कथालेखन - चर्चा आणि संवाद.

Submitted by नंदिनी on 27 November, 2012 - 04:36

सर्वच कथालेखक आणि लेखिकांना चर्चा करण्यासाठी व्यासपीठ. इथे कथा/कादंबरी या लेखन प्रकारावरची तांत्रिक अथवा सर्जनशील चर्चा आणि संवाद साधू शकता. रायटर्स ब्लॉक असल्यास इथे मदत घेऊ शकता, कथेसाठी पार्श्वभूमी बनवण्यासाठी आपण इथे एकमेकांची मदत करू शकतो.

कृपया, इथे चर्चा करत असताना संसदीय भाषेमधे चर्चा करा. तसेच, कुठल्याही होतकरू अथवा नविन कथालेखकांची इथे टिंगल करू नका. (कथांमधील चुका दाखवणे अथवा हलकीफुलकी मस्करी अवश्य चालू द्यात पण मुद्द्यांवरून गुद्द्यांवर येणे टाळा.

इथे आपले मुद्दे मांडण्याआधी आजवर झालेली चर्चा एकदा वाचून अवश्य घ्या म्हणजे पुन्हा तेच मुद्दे रीपीट होणार नाहीत.

हा धागा सध्या ग्रूपपुरताच मर्यादित ठेवला आहे.

हा अडमने चालू केलेला कथाकथी धागा. मायबोलीवरच्या उत्तम कथा त्याने इथे संकलित करून ठेवलेल्या आहेत. दिवाळी अंकांमधील कथा पटकन सापडत नाहीत कित्येकदा, तेव्हा या धाग्याचा उपयोग होऊ शकेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

...शेवट निश्चित करून मग शेवटाकडे निघालेली माझी कथालेखन पद्धत ऐकून तो हसला आणि म्हणाला, "कलाकृती अशी साचेबद्ध असू शकत नाही. आपल्या मनात कुठेतरी अनेक घटना, प्रसंग, गोष्टी फिरत असतात. त्यांना ना सुरूवात असते ना शेवट. आपण त्यातलं काहीतरी एक निवडून लिहायला सुरूवात करायची आणि ती सुरूवात आपल्याला नेईल तिकडे जात राहायचं. म्हणजे लोहचुंबकाला लोखंडाचे कण जसे आपोआप चिकटत जातात तशा अनेक घटना प्रसंग आपोआप जोडले जाऊन ती कथाच आपल्याला शेवटाकडे नेते. आपण कथेला ओढत न्यायचं नाही..."

-- 'आयदान', उर्मिला पवार.

धन्यवाद, साजिरा.

माझा प्रश्न परत वेगळ्या पद्धतीने फ्रेम करते. "हाच कथेचा शेवट आहे हे कथालेखकाच्या कसं लक्षात येतं? साहजिकच "ते सुखाने नांदू लागले" अशा शेवट अपेक्षित नाहीये...

नंदिनी, कथालेखकाच्या नाही, खुद्द कथेच्याच ते आधी लक्षात येतं. Proud

असो. थेअरीत अडकलं, की प्रकरण पुस्तकी होऊन आपल्यापासुन दूर दूर जात राहणार, त्यातून शिक्षण, फायदा काही नाही. झालीच तर सार्‍या कथांची सार्वजनिक परातीतली बर्फी होणार.
त्यामुळे माझ्याबाबतीत कसं घडलं, तेच सांगणं बरं होईल. प्रयत्न करतो. सर्वांनी तसंच केलेलं इतरांच्या फायद्याचं होईल. आपल्या शैलीला, प्रकृतीला मानवेल तेवढं उचलायचं. आपल्यादृष्टीने अनेक अंधारात असलेले मुद्दे प्रकाशात येऊ शकतात. 'अरे हो, या दृष्टीने आपण कधी विचारच केला नव्हता', असं होऊ शकतं.

त्यामुळे माझ्याबाबतीत कसं घडलं, तेच सांगणं बरं होईल. प्रयत्न करतो>> नक्की सांग.

मला थेअरीवाली उत्तरे नकोच आहेत. सध्या फक्त प्रोसेस बद्दल विचार करत आहे.

