आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे

पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर

पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट

पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले

पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित

पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले

पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर

पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी

पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव

पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,

पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,

पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे

पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे

पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम

पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर

पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव

पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे

पान १८ : ........ अपुर्ण...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही मालिका वाचता वाचता काही गोष्टींचा अधिक खुलासा हवा होता असे वाटले. पान क्रमांक ११ वर दैवज्ञ ब्राह्मण सोनारांविषयी चर्चा आहे. सोनारांमध्ये अनेक जाती आहेत त्यापैकी दैवज्ञ ब्राह्मण ही एक प्रमुख आहे. १९५० सालच्या मूळ भारतीय राज्यघटनेत सोनारांचा इतर मागासलेल्या जातींमध्ये(ओबीसी) समावेश नव्हता. बहुतेक सर्व सोनार हे पुढारलेले आणि संपन्न होते, आहेत. त्यातही कोंकण,गोवा,कारवार इथले सोनार((पितळे,हाटे,,मुरकुटे,गोरे,कुष्टे,चोडणकर,देवरुखकर,मणचेकर,पेंडूरकर,पेडणेकर,बांदिवडेकर,हळदणकर,अणवेकर इ.इ.) हे सगळे दैवज्ञ ब्राह्मण आहेत. त्यांचा स्वतःचा मठ कारवारमध्ये आहे. तो स्थापित करण्यासाठी मुंबईच्या पेडणेकर, शंकरशेठ(मुरकुटे) वगैरे कुटुंबांनी पुढाकार घेतला होता.हे सर्व लोक सोळा संस्कारांचे अधिकारी आहेत.
१९६२ साली भारत-चीन युद्धानंतर भारतात परकीय चलनाची प्रचंड चणचण निर्माण झाली. त्यावर मात करण्यासाठी त्यावेळचे काटकसरीच्या साध्या रहाणीचे खंदे पुरस्कर्ता अर्थमंत्री श्री. मोरारजी देशाइ यांनी सुवर्ण नियंत्रण कायदा अंम लात आणला. नंतर १९६८ साली त्यात आणखी काही कलमे जोडण्यात आली. यांअन्वये कुठल्याही सुवर्णकारागिराला/दुकानदारांना/लोकांना शंभर ग्रॅमच्यापेक्षा अधिक शुद्ध सोने जवळ बाळगायला मनाई करण्यात आली. चौदा कॅरटच्या हलक्या सोन्याला मात्र ही मर्यादा नव्हती. पण इतक्या निम्म्यापेक्षा जास्त अशुद्ध सोन्याला मागणीच नव्हती. यामुळे सुवर्णकारागिरांचा धंदा पार बसला. विशेषतः खुदाबादी सिंधी स्वर्णकार समाजावर याचा फारच परिणाम झाला. त्यांचा उदरनिर्वाहाचा परंपरागत व्यवसाय बंद झाल्याने या समाजात व त्यांच्या भाऊबंदांत निषेधाची तीव्र लाट उठली. तेव्हा नुकसानभरपाई म्हणून त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करून ओबीसींच्या सवलती त्यांना मिळाव्यात अशी तरतूद करण्यात आली. याचे संमिश्र स्वागत झाल्रे. निम्न आर्थिक स्तरावरचे कारागीर खूष झाले तर उच्चपदस्थ पेढीवाले, दुकानदार मागास ठरवले गेल्याने नाखुष झाले. कालांतराने परकीय चलन स्थिती सुधारल्याने त्या कायद्यातील काही तरतुदी मागे घेण्यात आल्या, पण ओबीसी सवलत मात्र तशीच राहिली. असो. आता मूळ धागा फारसा वाचला जाणार नाही व मायबोलीवर प्रतिसादाखाली उपप्रतिसाद दिसण्याची सोय नसल्याने हा प्रतिसाद सर्वात शेवटी जाऊन संदर्भहीन ठरणार, पण इलाज नाही.

मध्य प्रदेशात थोडाफार प्रवास केला ( इंदुर ते उजैन ) वाटेत अनेक मराठी आडनावे दिसली. पणशीकर, बावीसकर, धारकर, ठाकरे. हि नावे केवळ नावाच्या पाट्यांवरच होती असे नव्हे तर कॉलनी, रस्ते यांच्या नावातही होती. होळकर तर सगळीकडेच होते !

