कथालेखन - चर्चा आणि संवाद.

Submitted by नंदिनी on 27 November, 2012 - 04:36

सर्वच कथालेखक आणि लेखिकांना चर्चा करण्यासाठी व्यासपीठ. इथे कथा/कादंबरी या लेखन प्रकारावरची तांत्रिक अथवा सर्जनशील चर्चा आणि संवाद साधू शकता. रायटर्स ब्लॉक असल्यास इथे मदत घेऊ शकता, कथेसाठी पार्श्वभूमी बनवण्यासाठी आपण इथे एकमेकांची मदत करू शकतो.

कृपया, इथे चर्चा करत असताना संसदीय भाषेमधे चर्चा करा. तसेच, कुठल्याही होतकरू अथवा नविन कथालेखकांची इथे टिंगल करू नका. (कथांमधील चुका दाखवणे अथवा हलकीफुलकी मस्करी अवश्य चालू द्यात पण मुद्द्यांवरून गुद्द्यांवर येणे टाळा.

इथे आपले मुद्दे मांडण्याआधी आजवर झालेली चर्चा एकदा वाचून अवश्य घ्या म्हणजे पुन्हा तेच मुद्दे रीपीट होणार नाहीत.

हा धागा सध्या ग्रूपपुरताच मर्यादित ठेवला आहे.

हा अडमने चालू केलेला कथाकथी धागा. मायबोलीवरच्या उत्तम कथा त्याने इथे संकलित करून ठेवलेल्या आहेत. दिवाळी अंकांमधील कथा पटकन सापडत नाहीत कित्येकदा, तेव्हा या धाग्याचा उपयोग होऊ शकेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदीच पण मग तिथे सौंदर्यशास्त्राचा संबंध नाही असं नाही ना?<<< माझ्यामते तरी मुळीच नाही. उलट सौंदर्यशास्त्राचा संबंध सर्वत्र आहे असे मी त्याही लेखात म्हंटलेलेच होते. सौंदर्यशास्त्रानुसार बुधवार पेठ या कथानकात समाजातील कुरुपता वास्तववादी दृष्टिकोनातून समोर आणण्यात आलेली आहे. पण ती कथा 'सौंदर्यवादी' अज्जिबातच नाही. Happy

धन्यवाद!

( फॉर अ चेंज, आज तुमची माझी काही मते तंतोतंत जुळत आहेत - हे अवांतर )

तर ते लेखन कोणाला तरी आवडेल / आवडत असेल असे वाटणे हा जुगार झाला ना? <<
हो आणि नाही.
तुम्ही(कोणीही) नक्की कशासाठी लिहिता यावर अवलंबून आहे.
वाचकांचा प्रतिसाद हे कुणाही लेखकाने कितीही नाही म्हणलं तरी त्या त्या लेखकाला महत्वाचं असतंच पण ते बायप्रॊडक्ट आहे. त्याबद्दल नाही म्हणत मी.

आपले लिखाण लोकांना आवडावे म्हणून आपण लिहितो की व्यक्त होण्यासाठी लिहीतो की पैसे मिळणारेत म्हणून लिहितो की लिहिले नाही तर झोप लागणार नाही म्हणून लिहितो की लिहिले नाही तर श्वास घेणे अशक्य होईल म्हणून लिहितो यावर जुगार आहे नाही हे ठरेल ना.

आज तुमची माझी काही मते तंतोतंत जुळत आहेत <<
जास्त चिंता करू नका. असे गोंधळ होत असतात.

वरच्या काही पोष्टी वाचून पडलेला एक प्रश्न....(फारच अडाणी असू शकतो.. )
मुळात सुरुवात, शेवट 'माहित' नसताना कथा लिहीणं कसं सुरु होऊ शकतं ? माहित असणं म्हणजे साधारण अंदाज असणं.. अगदी पक्का माहित असणं नाही..
म्हणजे साधारण अशी अशी पार्श्वभूमी आहे.. आणि कथेत हे हे होणं अपेक्षित आहे.. लिहितानाचा प्रवास किंवा ऐनवेळेला झालेले बदल हा भाग निराळा..
पण मुळात थोडीफार रुपरेषा माहित असायला हवी ना ? का ते तसं नसतं ? इथल्या कथालेखकांनी अनुभव सांगा बरं जरा.

