मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टवणेसर, एकदम भारी भारी पुस्तकं समोर ठेवताहात. हे पण आवडलं.

सध्या तुमच्यामुळेच हा बाफ सुरू आहे असं म्हणण्याजोगी परिस्थिती आहे.

केसवानंद भारती खटल्यावर टेहेमतां अंध्यारुजींना (Tehmtan R. Andhyarujina) यांनी लिहिलेले The Kesavananda Bharati Case: The Untold Story of Struggle for Supremacy by Supreme Court and Parliament हे पुस्तक वाचनीय आहे. सध्या आउट ऑफ प्रिंट आहे. माझी कॉपी गहाळ आहे

उत्तेजन देणाऱ्या सर्वांचे आभार. या धाग्याचा मलाच खरे फायदा होतो कारण त्यामुळे वाचलेल्या पुस्तकांचे टिपण राहते.

@गजानन, थोरोबद्दल paul theroux म्हणतो की जरी हेन्री डेव्हिड थोरो वालदेनच्या (walden) काठावर लोकांपासून दूर एकांतात राहिला असला तरी हा एकाडेपणा खोटा आहे (वा अप्रामाणिक). कारण तो स्वतःच्या घरापासून काही मैलावरच होता, त्याला धान्याची रसद त्याच्या आईकडून पुरवली जात होती वगैरे वगैरे. पूर्ण उतारा मिळाला तर इथे टंकतो.

The Man Who Remade India: A Biography of P. V. Narasimha Rao - विनय सितपती
(भारतात Half-Lion: How P V Narasimha Rao Transformed India या नावाने प्रकाशित)