@मी नताशा, कल्याणपुर हे कारवार जिल्ह्यातल्या एका गावाचे नाव आहे. या प्रदेशात, विशेषतः चित्रापुर सारस्वतांमध्ये गावाचे नाव हेच आडनाव म्हणून लावण्याची पद्धत आहे. क्वचित कधी महाराष्ट्रातल्याप्रमाणे त्यापुढे 'कर' ही लावले जाते. उदा. चंदावर(कर) ,होनावर ,भटकळ, सुरतकल, कुंडापुर, हेमाडी ,हेजमाडी, हत्तंगडी,बेलतंगडी, बळवळ्ळी,गुलबाडी,वकनळ्ळी, कोमकळ्ळी(कुमार गंधर्वांचे मूळ गाव) ,नायमपळ्ळी, कुमठा ,बैलूर, ब्याळगी, पडबिद्री, बलसे(कर),शिराली,पडुकोणे,खंबडकोणे, किलपाडी, कलमाडी वगैरे वगैरे.
दक्षिण भारतात सर्वत्रच पूर्ण नावामध्ये ग्रामनाम समाविष्ट असतेच असते. कोणी ते पूर्ण लावतात किंवा कोणी त्याचे इंग्लिश आद्याक्षर लघुरूप म्हणून वापरतात. जसे, एस. राधाकृष्णन किंवा सर्वपळ्ळी राधाकृष्णन, बोंबिली विजयकुमार, इ.
गोव्यात काही आडनावांमध्ये गावाचे नाव असते, पण त्यापुढे 'कार' लावतात. उदा. सातोसकार, केळेकार, बोरकार, कुडचेडकार इ.

मी नताशा | 29 January, 2013 - 11:47
सुमन कल्याणपुर, दीपक शिकारपुर ह्यामधली "पुर" ने संपणारी आडनावे कुठून आली?

हीरा यांनी विस्तृत उत्तर दिलेलेच आहे. तरी, माझीही एक जुनी पोस्ट पुन्हा डकवतो -

sunilt | 29 December, 2012 - 02:10
करान्त आडनावांची पद्धत महाराष्ट्रात इतर विभागांपेक्षा कोकणात अधिक दिसते. किंबहुना, कुठल्या ना कुठल्या प्रकारे गावाशी नाळ जोडून ठेवण्याची प्रथा एकंदरीतच कोकणात (दमण ते मंगळूर) जरा जास्त असावी. इतकी की, कोकणातील हिंदूंप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन आणि ज्यूंमध्येदेखिल करान्त आडनावे दिसतात.

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम (कासकर), गेल्या पिढीतील एक बुजूर्ग ज्यू अभिनेता डेविड (चेऊलकर) ही काही उदाहरणे.

जाज्वल्य गोमंतकीय (जाज्वल्य हे विशेषण "ते" सोडून इतर ठिकाणच्या लोकांना लावण्याची मुभा आहे ना? ) मात्र "कर" न लावता "कार" असे लावतात. विख्यात कोंकणी साहित्यिक रविंद्र केळेकार हे एक उदाहरण.

कारवार भागात मात्र "कर" न लावता थेट गावाचे नावच आडनाव म्हणून लावण्याची प्रथा दिसते. सुमन कल्याणपूर, गुरु दत्त (पदुकोण) ही काही उदाहरणे.

इंदुर-उज्जैनात मराठी आडनावे आढळल्याने आश्चर्य का वाटावे? सगळ्याच जुन्या मराठा संस्थानांमधून पिढीजात लाखो मराठी लोक आहेत. हैद्राबाद, तंजावर, बडोदा, इंदौर, ग्वालियर, नागपूर वगैरे. पण पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठ्वाडा वगैरेला वाटतं आपण म्हणजेच महाराष्ट्र. अन आपण बोलतो तीच खरी मराठी. या भागातल्या लोकांना त्यातल्या त्यात गोवा, कर्नाटक बॉर्डरवाले मराठी आपले वाटतात, पण इतर नाही असं निरिक्षण आहे.

हा प्रतिसाद वैयक्तिक नाही. कृ.गै. न.

