कथालेखन - चर्चा आणि संवाद.

Submitted by नंदिनी on 27 November, 2012 - 04:36

सर्वच कथालेखक आणि लेखिकांना चर्चा करण्यासाठी व्यासपीठ. इथे कथा/कादंबरी या लेखन प्रकारावरची तांत्रिक अथवा सर्जनशील चर्चा आणि संवाद साधू शकता. रायटर्स ब्लॉक असल्यास इथे मदत घेऊ शकता, कथेसाठी पार्श्वभूमी बनवण्यासाठी आपण इथे एकमेकांची मदत करू शकतो.

कृपया, इथे चर्चा करत असताना संसदीय भाषेमधे चर्चा करा. तसेच, कुठल्याही होतकरू अथवा नविन कथालेखकांची इथे टिंगल करू नका. (कथांमधील चुका दाखवणे अथवा हलकीफुलकी मस्करी अवश्य चालू द्यात पण मुद्द्यांवरून गुद्द्यांवर येणे टाळा.

इथे आपले मुद्दे मांडण्याआधी आजवर झालेली चर्चा एकदा वाचून अवश्य घ्या म्हणजे पुन्हा तेच मुद्दे रीपीट होणार नाहीत.

हा धागा सध्या ग्रूपपुरताच मर्यादित ठेवला आहे.

हा अडमने चालू केलेला कथाकथी धागा. मायबोलीवरच्या उत्तम कथा त्याने इथे संकलित करून ठेवलेल्या आहेत. दिवाळी अंकांमधील कथा पटकन सापडत नाहीत कित्येकदा, तेव्हा या धाग्याचा उपयोग होऊ शकेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

So what दिनेशदा? साजिरी ही माझी पत्नी आहे आणि तिला स्वतःचा अभिप्राय द्यायचा पूर्ण अधिकार आहे ! तिने दिलेले ३ प्रतिसाद (प्रत्येकी १ ओळीचे ) तुम्हाला खपत नाहीयेत. तुम्ही चिरफाड करत दिलेले शेकडो ओळींचे शेकडो प्रतिसाद तिला खपले नाहीत ह्यात काही आश्चर्य नाही !

आणि हो दिनेशदा, कधी मला आणि साजिरीला एकत्र भेटायची इच्छा झालीच (पुराव्या प्रित्यर्थ का होई ना), तर माझ्या किंवा साजिरीच्या विपू वर जरूर लिहा ! You are most welcome to visit our home !!

एक निरिक्षणः

अनेकदा कविता लिहून मोकळे झाल्यासारखे वाटते तर अनेकदा कविता पूर्ण होऊनही हुरहूर लागल्यासारखे वाटते.

कथालेखनाच्या बाबतीत कसे कसे अनुभव आहेत ते शेअर करण्यात स्वारस्य असेल का?

धन्यवाद!

=============

माझा अनुभवः

'अजूनही (पात्रांची) मानसिकता व भावना, तसेच वर्तन यातील किचकटपणाला व गुंतागुंतीला अधिक सोडवता आले असते व ते या कथेत आधीच्या कथेपेक्षा अधिक जमले असले तरी हवे तितके जमले नाही' अशी एक हुरहूर लागते. याशिवाय, लेखन विविध कालावधीवर 'स्प्रेड' झालेले असेल तर काही पात्रे लेखकाच्या त्या त्या वेळच्या मूडप्रमाणे स्वतःचे वर्तन अचानक तात्कालीनरीत्या बदलू शकतात व किंचित अनप्रेडिक्टेबल होतात. कुठे व कसा कंट्रोल असावा याचे पूर्ण भान असले तरीही असे होणे हे अ‍ॅक्च्युअली आनंददायी ठरू शकते / ठरते.

हा एक अनुभव किंवा हे दोन अनुभव झाले. अजूनही अनेकविध अनुभव येत राहतात.