शेखर गुप्तांच्या एका लेखात(१) या पुस्तकाबद्दलचा संदर्भ वाचनात आल्यापासून पुस्तक वाचण्याची उत्सुकता होती. पुस्तक नक्कीच निराश करत नाही. हे पुस्तक भूतपूर्व पंतप्रधान नरसिंह रावांचे चरित्र म्हणता येणार नाही. चरित्रात संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा अपेक्षित असतो. खेळाडुंच्या आयुष्यावरील पुस्तकात वय वर्षे १० ते ३०, फार तर फार ४०पर्यंतची वर्षे सर्वात तपशिलात असतात. या उलट राजकारणी बहरतात पन्नाशीनंतर. सामान्यांच्या आयुष्यातले कुठलेही टप्पे घेतले तरी त्यात अपवादात्मक काही नसते आणि म्हणून त्यांच्यावर पुस्तकेही निघत नाहीत.
या पुस्तकाच्या पहिल्या ३०-४० पानातच नरसिंह रावांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या ५० वर्षांचा आढावा घेतला आहे. पुस्तक आहे खरे तर त्यांच्या पंतप्रधान कारकिर्दीच्या ५ वर्षांवर.
तेलंगणातल्या एका खेड्यात जन्मलेल्या नरसिंह रावांची शैक्षणिक कामगिरी लक्षणीय होती. जवळजवळ सर्व परिक्षात ते प्रथम आले आहेत. महाविद्यालयीन शिक्षणानिमित्त त्यांचे नागपूर व पुणे येथे वास्तव्य झाले. त्यामुळे त्यांचे मराठी उत्तम होते. तेलंगणात निजामशाहीत वाढल्यामुळे तेलुगु, उर्दू, हिंदी, मराठी या भाषा तसेच इंग्रजी आणि संस्कृत या भाषा त्यांना शाळेत असतानाच उत्तम येऊ लागल्या होत्या. या माणसाची भाषा शिकण्याची भूक इतकी होती की दिल्लीत केंद्रीय मंत्री असताना ते स्पॅनिश सेंटरमध्ये जाऊन स्पॅनिश शिकले. तंत्रज्ञानाची आवड असल्याने पर्सनल कम्प्युटर अगदी नवीन असताना ८०च्या दशकात आपल्या मुलाकडून एक त्यांनी अमेरिकेतून मागवला होता व त्यावर ते कोबोल तसेच युनिक्स शेल स्क्रिप्टींग करू शकत. जवळपास ८८/८९ पासून ते काँप्युटरवर इ-डायरी लिहित होते.
इंदिरा गांधींनी आंध्र प्रदेशाचा मुख्यमंत्री केले कारण नरसिंह रावांचा स्वतःचा कुठलाही गट नव्हता, त्यांच्या विरोधातही कोणी नव्हते. थोडक्यात हा माणूस आपण सांगू तसा वागू शकेल व आपल्याला एकनिष्ठ राहील या विचाराने त्यांना मुख्यमंत्री केलेले. स्वतः नरसिंह रावांनीच त्यांना का मुख्यमंत्री केले, काय अपेक्षा होत्या व त्या अपेक्षापुर्तीत ते कुठे यशस्वी ठरले व कुठे अयशस्वी याचे विवेचन केले आहे.
हा मनुष्य विचाराने पक्का समाजवादी अर्थव्यवस्थेवर, नेहरुंच्या मार्गावर विश्वास असलेला. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी प्रामाणिकपणे जमीन सुधारणा कायदा राबवला ज्यात त्यांची स्वतःची १२००पेक्षा अधिक एकर जमीन गावातील सर्वात विभागली गेली. पण त्यामुळे आपल्या पक्षातीलच जमिनदारांचे ते एक नंबरचे शत्रु झाले. त्यांना मुख्यमंत्री पदावरून पदच्च्युत केल्यावर ते पहिल्या राजकीय विजनवासात गेले. त्यानंतर वयाच्य पन्नाशीनंतर मुलीच्या बाळंतपणाच्या निमित्ताने त्यांचा पहिला परदेश प्रवास घडला - अमेरिका न्युयॉर्क येथे. तिथून परतलेल्या नरसिंह रावांना आर्थिक प्रगती व त्यामुळे होणार्‍या सर्वांच्या जीवनमानातला उद्धार प्रत्यक्ष अनुभवता आला. त्या पहिल्या भेटीपासून त्यांनी परदेशातील विश्वविद्यालयातील इन्डोलॉजिस्टांबरोबर (भारत-भारतीय उपखंडाचे अभ्यासक) संबंध जुळवले.
इथून पुढचा प्रवास पुस्तकातच वाचण्यासारखा आहे.
पुस्तकाची विभागणी वार्षिक क्रमाने न करता त्यांच्या कारकिर्दीचा विविध राजकीय-सामाजिक बाबींवर काय प्रभाव पडला यानुसार विभागले आहे. त्यांच्या केंद्रीय मंत्री असण्याच्या ८०च्या दशकाचा काळावर एक प्रकरण आहे. तिथून पुढे त्यांचे पंतप्रधान होण्यावर एक, अर्थव्यवस्थेला गर्तेतून बाहेर काढण्यावर एक, अर्थव्यवस्थेला गती देण्यावर, सामाजिक (वेल्फेअर) योजना, पक्षांतर्गत बंडाळ्या, बाबरी मशिद प्रकरण, परराष्ट्र निती, अणुशक्ति/अण्वस्त्रांसंदर्भातले काम, सोनिया गांधींबरोबरचे संबंध व अखेर या विषयांवर स्वतंत्र प्रकरणे आहेत. त्यामुळे काही प्रसंग पुन्हा पुन्हा येतात. पण त्यांचे संदर्भ आवश्यक असल्याने ते खटकत नाहीत.

नरसिंह राव हे रिआल-पॉलिटिकचे बादशाह होते. मॅचिआवली, चाणक्यनिती हा माणूस शब्दशः जगला. अर्जुन सिंग, शरद पवार यांसारखे सक्षम नेते पक्षात असताना त्यांनी अल्पमतातले सरकार साम-दाम-दंड-भेद सर्व वापरून पाच वर्षे टिकवले व देशाला प्रगतिपथावर आणले हे पुस्तकातून प्रकर्षाने मांडले आहे. बाबरी मशिदीच्या वेळच्या त्यांच्या वर्तणुकीवर अनेक वादविवाद-वावड्या आहेत. या पुस्तकात लेखक त्याचा दोष नरसिंह रावांनी कल्याणसिंग व अडवाणींच्या शब्दावर ठेवलेल्या विश्वासावर लादतो. काँग्रेस पक्षाने नरसिंह रावांना याबाबत दोषी ठरवले आहे. मणिशंकर अय्यरांनी death is not a necessary precondition for rigor mortis to set in या विधानात४ या भुमिकेस स्पष्ट केले आहे.

