कथालेखन - चर्चा आणि संवाद.

Submitted by नंदिनी on 27 November, 2012 - 04:36

सर्वच कथालेखक आणि लेखिकांना चर्चा करण्यासाठी व्यासपीठ. इथे कथा/कादंबरी या लेखन प्रकारावरची तांत्रिक अथवा सर्जनशील चर्चा आणि संवाद साधू शकता. रायटर्स ब्लॉक असल्यास इथे मदत घेऊ शकता, कथेसाठी पार्श्वभूमी बनवण्यासाठी आपण इथे एकमेकांची मदत करू शकतो.

कृपया, इथे चर्चा करत असताना संसदीय भाषेमधे चर्चा करा. तसेच, कुठल्याही होतकरू अथवा नविन कथालेखकांची इथे टिंगल करू नका. (कथांमधील चुका दाखवणे अथवा हलकीफुलकी मस्करी अवश्य चालू द्यात पण मुद्द्यांवरून गुद्द्यांवर येणे टाळा.

इथे आपले मुद्दे मांडण्याआधी आजवर झालेली चर्चा एकदा वाचून अवश्य घ्या म्हणजे पुन्हा तेच मुद्दे रीपीट होणार नाहीत.

हा धागा सध्या ग्रूपपुरताच मर्यादित ठेवला आहे.

हा अडमने चालू केलेला कथाकथी धागा. मायबोलीवरच्या उत्तम कथा त्याने इथे संकलित करून ठेवलेल्या आहेत. दिवाळी अंकांमधील कथा पटकन सापडत नाहीत कित्येकदा, तेव्हा या धाग्याचा उपयोग होऊ शकेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेपथ्यावरून चर्चा चालू आहे तर त्यातच थोडेसे.
परवाच श्री.नांचे ऑक्टोपस वाचले. 1962 मधल्या या कादंबरीत कथावस्तू आजमितीस विशेष आढळणार नाही. परंतू मला सापडलेले वैशिष्ट्य म्हणजे केवळ संवादातून उभे केलेले नेपथ्य. संपूर्ण पुस्तकात कुठेही स्थलकाल वर्णन करणारे साधे असे वाक्य नाही. फक्त प्रत्यक्श, फोनवरील व पत्रातील संवादातून घर, ऑफिस, रेल्वेस्टेशन, स्टुडियो, हॉस्पिटल असा भला मोठा अवकाश साकारणे आव्हानात्मक व कौतुकास्पद आहे, नाही का?

सप्टेंबरच्या ’अंतर्नाद'मधली 'संगम' ही कथा छान आहे. (लेखक - पु. रा. रामदासी)
कथावस्तू फारशी निराळी नाही, पण पात्रं, वातावरणनिर्मिती, अवकाश हे सगळं नेहमीपेक्षा जरा वेगळं आहे. या तीन गोष्टींमुळे कथेतली, पात्रांच्या/निवेदकाच्या तोंडची सांकेतिक भाषाही निराळी आहे, (बाज या अर्थाने नव्हे, पण त्या वातावरणातली मंडळी जी भाषा बोलतात, ती आपल्याला काहीशी अपरिचित असते.)
कथा अवश्य वाचावी अशी आहे.

नेपथ्यावरून जी चर्चा चालू होती, त्याचाही धागा आहेच इथे. कथेत प्रत्यक्ष नेपथ्याचा असा वापर केला गेलेला नाही, पण निवेदनाची पध्दत आणि अवकाश यांच्यामुळे नेपथ्य हुबेहूब आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. (त्याला हुबेहूब तरी कसं म्हणावं? कारण, कथेतला परिसर आपल्यापैकी फार थोड्या जणांना परिचित असेल. पण डोळ्यांसमोर जे उभं राहतं, ते तसंच असावं असा विश्वास मात्र वाटतो.)

ललिता, कशी मिळेल वाचायला? अंक ऑनलाईन येतो का?

अडमा, तुझा कथाकथीचा धागा या धाग्याची हेडरमधे देऊन ठेवू का? शोधायला सोपे पडेल.

नंदिनी, अंक ऑनलाईन येत नसावा बहुतेक. (मला नक्की माहिती नाही.)

परागच्या धाग्याची लिंक हेडरमधे दिलीस ते बरं झालं.
दिवाळी अंकातलं लेखन त्या-त्या आयडीच्या पाऊलखुणांमधे दिसायलाच हवं, खरंतर...