'अजूनही (पात्रांची) मानसिकता व भावना, तसेच वर्तन यातील किचकटपणाला व गुंतागुंतीला अधिक सोडवता आले असते व ते या कथेत आधीच्या कथेपेक्षा अधिक जमले असले तरी हवे तितके जमले नाही' अशी एक हुरहूर लागते. याशिवाय, लेखन विविध कालावधीवर 'स्प्रेड' झालेले असेल तर काही पात्रे लेखकाच्या त्या त्या वेळच्या मूडप्रमाणे स्वतःचे वर्तन अचानक तात्कालीनरीत्या बदलू शकतात व किंचित अनप्रेडिक्टेबल होतात. कुठे व कसा कंट्रोल असावा याचे पूर्ण भान असले तरीही असे होणे हे अ‍ॅक्च्युअली आनंददायी ठरू शकते / ठरते. >> सहमत आहे. कित्येकदा काही वर्षापूर्वीची कथा वाचताना "मी असं का लिहिलं होतं?" हाविचार मनात येऊन जातोच.

उत्तम धागा नंदिनी.. मी हा विचार करतच होते (पण आळशीपणा Happy )
बेफिकीर यांच्या मताशी सहमत.
याशिवाय कधी कधी पात्रे आणि घटना रुसून बसतात. आत्ताआत्ता पर्यंत पारदर्शक असलेली आपल्या आणि त्या गोष्टीच्या जगामधे असलेली काच धुकट होत जाते. जर धुकं आतल्या बाजूनं जमलं असेल तर जरा नेटानं प्रयत्न करून, काच पुसून नजरेचा रस्ता मोकळा होतो पण बर्‍याचदा धुकं बाहेरच्या बाजूने जमलेलं असतं तेंव्हा आपण जोरजोरात आतून हात, कापड फिरवूनही परिणाम शून्य.. अशा वेळी स्वस्थ बसावं, त्या गोष्टीच्या जगासमोर उघडणारी खिडकी सोडून दुसरीकडे फिरुन यावं.. सूर्य उगवला की धुकं निवळतं आणि पुन्हा सगळं स्वच्छ दिसतं.
अर्थात त्यावेळी बेफींकीरांनी म्हटल्याप्रमाणे पात्रं वेगळेच रंग दाखवत असू शकतात आणि कथेचा फ्लो सुद्धा..
बाकी मला कुणासाठी कथेचा साचा आधी की पात्रं आधी ही चर्चा महत्वाची वाटतेय. त्यावर आपण ठरवून, मुद्दे विचारात घेऊन आणि 'हे म्हन्जे काय रे भाऊ' टाईप सविस्तर (भरकटू न देता) चर्चा झाली तर उपयोगी पडेल असं वाटतंय.
माझ्याबाबतीत पात्रं नेहमीच सुरुवातीला जास्त ठळक त्यांच्या व्यक्तिमत्वासकट उभी रहातात. किंबहुना त्याशिवाय एखाद्या कल्पनेत कथेचा जर्म आहे हे माझ्या पात्रं स्पष्ट नसतील तोवर लक्षातच येत नाही. आणि हे कधी कधी खूप फ्रस्ट्रेटिंग होतं.

माझ्याबाबतीत पात्रं नेहमीच सुरुवातीला जास्त ठळक त्यांच्या व्यक्तिमत्वासकट उभी रहातात. किंबहुना त्याशिवाय एखाद्या कल्पनेत कथेचा जर्म आहे हे माझ्या पात्रं स्पष्ट नसतील तोवर लक्षातच येत नाही.>>सेम पिंच.

मायबोलीवर नुकतीच आलेली प्रकाश कर्णीक यांची गुप्तहेर कथा वाचलीत का? नसल्यास अवश्य वाचा. रैना म्हणत होती ते "स्पून फीडींग करायचे नाही" म्हणजे ही कथा का?

कथेचा साचा आधी की पात्रं आधी <<<

मला असे वाटते की प्रतिसादांमधील शब्दांची निवड ही या धाग्यापुरती अतिशय काळजीपूर्वक केलेली असणे आवश्यक आहे. संघमित्रांचे वरील विधान जर (कळत / नकळतपणे) नीधप यांच्या (माहेरमध्ये प्रकाशित झालेल्या) कथेमधील लेखिकेच्या विचारांमधून व त्यावर झालेल्या चर्चेमधून सुचलेले असले तर 'साचा' या शब्दाऐवजी कथेचा आत्मा हा शब्दप्रयोग योग्य वाटावा. नीधप यांच्या कथेत लेखिकेचा कथेच्या आत्म्यावर विचार होतो तो व्यक्तिरेखा व त्यांची व्यक्तीमत्वे ठळकपणे नोंदवून झाल्यावर. त्यामुळे त्या लेखिकेला साचाच बदलण्याची किंवा साचा नाहीच आहे किंवा साचा आपण बनवलाच नव्हता (व पात्रे रंगवण्यावर काही काळ प्रेम करत राहिलो) ही भावना बोचते किंवा त्रास देते.