'कथा' हा साहित्यप्रकार आवडणार्‍यांनी, त्यावर मनापासून प्रेम करणार्‍यांनी, आपल्याला कथा लिहिता येतात असं वाटणार्‍यांनी, 'तुम्ही चांगले कथालेखक आहात' असं ज्यांना लोक म्हणतात त्यांनी, चांगल्या-वाईट-कशाही कथा लिहू इच्छिणार्‍यांनी- अशा सर्वांनी 'बाँबे टॉकीज' हा सिनेमा जरूर पाहा. करण जोहर, दिबाकर बॅनर्जी, झोया अख्तर आणि अनुराग कश्यप - अशा चार बाप दिग्दर्शकांनी पडद्यावर सांगितलेल्या चार कथा. करण जोहरचं क्लासिक नॅरेशन (माझ्यासाठी धक्का!), दिबाकरचे अफाट अँगल्स (हे 'लिहिणार' कसे?), झोयाच्या पद्धतीतलं मनस्वीपण आणि अनुराग कश्यपच्या गोष्ट सांगण्याच्या पद्धतीतली डार्क, रॉ आणि फ्रेश ट्रीटमेंट- हे सारं माझ्या कथेत कसं आणता येईल? अवघड आहे.

त्यातली दिबाकर बॅनर्जीने दिग्दर्शित केलेली नवाजुद्दीनची कथा 'मी ही कथा अशी 'लिहिली' असती' अशी असाईन्मेंटही वेळ मिळेल तेव्हा करून बघा. Happy

आपल्या परिचयाचा नसलेला असा एखादा ठराविक विषय, समस्या, समाज, समाजाचा भाग निवडून कथालेखन करताना कथालेखकाने नुसत्या कल्पनेच्या भरार्‍या मारत लिहू नये.
त्या त्या विषय/समस्या/समाज/समाजाचा भाग याबद्दल किमान रिसर्च करणे अत्यंत आवश्यक किंवा बंधनकारक आहे.
इमोशनल, सेन्टिमेन्टल ड्रामा घडवण्यासाठी शास्त्रीय सत्य व इतर फॅक्टसना कैच्याकै मुरड घालायची याला काही अर्थ नाही.
अश्या प्रकारचे लेखन भले कितीही भावनांनी डबडबलेले असो नॉर्मल मेंदू आणि अ‍ॅव्हरेज बुद्धी असलेल्याला वाचकालाही इरिटेट करते.
आणि कथा म्हणून लिखाण संपूर्ण फसते नक्कीच.

इमोशनल, सेन्टिमेन्टल ड्रामा घडवण्यासाठी शास्त्रीय सत्य व इतर फॅक्टसना कैच्याकै मुरड घालायची याला काही अर्थ नाही. >> Happy नीधप, तू हे म्हणालीस फार बरे. शास्त्र कुठे संपवावे आणि कल्पना कुठे वापरावी ह्याची माझ्यासारख्या नवीन लिहिणार्यांना नेहमी पडणारी पंचाईत. तू जे लिहिले आहेस ते मार्गदर्शक आहे. नुकत्याच काही गोष्टी वाचनात येत आहेत आणि तिथे नेमके काय घडतय हे समजताना ही माझा गोंधळ उडतो. तू नेमके त्यावर बोट ठेवलेस. असो, बाकीची चर्चा हळू हळू वाचतीये.

शास्त्र कुठे संपवावे आणि कल्पना कुठे वापरावी ह्याची माझ्यासारख्या नवीन लिहिणार्यांना नेहमी पडणारी पंचाईत.>>>> कल्पनेची भरारी कितीही असली तरी त्याला (काल्पनिक) का होइना शास्त्राचा बेस हवाच. उत्तम उदा म्हणजे आपल्याच रोलिंग बाई. जादू आहे म्हणून काय वाट्टेल ते घडत नाही. Happy

दुसरं म्हणजे सायफाय असो वा फँटसी, माणूस हा त्या प्रसंगात कसा रीअ‍ॅक्ट होईल, हे त्या कॅरेक्टरला, परिस्थितीला आणि कथेतील पर्यावरणाला अनुसरूनच व्हायला हवं. एखादे पात्र नेमके तसे का वागते याची लेखकाने कारण मीमांसा (अगदी शब्दांमधे नाही तर किमान कॅरेक्टरायझेशनमधून) तरी द्यायला हवीच. Happy

कल्पनेची भरारी कितीही असली तरी त्याला (काल्पनिक) का होइना शास्त्राचा बेस हवाच. <<
या उदाहरणात शास्त्राचा बेस ऐवजी तर्काचा बेस/ लॉजिक हे जास्त योग्य ठरेल का?

