अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इश्कजादे मधे, अर्जुन चे नाव "परमा" असते... हे बहुतेक एका "सहनही होत नाही, सांगताही येत नाही" अशा रोगाचे नाव आहे.

रमा Rofl असा स्मायली आहे. लिहिताना दोन विसर्गांमध्ये अक्षरांमध्ये अंतर न ठेवता हहगलो अस लिहायच. तसेच आपल्या प्रतिसादाच्या टेक्स्ट बॉक्सखाली २ नंचा ऑप्शन आहे "Textual smileys will be replaced with graphical ones" त्याच्यावरुन कॉपी पेस्ट करुन तुला स्मायली देता येतील

786

>>इनका कुंवारापन ध्यान मे रखते हुए ऑपरेशन नही किया है, सिर्फ इंजेक्शन देके सुलाया है..

आता त्या डॉक्टरला ती कुंवारी आहे हे कसं कळलं हे विचारण्याचा मोह आवरत नाहिये. म हा न!

रिटर्न ऑफ चन्द्रमुखी नावाचा महान चित्रपट इच्छा असूनही मातोश्रींच्या प्रोटेस्टमुळे पहाता आला नाही ह्याचं दु:ख मला मरेपर्यंत राहील. ह्यातला एकच सीन पाहिला ज्यात एक व्हिलन दारू घेत होता (म्हणजे तो व्हिलन असावा असा माझा कयास कारण तो दारू घेत होता. नाहीतर साऊथच्या पिक्चरमध्ये कोण हिरो आणि कोण व्हिलन ते बर्‍याचदा कळत नाही). हिन्दी पिक्चरमध्ये दारुसोबत शेंगदाणे वगैरे असतात. इथे हा माणूस प्रॉन्सचं लोणचं खात होता असं संवादात होतं. आणि त्या लोणच्याचा घास त्याने तोंड उघडून आत घालताना दाखवला. मला तर भीती वाटत होती की मस्तानीच्या गळ्यातून कसा पानाचा रस जाताना दिसायचा (म्हणे!) तसं ह्याच्या तोंडातून गळ्यात आणि गळ्यातून पोटात लोणचं जाताना दाखवतात का काय Uhoh

मला गोविंदाचा एक सीन आठवतोय. त्यात तो कोणाच्या तरी हॉटेलच्या रुममध्ये घुसतो. आणि फुटलेल्या टीव्हीच्या मागे बसून निरनिराळी गाणी गातो. हा कुठला चित्रपट होता कोणी सांगू शकेल का प्लीज?

वॉल - इ किंवा वॉली
यातली माणसे अनेक शतके स्पेसमध्ये राहिल्याने त्यांची हाडे कमकुवत होतात आणि त्यांना स्वतःचे स्वतः उभेही राहता येत नाही.

पण हीच माणसे पृथ्वीवर परत आल्यावर चक्क चालू लागतात.

तसेच फक्त जीवनाचा अंश शोधायला बनवलेला रोबो (किंवा येथे रोबोटीण Happy ) इतकी विध्वंसक कशाला असेल?
तिने असा अंदाधुंद गन चालवली तर असलेली रोपे ही मरून जाणार नाही का? असेही प्रश्न मला पडले होते.

पण बाकी वॉली आणि इव्हाचा चित्रपट इतका सुंदर आहे की ही गोष्ट मी त्यांना माफ करून टाकली. Happy

पूर्वी बर्‍याच चित्रपटांमध्ये एक सीन असायचा, एखाद्याला पळवून व्हीलनच्या अड्ड्यावर नेताना डोळ्यांवर पट्टी बांधत असत.
नंतर तीच व्यक्ती जेव्हा पोलिसांना अड्डा दाखवायला घेऊन जात असे तेव्हा उघड्या डोळ्यांनी त्याला काहीच आठवत नसे. मात्र तशीच पट्टी परत डोळ्यांवर बांधली की, इधरसे लेफ्ट, उधरसे राईट असे करत ते अचूकपणे व्हीलनच्या अड्ड्यावर पोचत असत.
असं प्रत्यक्षात कधी होतं का?

yeappy... मी काल राजतीलक बघितला.... पुर्ण बघायच भाग्य नव्हतं... शेवट बघीतला.... ती भारी घोडागाडी... ती राजमाता... ते लाल द्रवाचं कुडं.... कमल हसन च कर्तब.... डोळ्याची पारणं फिटली..