आमचे आडनाव "तापकीर" या नावामागचा इतिहास महित नाही पण तुकोजी होळकर यांच्याबरोबर तापकीर नावाचा कोनी एक सरदार असा उल्लेख मि एका पुस्तकात वाचला होता पण जास्त माहिती मिळु शकली नाही. तसे तापकीर आडनावाचे लोक मुलखेड, चर्होली आळंदी,चिखली बाणेर काळेवाडी इकडे खुप आहेत

महाजन हे आमचे आड्नाव असुन आम्हि सध्या नशिक मधे रहतो.. पन मुळ गाव महाजन मळा, तरडोबाचि वाडि,शिरुर्,पुणे आहे...पण मझ्या महिति नुसार हे आड्नाव नसुन प्दवि आसवि मला आम्चे मुळ नाव जानुन घेने आहे ...

http://en.wikipedia.org/wiki/Mahajan

अभिप्राय मिळावा हि विनन्ति

माझे (जेजुरी) माहेरचे आडनाव दिडभाई आहे, पण आमच्याकडे कोणालाच याचा इतिहास माहीत नाही.
आम्ही शैव ब्राह्मण ( शुक्ल यजुर्वेदी पाराशर) आहोत.
कोणी मला इतिहास सांगु शकेल का?

अरे मस्त धागा आहे!!

माझी छोटीशी भर - आपण गावावरून आडनावे बघितली…. पण माझ्या पाहण्यात काही छोट्या वाड्या आहेत, ज्यांची नावं तिथल्या लोकांवरून आहेत…उदा. - हांगेवाडी, खांडेवाडी, मुंडेवाडी वगैरे…तिथे हांगे, खांडे, मुंडे वगैरे आडनावाची मंडळी जास्त आहेत…. आता आधी गावाच नाव आलं कि आधी आडनाव आलं हा आधी अंड कि आधी कोंबडी सारखा संशोधनाचा विषय आहे!!!

आजच विकीपेडिया वर आडनावांचा इतिहास शोधताना या धाग्याची आठवण झाली.
माझं माहेरचं आडनाव वडके... त्वष्टाकांसार/त्वष्टाब्राह्मण/तांबट जात! देवांचा स्थापत्यकार विश्वकर्मा याच्या तिसर्‍या पुत्राचे त्वष्टा चे वंशज! विश्वकर्मा/विश्वब्राम्हण्/धमीन ब्राह्मण यात ५ पोटजाती आहेत... लोहार, सुतार, त्वष्टाकांसार/तांबट(बांगड्या बनवणारे नाही तर तांबे आणि कांस्य (ब्राँझ) धातूची भांडी घडवणारे), सोनार व शिल्पकार!

यापैकी त्वष्टाकांसार/तांबट हे मुळचे कोंकण भागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पूणे, नाशिक आणि कोल्हापूर या महाराष्ट्राच्या भागातून आढळून आले आहेत तर अन्यत्र वैश्विक ब्राह्मण/ विश्वकर्मा कर्नाटक्,केरळ, तमिळ नाडू व उत्तर भारतभर आढळून येतात.

आमच्यात उपनयन (मुंज), जानवे घालणे, मंगळागौर वगैरे ब्राह्मण पद्धती आहेतच पण लाग्नानंतर मराठ्यांमध्ये जो "गोंधळ" घालण्याची प्रथा आहे तीसुद्धा आहे. कालिकामाता ही त्वष्टाकांसार/त्वष्टाब्राह्मण यांची देवी व आमची वडक्यांची कुलदेवी कन्याकुमारी! त्यामुळे मूळ केरळ असावे असे वाटते.
Ref:
http://en.wikipedia.org/wiki/Vishwakarma_(caste)
http://en.wikipedia.org/wiki/Twashta_Kasar_(Tambat)
http://en.wikipedia.org/wiki/Wadke

माहेरच्या आडनावांतील मजा म्हणजे आडनावांच्या जोड्या जोड्या आढळून येतात...
वडके, पिंपळे (वड आणि पिंपळ या वृक्षांवरून असावे)
हजारे, लाखाटे
गोडे, कडू
येडेकर, खुळे
पोटफोडे, पोरे
अजून बरेच आहेत... आठवले की लिहीनच...

सासरचे आडनाव तेरसे... ९६ कुळी मराठा! नावाचा इतिहास जास्त कोणाला माहीत नाही. पण राजस्थान येथील रजपूत वगैरे असून ते संपूर्ण भारतभर फिरून मग तळकोंकणात स्थायिक झाले अशी आख्यायिका आहे. पूर्वी वेगळे आडनाव होते (कोणते ते माहीत नाही...) पण भाषा व ठिकाणे बदलत बदलत तेरसे हे आडनाव चिकटले ते कायम राहीले. अर्थ व व्युत्पत्ती याहून अधिक माहीत नाही.

इथे तळकोंकणात तेर्से-बांबर्डे गांव आहे पण ते इथले नाहीत असे म्हणतात.

Pages