या उदाहरणात शास्त्राचा बेस ऐवजी तर्काचा बेस/ लॉजिक हे जास्त योग्य ठरेल का?>> हो ठरेल. पण मी जे म्हणत आहे तो काल्पनिक शास्त्राचा बेस. हॅरी पॉटरमधे एक समांतर दुनिया निर्माण करताना त्या दुनियेचे नियम लेखकाने ठरवलेत. पण त्या सर्व नियमांना कुठेतरी तर्क आहेतच.

'जीएंची कथा- परिसरयात्रा' हे पुस्तक वाचलं आणि इथं लिहावसं वाटलं.

जीएंच्या कथांनी आपल्या मनावर गारूड केलेलं असतं. आपण त्या पुन्हा पुन्हा वाचतो- तेव्हा हे जास्तच जाणवतं. त्यांची लाखो शेड्स असलेली पात्रं, पल्लेदार वर्णनं, श्रीमंत कथासूत्रं, मोहिनी घालणारी शैली, आणि अद्भूताच्या जवळ जाणारे आशय - हे सारं ऐश्वर्य पाहून थक्क व्हायला होतं. त्यांची बरीचशी पात्रं वेडसर-वेडाचारी, दुराग्रही, दाहक, भयंकर, अमानवी, विचित्र वाटत असली तरी ही सारी पात्रं ज्या परिसरात, स्थळांत फिरतात वावरतात- त्यांच्या वास्तविक वर्णनांनी स्थळा-पात्रांची बेमालुम गुंफण होते.. आणि नकळत गारूड होतं आहे, हे आपल्या लक्षातच येत नाही चक्क. त्या पात्रांना वास्तवाचं परिमाण ही स्थळं देतात, त्यांना भक्कम आधार देतात. त्यांच्या कथांमधली पात्रं जीएंनी खरंच कधी अनुभवली- पाहिली असतील का- असा प्रश्न आपल्या मनात येतो. मात्र कथांमधली गावे, रस्ते, चौक, गल्ल्या, कट्टे, वाडे, पिंपळपार, नद्या-ओढे हे सारे इतके जिवंत होऊन येतात, की हे नक्कीच कुठेतरी अस्तित्वात आहे- याची खात्री आपल्याला या कथा पुन्हा पुन्हा, आणि खास 'स्थळांसाठी' वाचताना लक्षात येतं. या सार्‍या स्थळांनी जीएंच्या अद्भुत पात्रांना अक्षरशः तोलून धरलं आहे. जिवंत नेपथ्य ही स्थळं आपल्या डोळ्यांसमोर उभं करतात, आणि जीएंच्या पात्रांच्या खरेखोटेपणाचा खटाटोप आपण कधी सोडून देतो, तेही आपल्या लक्षात येत नाही. एक प्रकारे ती स्थळं, ते ते परिसर हे जीएंच्या कथांमधली मुख्य पात्रं होऊन बसले. इतकंच नव्हे तर त्या कथांचा 'आत्मा' होऊन बसतात. कल्पना करून बघा- त्या अजरामर 'मठा' शिवाय 'स्वामी', कपिलेश्वराच्या मंदिराशिवाय 'लक्ष्मी', त्या पिंपळपाराशिवाय 'बळवंतमास्तर' आणि त्याने अक्षरशः भारून टाकलेली 'वीज', त्या विवक्षित 'गल्ली'शिवाय 'राधी', मावशी घराच्या परिसरशिवाय 'कैरी', देवरवाडीच्या डोंगराशिवाय 'फुंका'.. किती उदाहरणं सांगावीत!

