वृद्धाश्रम, वृद्धाश्रमात पाठवलेले गेलेले वॄद्ध, अतिवृद्ध, त्यामागची कारणे इत्यादी

Submitted by वेल on 15 January, 2016 - 08:34

अनेक जण आपल्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवतात. किंवा कधी कधी वृद्ध स्वतःच तिथे जाऊन राहतात.
मुलांची, वृद्ध पालकांची विचारसरणी, दोघांचे प्रॉब्लेम्स, बिहेवोरियल प्रॉब्लेम्स.
कुठे कुठे वृद्धाश्रम आहेत, ते कसे आहेत. त्यांचे चार्जेस काय आहेत.
वृद्धाश्रमात वृद्धांना कशी वागणूक मिळते. वृद्धांना घरी कशी वागणूक मिळते, ती का मिळते. वृद्ध जसे वागतात तए का वागतात.

अशा अनेक प्रश्नांवर इथे चर्चा करुया.

आज आपण सुपात असलो तरी कधी न कधी जात्यात जाणार आहोतच, म्हणजे वृद्ध होणारच आहोत. सो त्याआधी जरा मानसिक तयारी करु

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक काय, काही केले तरी बोलतातच ! त्यांची कशाला पर्वा करायची ?

बी, तू म्हणतोस तश्या सोयी अनेक देशांत मी बघितल्यात. पण भारतातली गर्दी आणि नियोजनाचा अभाव बघता ते कितीसे जमणार ? नाना नानी पार्क हि अगदी अलिकडच्या काळातली सुधारणा. ती पण किती अपुरी आहे ते बघतोच आहोत.

भरत, माझ्या भावाच्या बाबतीत नेत्रदान केले होते, त्यांना फोन केल्यावर ती माणसे घरी आली होती. आणि जरी समजा देह हॉस्पिटलमधे पोहोचवायचाच असेल, तरी ते कमी जिकीरीचे आहे. आपल्याकडे जो घोळ घातला जातो, त्यापेक्षा बराच सुसह्य !

आपण वृद्धापकाळ आणि त्यानंतर येणारा मृत्यू सहज स्वीकारत नाही. आसक्ती काही जात नाही. नातू बघितला, कि नातसून बघायची असते. ती बघितली कि पतवंडे बघायची असतात.
सगळे माझ्याच मनासारखे व्हावे. माझ्याच आवडीचे व्हावे हा हेका सुट्त नाही. मग एवढ्या तेवढ्यावरून वाद घातले जातात.

खरेच, मला वाटते कि या बाबतीत आपले संत आणि धर्म जरी बरेच काही सांगत असले तरी ते आपल्या पचनी पडलेले नाही.

>>त्यांना मुलीच्या ऐवजी मुलगा असता तर असाच विचार केला असता का? किंवा मुलाने जर परत येण्याचा केला नाहीतर त्याला दोष देण्यात येतो किंवा त्याला (मुलाला) जबाबदारीच त्याला दडपण असू शकत ना ?>>
मंजूताई माझा कझिनही एकटाच आहे. तो देखील परदेशातच स्थाइक झालाय. मामामामी दोघेच रहातात. माझ्या आजोळी आजीआजोबा आजी हयात होती तोवर मोठ्या घरी एकटेच रहायचे. मुलांना घरे बांधायला आधीच जवळ जागा घेतली होती. तिथे दोघा मामांचे स्वतंत्र बंगले, दोघे मामा नोकरी निमित्ताने शहरात स्वतंत्र असे होते. विभक्त कुटुंब हे आधीच्या पिढीतच असल्याने नव्या पिढीने आपल्या जवळच रहावे हा हट्ट नाहीये. कामाला माणसे ठेवून स्वतःच्या घरात किंवा चांगला वृद्धाश्रम अशी काळजी घेतली जावी एवढीच अपेक्षा आहे. आईच्या माहेरची सगळीच वृद्ध मंडळी स्वतंत्र रहातायत. आजारपणात मदत घेतली जाते पण एरवी स्वतंत्र संसार.

तसेही ग्लोबलाझएशनच्या काळात भारतातच रहायचे ठरवूनही बदली झाली म्हणून काही काळ परदेशात, बिझनेस ट्रॅवल वगैरे गोष्टींमुळे प्रसंगी अपत्य जवळ नाही असेही होत असते. अपत्याच्या कामाच्या विचित्र वेळा, रजा घेता न येणे हे देखील आहेच. त्यामुळे आमच्याकडे लेकींच्या सासरचे, सुनेच्या माहेरचे वगैरे मंडळी, जवळपास रहाणारी नवी पिढी अणि त्यांचे जोडीदार सगळे एकमेकांना संभाळून घेतात. जमेल तशी मदत करतात. वृद्ध मंडळी देखील प्रसंगी बेबीसिटिंग, हॉस्पीटलात सोबत थांबणे, बाईच्या मदतीने डब्याची व्यवस्था वगैरे जे जमेल ते करतात. मात्र खात्रीच्या व्यावसायिक सोयी फारश्या नसल्याने एकंदरीत कठीण जाते.

आता विचारांती हे जाणवते आहे माझ्या आजी आजोबांची पिढी नशीबवान होती की शेवटपर्यंत ते नांदत्या घरात राहू शकले.
आता जे मुलाबाळांसकट परदेशात रहात आहेत त्यांना पर्याय म्हणजे जोवर शक्य आहे तोवर स्वतःच्या घरात रहाणे नाहीतर वृद्धाश्रम. भारतात राहण्याचा पर्याय आहे पण मुले इथे वाढल्यामुळे भारतामध्ये सहज वावरू शकत नाहीत त्यामुळे ती तिथे भेटायला येणेपण कठीण.

आपण आपल्या मुलांकडून अपेक्षा ठेवायला हरकत नाही पण त्या पूर्ण होतीलच असे पण नाही आणि मुलांसाठी खूप केले पण परदेशात राहिल्याने आई वडीलांसाठी खूप काही करता आले नाही, येत नाही हे शल्य पण मनात असतेच.

