आंतरराष्ट्रीय घडामोडी

Submitted by अश्विनी के on 27 March, 2015 - 03:02

आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्‍या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.

कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.

कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्‍या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.

वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.

धन्यवाद.
================================================

NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पॅरिस हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या बेल्जियन तरूणाने आज छाप्याचा दरम्यान आत्महत्या केली असावी किंवा तो मारला गेला असावा. He is dead.

http://m.timesofindia.com/world/europe/Paris-attack-mastermind-may-have-...

पॅरिस हल्ल्याचा सुत्रधार मारला गेल्याची बातमी खरी आहे ?

पण त्याने काय फरक पडणार आहे ? १ गेला अजुन २० तयार झाले देखिल.... हा अगदीच क्लिष्ट आणि न सोडवता येणारा प्रश्न आहे...

सिरियामधे काय सुरु आहे आणि कोण (असाद, असाद विरोधी गट, आयसिस, कुर्द बन्डखोर, इराण, इराक, सौदी अमेरिका, नाटो, फ्रान्स, रशिया) कुणाशी,आणि कशासाठी लढतो आहे हेच कळत नाही...

नायजेरियाच्या योला शहरात 'बोको हराम' दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला घडवून आणला. त्यात ३२ लोक ठार आणि ८०+ जखमी झाले. गेल्या काही महिन्यांत नायजेरियात बोको हरामचे घातपात वाढले असून 'बोको हराम' हे IS पेक्षाही धोकादायक असल्याचे पाश्चिमात्य विश्लेषक करत आहेत. बोको हराम IS पेक्षा ड्यांजर? Uhoh

सिरियामधे काय सुरु आहे आणि कोण (असाद, असाद विरोधी गट, आयसिस, कुर्द बन्डखोर, इराण, इराक, सौदी अमेरिका, नाटो, फ्रान्स, रशिया) कुणाशी,आणि कशासाठी लढतो आहे हेच कळत नाही...

सहमत.
काहीतरी एक गोष्ट मिळवून आता स्वतः सुखाने जगतील असे काही वाटत नाही.
आपण का थयथयाट करत होतो हे विसरुन रडणे हेच मुख्य उद्देश बनलेल्या स्पॉइल्ड लहान मुलासारखे करत आहेत.
यंच्या खेळाने अनेक सुखात असलेल्या सामान्य नागरिकांची वाट लावली.

नरेश माने, आधीच्या पानावर म्हटल्याप्रमाणे अमेरिका, रशिया व फ्रान्स एकत्रपणे समन्वयाने सिरियात काम करु लागले आहेत.

फ्रान्सच्या विमानांनी सलग ३ दिवस हवाई हल्ले करुन ISच्या ठिकाणांवर बाँबफेक केली. भूमध्य समुद्रात तैनात केलेल्या रशियन युद्धनौकांनी रॉकेट्सचे हल्ले केले. त्या आधी अमेरिकेच्या कमांडशी संपर्क साधला गेला. गेल्या महिन्यात इजिप्तमध्ये रशियाचे विमान पाडले गेले तो घातपात असल्याचे रशियाने जाहिर केले आणि दहशतवाद्यांवर कडक कारवाई करण्याची घोषणा केली. रशियन विमानांनी सिरियाच्या इदलिब व अलेप्पो इथे हल्ले चढवले. नंतर पुतिन ह्यांनी भूमध्य समुद्रात तैनात 'मोस्कवा' ह्या क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेने सज्ज विनाशिकेला कारवाईच्या ऑर्डर्स दिल्या. रशियन विमानं व विनाशिकेची कारवाई फ्रेंच लढाऊ विमानांच्या समन्वयाने पार पडली. रशियाने तशीच पूर्वसूचना अमेरिकेच्या मध्य आशियातील 'सेंटकॉम' ह्या लष्करी कमाण्डलाही दिली होती.

मनिला येथील बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ह्यांनी सिरियाच्या संदर्भात रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन हे उत्तम सहकारी ठरू शकतात असे म्हटले. अर्थात, अस्साद राजवटीबद्दलचे मतभेद तसेच आहेत. पण ते दूर ठेवून सिरियाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे. पॅरिस हल्ल्यानंतर रशिया व अमेरिकेचे पाश्चिमात्य मित्र देश एकत्र येवू लागले आहेत. ह्याबाबतीत तुर्कीमधली जी-२० बैठक महत्वपूर्ण ठरली.