Lol लवकरात लवकर हा गोंधळ आवरता घेतो.

तुम्ही(कोणीही) नक्की कशासाठी लिहिता यावर अवलंबून आहे.<<<

जगातील प्रत्येक प्रकाशित लेखन (एक्झॅम पेपर्स, वर्तमानपत्रे, किराणा मालाचे दर वगैरे तत्सम प्रकार सोडून) हे 'माझा लौकीक वाढावा' या हेतूने केलेले असते व प्रत्येक अप्रकाशित लेखन प्रकाशित झाल्याशिवाय ते 'अप्रकाशित का ठेवले होते व केलेच का होते' हे समजणार नाही.

>>>मुळात सुरुवात, शेवट 'माहित' नसताना कथा लिहीणं कसं सुरु होऊ शकतं ? <<<

अहो तेच तर मी म्हणतोय.

पराग, आपण पर्वा बोलत होतो बघ.
तर ते तसं नसतं माझ्यासाठी.
'एका हरण्याची गोष्ट' मधे एका प्रसंगापासून सुरूवात करून त्या प्रसंगापर्यंत आणणार्‍या वाटांचा शोध घेतला होता. ती कथा सोडली तर बाकीच्या कथा सुरू करताना कुठलाही ढाचा, कुठे पोचायचंय... कश्याचेही तपशील ठरले नव्हते. 'एका हरण्याची गोष्ट' मधेही प्रसंग माहित होता पण कथा कुठल्या नोटवर संपणारे हे मला माह्ति नव्हतं.

अहो पात्रांवर प्रेम केल्याशिवाय कथा लिहिणार कशी? पण हे प्रेम म्हणजे 'सदोष अपत्यांवरचं प्रेम' असू शकतं असं म्हणतो आहे. या गोष्टीचा स्वतःचं संपूर्ण लिखाण 'आवडण्या'शी काय संबंध? याला विस्मयाच्या पोस्टमधला 'स्वतःची कथा स्वतःला आधी आवडायला हवी' याचा संदर्भ आहे. प्रेम केलेली पात्रं तीत असल्यामुळे ती आवडतेच. पण हा कसा काय निकष होऊ शकतो? बस, एवढंच.

बाकी सौंदर्यवादाबद्दल तुम्ही (आता) जे 'ते आवश्यक नाही' हे बोलत आहात, तेच मीही. तो विषय चालू असल्याने 'तो' शब्द वापरला. मी तर म्हणतो, 'वास्तववाद'ही नको. कोणताही वाद नको. अशी नावं का ठेवायची आहेत? सौंदर्यवादाच्या 'तथाकथित' व्याख्येवरून ते सारं चाललं होतं. सहज म्हणून वरची पोस्ट पुन्हा एकदा वाचून बघा. तुम्ही अजूनही त्याच (जुनाट) व्याख्येवर आहात. 'चक्र' कादंबरीवरचे वाद-विवाद तुम्ही कधी वाचलेत का? तुमच्या 'बुधवार पेठ'च काय, पण इतर अनेक कथा-कादंबर्‍यांपेक्षा 'तथाकथित' घाणेरडेपणा कित्येक पटीने जास्त आणि अंगावर येण्याइतक्या प्रमाणात 'चक्र'मध्ये आहे. मोठमोठ्या साहित्यिकांनी त्यावर राळ उडवली. सौंदर्यवादाची वासलात लावणारं लेखन आणि अशी अनेक शेलकी विशेषणं बहाल झाली. नंतर पुरस्कार आले. चित्रपटही आला. हे पुस्तक आणि सिनेमा 'मैलाचा दगड' ठरावे असे आहेत. माझ्या मते ते सारं 'सुंदर' आहे, ते नुसतं 'वास्तव' आहे म्हणून नाही, तर जुन्या व्याख्या बदलून टाकण्याची ताकद त्यांत आहे. आमच्यातुमच्या जगण्याला अनोळखी असलेली अनेक आयुष्यं आणि गोष्टी ल्यांत रेखाटल्या आहेत, आणि 'आग लागो तुमच्या(च) आयुष्यातल्या सौंदर्यवादाला!' असं म्हणत आपल्यासमोर आरसेही धरले आहेत.