वयाच्या ह्या टप्प्यात असे वाटत आहे की परदेशातल्या भारतीय लोकांचे ह्या बाबतीतले प्रश्न आणि त्याची उत्तरे अधिकच गहिरी आहेत

आज मदर्स डे च्या अनुषंगाने हि पोस्ट वाचनात आली. आणि इथल्या विषयाला लागू होत असल्याने इथे पोस्ट करावीशी वाटली.

--------------------------------------------------------------------

"आईला वृद्धाश्रमात ठेवले त्याने आणि मातृदिनाच्या शुभेच्छा देत फिरतोय" प्रकारच्या स्टुपिड फॉर्वर्डस वाचनात आल्या.

१. जणू वृद्धाश्रम म्हणजे कचराकुंडी आहे. आई हे एक उचलून नेऊन ठेवायचे प्रॉडक्ट आहे.

२. "त्याने" आईला वृद्धाश्रमात ठेवले. हा "तो" फॉर्वर्डच्या एकूणच बुद्धिमत्तेवरून लग्न झालेला असणार. म्हणजे, "बायको आली घरी आणि आई गेली वृद्धाश्रमी" असले काही नकळत सुचवायचे असावे. बरे, आई ह्याची. हा आईचे म्हातारपण काढायला काय करतोय? प्रत्यक्ष किती काम रोज घरात करतो? की हलवायाच्या घरावर तुळशीपत्र सारखे दुसऱ्या घरातून आलेल्या मुलीला ह्याच्या पालकांची काळजी घ्यायची आहे? किती काळ? कोणती नेमकी? तिला काय मदत उपलब्ध होणार आहे? आर्थिक, शारीरिक? हा तिच्या आई वडिलांची किती काळजी करतो? ते समजत नाही. तिचेही आईवडील म्हातारे असू शकतात. त्यांनाही देखभाल गरजेची असू शकते. हां, त्याने लग्न करतांनाच "भाऊ असलेली मुलगी" बघितली असणार. बरोबर...तिचे आई वडील पॅकेज कटले की. केवढी हुशारी नाही?!!!!

हा तो कुणी नोकरदार अविवाहित असेल. कसे सांभाळणार आईला? त्याची काही अपरिहार्यता असेल.

३. आई स्वतः कमावती असू शकते की नाही? तिने स्वतःच वयाच्या पन्नाशीत वृद्धाश्रमात जायचे प्लॅन केलेले असू शकतात की नाही? भरल्या घरात राहून देखील कुणाला म्हातारपणी वृद्धाश्रमात जावेसे वाटू शकते की. जितके चांगले, अफोर्डेबल, घराजवळ आणि विविध सुविधांनी युक्त वृद्धाश्रम चटकन उपलब्ध होतील, तितके ते बरेच राहील. 'वृद्धाश्रमात गेला बिचारा/बिचारी" असली फिलिंग कशाला?

४. घरोघरी एकेकटे वृद्ध आहेत. दुकटे आहेत. अविवाहित आहेत. जोडीदार दुरावलेले आहेत. सगळ्या नात्यांच्या कॉम्बिनेशन्स आहेत. अनेक जण आर्थिक सक्षम आहेत, शहरांत तरी. आर्थिक आधार नसलेले देखील अनेक वृद्ध आहेत. त्यात काही आजारपणे चिटकलेली असतात. काही सवयी असतात. हेकटपणा असतो. घरात सत्ता गाजवायची असते. कधी केविलवाणी परिस्थिती देखील असते. कोणीही ऐकत-विचारत नाही. एक आजारी व्यक्ती घरात असणे म्हणजे किती आणि काय स्वरूपाचे काम असते घरातल्या लोकांना, किती खर्च असतो, ते समजून घ्या. त्यांना देता येणारा वेळ समजून घ्या. उत्तम तब्येत असलेले वृद्ध आहेत. वृद्ध झाले तरी तरुण बेरोजगार मुलांना पोसणारे देखील वृद्ध आहेत. काहीही असू शकते परिस्थिती. आपल्याला माहित असते का?
अशावेळी वृद्धाश्रम म्हणजे जणू कचराकुंडी असले मेसेजेस आपण फॉरवर्ड करणे टाळावे.

उलट, आपापले म्हातारपण कोणालाही फारसा त्रास होणार नाही, अशाप्रकारे कसे आंनदाने सामोरे जाता येईल, याचा चाळीशी-पन्नाशीत निदान विचार करावा. कुणाला व्यसने असतील आणि त्यातून काही व्याधी होणार असतील, झालेल्या असतील तर त्याला लागणारा खर्च किती असेल, कसे झेपेल आपल्या केअर टेकर्स ना, मुळात दुसऱ्याने आपले करावेच असा अट्टहास ठेवून काही असायला नको, आर्थिक गणित कसे असेल, आपण कुणाशी कसे वागतो, तर कुणी आपल्या म्हातारपणी आपले करावे? का करावे? असा सगळा विचार करायला हवाय. व्यसने असो की नसो. आजारपणे असो की नसो. आर्थिक स्थैर्य आता असो की नसो. त्यानुसार काही बदल करावे आणि शहाणे व्हावे आरोग्य राखायला सुरुवात करावी. जरा दूर दृष्टी बाळगावी.
इतके करून देखील "आजचे जगा, उद्याचे कुणी पाहिले" फणा काढून जगता येतेच की.
थोडेसे भान हवे भविष्याचे, इतकेच.
प्राची पाठक
घाईत लिहिले आहे. समजून घ्या. शब्दखेळ करू नका.
#Prachi_Chirpy
===
Share if you feel like...

हा धागा सुरु झाला तेव्हा 102 नॉट आउट पिक्चर रिलिज झाला नव्हता. कसा वाटला पिक्चर या अनुषंगाने.

नाशिक मध्ये निरामय केयर सेंटर असे एक प्रायव्हेट केयर सेंटर आहे, जी वृद्ध व्याधीग्रस्त बेडरिडन अगदी कोमा मध्ये असलेल्या रुग्णांनाही सांभाळते. इथे डॉ. योगेश सदगीर आहेत. जे एम डी. आयुर्वेद आहेत. या ठिकाणी अशा सर्व रुग्णांची योग्य ती सुश्रुषा केली जाते. 8010083044 हा तेथील फोन नंबर आहे. तसेच तुम्ही गूगल वर niramay care centre सर्च करून अधिक माहिती घेऊ शकता...