म्हणजे, पुन्हा प्रयत्न करत, माझ्या मनातले अधिक स्पष्ट करता येईल का ते पाहतो:

आत्मा - मूळ कथा काय आहे, कशावर आहे हा आत्मा होईल. उदाहरणार्थ 'सत्या' हा चित्रपट गँगवॉरवर आहे. एक तरुण कसा गँगवॉरमध्ये फसतो, कोणते घटक कारणीभूत होतात, त्यानंतर तो कसा अधिकाधिक वाईट गुन्हेगार होत जातो आणि शेवटी कसा एका गँगवॉरलाच कारणीभूत असलेल्या राजकीय नेत्याचा नाश करतो, त्याचप्रमाणे त्यातील प्रेमकथा व त्या तरुणाचा पोलिसांकरवी शेवट, वगैरे आत्मा झाला.

साचा - ठिकाण मुंबई घेणे, अभिनय कोण करणार हे ठरवणे, इतर घटक, जसे संगीत, पार्श्वसंगीत, छायाचित्रण हे कसे असणार व कोण करणार हे ठरणे, महत्वाचे प्रसंग कसे असावेत यावर ठाम निर्णय होणे हा साचा झाला.

प्रत्यक्ष पटकथा निर्मीती - (प्रत्यक्षात, चित्रपटात हे साच्याच्याच वेळी, आधी, नंतर केव्हाही होत असेल, तो भाग वेगळा ) - ही प्रत्यक्ष कथा झाली. यात व्यक्तीरेखांचा परिचय, त्यांना रसिकांच्या मनावर ठसवणे, कथा पुढे नेताना रसिक गुंतून राहील असे प्रसंग, गीते इत्यादी पेरणे, भाषाशैली, धक्कादायकपणा, सौंदर्यस्थाने यांची पक्की निर्मीती! थोडक्यात परिणामकारक असे कथानक निर्माण होणे!

प्रकाशन - कलाकृतीचा आढावा घेत घेत ती प्रकाशित करणे!

(पुन्हा - नीधप यांच्या कथेतील लेखिकेच्या कथेचा आत्माच जवळपास पात्रनिर्मीती ठळक झाल्यावर झालेला आहे. त्यामुळे, पुढील चर्चेसाठी, नीधप यांच्या त्या कथेचे उदाहरण सर्वत्र लागू होईल असे नाही. मात्र ते उदाहरण त्याच्या स्वरुपाचे जवळपास युनिकच उदाहरण ठरेल व चर्चेस वेगवेगळे ट्रिगर्स देत राहील).

त्यामुळे, संघमित्रा यांच्या ''एखाद्या कल्पनेत कथेचा जर्म आहे' या विधानात मला एक कमतरता जाणवली. त्यांच्याच विधानात म्हंटल्याप्रमाणे कुठेतरी 'कल्पना' या पातळीवर कथा आधीच अस्तित्वात आहे हे त्यांच्या वाक्यात दुर्लक्षिले गेल्यासारखे वाटले. ती कथा चांगली फुलेल की नाही हे व्यक्तीरेखा ठळक झाल्यावर ठरू शकेलही, पण ती कथा होईल की नाहीच हे त्यावर ठरू शकणार नाही असे मला वाटते. म्हणजे कथा आधीच आहे, पण ती जाणिवेच्या पातळीवर आहे आणि तीच प्रेरणा देऊन व्यक्तीरेखा आपल्याकडून ठळक करून घेत आहे हे मी व्हिज्युअलाईज करू शकतो. कथा किंवा कल्पना नाहीच आहे आणि पात्ररचना जवळपास करून झाली हे कोणत्या प्रेरणेने होऊ शकेल? मला तरी वाटते तसे होणार नाही. एक शक्यता ही आहे की मूळ कल्पना (जीत कथेचे बीज आहे वगैरे म्हणता येईल) ही पात्रनिर्मीतीच्या प्रेमात अडकल्यामुळे धुरकटत जाते व ती तशी धुरकटत जाण्यावरही लेखकाचे प्रेमच बसते कारण त्याक्षणी त्याच्यादृष्टीने पात्ररचनेत तो त्याचे सर्वस्व देत असतो. होत असलेली निर्मीती ही 'करायची ठरलेल्या निर्मीतीपेक्षा' गोड वाटणे हे शक्य आहे, पण ती इतकी गोड वाटू लागणे की मूळ कल्पनेत 'जर्म' होता की नाही हा विचार तेव्हा पडणे हे मला असंभव वाटत आहे.

