भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

जर तुम्ही म्हैस 2kms दूर नेऊन सोडली तर. तो घरी परतणार नाही. >>>'तो' म्हणजे रेडा असावे कारण म्हैस घरी नसताना रेडा का घरी कडमडेल, तिकडून तिकडेच जातील खंडाळ्याला...

गाईच्या पाठीवरील "सूर्य केतू तंत्रिका" सूर्यप्रकाशात जागृत होते. >>>> ही म्हणजे मिस्टर ईन्डियाच्या चष्म्यासारखी 'सोलार पावर्ड झूल' असेल , जी आपल्याला म्हशीचे दूध पिऊन मंद झाल्याने दिसत /जाणवत नाही.

आमच्या गावच्या म्हशी फॉर्वर्ड मधल्या म्हशींसारख्या ढब्बु कांदा नसल्याने त्याना दिशाज्ञान व घड्याळज्ञान दोन्ही आहे, स्मरणशक्तीही दांडगी आहे. त्यामुळे त्या रोज तिन चार किमि डोंगर चढुन चरायला भटकतात, सन्ध्याकाळी बरोबर टायमात खाली उतरतात आणि घरची वाट धरतात. त्यांचे राखणे सम्ध्याकाळी खालीच त्यांची वाट पाहात थांबतात. म्हशी आल्यावर रस्त्यावरच्या गाड्या थांबवुन त्यांना वाट करुन देणे एवढेच काम त्यांना शिल्लक असते. बाकी सगळे म्हशीच करतात.

जांभळाचा फॉर्वर्ड वाचुन लोक जांभळाची भांडी व तुकडे मिळवण्यासाठी त्याची कत्तल करत सुटले नाहीत म्हणजे झाले. तसेही शहरी लोकांना लाकडा लाकडातील फरक काय कळणार? कुठलेही लाकुड जांभुळ म्हणुन गळ्यात मारुन फसवणुकही करणारे उपटतील.

म्हैस 'आग्नेयेकडून ईशान्येकडे ' रस्ता ओलांडते तर गाय पश्चिमेकडून पूर्वेकडे.>>>>>

रस्ताच उत्तर दक्षिण असेल तर म्हैस व गाय दोघीही एकाच बाजुला अडुन राहणार का???????

दहा म्हशींना बांधून त्यांची मुले टाकून दिली तर एकही पिल्लू आईला ओळखणार नाही. >> टाकून दिली तर त्यांच्या स्वतःच्याच वजनाने त्यांचे पाय मोडतील, मग कसले ओळखतायत कुणाला? ह्या असल्या टाकाटाकीतच आमच्या धर्मा मांडवकराच्या चांदीचं एक शिंग तुटलं. आता त्या शिंगापेक्षा दुसरं शिंग सव्वादोन इंच लांब आहे.


आता त्या शिंगापेक्षा दुसरं शिंग सव्वादोन इंच लांब आहे.

हवालदाराने ते सव्वादोन यार्ड लिहिले होते. हवालदार पण म्हशीचेच दूध पीत असणार.

जर तुम्ही म्हैस 2kms दूर नेऊन सोडली तर. तो घरी परतणार नाही. पॉवर मेमरी शून्य आहे.>>आमची शांती (म्हैस) विकत आणल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी 70 km लांब राहणाऱ्या जुन्या मालकाकडे वासरासकट चालत परत गेली होती

आमची शांती (म्हैस) विकत आणल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी 70 km लांब राहणाऱ्या जुन्या मालकाकडे वासरासकट चालत परत गेली होती>> तुमच्या शांतीच्या आत गायीचाच आत्मा असणार!

ह्या कालसर्प योगामुळे त्र्यंबकेश्वर येथे एकमेकांची गिऱ्हाईके पळवण्यावरून ब्रम्हवृंदांमध्ये चक्क मारामारी झाली अशी एक बातमी वाचण्यात आली होती.