अंबानी साहेब, अदानी साहेब वृध्द झाल्यावर त्यांनी जाहीर केले माझी सर्व सेवा जो कोणी करेल अगदी संडास साफ करण्या पासून सर्व.
त्यांना मी माझ्या पूर्ण संपत्ती चा वारस बनावेन.
130 कोटी हिंदुस्तानी आणि जगातील अती उच्च पदावर नोकरी करणारे नोकर सर्व तयार होतील संडास पण साफ करण्यासाठी.
हजारो मीठ मोठ्या कंपन्यांचे सीईओ तर टॉयलेट paper हातात घेवून 24 तास उभे राहतील.
संपत्ती ची ताकत खूप मोठी आहे.
वय 70झाले की असेल नसेल ती सर्व संपत्ती विकून टाकायची आणि मस्त राजेशाही म्हातारपण घरीच घालवायचे
असा पण आता जे वृध्द होणार आहेत त्यांची स्थावर मालमत्ता आणि बँक बॅलन्स कमीत कमी एक दोन करोड आहेच.
प्रतेक वर्षी दहा लाख खर्च केले तरी सहज वीस वर्ष निघून जातील.

130 कोटी हिंदुस्तानी आणि जगातील अती उच्च पदावर नोकरी करणारे नोकर सर्व तयार होतील संडास पण साफ करण्यासाठी.>>> मला वजा करा. असली घाणेरडी कामं पैशांसाठी मी करणार नाही. दोन वेळचं पोटभर मिळतंय त्यात खुश आहे मी. जर अडाणी अंबानीने मला खूपच रिक्वेस्ट केली की तू येच आम्हाला तुझ्याशिवाय कोणी सांभाळू शकणार नाही. तू ग्रेट आहेस. तू खूपच चांगला आहेस. तुला सगळी इस्टेस्ट देऊ.आम्ही तुझे नोकर बनून राहू . आणि माझे हातपाय पकडले तर काही अटींवर जायला मी विचार करू शकतो.

130 कोटी हिंदुस्तानी आणि जगातील अती उच्च पदावर नोकरी करणारे नोकर सर्व तयार होतील संडास पण साफ करण्यासाठी.
हजारो मीठ मोठ्या कंपन्यांचे सीईओ तर टॉयलेट paper हातात घेवून 24 तास उभे राहतील.>>>>>> काहीही !

अंबानी साहेब, अदानी साहेब वृध्द झाल्यावर त्यांनी जाहीर केले माझी सर्व सेवा जो कोणी करेल अगदी संडास साफ करण्या पासून सर्व.
त्यांना मी माझ्या पूर्ण संपत्ती चा वारस बनावेन. >> ह्यांना साहेब म्हणायचं काय कारण आहे?

माझी सर्व सेवा जो कोणी करेल अगदी संडास साफ करण्या पासून सर्व...
>>>

हे काम प्रोफेशनली उत्तमरीत्या करणारे असतात. त्याचा ते मोबदला घेतात जो परवडायला अंबानी अदानी असावे लागत नाही. तसेच हे काम हलके समजून ते काम करणाऱ्यांचा अपमान करण्यातही काही अर्थ नाही. कारण त्यांच्याबद्दल कृतज्ञताच वाटते.

>>>>>>>.हे काम प्रोफेशनली उत्तमरीत्या करणारे असतात. त्याचा ते मोबदला घेतात जो परवडायला अंबानी अदानी असावे लागत नाही. तसेच हे काम हलके समजून ते काम करणाऱ्यांचा अपमान करण्यातही काही अर्थ नाही. कारण त्यांच्याबद्दल कृतज्ञताच वाटते.

मनातले!!! गेले ३ दिवस, अगदी हेच वाटत होते. पण वाद वाढवायचा आळस.

'बिईंग मॉर्टल' - अतुल गावंडे यांचे पुस्तक वाचते आहे.

वार्धक्याची दुसरी व्याख्या म्हणजे 'गमावलेल्या' बाबींची साखळी . असे अतुल गावंडे मांडतात. जे की सत्य आहे. आपले जीवन, आक्रसत जाते. कधी जोडीदार गमावुन बसतो कधी मुलं दूर उडून जातात तर जास्त करुन शारीरीक क्षमता, मानसिक क्षमतेचा र्‍हास होत असतो. इथपर्यंत मी आले आहे. गावंड्यांनी त्यांच्या आजेसासू चे उदाहरण दिलेले आहे. ती आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. ती 'इन्डिपेन्डन्ट होम' मध्ये रहाते. आणि
तिची तक्रार काय तर - आता कार चालवता येत नाही, वृद्धाश्रम मला घरासारखा वाटत नाही. Really!!! यामध्ये गावंडे म्हणतात 'आपल्याला एखाद्या जागी घरासारखे' वाटण्याची गरज, हीची तुलना, 'माशाला पाण्याची'' गरज असते त्याच्याशी तुलना होउ शकते.

माझ्या मते हा बाऊ आहे. तुम्हाला तडजोड करता आलीच पाहीजे. त्याबद्दल अजुन तरी गावंडे बोलत नाहीत. पैश्याच्या दृष्टीने , संपन्न असणे, 'पुअर होम्स' मध्ये रहावे न लागणे, याउलट 'इन्डिपेन्डन्ट केअर' मिळणे, हे सुदैव (priviledge) नाहीये का? बर्‍याच लोकांना तो ऑप्शनही नसतो. पण आपली फ्रेम ऑफ रेफरन्स ही 'आतापर्यंत' विरुद्ध 'यापुढे' ही असते. आतापर्यंत मी अशी होते, ते यापुढे मला मिळणार नाही. मला हवी तेव्हा बाहेर रपेट घेता येणार नाही. मला शॉपिंग करता येणार नाही. मला नातवांना भेटता येणार नाही. Really!!!