चौकटी मानणं न मानणं, हे ज्याच्या त्याच्या हातात. पण 'आजूबाजूला असलेली कुरुपता रंगवणे व ती समाजासमोर आणणे हे सौंदर्यच आहे असा अट्टाहास' आवश्यक आहे. कारण व्याख्या बदलायला हव्यात. कारण मी नाही महत्व दिलं व्याख्येला, तरी इतर देतीलच. तुम्हीही आता 'सौंदर्यवाद आवश्यक नाही' असं म्हणताय खरं, पण त्याच्या व्याख्येला मात्र महत्व देताय. ते का?

मुळात सुरुवात, शेवट 'माहित' नसताना कथा लिहीणं कसं सुरु होऊ शकतं ? माहित असणं म्हणजे साधारण अंदाज असणं.. अगदी पक्का माहित असणं नाही..
>>पराग, माझी ही कथा वाचलीस का? ही कथा एका बैठकीत पूर्ण केली होती. अगदी स्टार्ट टू फिन्निश.

सुरूवातीची एक दोन वाक्ये लिहत असताना माझ्या डोक्यामधे तिने "बास आता जगणं" असं म्हणून आत्महत्या करावी असा विचार बहुधा येऊन गेला असावा. पण अशीच राहिले मी. अधांतरी हे वाक्य डोक्यात फिक्स होतं. त्यामुळे आत्महत्या हे सोल्युशन झालंच नसतं कारण मग तिचं आताचं आयुष्य आणि आत्महत्या यांचा संबंध लागला नसता. आता तिच्या मरण्याचा प्रवास कसा करावा हे मात्र उमगत नव्हतं. तिला मरावं तर लागणार होतं. अन्यथा कथा कशी होणार? मग राकेशभाई मदतीला आला. कार्पोरेट वॉर मदतीला आलं.. पण एकंदरीत कथेचा मूळ गाभा बघता या गोष्टींचे उल्लेख फक्त माहितीपुरते येऊन गेलेत. मुख्य फोकस राहिला तो तिच्या मरणानंतर तिने घेतलेल्या सूडाचा. म्हणून तो शेवट आधीपासून डोक्यात नव्हता, पण तरी तिच्या आणि राकेशभाईच्या पात्रांमधून आपोआप सामोरा आला.

साहित्यिक भाषेत वगैरे लिहिणं मला जमत नाही, तरी माझा मुद्दा तुझ्या लक्षात आला असावा. Happy

जाउदेत, आजवर मस्त चर्चा झाली. मी आता येथे वाचनमात्र! किंवा तोही नसेन बहुधा! अधून मधून जमेल तसे व्हिजिट मारून जाईन. पण एकंदर मजा आली. Happy

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

ती कथा सोडली तर बाकीच्या कथा सुरू करताना कुठलाही ढाचा, कुठे पोचायचंय... कश्याचेही तपशील ठरले नव्हते. >>>> मग तू लिहायला सुरुवात कुठून केलीस ?? म्हणजे आत्ता चालू असलेली कथा घे.. दोन कलप्स, त्यांच्यातले खटके, कुठलेतरी प्रसंग, घटना, शेवट... एव्हडंतरी माहित पाहिजे ना ?
कपल्सचे स्वभाव, संवाद, प्रसंग हा सगळा कथा फुलवायचा भाग झाला.. मुळात बीज असलं पाहिजेच ना?

