कथालेखन - चर्चा आणि संवाद.

Submitted by नंदिनी on 27 November, 2012 - 04:36

सर्वच कथालेखक आणि लेखिकांना चर्चा करण्यासाठी व्यासपीठ. इथे कथा/कादंबरी या लेखन प्रकारावरची तांत्रिक अथवा सर्जनशील चर्चा आणि संवाद साधू शकता. रायटर्स ब्लॉक असल्यास इथे मदत घेऊ शकता, कथेसाठी पार्श्वभूमी बनवण्यासाठी आपण इथे एकमेकांची मदत करू शकतो.

कृपया, इथे चर्चा करत असताना संसदीय भाषेमधे चर्चा करा. तसेच, कुठल्याही होतकरू अथवा नविन कथालेखकांची इथे टिंगल करू नका. (कथांमधील चुका दाखवणे अथवा हलकीफुलकी मस्करी अवश्य चालू द्यात पण मुद्द्यांवरून गुद्द्यांवर येणे टाळा.

इथे आपले मुद्दे मांडण्याआधी आजवर झालेली चर्चा एकदा वाचून अवश्य घ्या म्हणजे पुन्हा तेच मुद्दे रीपीट होणार नाहीत.

हा धागा सध्या ग्रूपपुरताच मर्यादित ठेवला आहे.

हा अडमने चालू केलेला कथाकथी धागा. मायबोलीवरच्या उत्तम कथा त्याने इथे संकलित करून ठेवलेल्या आहेत. दिवाळी अंकांमधील कथा पटकन सापडत नाहीत कित्येकदा, तेव्हा या धाग्याचा उपयोग होऊ शकेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटते प्रामाणिक किंवा शुद्ध कलानिर्मिती(कथालेखनही त्यात आलेच) ही कोणाला काय बघायला/ वाचायला/ ऐकायला आवडेल या आडाख्यांना धरून असू नये.>>> नी, तसे नव्हे. कुणाला काय "आवडेल" यावरून नाही. आवडणं/न आवडणं ही पुढची लेव्हल आहे. त्याआधी ती कलाकृती योग्य "वाचकांपर्यंत" पोचणे गरजेचे आहे. टारगेट ऑडियन्स म्हणजे बालकथेचा वाचक, साय फाय कथांचा वाचक अशा पद्धतीने म्हटलं होतं.

मलाही काही लिहावेसे वाटत आहे याबाबतः

कथेमधील कलात्मकता म्हणजे काय या प्रश्नावर एक प्रश्न विचारत आहे. हा प्रश्न कशामुळे निर्माण झाला? अशी चर्चा इतरत्र कुठे कशावर तरी झालेली आहे काय? कथालेखन हीच मुळात एक कला आहे असे मानले तर त्यात पुन्हा कलात्मकता म्हणजे वेगळी काय असणार, असेही विचारावेसे वाटत आहे.

पण थोडे मुळाशी जायचे झालेच तर हे मनात आले.

कथालेखन हे निर्हेतूक नसते. एखादी कविता, एखादी ओळ, एखादे गीत हे निर्हेतुकपणे रचलेले असू शकते. याचे कारण जेव्हा ते रचणार्‍याची मनस्थिती सभोवतालच्या घटनांनी प्रभावित होऊन तरल होते तेव्हा आपोआप त्याच्या भावना एक साहित्यकृतीचे रूप (म्हणजे येथे कविता) घेऊन जन्माला येतात. कविता, गीत यांच्यात निव्वळ वर्णन, निव्वळ मोहकता, निव्वळ अनुभुती हे स्वतंत्रपणे येऊ शकतात. कवितेचा वापर वाचकाने एखाद्या विशिष्ट कार्यासाठी करावा असा हेतू त्यात नसतो. कविता ही कवीमनाची अशी अवस्था प्रकट करते ज्यात काव्यात्मतेशिवाय इतर काहीही नसते.

मात्र कथालेखन निर्हेतूक असू शकत नाही. कथालेखनापुढे (कोणतेही असेल) ध्येय असते. त्यात निव्वळ निसर्गवर्णन करून कोणी थांबणार नाही किंवा नुसते पावसाळ्यावर काव्यात्म बोलून कोणी थांबणार नाही. (अन्यथा ते 'ललित' होईल / ठरेल). कथालेखन हेतूपुरस्पर असल्याने त्याला आपोआप साचा आवश्यक ठरतो. हा साचा म्हणजे कथाविषय, त्यातील पात्रे, एकुण गुंफण, पूर्वनियोजीत ध्येयाकडे कथा नैसर्गीकपणे वळली आहे असे वाटावे इतक्या हातोटीने आणलेली कथेतील वळणे हे सर्व आले.

आता कथेतील कलात्मकता म्हणजे काय होईल?

तर (कथा हीच मुळात एक कला आहे हे काही क्षण बाजूला ठेवल्यास) एखादी देवीची मूर्ती समोर आणून पाहू. एखादी मूर्ती अगदीच दगडापासून बनवलेली, ओबडधोबड, कोणतेही संस्कार नसलेली, बटबटीत डोळे व प्रमाणहीन चेहर्‍याची असते. तरीही ती श्रद्धेस पात्र ठरतेच. तर एखादी मूर्ती विलक्षण सुंदर असते. तीही श्रद्धेस पात्र असते. पण अशी मूर्ती पाहताना मूर्तीतील सौंदर्यानेही भान हरपते, ही भावना 'फक्त श्रद्धा व भक्तीभाव' या पलीकडची असते. ही झाली कलात्मकता. जे सांगितले गेलेले आहे ते सकस, परिपक्व, मानवतावादी व नेमके आहे इतकेच पुरेसे असते खरे तर, पण त्याला कलात्मकतेची जोड मिळाल्यास ते सौंदर्यशास्त्रीयदृष्ट्याही प्रभावी ठरते.

