची नाही. (अ‍ॅटलीस्ट माझ्या पिढीपर्यंत तरी). उलट उत्तरे दिल्यास सगळा खर्च पालक करत आहेत याची अधुनमधुन पालक जाणीवही करुन द्यायचे. १८+ झाल्यावर "आमच्या घरात राहायचं असेल तर आम्ही सांगु तसं वागावंच लागेल" असं या पाल्यांना (मीही आणि माझ्या माहितीतले बरेचजण) स्पष्ट ऐकावं लागलेलं आहे. (आता यात त्यात मुलांचंच कसं भलं होतं हा मुद्दा जरा बाजुला ठेवु).

तर आता स्वतःही कोणावर तरी अवलंबुन असल्यावर पैसे कमावणारे त्याचा विनियोग कसा करणार ते त्यांचं त्यांना ठरवु दे. प्रत्येक गोष्ट तुम्ही सांगता तशीच होणार हा हेका पालकांचाही असू नये. "आता सून-मुलाचा संसार.. लेट देम डिसाईड" एवढं जरी पाळलं तरी खुप आहे. पण असं घडतांना फार क्वचित बघते आहे. घरातली अमुक वस्तु आणतांना आम्हाला विचारलं नाही एवढंच कश्याला.. भाजी करतांना कोणती करायची हे मला विचारलं नाही एवढ्यावरुन भावना दुखावुन घेणारे आणि "आमचा अमुक अमुक नव्हता हो असा.. या सटवीने त्याला बिघडवलं" असं म्हणणारे ज्येना आजुबाजुला बघते आहे.

मुलांनी आयुष्यभर तुमच्या कंट्रोलखाली राहावं हा हेका सोडला तर वृद्ध आपलेसे होतील. त्यांच्यासोबत राहाणं इतकं अवघड होणार नाही. पण तसं होतांना दिसत नाही. कोणते ज्येना आपला मुलगा आपल्याला वृद्धाश्रमात सोडतोय म्हटल्यावर एकदातरी स्वतःचं कुठे चुकलं/ चुकतंय का याचं अवलोकन करतात? मुलांनी केलेल्या चुका त्याला लहानाचं मोठं करतांना पोटात घेतल्या.. लगेच तेवढ्यावरुन त्याला बोर्डींगमध्ये टाकलं नाही हेही मान्य.. पण स्वतःचंही काही चुकलं असेल हे मान्यतरी करा ना.. वयाने मोठा माणुस कायम बरोबरच हे किती दिवस चालणार? यावर मी मगाशी लिहिलं ते एवढ्याचसाठी. अवलोकन तर दुरची गोष्ट..

आणि हो.. मनात आलं म्हणून आईवडीलांना/ सासुसासर्‍यांना वृद्धाश्रमात टाकणं इतकंही सोपं नाहीये. समाज शेण घालतो तोंडात. वर कृतघ्न वै. शिक्के बसतात ते वेगळेच. काही वेळेला जर खरंच वृद्धांची चुक असेल तर ती समजुन घ्यायला कोण येतं मुलांच्या बाजुने? चुका फक्त मुलांनी मान्य करायच्या का? पालकांनीही आपली चुक झाली हे मान्य केले तर काय हरकत आहे? मी लहान असतांना अनेकवेळा आईवडीलांनी चुक कबुल करवुन घेऊन ज्या माणसाबाबतीत चुकलो त्याच्या पाया पडून माफी मागायला लावलेली आहे. (माझ्या वयाच्या बरेचजणांनी हा प्रसंग अनुभवला असेल). एवढी अपेक्षा तर वडीलधार्‍यांकडून नक्कीच नाही. पण चूक मान्य करायची? छेछे.. अशक्य.

वेळप्रसंगी गुरुच्याही चुका दाखवुन द्याव्यात असं एक संस्कृत सुभाषित आहे.. वानप्रस्थाश्रम सारखी एक पद्धत आहे. त्याचे संस्कार नाही केले जात ते मुलांवर? फक्त कर्तव्य आणि जबाबदार्‍यांचे कसे केले जातात?

असो.. कोणाला मुद्दा भरकटल्यासारखा वाटेल.. पण माझा इलाज नाही.