एखाद्या मोकळ्या जागेत एक अतीविशान बंगला बांधता येईल असा विचार बिल्डरने केला आणि सुरुवातीला सजावट म्हणून बागेत ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या बांधल्या (कारंजे, उत्तम वाटा, दिवे, झोपाळा, हिरवळ इत्यादीसारख्या) तर काय होऊ शकेल? की त्याला त्या दृष्यावर इतके प्रेम करावेसे वाटू शकेल की येथे फक्त बागच करावी असे मनात येईल आणि बंगल्याची कल्पना तो टाळेल. पण बंगल्याची किंवा कसलीही कल्पनाच मनात नसताना कोणताही बिल्डर कोणत्याही प्रकारचे काम हातात घेऊन सुरुवातच करणार नाही, असे उदाहरण सुचले.

धन्यवाद!

संघमित्रा मस्त पोस्ट !

मी कथा लिहिल्या नाहीत पण ..

<<याशिवाय कधी कधी पात्रे आणि घटना रुसून बसतात. आत्ताआत्ता पर्यंत पारदर्शक असलेली आपल्या आणि त्या गोष्टीच्या जगामधे असलेली काच धुकट होत जाते. जर धुकं आतल्या बाजूनं जमलं असेल तर जरा नेटानं प्रयत्न करून, काच पुसून नजरेचा रस्ता मोकळा होतो पण बर्‍याचदा धुकं बाहेरच्या बाजूने जमलेलं असतं तेंव्हा आपण जोरजोरात आतून हात, कापड फिरवूनही परिणाम शून्य.. अशा वेळी स्वस्थ बसावं, त्या गोष्टीच्या जगासमोर उघडणारी खिडकी सोडून दुसरीकडे फिरुन यावं.. सूर्य उगवला की धुकं निवळतं आणि पुन्हा सगळं स्वच्छ दिसतं.>>>

हा पॅरा खूप आवडला.. Happy

बेफिकीर, तुम्ही ज्याला कथेचा आत्मा म्हणत आहात त्याचा संघमित्रा जर्म म्हणत आहे. (होय ना?)<<<

हो.

साचा म्हणजे आत्मा मानला जाऊ नये किंवा उल्लेख करताना अचूक उल्लेख असावा एवढेच म्हणायचे होते, माझा प्रतिसाद शेवटी निबंध झालाच Happy

स्व. कवीवर्य सुरेश भटांचे चिरंजीव श्री चित्तरंजन यांनी कोणाचे तरी (तूर्त आठवत नाही) नांव सांगून मला असे सांगितले होते की ते म्हणतात की ते गद्य लिहिताना एक व्याकरणचिन्हही अनावश्यक नसेल याची काळजी घेतात.

त्यावर थोडासाच विचार केला (निष्कर्षावर उडी मारली नाही) पण थोड्याश्या विचारावर तूर्त समाधान मानले. तो विचार म्हणजे असा की गद्य लिहिताना लेखकाने स्वतःला थोडी सूट द्यायला हरकत नसावी. पतंगाला ढील देतो तसे पात्रांना अधेमधे मनमोकळे वागू द्यावे. थोडी भरतीची लाट आली तर विशेष काय बिघडेल? (अर्थात, ते रंजक मात्र असावे - पाल्हाळ वाटू नये). भरकटू देऊ नये, पण आपलेच मन गुंतेल इतपत मोकळीक काही बाबींना दिली तर मजा येऊ शकते / येते.

(चित्त यांनी उल्लेख केलेल्या गृहस्थांनी एकंदर गद्यलेखनाबद्दल उद्गार काढले होते की कथालेखनाबद्दल, असा प्रश्न असल्यास गद्य लेखनाबद्दलच! त्यामुळे माहितीपूर्ण लेखनापुरते त्यांचे म्हणणे उचितच म्हणायला हवे, पण गद्यात कथाही येतेच, म्हणून मी त्यांचे तेच मत कथेबद्दलही असेल असे गृहीतही धरलेच).