यामुळे वापरलेले शब्द, उपमा, काव्यात्मकता, वर्णने, चित्रदर्शीत्व, जिवंतपणा आणण्यासाठी योजलेली कथावळणे, संवादात्मकता हे सर्व घटक कथेला कलात्मक बनवू शकतात. अशी कथा 'भावण्याची शक्यता' निव्वळ सकस कथेहून अधिक असतो. (म्हणजे कलात्मकता असली तरी मुळात कथावस्तू सकस असायलाच पाहिजे, पण कलात्मकतेने मांडलेली सकस कथा भावण्याची शक्यता अधिक असते).

कलात्मकतेला महत्व देणे अत्यावश्यक आहे असे माझे मत आहे. उदाहरणार्थ हिंदी चित्रपटातील नायिका अभिनय चांगला करू शकत असली तरी दिसायला अगदीच सामान्य किंवा ओबडधोबड असली तर प्रेक्षकाच्या मनात काय येईल? अश्या वेळी 'प्रेक्षकाला दृष्टिकोनात ठेवून आम्ही ही नायिका आणलेलीच नाही' असे म्हणणे कितपत योग्य ठरेल? 'जे प्रकाशित करायचे आहे ते रचताना आपोआप रसिक डोळ्यासमोर येतोच' हे सर्वमान्य व्हायला हरकत नसावी.

बाकी मुद्यांबाबत नंतर!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

टारगेट ऑडियन्स म्हणजे बालकथेचा वाचक, साय फाय कथांचा वाचक अशा पद्धतीने म्हटलं होतं. <<
बालकथेचं हो.
सायफाय वगैरे या जर प्रौढ वयाच्या लोकांसाठीच्या असतील तर टार्गेट ऑडियन्स हा मुद्दा मला महत्वाचा वाटत नाही.

सायफाय वगैरे या जर प्रौढ वयाच्या लोकांसाठीच्या असतील तर टार्गेट ऑडियन्स हा मुद्दा मला महत्वाचा वाटत नाही.>> नी, मी वाचकाला समोर ठेवून मग कथा लिहावी असे म्हणत नाहीये. Happy लिहिलेली कथा "योग्य वाचकापर्यंत" पोचायला हवी असे म्हणत आहे.
बाकी, तुझ्य मागच्या पानावरच्या पहिल्या मुद्द्याला "कथमधला खरेपणा आणि सच्चेपणा" याला पूर्ण अनुमोदन.

लिहिलेली कथा "योग्य वाचकापर्यंत" पोचायला हवी असे म्हणत आहे. <<
तो पुढचा मुद्दा झाला. लिहून झाल्यानंतरचा.

आपण काय लिहिले आहे ते वाचणार्‍यापर्यंत कसे पोचणारे या विचाराइतपत ठिके. बाकी योग्य वाचक हा मुद्दा मार्केटिंगचा लिहिण्याचा नाही. Happy

कलेची व्याख्या करता येत नाही तर कलात्मकतेची कशी करशील? >> अगदी बरोबर. शिवाय (गद्य साहित्याच्या संदर्भात) व्याख्या करण्यामध्ये गोची अशी आहे, मोठ्या कालखंडाच्या संदर्भात तिला काहीही अर्थ उरत नाही. गेल्या दहा दशकांचा साहित्य-इतिहास तपासा. कलात्मकता या शब्दाचे किती अर्थ बदलले, आणि किती वेगवेगळे अर्थ घेऊन लोकांनी लिखाण केले. कलात्मकतेचा अर्थ आणि त्याचं महत्व-महात्म्य यावर मोठमोठ्या साहित्यिकांत साग्रसंगीत वादही झाले, आणि गंमत म्हणजे हे सारे वाद यथावकाश 'आऊटडेटेड' आणि निरर्थकही झाले! प्रत्येकाने आपापल्या साहित्यात आपापल्या परीने ही 'कलात्मकता' उभी केली, दाखवली. फडक्यांची कलात्मकता वेगळी आणि सिग्निफिकन्सही वेगळं. रेग्यांची वेगळी. साने गुरूजींची वेगळी. खांडेकरांच्या लेखी तर उच्च जीवनध्येये असणं हीच कलात्मकता होती. साठच्या दशकात सो-कॉल्ड-आधुनिक लेखकांनी या 'कलात्मकतेच्या' भानगडीची तर चक्क खिल्ली उडवली. आधी हे 'नववादी' लोक कमी संख्येने असल्याने त्यांना कुणी गांभीर्याने घेत नव्हते. नंतर तेही वाढले, शिवाय साहित्य लेखनाचे विषय बदलले, वाढले. माध्यमे वाढली. वाचकांची समज वाढली. या सार्‍यांत 'चांगल्या' लिखाणाचे निकषही बदलत गेले. '..बाहेर येऊन त्याने वर चंद्राकडे पाहिलं, मग चंद्राची गरज नसल्यासारखा तो घराआत निघून गेला' हे वाक्य काही वाचकांना भंपक आणि कोरडं वाटलं, तर काहींना अचाट 'कलात्मक'. '..ती गेली.. तिच्यामागे तिने खानेसुमारीची अख्खी ओळच वाचवली..' अशा अंगावर येणार्‍या, पण आशयसंपन्न ओळींनी काय किमया केली, इतिहास घडवले हे सगळ्यांना माहिती आहे. 'कलात्मकता' म्हणून जे काय असेल, ते 'हे' नाही- असं म्हणायला आज नक्कीच धाडस लागेल.