'मी संपूर्णपणे काल्पनिक लिहू शकत नाही' असं (इतर अनेक लेखकांप्रमाणे) जीएंनी स्वतःच कबुल केलं आहे. आयुष्यभर काळ्या चष्म्याच्या आड जीएंनी आपलं वैयक्तिक आयुष्य लोकांपासून दडवलं. असे हे जीए आपल्या आयुष्यातले प्रसंग, पात्रे आणि स्थळे इतक्या सहजासहजी लोकांसमोर उघड सांगून टाकतील, ही शक्यताच नव्हती. पात्रांचा विचार थोडा बाजूला ठेवला, तर ते जिथंजिथं राहिले जगले, तो सारा परिसर जीएंनी आपल्या अलौकिक कथाविश्वात इतक्या बेमालुमपणे गुंफून टाकला आहे, की त्या त्या स्थळांत परिसरात रोजचं जीवन जगणार्‍या लोकांना सुद्धा त्याचा पत्ता लागला नाही. हे सारे परिसर आपल्यातुपल्या आयुष्यात रोज सामोरं येणार्‍या रस्ते, घरं, गावं, चौक, पार इ. सारखेच. पण या सार्‍या परिसरांना जीएंनी आपल्या प्रतिभेचा परिस लावुन त्यांचे सोने करून टाकले आहे.

कुठे जन्मली-रूजली ही अचाट कथाबीजं? कुठले हे परिसर आणि गावं-स्थळं? कसे नि कुठे शोधणार ते सारे?

अ.रा. यार्दी आणि वि. गो. वडेर या बेळगाव आणि धारवाडच्या प्राध्यापकद्वयींनी हे शिवधनुष्य उचललं. जीएंच्या कथा पुन्हा पुन्हा वाचून, अक्षरशः पाठ करून या परिसरांचा त्यांनी पाठलाग केला. जिथं जिथं जीए राहिले, तिथं कथेच्या खुणा शोधल्या. अनेक खुणांनी पाठशिवणीचा खेळ चालू केला. पण शेवटी त्या सापडल्या, आणि ती-ती स्थळं जीएंच्या कथा अंगावर मिरवत डौलाने सामोरी आली. तशी ती आली तेव्हा त्यांना जीएंच्या निरीक्षणशक्ती आणि स्मरणश्कतीचं कमालीचं कौतुक वाटलं.

आणखी एक म्हणजे, काही परिसर जीएंनी अगदी कॉपी केल्यासारखे वापरले, तर काही परिसर स्वतःच्या कथेनुसार जुळवून घेतले, त्यांत बदल केले. काही ठिकाणी एका परिसरातले डिटेल्स दुसर्‍यात कॉपी-पेस्ट करून अत्यंत चपखलपणे वापरले. आपण पिसून वाटलेले पत्ते हातात आल्यावर पाहिजे तसे जुळवून घेतो, तसे!

मुळातून आणि अभ्यास केल्यागत वाचावं, अशा या पुस्तकांत वर्णनं आणी छायाचित्रं यांचा मुक्तहस्ते वापर करत हे परिसर या लेखकांनी आपल्यासमोर उभे केले आहेत. त्या अलौकिक कथानक्षत्रांमागच्या कथा चित्रपटासारख्या आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. जीएंच्या चाहत्यांना अगदी 'तिर्थक्षेत्रे' वाटतील अशा स्थळांची छायाचित्रं. पुस्तकाबद्दल लिहिण्यासारखं भरपूर आहे, पण ते नंतर कधीतरी.

*****

'परिसर वाचन' हा कुठच्याही कथेच्या निर्मितीचा एक मुख्य भाग असावा. कथा जिथं घडते, तिथं ती मुळात सशक्तपणे आणि 'मुळं रोवून उभी' राहिलेली दिसणे- यामुळे कथेचा अंतिम परिणाम कितीतरीपट वाढतो, हे हाडाच्या कथावाचकांना सांगायची गरज नाही. आपापल्या कथांच्या परिसरा-स्थळांबाबत यापुर्वी इथं काही उल्लेख न झाल्यने आता लिहावंसं वाटलं.

