हितगुज दिवाळी अंक - २०१० - अभिप्राय

Submitted by संपादक on 4 November, 2010 - 21:27

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०१०बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

---------------------------------

हितगुज दिवाळी अंक - २०१० आता पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक संकल्पनेची एक याप्रमाणे चार आणि 'ग्रंथस्नेह'ची एक अशा पाच फाईल्स इथून उतरवून घेता येतील.

विषय: 

instrumentation साठी उपकरणीकरण हा पर्यायी मराठी शब्द पटला नाही.

अनंत अमुची ध्येयासक्ती पण उत्तम जमले आहे. अभिनंदन डॉक्टरगारू.
नितीश कुमारांचा परत विजय झाला कारण त्यांनी विकास कामांवर दिलेले लक्ष. त्याचे एक उदाहरण मिळाले. प्रशासकीय सेवेत अश्या माणसांची गरज आहे.
अभिनय, रायफल शूटिन्ग, रंगकर्मी व यशोदाचे मनोगत वाचून झाले. सर्व तरुणाईचे मनापासून कौतुक. मला एक जास्त भावले म्हणजे ही मंड्ळी किती निगर्वी आहेत. त्यांचे कार्यच खूप काही सांगून जाते. स्वतःची मानसिक वाढ व्हावी म्हणून ते जागरूक आहेत ते किती शिकण्यासारखे आहे. परवा पुन्नीच्या शाळेत एका मुलास एपिलेप्सीचा अ‍ॅटॅक आला व सर्व मुले मुली बावरून गेल्या होत्या. तिला मी घरी आल्यावर यशोदाचे उदाहरण दिले होते व आमचा या बाबत संवाद झाला होता. मग आज तिचा लेख वाचला. साप्ताहिक सकाळ मध्ये तिचा आधीचा लेख वाचला होता. मुलांना कसे वाढ्वायचे ते ही हे वाचून कळते. मला फक्त मुलगी मोठी व्हावी व तिचे लग्न करून द्यायचे अश्या मर्यादित अपेक्षा स्वतःकडून होत्या पण आता वाट्ते कि अजून दहा पंधरा वर्षात तिला तिच्या आवडीच्या क्षेत्रात कामगिरी करण्यास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. तिचेही मनोगत अश्या एखाद्या लेखात आले तर किती छान होईल.

चेतन दातारांबद्दल माहिती मिळाली तरी आवडेल.
मराठी वेबसाइट्स चा उद्योग पण वाचले. माहितीपूर्ण आहे. पुण्यात अश्या प्रकारची व्यावसायिकता आहे
हे माहिती नसते. ते साहेब बायको वर घर चालवायचा भार टाकतात ते वाचून तर त्यांचा दोन क्षण हेवाच वाट्ला. किती गोड ना.

चित्रकलेतील पिकासोवरील लेख पण माहितीपूर्ण आहे. पिकासो चे शेवटी लिहीलेले वाक्य मस्त आहे.
या दिवाळी अंकामुळे माझ्या अंतरंगातील मातृभाषेत लिहीणे व चित्रे काढणे हे दोन निर्मल झरे वाहते झाले आहेत त्याबद्दल कॄतज्ञ आहे.

मिथक - फारशी आवडली नाही. खूप ढोबळ प्रतिमांचा वापर वाटला. जवळचं कुणी गमावणे व त्याने उध्वस्त होणे हे कथाबीज अधिक पदरी होउ शकते. मागल्या अंकात बहुतेक शोनूची अशीच कथा होती. ती फारच जास्त सपक/एकसुरी होती.

सेमो म्हणे: चित्रकला ह्याविषयी मला morbid कुतुहल आहे. शाळेत/इतरत्र ह्या कलाविष्काराचे संस्कार शून्य झालेत. असे लेख म्हणजे नीरजानेच लिहिल्याप्रमाणे आपल्या कलेचा आस्वाद घेण्याच्या जाणीवांना थोडे का होइना किलकिले करतात. धन्यवाद नीरजा.

लांडगा आला रे आला - simply great!! निव्वळ सुरेख पुस्तक परिचय. परिचयात कथा अनुक्रमणिका पद्धतीने न लिहिता पुस्तकाचा गाभा, शैली, पार्श्वभुमी हे सगळे अतिशय सोप्या व परिणामकारक पद्धतीने लिहिले आहे. १०० मार्क. लगेच ऑर्डर केले Happy (एक शंका: हे पुस्तक 'लांडगा आला रे आला' वा इतर नावाने मराठीत भाषांतरीत झाले आहे का? मी इंग्रजी Never cry wolf हेच ऑर्डर केले.)