आता माझ्या मते, तुझ्या प्रश्नांची उत्तरं सोपी आहेत..

२. कथा म्हटली म्हणजे तीत कलात्मकता असायलाच हवी का? >> नाही. उत्तम साहित्याचा हा एकमेव निकष नाही. शिवाय सर्वात कमी महत्वाचा निकष आहे.

३. कलात्मकता नसेल, तर कथा ही कथा म्हणवली जाणार नाही का? >> नक्कीच म्हणवली जाईल.

४. कलात्मकता असणारी कथा आणि कलात्मकता नसणारी कथा असे दोन प्रकार असू शकतात का? >> नाही. असे दोन प्रकार तयार करणं म्हणजे त्या 'कलात्मकते'ला खूप मोठं स्थान दिल्यासारखं आहे, जिची व्याख्याच आपण नीट करू शकत नाही आहोत. केलीच तर सारखी बदलते!

जर असतील, तर कलात्मकता असणारी कथा नेहमी वरचढ ठरेल का? >> अर्थात नाही.

५. लेखकाने निवेदनाचा ओघ, कथानकाचा बांधेसूदपणा सांभाळावा, की कलात्मकतेला अधिक महत्त्व द्यावं? >> कलात्मकतेची सतत काळजी करून कथा लिहू गेल्यास तिच्यातलं सत्व हरवेल, अशी मला भिती वाटते. कथा म्हणजे कविता नव्हे.

६. मुळात कशावर काय अवलंबून आहे? कलात्मकतेकडे लक्ष द्या, ओघ इ. आपोआप सांभाळलं जाईल, असं? >> नाही.
की ओघ, प्रतिपादन इ. काटेकोरपणे सांभाळा, कलात्मकता आपोआप प्राप्त होईलच, असं? >> असंही नाही खरं तर. जे 'आपोआप' साहित्यात येणारच आहे, त्याची इतकी काळाजी का करावी मुळात?

माझ्या मते सध्या जी फुकटची outlets निर्माण झाली आहेत जसे की blogs, माबो ह्यांनी दर्जा नक्कीच कमी झाला आहे. एका ब्रिटीश विचारवंतानी ह्या media explosion मुळे आता Age of Mediocrity होईल असे भाकीत केले होते. ते खरे झाले आहे.
आता सगळेच महागायक, महागुरु वगैरे.
पूर्वी कथा किंवा कादंबरी प्रकाशीत करायची सत्यकथेत कींवा माणुस मधे तर आधी प्रकाशक तपासुन घ्यायचा, त्यामुळे दर्जा रहायचा.

आता सुचले काहीतरी की लगेच ब्लॉग वर टाका.

माबोवर पण कथा , गजल लिहिणार्‍यांनी एकदा विचार करावा की जर हे छापले तर कोणी मुद्दाम जाउन विकत घेउन वाचेल का?

साजिरा. उत्तम पोस्ट.

कलात्मकतेची सतत काळजी करून कथा लिहू गेल्यास तिच्यातलं सत्व हरवेल, अशी मला भिती वाटते. >>> यावर जरा अजून लिहू शकशील का?

नक्की लिहिन नंदिनी, जमेल तसं. पण ते सारं खरं तर माझ्यापुरतंच. दुसर्‍या एखाद्या लिहिणार्‍याची थॉट प्रोसेस आणि लेखनप्रवास वेगळा असू शकेल, हे अर्थातच मान्य आहे.

एकंदरितच या धाग्यावर लेखकांनी (स्वतःच निवडलेल्या स्वतःच्या एखाद्या) 'कथेचा प्रवास' कसा होत गेला, यावर लिहावं असं वाटत होतं. कारण 'असं असावं' हे जे काही या धाग्यावर आपण लिहितो आहोत, ते स्वतःच्याच अनुभवांवरचे आधारित ठोकताळे असतात ना. नियम, साचा, पद्धत असं ठरलेलं काहीच नाही. प्रत्येकाचं वेगळं. Happy

दुसरं असं, की दुसर्‍या कथेबद्दल असं काही त्याच्या तोंडून ऐकणं मनोरंजक असू शकतं. शिवाय आपल्या नजतेतून आणि विचारपद्धतीतून काही लुपहोल्स नेहमी सुटतात, त्याकडे नव्या दृष्टीने बघता येईल.

अरे वा! छान चर्चा... Happy

बेफिकीर, तुम्ही मूर्तीच्या सौंदर्याचं उदाहरण दिलंत. पण ते व्यक्तिनिष्ठ आहे. मूर्तीकडे पाहतानाचा त्या-त्या व्यक्तीच्या मनातला भाव अधिक महत्त्वाचा असतो. (इथे आस्तिक-नास्तिक किंवा सश्रध्द-अश्रध्द हा विषय अथवा वाद उकरून काढायचा उद्देश नाही, पण मला अधिक सुंदर मूर्ती आणि कमी सुंदर मूर्ती यातला फरक कधीच कळत नाही, कारण मूर्तीकडे पाहताना माझ्या नजरेत तो भावच नसतो. शिवाय शिल्पकलेतलंही काही कळत नसल्यामुळे त्या दृष्टीकोनातूनही पाहिलं जात नाही.)
मग तसंच, कथेतल्या कलात्मकतेबद्दल म्हणता येईल का? कथा या साहित्यप्रकाराबद्दल वाचकाच्या मनात जो आणि जितका इन्टेन्स भाव आहे, त्यावर त्या कथेचं चांगली कथा / उत्तम कथा / उकृष्ट कथा / श्रेष्ठ कथा असं वर्गीकरण तो करेल का?