'युरेशिया ग्रूप' ह्या अभ्यासगटाचे अध्यक्ष इयन ब्रेमर ह्यांनी पॅरिस हल्ल्यानंतर ISविरोधातील रशिया व इराणचा प्रभाव वाढल्याचे मत व्यक्त केले आहे.

दहशतवाद्यांनी पुकारलेल्या 'सुसंस्कृत जगा'विरोधातल्या युद्धात पौर्वात्य व पाश्चिमात्य देशांनी एकत्र यावे असे आवाहन रशियन पंतप्रधान दिमित्रि मेदवेदेव्ह ह्यांनी मनिला येथील अ‍ॅपेकच्या बैठकीत केले आहे. ते म्हणाले, रशिया एकटा ह्या संघर्षात उतरला तरी विजयी होईल पण रशियाबरोबर पाश्चिमात्य देशांनी देखिल संघर्ष केला तर ते देखिल विजयी होतील (मग अमेरिका, फ्रान्सवगैरे संघर्ष नाही तर काय टीपी करतायत सिरियात? Uhoh )अर्थात दोन्ही गटांना ह्याची किंमत चुकवावी लागेलच. युक्रेनप्रकरणी रशियावर निर्बंध टाकण्याच्या पाश्चिमात्य देशांच्या निर्णयावरही रशियन पंतप्रधानांनी टीका केली आहे.

'विनिंग द ग्लोबल रेस' ह्या 'ब्रिटिश बँकर्स असोसिएशन'ने तयार केलेल्या अहवालात ब्रिटनमधील परदेशी बँका झपाट्याने इतर देशांकडे जात असल्याचा इशारा दिला आहे. ह्या परदेशी बँकांना आकर्षित करण्यासाठी किंवा देशात राखण्यासाठी काही केलं गेलं नाही तर लंडन हे जगातील बँकिंग क्षेत्रातले प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाणार नाही.

कर, एकतर्फी नियम, अनिश्चितता व भांडवलासंदर्भातील रचना ह्याचा ब्रिटनमधल्या बँकिंग उद्योगाला बसला आहे असे बँकिंग असोसिएशनचे प्रमुख अँथनी ब्राऊन ह्यांनी म्हटले आहे. एकून GDP मधील approx ५% बॅ़किंगचा सहभाग आहे. साडेचार लाखांहून अधिक कर्मचारी आहेत आणि ह्या क्षेत्राकडून ब्रिटनला जवळजवळ ३१ अब्ज पौंड कर देण्यात येतो. आंतरराष्ट्रीय बँकिंग क्षेत्रात व्यवहार व भांडवल गृहित धरता लंडन हे जगात तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे. इथे साडेचार ट्रिलियन डॉलर्स इतकी अवाढव्य उलाढाल आहे. पण २०११ पासून ब्रिटनच्या बँकिंग क्षेत्राच्या मालमत्तेत १२%ची घट आहे. लंडनसह ब्रिटनबाहेर जाणार्‍या बँका अमेरिका, हाँगकाँग व सिंगापूरमध्ये जात आहेत. आघाडीची बँक HSBCनेही आपले मुख्यालय ब्रिटनबाहेर नेण्याचा इशारा दिला आहे. ब्रिटनकडून बँकिंग क्षेत्रावर वाढते निर्बंध व नियमांमुळे हा निर्णय घ्यावा लागेल असे बँकेने सांगितले आहे.

<< बोको हराम IS पेक्षा ड्यांजर? अ ओ, आता काय करायचं>>

----- किती लोकान्ना वर्षभरात मारले त्यावरुन डेन्जर पणा ठरवला गेला आहे... यान्न्नी (बोको हराम) ६७०० मारले, तर त्यान्नी ६०००.

ओके उदय. किती बळी घेतले त्यावर डेंजरपणा मोजला जातो हे माहित नव्हते. तरी मला वाटतं बोको हराम आधुनिक तंत्रज्ञान आयएसएवढं वापरत नसावेत त्यामुळे त्यांचा फैलाव नायजेरियापुरताच झाला असावा.

आयएस आणि भारतातून आयएसमध्ये भरती व्हायला निघालेल्या तरुणांवर आज लोकसत्तामध्ये लेख आला आहे. त्यात ह्या कामी सोशल मिडियाचा कसा दुरुपयोग केला जातो ते दिसून येते.

http://www.loksatta.com/coverstory-news/isis-islamic-state-of-iraq-and-t...

