हसत खेळत स्पोकन इंग्लिश शिकवू शकणारे स्वयंसेवक हवे आहेत!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 27 June, 2013 - 02:57

''एकसाथ नमस्तेऽऽ!'' इयत्ता पहिली व दुसरीतील ती चिटुकली मुलंमुली आम्हाला वर्गाच्या दाराबाहेर पाहूनच एकसुरात आमचे स्वागत करू बघत होती. जुनाट वाड्यात भरणार्‍या त्या शाळेतील लाकडी तुळया, पोपडे उडालेल्या भिंतींवरच्या रंगीबेरंगी कागदी पताका, तक्ते, चित्रे व फळ्यांनी सजलेल्या भिंती, बुटक्या उंचीची बाकडी यांना आम्ही न्याहाळत असतानाच वर्गातल्या मुलामुलींची लगबग सुरु झाली होती. वर्गाच्या दारात आम्ही थबकलो. त्यांच्या त्या लगबगीला, उत्साहाला आणि निरागसतेला मनात आणि कॅमेर्‍यात साठवून घेऊ लागलो. ''आम्हाला फोटू दाखवा ना!''च्या त्यांच्या गजरात शाळेपर्यंत येताना आजूबाजूच्या बकाल वातावरणाने मनावर आलेली किंचित मरगळ आपोआप झटकली जाऊ लागली. त्यांचे निरागस हसू आणि दंगा बघून आपल्या येण्याचे सार्थक झाले आणि ह्या मुलांसाठी आणखी काहीतरी केले पाहिजे हीच भावना मनावर तरंगत राहिली.

मायबोलीकर साजिरा, केदार, मो आणि मी गेल्या गुरुवारी खास वेळ काढून पुण्याच्या बुधवार पेठेत भर वेश्यावस्तीत चालविल्या जाणार्‍या व सावली सेवा ट्रस्ट तर्फे मदत केल्या जाणार्‍या नूतन समर्थ विद्यालयातील मुलांना भेटायला गेलो होतो. आपल्या संयुक्ता सुपंथ उपक्रमातून गेली दोन - तीन वर्षे आपण ह्या ना त्या प्रकारे या मुलांना शिक्षणासाठी मदत करत आहोत. या वस्तीत राहणार्‍या व व्यवसाय करणार्‍या वेश्यांच्या मुलांना या शाळेत इयत्ता सातवी पर्यंत विनामूल्य शिक्षण दिले जाते. बरीचशी मुले याच पार्श्वभूमीची असतात आणि खूप विचित्र आणि खडतर असते त्यांचे हे जगणे! आपले वडील कोण हे या मुलांना माहित नसते. आई वेश्या व्यवसायात असल्यावर त्या व्यवसायात असणारे शोषण अनेक प्रकारे ह्या मुलांच्या वाट्यालाही येते. रात्री ही मुले रस्त्यावर असतात. पहाटे तीन-चार च्या पुढे कधीतरी त्यांना घरात घेतले जाते. उपेक्षा, कुपोषण, उपासमार, व्यसने, कुसंगती, शिवीगाळ, अत्याचार, संघर्ष व असुरक्षिततेच्या दुष्टचक्रातून - तसेच वेश्याव्यवसायाच्या किंवा गँगवॉर-गुन्हेगारी जगताच्या फेर्‍यातून या मुलांना बाहेर काढायचा एकच मार्ग म्हणजे त्यांना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर, समाजात मानाने जगण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे.

नूतन समर्थ विद्यालयात मुलांना शिक्षणाबरोबरच दुपारची पोळी-भाजी आणि नाश्त्याला सरकार तर्फे दिली जाणारी खिचडी किंवा उपमा मिळतो. या मुलांच्या रात्रीच्या जेवणाची बर्‍याचदा वानवाच असते. उपासमार ही ठरलेली! सावली सेवा संस्थेकडून मुलांना शैक्षणिक साहित्य, गणवेष, स्वेटर, रेनकोट, दप्तर, इतर काही गरजेचे कपडे व वस्तू घेऊन दिल्या जातात. तसेच शाळेच्या काही शिक्षकांचे पगारही केले जातात. वर्षातून एकदा या मुलांचे स्नेहसंमेलन आयोजित करणे, त्यांना पिकनिकला घेऊन जाणे, त्यांच्या मनोरंजनासाठी जादूचे प्रयोग, पपेट शो इत्यादी कार्यक्रम हेही केले जातात. ह्या मुलांना शिक्षणात रुची वाटावी व स्वतःच्या हिमतीवर पुढे येऊन, चांगले शिक्षण घेऊन त्यांना अर्थार्जन करता यावे व समाजात मानाने जगता यावे यासाठी ही संस्था विशेष प्रयत्न घेते.