*****

कथा पुढे सरकत नसेल, किंवा मुळात सुचत नसेल त्याच्या अनेक कारणांपैकी एक- आपण आपले परिसर 'नीट' बघत नाही, हेही असावं. लेखनाआधी हे परिसरवाचन मला नेहमीच महत्वाचं वाटत आलं आहे. इतर कुणाहीबाबत बोलण्याआधी स्वतःबद्दल बोलायचं ठरवलं, तर मी भूतकाळात जगलेले, वास्तव्य केलेले काही परिसर आणि स्थळं इअतकी भयकंर सशक्त आहेत, की त्यांच्यावर कथा लिहायची अक्षरशः भिती वाटते. लेकुरवाळ्यासारखं ते स्थळ अनेक कथाबीजांना कडेवर घेऊन आपल्याला वाकुल्या दाखवत असतं. त्यातल्या काही कथाबीजांची प्रखरता इतकी असते, की 'छे, नाही पेलवणार!' असं वाटून मी दोन पावलं मागे सरतो.

उदाहरणच द्यायचं झालं, तर माझ्या मूळ (वडिलांच्या) गावात आणि मामाच्या गावात एक समान धागा आहे- तो म्हणजे आता जिथं ती आहेत, तिथं ती काही वर्षांपुर्वी नव्हती. काही कारणाने (वादळ, पूर, अंधश्रद्धा, भौगोलिक स्थान सगळ्याच दृष्टीने चुकीचं असल्यचं लक्षात येणं इ.इ.) मूळ जागा सोडून दुसरीकडे वसली. यालाही झाली असतील ७-८-९-१० दशकं. पण मूळ गावांच्या ठिकाणी गेल्यावर खुणा दिसतात. घरांचे दगडी चौथरे, ग्रामदैवतं, जुने पार.. अनेक. या सार्‍यांना बर्‍यावाईट कथा चिकटल्या. जख्ख म्हातार्‍यांनी त्याभोवती स्वतःची भावविश्वं उभी केली. त्यातली काही भितीदायक आणि अमानवीही. हे सारे परिसर आता मंतरलेले वाटतात. तिथं उभं राहिल्यावर अनेक संमिश्र भावना-प्रसंग-आठवणी दाटून येतात.

*****

स्वतःपुरतं बोलायचं, आणि मायबोलीवरच्याच लिखाणाचा विचार करायचा, तर स्थळांचा आधार घेतल्याशिवाय मी फारसं कधी काही लिहू शकलो नाही. 'गावशीव' मधलं मूळ गाव तंतोतंत जसं आहे तसंच कथेत उभं राहिलं आणि मग ते स्थळ न राहता मुख्य पात्र झालं. आता पुन्हा 'स्थळ' ही मुख्य चौकट ठेवून ती कथा पुन्हा वाचतो तेव्हा असंख्य अध्याऋत कथा मला त्यात दिसतात. 'दरजा' मधलं गाव दुसरं आणि मोठं, पण तेही तंतोतंत तसंच्या तसं उभं राहिलं. त्यातला एकही तपशील गाळला, तरी ते मला अभिप्रेत असलेलं लिखाण होणार नाही असं धोशा जणू नेणीवेत कुठेतरी ते लिहिताना चालू होता. जीएंच्या 'परिसर-कॉपी-पेस्ट' बद्दल लिहिताना 'विहिर' आठवली आणि मला क्षणभर मजाच वाटली. कथेच्या शेवटी मुख्य पात्र बनून बसलेली ही विहिर चक्क मी कॉपीपेस्ट केली होती. सारे परिसर-स्थळं खरे होते. पण म्हणजे संपूर्ण मळा, घर राघोनानांचं, पण विहिर मात्र दुसर्‍याची (पण खरीच) आणून मी चिकटवली होती!! Happy 'इन्व्हाईट' सारखं एखादंच काहीतरी लिहिताना काल्पनिक परिसरांचा वापर झाला, पण तिथला अ‍ॅक्सिडेंट जिथं झाला, म्हणजे शिवाजीनगरच्या प्राईड हॉटेलच्या इथं सुरू झालेला आणि कृषी महाविद्यालयावरून जाणारा पूल- तो, तस्साच, तपशीलाबरहुकूम.