या अशा सगळ्या कथा तू जमवून ठेव, मी मुंबईला आले की मला वाचायला दे मग Happy

दिवाळी अंकातलं लेखन त्या-त्या आयडीच्या पाऊलखुणांमधे दिसायलाच हवं, खरंतर...<< हो. कितीतरी चांगलं लेखन आयत्यावेळी सापडत नाही त्यामुळे!!

आजच्या लोकसत्ता-लोकरंगमध्ये कथालेखनासंबंधी आलेले हे दोन लेख. अवश्य वाचा.

राजन खान यांचा लेख -
http://www.loksatta.com/lokrang-news/current-position-of-marathi-literat...

रेखा इनामदार-साने यांचा लेख -
http://www.loksatta.com/lokrang-news/current-position-of-marathi-literat...

मला रेखा इनामदार-साने यांचं मनोगत आवडलं.
राजन खान यांचा लेख मात्र फारसा नाही पटला.

मधुकर धर्मापुरीकर यांचा 'रूप' हा कथासंग्रह सध्या वाचते आहे.

साध्याश्या, छोट्या पण परिणामकारक विषयांवरच्या कथा आहेत. नाट्यमयता, कलाटणी देणे, धक्कातंत्र, अलंकारिक भाषेचा वापर यातलं काहीही नाहीये, तरीही कथा एक से एक आहेत. काही कथांचा शेवट अनपेक्षित टप्प्यावर केलेला आहे, 'अरे, इथे कशी काय संपवली कथा?' अशी प्रतिक्रिया होते आपली, पण नंतर कथा पुन्हा वाचाविशी वाटते, तिथे शेवट का केला असावा यावर पुन्हा विचार करावासा वाटतो.

'एका थेंबाची कथा' - अफलातून आहे. त्यातलं रूपक जबरदस्त आहे.

मात्र, अनेक कथांची शीर्षकं मला पटली नाहीत, त्याहून समर्पक शीर्षकं नक्की देता आली असती असं वाटलं.

तरीही, 'गोष्टीवेल्हाळ'ची सर या संग्रहाला नाही !! ('रूप'मधल्या कथा लेखकाच्या कारकीर्दीच्या सुरूवातीच्या टप्प्यातल्या असाव्यात असं वाटतंय.)

गोष्टीवेल्हाळ वाचलेलं आहे. रूप वाचले नाही,. मी नुकताच मोनिका ग्रजेद्रगडकर यांचा आर्त हा कथासंग्रह वाचला. सविस्तर लिहेन नंतर.

ही आज फेबुवर मिळालेली एक लिंक.

नंदिनी, लिंक भारी आहे. वेळ काढून वाचावी लागेल. (इंग्रजीत आहे आणि फार मोठी आहे, म्हणून. ;))

मी वरचा 'रूप'बद्दलचा मजकूर माझ्या अन्य फ्रेण्ड-सर्कलमध्येपण पाठवला होता. त्यातल्या एका कॉमन ओळखीद्वारे तो धर्मापुरीकरांपर्यंत गेला. त्यावर त्यांनी पाठवलेलं उत्तर इण्टरेस्टिंग आहे. ते इथे पेस्ट करते. (त्यांची पूर्वपरवानगी घेतली आहे.)

रूप आणि अप्रूप हे दोन्ही संग्रह सुरूवातीचे म्हणून माझे लाडके असे. मात्र विश्वनाथ आणि गोष्टीवेल्हाळ संग्रहांनी कथालेखनाचे समाधान दिले.
कथेच्या शेवटासंबंधी कै विजय तेंडुलकर यांनी ( गप्पात ) हाच मुद्दा काढला होता- तुम्ही असे शेवट जाणीवपूर्वक करीत असाल, तर काही हरकत नाही; मात्र अनाहूतपणे असे शेवट तुमच्याकडून झाले, तर ती कथेची उणीव म्हणता येईल.

यातल्या बोल्ड वाक्यानं मी जरा विचारातच पडले. (ते त्यांनी बोल्ड केलेलं नाहीये, मी इथे केलंय.)
लेखक कथेचा शेवट अनाहूतपणे करतो का? करू शकतो का? कथा इथेच संपली पाहिजे हे त्याला जाणवल्याशिवाय तो थांबेल कसा?