धन्यवाद

धन्यवाद पराग..
बेफिकीर तुमची पूर्ण पोस्ट एकाच वेळी वाचून मला त्याचा एक गोळीबंद निष्कर्ष काढता येत नाहीये. पण बर्‍याच उपयोगी गोष्टी मांडल्यात त्या पोष्टीत.. पुन्हा वाचून कदाचित काहीतरी नविन समजेल. पण तूर्तास :
नीधपच्या त्या कथेचा एकदोन ठिकाणी उल्लेख वाचल्यावर शोधायचा प्रयत्न केला पण सापडली नाही. त्यामुळे मी तिथले संदर्भ घेतले नाहीयेत. पण हो साचा आणि आत्मा ही जास्त समर्पक वर्गवारी आहे. मी साचा म्हणजे आत्मा आणि साचा दोन्हीला एकत्रच म्हटलं होतं. याचं कारण मी गोष्ट ही कलाकृती जी आपण बांधतो ती असं समजून मांडली होती. (त्यापेक्षा आत्मा म्हटलं तर त्यात जास्त जान येईल हे खरंच)
शब्द, संकल्पना जपून वापराव्यात याला अनुमोदन..
>> बेफिकीर, तुम्ही ज्याला कथेचा आत्मा म्हणत आहात त्याचा संघमित्रा जर्म म्हणत आहे. (होय ना?)
होय..
>> त्यामुळे, संघमित्रा यांच्या ''एखाद्या कल्पनेत कथेचा जर्म आहे' या विधानात मला एक कमतरता ........
अं..यात थोडा घोळ आहे. एखादी कल्पना नुसताच अवर्णनीय आनन्द देऊ शकते. एखाद्या कल्पनेची कविता होऊ शकते. तर एखादीची कथा होऊ शकते. (एखादा माणूस उत्तम डॉक्टर होऊ शकतो तर एखादा उत्तम सुतार) अर्थात मला याचं हेच करायचंय ( माझ्या मुलाला मी आर्किटेक्टच बनवणार) असा अट्टहास असू शकतो काहींचा.
आणि कल्पनाच हवी कथेला असं कुठेय. एखादा अनुभव, स्वप्नरंजन असंही अस्तंच की.

>> एखाद्या मोकळ्या जागेत एक अतीविशान बंगला बांधता येईल असा विचार बिल्डरने केला..
कथालेखन ही कलाकृती आणि जागेचं बांधकाम हे कमर्शल प्रोजेक्ट असतं त्यामुळे ही तुलना मला थोडी डळमळीत वाटतेय. कारण कसलाही विचार न करता केलेली, छापलेली कित्येक लिखाणं मी वाचलीयत. (त्यात लक्षणीय आर्थिक नुकसान हा कनस्ट्रक्शन मधला मुद्दा नसल्यामुळे.. ) अनेक कलाकार वेगवेगळ्या प्रकारे कलाकृती उभारून पहातात, नाही आवडली तर मोडून पुन्हा उभारणीला लागतात.

(त्यात लक्षणीय आर्थिक नुकसान हा कनस्ट्रक्शन मधला मुद्दा नसल्यामुळे.. )<<<

त्यात 'कलाकृती प्रकाशित करणे' हे स्वतःच्या फायद्यासाठी केलेले असते असे माझे मत. मग तो कोणताही फायदा असो, अगदी एक दोघांनी 'छान चित्र काढलेस' म्हणणे इतकाही. स्वतःची कलाकृती मोडतोड करून पुन्हा उभारणे यात दोन प्रकार यावेत. प्रकाशित कलाकृती असल्यास रसिकमताचा प्रभाव मोडतोडीस काही प्रमाणात कारणीभूत असू शकतो. अप्रकाशित कलाकृती असल्यास निव्वळ आत्मिक समाधान हा घटक असणार. सहसा व्यासपीठावर अनेक लोक चर्चा करतात (जशी येथे चालली आहे) तेव्हा ती चर्चा 'प्रकाशित कलाकृती'बाबत होते. (एक दिलचस्प बाब म्हणून काही नियमीत लेखक कवींना 'तुम्ही न प्रकाशित केलेले साहित्य कसे आहे हे बघायचे आहे' असे म्हणून ते साहित्यही बघता येईल). असो, मी केलेली तुलना डळमळीत वाटणे या मताबाबत आदर!