******

आपापल्या स्थळा-परिसरांचा अत्यंत चपखल वापर करून घेणारे काही मायबोलीकर लेखक (नवे-जुने-सारेच) आहेत. नुसती स्थळं उभी न करता, त्यांचा आधार घेऊन कथा उभी करणारे. असं जिवंत नेपथ्य उभं करून दाखवण्याची दुर्मिळ कला इथं अनेकांकडे आहे. तो तसा वापर केल्यावर आशयाची प्रखरता कित्येक पटीने वाढली / वाढल्यासारखी, हे मी अनेकदा वाचताना अनुभवलं आहे. अनेक कथालेखकांपासून अनेक गोष्टी शिकलो. त्यांच्या अशा काही कथांबद्दलही मला लिहायचं आहे. जीएंबद्दलच्या या पुस्तकाचं गारूड उतरण्याआधी हे करायला हवं. इतर कुणासाठी नाही, माझ्याचसाठी.

******

इतर कुणी यासंदर्भात लिहिलं तर मला ते हवंच आहे- माझ्या अभ्यासासाठी. Happy

साजिरा, नेहमीप्रमाणेच सुंदर पोस्ट.

लेकुरवाळ्यासारखं ते स्थळ अनेक कथाबीजांना कडेवर घेऊन आपल्याला वाकुल्या दाखवत असतं. त्यातल्या काही कथाबीजांची प्रखरता इतकी असते, की 'छे, नाही पेलवणार!' असं वाटून मी दोन पावलं मागे सरतो.
>>> क्या बात... Happy

एका दिवाळीअंकामधे जीए यांच्या कथांमधून दिसणारे पटकथालेखन असा विषय असलेला एक लेख वाचला होता. त्यानंतर कथा-कादंबरी वाचत असताना "वाचक कसे व्हिजुअलाईझ करतील" याचा विचार करून मग लेखन करण्यापेक्षा "वाचकांना ते कसे दाखवू शकतो" असा विचार करून मग लेखनामधे बदल मी तरी घडवत आणला आहे. याआधी मी कधी स्क्रीनप्ले टाईप कथा लिहिली नव्हती.

मुळात कथेमधे (खरंतर कुठल्याही फिक्शनमधे) एखादं स्थळ अथवा ठिकाण हे एखाद्या पात्राइतकीच महत्त्वाची भूमिका पार पाडणारं असतं असे माझे ठाम मत. जीएंप्रमाणेच स्थळांना पात्र बनवू शकणारे अजून एक म्हणजे प्रकाश संत. लंपन जिथे वाढला-खेळला त्या जागा आयुष्यात कधीही न बघता पण फार जवळच्या वाटत राहतात. मायबोलीबद्दल बोलायचं झालं तर साजिरा अथवा ललिता-प्रीतिच्या कथांमधे तर हे स्थळच कथानायक आहे. (दरजा, विहीर, रस्ता इत्यादि.)

एक लेखक म्हणून तुम्ही जेव्हा एखादे स्थळ अथवा परिसर लेखनात आणता तेव्हा त्याला अनुभवाचा थोडाफार तरी सपोर्ट असतोच. पण लिहत अस्ताना हे अनुभव एकमेकांमधे गुंतून जेव्हा एक वेगळंच रसायन तयार होत असतं. त्यामुळे लिहिताना त्या स्थळाबद्दल पूर्ण माहिती आणि ते कसे दिसत असेल याच अनुषंगाने ते कथेमधे यायला हवं. पण साला यात एक गोची असते, आपल्या डोक्यामधे काही स्थळं परफेक्ट बसलेली असतात. लेखक म्हणून आणि वाचक म्हणूनपण.

मला शाळा म्हटली की डोळ्यासमोर दामले हायस्कूलच उभं राहतं, जरी मी शिर्के हायस्कूल बद्दल बोलत असले तरी.... तसंच वाचकाच्या पण डोळ्यासमोर कुठलीतरी एक त्याच्या परिचयाची वास्तू उभारणारच की. त्यामुळे लिहिताना मला "वाचकांना डोळ्यासमोर शिर्के हायस्कूलच दिसलं पाहिजे" या दृष्टीने लिहायला हवं. प्ण ते कसं लिहायचं ते सर्वात कठिण काम बघा....