मग तुमची वयाने आलेली प्रगल्भता उपयोगी पडणार कधी? 'तक्रार करणं' हा मनुष्य स्वभाव आहे. पण त्यावरती मात करुन, 'bloom where planted' आले पाहीजे की नको? इथे अध्यात्मिक माईंडसेट(मानसिकता) कामला येते. - Pain is inevitable suffering is optional हे गावंडे पुढे सांगतात का? अजुन वाचायचे आहे.

कल नई कोंपलें फूटेंगी, कल नए फूल मुस्काएंगे
और नई घास के नए फर्श पर नए पांव इठलाएंगे
वो मेरे बीच नहीं आए, मैं उनके बीच में क्यों आऊं
उनकी सुबह और शामों का मैं एक भी लम्हा क्यों पाऊँ

हेसुद्धा खरे नाहीये का? तुमच्या मुला-नातवांना आता त्यांचे जीवन जगू द्यात. तुम्हीही आराम करा. तक्रारखोरपणा कमी करा. Is it too much to ask?

इतरांचे प्रतिसाद वाचते आहे. हा धागा माहीत नव्हता. हा धागा विसरले होते. नवा धागा काढणार होते परंतु आधी चाचपणी केली व हा धागा सापडला.

धन्यवाद ममो.

गावंडे सांगतात, बर्‍याच वृद्धांना, वृद्धाश्रमामध्ये गेले की, सर्वाधिक गमावल्याची खंत वाटते ती म्हणजे, खाजगीपणा, मैत्र आणि स्वतःच्या जीवनावरील आपले नियंत्रण. ते लोकं सांगणार तेव्हा झोपायचे, खायचे, उठायचे. सर्व काही त्यांच्या तालावरती. एक बाई होत्या त्या म्हणत की - मी दागिने बनवते. माझ्यात अजुनही समाजाला, आसपासच्यांना देण्यासारखे, खूप काही आहे. मी विविध भूमिका वठवु इच्छिते, माझ्या आयुष्याला एक अर्थ हवा असे मला वाटते. हा जो अर्थ आहे, आयुष्याचे ध्येय आहे, ते वृद्धाश्रमांमध्ये हरवते. मैत्र होउ शकत नाही कारण बर्‍याच वृद्धांना 'आकलनाच्या' समस्या असतात, बरेच जण शांत आणि हरवलेले असतात.

म्हणजे बहुते आपली सकारात्मकता , आजूबाजूच्या नकारत्मकते मधे हरवते, लोप पावते. तुम्हाला सुरक्षा मिळते, अगदी बेडपॅनपासून, अत्यावश्यक सुविधा मिळतात पण बरच काही गमवावं लागतं.

जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया असे म्हणून पुढे चालावे.
आमच्या मंडळींनी मला एक चांगल सांगितलय, काहिही असो, मित्र, नातेवाइक, सहकारी, नोकरी धंदा, वस्तू, घर अगदी काहिही. दूर गेल्यावर, हरवल्यावर या जन्मात आपल त्यासंबधी तेवढच देण घेण होत अस समजावे व पुढे जावे.

या अन्य कोणी लिहिलेल्या फेसबुक पोस्ट्स आहेत.
इथल्या काहींनी आधीच वाचल्या असतील.