अण्वस्त्रसज्जते संदर्भात त्यांनी केलेल्या पायाभरणीचे श्रेय क्वचितच नरसिंह रावांना दिले जाते. त्याचे शक्य तितक्या तपशिलात वर्णन पुस्तकात आहे जे अत्यंत वाचनीय आहे. वाजपेयींनी अण्वस्त्र चाचण्या केल्यावर पी वी नरसिंह रावांनी सर्व तयारी केली होती मी फक्त बटण दाबले हे जे वक्तव्य केले त्यामागचे संदर्भ पुढे येतात. नरसिंह राव पंतप्रधान असताना डिसेंबर १९९५मध्ये न्युयॉर्क टाइम्समध्ये भारत अणुचाचणी करण्यासाठी सज्जता करत आहे ही बातमी आली. क्लिंटन यांनी नरसिंह रावांना फोन केला, सगळीकडून दबाव आल्याने भारताने असे काही नाहिये अशी घोषणा केली हे जगजाहीर आहे. यामागे अनेक प्रवाद आहेत. पुस्तकात ३ प्रमुख थेअरीजवर चर्चा असून त्यातली एक थेअरी ही सर्वात जास्त प्रॉबेबल आहे असे लेखक लिहितो. तसे असेल तर मुत्सद्दीगिरीच्या काही सर्वोच्च प्रसंगातील हा एक प्रसंग असेल. अर्थात काहील्गुपिते कायमची गुपितेच राहतील.
शिक्षण, सामाजिक उद्धाराच्या योजना ही क्षेत्रे नरसिंह रावांच्या आवडीची. तिथे त्यांनी पक्के समाजवादी विचाराचे शासकीय अधिकारी आणले. तर गरज ओळखून वित्त, वाणिज व उद्योग क्षेत्रे (फायनान्स, कॉमर्स, इंडस्ट्री ) खुल्या आर्थिक विचारसरणीचे शासकीय अधिकारी तसेच केंद्रीय मंत्र्यांच्या (मनमोहन/चिदंबरम) हाती त्यांनी खूप मोठा विरोध पत्करून दिली. तसेच त्यांच्या मागे ते खंबीरपणे उभे ठाकले.
अल्पमतातले सरकार, स्वत:चा मोठा प्रबल गट नसणे, कुणी जवळचा मित्र नसणे या कारणाने त्यांची कार्यशैली ही पाठिंबा द्यायचा मात्र प्रकाशात यायचे नाही अशी राहिली. त्यामुळे अपयश आले तरी मोठा बट्टा लागणार नाही व स्थान डळमळीत होणार नाही. पण त्यामुळे यशाचे श्रेयदेखील दुसर्‍यांना गेले.
सोनिया व गांधी परिवाराबरोबरच्या संबंधांबद्दल काही चमचमीत वाचण्याची अपेक्षा असेल तर हे पुस्तक वाचू नये. त्यांच्या परस्परसंबंधाचे दोन्ही पक्षांच्या आयुष्यावरील परिणाम दूरगामी होते पण त्यात चमचमीत काही नाहिये.

या पुस्तकाची एक डावी बाजू म्हणजे पुस्तक 'फॅन बॉय'ने लिहिल्यासारखे झाले आहे. लेखक त्यांच्या कर्तुत्व व योगदानापुढे इतका स्मितीत झाल्यासारखा वाटतो की त्यांनी केलेल्या काही मोठ्या चुका व गुन्ह्यांचे फार वरवर विश्लेषण केले आहे. सरकार वाचवण्यासाठी झारखंड मुक्ति मोर्चा बरोबर झालेले सौदे व इतर काही सौदे हे लेखक 'सर्व पुरावे पाहता ते घडले असण्याची शक्यता फारच दाट आहे' इतकेच म्हणतो मात्र त्यापुढे जात नाही. वैयक्तिक आयुष्यात त्यांचे पत्नि व मुलांबरोबर संबंध तणावपूर्वक होते व त्यात नरसिंह रावांच्या वैयक्तिक वर्तणुकीचा हात मोठा होता. स्वतःच्या अपत्यांना त्यांनी कटाक्षाने राजकारणात सहभागी होऊ दिले नाही. त्यांची पत्नि ८ अपत्यांचा सांभाळ करत, गावची शेती सांभाळत गावातच पन्नाशीत वारली, ती कधीच हैद्राबाद वा दिल्लीत आली नाही. हैद्राबादमध्ये लक्ष्मी कांतम्मा व नंतर दिल्लीत कल्याणी शंकर या दोन स्त्रीयांचा त्यांच्या राजकीय जीवनात मोठा सहभाग आहे. हा सर्व तपशिल येतो मात्र त्याचे मूल्यमापन एक पति/पिता या नात्याच्या अनुषंगाने केले नाहिये.