प्रीति, मागे काही पानांवर मी हाच प्रश्न विचारला होता. कथा संपते महणजे नक्की काय होतं?

आपण लिहत असलेल्या कथा "... आणी ते सुखाने नांदू लागले" असला शेवट अपेक्षित नसतोच. तरीपण "इथेच थांबावं" हे कसं समजतं आपल्याला... हे फार इंटरेस्टिंग असतं... लेखकाने जाणीवपूर्वक हा शेवट केलाय की अनाहूत्पणे हे अर्थात वाचकाला समजणार नाहीच. मग लेखकाला कसं जाणवतं की ही कथा इथेच संपायला हवी??

तुम्हा सर्वांची ही "कथा शेवट" प्रोसेस नक्की काय असते ते जाणून घ्यायला आवडेल. पेजिंग- साजिरा, पूनम, श्रद्धा, रैना,मेधा

हो, नंदिनी, आठवते आहे ती चर्चा. शेवट कुठे करायचा याची लेखकाची थॉट-प्रोसेस तुला जाणून घ्यायची होती.
पण इथे मुद्दा वेगळाच आहे असं मला वाटतं... मुळात अनाहूतपणे शेवट होईलच कसा? असा मला प्रश्न पडला आहे.

दुसरा कुठलाच शेवट समर्पक वाटत नसेल, ओपन एंडेडच ठेवावीशी वाटत असेल , एखाद्या शेवटामुळे सुंदर कथेवर अनावश्यक शिक्के बसायची शक्यता असेल , पात्रांना न्याय द्यायचा असेल तर कधीकधी आहे तिथेच थांबण्यात नाईलाज आणि शहाणपणाही असतो. याला 'अनाहूत शेवट' म्हणता येईल का?

हो, आशू, तुझं बरोबर आहे... पण मग अश्या शेवटामागे इतका विचार असेल, तर तो शेवट अनाहूत कसा काय ठरेल?
आणि तेंडुलकर म्हणतात, तशी उणीवही म्हणवणार नाही या प्रकाराला...

खरंय, हे शेवट जास्त 'जाणीवपूर्वक'कडे झुकलेले वाटतात. मग कदाचित, दुसरं काहीच सुचलं नाही, जमलं नाही म्हणून तिथेच शेवट करणे ( हे लेखक मनाशी कबूल करतोच) हे उणीव दाखवणारं आहे. मग हे अनाहूत असेल.

दुसरं काहीच सुचलं नाही, जमलं नाही म्हणून तिथेच शेवट करणे ( हे लेखक मनाशी कबूल करतोच) हे उणीव दाखवणारं आहे.

>>> हे पटतंय.

इतरांनी आपली मतं लिहा.

हेल्लो...हा धागा फार इंट्रेस्टींग आहे.
आणि आता चाललेली चर्चाही.

मी लिहीणार्‍या प्रत्येक कथेचा शेवट माझ्या डोक्यात फार फिट असतो.
आणि सुरुवातही तितकीच फिट असते.
मधे कथा कशी कशी वळणे घेत शेवटाला जाते हा प्रवास स्वत:साठीही फार जास्त उत्सुकतेचा बनून राहतो Happy

बेनझीर आणि सांवरा रे लिहिताना शेवट आधी 'दिसला'. अन मग गुंडा उलगडावा तशी गोष्ट उलट्या क्रमाने दिसत गेली.

मला गोष्टी नेहमी सिनेमा, टीव्ही शो सारख्या दिसतात Happy मी जाणुन बुजून फार डिटेल लिहित नाही, पण मला लोकांचे कपडे, मागची सीनरी , फर्निचर, फ्रेममधले इतर लोक, लायटिंग, बॅकग्राऊंडचे आवाज,वास , कोण कुठे बसलंय, उभे आहेत , कसे इकडून फिरत आहेत हे सर्व डोक्यात असतं .

मी गोष्टी वाचते तेंव्हा सुद्धा माझ्या मनात असं पूर्ण चित्र उमटत असतं ( उदा , रेहान कायम टाइट जीन्स, एक कान टोचलेला, जरा जास्तीच बटण उघडी असलेला शर्ट, लांब, डोळ्यावर, कॉलवरवर येणारे , दाट केस, लेदर शूज किंवा बूट्स घालणारा आहे )

बाकीच्या गोष्टींमधे खर्‍या अनुभवांची कल्पनांची सर- मिसळ आहे त्यामूळे एका पंच लाईनपेक्षा गोष्ट संपते.

वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन उसे इक खूबसूरत मोड देकर भूलना अच्छा अशा स्टाइलने अर्धवट सोडलेल्या गोष्टी वाचल्या की माझी चिडचिड होते.

वा, मेधा! Happy
मेधा, बागेश्री, इथे नियमित येत जा.

'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या जयंत पवारलिखित कथासंग्रहाची निखिलेश चित्रे यांनी लिहिलेली प्रस्तावना जबरदस्त आहे!! कथालेखकांना घेण्यासारखं खूप काही आहे त्यात.

मेधा. तुझ्या पूर्ण पोस्टला मम. (फक्त ते रेहानच्या केसांचं वर्णन सोडून!!) फक्त ते मी लिहिताना तेवढ्या स्पष्टपणे उतरत नाही असं मला वाटतं.

मला कथा कुठे संपणार हे माहित असतं. मागे एक कथा लिहायला सुरूवात केली आणि जवळ जवळ पूर्ण लिहून झाल्यावर वाटलं "साला इथेच कशी संपेल हे असं?" पुढे काहीतरी घडायला पाहिजेच. पण मग लगेच माझ्यातला पत्रकार शब्दसंख्येकडे बोट दाखवायला लागला ऑलरेडी धाह्जार शब्द लिहून झाले होते. चार आठ दिवस फार चिडचिडीत गेले माझे. साजिरा, प्रीति यांच्याशी बोलल्यावर मग जाणवलं की खरचं हे पुढे जाऊ शकतं. आणि ते अजून पुढे जातच आहे!!!! क्रॉस्ड ६०००० वर्ड्स. Lol

बागेश्री. लिहित रहा.

मेधा +१ पण मलाही केसांचं सोडून!!! बाकी कथालेखन हा कदाचित माझा प्रांत नाहीय... कथाबीज खुलवणे, फुलवणे हे एक स्कील असतं... पण वाचायला (आणि वर्णनानुसार इमॅजिन करायला) मात्र आवडतं... ही चर्चा मस्तच चाललीये. लोकसत्ता तील रेखा इनामदार-साने यांचा लेख फार पटला.

ललितादेवी,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. त्यात दुवे दिलेले लेखही वाचले. माझ्याही मते राजन खान यांच्या लेखापेक्षा रेखा इनामदार-साने यांचा लेख अधिककरून पटण्याजोगा आहे.

थोड्या विचारांती लक्षात आलं की राजन खान यांना त्रुटीवर नेमकं बोट ठेवता आलं नाहीये. तर रेखा साने यांनी त्यांच्या परीने त्रुटी शोधायचा प्रयत्न केला आहे. दोघांच्या आकलनाचा मसावि (महत्तम सामायिक विभाजक) काढला तर सकस अनुभवाशी भिडणारे लेखक/वाचक नाहीत असा निघू शकतो. राजन खान दर्जेदार लेखक दिसत नाहीत असं म्हणतात तर रेखा साने दर्जेदार वाचक मिळत नाहीत असं म्हणतात.

असं का व्हावं यावर विचार करीत होतो तेव्हा नुकताच वाचलेला आतिश तसीर यांचा एक इंग्रजी लेख आठवला. दुवा इथे आहे : http://www.openthemagazine.com/article/art-culture/a-historical-sense

मी स्वत:लेखक नाही. पण हा लेख वाचल्यावर वाटलं की तुमच्यासारख्या लेखिकेस यात बरंच काही सापडावं. आतिश तसीर यांनी सांस्कृतिक मुळं गमावून बसलेल्या समाजातल्या त्यांच्यासारख्या नवलेखकांची स्थिती मुख्यत: वर्णिलेली आहे. तशीच परिस्थिती राजन खान आणि रेखा साने यांना अभिप्रेत आहे का? तुमचं मत वाचायला आवडेल.

सतीश तांब्यांच्या मुलाखतीतलं (नंदिनी, धन्यवाद!) एक वाक्य कळीचा मुद्दा ठरतं : ह्यासाठी येत्या काही वर्षांमध्ये मराठीत 'कलाविषयक' मूल्यांची सविस्तर चर्चा होणे अत्यंत गरजेचे आहे.