जेव्हां एकादि व्यक्ती अती-वृद्ध अवस्थेत पोहोचते, किंवा त्या आधीच विकलांग होते, तेव्हां तो प्रश्न सगळ्या कुटुंबाचाच प्रश्न होतो. हा प्रश्न अती-वृद्ध पाल्याचा आणि हा प्रश्न त्याच्या पालकाचा, असा फ़रक नसतो. म्हणून हे विश्लेषण पाल्यां करता, व पालकां करता, दोघां करता आहे. अती-वृद्ध जीवनाच्या चार अवस्था आहेत.
अवस्था-1. स्वतंत्र जगण्यास सक्षम. बाजार-काम, घर-कामवगैरे सांभाळून स्वत: एकटे राहू शकतात.
अवस्था-2. शौच-स्नान इत्यादी अजून आपल्या आपण करू शकतात. मात्र आता घरा बाहेरची कामे (बाजार, बॅन्क, डॉक्टर) व घर-काम सुद्धा आपल्या आपण करता येत नाहीत. परावलंबी अवस्थेची ही पहिली पायरी आहे.
अवस्था-3. इंग्रजीत Assisted Living म्हणतात, ती अवस्था. आता शौच-स्नान इत्यादी करता पण स्वावलंबी नाही. कदाचित अंथरुणाला खिळलेले, 24X 7 मदतनीस लागतो/लागते.
अवस्थ-4. यात अल्झायमर, बुद्धीभ्रंश, पक्षघात, वगैरे आले. खर म्हणजे आता ती “व्यक्ती” उरलीच नाहीत. आता उरले आहे ते फक्त श्वसन क्रिया आणि पचनक्रिया चालू असलेले एक शरीर.
या अवस्था वया प्रमाणेच असतात असे अजिबात नाही. काही लोक 90+ वयात पण अवस्था 2 पर्यंतच असतात, तर काही 75 वर्षे वयातच अवस्था 3 किंवा 4 मधे पण पोहोचतात. प्रश्न अवस्थेवर अवलंबून आहेत, वया वर नाही. प्रत्येक वृद्धाचा प्रवास या सर्व अवस्था मधून होईलच असे अजिबात नाही. अनेकदा आपण बातमी ऐकतो, "चांगले हिंडते-फ़िरते होते. आपल सगळ आपल्या आपण करत असत. परवा रात्री झोपले आणि झोपेतच गेले". म्हणजे अवस्था 1 किंवा 2 मधे असलेली व्यक्ती, अवस्था 3 किंवा 4 मधे न जाता, फ़ार काळ रुग्ण शैय्ये वर न राहता, झोपेतच गेली. आणि अशी बातमी ऐकल्या वर आपली प्रतिक्रिया असते "नशीबवान"(ते आणी त्यांचे पालक, दोघेही). पण सगळेच असे नशीबवान नसतात. आधुनिक वैद्यकशास्त्र आयुष्यातील Quality पूर्णपणे संपलेली असताना आयुष्याची Quantity वाढवत नेण्यास सक्षम आहे, भोगणाऱ्याला आणि त्याची काळजी घेणाऱ्याला, दोघांनाही असह्य होई पर्यंत.
अवस्था 1 किंवा 2 असे पर्यंत अती-वृद्ध घरातलीच एक व्यक्ती असते, त्यांना घरातच सांभाळणे शक्य असतेे. पण अवस्था 3 व 4 मधे मात्र त्यांना घरातच सांभाळणे शक्य नसते. एक पीढी आधी पर्यंत सात-आठ बहीण भाऊ असत. जबाबदारी वाटून घेता येत असे. आता सगळी जबाबदारी फार तर दोन, कधी कधी तर एकाच अपत्यावर पडते. दोन्ही अपत्ये परदेशात स्थायिक असल्यास आई-वडील इथे एकटे पडतात. जेव्हां ते रोजच्या जीवना करता पण परावलंबी अवस्थेत जातात, तेव्हां फार बिकट परिस्थिती उभी राहते. प्रश्न गंभीर आहेत आणि "त्यांनी तुमच्या करता किती कष्ट घेतले आहेत त्याचे भान ठेवा. त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांची काळजी घ्या" असल्या कानपिचक्या मुलांना देऊन सुटणारे नाहीत.
सगळ्यात मोठा प्रश्न पैश्याचा. भारतात 70 वर्षे वा अधिक वयाची जनसंख्या 2020 साली 5.25 कोटी होती. या पैकी 80% अवस्था 1 वा 2 मधे आहेत असे धरले व त्यांच्या वर प्रत्येकी महिना 5,000 खर्च धरला; अणि 20% अवस्था 3 वा 4 मधे आहेत असे धरले व त्यांच्या वर प्रत्येकी महिना 20,000 खर्च धरला; तर एकूण खर्च वार्षिक 5,00,000 कोटी (पाच लाख कोटी) येवढा होतो. येवढा खर्च सरकार करेल हे निव्वळ अशक्य आहे. असले खर्च करण्या करता देश संपन्न असावा लागतो. इथे सरकार कडे कुपोषित बालकांना डाळ-तांदुळाची खिचडी खाउ घालायला पैसे नाहीत, विकल-वृद्धांना कसे पोसणार? तेव्हां सरकारच्या नांवाने बोटे मोडून किंवा "सगळ्यांनी आवाज उठवा" असल्या पोस्ट फ़ॉर्वर्ड करून / "लाईक" करुन काहीही साध्य होणार नाही. काही स्वयं सेवी संस्था निराधारां करता चांगले काम करीत आहेत, पण त्यांच्या कडून सुद्धा काही कोटी लोकांची व्यवस्था होणे शक्य नाही, काही लाखांची पण नाही. म्हणजे, सर्व जबाबदारी कुटुंबाचीच आहे, हे लक्षात घेणे. आर्थिक बाजू भक्कम असली तर अति-वृद्ध पाल्यांचे व त्यांच्या पालक वृद्धांचे, दोघांचे रोजचे जगणे बऱ्याच अंशी सुसह्य करणे शक्य आहे. पण आर्थिक पाठबळ नसले, तर मात्र कठीण आहे.
अवस्था 3 वा 4 मधे जेव्हां मदतनिसाची गरज लागते, घरी निवासी मदतनीस ठेवल्यास महिन्याचा खर्च 20,000 पर्यंत जातो. वृद्धाश्रमात ठेवल्यास, मदतनीस shared असल्याने तो खर्च कमी होतो पण त्यात वृद्धाश्रमाचा recurring खर्च - जेवण, कपडे धुणे इत्यादी; आणि capital expenditure on land, building, interest on capital, वगैरे जमा होतो पुन्हा महिन्याचा खर्च किमान 20,000 पर्यंत जातोच. दानशूर लोकां कडून डोनेशन मिळवून अती-वृद्धांना कमी खर्चात, फुकट सुद्धा, संभाळणे शक्य आहे. पण अश्या प्रकारे किती लोकांची सोय होणार? Self-paid वृद्धाश्रमाचा महिन्याचा खर्च सोयी काय आहेत त्यानुसार 20,000 ते 50,000 पर्यंत जातो.
अनेकां कडे बँकेत फारशी शिल्लक नसते, पण आयुष्यभर कष्ट केल्या नंतर अति-ज्येष्ठांच्या नांवावर एक सदनिका असते. यांच्या करता एक उलट-गहाण (Reverse Mortgage) असा पर्याय आहे. म्हणजे, मालका कडून बँक घर (एक प्रकारे) हप्त्याने खरेदी करते. मालकाच्या हयातीत त्याला घरात राहाण्याची परवानगी असते, व बँक त्याला महिन्याला एक ठरावीक रक्कम देते. मालकाच्या निधना नंतर घर बँकेच्या मालकीचे होते. यात गोम अशी कि अती-वृद्धाच्या हयातीत त्याच्या खर्चाची काही अंशी तरी सोय होईल, पण त्याच्या नंतर घर त्याच्या मुलांना मिळणार नाही. या वर कोणी म्हणेल कि जर मुले आई-बापांची जबाबदारी घेत नसतील तर आई-बापांनी आपल्या नंतर मुलांना घर मिळणार नाही याची चिंता का करावी? याचे उत्तर असे कि अनेक कुटुंबात मुले आई-बापांची जबाबदारी नाकारत नसतात, पण महिना 25,000 खर्च करण्याची त्यांची ऐपतच नसते.
Reverse Mortgage करण्या करता काही प्रोपर्टीच नसेल, किंवा असली तरी ती Reverse Mortgage करून मुलांना नाकारणे पचनी पडत नसेल, व अति-वृद्धांचा खर्च करणे मुलांना परवडत नसेल, तर मग काय करावे? साधारणतः अश्या विश्लेषणात्मक लेखांचा शेवट "अमूक-तमूक केले तर या प्रश्नांवर समाधानकारक तोडगा नक्कीच निघेल" असा करायची पद्धतआहे. पण ज्यांना अती-वृद्धांचा खर्च परवडत नाही त्यांच्या समस्यां वर कोणा कडे ही कोणताही उपाय नाही. सर्व प्रश्नांना उत्तरे नसतात.