लंपन!! काय आठवण काढलीस. Happy

अरे तिथं तर नकाशेच आहेत अक्षरशः. लंप्याच्या भावविश्वातल्या जागा डोकाऊन बघण्यात वाचकांना रस नक्की वाटेलच - याचा केवढा जबरदस्त आत्मविश्वास! रेल्वेलाईनवरचे पहिले गेट, दुसरे गेट, तिसरे गेट. लंप्या खेळत खेळत कुठपर्यंत जात असे, ते आपण नकाशात बारकाईने बघत राहतो चक्क. आणि बेळगावातल्या गल्ल्या, शाळा, चौक, बागा.. इतकंच काय पण घसरगुंड्या आणि केस कापण्याच्या दुकानासारख्या क्षुल्लक वाटणार्‍या (नकादुचेण्यापकासके!! कमलवा-चनालय!!) वस्तु देखील संतांनी देखण्या नेपथ्याद्वारे आणि त्याला बिलगुन उभ्या राहिलेल्या पटकथेद्वारे उभ्या केल्या आहेत. परिसरांचा इतका सुक्ष्म पण जबरदस्त वापर करून घेणार्‍या महान लेखकांतले प्रकाश संत एक.

मस्त पोस्ट साजिरा.
खुप उपयोगी. Happy

मला हे आधी फारसे कधी जाणवले नव्हते. पण खुप आधी बिअ‍ॅट्रिक्स पॉटर ( पीटर रॅबिटची जन्मदात्री) बद्दल एक पुस्तक वाचले, त्यात तीने तीच्या आसपासच्या जागांना पीटर रॅबीट आणि बाकीच्या गोष्टीत कसे बसवले ते चित्र आणि फोटो सहीत दिले होते. तेव्हा ही जाणिव झाली. नंतर पाथेर पांचाली वाचल्यावर आजुबाजूचा निसर्ग , परिसर कथेचा किती मोठा भाग होऊ शकतो हे जाणवलं.

काय भारी लिहिलं आहेस साजिर्‍या... खूप सुंदर.

असंच छान छान नेहमी लिहित रहा.

साजिरा, उत्तम पोस्ट. जीएंचा कॆनव्हास अफाट आहे. परिसरयात्रा वाचणार.
नंदिनी, लंपनचे उदाहरण आणि गोची तंतोतंत!
एक नवीन पैलू मिळाला चर्चेला साजिरा तुझ्यामुळे.

फार सुंदर लिहिलंय साजिरा. सर्वांनीच लिहिलेले वाचते आहे आणि शिकते आहे. या आधीच या धाग्यावर डोकावायला हवे होते असे वाटले. असो. यापुढे सर्वांचे विचार वाचण्यासाठी आणि शिकण्यासाठी इथे येत राहीन. आणि माझ्यापाशीही काही सांगण्यासारखे असेल तर नक्की सांगेन.

परवा ललितचा कथा विशेषांक आला. वाचून प्रचंड निराशा झाली.

मुळात अंकामधे लिहिलेले कुणीही लोक मला याअधी कुठे वाचल्याचे आठवत नव्हते, अधिक परिचय वाचल्यावर हे सर्वजण "प्राध्यापक, सहयोगी अध्यापक, विविध ठिकाणी समीक्षात्मक लेखन केलेले" असे आहेत हे समजले. एकही कथालेखक अथवा लेखिकेने या अंकामधे लिहिलेले नाही. पूर्ण अंकभर विविध कथालेखक्-लेखिकांची समीक्षा करणे एवढेच केलेले आहे, ही समीक्षादेखील अगदी पुस्तकी आणि नवीन काहीही न देणारी. भरीसभर लेखाचे नाव आणि त्या लेखामधे कुठल्या लेखकांच्या लेखनाचा परामर्ष घेतला आहे, हे न समजण्याची पुरेपूर तसदी घेतली आहे. "महत्त्वाचे तीन कथाकार", "मानवी मनाचा तळ शोधणारे लेखक" असली अगम्य नावे दिलेली आहेत लेखांना. पूर्ण लेखन ५०-६-७-च्या दशकात झालेल्या लेखनाबद्दलच आहे. त्यानंतरच्या वेगळ्या वाटा चोखाळणारे लेखक यामधे नाहीतच. २००० नंतरच्या अनेक महत्त्वाच्या कथाकारांचा, बदलत्या माध्यमांचा यामधे आढावा राहू दे, उल्लेख देखील केलेला नाही.