सध्या लिहित असलेल्या कथेची प्रक्रिया अजून चालू आहे त्यामुळे त्यावर नको. नंदिनीने सांगितल्याप्रमाणे माझ्या 'मी आणि नवा पाऊस' या कथेच्या प्रक्रियेबद्दल लिहिते. कदाचित तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, कदाचित मिळणारही नाही.

मी आणि नवा पाऊस लिहायला सुरू केली तेव्हा अक्षरशः एक वातावरण, एक लॅण्डस्केप होतं डोक्यात. उन्हाळा सरतानाच्या वेळेचा पुणे विद्यापीठातल्या एका बसस्टॉप आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. त्या बसस्टॉपवर दोन अनोळखी व्यक्ती. त्यांच्यात एक संवाद सुरू झाला.

हा आणि इतकाच विचार केला होता पहिलं वाक्य लिहायच्या आधी. त्यातली एक व्यक्ती प्रथमपुरूषी एकवचनी होती.

आम्ही नाटकवाले लोक एक्सरसाइझ म्हणून इम्प्रोव्हायझेशन्स करतो. उस्फूर्तपणे दृश्य सादर केले जाते. कधी कधी ठिकाण ठरलेले असते, कधी पात्रे तर कधी विषय. एकानंतर एक संवाद, संवादांच्यातून दृश्याला वळण मिळत जाते. हा खेळ फार उपयोगाचा ठरतो.

या कथेतला सुरूवातीचा संवादही काहीसा असाच अनोळखी व्यक्तींच्यातले संभाषण एवढ्याच प्रिमाइसवर सुरू इम्प्रोव्हाइज करत गेले. त्यातच त्या व्यक्तींचे तपशील आले, व्यक्तिरेखेचे काही पैलू उघड होत गेले. बस आली तेव्हा दोघांपैकी कोणीच बसमधे न चढणं हे अपरिहार्य होतं अन्यथा कथा संपली असती. त्यामुळे दोघांना तिथेच ठेवलं. कावेरीचा डिव्होर्स होऊ घातलाय इथवर मी केवळ इम्प्रॉव्ह करतच आले.

त्यानंतर नरेनचे आणि कावेरी-नरेनच्या नात्याचे तपशील येणं आणि त्यायोगे कावेरी एक त्रिमित व्यक्तीरेखा म्हणून उभी राहणं अपरिहार्य व्हायला लागलं. तस्मात ते आलं. याच दरम्यान किरण शहाणेची व्यक्तिरेखा ही द्विमित, ऐकणारा, प्रश्न विचारणारा अश्या स्वरूपाचीच रहाणार हे ही स्पष्ट झालं.

कावेरी-नरेनच्या नात्याचे तपशील जे समोर आले त्यातून कावेरीची मनस्थिती आणि बस न पकडण्याची कारणं मिळत गेली. मग घटस्फोट, त्यातली तडफड, भिती, राग हे सगळंच आलं.

हे सगळं विशद करून झाल्यावर मग शेवटाला येताना मात्र मी खूप सावध झाले. जे काही तयार झालं होतं त्यातून कथा शेवटाला नेताना काय काय होऊ शकतं याचे पर्याय शोधले. सगळ्या परिस्थितीशी हसून हात मिळवणे, भितीला उलथून टाकणे, आयुष्य जगायची परत चांगल्याने सुरूवात करणे हा एकमेव पर्याय कावेरीसाठी अपरिहार्य असल्याचं लक्षात आलं आणि मग शेवटाला तिला बसमधे चढवणे, पावसाची सर येणे हे सगळं ओघानेच आलं.

ह्या सगळ्यानंतरच कथेचं नाव आलं. जे बर्‍यापैकी ऑब्व्हियस आहे.

