हसत खेळत स्पोकन इंग्लिश शिकवू शकणारे स्वयंसेवक हवे आहेत!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 27 June, 2013 - 02:57

''एकसाथ नमस्तेऽऽ!'' इयत्ता पहिली व दुसरीतील ती चिटुकली मुलंमुली आम्हाला वर्गाच्या दाराबाहेर पाहूनच एकसुरात आमचे स्वागत करू बघत होती. जुनाट वाड्यात भरणार्‍या त्या शाळेतील लाकडी तुळया, पोपडे उडालेल्या भिंतींवरच्या रंगीबेरंगी कागदी पताका, तक्ते, चित्रे व फळ्यांनी सजलेल्या भिंती, बुटक्या उंचीची बाकडी यांना आम्ही न्याहाळत असतानाच वर्गातल्या मुलामुलींची लगबग सुरु झाली होती. वर्गाच्या दारात आम्ही थबकलो. त्यांच्या त्या लगबगीला, उत्साहाला आणि निरागसतेला मनात आणि कॅमेर्‍यात साठवून घेऊ लागलो. ''आम्हाला फोटू दाखवा ना!''च्या त्यांच्या गजरात शाळेपर्यंत येताना आजूबाजूच्या बकाल वातावरणाने मनावर आलेली किंचित मरगळ आपोआप झटकली जाऊ लागली. त्यांचे निरागस हसू आणि दंगा बघून आपल्या येण्याचे सार्थक झाले आणि ह्या मुलांसाठी आणखी काहीतरी केले पाहिजे हीच भावना मनावर तरंगत राहिली.

मायबोलीकर साजिरा, केदार, मो आणि मी गेल्या गुरुवारी खास वेळ काढून पुण्याच्या बुधवार पेठेत भर वेश्यावस्तीत चालविल्या जाणार्‍या व सावली सेवा ट्रस्ट तर्फे मदत केल्या जाणार्‍या नूतन समर्थ विद्यालयातील मुलांना भेटायला गेलो होतो. आपल्या संयुक्ता सुपंथ उपक्रमातून गेली दोन - तीन वर्षे आपण ह्या ना त्या प्रकारे या मुलांना शिक्षणासाठी मदत करत आहोत. या वस्तीत राहणार्‍या व व्यवसाय करणार्‍या वेश्यांच्या मुलांना या शाळेत इयत्ता सातवी पर्यंत विनामूल्य शिक्षण दिले जाते. बरीचशी मुले याच पार्श्वभूमीची असतात आणि खूप विचित्र आणि खडतर असते त्यांचे हे जगणे! आपले वडील कोण हे या मुलांना माहित नसते. आई वेश्या व्यवसायात असल्यावर त्या व्यवसायात असणारे शोषण अनेक प्रकारे ह्या मुलांच्या वाट्यालाही येते. रात्री ही मुले रस्त्यावर असतात. पहाटे तीन-चार च्या पुढे कधीतरी त्यांना घरात घेतले जाते. उपेक्षा, कुपोषण, उपासमार, व्यसने, कुसंगती, शिवीगाळ, अत्याचार, संघर्ष व असुरक्षिततेच्या दुष्टचक्रातून - तसेच वेश्याव्यवसायाच्या किंवा गँगवॉर-गुन्हेगारी जगताच्या फेर्‍यातून या मुलांना बाहेर काढायचा एकच मार्ग म्हणजे त्यांना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर, समाजात मानाने जगण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे.

नूतन समर्थ विद्यालयात मुलांना शिक्षणाबरोबरच दुपारची पोळी-भाजी आणि नाश्त्याला सरकार तर्फे दिली जाणारी खिचडी किंवा उपमा मिळतो. या मुलांच्या रात्रीच्या जेवणाची बर्‍याचदा वानवाच असते. उपासमार ही ठरलेली! सावली सेवा संस्थेकडून मुलांना शैक्षणिक साहित्य, गणवेष, स्वेटर, रेनकोट, दप्तर, इतर काही गरजेचे कपडे व वस्तू घेऊन दिल्या जातात. तसेच शाळेच्या काही शिक्षकांचे पगारही केले जातात. वर्षातून एकदा या मुलांचे स्नेहसंमेलन आयोजित करणे, त्यांना पिकनिकला घेऊन जाणे, त्यांच्या मनोरंजनासाठी जादूचे प्रयोग, पपेट शो इत्यादी कार्यक्रम हेही केले जातात. ह्या मुलांना शिक्षणात रुची वाटावी व स्वतःच्या हिमतीवर पुढे येऊन, चांगले शिक्षण घेऊन त्यांना अर्थार्जन करता यावे व समाजात मानाने जगता यावे यासाठी ही संस्था विशेष प्रयत्न घेते.