त्यातल्या त्यात आवडलेले दोनच लेख म्हणजे स्त्रीकथाकार (एक आणि दोन अशा भागात आहे). आणि विज्ञानकथा.

नंदिनी.. अगदी!!
माझीही हीच प्रतिक्रिया झाली. (पण फक्त आपल्यालाच असं वाटलं की काय या विचाराने कुठे बोलायचीही चोरी वाटली. Wink )
मी अंक नुसता चाळून ठेवून दिला. अजून एकही लेख वाचलेला नाही. पण आता स्त्री-कथाकार आणि विज्ञानकथा हे लेख वाचेन म्हणते.

५०-६०-७०च्या दशकानंतरच्या लेखकांची नावं मुखपृष्ठावर तेवढी आहेत.
'कथा विशेषांक' म्हणताना 'ललित'ला हेच अभिप्रेत होतं का अशीही शंका आली. पण पुन्हा तोच दुसर्‍या ओळीतला कंस Biggrin

पण गेले कित्येक वर्षं ललितच्या 'समीक्षात्मक' लेखांची पातळी बहुतांशी अशीच असते की! आश्चर्य काही नाही त्यात Happy

'कथा विशेषांक' म्हणताना 'ललित'ला हेच अभिप्रेत होतं का अशीही शंका आली. पण पुन्हा तोच दुसर्‍या ओळीतला कंस >>> त्यामानाने समीक्षा विशेषांक बरा म्हणायची पाळी आलीये. मुख पृष्ठावर जेवढी नावे आहेत, त्याच्याने निम्म्याने सुद्धा त्यांच्या कथांबद्दल कुणी लिहिलेलं मला आढळलं नाही.

वरदा, मग कथा-समीक्षा विशेषांक असे नाव द्यावे सरळ. उगाच कथाविशेषांक असे म्हणायचे, Proud आणि त्यामधे कथालेखक्-लेखिका एकपण नाहीत असे कशाला? याआधीच्या विशेषांकामधे लेखकांनीदेखील त्यांच्या लेखनाविषयी लिहिलेच होते की. कविता, चरित्रे-आत्मचरित्रे इत्यादिंमधे.

अगदी अगदी वरदा. गेल्या कित्येक वर्षांत रंगारूपासकट सगळ्याच बाबतीत काळाच्या सोबत नि चौकटीच्या बाहेर पडायचं त्यांनी नाकारल्यागत.

चरित्रे-आत्मचरित्रे विशेषांक त्या मानानं मला आवडला होता. (आणि त्यातला अंबरीश मिश्र यांचा लेख तर फारच.)
असो. या धाग्याचा हा विषय नव्हे.

साहित्यलेखनातलं फारसं काही कळत नाही, पण तुम्ही सगळेजण इथे जे लिहिता त्यामुळे एक वाचक म्हणूनही खूप शिकता येतं. कधीकधी मला स्थळवर्णनं कंटाळवाणी वाटतात असं या क्षणापर्यंत वाटायचं. पण आता वर साजिर्‍याने लिहिलेलं पोस्ट आणि नंदिनीने दिलेलं (आणि माझं लाडकं) लंपनचं उदाहरण वाचून काहीतरी नवीन जाणवलं. लंपन मला एकेका काना-मात्रा-वेलंटीसकट लोभस का वाटला ते आता समजलं, आणि परिसरवर्णन माझ्याही नकळत मला आवडतही होतं हेही समजलं! Happy

तुम्ही मंडळी वाचकही असे "घडवताय"! असंच लिहीत रहा! Happy

Pages