जे आयुष्यभर म्हणजे २५-३० वर्षं स्वतःच्या मनाप्रमाणे वागले त्यांनी मुलांच्या संसाराच्या वेळी 'आम्ही असे पर्यंत हे असे असे पाळाच' म्हणणे जाचक, आणि भारतातले ७०-८०% वृद्ध असेच आहेत. म्हणजे निरोगी जीवन मान जगले असले तर किमान ७५-८० वये जगतील हे लक्षात घेता 'आम्ही गेल्यानंतर वाटेल ते करा' च्या 'आम्ही गेल्यानंतर' पर्यंत मुलं सुना ५५-६० ला येणार(किंवा खूप वाईट जीवन मान असले तर एक किंवा दोघेही फोटोत जाणार) हा मुद्दा वृद्धांनी लक्षात घेतला तर वृद्धाश्रम निघणारच नाहीत.

वेगळ राहण सोप आहे का? लोक आप्ल्यालाच (पक्षी: सुन) वाईट बोलतात कि बघा कसा आई पासुन मुलाला तोडलं

हो मी वाचल्या त्या, पण त्यापैकी किती योजना सध्या चालू आहेत ? झाल्यात ?
आणि आपल्याकडच्या सर्वच योजनांचे काय होते, एकतर त्यात सरकार जो पैसा गुंतवते त्यापैकी थोडाच लाभधारकांपर्यंत पोहोचतो आणि दुसरे म्हणजे गरज असलेल्यांपैकी फारच थोड्या लोकांपर्यत हि योजना पोहोचते.

म्हणजे दुशीकडून नुकसानच.

व्यावसायिक तत्वावर आश्रम चालवणे ही काळाची गरज आहे असे मला वाटते. अर्थात त्याला पैसा लागणार. पण तो सरकारने न गुंतवता खाजगी संस्थांनी गुंतवावा आणि त्यांचे जे चार्जेस असतील ते सहज मिळावेत म्हणून करसवलत. असे माझे लॉजिक.

या संस्थेची पावती जोडली, कि करसवलत मिळायला हवी.. मला मान्य आहे हे मी मध्यम वर्गाबद्दल ( करदात्या ) बोलत आहे. पण हिच सवलत जर इतर ( पालक नसलेल्या ) व्यक्तींसाठी मिळाली, तर त्या मिषाने का होईना. पैसा मिळेल. आणि निराधार वृद्धांची सोय होईल.

आईवडिलांच्या आजारपणात केलेल्या खर्चाला करसवलत मिळत नाही पण आपल्या पगारातून त्यांचा आरोग्यविमा काढला की करसवलत मिळते.

वरती पियू ने लिहिलेले मुद्दे .. सत्य आहेत.

पण ज्या काळात आणि ज्या मर्यादीत उत्पन्नात ती पिढी वाढली, त्यांना हे पटवणे त्रासदायकच आहे. उदा. ३०/४० वर्षांपुर्वी हॉटेलिंग अजिबात नसायचे, त्यामूळे आता प्रत्येकाच्या वाढदिवसाला हॉटेलमधे जेवणे त्यांना नाहीच पटणार.

म्हणजे एकत्र राहण्यात दोन्ही गटातील व्यक्तींना मानसिक त्रासच होणार, त्यापेक्षा खात्रीशीर आश्रमात राहणे काय वाईट ?

मुळात सांभाळ करणे म्हणजे एकाच घरात एकमेकांना ओचकारत एकत्र राहणे असलं पाहिजे का?
सुरक्षित अंतरावर राहून सांभाळ होऊच शकत नाही का?

किंवा रादर सुरूवातीपासूनच सुरक्षित अंतरावर राह्यल्यावर संबंध जास्त चांगले राहू शकतात.

लग्नानंतरची काही वर्षे तरी निदान नवीन जोडप्याने एकत्र कुटुंबात राहूच नये. आपापल्या घरांमधून बाहेर पडून वेगळे जग थाटावे. एकमेकांना समजून घ्यावे. मग दोघांपैकी ज्याच्या आईवडिलांना जशी गरज असेल त्या प्रकारे मदत, सांभाळ व्हावा.

एक्काच घरत असण्यापेक्षा शेजारच्या फ्लॅटमधे/ एकाच बिल्डींगमधे/ सोसायटीमधे/ गल्लीत इतपत अंतर ठेवूनही व्यवस्थित सांभाळ होऊ शकतो.

मुलांच्या रोजच्या निर्णयांमधे ज्येनांचा हेका नको आणि ज्येनांच्या आयुष्यामधे मुलांची लुडबूड नको.

सुरक्षित अंतरावरून जोपासलेले नातेसंबंध ही मला तरी गुरूकिल्ली वाटते या सगळ्या समस्येवर.
अर्थात याला खूप पण, परंतु, अपवाद, शक्याशक्यता वगैरे आहे. पण प्रयत्न असावाच असे वाटते.