सापेक्षतेच्या विश्वात आपण प्रत्येक क्षण व्यतीत करत असल्यामुळे अनेक आणि त्यातल्या त्यात कला या क्षेत्रात 'अ‍ॅबसोल्यूट' सुंदर असे काही असू शकत नाही याचे भान आहे. पण बिरबलाने अकबराच्या रेषेला लहान करण्यासाठी मोठी रेघ काढली ते 'तुलनेने लहान करण्यासाठी' त्याचप्रमाणे ओबडधोबड प्रमाणहीन मूर्तीसमोर सुबक मूर्ती अधिक कलात्मक वाटणे हे शक्य असावे. आता प्रमाणहीनता व सुबकता यांच्यातही सापेक्षता आहे इतपत मर्यादा चर्चेतून गाठणे आपल्याला अभिप्रेत नसेल असा अंदाज आहे. त्यामुळे सकृतदर्शनी असे म्हणता येईल की सर्वमान्य सौंदर्यशास्त्रीय परिभाषा व सौंदर्याची आकलनक्षमता यानुसार सुंदर मूर्ती व सुंदर नसलेली मूर्ती हा फरक करणे कोणत्याही माणसाच्या बाबतीत सहज घडू शकेल व त्यामुळे त्या प्रमाणापुरते ते 'अ‍ॅबसोल्यूट' ठरेल.

आता समजा एखाद्याला ही चर्चा 'प्रमाणहीनताही सुंदर असते' अश्या पातळीला न्यायची झाल्यासः

१. त्यातील कलात्मकता 'एक्स्ट्रॅक्ट' करून दाखवावी लागेल

२. ती सुंदर मूर्तीतील सौंदर्यवादी कलात्मकतेपेक्षा कशी भिन्न आहे व कोणत्या सौंदर्यशास्त्रीय तत्वावर विसंबलेली आहे हे विश्लेषण करून दाखवावे लागेल.

३. याला सर्वमान्यत्वाची आवश्यकता नसली तरी निदान (२ + २ = ४) हे समीकरण किमान { (२ + ३) - १ } = ४ असे मांडले गेले आहे हे तरी सर्वमान्य व्हावे. यातील उत्तर '४' हेच वेगळे असायला हवे अशी भूमिका असल्यास, म्हणजे '४' म्हणजेच सौंदर्य नव्हे, कलात्मकता नव्हे तर ५. ६, ८ या कश्यातही कलात्मकता आहे हे म्हणायचे असल्यास तो प्रवाह रुंद व्हायला हवा व त्याला काळ लागेल.

४. प्रवाह रुंद करण्यासाठी उगम प्रामाणिक असावा लागतो, धीर असावा लागतो आणि वैचारीक सातत्य आवश्यक ठरते. सबूरीने घ्यावे लागते, पण ते कधीतरी होऊ शकते.

बाकी या सर्व भूमिका शेवटी सौंदर्यशास्त्रीय परिघाला ओलांडून तात्वज्ञानिक वर्तुळात पोचतात तेव्हा आधीच्या संज्ञांना, कसोट्यांना, निकषांना फारसे संदर्भ राहत नाहीत हेही खरे.

धन्यवाद

-'बेफिकीर'!

सुबकतेची व्याख्या काय?
प्रमाणबद्ध किंवा प्रमाणहीन याची व्याख्या काय?

सुबकतेची व्याख्या काय?
प्रमाणबद्ध किंवा प्रमाणहीन याची व्याख्या काय?<<<

प्रादेशिकतेमध्ये व दीर्घकाल टिकलेल्या संस्कृतीमध्ये व्यवहार्य, मानवतावादी, सौंदर्यशास्त्रीय, तात्विक व अध्यात्मिक असे काही अलिखित परंतु सर्वमान्य निकष आपोआप ठरून जातात. जसे लहान आकाराचे पाऊल ही चीनमधील सौंदर्याची (अनेकपैकी एक) व्याख्या आहे तर गालाला खळी पडणे ही (किमान) आपल्याकडील! ही फक्त वरवरची उदाहरणे आहेत.

आज जगामध्ये स्त्रीची मूर्ती ही बारीक कंबर, उठावदार अवयव, मोठे बोलके डोळे, अश्याप्रकारच्या सुंदरतेच्या निकषांवर तपासली जाते (यात पुरुषप्रधानता वगैरे बाबी नाहीत, ही फक्त सध्याच्या संस्कृतीची दृष्टी आहे).

असे निकष आपोआप स्वतःची परिमाणे निर्माण करतात व त्यानुसार सुबक व प्रमाणहीन हे शब्द आपापली व्याख्या निर्माण करून ठाम होत राहतात.

'तिच्या पोलक्याला मग माया का न असावी' ही माझी कविता याच विषयावर होती, पण तेव्हा हा विषय बहुधा कोणालाच स्ट्राईक झाला नाही त्या कवितेतून, त्यामुळे ती मागे पडत गेली.

धन्यवाद

ही फक्त सध्याच्या संस्कृतीची दृष्टी आहे <<
हे महत्वाचे आहे.
काल, प्रदेश, त्या त्या व्यक्तीची/समूहाची पार्श्वभूमी अश्या अनेक बाबींना धरून सौंदर्याच्या जाणिवा बदलत असतात.