दुसरी पोस्ट
मुळात आपल्या कड़े फ़क्त ज्येष्ठांच्या समस्यांचाच विचार होतो. अती-ज्येष्ठांचा सांभाळा करणार्या आणि स्वत:च "ज्येष्ठ" असलेल्यांच्या पण काही समस्या असतील यांचा विचारच होत नाही. आणी मग "त्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे, तुमच्या करता खस्ता खाल्ल्या आहेत, आता या वयात त्यांना, . . . . " असल्या शुद्ध भावनीक, काव्यात्मक पण वास्तवाचे भान नसलेल्या पोस्ट लिहिल्या जातात.
1: आई वडीलांना वृद्धाश्रमात ठेवले म्हणजे मुलांनी जबाबदारी नाकारली, असे अजिबात नाही. जी मुल स्वत:पण रिटायर झाल्या नंतर आई वडीलां करता वृद्धाश्रमाचे दर महीना 50,000 खर्च करतात, त्यांच्या वर जबाबदारी नाकारली, आई वडीलांना घरा बाहर काढले, वगैरे आरोप करणे चुकीचे तर आहेच, पण अत्यंत दुर्दैवी आहे. आई वडीलांना वृद्धाश्रमात ठेवानुयाची गरज पड़ते त्याची कारने दोन. एक, अती-ज्येष्ठांचा संभाळ करण्यास जे काही लागते, त्याची सोय घरी नाही करता येत. 24 तास resident दाई, एक नर्स, गरज पडेल तशी डॉक्टरांची विजिट, हे सर्व घरी नाही करता येत. resident दाई ठेवायची असेल तर बंगलाच हवा, 2BHK तर सोडाच, 3BHK मधे सुद्धा resident दाई नाही ठेवता येत. डॉक्टरांनी होम-विजिट करण्याचा ज़माना केव्हांच संपला. नव्वदीच्या इकडे-तिकडे असलेल्या अती वृद्धांना डॉक्टरांकड़े OPD मधे नेणे म्हणजे काय दिव्य असते, हे ज्याच्या वर ते करायची पाळी आली, त्यालाच कळेल.
दुसरे, अती-ज्येष्ठांना घरीच सांभाळायचे असल्यास त्यांची मुलगा-सून हे "बांधले" जातात. दोघे कुठेही बाहर जाऊ शकत नाहीत. अगदी शहरातल्या शहरात एकाद्या लग्न-मुंज कार्यक्रमा करता पण नाही. एकाने घरी असलेच पाहिजे. हे असे "बांधले" जाणे अती-ज्येष्ठांच्या एकाद्या आजारपणात दोन-चार महिन्यां करता असेल तर निभावून नेता येते. सलग दहा-पंधरा वर्षे असे नाही करता येत. हे सुद्धा ज्याच्या वर ते करायची पाळी आली, त्यालाच कळेल. आणि मुलगा-सून यानी सलग दहा-पंधरा वर्षे असे करावे अशी अपेक्षा करणे हा त्यांच्या वर पण अन्याय आहे.
हे सर्व आम्ही दोघानी पाच वर्षे केले. माझ्या बेड-रिडन आईला फोल्डिंग व्हीलचेयर मधून माझ्या कार पर्यंत न्यायचे, तिला गाडीत बसवून व्हीलचेयर फोल्ड करून गाडीच्या डीकीत ठेवायची, दवाखान्यात पोहोचल्या नंतर व्हीलचेयर डीकीतून बाहर काढून तिला त्यावर बसवायचे अणि वेटिंग रूम मधे पोहोचवायचे, लगेच धावत बाहर येउन गाड़ी कुठे तरी पार्किंग शोधून तिथे लावायची, व झपझप चालत परत दवाखान्यात यायचे. हे सर्व मी माझी स्वत:ची बायपास झाल्या नंतर, अणि कमरेला स्पोंडीलायाटीस करता पट्टा लावून केले, अनेक वर्षे केले. किती तरी वर्षे आम्ही दोघे कुठेही बाहर गेलो नाही. एक जण तरी घरात पाहिजेच. अगदीच होईना, तेव्हां वृद्धाश्रमाचा पर्याय निवडला. म्हणून "मुलांनी जबाबदारी नाकारली, आई वडीलांना घरा बाहर काढले" असले फालतू पोस्ट वाचले की माझा संताप होतो.
2: काल एका पोस्ट मधे मी लिहिले होते की आम्ही पुण्यात अनेक वृद्धाश्रमांचा सर्वे केला. शेवटी शहराच्या मध्यावर्ती भागात असलेले पर्यायच निवडले, आधी "देवतरू" अणि मग रेग्युलर डॉक्टर-तपासनीची गरज वाढली तेव्हां "आस्था". शहरा पासून थोड़े दूर काही जागा होत्या, अणि त्यांचे दर अर्थातच कमी होते. पण वृद्धाश्रम शहरात पाहिजे कारण रुग्णालयात एडमिट करण्याची गरज पडल्यास तुमच्या राहत्या घरा पासून वृद्धाश्रम अणि वृद्धाश्रमा पासून एक रुग्णालय, जवळ पाहिजेत.
3: जसे रुग्णालयात असते तसेच वृद्धाश्रमात पण असते, जनरल वार्ड (एका खोलीत सहा खाटा) पासून स्वतन्त्र खोली, त्यात TV, स्वतन्त्र शौचालय, येथ पर्यंत अनेक प्रकार आहेत. ज्याला जसे परवडेल तसे त्याने घ्यावे. या विषयाचा काही अभ्यास केल्या नंतर असे वाटते की स्वतन्त्र खोली-शौचालय या करता सुद्धा दोघां करता महीना 50,000 हा दर कमी करता येईल. त्या करता चार गोष्टी कराव्या/ व्हावया लागतील.
एक - वृद्धाश्रमाचे व्यवस्थापन प्रोफेशनल पाहिजे, हौशी/ सेवा भावनेचे नको. विमान कम्पनी असो, टेलिकॉम कम्पनी असो, किंवा वृद्धाश्रम असो, कार्यकुशलता कशी वाढवता येइल व खर्च कसा कमी करता येईल हे प्रोफेशनल व्यवस्थापनच करू शकतात.
दोन - वृद्धाश्रमाचा आकार वाढवावा लागेल. सध्या बहुतेक वृद्धाश्रम साधारण 24 निवासी एवढेच असतात, काही तर या पेक्षा पण लहान. जशी मोठी रुग्नालाये 200 अधिक बेडची असतात तसेच वृद्धाश्रम पण 200 अधिक बेडचे असावेत. म्हणजे Economies of Scale चा फायदा होईल व दर कमी होतील.
तीन - वृद्धाश्रम मध्य शहरात का पाहिजे हे वर सांगितलेच आहे. पण मध्य शहरात रियल इस्टेटचे भाव खूप जास्त असतात. मार्केट दराने जमीन घेतल्यास तो वृद्धाश्रम कोणालाच परवडणार नाही. म्हणून, जशी रुग्नालयाना सरकार कमी दरात जमीन देते, तशी वृद्धाश्रमांना पण द्यावी. तरच मध्य शहरात वृद्धाश्रम अफोर्डेबल होतील.
चार - वृद्धाश्रमातच एक प्राथमिक रुग्णालय असावे, say 10% of beds. 80+ या वयात सुपर स्पेशालिटीची गरज नसते. कोणतीही मोठी शस्त्रक्रिया वगैरे करायची नसते. MBBS MD DNB यांची गरज नाही. CT scan, MRI, . . . यांची पण गरज नाही. ECG, path-lab tests, इंजेक्शन देणे, IV ड्रिप लावणे, फार-फार तर ऑक्सिजन, नाकातून नळी घालून फीडिंग, वगैरेची सोय असावी. थोडक्यात "शेवटचा दीस गोड व्हावा" एवढी सोय असावी. जर अशी सोय झाली, तर वृद्धाश्रम मध्य शहरात असण्याची गरज नाही, मध्य शहरा पासून ज़रा दूर, जिथे जमीनीचे भाव खूपच कमी असतील, तिथे करता येतील.
एक पाचवा सुझाव असा की वृद्धाश्रमा वर केलेला खर्च Tex Deductible असावा. पण यातील काहीही होण्या करता, समाजाला "त्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे, तुमच्या करता खस्ता खाल्ल्या आहेत, आता या वयात त्यांना, . . . . " या वैचारिक गुन्त्यातून बाहेर पडावे लागेल, व वृद्धाश्रम एक गरज आहे, हे मान्य करावे लागेल.