कलाविषयक मूल्यांची अभिप्रेत असलेली सविस्तर चर्चा करण्यासाठी भक्कम तात्विक अधिष्ठान आवश्यक आहे. आपण (म्हणजे मराठी सारस्वत) मुळं गमावून बसलेलो आहोत का? तसं असल्यास मूलोत्पाटित अवस्थेत आपण अशी चर्चा करू शकतो का?

तुमचं आणि इतर लेखकांचं मत वाचायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

अ‍ॅडमिन यांनी क्रोधे उत्पाटीलेली गापै यांची आयडी त्यांना परत मिळाली की काय!
असो.
हॅपी दिवाळी

मेधा, मस्त लिहिलं आहेस. माझ्याही मनात लिहिताना/ वाचताना सीन संपूर्ण उभा राहतो >>+१

मस्त चालू आहे चर्चा. भाग घेण्याइतकं मटेरिअल नसल्याने इथे मी वाचनमात्र Proud

मेधा, नेमकं लिहीलं आहेस.

माझ्या मते आधी ठरवलेलं नसताना जेव्हा एका ठिकाणी 'हाच तो क्षण, हीच ती जागा, जेथे ही कथा थांबते' असे वाटते, तेव्हा त्याला अनाहूत शेवट म्हणता येईल. एकदा ठरल्यानंतर तो अर्थातच जाणीवपूर्वक केलेला शेवट होतो, पण मुळात तसा शेवट करण्याचे ठरले होते का हा फरकाचा मुद्दा आहे तेंडुलकरांनी मांडलेला असे माझे मत.

'निळ्या अनंतिकेच्या शोधात' या माझ्या कथेवर शर्मिला आणि नंदिनी यांनी त्या कथेची कल्पना कशी जन्मली असा प्रश्न विचारला. त्या निमित्ताने मलाही माझ्या विचारांचा प्रवास शोधता आला. कथेच्या धाग्यावर दिलेला प्रतिसाद नंदिनीने सुचवल्याप्रमाणे इथे आणत आहे :

>>>>> कथा-कल्पना डोक्यात कशी जन्मली ते ऐकायला आवडेल. >>>>

खरंतर असा प्रश्न मला पहिल्यांदाच कोणीतरी विचारला आहे (आणि ते कोणीतरी म्हणजे कोणीतरी नव्हे तर शर्मिला आणि नंदिनी सारख्या मातब्बर स्त्रिया आहेत) त्यामुळे जरा अवघडच प्रसंग की!

या कथेचं बीज - अ‍ॅक्च्युअली अनेक बीजं - खूप दिवसांपासून आहेत डोक्यात. पण नक्की कल्पना अजिबात सुस्पष्ट नव्हती. मनात घोळणारे दोन-तीन सुटेसुटे विचार एका कथेत येतील असंही मला अजिबात वाटलं नव्हतं. खरंतर या विचारांवर एक कथा लिहिली जाईल अशीही मला स्वत:लाच कल्पना नव्हती.

पण मानवी शरीराच्या अनेक मर्यादा आहेत आणि आताच्या नव्या तंत्रयुगात जगण्याकरता शरीरात उत्क्रांती होऊन बदल अपेक्षित आहेत हा एक मुख्य विचारधागा होता.

जर उत्क्रांती झालीच तर अनेक अवयव निकामी ठरतील आणि असं होतं गेलं तर केवळ मेंदूची गरज उरेल. पण (फार प्राचीन भूतकाळात वाचलेल्या) 'ब्रेव्ह न्यू वर्ल्ड' मध्ये मांडल्याप्रमाणे जर जन्मताच मेंदूत माहिती भरली तर सगळ्यांकडे एक स्टँडर्ड असा माहितीचा संचय असेल ही संकल्पना जरा अजून पुढे नेऊन त्या माहितीबरोबरच एक स्वतंत्र 'व्यक्तीमत्त्वही' प्रत्येक बिंदूच्या खास व्यक्तिगत जाणिवेद्वारे अस्तित्वात राहील अशी संकल्पना डोक्यात आली.