आत्ता मिथुनच्या 'जल्लाद'चा शेवटचा शीन पाह्यला. कालीमातेच्या मूर्तीसमोर अमावस वि. क्रांती (दोन्ही मिथुन. एक वृद्ध एक तरुण) यांचा आखरी सामना चालला होता. (अमावस आणि क्रांती यात हिरो कोण आणि व्हिलन कोण असेल सांगा बरं? आणि वृद्ध कोण आणि तरुण कोण असेल तेही!) तर कालीमातेसमोर असल्याने शेवटी हि.मि.ने त्रिशूळ भोसकून व्हि.मि.ला संपवले व तो बाजूला उभ्या बाईकडे (पक्षी: हिर्वीण) वळला. अहो काय आश्चर्य, व्हि.मि. मध्ये अजूनही जीव बाकी होता. त्याचा हात बाजूला गेला. तिथे एका ताटलीत फुलांच्या पाकळ्या आणि रिवॉल्व्हर होते. मनात म्हटले, 'च्यायला, मरता मरता हि.मि.ला गोळी घालायचा अटेम्ट करनार दिस्ते हा..' पण नाही. देवीच्या पायाशी पडल्याने व्हि.मि.चे अष्टसात्त्विक भाव जागे झालेले असतात. तो रिवॉल्व्हर लांब ढकलून देतो व स्वतःवर फुलांच्या पाकळ्या दोनदा उधळून घेतो, म्हणतो 'अमावस (तो स्वतः) जिंदाबाद...' आणि प्राण त्यागतो. आपल्याला ज्याने मारले आहे तो आणि पिस्तूल दोन्ही आवाक्यात असताना मनावर एवढा कंट्रोल ठेवणे, म्हणजेच दैवी चमत्कार.

जय भद्रकाली! (मि.च्या हौसफुल्ल २मधून साभार!)

'गीत' ह्या चित्रपटाचा शेवटचा काही भाग पहायला मिळाला. त्यात मालाताई सिन्हा दुल्हनच्या वेषात असतात. अचानक तिथे पोलिस येतात आणि तिच्या वडिलांचा खून नवरदेवाच्या वेषात असलेल्या सुजीत कुमारने केलाय वगैरे सांगतात. मग मालाताई त्याला यथेच्छ शिव्याशाप देतात. तेव्हढ्यात पोलिस तिला तिचा बॉफ्रे सुध्दा त्याच्याच हातून नुकता मेला असल्याचं शुभवर्तमान सांगतात. ह्यावर मालाताई एक हृदयद्रावक वगैरे म्हणतात तशी किंकाळी फोडतात. आणि 'मै आ रही हू' म्हणून दोन्ही हात पुढे करून सुसाट धावत सुटतात. लगेच सीन चेन्ज होतो आणि मालाताई डोंगराच्या कडेने धावताना दिसतात (बहुतेक लग्नाच्या हॉलजवळ डोंगर असतात). त्यांच्यामागे दोन आणखी बाया 'कमला कमला' असं ओरडत धावत असतात. डोंगराच्या सर्वोच्च टोकावरून उडी मारली नाही तर कदाचित आपण मरणार नाही ह्या भावनेतून ते टोक लवकरात लवकर गाठायचा मालाताईचा प्लॅन असतो.

मग राजेन्द्रकुमारला दोन लोक वाचवत असताना आपल्याला दिसतात. आपल्या मनात 'अरे देवा! हा का हिचा बॉफ्रे? त्यापेक्षा तो सुजीतकुमार बरा होता की' हा विचार चमकतो ना चमकतो तोच मालाताई डोंगराच्या टेरेसवर (जय पुलं!)) पोचलेल्या असतात. तिथून खाली नदीत उडी मारायच्या तयारीत त्या असताना डोंगराच्या ग्राउन्ड फ्लोअर (जय पुलं!) वरून राकु त्यांना पहातो. आणि 'कमला' असं खच्चून ओरडतो - बहुतेक तिने उडी टाकली आणि ती आपल्या डोक्यावर पडली तर आपलं काय होईल ह्या भीतीतून. एव्हढ्या खालून ती मालाताई आहे हे त्याला दिसतं हे एक आश्चर्य. मग लगेच पुढच्या शॉटमध्ये मालाताई त्याला मिठी मारतात. बहुतेक वार्‍याने साडीत वारं भरून त्या उडून खालपर्यंत येत असाव्यात. नंतरच्या शॉटमध्ये दोघे बागडताना आणि गाणं म्हणताना दाखवून पिक्चर संपतो. ह्याला म्हणतात क्रिस्प एडिटींग

800

अंकुश चित्रपटातील कोर्टातील एका दृश्यात एक हात नसलेलं पात्र दाखवलयं. त्याचे हात मागे बांधलेले स्पष्ट दिसतात. त्याचं काम दोनेक मिनिटांचच असेल. मग शोलेमध्ये सबंध चित्रपटात संजीव कुमारने हात बरे लपवलेत.