>>>>>अनेकां कडे बँकेत फारशी शिल्लक नसते, पण आयुष्यभर कष्ट केल्या नंतर अति-ज्येष्ठांच्या नांवावर एक सदनिका असते. यांच्या करता एक उलट-गहाण (Reverse Mortgage) असा पर्याय आहे. म्हणजे, मालका कडून बँक घर (एक प्रकारे) हप्त्याने खरेदी करते. मालकाच्या हयातीत त्याला घरात राहाण्याची परवानगी असते, व बँक त्याला महिन्याला एक ठरावीक रक्कम देते. मालकाच्या निधना नंतर घर बँकेच्या मालकीचे होते.

अच्छा रिव्हर्स मॉर्टगेज याला म्हणतात. माहीत नव्हते. संज्ञा ऐकून होते.

दुसरी पोस्ट पटली मला.

भरत प्लस वन. स्वानुभवानंतरच कळते केअर गिव्हर म्हणजे पूर्ण जीवन सॅप करून टाकणारा दमव्णारा अनुभव आहे. मी हे १९९० ते २००१ केले आहे. त्यात एका लहान मुलाचे पण. पण आई वडिलांना वृद्ध्हाश्रमात ठेवले नाही. एकदा वडिलांची तब्येत बिघडली. त्यांना आटोतून अपोलो हॉस्पिटल मध्ये नेले अ‍ॅडमिट केले व ते स्ट्रेचर वर झोपले मग आई बरोबर असली तर बरे म्हणून परत जाउन आईला घेउन आले. तो अर्धा पाउण तास वडील इन केअर ऑफ हॉस्पिटल स्टाफ स्रेचर वर पडूण होते तेव्हा मला फार असहाय वाटले होते. फिरतीचा जॉब असल्याने नवरा मदतीला उपलब्ध नसे बरेच वेळा. मग आईला त्यांच्या जवळ ठेवुन मग अ‍ॅड्मिशन चे सोपस्कार केले आहेत. मी अगदी लहान असल्या पासुन तिथे राहत असल्याने जीवनातला बराच वेळ केव्हाही त्यांची औषधे जिमखान्यातील मेडिकल शॉप्स मधून आणणे, ऑपरेशन्स ,पोस्ट केअर. मदत करणे ह्यात त्यात च गेला. एल्डर केअर इज अ डिफायनिन्ग फीचर इन माय लाइफ.

एक्दा आईच्या मनगटाचे हाड फ्रेक्चर झाले तेव्हा मी व ड्रायव्हर मिळून आईला चेअर वर ठेवुन तीन मजले खाली घेउन गेलेलो. लिफ्ट बंद नेहमी प्रमाणे. भरतच्या पोस्टी वाचून ते आठवले. लाइफ सर्टिफिकेट प्रोडुस करणे हे पण असेच जिवावरचे काम होते. बरं ते पैसे नको म्हटले तरी वयस्करांना ते पटत नाही. कारण त्यांची हक्काची पेन्शन असते.