राजकारणा व्यतिरिक्त साहित्य हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. अनेक साहित्यिकांबरोबर त्यांची उठबस होती. मराठी, तेलुगु, इंग्रजी, संस्कृत व इतर भाषातले साहित्य ते वाचत असत तसेच भाषांतरही करत. सत्तेत असताना, सत्ते बाहेर असताना त्यांचे वाचन व नवीन विषयांत प्राविण्य मिळवण्याची धडपड कमी झाली नाही. 'द क्लॅश ऑफ सिविलायझेशन'२ या सॅम्युएल हंटिग्टनचा १९९३च्या फॉरेन अफेअर्सच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा व समासात त्यांनी काढलेल्या टिपणांचा फोटो या पुस्तकात आहे. या लेखाची महती आणि माहिती ज्यांना आहे त्यांच्या लक्षात येइल की पंतप्रधानसारख्या अत्यंत व्यस्त पदावर असतानादेखील कुठला लेख वाचावा व कुठल्यावर टिपणे काढावीत याचे अचूक ज्ञान या व्यक्तीला होते. टेबलवर व चहुबाजूला पुस्तके व कागदांच्या गठ्ठ्यात मध्ये खुर्चीवर टिपणे काढत बसलेल्या नरसिंह रावांचा फोटो एकदम प्रातिनिधिक आहे. तेलुगु भाषेत मध्ययुगीन कालात लिहिलेले राघव पांडवीयम३ हे एक द्व्यर्थी काव्य आहे जे रामायणावरही आहे व महाभारतावरदेखील. नरसिंह रावांचे हे आवडते काव्य होते. लेखकाच्या मते हे काव्य नरसिंह रावांच्या अनेक राजकीय निर्णयांचे प्रतिक आहे.

१९७० ते १९९० या काळात राजकीय इच्छाशक्तीच्या व दूरदृष्टीच्या अभावामुळे भारताने आर्थिक नितीच्या बदलाची व त्यायोगे प्रगतीची मोठी संधी गमावली. अर्थव्यवस्थेबद्दल तुलनेने अनभिज्ञ असलेल्या या सत्तरीतल्या चाणक्याने सर्व राजकीय चतुरता पणाला लावून तो बदल घडवून आणला. माझ्या लेखी पं नेहरुंनंतर दिशादर्शक काम केलेल्या पंतप्रधानांमध्ये नरसिंह रावांचा क्रमांक येतो. ५वर्षाचा कालावधी पूर्ण केलेल्या भारतीय पंतप्रधानांपैकी जनसामान्यांच्या विस्मृतीत गेलेल्या या नेत्याने देशाच्या प्रगतीमध्ये केलेल्या अतुलनीय योगदानाचे हे पुस्तक योग्य मूल्यमापन नक्कीच करते.

१. https://theprint.in/opinion/why-narasimha-rao-is-indias-most-vilified-de...

२. https://www.foreignaffairs.com/articles/united-states/1993-06-01/clash-c...

३. https://en.wikipedia.org/wiki/Pingali_Suranna

४. http://archive.indianexpress.com/news/rao-responsible-for-babri-demoliti...

राजकारणातल्या ज्या मोजक्याच व्यक्तींबद्दल आदर शेवटपर्यंत टिकून राहिला त्यातले एक व्यक्तीमत्व म्हणजे नससिंहराव.

वैयक्तिक आयुष्यात त्यांचे पत्नि व मुलांबरोबर संबंध तणावपूर्वक होते व त्यात नरसिंह रावांच्या वैयक्तिक वर्तणुकीचा हात मोठा होता. >>> याबद्दल कधी माहिती नव्हती. पण त्यांच्या पैसे न खाण्याच्या वृत्तीमुळे हे संबंध ताणले गेले असतील तर मात्र तो भाग नाकीच यायला हवा पुस्तकात.

तुझी पुस्तकांची ओळख करून द्यायची शैली खूप सुंदर झाली आहे हल्ली. विशेष आवड नसलेल्या विषयातल्या पुस्तकाची ओळख पण इतकी मार्मिक करून देतोस की तोच एक वाचनीय लेख होतो. हा धागा हलला की 'टण्याचा लेख असूदे' अशी आशा करत लगेच उघडला जातो.

