लोकसभा निवडणुका २०१४

Submitted by नंदिनी on 5 March, 2014 - 00:50

आज लोकसभा २०१४ निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. ७ एप्रिलपासून निवडणुका घेतल्या जातील. आचारसंहिता लागू झालेली आहे.

निवडणुकासंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी हा धागा. या निवडणु़का नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि केजरीवाल व्यतिरीक्त अजूनही हजारो लोक लढवत असतील तेव्हा निव्वळ या तिघांनाच सर्व फुटेज देऊ नये ही विनंती.

आपपल्या शहरतील, भागातील उमेदवारांविष्यी अधिक लिहिल्यास उत्तम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊकाका, तुमच्या मतदार संघामध्ये प्रिया दत्तच्या भावामुळे पण बरीचशी नाराजी आहे असं समजलंय.

आमच्याकडे काल एक काका येऊन तमिळमध्ये बडाबडा करून गेले. बहुतेक निवडणुक प्रचाराला आले असावेत अंदाज.

कुठल्याही फॅमिलीला सगळेच पक्ष (मुख्यत्वे काँग्रेसने पायंडा पाडला) का सारखे तिकिट देतात हा प्रश्न मला खूप वर्षांपासून पडलेला आहे.

हे म्हणजे सरकारी बँकेत असलेला नवरा मेला की बायकोला किंवा मुला/मुलीला नौकरी मिळाल्यासारखे आहे. निदान ते समजण्यासारखे आहे. (नौकरी देणे) पण तिकिट?

भाऊ, तस झाल तर उत्तमच! प्रिया दत्त पडून पुनम महाजन आल्या तर आनंदच आहे!प्रिया दत्त यांच भरीव काम नाहीच फक्त दत्त घराण्याची पूर्वपुण्याई. सेना भाजप आरपीआय महायुतीने नेटाने प्रचार केला तर विजय अशक्य नक्कीच नाही.

ठाकरे आणि दत्त कुटुंबियांचे संबंध चांगले राहिले आहेत. मात्र आता बाळासाहेब नाहीत आणि सुनील दत्तही नाहीत.बदलत्या स्थितीत सेना दत्त यांना मदत करेल असे वाटत नाही.तसे तर ठाकरे-महाजन संबंध पण चांगलेच राहिले आहेत की.

पुण्यातून कॉंग्रेसने विश्वजीत कदमांना तिकीट दिलेय.कॉंग्रेसचे मंत्री पतंगराव कदमांचे ते पुत्र आणि युवक कॉंग्रेसचे नेते ही त्यांची ओळख.सांगलीतला हा उमेदवार पुणेकर कसे स्वीकारतील हे बघावे लागेल. सुरेश कलमाडीनी आपल्या पत्नीला किंवा एखाद्या समर्थकाला तिकीट देण्यासाठी प्रयत्न केले मात्र यशस्वी झाले नाहीत . मनसेकडून पायगुडे आहेत तर भाजपचा उमेदवार अजून जाहीर झाला नाही. शिरोळे आणि बापट यांच्यात चुरस आहे.पुण्यात भाजपला वातावरण अनुकूल आहे.
मावळमध्ये राष्ट्रवादीने सेनेतून उमेदवार आयात केला आहे. श्रीरंग बारणे (शिवसेना), लक्ष्मण जगताप (शेकाप), राहुल नार्वेकर (राष्ट्रवादी) अशी लढत होईल. जगतापांच्या मागे अर्धी राष्ट्रवादी संघटना जाइल. बारणे आणि जगताप यांच्यात फाईट होवून बारणेना फायदा होईल अशी शक्यता आहे.

लक्ष्मण जगताप - राष्ट्रवादी सोडली का? कधी? एकुण राष्ट्रवादीला पिंप्री-चिंचवड मध्ये हा दुसरा धक्का दिसतोय. बरं आहे म्हणा.