थोडक्यात व्यक्तिरेखांनी मला पुढे नेलं.
संदर्भासाठी म्हणून कथेच्या पहिल्या ड्राफ्टची जुन्या माबोवरची ही लिंक
नवीन माबोवर ह्या कथेचा फायनल ड्राफ्ट टाकलेला आहे. काही थोडे शब्द/ वाक्य इकडेतिकडे, मुशो वगळता दोन्हीत फारसा फरक नाही.

मुळात बीज असलं पाहिजेच ना? <<
मुळात बीज म्हणजे काय याचा विचार केला तर या प्रश्नाकडे जास्त चांगल्या पद्धतीने बघता येईल.

एखादा विषय की एखादी संकल्पना की एखादा प्रसंग की अजून काय?

चर्चा वाचते आहे. छान चालू आहे.

एक सजेशन आहे- ज्य कथेबद्दल तुम्ही चर्चा करताय, ती जर आंतरजालावर- मायबोली/ ब्लॉग/ इतर संकेतस्थळ इथे असेल तर त्या कथेची लिंकही द्या. म्हणजे त्या त्या अनुषंगाने चर्चा वाचता येते. नंदिनीने केले आहे तसेच Happy

एखादा विषय की एखादी संकल्पना की एखादा प्रसंग की अजून काय? >>>> संकल्पना किंवा प्रसंग... विषय म्हंटलं तर ते फारच मोठं होईल.. संकल्पना किंवा प्रसंग म्हंटलं तर ते जरा तरी नॅरो डाऊन केल्यासारखं आहे.
एखादा मुद्दा असं म्हंटलं तरी चालेल. रामायण ऐकल्या/वाचल्यावर "ते सगळं ठिक आहे.. पण नेमका मुद्दा काय आहे??" ह्या प्रश्नाचं उत्तर नेमकं देता आलं पाहिजे. नंदिनीच्या वरच्या पोस्टच्या संदर्भाने "अधांतरी अवस्था" ह्याला मी बीज म्हणेन.. किंवा हरण्याच्या गोष्टीत "एक प्रसंग आणि त्याकडे बघायच्या लोकांच्या दृष्टीकोनांचा कोलाज" किंवा साजिर्‍याच्या इनव्हाईट बद्दल "घडलेला प्रसंग बदलून आपल्या मनासारख घडवण्याचा प्रयत्न" ह्याला मी बीज म्हणेन.. ही सगळी संकल्पनांची उदाहरणं झाली. तशीच प्रसंगांचीही देता येतील.

मी आणि नवा पाऊस बद्दलची पोस्ट छान आहे.
मी आणि नवा पाऊस लिहायला सुरू केली तेव्हा अक्षरशः एक वातावरण, एक लॅण्डस्केप होतं डोक्यात. उन्हाळा सरतानाच्या वेळेचा पुणे विद्यापीठातल्या एका बसस्टॉप आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. त्या बसस्टॉपवर दोन अनोळखी व्यक्ती. त्यांच्यात एक संवाद सुरू झाला. >>>>
थोडक्यात व्यक्तिरेखांनी मला पुढे नेलं. >>>>> इंटरेस्टींग.. Happy

पराग, बीज म्हण, कथेचा आत्मा म्हण, जर्म म्हण अथवा अन्य काही पण कथेमधला हा बिंदू फार फार महत्त्वाचा असतो. हे जर कथेमधे नसेल तर कथा म्हणजे नुस्ता पात्रांचा फाफटपसारा होतो. हा पसारा फार विलोभनीय असू शकतो. वाचकांना आवडूदेखील शकतो. पण कथा वाचल्यावर "बरं मग?" या प्रश्नाचे उत्तर वाचकाआधी लेखकाला देता आले पाहिजे, जर ते आले नाही तर माझ्या दृष्टीने तरी कथा गचकली. Happy

पूनम, तू पण तुझ्या एखाद्या कथेबद्दल लिही ना. साजिरा, ललिता (रामायण चालू करून गेली कुठे?) तुम्हीपण लिहा.