<<ओके उदय. किती बळी घेतले त्यावर डेंजरपणा मोजला जातो हे माहित नव्हते. तरी मला वाटतं बोको हराम आधुनिक तंत्रज्ञान आयएसएवढं वापरत नसावेत त्यामुळे त्यांचा फैलाव नायजेरियापुरताच झाला असावा.>>
------ हे मोजमाप माझे नाही, ज्यान्नी बोह ला पहिला क्रमान्क दिला आहे त्यान्चे आहे आणि ते मोजमाप सर्वमान्य असायला हवे असे नाही. योग्य आहे असे मलाही वाटत नाही.

हिन्साचार जगाच्या कुठल्या भागात कुठे होतो आहे, कोणते (काळे, गोरे, निळे, ताम्बडे) लोक बळी जातात हे पण महत्वाचे घटक आहेत मग त्यानुसार प्रसिद्धी मिळते. उदा: चार्ली हेब्डो हल्ल्याला मिळालेली प्रसिद्धी आणि १००-२०० तर कधी ३०० लोकान्ची हत्या यान्ना त्या प्रमाणात न मिळणारी प्रसिद्धी हे माझ्या समजण्यापली कडे आहे. बगदाद मधे किव्वा कुठे अफगाणात किव्वा लेबनॉन मधे अशा १० घटना एकाच आठवड्यात घडतात.... पण मेणबत्या लावायला कुणीच पुढे येत नाही... वर्षाच्या शेवटी आकडे आणि स्टॅटस वाचायला मिळतात २५ % घटना वाढल्या किव्वा ३० % हल्ली कमी झाले...

२००-२५० मुली शाळेतुन पळवुन ने ल्या जातात... पुढे काय होते? वर्ष लोटल्यावरही त्यान्ची सुटका होत नाही. त्यान्च्यावर दर-रोज अन्वनीत अत्याचार होत आहेत... एका मुलीसमोरच चार लोकान्चे गळे 'चिरले'... आता काय करणार बापडी तर दहशतवाद्यान्नी सान्गितलेली कामे मुकाट्याने करतात, आता तर त्यान्च्याकडुनच अत्याचाराची / हत्येची कामे करवली जात आहेत... या पिडीत मुली गरिब घरातल्याच आहेत, त्यान्च्यामधे कुणी मोठे श्रीमन्त किव्वा मोठ्या व्यक्तीच्या मुली नाही आहेत आणि म्हणुन पोलादी पन्जे (नायजेरियन लष्कर किव्वा जगातले मोठे खेळाडू) मनापासुन काम नाही करत.

अमेरिका / ब्रिटन डाफरतो पण करत काही नाही... अफगाण, इराक (आणि आता सिरिया) मधेच हात, पाय गुन्तलेले आहेत तर अपेक्षाही काय ठेवणार. चायना, रशिया बेरकी आहेत...

सर्व प्रकारच्या दहशतवादाला केवळ सामान्य जनताच बळी पडते. मग ते पॅरिसमधले सामान्य असतील किव्वा, सिरिया मधले सामान्य असतील... तेल साठ्यावरच्या नियन्त्रण आणि दोन विचारान्च्या लढाईत भरडली जातात केवळ सामान्यजन...

शुक्रवारच्या पवित्र दिवशी माली ह्या अफ्रिकन देशाच्या राजधानीत असणार्‍या रॅडिसन ब्लु हॉटेलात काही अतिरेकी शिरले. सकाळच्या वेळी. ते थेट रेस्टरॉमधे घुसले. अल्लाहू अकबर अशा प्रकारच्या आरोळ्या ठोकत त्यांनी रायफल चालवून नाश्ता करत असलेल्या लोकांना ठार केले. ह्या हल्ल्यात अनिता अशोक दातार ह्या अमेरिकावासी मराठी महिलेचा मृत्यू झाला.
नंतर अनेक लोकांना ओलिस ठेवले.