<<...कुठल्याही फॅमिलीला सगळेच पक्ष (मुख्यत्वे काँग्रेसने पायंडा पाडला) का सारखे तिकिट देतात..>> भावनिक आवाहनाला आपल्याकडे अवास्तव महत्व असतं , हें नेमकं काँग्रेसने प्रथम हेरलं, एवढंच ! Wink
<<... प्रिया दत्तच्या भावामुळे पण बरीचशी नाराजी आहे असं समजलंय >> असेलही . पण निवडणूकीच्या संदर्भात तरी त्या नाराजीमुळे फारसा फरक पडेल असं नाही वाटत. 'मुस्लीम व्होट बँक'ने काँग्रेसशीं काडीमोड घेतला नसला तरीही ती बँक आतां पूर्वीसारखी कॉग्रेसची बटीक राहीलेली नाहीं, हें कॉग्रेसही जाणून आहे. म्हणूनच त्यांच्या खर्‍या- खोट्या अडचणींत त्याना मदतीसाठी विश्वासार्ह कोण वाटतं, यावरच व्होटींग पॅटर्न ठरण्याची दाट शक्यता आहे. या निकषावर प्रिया दत्त यांचा आलेख गेल्या निवडणूकीनंतर घसरला असण्याचीच निदान लक्षणं तरी दिसताहेत. पण अधिक विश्वासार्ह पर्यायच नसेल, तर मात्र प्रिया दत्त व काँग्रेसला या मतदारसंघात मुस्लीम व्होटसचा आयताच लाभ होणार, हें निश्चित !

सांगलीतला हा उमेदवार पुणेकर कसे स्वीकारतील हे बघावे लागेल >> अविनाश भोसलेंची मदत होइलच. विश्वजीतचे पुण्यात फारसे काही काम आहे असं वाटत नाही. कात्रज भागात काही असेल तर आणि कोथरूडमध्ये त्याच्या माजी नगरसेवक काकांमुळे (सुबराव कदम) त्याला मतं मिळू शकतील. पण पुण्यातून काँग्रेसला स्थानिक उमेदवार मिळू नये हे काही कळाले नाही.

कुठल्याही फॅमिलीला सगळेच पक्ष (मुख्यत्वे काँग्रेसने पायंडा पाडला) का सारखे तिकिट देतात हा प्रश्न मला खूप वर्षांपासून पडलेला आहे. >> केदार, सगळेच नेते आपल्या कुटुंबातच खासदारकी/आमदारकी कशी राहिल हे बघत असतात. पेन्शन प्लॅनसारखी त्यांनी सोय करून ठेवलेली असते. कारण एकदा का सत्ता घरातून बाहेर गेली तर नंतर कोणि जास्त विचारत नाही हे त्यांना माहिती असतं (शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार साबिर शेख हे एक उदाहरण).
आई-वडिलांनी चांगलं काम केलं असेल तर ती पुण्याई असतीच. कार्यकर्ते आणि इतर सेट-अप (मुख्यतः आर्थिक) तयार असतो त्यामुळं पक्षपातळीवर फार जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. शिवाय लहान असल्यापासूनच पक्षाच्या हायकमांडची चांगली ओळख असते.

केदार, नुकतेच राष्ट्रवादीचे आझम पानसरे कॉंग्रेस मध्ये गेले आहेत. गेल्या वेळेस (२००९) मावळमधून पानसरे विरुद्ध सेनेचे बाबर अश्या लढाईत स्वपक्षीयांनी (लक्ष्मण जगताप,लांडे वगैरे ) त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न केले त्याचे उत्ते काढण्यासाठी ते यंदा सेनेच्या बारणेना मदत करतील असे ते यापूर्वी पण म्हणाले होते. दुसरीकडे जगताप अपक्ष आमदार असले तरी राष्ट्रवादीचे खास करून अजित दादांचे समर्थक मानले जात. त्यांचे जवळ पास ३० समर्थक नगरसेवक राष्ट्रवादीत आहेत.अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, मावळ मध्ये शेतकर्यांवर गोळीबार, सिंचानात्ला भ्रष्टाचार यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध मोठी नाराजी आहे म्हणून ते शेकाप कडून लढणार आहेत म्हणे. राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि मते जगताप आणि नार्वेकर ( पक्षाचे अधिकृत उमेदवार) यांच्यात विभागले जाणार हे निश्चित.

आत्ताशी कुठे कोण उभे रहाणार ते निश्चित होत आहे... अजून अर्ज दाखल करणे सुरु केलेले नाही.. ते होई पर्यंत नक्की कोण कुठून उभे राहणार हे कळणारच नाही... भरपूर उलथापालथ होऊ शकते..

आम्हाला आमच्या मार्केटींगच्या प्रोफ. नी marketing strategy and advertising बारीक लक्ष देऊन बघायला सांगितलं आहे, आणि तेही इथे ऑस्ट्रेलियात.

प्रोफ. ऑस्ट्रेलियन आहे हे विशेष.