आपल्यातील काही मायबोलीकर या मुलांना आर्थिक किंवा वस्तूरुपाने मदत दर वर्षी आवर्जून करतातच! परंतु त्या शिवाय आणखी कशा प्रकारे मदत करता येईल असा आमचा विचार चालला असतानाच शाळेच्या मुख्याध्यापिकांनी व सावली संस्थेच्या भाटवडेकर बाईंनी ''मायबोलीकरांपैकी कोणी या मुलांना दर शनिवारी येऊन स्पोकन इंग्लिश (बोली इंग्लिश) शिकवू शकेल का?'' असे आम्हाला विचारले.

तर इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना दर शनिवारी शाळेत जाऊन स्पोकन इंग्लिश शिकवायचे आहे. वेळ साधारण सकाळी अकरा ते बारा अशी असेल. कधी मुलांच्या व शाळेच्या सोयीनुसार पंधरा-वीस मिनिटे अलीकडे किंवा पलीकडे. आपल्यातले अनेक मायबोलीकर शनिवारी सुट्टीवर असतात. आपल्या वेळातला मौल्यवान वेळ या मुलांसाठी काढून त्यांना स्पोकन इंग्लिश शिकवू शकतात व त्यांचा इंग्रजीतून बोलण्याचा सराव घेऊ शकतात.

शाळेने अशी विनंती करण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर एका संस्थेमार्फत या मुलांना सहा महिने स्पोकन इंग्लिश शिकविले जात होते. येणार्‍या शिक्षिका मुलांशी इंग्रजीतूनच संवाद साधत व फ्लॅश कार्ड्स, गेम्स इत्यादी माध्यमांतून मुलांना सहज, हसत-खेळत, त्यांच्या कलाकलाने इंग्रजी बोलायला शिकवित होत्या. मुलांचे इंग्रजी त्यानंतर बरेच सुधारले व त्यांच्या आत्मविश्वासातही चांगला फरक दिसून आला. त्यामुळे शाळेला या वर्षीही मुलांना स्पोकन इंग्लिश स्वयंसेवा धर्तीवर शिकविणारे शिक्षक हवे आहेत. शाळा मराठी माध्यमाची आहे. संपूर्ण शालेय वर्षात (जुलै / ऑगस्ट २०१३ ते मार्च २०१४) या मुलांना शिकवायचे आहे.

आपल्यातील कोणी मायबोलीकर जर या मुलांना स्पोकन इंग्लिश शिकवू इच्छित असतील तर कृपया ह्या बाफावर तसे कळवावे व मायबोली संपर्कातून आपला संपर्क क्रमांक, खरे नाव, आपण देऊ शकणारा वेळ इत्यादी तपशील कळवावेत. लवकरच आपल्याशी संपर्क साधला जाईल. स्पोकन इंग्लिश खेरीज आपण शालेय अभ्यासक्रमातील इतर कोणत्या विषयांबद्दल या मुलांना अनुभवी मार्गदर्शन करू इच्छित असाल तर तसेही कृपया कळवावे. आपल्यातील प्रत्येकाचा सहभाग व योगदान हे अनमोल असणार आहे! Happy

शाळेचा पत्ता : नूतन समर्थ विद्यालय, सोन्या मारुती चौक, सिटी पोस्टाजवळ, बुधवार पेठ, पुणे २.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीव वरखाली होत आहे.
मी पुण्यात असते तर.......
मी कशी मदत करु शकेन? :विचारात पडलेली बाहुली:

पुण्याबाहेरच्या लोकांना आपल्या जवळच अशा काही सेवाभावी संस्था आहेत का ते शोधता येईल.
माझ्यासोबतचे काही volunteer teachers अक्षरशः मी कुठे जाऊन असे काम करून शकेत ते शोधत फिरलेले आहेत.
जालावरही कोणत्या सेवाभावी संस्थांना स्वयंसेवक हवे आहेत ते कळते. (मला इथूनच कळले होते)

भरत, त्या संदर्भातच जाई. व मुग्धानन्द यांना इमेल केली आहे. शोधाल तिथे अशा संधी आहेत. Happy

वाचुनच काम किती आव्हानात्मक आहे ते कळते.>>> +१...

तुम्ही सगळे खूप छान काम करत आहत ....

मला काय करता येइल ???? मी पण लायब्ररी साठी मदत करु शकते नक्की.... मला पण यादी मध्ये घाला....

भरत ह्यानी दिलेली लिंक बघते ....

मेल वाचले. मी ,जाइ, आणु भारतीताई नक्की बोलु.
अवांतर- माझे इतर संस्थांबरोबर काम चालुच असते.
पण रेड लाईट एरिआ मधील मुले, आणि त्यासंदर्भातील काम हा मी आणि नवर्‍यासाठी नेहमीच एक near to heart विषय आहे.

हेडमास्तरांशी इतर काही विषयांसोबतच पुस्तकांबद्दलही बोललो. काही देणगीदारांनी दिलेली काही पुस्तकं आहेत आधीच, मात्र ती सारी अभ्यासाशी थोडीफार संबंधित आहेत. वाचायला दिली तर मुलं वाचत नाहीत, फाडातात, हरवतात, कूठेतरी टाकतात अशा तक्रारी. शबानासारख्या काही मुलांना आधीच वाचनाची थोडीफार गोडी आहे, मात्र सामान्यतःच या मुलांना मुळात वाचनाची गोडी लावण्यासाठी अवांतर पुस्तकं हवी आहेत. उदा. जंगलातल्या गोष्टी, राक्षसाच्या आणि जादूच्या गोष्टी, परीकथा, कॉमिक्स आणि चित्ररूप कथा इ.
'तुमच्याकडच्या पुस्तकांची यादी द्या, म्हणजे कोणती आणि कशी निवडायची, ते आमचे लोक (मायबोलीकर) ठरवतील-' असं मी हेडमास्तरांना सांगितलं आहे. या शनिवारी यादी मिळेल, ती बघून याबद्दल ठरवता येईल. इथे पुन्हा अपडेट टाकूच.

आणखी एक म्हणजे या मुलांच्या उदंड उत्साहाला, नसत्या हुडपणाला आणि एनर्जीला (क्वचित प्रसंगी दांडगाईला) योग्य मार्गाला लावण्यासाठी काही शारिरिक श्रम / खेळ / शिकवण्या आवश्यक आहेत. कराटे / मार्शल आर्टसारख्या खेळांत ते आवडीने भाग घेतील असं वाटतं. हे शिकवायला कुणी तयार असेल तर अवश्य इथे लिहा कृपया. आठवड्यातून किमान दोन दिवस एकेक तास देऊ शकणं, कमिट्मेंट असणं, देऊ करत असलेल्या वेळेबद्दल / मदतीबद्दल गंभीर असणं- या बाबी आधी लिहिल्यापर्माणेच इथंही आवश्यक आहेतच. Happy

वाचनाबाबतचा माझा अनुभव :
मुलांना पुस्तके वाचायला दिली, तर मुलांनी वाचली नाहीत.
मग निवडक मुलांना एकेक पुस्तक देऊन हे पुस्तक वाचून त्यातली गोष्ट वर्गाला सांगायची असे म्हटल्यावर मी वाचणार मी वाचणार अशी चढाओढ लागली. हे मी स्वत:हून केले नव्हते.
http://www.prathambooks.org/ यांचा एक उपक्रम होता. त्याअंतर्गत पुस्तके मिळाली होती. खूप चित्रे असलेली , प्रत्येक पानावर थोडकाच मजकूर असलेली पुस्तके. त्यातल्या गोष्टी मुलांसाठी त्यांच्या वयाच्या मानाने इंटरेस्टिंग नव्हत्या. पण त्यांना वाचनाचा आनंद मिळाला.
नववी इंग्रजी माध्यमाच्या, मराठी वाचायला तयारच नसणार्‍या मुलांकडून मी( विश्वास ठेवा) माधुरी पुरंदरेंची 'मोठ्ठी शाळा', 'हात मोडला', 'मामाच्या गावाला' वाचून घेतली. त्यांची शब्दसंपत्ती खूपच मर्यादित असल्याने त्यांच्या वयाला अनुरूप कथाही(उदा: बोक्या सातबंडे) त्यांना झेपत नाहीत असे दिसले.