अहो दिनेशदा,
आम्हाला मुले आहेत म्हणून आम्हाला करसवलत द्या, असा क्लेम अजून भारतात होतो का?
(काही देशात मुले असल्यावर सवलत/ इंसेंटिव्हज मिळतात असे ऐकलेय)

मग आईबापांसाठी खर्च करतो म्हणून का बरं करसवलत पाहिजे.

खरे तर फॅमिली हे युनिट अस्तित्वात आहे असे मानूनच सगळ्या करसवलती मिळतात ना?

स्वतः कमवून स्पाऊस सांभळणार्‍याला 'स्पाऊस सांभाळण्याबद्दल करसवलत ' मिळते का?

तरी बाबाच्या घरात राहून रीतसर पावतीने भाडे देऊन वजावट मिळवणारे महाभाग आहेतच की नाही?

वेगळ राहण सोप आहे का? लोक आप्ल्यालाच (पक्षी: सुन) वाईट बोलतात कि बघा कसा आई पासुन मुलाला तोडलं

>> हे मीही लिहिणार होते. पण सारखा सुनांचा अजेंडा चालवतेय असा शिक्का नको बसायला म्हणून आवर्जुन हे वाक्य टाळलं मी. पण ते (वाक्य) इतकं सार्वत्रिक आहे.. कि तुम्ही बोललातच शेवटी.

नीधप, तू सांगितलेली पद्धत आदर्श असली तरी आर्थिकदृष्ट्या सर्व कुटुंबांना परवडेल अशी नाही.
आणि सर्व ज्येना हि सिस्टीम मान्य करतील असे नाही. शिवाय "कसं आई पासुन मुलाला तोडलं" हे संपेल असं वाटत नाही.

पियु, पण अती मानसिक त्रासापेक्षा आर्थिक झळ परवडेल ना..
लोकांच काय लोक बोलणारच.. त्या कडे किती लक्ष द्यायचं हे आपण च ठरवायला हवं ना?

मी म्हणतोय तशी कल्पना, कापोचेनी दिलेल्या भारत सरकारच्या धोरणातच लिहिलेली आहे.

10. Efforts would be made to strengthen the family system so that it continues to play the role of primary caregiver in old age. This would be done by sensitizing younger generations and by providing tax incentives for those taking care of the older members.

अरे वा!
छानच!
एका आईबाबांच्या पेअरवर साधारण किती मुलं टॅक्स बेनिफिट मागू शकतील बघायला पाहिजे.
आई बाबा तीन तीन महिने, चार चार महिने एका एका मुलाकडे रहात असतील तर खर्चावरचा टॅक्स कसा डिडक्ट करणार तेही बघायला पाहिजे.
एकंदर मजा आहे.

<एक्काच घरत असण्यापेक्षा शेजारच्या फ्लॅटमधे/ एकाच बिल्डींगमधे/ सोसायटीमधे/ गल्लीत इतपत अंतर ठेवूनही व्यवस्थित सांभाळ होऊ शकतो. >
हे असं करणारी किती तरी कुटुंब पाहण्यात आहेत. ती सणसमारंभांना एकत्र येतात.
. इथे लोक आपल्याला आलेल्या अनुभवांचं जनरलायझेशन करताहेत असं वाटतं.

मागच्या पिढीबरोबर राहणं अशक्य आहे हे नक्की झालेलं असल्याने त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचं, म्हणजे त्यांची तिथे योग्य ती काळजी घेतली जाईल अशी आयडिया दिसतेय. स्वतःचा वेगळा असा संसार मांडायचा ऑप्शन का नकोय?
लोक नावं ठेवणार असतील तर दोन्हीकडे ठेवतील. इथे जागा पुरत नाही असं पटण्यासारखं कारणही आहे.

आपल्या आजूबाजूला मुले असलेली तरीही एकटी राहणारी किती वृद्ध जोडपी आणि एकेकटे वृद्ध आहेत हे बघणार का?

अ‍ॅमी १०% चक्रवाढदराने ७.२ वर्षांत दामदुप्पट होतात.
पण मी दिलेली आकडेवारी वाचल्यावर मुलं ही हाय रिटर्न इन्व्हेस्टमेंट्स होऊ शकतात नाही याबद्दल तुमचं काय ठरलं ते कळलं नाही. तरीही मी एक वर्षाचा एफ्डी हा फार कमी रिटर्न्स देणारा पर्याय निवडलाय. त्यापेक्षा जास्त रिटर्न्स देणारे अनेक पर्याय तेव्हा होते. आजही आहेत.