पिल्या तुमचा प्रोफ हुशार आहे.. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकीकडे तुम्हाला लक्ष द्यायला सांगितले आहे म्हणजे.. प्रचंड प्रमाणात पैश्याची उलाढाल आणि जोरदार मार्केटींग.. त्यात यंदा ऑनलाईन मार्केटींग पण जोरात होते आहे..

प्रोफ. ऑस्ट्रेलियन आहे हे विशेष.
अहो जगातल्या सगळ्यांनाच भारतातला पैसा हवा आहे. त्यातून एका मुख्य पक्षाच्या नेत्याने परकीयांना पैसे देऊन प्रचार करायला बोलावले म्हणजे सगळ्याच परकीयांना भारतातील पैसे मिळतील अशी आशा वाटणे साहाजिकच आहे.

भारतभर, पक्षाच्या प्रचारास वेळ मिळावा म्हणून अर्थ मंत्री पी. चिदम्बरम यांना तिकीट देण्यात आलेले नाही. - बातमी

असच असेल तर राहुलला पण तिकीट देवू नका म्हणजे त्याला सुद्धा भारतभर प्रचार करण्यास वेळ मिळेल.

आणखी एक. चिदम्बरम मोदीच्या आर्थिक धोरणाविरुद्ध जोरदार प्रचार करणार. नक्कीच इंग्लिश मध्ये असणार आणि तो कळणार कोणाला.

सांगलीत काय परिस्थिती आहे? भाजपाचा उमेदवार की ह्यावेळी पण बाहेरून आयात? संजयकाकाला मिळणार का तिकीट?

कि वोट फॉर मोदी साठी वर्गणी ?
वर्गणी असली तर बिघडले कुठे? पैशाची गरज असतेच हो निवडणुकांमधे. आता एव्हढे पैसे सहसा कुणि स्वतःच्या खिशातून देत नाही. (तसे खरा राजकारणी, उद्योगपति स्वतःचे पैसे न वापरता लोकांच्या पैशातूनच सर्व करतात)

मग लोक ज्याच्यावर विश्वास ठेवून (किंवा धाकदपटशाला बळी पडून) एव्हढे पैसे त्याला देतील तो त्याच मार्गाने मते पण मिळवू शकेल.
कुठल्याहि लोकशाहीतल्या निवडणुकांचा अभ्यास करा - जसे इंजिनियर, डॉक्टर, प्रोग्रामर सगळी कडे एकच शास्त्रीय तत्व वापरतात तसेच राजकारणीहि.

मतदान जवळ येतेय तसे राज्यात नेत्यांमध्ये खास करून राष्ट्र्वादिच्या नेत्यांमध्ये बेताल वक्तव्ये करायची चढाओढ लागली आहे. शरद पवारांनी मुंबईमध्ये एके ठिकाणी लोकना सल्ला दिलाय कि बोटाची शाई पुसून दोन वेळा मतदान करा (१७अप्रिलला गावाकडे आणि २४ एप्रिलला मुंबईमध्ये). पक्षाची अशी गुपिते जाहीरपणे सांगताना कॅमेरा चालू असल्याचे बहुतेक साहेब भान विसरले .हे लोक बोगस मतदान करूनच जिंकत आलेत कि काय?निवडणूक आयोग काय करतेय बघावे लागेल. मागे पवारसाहेब आम्ही शिव्या देण्यात पी एच डी केलीय असे म्हणाले होते तशीच पी एच डी या लोकांनी बोगस वोटिंग मध्ये पण केली असावी. अजितदादा तर काय महान आहेत. जितेंद्र आव्हाड मुंब्र्याम्ध्ये पोलिसांना शिव्या घालून विशिष्ट जातीच्या चोरांना वाचवू पाहतात.अजित पवार, आव्हाड, भास्कर जाधव, शरद पवार, नवाब मलिक हे सगळे निवडणुका आल्यावर ताळतंत्र सोडून बसलेत असे दिसतेय.

सगळे निवडणुका आल्यावर ताळतंत्र सोडून बसलेत असे दिसतेय.
सगळ्या जगातले राजकारणी तसेच हो. १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेणारे लोक स्पर्धा सुरु झाल्यावर अंगचोरपणा करतील का जीव तोडून धावतील?
मग निवडून येणे हेच ज्यांचे एकमेव ध्येय ते तरी दुसरे काय करणार?

ते "जण्टेची सेवा" वगैरे म्हणतात ते खोटे हो. जनतेची सेवा जनतेलाच करायला पाहिजे. या लोकांना जेव्हढे दूर ठेवाल तेव्हढे बरे!