आता स्वतःच केअर नीडेड मोड मध्ये असल्याने मला करणार्‍याच्या लिमिटेशन्स चांगल्या माहीत आहेत. परवा मला स्कॅन करायचा होता. लेक थोडी उशीरा आली. परत त्यांनी कॅश मागितली व ती तिने एटीएम मधून काढून भरली. व तिला पुढे मीटिन्ग होती मग मी तिला जायला सांगितले.
पोर बिचारे आटोत रडत कामावर गेले. त्या दिवशी मला स्वानुभवाने लक्षात आले की हे केअर गिव्हरला टोचणे त्रास देणे आजिबात बरोबर नाही. मी तिला मातृरुणातून कधीच मुक्त केले आहे. पण जी मुले परदेशात स्थायिक आहेत त्यांनी पण आटापिटा करून भारतात येणे., एल्डर
केअर चे प्रयत्न करणे ह्यात फार मोठी मानसिक उलघाल आहे. त्यांच्या कडुन आदर्श मूल वागणूक अपेक्षा करणे बरोबर नाही. त्यांची जीवने ट्रॅक वर ठेवणे हेच त्यांचे ऑब्जेक्टिव्ह असायला हवे. ते परदेशात अजूनच अवघड आहे. आमच्या जनरेशनच्या नोकर्‍या ,कामे चालून गेली आता प्रोफेशनले सर्वाइव्ह करणे खूप जास्त अवघ ड आहे. त्यात मुलांचे रक्त आटत असते. ती जे मदत देउ शकतात ती घ्यावी नाहीतर झाडासारखे रिसोर्सेस संपले की शांतपणे मरून जावे. हे मी पक्के मनात धरले आहे. आपल्या केअर चे कोणावर ओझे होउ नये. असिस्टेड हाउसिंग उपलब्ध जाले तर बरेच आहे.

तुम्हाला तडजोड करता आलीच पाहीजे. >> हे मदरहुड स्टेटमेंट आहे. जिवंत माणसा वर अशी जबरदस्ती कशी करता येइल. दडपशाही झाली. मला नाही करायची तडजोड असे कोणीही जिवं त माणूस कधीही म्हणूच शकते.

वार्धक्याची दुसरी व्याख्या म्हणजे 'गमावलेल्या' बाबींची साखळी >> सात प्रकारचे मृत्यु असतात. आर्थिक, भावनिक, सामाजिक, प्रोफेशनल जीवनाचा मृत्यु, मानसिक, जालीय व शेवटचा शारीरिक. एक एक टप्प्या टप्प्याने संपत जाते. ह्यावर वेगळा धागा काढू का?

. पण आपली फ्रेम ऑफ रेफरन्स ही 'आतापर्यंत' विरुद्ध 'यापुढे' ही असते.>> होतं हो असं. क्यान्सर सर्जेरी तुन उठलेले रोगी अस्तात ते अग्दी आज मी पहिल्यांदा शॉवर घेतला, किती दिवसांनी भेळ खाल्ली, साडी नेसली कार चालवली असे कौतुकाने लिहितात. कारण साधे साधे जीवनातील आनंद पण वय होईल तसे अवघड होत जातात. एक एक बाबी दूर दूर जातच राहतात. हे नैसर्गिक आहे. पण त्याचे वाइट तर वाटतेच. मी मध्यंतरी चांगले हेडफोन्स घेउन निवांत गाणी ऐकली तेव्हा अरे हे जमतंय की अजून असे वाटून आनंद झाला होता. घरी डबल मोगरा आला तर त्याचा वास घेउनही मन सुखावले होते.

ग तुमची वयाने आलेली प्रगल्भता उपयोगी पडणार कधी? 'तक्रार करणं' हा मनुष्य स्वभाव आहे. पण त्यावरती मात करुन, 'bloom where planted' आले पाहीजे की नको? इथे अध्यात्मिक माईंडसेट(मानसिकता) कामला येते. - >> किती जरी प्रगल्भ झाले तरी दु:ख होतेच स्वातंत्र्य हिरावले त्याचे. परत ज्या झाडाची मुळे एका ठिकाणी रुजली आहेत त्याला दुसर्‍याच वातावरणात रुजणे अवघड किंवा अशक्यच होते ते झाड मरूनच जाते जर बरोबर केअर नसली तर. ही साधी बॉटनी आहे. हातातील उपलब्ध असलेला वेळ वितळत एक एक दिवस क्षण संपत आहे ही भावना फार घाबरवून टाकणारी आहे. तेव्हा आध्यात्मिक पोपटपंची कामास येत नाही.

जमेल ते शब्द नीट जोडलेले आहेत. Wink

अमा, मरून जाणं आपल्या हातात असतं तर चांगलं झालं असतं. पण तसं नाही.
तो मुगल ए आजम मधला अकबराच्या तोंडचा संवाद आहे ना - सलीम तुझे जीने नहीं देगा, और हम, अनारकली, तुझे जीने नहीं देंगे.

या वरच्या पोस्ट्स माझ्या नाहीत. मी ही सध्या त्याच नावेतून चाललो आहे. पण त्याबद्दल इथे जेवढं जनरल म व्यक्तिगत माहिती आणि डिटेल्स टाळून, लिहिणं शक्य आहे, तेवढंच लिहीन. इथे काही आयडी पूर्णपणे संवेदनाहीन आहेत. ते काहीही कमेंट्स करत असतात. वेबमास्तर, अ‍ॅडमिनना सांगूनही उपयोग झालेला नाही.
शिवाय काही वर्षांपूर्वी मी आईच्या आजारपणाबद्दल गप्पांच्या पानावर लिहिलं होतं ; तेव्हा राजकीय मतांमुळे माझा द्वेष करणार्‍या एका व्यक्तीने त्यातही आनंद वाटून घेतला होता. मायबोली किंवा कोणतंही सोशल नेटवर्किंग साइट जिथे तुम्हाला तुमचा ऑडियन्स निवडता येत नाही, असा गोष्टींसाठी योग्य जागा नाहीत. आपण लिहून मोकळं व्हायचं आणि प्रतिक्रिया वाचायच्याच नाहीत हा एक मार्ग आहे.
ज्यांना आपण जवळचं समजतो, अशा नात्यातल्या, मित्रवर्गातल्या लोकांनाही जर असा अनुभव नसेल, तर या गोष्टी समजत नाहीत.

<मग तुमची वयाने आलेली प्रगल्भता उपयोगी पडणार कधी? >

हे तुम्ही वृद्ध आहात तोवर ठीक आहे. एकदा अ तिवृद्धत्वाकडे वाटचाल सुरू झाली की ते दुसरं शैशव असतं. प्रत्येक बाबतीत. तान्हं बाळ जसं परावलंबी असतं तसं परावलंबित्व येत जातं. आणि हे त्या व्यक्तीसाठी खूप वेदनादायी असतं.

Pages