तुमच्या दुसर्‍या धाग्यावर पण मी म्हणलेय त्याप्रमाणे सौंदर्यवाद आणि सौंदर्यशास्त्र यांच्यात गल्लत होताना दिसतेय मला. सौंदर्यवाद = सौंदर्यशास्त्र नव्हे.

मी विद्यार्थ्यांना डिझाइनचे घटक व मूलतत्वे शिकवते (Elements & Principles of Design). कुठल्याही दृश्य कलेच्या (चित्र, शिल्प इत्यादी) किंवा दृश्य कलेशी निगडीत (आर्किटेक्चर, इतर कुठलेही डिझायनिंग इत्यादी) अभ्यासाचा हा पाया असतो. त्यामधे मूलतत्वांच्यात 'प्रमाण' किंवा प्रपोर्शन हे एक तत्व असते. प्रमाण हा दोन गोष्टींचा एकमेकांशी असलेला रेश्यो आहे. तो रेश्यो अमुक असणे म्हणजे प्रमाणबद्धता असे म्हणले जाते. पण या प्रमाणबद्धतेची संदर्भचौकट ठरलेली असते. संदर्भचौकटीच्या पलिकडे प्रमाणबद्धता रिडंडंट (प्लीज योग्य मराठी शब्द सांगा) होते.

तुमच्या त्या धाग्यावरील प्रतिसादावर मी दिलेले हे मत येथे केवळ चर्चेतील प्रवाहीपणा राहावा म्हणून कॉपी पेस्ट करत आहे.

>>>सौंदर्यवाद हे कलाकृतीचे एकमेव ध्येय असल्याचे मी वर म्हंटले असावे असे सध्या वाटत नाही. तरी लेख पुन्हा वाचून पाहतो. ते एकमेव ध्येय नाहीच. पण समीक्षेस पात्र लेखनाच्या वरचा दर्जा सौंदर्यशास्त्रीय लेखन इतपत म्हंटले असावे.<<<

विस्मया, या चर्चेमधे सुरूवातीलाच कथेशी संदर्भात तुम्ही आणखी सहज सुचलं म्हणून या जो पॅरा लिहिला आहे तिथे येऊन गेलं आहे. अर्थात तुमच्या मताला अनुमोदन आहेच.

गोष्टीची सुरूवात, मध्य आणि शेवट नजरेच्या टप्प्यात आल्याशिवाय ती लिहायला घेऊ नये असं मला वाटतं. फारतर नवीन सुचलेली कल्पना लिहून ठेवायची सवय असू द्यावी. ऑनलाईन क्रमशः कादंबरी लिहीताना वाचकांचं प्रेशर येण्याचा धोका असतो हे मला गेल्या वेळी अनुभवाला आलं. >>>> ह्म्म.. माझ्या डोक्यामधे सुरूवातीचं वाक्य आणि शेवटचं वाक्य या दोन गोष्टी ठाम असतात. या दोन "वाक्यांमधला" प्रवास म्हणजे माझी कथा असत नाही. कारण, सुरूवात, मध्य आणि शेवटपेक्षा माझ्या डोक्यामधे पात्रं आधी तयार होतात. पात्रांचं दिसणं वागणं बोलणं ते कुठे शिकले अस्तील, कुठे काम करत असतील हे आधी पक्कं होत जातं आणि मग अशा विविध पात्रांना एकत्र प्रोसेसर्मधे घातलं की जे काय तयार होइल ते माझं लेखन, माझ्या दृष्टीने घटना आपोआप घडत जातात, त्या घटनांना एखादे पात्र जसे रीअ‍ॅक्ट होईल त्यावरून कथा बनत जाते.

लिखाण स्वतःला आवडलं पाहीजे. >>> न्म्हणजे नक्की कसं आवडलं पाहिजे? अ‍ॅज अ लेखक की अ‍ॅज अ वाचक? माझी लेखनशैली बघता मला माझं कुठलंच लिखाण आवडणार नाही. ती माझी वाचनपद्धती नव्हे. पण मला जसं वाचायला आवडतं तसं जर मी लिहिलं तर मी कधीच काही लिहिणार नाही. Happy माझे वाचन आणी लेखन या पूर्ण भिन्न गोष्टी आहेत. मस कसं जमणार? (स्किझोफ्रेनिक आहे का मी?)

एकंदरितच या धाग्यावर लेखकांनी (स्वतःच निवडलेल्या स्वतःच्या एखाद्या) 'कथेचा प्रवास' कसा होत गेला, यावर लिहावं असं वाटत होतं. >> याला +१००. असा उपक्रम करायचा का? कोण कोण तयार आहेत हात वर करा. Happy

हेच बरे होईल. अन्यथा कार्यशाळेत शिकवल्यासारखं बरेच जण बोलत रहातात.
माझा हात वर.

नी, ओके. तुझी कुठलीही एक कथा घे. (मी आणि नवा पाऊस ?) आणि त्यावर लिही. Happy

ही चर्चा वाचली नाही. शक्यही नाही.
<<< विस्मया, चर्चा वाचणे का बरे शक्य नाही? पूर्ण चर्चा वाचली असती तर रीपीट होणारे मुद्दे टळले असते. असो. Happy

कथा या साहित्यप्रकाराबद्दल वाचकाच्या मनात जो आणि जितका इन्टेन्स भाव आहे, त्यावर त्या कथेचं चांगली कथा / उत्तम कथा / उकृष्ट कथा / श्रेष्ठ कथा असं वर्गीकरण तो करेल का?>> ललिता, वाचकाच्या वर्गीकरणावर कथेचा दर्जा अवलंबून असतो का? असा माझा प्रतिप्रश्न आहे. Happy

अ‍ॅज अ लेखक की अ‍ॅज अ वाचक? माझे वाचन आणी लेखन या पूर्ण भिन्न गोष्टी आहेत. मग कसं जमणार? <<<

अगदी प्रामाणिक शब्दात मनातील भावना सांगायच्या तर हा घोळ असून तो आधी निस्तरणे आवश्यक आहे. हे विधान वैयक्तीक रोख असलेले नसून ते निव्वळ वरील दोन वाक्ये वाचून मनात आलेल्या भावना ज्या शब्दांत आल्या त्याच शब्दांत व्यक्त करणे आहे. तरीही राग आला असल्यास प्रतिसादातील तो भाग वगळेन.