कालसर्प योगामुळे त्र्यंबकेश्वर येथे एकमेकांची गिऱ्हाईके पळवण्यावरून ब्रम्हवृंदांमध्ये चक्क मारामारी झाली अशी एक बातमी वाचण्यात आली होती.
>>> Lol
हा तर भ्रम्मवृंद !!!

*शास्त्र असे सांगते --
आडवे पडून वाचन करू नये यामागील शास्त्रीय मिमांसा काय ?*
*पाठीचा कणा जमिनीला समांतर ठेवून वाचन तर करू नयेच, पण पोहणे व झोपणे याखेरीज इतर कोणतेही कर्म, विशेषतः बौध्दिक कर्म यत्किंचितही करू नये अशी पूर्वापार समजून असून ती पूर्णतया शास्त्रीय आहे. फक्त मानव हा एकच प्राणी असा आहे की, ज्याचा पाठीचा कणा जमिनीशी काटकोन करून असतो. इतर सर्व प्राण्यांचा कणा जमिनीशी समांतर वा ४५ पेक्षा कमी अंशाचा कोन असतो. त्यामुळे मानवाखेरीज इतर सर्व प्राण्यांना बुध्दिची देणगी मिळू शकत नाही.*

*पाठीच्या कण्याचा जमिनीशी कोन जितका अधिक, (पण ९० पेक्षा कमी) तितका त्यात हुशारीचा अंश अधिक असतो. उदाहरणार्थ, पायावर उभे राहणारे माकड, चांगल्या जातीचे कुत्रे, पेंग्विन हे प्राणी इतर प्राण्यांपेक्षा अधिक बुध्दिमान असल्याचे दिसून येतात. त्यामागे वैज्ञानिक कारण म्हणजे वैश्विक शक्तीचे ग्रहण करणारा अॅंटिना म्हणजे पाठीचा कणा होय. पाठीच्या कण्याच्या टोकाशी "मेडूला ऑबलाॅंगेटा" हे इंद्रिय असून त्यातून वैश्विक शक्तीच्या लहरी शरीरात प्रविष्ट होतात. पाठीचा कणा आकाशाकडे टोक करून ताठ राहिला, तर वैश्विक शक्ती प्रचंड प्रमाणात शरीरात प्रविष्ट होऊन मानवाच्या ठायी उत्साह, आरोग्य, ओज, बुध्दी, स्फुर्ती इत्यादी गोष्टी विपुल प्रमाणात प्रविष्ट होतात. उलट आडवे पडून वाचन केल्यास मेंदूचा कॅमेराही आडवा असल्यामुळे वैश्विक लहरी मेडूलामधून चांगल्या प्रकारे प्रविष्ट होऊ शकत नाहीत. ज्या प्रविष्ट होतात, त्यांचे प्रक्षेपण त्याच स्थितीत म्हणजे आडवे पडूनच होत असते. म्हणून आडवे पडून आभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला डेस्कवर आडवे डोके ठेवण्याची प्रवृत्ती होऊ लागते. शिवाय आडवे पडून बौध्दिक कर्म करणाऱ्या व्यक्तीचा पाठीचा कणा हळूहळू कमी संवेदनाक्षम होत जातो व त्याचे परिणाम पुढच्या पिढीवर उमटतात.*

*आडवे पडून अभ्यास करणाऱ्या व्यक्तीची संतती फारशी तल्लख निघत नाही. यासाठी आडवे पडून अध्ययन न करण्याविषयीचा शास्त्रदंडक पूर्वापार पध्दतीने चालत आला आहे.*

*संदर्भ : वेदवाणी प्रकाशन.*

पाठीचा कणा जमिनीला समांतर ठेवून वाचन तर करू नयेच, पण पोहणे व झोपणे याखेरीज इतर कोणतेही कर्म>>> हे वाक्य लिहीताना पूर्ण विचार केलेला दिसत नाही Proud

हे वाक्य लिहीताना पूर्ण विचार केलेला दिसत नाही >> वेदवाणी प्रकाशनात ते महत्त्वाचे विषय नसतील Lol

काहीतरी चुकतंय! >> Lol

Pages