ह्या अतिरेकी हल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे अतिरेकी पकडलेल्या व्यक्तींची परीक्षा घेत होते. त्यांना परमपवित्र कुराणातील वचने उद्धृत करायला सांगत होते. ज्यांना ती वचने सांगता आली त्यांची तात्काळ सुटका करण्यात आली.
( अर्थात अतिरेकाला धर्म नसतो त्यामुळे ह्या प्रकरणातही कुठल्याच धर्माचा काहीही संबंध नाही हे सांगायची आवश्यकता नसावी! कुठल्या धार्मिक गोष्टींचा उल्लेख हा निव्वळ योगायोग समजावा!)

ह्या हल्ल्याची जबाबदारी अल कायदा ह्या जगप्रसिद्ध अतिरेकी संघटनेने घेतली आहे. आयसिस फार लोकप्रिय होत आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्हीही अतिरेक करू शकतो अशा प्रकारचा चुरशीतून उद्भवलेला प्रयोग असावा.

चीनच्या युआनला आंतरराष्ट्रीय चलन म्हणून मान्यता मिळण्याबद्दल RBI प्रमुख श्री रघुराम राजन ह्यानी हॉंगकॉंगमधे एका मुलाखतीत व्यक्त केलेली मते ---

http://m.timesofindia.com/business/international-business/RBI-chief-bats...

तुर्कीने रशियाचे लढाऊ विमान पाडले. मग त्या विमानातल्या वैमानिकांना शोधायला गेलेले रशियाचे हेलिकॉप्टर सिरियातल्या 'फ्री सिरियन आर्मी'च्या बंडखोरांनी पाडले. हेलिकॉप्टरमधल्या एका वैमानिकाला ठार केले. तसेच लढाऊ विमानातून उतरणार्‍या रशियन वैमानिकांवरही गोळीबार केला त्यात एक वैमानिक ठार झाला तर दुसरा बेपत्ता आहे.

हेलिकॉप्टर पाडण्यासाठी बंडखोरांनी 'टोव' ह्या रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचे बंडखोरांनी जाहिर केले आहे. सिरियन लष्कराविरोधी संघर्षासाठी अमेरिकेने त्यांना ही क्षेपणास्त्रे पुरवली होती. आता पुढच्या काळात रशियन हवाईदल आयएस दहशतवाद्यांबरोबरच सिरियन बंडखोरांनाही लक्ष्य करेल असे संकेत दिसत आहेत. आधीही तेच चालू होतं म्हणा! आता सरळसरळ कारण मिळालंय.

तुर्कीने रशियाचे लढाऊ विमान पाडल्यावर पुतिन ह्यांनी "तुर्कीने रशियाचे विमान पाडून रशियाच्या पाठित खंजीर खुपसला आहे. आता तुर्कीने ह्याचे परिणाम भोगायला तयार रहावे" असा इशारा दिला आहे. रशियाने तुर्कीबरोबरचे लष्करी सहकार्य खंडीत करुन टाकले आहे. रशियन नौदलाची क्षेपणास्त्रधारी विनाशिका तुर्की व सिरियाच्या किनारपट्टीवर तैनात करण्याचे आदेश आहेत. सिरियाच्या लताकिया हवाईतळावर रशियाची 'एस-४००' ही अत्याधुनिक क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा तैनात केली जाणार आहे.

रशियाच्या विमानाला तुर्कीने १० वेळा इशारे देणारे संदेश पाठवले होते हा तुर्कीचा दावा रशियाने फेटाळून लावला. ह्या विमानाने तुर्कीची हवाईहद्द ओलांडल्यावर फक्त १७ सेकंदांत हे विमान पाडले गेले. एवढ्या कमी कालावधीत हे विमान तुर्कीचे हवाईदल कसे काय पाडेल? असा प्रश्न रशियन माध्यमे करत आहेत.

दरम्यान तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन ह्यांनी रशियन विमान पाडण्याच्या कारवाईबद्दल ठाम भूमिका घेतली आहे. शेजारी राष्ट्राशी शत्रुत्व नसले तरी आपल्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्याच्या तुर्कीच्या अधिकारांचा सर्वांनी आदर करावा असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेने तुर्कीच्या कारवाईचे समर्थन केले आहे. नाटोनेही सदस्य असलेल्या तुर्कीला पाठिंबा देताना नियमानुसार सदस्यदेश असलेल्या तुर्कीवरी रशियाचा कुठल्याही स्वरुपाचा हल्ला हे नाटोवरील आक्रमण समजले जाईल असे म्हटल्याने हा संघर्ष केवळ रशिया व तुर्कीमध्ये न राहता नाटोचे सर्वच सदस्य देश रशियाच्या विरोधात उभे राहतील.