एका माणसाची दोन भिन्न क्रियांमधील अभिरुची भिन्न 'दर्जाची' असू शकते हे म्हणणे मला पटते. म्हणजे सेहवागने अधिकाधिक चौकार लगावावेत असे वाटणारा स्थानिक फलंदाज स्वतः एकेरी दुहेरीवर भर देऊन सामना फिरवण्याकडे कल असणारा असू शकतो हे समजू शकतो. (ही नेमकी अभिरुची नसून शैली झाली, पण लगेच सुचलेले उदाहरण म्हणून ते वापरले इतकेच - चौकार, एकेरी, दुहेरी हे सर्व त्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे बदललेल्या पॉलिसीजचेही परिणाम असू शकतात हेही मान्यच).

पण इतराने केलेल्या एखाद्या क्रियेमध्ये आपल्याला जे सर्वात आवडते, ती क्रिया आपण स्वतः करताना तेच आपणही अ‍ॅचिव्ह करायला हवे असे कसे काय वाटत नाही हे मला तरी समजू शकत नाही. म्हणजे वाचक म्हणून मला इतरांच्या लेखनातील जे आवडेल ते लेखक म्हणून मला अ‍ॅचिव्ह तर करता यायलाच हवे. ते अ‍ॅचिव्ह केल्यानंतर जाणीवपूर्वक वेगळेपण किंवा स्वत्व जपण्याच्या भूमिकेतून काही वेगळे लेखन केलेच तर ते आधी जे इतरांचे आवडत होते त्यापेक्षा (एक वाचक म्हणून) आपल्यालाच अधिक आवडणारे असायला हवे असे मला वाटते.

आपल्याला इतरांचे लेखन वाचक म्हणून आवडणे याचे निकष वेगळे आणि आपले लेखन आपल्याला लेखक म्हणून व वाचक म्हणून आवडणे / न आवडणे याचे निकष वेगळे असे होणेच मला का पटत नाही आहे हे मला समजत नाही आहे. आपल्याला आपल्याच लेखनापैकी अमुक तमुक हे आपल्याच लेखनापैकी दुसर्‍या अमुक तमुकपेक्षा कमी जास्त आवडणे हे मी समजू शकतो. पण जे आपल्याला वाचक म्हणून आवडू शकत नाही ते लेखक म्हणून लिहिता कसे येते? लिहावेसे कसे वाटते?

माझ्याकडून ज्या काही थोड्याफार कथा लिहिल्या गेल्या, त्यांपैकी कशातही शेवट नजरेच्या टप्प्यात सुरूवातीला आला नाही. त्यातल्या बर्‍याचशा कथांचा मध्य देखील नाही. नंदिनी म्हणते तसं पात्रं कागदावर उतरत गेली आणि शेवटी कथा तयार झाली. 'गावशीव' ही 'आजी'ची कथा म्हणून लिहायला घेतली, शेवटी ती झाली 'गावाची'. 'विहीर' ही राघोनानांची म्हणून लिहायला घेतली, नंतर 'विहीर' हे पात्र म्हणून पुढे आलं, आणि ती फक्त राघोनानांची म्हणून राहिली नाही. 'आज दिनांक' चेही तेच. 'इन्हाईट' चा प्रवास (माझ्या दृष्टीने) सर्वात रोमांचकारक होता, आणि 'पाखरू वेल्हाळ..' ने 'लिहून झाल्यानंतर' सर्वात जास्त समाधान दिलं. 'अंतर' चं पुढे काय होईल तेच ठाऊक नव्हतं, ते लिहिताना सुचत गेलं.
अशी अनेक उदाहरणं.

लिखाण स्वतःला आवडलं पाहीजे. >> या गोष्टीला माझ्यालेखी तरी काही अर्थ नाही. माझ्या पात्रांत मी इतका गुरफटून जातो समजा, की सदोष अपत्यांवर जरा जास्तच प्रेम करावं तसं माझं होतं. सारासार विचार (निदान त्यावेळेला तरी) करू शकत नाही. मग 'स्वतःचं लिखाण स्वतःला आवडणं ही संपूर्ण बायस्ड प्रक्रिया होऊन बसते, आणि मग निरर्थक. याला 'स्वान्तसुखाय'चाही एक पदर आहे, पण त्या पातळीला मी अजून पोचलो नसेन. Happy नंदिनी म्हटल्याप्रमाणे माझ्याही दृष्टीने 'लिखाण' आणि 'वाचन' भिन्न गोष्टी आहेत. मला पु.शि.रेगे किंवा प्रवीण दवणे आवडतात (समजा). त्यांच्या शैलीत लिहिण्याचा प्रयत्न करून तसं (समजा) जमलं तर मी समाधानी व्हायचं का? हा प्रश्नच आहे.