याबद्दल कधी माहिती नव्हती. पण त्यांच्या पैसे न खाण्याच्या वृत्तीमुळे हे संबंध ताणले गेले असतील तर मात्र तो भाग नाकीच यायला हवा पुस्तकात
>>>

नाही ते कारण नव्हते. विस्तार भयास्तव थोडे संक्षिप्त लिहिले होते. आता मूळ पोस्ट अजून थोडी वाढवली आहे.
मला पुस्तक परिचय, परिक्षण, समिक्षा यातला फरक समजत नाही (आणि तिनही शब्दातला र्‍हस्व इकार बहुतेक चुकला आहे तेव्हा हे शब्द लिहिता येत नाहीत असेही म्हणता येईल), तितकी योग्यता नाही व कुठल्याच एका विषयात सखोल अभ्यास नाही. त्यामुळे पुस्तकाची ओळख होईल, माझी वैयक्तिक मते त्या परिचयाला झाकोळणार नाहीत इतपत काळजी घेण्याचा मी प्रयत्न करतो. हजारो तासांची मेहनत करून शेकडो पाने लिहिणार्‍या लेखकाने दिलेल्या आनंदाची थोडी परतफेड करण्याचा प्रयत्न म्हणून इथे लिहित असतो.

नरसिंह रावांच्या पुस्तकाचा परिचयआवडला.
नरसिंह राव यांच्याबद्दल आधी फारशी माहिती नव्हती, पण अलीकडच्या काळात बरंच काही चांगलं ऐकलं. एकूणात देशासाठी खूप काही चांगलं काम करून नंतर विस्मृतीत गेलेले एक नेतृत्व.
त्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळायला हवं असं मनापासून वाटतं.

धन्यवाद टण्या !
तुझी पुस्तकांची ओळख करून द्यायची शैली खूप सुंदर झाली आहे हल्ली. विशेष आवड नसलेल्या विषयातल्या पुस्तकाची ओळख पण इतकी मार्मिक करून देतोस की तोच एक वाचनीय लेख होतो. हा धागा हलला की 'टण्याचा लेख असूदे' अशी आशा करत लगेच उघडला जातो.+१

धन्यवाद टण्या !
तुझी पुस्तकांची ओळख करून द्यायची शैली खूप सुंदर झाली आहे हल्ली. विशेष आवड नसलेल्या विषयातल्या पुस्तकाची ओळख पण इतकी मार्मिक करून देतोस की तोच एक वाचनीय लेख होतो. हा धागा हलला की 'टण्याचा लेख असूदे' अशी आशा करत लगेच उघडला जातो. >> +१

हजारो तासांची मेहनत करून शेकडो पाने लिहिणार्‍या लेखकाने दिलेल्या आनंदाची थोडी परतफेड करण्याचा प्रयत्न म्हणून इथे लिहित असतो.
>>>

हे ही खूप आवडले

टवणे सर, अतिशय उत्कृष्ट पुस्तक परिचय!
नरसिंह रावांचं The Insider नावाचं जे एक पुस्तक आहे, जे आत्मचरित्र नाही, पण त्यांच्या स्वतःच्या आयुष्यावर आधारित आहे असं म्हटलं जातं, त्याचा मराठी अनुवाद ( अशोक जैन?) अंतस्थ नावाचा आहे, तो फार पूर्वी वाचला होता. पण अनुवाद असल्यामुळे असेल, कंटाळवाणा वाटला होता.
नरसिंह रावांबद्दल खूप आदर आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचायला आवडेल.

ही पुस्तकं मी वाचेन का माहीत नाही. पण त्यांचा थोडक्यात परिचय तरी झाला.
नरसिंह राव यांच्या दोन खोल्या पुस्तकांच्याच होत्या, असं वाचल्याचं आडवतं.

> तुझी पुस्तकांची ओळख करून द्यायची शैली खूप सुंदर झाली आहे हल्ली. विशेष आवड नसलेल्या विषयातल्या पुस्तकाची ओळख पण इतकी मार्मिक करून देतोस की तोच एक वाचनीय लेख होतो. > +१ मी ही पुस्तकं बहुतेक कधीच वाचणार नाही पण तुमचे प्रतिसादमात्र नेहमी वाचते.