एकाच वेळी अनेक देश सिरियात गुंतल्यामुळे आता आयएसला रोखण्यासाठी सुरु असलेला हा संघर्ष भयावह झाला आहे. त्यामुळे रशियाची बाजू उचलून धरणारा चीनही ह्या संघर्षापासून फारकाळ अलिप्त राहू शकणार नाही असं दिसतंय.

प्रकू,

आपल्याला बाजू नसणारे. तेवढे प्रो-ऐक्तीव्ह आपण नाहीत Wink जेव्हा आजूबाजूचे ढकलतील, तिकडे आपण ढकलले जाऊ Happy

नाटोनेही सदस्य असलेल्या तुर्कीला पाठिंबा देताना नियमानुसार सदस्यदेश असलेल्या तुर्कीवरी रशियाचा कुठल्याही स्वरुपाचा हल्ला हे नाटोवरील आक्रमण समजले जाईल असे म्हटल्या>> या वक्तव्याची लिंक मिळू शकेल का ?
माझ्या माहीत हे नविन आहे.

सौदी अरेबियात प्रथमच स्त्रियांना म्युनिसिपालिटी निवडणूका लढवण्याची परवानगी मिळाली असून ९०० स्त्री उमेदवारांनी प्रचाराचे काम सुरु केले आहे. सौदीमध्ये निवडणूका घेवून प्रतिनिधी निवडायची पद्धत नव्हती. २००५ साली पहिल्यांदा निवडणूका झाल्या व नंतर २०११ मध्ये झाल्या. परंतु दोन्ही वेळेस स्त्रियांना उमेदवारी हक्क नव्हता.

http://zeenews.india.com/news/world/saudi-women-candidates-begin-first-e...

रशियाच्या मध्यवर्ती बँकेने चीनच्या युआनचा रशियाच्या राखिव चलनात समावेश करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त 'तास'ने दिले आहे. २०१० पासून रशियाने युआनमध्ये व्यवहार सुरु केले असून गेल्या वर्षात त्यात खूप वाढ झाली आहे. ऑगस्ट २०१५ मध्येच १८ अब्ज युआनचे व्यवहार झाले. अमेरिका व पाश्चात्य देशांनी निर्बंध घातल्यावर रशियाने युआनच्या वापरावर भर दिला आणि अमेरिकी डॉलरचा हिस्सा कमी करत नेला.

सद्ध्या रशियाच्या परकिय गंगाजळीत अमेरिकी डॉलर, ब्रिटिश पौंड, युरो चा वाटा जास्त आहे. पण लवकरच युआनचा वाटा २०% पर्यंत नेण्यात येईल असा अंदाज रशियन तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

रशियाची अग्रगण्य इंधनकंपनी 'गाझप्रोम' व प्रमुख बँक 'एसबरबँक' ह्यांनी युआनला प्राधान्य देण्यास सुरुवातही केली.

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात सॅन बर्नाडिनो मधील 'इनलॅण्ड रिजनल सेंटर'मध्ये दोन सशस्त्र हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करुन १४ जण ठार केले आणि १७ जखमी केले. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी अमेरिकेत घडणार्‍या 'मास शूटिंग' घटनांवर चिंता व्यक्त करताना म्हटलं आहे की अमेरिकेप्रमाणे बेछूट गोळीबाराच्या घटना जगात कुठेही घडत नसतील.

इनलँड रिजनल सेंटरमध्ये रुग्णांसाठी काही समारंभ सुरु असताना त्यात सहभागी झालेल्या २८ वर्षाच्या सय्यद रिझवान फारुखची वादावादी होवून तो बाहेर पडला आणि थोड्यावेळाने एका तरुणीला सोबत घेवून हातात रायफल्स व हँडगन घेवून आला. तिथे आल्यावर त्याने अर्धा तास बेछूट गोळीबार केला. दोघे गाडीतून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी पाठलाग केल्यावर झालेल्या चकमकीत दोघे ठार झाले. तरुणीचे नाव तशफिन मलिक आहे. ती पाकिस्तानी वंशाची असल्याचे 'कौन्सिल ऑन अमेरिकन इस्लामिक रिलेशन्स'ने सांगितले. दोघे पती-पत्नी असल्याचे व त्यांना एक सहा महिन्याची मुलगी असल्याचेही सांगितले जाते. बायकोची ओळख त्याने फार्मासिस्ट म्हणून करुन दिली होती.