सौंदर्यवादाबदलही नीरजेला अनुमोदन. सौंदर्य आणि कला हे कथेचे परिणामस्वरूप पुढे येऊ शकतात. कथेचे कारण म्हणून नाही आणि आवश्यक घटक म्हणूनही नाही. (आता सहजच 'चिन्ह च्या बीबी वर झालेले वाद-संवाद आठवले. प्रमाणबद्धता म्हणजे सौंदर्य, शिवाय त्यातच कलाही- अशी काही मतं असतात. अशी परफेक्ट प्रमाणबद्धता आजूबाजूला किती आढळते? आजूबाजूला जे आढळतं, दिसतं, ते मी माझ्या चित्रांत, कथांत, सिनेम्यात तसंच्या तसं रेखाटून दाखवलं तर ते सौंदर्य नाही का? त्याहीपुढचे प्रश्न म्हणजे नीरजेने विचारलेले 'सुबकतेची व्याख्या काय? प्रमाणबद्ध किंवा प्रमाणहीन याची व्याख्या काय?' आय वंडर!!)

बेफिकीर, थेअर्‍यांची चौकट अनेकांनी नाकारली आहे हो. व्याकरणाची किंवा शास्त्राची पुस्तकं समोर लिहून कॉपी केल्यागत तुम्ही तरी कधी कथा, कादंबरी लिहिली आहे का? तुमच्या काही कथांत मला 'उत्स्फुर्तता' जाणवली. वारं भरल्यागत लिहून काढलं असणार तुम्ही. तेच तुमच्यापुरतं (किंवा त्या त्या लिखाणापुरतं) सौंदर्य, कला आणि साहित्यातलं जीवन आणि ध्येयवाद आणि शास्त्र. साहित्याची समीक्षा आणि अध्यात्म या वगैरे कितीतरी पुढच्या गोष्टी, आणि (माझ्या दृष्टीने) अनावश्यकही. लिहित जाताना (आणि सोबत वाचनामुळेही) काही गोष्टी, तंत्रं, सत्त्वं नक्कीच कळत जातात, पण तो स्वतःचाच प्रवास असतो, आणि प्रत्येकाचा वेगळा असू शकतो.

तेच सौंदर्य, कला आणि साहित्यातलं जीवन आणि ध्येयवाद आणि शास्त्र. साहित्याची समीक्षा आणि अध्यात्म या वगैरे कितीतरी पुढच्या गोष्टी, आणि (माझ्या दृष्टीने) अनावश्यकही. लिहित जाताना आणि सोबत वाचनामुळेही) काही गोष्टी, तंत्रं, सत्त्वं नक्कीच कळत जातात, पण तो स्वतःचाच प्रवास असतो, आणि प्रत्येकाचा वेगळा असू शकतो.>>साजिरा, क्या बात.

पूर्ण पोस्ट पटलं आणि आवडलं. तुझ्या कथांमधला प्रवास अजून वाचायला आवडेल.

माझ्याकडून ज्या काही थोड्याफार कथा लिहिल्या गेल्या, त्यांपैकी कशातही शेवट नजरेच्या टप्प्यात सुरूवातीला आला नाही. त्यातल्या बर्‍याचशा कथांचा मध्य देखील नाही.<<<

कथावस्तू / विषय / काय सांगायचे आहे, हे मनात ठरल्याशिवाय कथालेखन सुरू होणे हे कथालेखनाची प्रेरणा मनामध्ये आहे, पण अचूक संदेश निर्माण झालेला नाही आहे याचे निदर्शक वाटते. प्रेरणा आहे याचा अर्थ मनाच्या तळाशी खूप साठलेले आहे. एक समाज, अनेक पात्रे, एक संस्कृती, एक लढाई हे सगळे मनाने टिपून घेतलेले आहे आणि कवीमनाच्या किंवा लेखकमनाच्या व्यक्तीला त्यातून एक शाब्दिक विश्व साकारायचे आहे ज्याला पुढे कविता, कथा असे कोणतेही साहित्यस्वरूप मिळेल. प्रेरणा येथे समाप्त झाली. मन स्वतःलाच आतून ठोठावून आठवण करून देत असते की 'साचले आहे, व्यक्त हो, सांगण्यासारखे खूप आहे'! प्रेरणा येथे समाप्त झाली. या प्रेरणेबरहुकूम माणूस शंभर पाने लिहूनही काढू शकतो. पण 'काय सांगायचे आहे' हे (ठरवावे लागतच नाही, ठरलेही जाते आपोआप) हे कोणत्यातरी आधीच्याच पातळीला ठरले जाते. यामुळे कथेचा शेवट ज्ञात असणे हे मला तरी कथालेखनामागचे तत्व वाटते. पात्रांवरील प्रेमामुळे कथा काहीशी भरकटली तरी शेवटी समेवर येणे हे कर्तव्य वाटते.

सदोष अपत्यांवर प्रेम करावं तसं माझं होतं. सारासार विचार (निदान त्यावेळेला तरी) करू शकत नाही. मग 'स्वतःचं लिखाण स्वतःला आवडणं ही संपूर्ण बायस्ड प्रक्रिया होऊन बसते,<<<

या पातळीला मी पोचलेलो नाही आहे. पात्रांवर प्रेम केले, त्यांना मोकळीक दिली, पण जे लिहीत आहे ते त्याक्षणी मला स्वतःला आवडत आहे ही स्वार्थी भावना त्याच्या मुळाशी राहिली. माझी पात्रे मलाच पटू न शकणारे वागली नाहीत. अरे, हा महेश पेंढारकर असा कसा वागतोय हा प्रश्न माझ्या वाचकांना पडला, मला कधीच नाही. मला तो तसाच पेंट करायचा होता. हे फक्त एक उदाहरण म्हणूनच!