धन्यवाद साजिरा इथे हे लिहिल्याबद्दल. Happy

मुलांना वाचनाची गोडी लागेपर्यंत, पुस्तकांबद्दल उत्सुकता निर्माण होईपर्यंत वेगवेगळे प्रयत्न हे करून बघावेच लागणार आहेत. त्यामुळे भरत, तुमच्या टिपांचा उपयोग होईलच!

कराटे / मार्शल आर्ट शिकवण्याविषयी : शाळेजवळचा एक हॉल ह्या वर्गासाठी उपलब्ध होऊ शकणार आहे असे सावली ट्रस्टच्या भाटवडेकर मॅडम म्हणाल्या. मुलांच्यातील ऊर्जेला, दांडगेपणाला सकारात्मक दिशा मिळण्यासाठी अशा उपक्रमाची खूप गरज आहे हे त्यांनी सांगितले.

त्यांना बॅडमिंटन सारखे खेळाचे साहित्य दिले तर चालेल का? कुणी शिकवणारे असेल तर चांगलेच आहे. एरवी पण त्यांचे ते खेळु शकतील.

साजिरा-अकु, स्वयंसेवक मिळाले तर हॉल असल्याने निदान असे खेळ घेता येतील ज्यामध्ये साहित्याची वा विशेष कौशल्याची (शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही) गरज नाही. आपण सर्वच किती खेळायचो शाळेत. हॉल मधे खेळत येतील असे खेळ शोधता येतील.

वाचनाबद्दल हाच विचार मनात आला, एकच गोष्ट मुलांना वाचायला सांगायची प्रत्येकी १-१, २-२ पाने वगैरे.

सुनिधी, अगदी सुयोग्य विचार!

हाच विचार भाटवडेकर मॅडमनेही बोलून दाखवला. शाळेत मुलांना शारीरिक व्यायाम, कसरती, खेळ इत्यादींसाठी पुरेशी जागा नाही आणि त्या वाड्याची अवस्था बघता तिथे मुलांनी दाणदाण उड्या मारल्या, पळापळी केली तर काय होईल ह्याची कल्पना करवत नाही. असो. भाटवडेकर बाईंशी जेव्हा ह्याबाबत बोलले तेव्हा त्यांनी मार्शल आर्ट प्रशिक्षणाचा विचार का सुचला त्याबद्दल बोलताना सांगितले -

१. कराटे / तायक्वोंदो / तत्सम प्रकारांनी मुलांना व्यायाम, शिस्त, मानसिक व शारीरिक एकाग्रता, कौशल्य प्राप्त करता येईल व त्याचा फायदा त्यांना पुढील आयुष्यात व शिक्षणात होईल. (मुलांना शाळेत व घरी तसा वेगळा 'व्यायाम' होत नाही. मुळात तेवढी जागाच नसते. रस्त्यावर जे काय खेळतील, पळापळी करतील किंवा घरकाम करतील तेवढेच!)

२. मुलांना मार्शल आर्टच्या शालेय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेता येईल. यलो बेल्ट, ग्रीन बेल्ट, ऑरेंज बेल्ट इत्यादींसाठी प्रयत्न करता येतील. भाटवडेकर बाईंच्या म्हणण्यानुसार मुलांमध्ये सेल्फ एस्टीम बिल्ट अप होण्यासाठी, काही साध्य करण्यासाठी याचा खूप उपयोग होईल (ज्याची खूप जरुरी आहे). मुलांनाही नवीन काही शिकत असल्याचा आनंद मिळेल.