ह्या गोळीबाराचा हेतू अजून स्पष्ट झाला नसून फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (FBI) ने दहशतवादाचीही शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले आहे.

ह्या वर्षी अमेरिकेत ३०० हून अधिक अंदाधुंद गोळीबाराच्या घटना घडल्या असून त्यात एक हजाराहून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले.

युरोपात सिरियन निर्वासितांवरुन खूपच गोंधळ चालू आहेत.

स्वीडनमध्ये शिरलेले १४ हजार निर्वासित गायब आहेत असे स्थानिक सुरक्षायंत्रणांनी सांगितले आहे. स्वीडनमध्ये आलेल्या निर्वासितांपैकी २१०००+ लोकांना परठ पाठवण्याचे निर्देश दिले गेले होते पण त्यातले १४१४० निर्वासित गायब आहेत.

दरम्यान, हंगेरीच्या पंतप्रधानांनी युरोपात पाच लाख सिरियन निर्वासित घुसविण्याचे जर्मनीचे कारस्थान असल्याचे म्हटले आहे. ब्रुसेल्समध्ये तुर्कीबरोबर झालेल्या करारादरम्यान जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल ह्यांनी ८ निवडक देशांची स्वतंत्र बैठक घेतल्याचेही उघड झाले आहे. तुर्कीत सद्ध्या सुमारे २५ लाख सिरियन निर्वासित असल्याचे सांगण्यात येते.

काही दिवसांपुर्वी तुर्की बरोबर झालेल्या युरोपिय महासंघाच्या करारात तुर्कीला तीन अब्ज युरोच्या अर्थसहाय्यासह वेगवेगळ्या सवलती देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्याबदल्यात तुर्कीने निर्वासितांना रोखायचे व त्यांची योग्य व्यवस्था पहायचे आश्वासन दिले होते. पण ह्याशिवायही तुर्की व जर्मनीमध्ये निर्वासितांच्या मुद्द्यावर गुप्त करार झाल्याचा आरोप हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन ह्यांनी केला. निर्वासितांना आणून त्यांना विभागून त्यांची जबाबदारी घेणे युरोपिय देशांवर बंधनकारक करण्यात येईल आणि हा युरोपसाठी आश्चर्याचा धक्का असेल असेही ते म्हणाले. पण हे सोपे नाही कारण हंगेरीसारखे देश हे स्वीकारणार नाहीत. आधीच ही जबाबदारी लादून घेण्यास नकार दिला आहे. निर्वासितांना रोखण्यासाठी सीमेवर कुंपण घालून लष्कर तैनात केले आहे. पॅरिस हल्ल्यानंतर ऑर्बन ह्यांनी सर्व दहशतवादी निर्वासितांमधीलच असल्याचा आरोप केला होता. ह्या इशार्‍यानंतर युरोपिय महासंघाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी तुर्कीकडून युरोपिय देशांसमोर थेट निर्वासित स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

तुर्कीने रशियाचे विमान पाडल्यावर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन ह्यांनी संरक्षणदलांना 'इल्युशिन आयएल-८०' हे अतिप्रगत विमान सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश म्हणजे रशियाने अणुयुद्धाची तयारी केल्याचे म्हटले जाते आहे.

लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्यावरही प्रतिहल्ल्याची सूचना व आवश्यक माहिती पुरवण्याची अफाट क्षमता असलेल्या ह्या विमानाला 'डूम्स डे प्लेन' असेही म्हटले जाते. रशियाशिवाय फक्त अमेरिकेकडेच अशी यंत्रणा असलेले विमान आहे. आण्विक किंवा पुर्ण संहार करणार्‍या हल्ल्यात लष्करी तळ, जवान, अधिकारी गेल्यावरही आयएल-८० चा वापर करता येतो. हे विमान म्हणजे संरक्षणदलांचे सूत्रसंचालन करणारा स्वतंत्र तळ असल्याचे म्हटले जाते. ह्या विमानांचा माग काढणे जवळ जवळ अशक्य असल्याने ही विमान अजेय असल्याचा दावा ह्या अतिप्रगत विमानाची निर्मिती करणार्‍या रशियाचे संशोधक अलेक्झांडर कोमायेव्ह ह्यांनी केला आहे.