नी, पोस्ट छान.
आम्ही नाटकवाले लोक एक्सरसाइझ म्हणून इम्प्रोव्हायझेशन्स करतो. उस्फूर्तपणे दृश्य सादर केले जाते. कधी कधी ठिकाण ठरलेले असते, कधी पात्रे तर कधी विषय. एकानंतर एक संवाद, संवादांच्यातून दृश्याला वळण मिळत जाते. हा खेळ फार उपयोगाचा ठरतो. >>> +१.

नंदिनी, मी ते कथेचं वर्गीकरणाबद्दल लिहिलं होतं, ते वाचकाऐवजी समीक्षकाच्या दृष्टीकोनातूनही आपण पाहू शकतो.
कारण माझे मूळचे प्रश्न हे बेसिकली, श्रेष्ठ कथा कशाला म्हणता येईल? कलात्मकतेचा निकष लावून ते ठरवता येईल का? - असेही फिरवता येतील.
लेखकानं स्वतःशी प्रामाणिक राहून लिहिलं पाहिजे, नेमकं निवेदन आलं पाहिजे, हे तर झालंच. पण एका लेखकाच्या दोन कथा - एक कलात्मक आणि एक कमी कलात्मक असं जर म्हटलं गेलं, तर ते कशाच्या आधाराने ठरवलं जातं? कथेच्या वाचनातून मिळणार्‍या अनुभूतीतूनच ना? की अजून काही? हे मला जाणून घ्यायचं आहे.

नीरजा, कथेबद्दलची पोस्ट छान. Happy
(तू जे इम्प्रोव्हायझेशन्सबद्दल लिहिलं आहेस, त्याचा उल्लेख आणि वर्णन 'झिम्मा'मधेही आहे.)

मी ज्या काही थोड्याफार कथा लिहिल्या आहेत, त्या लिहायला सुरूवात करण्यापूर्वी त्यांचा विषय माझ्या डोक्यात पक्का होता.
माझ्या बाबतीत अजून एक होतं - कथेचं पहिलं वाक्य नजरेसमोर दिसल्याशिवाय मी लिहायला सुरूवात करू शकतच नाही.
एकदा असं झालं होतं, की कथेत पुढे येणारे काही प्रसंग डोक्यात तयार होते. मग मी विचार केला, की आधी ते लिहून काढू. त्यांची सांधेजोड आपसूक होईलच. ते लिहिता-लिहिता सुरूवातही सुचेल. पण या पध्दतीने नाही तर नाही जमलं. मग मी ४-६ महिने त्या कथेचा विचार सोडूनच दिला. एक दिवस अचानक डोळ्यांसमोर ते पहिलं वाक्य दिसलं मला.
शेवट मात्र मी आधी ठरवलेला नसतो. पण लिहिता लिहिता अचानक एका बिंदूला आकलन होतं, की कथा इथेच संपते आहे. मला जनरली काही गोष्टी वाचकांवर सोडायला आवडतात. निर्णायक शेवट करण्याकडे माझा कल जरा कमी आहे.
तसंच, आधी डायरीत लिहून काढून मग कंप्युटरवर टाईप करणे - हे पण मला जमत नाही. अर्थात हा सवयीचा भाग झाला.

पण एका लेखकाच्या दोन कथा - एक कलात्मक आणि एक कमी कलात्मक असं जर म्हटलं गेलं, तर ते कशाच्या आधाराने ठरवलं जातं? कथेच्या वाचनातून मिळणार्‍या अनुभूतीतूनच ना? की अजून काही? हे मला जाणून घ्यायचं आहे. <<
मला वाटतं अनुभूती हा सगळ्यात मोठ्ठा आणि महत्वाचा मुद्दा. जिथे लख्ख अनुभूती असते तिथे लिखाणातला सच्चेपणा, ताजेपणा येतोच की.

मी आधी पण म्हणलं होतं की कला ही स्वभावतः वादग्रस्त संकल्पना आहे त्यामुळे कलेची व्याख्या होऊ शकत नाही आणि कलात्मकतेची सुद्धा. तस्मात फॉर्म्युला नाहीच.