श्रद्धाचा कला आणि 'न'कला लेखदेखील उत्तम उतरला आहे. बरीच नवीन माहिती कळाली तसेच इतर काही संदर्भ जे धरुन पुढे जाता येईल तेही कळाले.
चित्र/शिल्पकला व तिची विक्री-वितरण-ग्राहक व्यवस्था (थोडक्यात चित्र/शिल्पकलेची Value Chain) इतकी प्रचंड 'नावा'भोवती रेंगाळणारी आहे की ज्याचे नाव बडे त्याला भाव जास्ती. मुळात खरेदी करणारे अनेक प्रतिष्ठा व गुंतवणुक ह्या कारणांसाठीच केवळ खरेदी करतात. मग रिकाम्या पोटी कलेसाठी कला, कलेशी प्रामाणिक राहणे, कलाकाराची अस्मिता वगैरे गुंडाळुन तितकेच प्रभावी कलाकार नकला बनवतात. तसेच लेखन्/नृत्यादी कलांच्या तुलनेत चित्र/शिल्पकलेत तंत्र आत्मसात करुन स्रुजनाची कमी भरुन काढता येते. नकलाकार नेमके हेच करतात.

पिकासो - संवेदचा हा लेख अतिशय त्रोटक वाटला. ह्यात ना पिकासो एक व्यक्ती म्हणुन पुढे येतो ना त्याच्या चित्रकारितेवर भाष्य येते. खरं म्हणजे प्रचंड लिहिता येईल (आणि लिहिले गेले आहे) असे हे व्यक्तिमत्व. 'सेमो म्हणे'ने जशी एका नव्या कलाकाराची, त्याच्या कलेची ओळख करुन दिली तश्याप्रकारे काहितरी अपेक्षित होते. त्याइअवजी अगदीच विकीपिडिया स्टाइल लेख वाटला.

स्थापत्य कशाला म्हणतात हो: प्राथमिक माहिती देणारा लेख म्हणुन ठिकठाक वाटला. पण माहितीची थोडी जास्तच गिचमिड झाली आहे. कुठलाच स्थपती ठळकपणे उभा राहत नाही, त्याची सौंदर्यस्थाने/सामर्थ्य अगदी एक-दोन वाक्यात गुंडाळले गेले आहे. हा लेख अजून विस्तृतपणे आला असता तर मजा आली असती. लेखकाकडे ह्या विषयाचे सखोल ज्ञान आहे हे दिसतेच तसे मराठीतून सुलभरित्या ते मांडण्याची हातोटीदेखील आहे. लेखकाने जर पुन्हा ह्या लेखावर हात फिरवून एक मोठा लेख लिहिण्याचे मनावर घेतले तर एक उत्कृष्ट लेख वाचण्यास मिळेल.

मंजूडी "वेगळ्या वाटेवरची एक 'तालबद्ध' वाटचाल" - वाचुन मस्त वाटलं .
अश्विनीमामी "विश्व सुगंधाचे" फारच आवडले. एका अतिशय नविन विश्वाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद Happy
चिनूक्स "सागरपरिक्रमा" आवडली.

दिवाळी अंक सुरेखच झाला आहे. हे सगळं कधी वाचून होणार.. एवढं लिहिणारे लोक इथे आहेत हे माहितीच नव्हतं. अभिप्राय नक्की देईनच थोडेच दिवसात. छान उपक्रम आहेत इथे.. संपादक मंडळावर मोठीच जबाबदारी असणार अशा पद्धतीचा अंक तडीस नेण्याची आणि असे काम करायला कोणाला आवडणार नाही!

मोडकांची बळी आवडली. साजिर्‍याची कॅटवॉक नाही. खूप पुस्तकी भाषा वाटली, कृत्रिम वाटली एकुणच. साजिरा बरेच चांगले लिहू शकतो.

कृष्णमेघ कुंटेची मुलाखत अनिशाने सुरेख घेतली आहे. सोप्या मराठी शब्दांचा वापर केला आहे. एकूणच मेहनत घेउन मुलाखत घेतली आहे.
वीणा जामकरचे मनोगतदेखील अत्यंत वाचनीय. केवळ नाटक/चित्रपट ह्या कोषात मर्यादित न राहता एक व्यक्ति म्हणुन पुढे जाण्याचा प्रयास करणे, त्याबाबत सजग असणे हे फार कौतुकास्पद वाटले.

बरेचसे लेख वाचले जसा वेळ मिळेल तसा पण अभिप्राय दिला गेला नाही प्रत्येक लिखाणावर.
आस्वाद, विचारगर्भातून हे विभाग सगळ्यात जास्त आवडले. त्या खालोखाल दिवाळी संवाद.
ग्रंथस्नेह हा प्रकार एकदम आवडला. कुठली पुस्तके वाचायला हवीत हे कळले. पण तो ग्रंथस्नेहचा लोगो चटकन दिसत नाही त्या लोगोऐवजी जर ही लिंक डावीकडे आस्वाद, आविष्कार, अभिप्राय इ. टॅबच्या खालीच अजून एक टॅब घालून दिली असती तर जास्त योग्य झाले असते.

अनीशा,
कुंटेंवरचा लेख अतिशय छान जमला आहे - मुलाखत ती म्हणजे. सर्वच नीट आहे पण त्यांनी जे शेवटी लिहीले आहे ते अगदी अमुल्य आहे. आपण एक अत्तर वाट्त फिरणारे फुलपाखरूच आहोत असेच मला वाट्ले. Happy
पर्यावरणावरील विचार पण मस्त आणि बरोबर आहेत. त्यांनाही छान पेरेंटिंग मिळाले आहे. हे वाचूनच किती बरे वाटते. मीपण मुठा नदीत असलेले साप पाहिले आहेत एकेकाळी व लोक त्या नदीत मासे पकड्त असत हे खरे वाट्ते का?