खरंतर मला वाटतं तुम्ही या प्रत्येक पुस्तक/ प्रतिसादाचा वेगळा धागा काढायला हवा. म्हणजे कधी हवे असल्यास तुमच्या लेखनमध्ये ते लगेच शोधता येईल आणि माबोवर चांगले लेखनदेखील होते हे सर्वांना दिसेल Wink

टण्या, चांगले लिहिले आहेस. शाळेत त्यांचा 'स्वामी रामानंद तीर्थ' असा एक धडा होता. तिथे लेखक म्हणून त्यांची ओळख दिलेली होती. तब्बल १३ भाषांत प्राविण्य असलेल्या, 'पण लक्षात कोण घेतो' या मराठी कादंबरीसह इतर प्रसिद्ध मराठी पुस्तकांचा तेलुगु अनुवाद केलेल्या नरसिंहरावांच्या राजकारणाबाहेच्या इतर व्यासंगाबद्दल आदर आणि उत्सुकता वाटू लागली होती. पण पुढे आवर्जून शोधून वाचणे झाले नाही.

अलीकडेच त्यांचे खासगी सहाय्यक सचिव म्हणून काम केलेल्या राम खांडेकर यांचे त्यांच्यावरचे लेख लोकसत्तेत प्रसिद्ध झाले होते:
नागपूरच्या विकासाचे प्रणेते: https://www.loksatta.com/lokrang-news/sattechya-padchayet-yashwantrao-ch...
विद्वान व अभ्यासू नेते: https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/author-ram-khandekar-a...
स्थितप्रज्ञ नरसिंह राव: https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/article-about-pv-naras...
शिक्षणप्रेमी.. : https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/narasimha-rao-establis...
माणुसकीचा झरा : https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/article-about-pv-naras...
अस्वस्थ पर्व : https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/ram-khandekar-article-...
उदारीकरणाचे प्रणेते : https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/ram-khandekar-article-...
सूर्याची पिल्ले! : https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/ram-khandekar-article-...
युद्ध आमचे सुरू.. : https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/ram-khandekar-article-...
सुधारणा पर्व : https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/ram-khandekar-article-...
सौजन्यशील नेतृत्व : https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/author-ram-khandekar-a...
प्रगतीची जादूची कांडी : https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/author-ram-khandekar-a...
राम मंदिर वाद आणि नरसिंह राव : https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/ram-mandir-dispute-and...
शापित नायकाची अखेर : https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/ram-mandir-dispute-and...
आठवणी दाटतात.. : https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/author-ram-khandekar-a...

खरंतर मला वाटतं तुम्ही या प्रत्येक पुस्तक/ प्रतिसादाचा वेगळा धागा काढायला हवा. म्हणजे कधी हवे असल्यास तुमच्या लेखनमध्ये ते लगेच शोधता येईल +१ वजा अहो जाहो Wink

धन्यवाद गजानन.
मी यापैकी फक्त त्यांच्या निधनाबद्दलचा लेख वाचला होता, आता सर्व लेख वाचता येतील.
निधनाबद्दल वाचताना असं वाटलं की आपला देश किती कृतघ्न आहे.

गजाभाऊ, फारच सुरेख लिंक शोधून टाकल्या आहेस. धन्यवाद.

खांडेकर हे नरसिंह रावांच्या मार्जितले अधिकारी होते, त्यांच्या कोअर टीमचा हिस्सा. त्याबरोबर नरेश चंद्रा या अविवाहित सनदी अधिकाऱयांनी मोठी भुमिका बजावली. सत्या नडेलांचे वडील समाजवादी विचारांच्या गोटातले अधिकारी होते ज्यांना नरसिंह रावांनी शिक्षण, रेशन या खात्यांवर आणले होते. सत्या नाडेलांच्या पत्नी या त्याच वर्तुळातल्या दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याची मुलगी. यांचे लग्न दिल्लीतच सरकारी बंगल्याच्या हिरवळीवर होते. नरसिंह रावांना आमंत्रण नव्हते तरी ते आपलेपणाने गेट क्रॅश करत या लग्नास उपस्थित राहिले. संजय बारू यांचे वडील नरसिंह रावांचे जुने सनदी अधिकारी मित्र/सहकारी. संजय बारू राव पंतप्रधान असताना इकॉनॉमिक टाइम्समध्ये उपसंपादक होते. त्यांना आतल्या गोटात प्रवेश होता. मनमोहन सिंगांबरोबर त्यांची उठबस, जवळीक तेंव्हापासूनची.
खुद्द मनमोहन सिंगांच्या आधी आय.जी. पटेलांना वित्तमंत्री म्हणून मंत्रिमंडळात सामील होण्याची विनंती केली होती, ती वयाच्या कारणाने त्यांनी नाकारली. मनमोहन सिंग हे दुसऱ्या क्रमांकाचे म्हणून शॉर्टलिस्टड होतेच. उदारीकरणाचा मूळ ढाचा 80च्या सुरुवातीपासून मनामोहन, मोंटेक सिंग या उदारीकरणाच्या समर्थकांनी तयार केला होता.