लोक्स, 'नीले गगनके तले' ह्या गाण्यात टॉय ट्रेनच्या समोरच्या भागात उभे राहून राजकुमार आणि विमी खाली काय टाकत असतात? जेव्हा जेव्हा हे गाणं बघते तेव्हा तेव्हा मला हा प्रश्न पडतो. शेवटी आज विचारायचं ठरवलं.

स्वप्ना, काय म्हैत... कबुतरांना दाणे टाकल्यासारखं केलय खरं... मी आत्ता मुद्दाम बघितलं ते गाणं.

उदयन, पाहून आलास का अजून खालीच थांबला आहेस? ट्रॅकवरून बाजूला हो आता नाहीतर ट्रेन उडवेल Proud

शिल्पि, दाद Happy

मी पण पाहीलं, खरंतर मी उदयला शोधायला गेलेलो ट्रॅकवर..हे दोघे दिसले, मेथी पेरतायत ते.. येताना ट्रेननं रस्ता चुकू नये म्हणून Happy

काल आरजू पिक्चरमध्ये राजेन्द्रकुमारसाहेब हॉस्पिटलच्या बेडवरून आई आणि बहिणीला फोन लावतात हा हृदयद्रावक सीन पाहिला. त्याच्या आईने बहुतेक एकही हिंदी सिनेमा पाहिलेला नसतो कारण तो "मला अ‍ॅक्सिडेन्ट झाला नाही, दुसर्‍या कोणाला तरी झालाय" म्हणून सांगतो तेव्हा ती त्याच्यावर विश्वास ठेवते. कोणीही काहीही सांगितलं तरी डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवणे हा हिरो किंवा हिरॉईन च्या आईच्या रोलचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. डोकं म्हणून वापरायचं नाही (डोम्हवाना).

मग आई 'बेटा, घर कब आओगे, तुम्हारी बहोत याद आ रही है' हा एखाद्या ट्रकच्या मागे शोभेल असा ड्वायलॉग टाकते. ह्यावर राकुसाहेब 'अभी नही आ पाउंगा मा, जिसका अ‍ॅक्सिडेन्ट हुआ है उसपर इलाज करने के लिये रुकना पडेगा'. ती माऊली 'बाकीचे डॉक्टर मेलेत काय?' हा प्रश्न विचारत नाही कारण डोम्हवाना हा आद्य नियम. बहिण त्या गावचा पत्ता देऊन ठेव म्हणून सांगते तेव्हा राकुसाहेब पोटात मुरडा धरल्यासारखा चेहेरा करुन 'पता बहोत दूरका है मेरी बहन' असं अनंताच्या प्रवासाला निघायच्या थाटात म्हणतात. बहिण सुध्दा डोम्हवाना नियमाची कट्टी पुरस्कर्ती.

फोन ठेवल्यावर डॉक्टर आगाउपणा करुन 'आपकी पत्नीको बुला लेना चाहिये' असं सुचवतात. त्यांनी बोलण्यात 'भाभी' हा शब्द ऐकलेला असतो कारण पेशन्टला फोनवर बोलताना प्रायव्हसी देण्याची पध्दत नसते. मग राकु 'भगवानकी दयासे मेरी शादी नही हुई है' असं काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटतो. त्या देवाची दया कसली, समस्त स्त्री जातीवर अनंत उपकारच म्हणायचे. डॉक्टरचे कान मिस्टर स्पॉकसारखे असतात बहुतेक कारण त्यांना राकुचं बोलणं ऐकायला येतं आणि ते 'फिर फोन पे भाभी बोल रहे थे उसका क्या' असं विचारतात. त्यांचा कोणीही पेशन्ट क्रिटिकल नसतो किवा त्यांना राऊन्डला जायचं नसतं. म्हणून फालतू गप्पा मारत असतात बहुतेक. राकु सज्जन वगैरे हिरो असल्याने 'तुम्हाला काय करायच्यात नसत्या चौकश्या. जा आपल्या कामाला' असं वसकन ओरडत नाही. 'वो एक सपना था' असं काहीतरी बोलतो.

एव्हाना मला श्ंका आली होती की अ‍ॅक्सिडेन्टमध्ये ह्याचे पाय गेले आहेत.पुढचं काही पहायची हिंमत झाली नाही.

Pages