आजूबाजूला जे आड्षळतं, दिसतं, ते मी माझ्या चित्रांत, कथांत, सिनेम्यात तसंच्या तसं रेखाटून दाखवलं तर ते सौंदर्य नाही का?<<<

आजूबाजूला असलेली कुरुपता रंगवणे व ती समाजासमोर आणणे हे सौंदर्यच आहे असा अट्टाहास का आवश्यक वाटावा? सौंदर्यवादीच लिहिले पाहिजे असे कुठे आहे? कुरुप वास्तव कथन करावे की? पण त्याला सौंदर्य म्हंटले जावे हा आग्रह नसावा असे मला वाटते. अश्या लेखनाला 'वास्तववादी' हे विशेषण पुरेसे वाटत नाही का? ते सौंदर्य नाही आहे हे पचवून घेण्यात कोणताही कमीपणा आहे असे मला तरी वाटत नाही. बुधवार पेठ या माझ्या कादंबरीत नावालाही सौंदर्य नाही असे कोणी म्हणाले (मीही म्हणतोच) तर मला त्याचे काहीच वाटणार नाही.

तो स्वतःचाच प्रवास असतो, आणि प्रत्येकाचा वेगळा असू शकतो.<<< पूर्ण सहमत. मी वरील कोणत्याही प्रतिसाददात्याच्या स्वानुभवांचा अनादर केलेला नाही. ज्याचा त्याचा प्रवास ज्याचा त्याचा! याच तत्वांनुसार माझे प्रतिसादही आहेत. पण वारं भरल्यागत लिहून काढले म्हणजे मी जे निकष मानतो ते वेशीवर टांगून लिहून काढले असे होत नाही. एका सिटिंगमध्ये लिहून काढले काय किंवा वीस बैठकींमध्ये! ज्याला एखादी थेअरींची चौकट मानायची आहे तो कोणत्याही वेगामध्ये ती मानूनच लेखन करेल असे मला वाटते.

ही चर्चा वाचली नाही. शक्यही नाही. <<
विस्मया यांच्या पोस्टची ही सुरूवात असल्याने त्यांची पोस्ट वाचण्याचे कष्ट घ्यायची गरज वाटली नाही. तस्मात त्यांच्या पोस्ट बाबतीत माझा पास.

>> ती क्रिया आपण स्वतः करताना तेच आपणही अ‍ॅचिव्ह करायला हवे असे कसे काय वाटत नाही हे मला तरी समजू शकत नाही. <<
मला वाटतं ते वाटत नाही असं नसावं. घडत नाही असं असावं. आणि त्याची खालील कारणे असू शकतात.
१. अमुक अ‍ॅचिव्ह करण्याच्या प्रक्रियेमधे असणं. पण ज्या शैलीचं जमतंय ते सराव म्हणून का होईना चालू ठेवणं.
२. अमुक अ‍ॅचिव्ह करायचे अनेक फसलेले प्रयत्न असणं ज्यातून आपली क्षमता ती/तेवढी नाही असे वाटणं
३. अमुक अ‍ॅचिव्ह करण्यासाठी आपला पिंड त्या प्रकारचा नाही याची कल्पना असणं.

ही व्हॅलिड असावीत कारणं.

आजूबाजूला असलेली कुरुपता रंगवणे व ती समाजासमोर आणणे हे सौंदर्यच आहे असा अट्टाहास का आवश्यक वाटावा? सौंदर्यवादीच लिहिले पाहिजे असे कुठे आहे? कुरुप वास्तव कथन करावे की? पण त्याला सौंदर्य म्हंटले जावे हा आग्रह नसावा असे मला वाटते. अश्या लेखनाला 'वास्तववादी' हे विशेषण पुरेसे वाटत नाही का? ते सौंदर्य नाही आहे हे पचवून घेण्यात कोणताही कमीपणा आहे असे मला तरी वाटत नाही. बुधवार पेठ या माझ्या कादंबरीत नावालाही सौंदर्य नाही असे कोणी म्हणाले (मीही म्हणतोच) तर मला त्याचे काहीच वाटणार नाही. <<<
अगदीच पण मग तिथे सौंदर्यशास्त्राचा संबंध नाही असं नाही ना?

१. अमुक अ‍ॅचिव्ह करण्याच्या प्रक्रियेमधे असणं. पण ज्या शैलीचं जमतंय ते सराव म्हणून का होईना चालू ठेवणं.
२. अमुक अ‍ॅचिव्ह करायचे अनेक फसलेले प्रयत्न असणं ज्यातून आपली क्षमता ती/तेवढी नाही असे वाटणं
३. अमुक अ‍ॅचिव्ह करण्यासाठी आपला पिंड त्या प्रकारचा नाही याची कल्पना असणं.

ही व्हॅलिड असावीत कारणं.<<<

बरोबर!

मला खरंच संवाद येथेच यावा असे वाटत होते. आता वरील तीनपैकी कोणतेही, कोणतीही दोन किंवा तीनही कारणे कमीअधिक प्रमाणात कारणीभूत असल्यानंतरही जर माणूस लिहीत राहिला (असे, जे त्याला स्वतःला वाचक म्हणून आवडू शकत नाही) तर ते लेखन कोणाला तरी आवडेल / आवडत असेल असे वाटणे हा जुगार झाला ना? म्हणून विस्मया जे म्हणतात ते मला पटते की आपले लेखन आपल्याला आपल्या वाचक म्हणून असलेल्या अभिरुचीनुसारही आवडायला हवे. (आणि म्हणून मी वर एकदम हासलो होतो, बाकी काही गैरसमज नसावा).

Pages