राजकारणात काही पर्मनंट नसते. राजीवच्या मृत्यू नंतर डीएमकेला जवळ केले तर बट्टा लागेल म्हणून धोका पत्करून नरसिंह राव त्यांच्यापासून दूर राहिले. तोच द्रमुक आता काँग्रेसचा मित्रपक्ष आहे. जयराम रमेश मुळच्या उदार गटातले, ते 2004नंतर डाव्या गटातले झाले. जयराम रमेश, सलमान खुर्शीद व मनमोहनसिंग हे नरसिंह रावांच्या बद्दल शेवटपर्यंत जाहीर आदरात्मक विधाने देत राहिले/आहेत.

ईथे अवांतर असेल तर माफ करा पण एक शंका आहे. Amazon सेलमध्ये परवाच पाच मराठी ईपुस्तके विकत घेतली अगदी स्वस्तात आणि ती पुस्तकं सध्या किंडल अॅपमध्ये पडून आहेत. पुस्तकं वाचायला बराच वेळ लागेल तर या पुस्तकांना काही कालमर्यादा असेल का. अशी कालमर्यादा असते ईपुस्तकांना असे मी वाचले आहे तर तेे कसे कळेल. पुस्तक विकत घेताना तर काही लिहीलेलं नव्हतंं.

सुंदर परिचय टवणे सर!
खरंतर मला वाटतं तुम्ही या प्रत्येक पुस्तक/ प्रतिसादाचा वेगळा धागा काढायला हवा. म्हणजे कधी हवे असल्यास तुमच्या लेखनमध्ये ते लगेच शोधता येईल +१
गजानन, दुव्यांसाठी धन्यवाद!

खरंतर मला वाटतं तुम्ही या प्रत्येक पुस्तक/ प्रतिसादाचा वेगळा धागा काढायला हवा. म्हणजे कधी हवे असल्यास तुमच्या लेखनमध्ये ते लगेच शोधता येईल
>>>
एक स्वतंत्र धागा सुरु करावा इतके लिहिन असे सुरुवात करताना माझ्या मनात नसते. मात्र बरेचदा लिहिण्याच्या ओघात सविस्तर लिहिले जाते. तुम्हा सर्वांच्या सुचनेबरहुकूम आज नवीन धाग्यावर पुस्तक परिक्षण लिहिले.

इथे आधी लिहिलेली परिक्षणे पण जर सविस्तर असतील तर स्वतंत्र धाग्यावर हलवली तर चालेल का? का उगाच भारंभार धागे काढले असे होईल?

> इथे आधी लिहिलेली परिक्षणे पण जर सविस्तर असतील तर स्वतंत्र धाग्यावर हलवली तर चालेल का? का उगाच भारंभार धागे काढले असे होईल? >
हो प्रत्येक जुने परीक्षणपण हळूहळू वेगळ्या धाग्यात हलवा. मधे २-३ दिवसांचा ब्रेक घ्या किंवा आठवड्याला एक असे.
त्या पुस्तकाबद्दल कोणी इतराने चांगले लिहले असेल तर तो प्रतिसाद त्या व्यक्तीच्या नावानिशी कॉपीपेस्ट करून टाका तुम्हीच, प्रतिसादात.

सॉरी तुम्हाला कामाला लावतेय असे वाटेल, पण हे खरंच चांगले डॉक्युमेन्टेशन होईल.

एव्हढे सगळे करत बसला तर टण्या वाचणार कधी पण ?
>>>
Proud

तुज्यासारखी आणि नंदन सारखी लोकं लिहायची बंद झाली म्हणून माझ्यासारख्या चिलटांना लिहावे लागते आहे. तुम्ही पुन्हा लिहायला घ्या!

Pages