साती,
फॅमिली अलाऊन्स अंगोला मधे आहे. न्यू झीलंडमधेही लहान मूल असेल तर सरकारतर्फे भत्ता मिळतो.
ही दोन टोकाच्या परिस्थितीत असणार्‍या देशांची उदाहरणे आहेत.

भारतातले स्टॅण्डर्ड डीडक्शन हे फॅमिलीसाठी नसून ते उत्पन्न मिळवण्यासाठी जो खर्च करणे गरजेचे आहे, त्याची वजावट या तत्वावर आधारीत आहे. पगार कमावताना येण्याजाण्याचा खर्च, पुस्तकांचा खर्च वगैरे करावा लागतो, त्यासाठी प्रत्येकाकडून पुरावा न मागता, एक ठराविक रक्कम वजावट म्हणून मिळते.

ही सवलत बॅचलरलाही तेवढीच मिळते आणि चार बायका असणार्‍यालादेखील Happy

स्पाऊस साठी नाही मिळणार पण ज्या ज्या व्यक्तींमधे इन्सुरेबल इंटरेस्ट असू शकतो, त्या त्या व्यक्तीच्या विम्याबाबत कर सवलत मिळतेच.

कर हा मिळकतीवर असतो, करानंतरची मिळकत कशी खर्च करायची त्यावर बंधन नाही. त्यातूनही सरकारने सांगितलेल्या बाबींवर खर्च केला ( जसे कि आयुर्विमा, नवीन घर बांधणे ) तर सवलत / वजावट मिळते. तर त्याच तत्वाने अशी सवलत वृद्धांच्या देखभाली साठी असावी असे मला वाटते.

भरत, खरेच होऊ देत कि भांडणे. आईबाबा ठरवतील कुणाकडे रहायचे ते. आणि त्यांच्या सहीशिवाय ही सवलत मिळू नये.

अशी सवलत काही नवी गोष्ट नाही. अगदी हिटलरच्या काळातही जर्मनीमधे (परक्या) लहान मुलांचा संभाळ करायला तयार असणार्‍या कुटुंबांना भत्ता मिळतच असे.

केव्हढी सरमिसळ आहे मुद्द्यांची!

१. सून त्रासदायक
कारण म्हणजे घरातल्या वृद्धांच्या संगोपनाची जबाबदारी घरातल्या मुख्य स्त्रीवर आहे असे गृहीत धरण्यात येते. किती पुरूष आपल्या सासूचे डायपर सहजपणे बदलतील? स्त्री वात्सल्यमूर्ती/ शुश्रूषानिपुण असणे अपेक्षित असते. ते पुष्कळ स्त्रियांना अवघड जाते.
माझ्या सासरी मातृसत्ताक पद्धतीमुळे आजेसासू-सासरे अतिवृद्ध झाल्यावर सासर्‍यांना स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांच्या सेवेसाठी सासूबाईंच्या माहेरी परतावे लागले. शुश्रूषा अर्थातच साबांच्या खात्यात. स्वतःचेच आई वडील असले तरी साठीच्या घरात असताना नव्वदीच्या घरातल्या हट्टी वृद्धांचा सांभाळ करणे कठीण काम आहे. साबा अत्यंत सोशीक असल्याने त्यांना जमले. मला जमले नसते. सांभाळण्याच्या या १०/ १५ वर्षात ते दोघे घर सोडून कधीच कुठे गेले नाहीत. सुट्टीच नाही आयुष्यात.
ओळखीच्या एक आजी आहेत, त्यांना एकूण ९ नातवंडे आहेत. (ज्यांची मुले आता शाळा कॉलेजात आहेत.) तर पैकी एकच नातू हा मुलाचा मुलगा आहे. इतर आठांचे म्हणणे की आजींना त्यानेच सांभाळावे. तर त्याच्या पत्नीचे म्हणणे की जबाबदारी वाटून घ्यायला हवी. नातवाला सोशल कंडीशनिंग मधून येणारे प्रेशर की आजीची जबाबदारी त्याची आणि नातसुनेला वर्षभर आजींना सांभाळून आलेला शीण.