आम भारतीयाची मानसिकता व काही पक्षांची वैचारीक बैठक लक्षात घेता लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच का ठरणार याबाबत काही वैयक्तीक मते खालीलप्रमाणे (काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून यावा अशी इच्छा नसली तरीही तसे होईल असे वाटत मात्र आहे).

१. भारतीयांना 'कोण्या दुष्टाला अद्दल घडावी' असे फार वाटत असते. ह्याला कारणीभूत आपल्याकडच्या पौराणिक कथा आहेत. हे मान्य झाले तर खरे तर काँग्रेसऐवजी भाजप निवडून आलेले पाहायला त्यांना आवडेल, पण विधानसभांमध्ये भाजप निवडून आल्यामुळे कुठेतरी मनात आता तो दुष्ट उगाचच भाजप ठरलेला आहे. आता ह्या नव्याच दुष्टाला अद्दल घडावी असे वाटणार्‍या भाबड्यांची संख्या एप्रिलपर्यंत वाढत जाईल.

२. अरविंद केजरीवालांचे जे काही नाट्य झाले ते दिल्लीऐवजी इतर कोठेही घडले असते तर त्याचा इतका प्रभाव पडला नसता. झाले असे की 'फ्रॉम नोव्हेअर' केजरीवाल दोन बड्या पक्षांसमोर दणदणीत यश मिळवून पुढे आले. तेही नेमके राजधानीतच! शीला दीक्षितांचे साम्राज्य केजरीवालांमुळे संपुष्टात आले. काँग्रेसचा बालेकिल्ला केजरीवालांमुळे हादरला. ह्या सर्वामुळे काँग्रेसला 'सर्व बाजूंनीच' आता दणके बसणार हे आम भारतीयाला मान्य झाले. खरे तर 'आप' आणि 'भाजप' हेही एकमेकांचे शत्रूच होते, पण आम भारतीयांसाठी कोठेतरी त्यांच्यातील 'कोंग्रेसचे विरोधक' हा समान धागाच महत्वाचा राहिला. ह्याच केजरीवालांचे समीकरण सरकारस्थापनेपासूनच त्रांगडे झाले आणि केवळ काही महिन्यात कारभार आटोपलाही. आम माणसाने दाखवलेला विश्वास धुळीस मिळाला. हे सर्व घडतानाच 'काँग्रेसशिवाय स्थैर्य कुठे कोणाला देता येते' ही भावना रुजली, रुजू लागली. ह्या भावनेतूनच भाजपचाही बळी जाणार. मात्र भाजपचा बळी कधी जाणार? तर दिल्ली विधानसभेच्या पुढच्या निवडणुकीत नाही, भाजपचा बळी जाणार लोकसभा निवडणुकांमध्ये! तेही, राजधानीतच विरोधकांची बेअब्रू झाल्यामुळे हा बळी राष्ट्रीय पातळीवरही जाऊ शकेल.

३. सत्तेपासून अनेक वर्षे दूर असलेल्या भाजपसारख्या पक्षांना लहानसहान यशांची धुंदीही इतकी चढते की ते सार्वकालीन जेत्यासारखे वागू लागतात व नंतर बेतालही होतात. ह्या प्रक्रियेत त्यांचा पाय घसरतो आणि त्यांचे नेते वादग्रस्त वर्तणूक करतात, मुक्ताफळे उधळतात, त्यांच्यातील अंतर्गत हेवेदावे पुढे येतात. काँग्रेसवर हे लोक अश्या वेळी हलक्या दर्जाची टीका करतात. पुलंच्या भाषेत अनेक वर्षे म्हैस न पाहिलेल्या रेड्याला म्हैस दिसल्यावर तो जसा आवाज काढेल तसे ह्या लोकांचे वर्तन होऊ लागते. जेमतेम विधानसभेत मिळालेल्या यशाची धुंद त्यांना दिवास्वप्ने पाडू लागते. नेमके ह्याचवेळी आत्मपरीक्षण करणा काँग्रेस अधिक परिपक्वता दाखवत आहे. आठवून पाहा: टीव्हीवरील भाजपच्या जाहिराती ह्या काँग्रेसची 'चीप' खिल्ली उडवल्यासारख्या आहेत (बिनाकॅप्टनकी टीम वगैरे) तर काँग्रेसने एक छान ट्यून वापरली आहे जी सहज ओठांवर राहील (भारतके मजबूत हाथ) आणि इतरांवर टीका न करता फक्त आपण काय चांगले करू इच्छित आहोत ते सांगितलेले आहे. ह्याचा कॅस्केडिंग इफेक्ट असा होईल की ऐन मतदानाच्या वेळी सामान्य माणसाच्या मते काँग्रेस हा एक स्थिर आधार देणारा पक्ष ठरलेला असेल तर भाजप हा एक विदुषक! तसेही, मुरलेल्या काँग्रेसजनांच्या पॉलिटिकल गेमा समजण्यापासून बाकीचे फारच दूर आहेत म्हणा!