३. मुलांमध्ये भरपूर हूडपणा आहे. त्यांची ऊर्जा सुयोग्य प्रकारे हाताळली गेली तर त्याचा त्यांना पुढच्या आयुष्यात फायदा होईल आणि अभ्यासातही या मुलांचे लक्ष लागण्यास मदत होईल.

४. या मुलांची परिस्थिती व त्यांच्याभोवतीचे वातावरण बघू जाता त्यांना आत्मसंरक्षण करणार्‍या कौशल्याची गरज आहे हे नक्की.

५. मार्शल आर्ट खेरीज खेळ, गाणी, गप्पा, गोष्टी हेही करण्याचा विचार आहेच! परंतु प्राधान्यक्रम शक्यतो मार्शल आर्ट शिकवणे / शिकणे यांवर देता येईल का, हे त्यांनी सुचविले.

ते शिकवायला शिक्षक मिळाले तर उत्तमच. त्यावेळी मुलांची (खुप दमवल्यावर) काही खाऊची सोय करायची असेल तर लिहा इथे.

थँक्स सुनिधी.

गेल्या शनिवारी साजिर्‍याने शाळेत उपलब्ध असलेल्या पुस्तकांचा स्टॉक घेतला. शाळेत भ र पू र पुस्तके आहेत असे निदर्शनाला आले. सध्या तरी ही पुस्तके कुलूपबंद आहेत. कारण मुले पुस्तके हरवतात, फाडतात, परत आणत नाहीत असे तेथील शिक्षकांचे म्हणणे आहे. बर्‍याच मुलांना वाचनाची गोडी नाही. पण काही मुलांना पुस्तके वाचायला आवडते असे लक्षात आले आहे. त्या दृष्टीने जास्तीत जास्त मुलांना वाचनाची गोडी कशी लागेल, पुस्तके व्यवस्थित कशा प्रकारे हाताळावीत हे समजेल ह्या हेतूने आता हालचाली करणार आहोत.

आतापर्यंत पुस्तक उपक्रमासाठी हात वर केलेल्या सर्व मायबोलीकरांना धन्यवाद! काही गरज भासल्यास येथे सांगूच!

सध्या मार्शल आर्ट शिकवणार्‍या शिक्षकांच्या / कोच च्या शोधात आहोत. कोणाला काही माहिती असल्यास कृपया येथेच किंवा संपर्कातून कळवा प्लीज.

मध्ये सांगितल्याप्रमाणे आता आमची बालमित्रची आयडीया चांगली सेट झाली आहे. मी माझ्या शेजारी-पाजारी, मैत्रिणींना, योगा क्लासमध्ये सगळ्यांना ‘बालमित्र द्या’ अस सांगून ठेवल आहे. बरेच पेपर जमले की शाळेत वाटून टाकते. मुलांना आपल्याला काहीतरी मिळालय ह्याचा प्रचंड आनंद होतो. मग एकमेकांचे पेपर लंपास करणे, ‘मला हा नको, तो द्या’ असा हट्ट करणे, ’दीदी, मला पुढच्या वेळेला दोन आणाल?’ अस विचारून काळजाला हात घालणे, इत्यादी प्रकार होतात.

त्यात असलेले ‘फरक ओळखा’ किंवा ‘गटात न बसणारे चित्र ओळखा’ असे सोपे प्रकारही माहिती नसतात. मग आम्ही इंग्लिश बाजूला ठेवून ते खेळतो.

बालमित्र मागण्याचा चांगला परिणाम म्हणजे अशी शाळा आहे आणि तिथे अस काही काम चालत, हे बऱ्याच जणांना माहिती झालं. त्यानंतर माझ्या दोन मैत्रिणींच्या मुली तिथे शिकवायला येऊ लागल्या!