कृष्णविवर ही संकल्पना तर असंख्य वेळा विज्ञानकथांतून वाचली आहे पण दरवेळी ती अर्धवट वाटायची. त्यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग हवा असं वाटत रहायचं ...... हे सगळे विचार प्राचीन भूतकाळी बरं (किंवा नजिकच्या भूतकाळातही असतील). डोळा मारा

नंतर मात्र खरंचच्या नजिकच्या भूतकाळात एक गंमत झाली. अचानक डोक्यात अनंतिका हा शब्द आला आणि त्या पाठोपाठ 'अनंतिकेच्या शोधात' असं शीर्षकही आलं. ते आधी नुसतंच आकर्षक वाटायला लागलं आणि मग बघता बघता त्याभोवती बाकीच्या संकल्पना फिट बसायला लागल्या. पण ते सगळं छोट्या छोट्या तुकड्यांत होतं. पहाटे झोपेतून जागी झाले की त्या तुकड्यांचं जिगसॉ पझल सोडवत बसायला मजा येत होती आणि ही प्रक्रिया आपोआपच होत असे.

कथा लिहिण्यास सुरवात करेपर्यंतही बर्‍याच गोष्टी धूसरच होत्या. म्हणजे त्या मनात होत्या पण नेमक्या जागी नेमक्या शब्दात कशा मांडल्या जातील याची मलाच खात्री नव्हती. पण लिहायला सुरवात केली आणि काळाची संकल्पना सुस्पष्ट कशी मांडायची, अंतिकेतल्या बिंदूची नक्की अवस्था कशी असेल, स्वप्न म्हणजे नेमकं काय हे न लिहिताही ते स्वप्न पडण्याच्या आधीची अवस्था कशी वर्णन करायची याची उकल होत गेली. त्याच वेळी कथेचा फॉरमॅटही नक्की झाला. सर्व खुलासे तर दिले गेले पाहिजेत पण तरीही कथेत एक प्रकारची संदिग्धता ठेवायची होती. वर मानुषीनं म्हटल्याप्रमाणे एक अदभुत वातावरण निर्माण करायचं होतं. अगदी रोखठोक विज्ञानकथा नव्हती मांडायची. तो प्रयत्न बर्‍यापैकी यशस्वी झालाय अशी आशा करते.

सुरवातीचं स्वप्नं अगदी सहज आलं. मात्र क्रोकेटूचं स्वप्नंही लिहिण्याची गरज आहे हे अगदी शेवटच्या क्षणी जाणवलं. या स्वप्नामुळेच पुन्हा पाण्यातून जीवन निर्माण होणार आहे आणि आपल्या पृथ्वीसारख्याच 'निळ्या जगाची' ती सुरुवात आहे हे अधिक ठळकपणे अधोरेखित केलं गेलं. म्हणून मग सुधारीत शीर्षक आलं - निळ्या अनंतिकेच्या शोधात. आणि निळी अनंतिका तर मग कृष्ण विवराकरता आपसूकच 'काळी अंतिका' हे आलंच.

कथेतली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला यात मानवी भावभावनांना थारा द्यायचा नव्हता. तसंच कथेतील पात्रांना स्त्री अथवा पुरूष अशा कोणत्याही कॅटेगरीत घालायचं नव्हतं. कथा पुन्हा वाचा. लिंगनिरपेक्ष आहे.

माझ्या मते आधी ठरवलेलं नसताना जेव्हा एका ठिकाणी 'हाच तो क्षण, हीच ती जागा, जेथे ही कथा थांबते' असे वाटते, तेव्हा त्याला अनाहूत शेवट म्हणता येईल. एकदा ठरल्यानंतर तो अर्थातच जाणीवपूर्वक केलेला शेवट होतो, पण मुळात तसा शेवट करण्याचे ठरले होते का हा फरकाचा मुद्दा आहे तेंडुलकरांनी मांडलेला असे माझे मत.<<< परफेक्ट.

असं माझ्याच एका कथेबद्दल माझे झाले होते. कथेचा शेवट झालाच होता. पण अजून पुढे एखादा परिच्छ्द लिहायचा होता, पण लिहिताना अचानक एक वाक्य असं लिहिलं गेलं की पुढे काहीच लिहावंसं वाटेना. त्याच वाक्याशी कथा संपली. हा "ठरवलेला शेवट" नव्हता. अचानक झाला. पण अगदी अनपेक्षित रीत्या, पण आजही माझ्याच कथामधला परफेक्ट जमलेला शेवट म्हणून मी याच कथेचा उल्लेख करेन.

Pages