४. काँग्रेसशी कोणताही पक्ष युती करू शकतो पण भाजपचे तसे नाही हे आम भारतीयाच्या मनात घट्ट बसलेले आहे. आपले मत वाया जाऊ नये म्हणूनही माणूस काँग्रेस किंवा त्याच्याशी युती करू शकणार्‍या पक्षाला मत देतो.

५. एक महत्वाची बाब प्रचाराच्या भरात आम माणसाच्या लक्षात फारशी येत नाही. सत्तेत नसल्यामुळे भाजपसारख्या पक्षांचा प्रचार हा बरेचदा व्यक्तीकेंद्रीत (मोदी ह्या नावाचे वलय) असतो तर सत्तेत असल्यामुळे काँग्रेसचा प्रचार हा बर्‍यापैकी इश्यूबेस्ड असतो (जसे धर्मनिरपेक्षता, साक्षरता वगैरे). एक 'अमिताभ बच्चनीय' स्वरुपाची 'सूडेच्छा' म्हणून सुरुवातीला मोदी (किंवा त्या त्या काळी वाजपेयी, अडवानी) हे हिरो ठरत असले तरी प्रचाराच्या एखाद्या टप्प्यात त्यांचे वलय एखाद्या क्षुल्लक कारणाने अचानक घटते आणि पुन्हा 'काँग्रेसचे बरे बुवा आपले' ह्याचे वारे वाहू लागतात. प्रचार जवळपास पूर्णत" व्यक्तीवलयाधिष्ठित असल्याने भाजपसारख्या पक्षांना सेन्सिटिव्हिटीवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवूनही ऐनवेळी सावरता येत नाही तर काँग्रेसला विशेष काहीही न करता आम माणसाचे मन जिंकता येते. बघा: भाजपच्या सर्व जाहिराती 'इस बार मोदी सरकार' म्हणत आहेत पण काँग्रेसच्या जाहिरातीत 'राहुल सरकार' किंवा 'सोनिया सरकार' हा घटक दिसत नाही.

अनेक सूक्ष्म घटक आहेतच. पण सत्तेचीसुद्धा सवय असावी लागते. जशी ती शरद पवारांना आहे तशी ठाकरे बंधूंना नाही. त्याचप्रमाणे जशी ती काँग्रेसला आहे तशी भाजपला नाही.

एक गोष्ट मात्र आहे. राहुल गांधींचा बचकाना व्हॉईस टोन, संभाषणातील / संदर्भांमधील चुका, एक अपरिपक्व नेतृत्व म्हणून झालेली प्रचंड नकारात्मक जाहिरात ह्या सर्वांचा परिणाम होऊन मोदींच्या पक्षाला अधिक मते मिळणे शक्य आहे. पण ते बेनिफिट मिळवण्यासाठी मुळात भाजप नेत्यांना परिपक्वपणे वर्तन ठेवावे लागेल, इश्यूजबद्दल बोलावे लागेल. आलेच तर नेहमीप्रमाणे त्रिशंकू सरकार येईल.

वैयक्तीकरीत्या तरी एकदा भाजपला बहुमत मिळावे व ते काय करू शकतात ते समजावे असे वाटत आहे हा भाग वेगळा!

-'बेफिकीर'!

बेफिकीर,

तुमचा वरील प्रतिसाद वाचला. मतं पटली नाहीत. कारण लढत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी नाहीच्चे मुळी. ती काँग्रेस विरुद्ध मोदी अशी आहे. अशीच लढत १९७१ च्या वेळेस झाली होती. ती इंदिरा गांधी विरुद्ध इतर विरोधी पक्ष अशी होती. तीत बाईंनी २/३ बहुमत मिळवलं. तेव्हा तर काँग्रेस पक्षही फुटला होता. त्यामानाने आत्ताचा भाजप बराच एकसंध आहे. हाही मोदींच्या बाजूने एक जमेचा मुद्दा आहे. अधिक माहितीसाठी : http://goo.gl/pV3W7

आ.न.,
-गा.पै.

Pages