पण कथा वाचल्यावर "बरं मग?" या प्रश्नाचे उत्तर वाचकाआधी लेखकाला देता आले पाहिजे, जर ते आले नाही तर माझ्या दृष्टीने तरी कथा गचकली. <<
नंदे, हे थोडं जास्त एक्स्प्लेन कर.

लले, तुझ्या रस्ता कथेची प्रक्रिया समजावून सांग ना.

पण कथा वाचल्यावर "बरं मग?" या प्रश्नाचे उत्तर वाचकाआधी लेखकाला देता आले पाहिजे, जर ते आले नाही तर माझ्या दृष्टीने तरी कथा गचकली. <<
नी, कथा (खरंतर कुठलीही कलाकृती) वाचकाच्या मनावर रेंगाळली पाहिजे. कथा संपल्यावर "वा वा ते सुखानं नांदू लागले" टाईप शेवट नसावा असे माझे मत. कथा संपली म्हणजे कुठेतरी कथालेखक येऊन पॉझ घेतो आणी तिथून पुढे कथन थांबवतो हे मला अपेक्षित असतं. कथा संपल्यावर कथा नक्की कशाला कुणासाठी आणि कशी लिहिली हे लेखकाला माहित असलं पाहिजे. (कथा लिहून झाल्यावर म्हणतेय. कथालेखनाची प्रोसेस चालू असताना नव्हे!! ) त्याचबरोबर कथा संपल्यावर पुढे काय हे लेखकाला माहित असणं गरजेचं. (याच नोटवर कथा सुरू व्हायच्या आधी जे घडलंय तेही माहित असायला हवं) जरी ते लकथेत प्रत्यक्ष आलं नसलं तरीही. हे जेव्हा घडतं तेव्हा ती कथा वाचकांना कथा वाचल्यावर "कथा वाचून झाली. मग?" हा प्रश्न पडला पाहिजे. वाचकाला हा प्रश्न पडलाच नाही तर कथा गचके गयी. आणि या प्रश्नाचे उत्तर लेखकाला म्हणजे मलातरी माहित असायला पाहिजे.

मी ते कथेचं वर्गीकरणाबद्दल लिहिलं होतं, ते वाचकाऐवजी समीक्षकाच्या दृष्टीकोनातूनही आपण पाहू शकतो.
<< अगदी स्पष्ट सांगू का? आजपर्यंत मी माझ्या कुठल्याही कथेसंदर्भात समीक्षक काय म्हणतील अथवा त्यांचा दृष्टीकोन याबद्दल विचार केलेला नाही. Happy वो अपने बसकी बात नही!!!

त्याचबरोबर कथा संपल्यावर पुढे काय हे लेखकाला माहित असणं गरजेचं. (याच नोटवर कथा सुरू व्हायच्या आधी जे घडलंय तेही माहित असायला हवं) जरी ते लकथेत प्रत्यक्ष आलं नसलं तरीही. <<
आधीचं मान्य. पण नंतरचंही?

म्हणजे एखादी कथा एखाद्या ठिकाणी संपली. त्यातल्या महत्वाच्या व्यक्तिरेखेचे पुढे काय होणार आहे यासाठी एकापेक्षा जास्त पर्याय असू शकतात. माझ्या ’वैदेही’ मधे कथा संपल्यानंतर ती लेखिका होईल किंवा ती मनोरूग्ण होईल या दोन्ही शक्यता दिसतात. पण ते तसे होणे ही पुढची कथा आहे. ते या कथेच्या लिखाणाबरोबरच मला लेखक म्हणून माहिती हवे हे कशासाठी?