हा धागा कथालेखनाबाबत असल्याने मी असे गृहीत धरून लिहिले होते की 'कल्पना हे बीज कथेचेच मानले जाणार'! तुम्ही म्हणता ते आहेच (व पुन्हा नीधप यांच्या कथेवरील माझ्या पहिल्या प्रतिसादात मी ते म्हणालेलोही आहे) की संवेदनेचे प्रकट रुपांतर कोणत्या प्रकारच्या कलाकृतीत व का आणि कसे होते हेही बघायला हवेच. येथे मी असे मानले की तुम्ही म्हणत आहात त्या कल्पनेची कथा होणार हे निश्चीत झालेले आहे.

Happy

आणि कल्पनाच हवी कथेला असं कुठेय. एखादा अनुभव, स्वप्नरंजन असंही अस्तंच की.<<<

या सर्वांना 'कथाबीज' असे एकच ढोबळ नाव देता यावे.

'मला काहीतरी लिहायचंय' ही उर्मी निव्वळ 'लिहिणे व ते सहजरीत्या प्रकाशित करून वाहवा मिळवणे' हे शक्य असल्यामुळे येऊ शकत नाही व येऊ नयेही. 'मला काहीतरी लिहायचंय' यामागे एक अनुभुती असते जी आपल्याच मेंदूत वावरत असते. त्याला कथाबीज म्हणायला हरकत नसावी. मग त्यात निव्वळ कल्पनाविलास, निव्वळ वास्तव चित्रण, ह्यूमर, निसर्गवर्णन या व अश्या कित्येक घटकांचे मिश्रण किंवा सोलो प्ले असू शकतो.

'माहेर' दिवाळी अंकातली मनस्विनी लता रविंद्र यांची 'मधुबाला आणि लोडशेडींग' ही कथा वाचली. शीर्षकाशेजारचे चित्र पाहून, लेखिकेचे नाव आणि कथेची सुरूवात वाचून काहीतरी सुरेख वाचायला मिळणार अशी जवळजवळ खात्री पटली होती. पण कथा संपूर्ण वाचल्यावर माझाच पोपट झाला Sad काहीही समजले नाही. कथेत रस अजिबात निर्माण झाला नाही. कशाचा कशाशी कसा संबंध आहे हे समजले नाही.
ही कथा समजून घ्यायची माझी कुवत नाही बहुतेक.
तर, अश्या प्रकारच्या कथा कश्या वाचाव्यात, कश्या समजून घ्याव्यात याविषयी मार्गदर्शन हवे आहे.

बेफिकीर, आपला प्रतिसादाचा धागा चुकलाय का? वर उल्लेख केलेला लेख हा "ललितलेख" आहे. आपण इथे "कथालेखन" संदर्भात चर्चा करत आहोत.

बेफिकीर, चर्चाकेली जाऊ शकते.पण या बीबीवर नको. अन्यथा इतर सर्वदेखील साहित्यप्रकार इथेच चर्चेला येतील... Happy

बरं मला आज पडलेला एक प्रश्न: (कथेच्या संदर्भाने आहे) एखादी स्त्री (जी गृहिणी आहे) जर इंटरनेटवर पुरूष आयडी घेऊन वावरत असेल तर त्यामागे काय काय कारणे असू शकतात?

नंदिनी, काय योगायोग आहे!
तुझ्या प्रश्नाचं चपखल उत्तर ठरू शकेल असा मजकूर मी नुकत्याच अनुवादित केलेल्या पुस्तकाच्या एका प्रकरणात आहे! Happy
(ही पुस्तकाची रिक्षा नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
बाहेरच्या जगात वावरताना गुप्तहेर आपली विशिष्ट अशी ओळख बनवतात तेव्हा त्यामागे काय-काय कारणं असू शकतात - हे मांडणारा असा तो मजकूर आहे. त्यात जे लिहिलंय ते तुझ्या प्रश्नालाही पर्फेक्ट लागू होतं.

तो मजकूर थेट इथे लिहिणं शक्य नाही, for obvious reasons...
तो वाचण्यासाठी पुस्तक वाचा. (ही मात्र पुस्तकाची रिक्षा आहे :फिदी:)

तुझ्या प्रश्नाचं चपखल उत्तर ठरू शकेल असा मजकूर मी नुकत्याच अनुवादित केलेल्या पुस्तकाच्या एका प्रकरणात आहे! >>तुझं पुस्तक कुठे मिळेल? वाचायचं तर आहेच आहे म्हनून विचारतेय. Proud

पण खरंच अशी काय कारणे असू शकतात याबद्दल जरा डोक्याला व्यायाम हवा आहे.