ह्या विमानाच्या चाचण्या झाल्या असून ते लवकरच रशियाच्या ताफ्यात येणार होते पण आता पुतिन ह्यांनी अर्जन्टली दोन आठवड्यात हे विमान तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. समजा तुर्कीवर रशियाने हल्ला केलाच तर अमेरिकेसह नाटोचे सदस्य देश रशियाविरोधात युद्धात उतरतील. अश्यावेळी अण्वस्त्रांचा वापर झाला तर भयंकर परिस्थितीला तोंड देण्यासाठी आयएल-८० तयार ठेवले असावे. रशियाकडेही अण्वस्त्रांचा प्रचंड साठा आहे आणि अमेरिकेच्या अण्वस्त्रभेदी यंत्रणेवर मात करणारी अण्वस्त्रे आपल्याकडे असल्याचे रशियाने दाखवून दिले आहे. अण्वस्त्र हल्ला झालाच तर त्यापेक्षाही भयंकर प्रत्युत्तर रशिया देवू शकतो.

अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री विल्यम पेरी, माजी अर्थमंत्री पॉल क्रेग रॉबर्ट्स, अमेरिकी संसद सदस्य तुलसी गॅबार्ड अश्यांनी ओबामांच्या आयएस बाबतच्या धोरणांवर टीका करत त्यामुळे रशियाबरोबर अणुयुद्ध पेटेल असा इशारा दिला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून वेस्टबँकमध्ये इस्रायली आणि पॅलेस्टिनी जनतेत संघर्ष चालू आहे. रोज बळी जात आहेत आणि दोन्ही पार्टी एकमेकांवर आरोप करत आहेत. वेस्टबँकमधील वाढत्या हिंसाचारामुळे स्थानिक पॅलेस्टिनी लोक पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास ह्यांच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच गेले दशकभर इस्रायलबरोबर चालू असलेली शांतीचर्चा विफल ठरल्याचेही सूर आहेत. त्यामुळे गाझापट्टीसारखंच वेस्टबँकमध्येही 'हमास' ह्या दहशतवादी संघटनेची सत्ता स्थापन व्हावी अशी मागणी होत आहे.

ट्रम्प भाऊंचे वादग्रस्त वक्तव्य.
कॅलिफोर्निया शूटिंग नंतर त्यांच्या भावना कितीही खर्‍या असल्या तरी या वक्तव्याने माकडांच्या हाती कोलीत मिळून अमेरिकेत परत काही घातपात घडू शकतो.
भारतही हिट लिस्ट वर आहेच.

मी अनु, ट्रम्प भाऊंनी मुस्लिमांना अमेरिकेत एंट्रीच देता कामा नये असेही वक्तव्य केलेलं कालपासून वाचतेय.

http://www.theatlantic.com/politics/archive/2015/12/donald-trumps-call-t...

http://www.bbc.com/news/world-us-canada-35035190

तेच वक्तव्य म्हणतेय
आणि ट्रम्प या विधानाच्या एक्झिक्युशन बद्दल स्वतःच थोडा गोंधळलेला असावा. आता असलेले ठेवा, नवे येत असतील तर येऊ देऊ नका इ.इ.
जे आता आहेत त्यात कोणी अपायकारक असले तर? संशयाची सुई एका धर्माकडे जाते आणि सस्पेक्ट्स म्हणून पकडले जाते हे बघून नीट प्रयत्न करुन इतर धर्मीय किंवा नागरिक प्रमुख गुन्हेगार बनवले तर?

भारताची सध्याची परराष्ट्रीय निती आता पर्यंतची सर्वात गोंधळलेली आहे. वाजपेयीचे मन साफ होते नेहरूंसारखी चूक केली ठीक आहे पण आता काय झाले? १५ वर्षापासूनची निती बदलायला?
नुसते बोलून उपयोग नाही. एका बाजूला जावड़ेकर ठामपणे पाश्चात्य देशांवर जवाबदारी देतात (जे कौतूकाचे आणि अभिमानास्पद आहे) तिथे मेनका गांधी आपल्याच देशाला कटघर्यात उभा करते. जरा तरी समन्वय ठेवा. जावडेकरांच्या वक्तव्यावर पाणी फेरण्याचा प्रकार आहे.

Pages