आपल्यातील काही मायबोलीकर या मुलांना आर्थिक किंवा वस्तूरुपाने मदत दर वर्षी आवर्जून करतातच! परंतु त्या शिवाय आणखी कशा प्रकारे मदत करता येईल असा आमचा विचार चालला असतानाच शाळेच्या मुख्याध्यापिकांनी व सावली संस्थेच्या भाटवडेकर बाईंनी ''मायबोलीकरांपैकी कोणी या मुलांना दर शनिवारी येऊन स्पोकन इंग्लिश (बोली इंग्लिश) शिकवू शकेल का?'' असे आम्हाला विचारले.

तर इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना दर शनिवारी शाळेत जाऊन स्पोकन इंग्लिश शिकवायचे आहे. वेळ साधारण सकाळी अकरा ते बारा अशी असेल. कधी मुलांच्या व शाळेच्या सोयीनुसार पंधरा-वीस मिनिटे अलीकडे किंवा पलीकडे. आपल्यातले अनेक मायबोलीकर शनिवारी सुट्टीवर असतात. आपल्या वेळातला मौल्यवान वेळ या मुलांसाठी काढून त्यांना स्पोकन इंग्लिश शिकवू शकतात व त्यांचा इंग्रजीतून बोलण्याचा सराव घेऊ शकतात.

शाळेने अशी विनंती करण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर एका संस्थेमार्फत या मुलांना सहा महिने स्पोकन इंग्लिश शिकविले जात होते. येणार्‍या शिक्षिका मुलांशी इंग्रजीतूनच संवाद साधत व फ्लॅश कार्ड्स, गेम्स इत्यादी माध्यमांतून मुलांना सहज, हसत-खेळत, त्यांच्या कलाकलाने इंग्रजी बोलायला शिकवित होत्या. मुलांचे इंग्रजी त्यानंतर बरेच सुधारले व त्यांच्या आत्मविश्वासातही चांगला फरक दिसून आला. त्यामुळे शाळेला या वर्षीही मुलांना स्पोकन इंग्लिश स्वयंसेवा धर्तीवर शिकविणारे शिक्षक हवे आहेत. शाळा मराठी माध्यमाची आहे. संपूर्ण शालेय वर्षात (जुलै / ऑगस्ट २०१३ ते मार्च २०१४) या मुलांना शिकवायचे आहे.

आपल्यातील कोणी मायबोलीकर जर या मुलांना स्पोकन इंग्लिश शिकवू इच्छित असतील तर कृपया ह्या बाफावर तसे कळवावे व मायबोली संपर्कातून आपला संपर्क क्रमांक, खरे नाव, आपण देऊ शकणारा वेळ इत्यादी तपशील कळवावेत. लवकरच आपल्याशी संपर्क साधला जाईल. स्पोकन इंग्लिश खेरीज आपण शालेय अभ्यासक्रमातील इतर कोणत्या विषयांबद्दल या मुलांना अनुभवी मार्गदर्शन करू इच्छित असाल तर तसेही कृपया कळवावे. आपल्यातील प्रत्येकाचा सहभाग व योगदान हे अनमोल असणार आहे! Happy

शाळेचा पत्ता : नूतन समर्थ विद्यालय, सोन्या मारुती चौक, सिटी पोस्टाजवळ, बुधवार पेठ, पुणे २.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर सुचवलेली पुस्तक देऊन पाहते. टाइम्सची पुरवणी माझ्या घरी का येत नाही? माझा मुलगा शाळेत होता तेव्हा N.I.E. स्कीमखाली वेगळी पुरवणी शाळेत मिळायची. ती विकत मिळते का?

अनया, एन आय इ स्कीम खाली मिळणार्‍या पुरवणीबद्दल कल्पना नाही गं!
तुमच्या भागातील पेपर विक्रेते / डीलर सांगू शकतील कदाचित. त्यांच्याकडे चौकशी केलीस का?

http://www.robinage.com/ अशा तर्‍हेच्या अनेक वेबसाईट्स आहेत, जिथे मुलांच्या विश्वातील कथा, कविता, विनोद, कला, साहित्य इत्यादी आहेत. अशा साहित्याची प्रिंट आऊट देखील घेता येऊ शकेल.

स्पोकन इंग्लिश क्लास घेणार्‍या या दोन ताया व त्यांच्या विद्यार्थ्यांची ही क्षणचित्रे माझ्या बहिणीने तिच्या कॅमेर्‍यात बंदिस्त केली. शाळेच्या व तायांच्या परवानगीने ती इथे टाकत आहे.

इयत्ता सातवीचा वर्ग

savali col2.jpg

इयत्ता पहिली व दुसरीचे विद्यार्थी

savali col3.jpg

Pages