२. खर्च
माझ्यामते माझ्या जन्मापासून नोकरी लागण्याचा वरखर्च १५/१६ वर्षांपूर्वी बहुतेक साधारण १२ लाख होता. दुसरे मूल परवडणार नाही म्हणून मी एकुलती एक - तर परवडले असते का भावंड असे मी गंमत म्हणून गणित केल्याचे आठवते आहे. आम्ही स्वतःच्या घरात रहायला जाईपर्यंत '७५-८५ च्या काळात घर भाडे साधारण रू १५० ते रू ३०० होते. माझ्या शाळेची फी पहिली ते दहावी रू १२ ते रू ३६ होती. मुलींना शिक्षण फुकट असल्याने ही नाममात्र फी लायब्ररी, बिल्ला इत्यादीसाठी लागत असे. दोन वर्षांतून १ युनिफॉर्म. (दर गुरुवारी युनिफॉर्मला सुट्टी असल्याने तेव्हा तो धुवायचा.) वर्षातून दोन वेळा नवीन कपडे (प्रत्येकवेळी २). ८वी ते १२वी कसले कसले क्लास होते. त्यांची फी महिना रू१०० ते रू२५० अशी वाढत गेली.
इंजिनियरिंगची फी वर्षाला ५१२० ते ५५६० अशी काहीशी. (४००० सरकारी फी + कॉलेजची इतर) हॉस्टेलवर रहायचे महिन्याला रू १०००. वगैरे.
गणित आवडता विषय असल्याने महिन्याचे बजेट करणे, दिवाळीला कोणती नवी वस्तू घ्यायची आहे त्यासाठी काय सेविंग असले काम साधारण सातवीपासून माझ्या खाती आले होते. त्यामुळे वरचे आकडे अगदी पक्के नसले तरी खर्‍याच्या जवळपासचे असावेत.

आईवडिलांनी दिलेला वेळ आणि श्रम याचे मात्र काहीच मोल नाही. Happy

३. पर्याय
हॉस्टेल टाइप वृद्धाश्रमापेक्षा गेटेड कम्युनिटी मला आवडेल. अथश्री कुतूहल म्हणून पाहून आले एका भारतवारीत. चांगला पर्याय वाटला.
मी शक्यतो निवृत्त होणार नाही आणि अगदीच काम होईनासे झाले तर लगेच मरेन असे ठरवून ठेवले आहे. Wink

नीधप, तू सांगितलेली पद्धत आदर्श असली तरी आर्थिकदृष्ट्या सर्व कुटुंबांना परवडेल अशी नाही. <<
पियू, असे करणारे, असणारे अनेक लोक मला माहिती आहेत. कुठलीही पद्धत कुणाला परवडेल कुणालातरी नाही परवडणार. ज्याने त्याने आपल्याला जे जसे योग्य वाटते तसा पर्याय निवडायचा आहे. लाख दुखोंकी एक दवा टाइपचे सोल्युशन अश्या समस्यांवर असू शकत नाही. त्यामुळे जर तुला एखादी पद्धत आदर्श वाटतेय तर ती तशीच्या तशी/ थोडी मॉडिफाय करून/ बरीच मॉडिफाय करून तुला वापरता येते का हे बघ.

हे असं करणारी किती तरी कुटुंब पाहण्यात आहेत. ती सणसमारंभांना एकत्र येतात.<< एक्झॅक्टली.

>> ती सणसमारंभांना एकत्र येतात.
हो, हे यावेळच्या भारतवारीत विशेषत्वाने पाहिले. एकदम प्रेमच प्रेम. Happy सर्कास्टिक नाही, एकदम खरेच. छान वाटले पाहून.

माझ्यामते माझ्या जन्मापासून नोकरी लागण्याचा वरखर्च १५/१६ वर्षांपूर्वी बहुतेक साधारण १२ लाख होता.

<<

रोजचे नाश्ता, चहा, जेवण, कपडेलत्ते, आजारपणं, प्रवास, सिनेमा, खाऊ इ. धरलंय का हिशोबात?

काही काही मुलामुलींना चप्पल, जेवणाचा डबा, वॉटरब्याग, पेन, पेन्सिल, खोडरबर, कम्पासबॉक्स जे काय असेल ते वारंवार हरवण्याची सवय असते त्यांचा एक्स्ट्रा खर्च पकडा. आमच्या काळी धाव्वीत आणि बाराव्वीत गेल्यावर प्रत्येकी २ हीरोची पेनं घ्यायची फ्याशन होती. रु. १५ * ४ खर्चात धरा. मोठी भावंडं असलेल्यांना अनेकदा वापरलेली पुस्तकं , कपडे मिळायचे तो खर्च वजा जाउ देत. नाही तर असं करा ना असे बारीक-सारीक खर्च कव्हर करण्यासाठी काही तरी कुशन ठेवा हिशेबात.