काही उत्तरं हवी आहेत.

१. कथेमधील कलात्मकता म्हणजे नक्की काय? कुठल्याही कथेतील कलात्मकतेची जातकुळी एकच असते का?
२. कथा म्हटली म्हणजे तीत कलात्मकता असायलाच हवी का?
३. कलात्मकता नसेल, तर कथा ही कथा म्हणवली जाणार नाही का?
४. कलात्मकता असणारी कथा आणि कलात्मकता नसणारी कथा असे दोन प्रकार असू शकतात का? जर असतील, तर कलात्मकता असणारी कथा नेहमी वरचढ ठरेल का?
५. लेखकाने निवेदनाचा ओघ, कथानकाचा बांधेसूदपणा सांभाळावा, की कलात्मकतेला अधिक महत्त्व द्यावं?
६. मुळात कशावर काय अवलंबून आहे? कलात्मकतेकडे लक्ष द्या, ओघ इ. आपोआप सांभाळलं जाईल, असं? की ओघ, प्रतिपादन इ. काटेकोरपणे सांभाळा, कलात्मकता आपोआप प्राप्त होईलच, असं?

प्रश्न क्र.२ - माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा आहे.

कथेमधील कलात्मकता म्हणजे नक्की काय?<<< मी याच प्रश्नाला नापास. Happy

साहित्यिक भाषेमधे मला सांगता येणार नाही. पण माझ्या मते, जी कथा मला (पक्षी वाचकाला) वाचण्यासाठी कंटाळवाणी वाटते ती कितीही कलात्मक असली तरी वाचकाच्या दृष्टीने बेक्कार. त्यामुळे कथालेखकाला त्याचा "वाचक" कोण आहे ते चांगले माहित असायलाच हवे. टारगेट ऑडियन्स क्लीअर माहित हवा.
ओघ, प्रतिपादन इ. काटेकोरपणे सांभाळा, कलात्मकता आपोआप प्राप्त होईलच, असं?>>> माझे मत इथे.

प्रश्न क्रमांक १ चं उत्तर इतकं पसरलेलं असू शकतं अगं...
कलेची व्याख्या करता येत नाही तर कलात्मकतेची कशी करशील?

२,३,४ हो आणि नाही
५. निवेदनाचा ओघ, बांधेसूदपणा याच्याआधी गाभ्यातला, मांडणीतला, निवेदनातला सच्चेपणा, खरेपणा (पायस किंवा राइच्युअस अर्थाने नाही), लख्खपणा माझ्यामते महत्वाचा. त्यानंतर ओघ आणि मग बांधेसूदपणा. बांधेसूदपणा हे क्राफ्ट आहे. ते गरजेचे आहे पण मूळ वस्तू काही प्रमाणात आकाराला येऊ घातल्यानंतर.
६. ५ च्या उत्तरातच हे उत्तर आहे.
पहिल्या क्रमांकावर गाभ्यातला, मांडणीतला, निवेदनातला सच्चेपणा, खरेपणा (पायस किंवा राइच्युअस अर्थाने नाही), लख्खपणा
दुसर्‍या क्रमांकावर ओघ
तिसर्‍या क्रमांकावर बांधेसूदपणा (यापेक्षा मला बांधणी हा शब्द आवडेल.)

त्यामुळे कथालेखकाला त्याचा "वाचक" कोण आहे ते चांगले माहित असायलाच हवे. टारगेट ऑडियन्स क्लीअर माहित हवा. <<
असहमत.

मला वाटते प्रामाणिक किंवा शुद्ध कलानिर्मिती(कथालेखनही त्यात आलेच) ही कोणाला काय बघायला/ वाचायला/ ऐकायला आवडेल या आडाख्यांना धरून असू नये. लोकांपर्यंत आपल्याला काय पोचवायचंय, ते आपण कसं पोचवतोय आणि वाचक/ आस्वादक म्हणून जर याकडे पाह्यलं तर ते आपल्यापर्यंत कसं पोचणारे? याचा विचार करणे ठिक.

Pages