किती छान अनया! Happy मुलांचे कुतूहल, उत्साहाने फुललेले चेहरे डोळ्यांसमोर आले. Happy

काल शाळेत गेले होते तेव्हा मायबोलीच्या सार्‍या स्वयंसेवक शिक्षक टीमचे कौतुक ऐकायला मिळाले. मुख्याध्यापिका सांगत होत्या की मुलं स्पोकन इंग्लिशच्या तासांवर खूप खुश आहेत, छान रमली आहेत. शनिवारची वाट बघत असतात. सारे स्वयंसेवक शिक्षक अगदी मनापासून शिकवतात. मुलांना वह्या दिल्या आहेत त्यात ती गृहपाठ लिहून घेतात, वगैरे वगैरे. मुलांना उत्साहाने व तयारीने शिकवणारी शिक्षक मंडळी पाहून शाळेतल्या इतर शिक्षकांचा उत्साहही वाढतो. सारे 'ताई', 'दादा' आपल्या कामातून खास वेळ काढून येतात ह्याचे त्यांना कौतुक वाटते.

मुख्याध्यापिकांशी मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून काय करता येईल ह्याबद्दल थोडे बोलणे झाले. शाळेच्या संग्रहात असलेली काही पुस्तके मुलांना आठवड्यातून थोडा वेळ शाळेतच वाचायला देता येतील का, त्यांना पुस्तकांची कशी काळजी घ्यायची - त्यांना कसे हाताळायचे याबद्दल मार्गदर्शन करता येईल का, आणि हळूहळू जी मुलं पुस्तकं नीट वापरतील त्यांना घरी वाचायला पुस्तकं देता येतील का, असे सुचविले - विचारले. आपले स्वयंसेवक शिक्षकही त्यांना स्टोरी बुक्स मधून एखादी छोटीशी गोष्ट तासाच्या शेवटी ५-१० मिनिटे वाचून दाखवू शकतात.
असो. बघूयात काही करता येते का ते! Happy

अनया, अशी काही मनापासून योजलेली चांगली गोष्ट, मग ती छोटी मोठी कशीही असो, प्रत्यक्षात उतरली की किती छान वाटतं ना?

सुकी आश्वासनं न देता, मनापासून इन्व्हॉल्व होऊन हे सगळं करुन दाखवताय ह्यातच तुमचे शब्द किती पक्के आहेत ते दिसून येतंय Happy

हा सगळा अनुभव एकाच वेळी खूप एक्सायटींग आणि खूप निराश करणारा असतो. मुलांना शिकवताना मजा येते, पण 'आपण खरच नीट शिकवतोय का?' अशी भीतीही वाटते. त्यांच्या एवढ्या आभाळाएवढ्या प्रश्नांना ह्या एक तासाने काय ठिगळ लागणार? अशी खंत वाटते.

मुलांना शिकवताना मजा येते, पण 'आपण खरच नीट शिकवतोय का?' अशी भीतीही वाटते. >>> म्हणजेच तुम्ही मनापासून हे करताय. पाट्या टाकत नाहियात Happy

माझ्या वर्गातील एक मुलगी दरवेळेला मी बालमित्र दिला की, ' दिदी मला इंग्लीश पेपर आणा' अस सांगते. तिच इंग्लीश बाकीच्यांपे़क्शा बर आहे, पण टाइम्स वाचण्याइतक नक्कीच नाहीये. कुठ्ल्या इंग्लीश पेपरची मुलांसाठीची पुरवणी असते का? प्लीज सांगा.

त्यांना वाचायची सवय लागावी, म्हणून मी काही मुलांना पुढच्या वेळी बालमित्र मधली गोष्ट वर्गात सांगायला लावणार आहे. पाहुया.

बाकी वर्ग छान चालला आहे. सध्या उपस्थिती बरी आहे. आधी आजिबात न बोलणारी काही मुल-मुली आता ओपन होतात. लिहायचा-बोलायचा प्रयत्न करतात. तेव्हा धावपळ करत गेल्याच चीज झाल्यासारख वाटत.

कुठ्ल्या इंग्लीश पेपरची मुलांसाठीची पुरवणी असते
का? >>>> टाइम्स ऑफ़ इंडियाची असत अशीे पुरवणीे अनया

अनया |
वर नंदिनी,जाई. नीं सांगितलेच आहे,पण चम्पक,टिंकल,किंवा फेयरी टेल्सची नवनीतची छोटी पुस्तके ह्या वयोगटाला योग्य आहेत.

Pages