जोवर सुरक्षित अंतरावर वेगळ्या घरांमधे राहणं जमतंय तोवर तेच बरे. पहिल्यापासून अंतर राखून असल्यामुळे संबंध नीट राहण्याची शक्यता जास्त. त्यामुळे नंतर जमेनासे होईल ज्येष्ठांना तेव्हा नुसते कर्तव्य नाही तर आपलेपणाने केले जाण्याची शक्यता जास्त.

कपडेलत्ते, आजारपण धरले आहेत. सिनेमा वगैरे नसायचा हो तेव्हा फारसा. वर्षातून एखादा लहान मुलांचा. जेवण, नाश्ता, घरभाडे इ धरले नव्हते नक्की. प्रवास म्हणजे सहल म्हणताय का? (हॉलिडे?) सुट्टीत आजोळी जाणे? तेही धरलेले नाही.

गेल्या काही पानांपासून मी अडेलतट्टूसारखा त्या पैशाच्या हिशोबाभोवती का फिरतोय, त्याचं कारण थोड्या वेळाने सविस्तर लिहीन. तोपर्यंत मला म्हातारपण, एकेमेकांवर खर्च केलेला, व भविष्यात करायचा पैसा, इ. बद्दल तुम्ही सर्व लोक काय म्हणताहात ते ऐकायचं होतं.

सासू-सुना, अन बाप-मुलाच्या दोन पिढ्यांतल्या संघर्षात नवे काहीच नाही. अन युनिकही काही नाही. घरोघरी मातीच्याच चुली असतात. मुलांनी 'वेगळे निघणे', बाप/आई जिवंत असतानाच 'वाटा' मागणे, आईबापांना तुसड्यासारखे बोलणे, ओरडणे, क्वचित प्रसंगी मारहाण, उपासमारही करणे, तीर्थयात्रेला नेतो म्हणून शिर्डीला नेऊन तिथेच सोडून गायब होणे, हेच नव्हे तर परदेशी नोकरीत असणार्‍या मुलांनी येऊन आईबापाची सगळी इस्टेट विकायला लावून चला माझ्याकडे रहायला असे सांगून विमानतळापर्यंत नेऊन तिथे त्यांना सोडून उडून जाण्याच्या घटना एकीकडे आहेत,

तशाच, श्रावणबाळ कॉम्प्लेक्सने पीडीत स्वतःचं आयुष्य, बायकापोरं यांना फाट्यावर मारून आईबापांना कावडीत घालून 'तीर्थयात्रा' घडवताना जीवाला मुकणार्‍या आधुनिक श्रावणबाळांच्या स्टोर्‍याही बक्कळ आहेत.

इट्स ऑल इन ह्युमन नेचर.

नुसते, 'हे घ्या तुम्ही आमच्या पालनपोषणावर खर्च केलेले पैसे अन गप पडा', असे म्हणणे, अन त्यांनी हरघडी 'तुझ्यासाठी इतक्या खस्ता खाल्ल्या अन तू..' असे ऐकवणे यात क्वालिटेटिव्ह फरक काहीच नाही.

तर लोकहो,

मुद्दा आजची कुटुंबसंस्था, त्यात वृद्धाश्रम व पाळणाघरे यांची भूमीका, आपले आजचे वय, व त्या वयानुसार आपण पाळणाघर, वृद्धाश्रमात स्वतः जाण्यासाठी उत्सुक आहोत काय? हो किंवा नाही, याची कारणे. तिथे जावे लागले तर काय करावे? न जावे लागण्यासाठी काय करावे? या बाबींबद्दल बोलावे.

अर्थात, सध्याच्या कौटुंबिक परिस्थीतीनुसार व्हेंटिंग (ज्येना असेच अन तसेच. किंवा आजकालची मुले ना.. इ.) अपेक्षित आहेच. तो या धाग्याचा अ‍ॅडेड स्पाईस राहील.

पण यानिमित्ताने का होईना, आज आपण "त्यांच्या" वानप्रस्थाश्रमाबद्दल बोलत आहोत. उद्या आपल्यावरही ती वेळ येईलच, त्यादृष्टीने काय प्लॅनिंग, असे काहीसे निष्पन्न झाले तर बरे होईल..

एक्झॅक्टली हेच सगळं मी मुद्देसूद माझ्या १,२,३,४...पोस्टीत लिहिलंय.
तरी मला मार्क्स नाहीत?
Happy

Pages