ते या कथेच्या लिखाणाबरोबरच मला लेखक म्हणून माहिती हवे हे कशासाठी?>>कशासाठी असं मला नाही सांगता येणार.. Happy पण पुढे काय होऊ शकेल याचा अंदाज मात्र लेखकाला हवा असं मला वाटत.. तुझ्या वैदेहीला ज्याप्रमाणे दोन शक्यता आहेत याचा तुला अंदाज आहे. इन फॅक्ट त्यापैकी एकही शक्यता कथेमधे न येताच कथा संपते तेच मला म्हणायचं आहे. पण नीट सांगता येईना झालय.

छान आहे धागा
माझ्यासारख्या नवीन लेखकाना खूपच मार्गदर्शक आहे
इथे मी काही बोलणं म्हणजे लहान तोँडी मोठा घास

थँक्स नंदिनी
मला अहो जाहो नाही केलत तर आवडेल

मुद्दे कव्हर वरती झालेच आहेत तरी माझे दोन शब्द

लिहीलेल एखाद्या अनुभवी व्यक्तीला जरुर दाखवाव

दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पार्श्वभूमीची कथा आहे त्या पाश्वभूभीची बेसिक मिनिमम माहिती असण गरजेच

मी व्यवसायाने सीएस आहे
इथे माबोवरच मी एका कथेत कंपनीच्या वार्षिक सभेत कोणतेही सूचना न देता चेअरमन अपाँईट करतात असा प्रसंग दाखवलाय
जे पूर्णपणे कंपनी लाँजनुसार चूक आहे
कंपनी लाँ विषयात कार्यरत असल्याने ते खटकल होत इतकच
अर्थात हीच चूक माझ्याकडूनही डाँक्टरी वगैरे क्षेत्रात होऊ शकते
त्यामुळे स्पेशलाईज्ड विषयावरची कथा लिहीताना बेसिक गोष्टी लक्षात घ्यावात अस माझ मत आहे

नंदिनी, कथा लिहिताना ती कथा वाचून कोण काय म्हणेल याचा विचार करू नयेच, कधीच.

पण वर जाई. यांनी म्हटलं आहे, त्याप्रमाणे, एखाद्या अनुभवी व्यक्तीनं जर ती कथा वाचली आणि कथेतल्या काही कमकुवत बाबी दाखवून दिल्या तर काय करावं असं तुला वाटतं?
(माझी एक नवीन कथा एका अनुभवी व्यक्तीला मी वाचायला दिली होती. त्यावर त्या व्यक्तीच्या ज्या प्रतिक्रिया आल्या, त्यावरूनच ते सुरूवातीला मी मांडलेले प्रश्न मला पडले होते. मी बरेच दिवस त्यांची उत्तरं शोधण्याचा स्वतःशीच प्रयत्न केला.)

त्या अनुभवी व्यक्तीनं मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तू कथेचं पुनर्लेखन करशील का? पुनर्लेखन या गोष्टीवर तुझा विश्वास आहे का? (पुनर्लेखन संपूर्णतया नाही, पण काही बदल, काही तपशील वाढवणे, इ.)
मला स्वत:ला ही पुनर्लेखनाची प्रक्रिया खूप आवडते. (अर्थात, ऑलरेडी प्रकाशित झालेल्या कथेच्या बाबतीत नाही म्हणत मी हे,)
कथेचा पहिला खर्डा, त्याचं परत-परत वाचन, आवश्यक वाटल्यास पुनर्लेखन - ही सर्व प्रोसेस माझी प्रत्येक कथेच्या बाबतीत होते. या सर्वाला ६-८ महिन्यांचा कालावधी लागतो मला.

जिथे लख्ख अनुभूती असते तिथे लिखाणातला सच्चेपणा, ताजेपणा येतोच की.

>>> हे झालं लेखकाच्या बाजूने. याच्या उलट विधानही सार्थ ठरतं, की लेखनात जर सच्चेपणा, ताजेपणा असेल, तर वाचकांना लख्ख अनुभूती मिळते.
शेवटी, या लख्ख अनुभूतीमार्गे लेखक-वाचक पूल बांधणं जाणं महत्त्वाचं. मग या लख्ख अनुभूतीत कलात्मकतेचा वाटा किती?

Pages