चंदनची प्रकाशचित्रे सुंदर तसेच धनश्रीचे स्पंदन देखील.. 'कट्यार काळजात घुसली'ची गाणी कित्येकदा ऐकली आहेत.. नाटक मात्र काय असेल हा विचारदेखील केला नव्हता.. पौर्णिमामुळे ते कळाले.. अर्थात त्यातला शेवटचा परिच्छेद फारच पुस्तकी वाटला..
विश्व सुगंधी - फारच मस्त लिहिला आहे हा लेख. सोप्या भाषेत भरपूर ओळख करुन दिलीत आणि एका नवीन जगताची सफर घडवलीत.

अश्चिगचा लेख मात्र थेट बाउन्सर.. ह्याचे इंग्रजी रुपांतर उपलब्ध आहे का? Happy

सावलीचा 'रंगवूनी आसमंत' पण आवडला. त्यातली प्रकाशचित्रे तर अतिशय सुरेख..

प्रवीणपाची योसेमिटीची सफर आणि पक्का भटक्याची राजगड सफर - दोन्ही प्रवासवर्णने आवडली.. योसेमिटी हे प्रस्तरारोहण करणार्‍यांचे एक आवडते ठिकाण.. राजगडबद्दल तर बोलाल तितके थोडे. आणि ती राजगडाची ओढ पक्का भटक्याच्या शब्दात ठायीठायी जाणवत आहे.

मुख्यपृष्ठावरील भोवरे, त्याच्याबाजूची जाळी (दोरी), पोते, भोवरे ठेवलेली पाटी, खालच्या लाकडी फळ्या आदी साहित्य सगळे अगदी कोरे करकरीत वाटते आहे. अगदी दुकानातून आणलेले, नवे.
तेच जर भोवरे टोच्या पडलेले, वापरलेले, मळके पोते, जुनी पाटी, जुने प्लोअरींग आदि असते तर वेगळेच फिल आले असते. हे म्हणजे एखादा शहरी गबरू मुलगा आहे अन त्याला चित्रपटात ग्रामिण मुलाची भुमिका दिलेली आहे असे वाटते आहे. ('टिंग्या' त्याला अपवाद आहे.)

अंक अगदी जबरा आहे. लेख हे सिलेक्षन करून टाकलेले आहेत काय? किंवा ज्यांनी दिले त्यांचे आले आहेत?

हा धागा वर आला त्या निमित्ताने -

मी अंकासाठी काहीच साहित्य पाठवलेले नव्हते. पण आता उत्सुकत अशी वाटत आहे की ....

काव्यविभागात घेण्याच्या पात्रतेचे काहीच वाटले नाही - याबाबत..

१. जे काही साहित्य आले होते ते आता स्वतंत्ररीत्या प्रकशित करता येईल का?

२. हे कोणत्या निकषांवर नाकारले गेले ते निकष समजतील का?

३. हा निर्णय कुणाचा होता ते समजेल का?

आणि

४. कशाच्या आधारावर हे ठरले की निर्णय घेणार्‍यांची 'तो निर्णय घेण्याची' पात्रता आहे? त्यांची काव्य कारकीर्द काय?

कुणीतरी माहिती दिल्यास बरे वाटेल.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मायबोलीवर लेखन प्रकाशित होताना ते तपासलं/संपादित केले जात नाही. कारण कुठले लेखन कुठल्या दर्जाचे आहे हे ठरवण्याचा निर्णय वाचकाचा आहे.

असे असूनही आपल्यातल्याच काही मायबोलीकरांनी संपादक मंडळ स्थापून दिवाळी अंक प्रकाशित करण्याची कल्पना मांडली ती गेली ११ वर्षे आपण सुरु ठेवली आहे. त्या त्या वर्षीच्या संपादन मंडळाला योग्य वाटेल ते लेखन प्रकाशित केले जाते. हे निकष दरवर्षी बदलू शकतात (बहुदा बदलतातच). अशा निर्णयात वैयक्तीक मत असणे साहजिकच आहे जे कुठल्याही प्रकारच्या स्पर्धेत/निवडीत असतेच. असा संपादित दिवाळी अंक असल्यामुळे मायबोलीवरच्या लेखनस्वातंत्र्याला बाधा येईल का किंवा काहिच व्यक्तींनी हे ठरवल्यामुळे दर्जाबद्दलचे नवीन प्रश्न निर्माण होतील का अशी भिती आम्हालाही होती.

मुख्य संपादक आणि संपादक मंडळ दरवर्षी बदलते. संपादक मंडळावर एका व्यक्तीला (एका आयडीला नाही Happy ) जास्तीत जास्त ३ वर्षे काम करता येते.

संपादक मंडळाचे कुठलेही निकष जाहीर करायला संपादक मंडळ बांधिल नाही. आणि यात काही वेगळे नाही. आवाज असो, मौज असो किंवा मटा असो, कुठल्याही अंकाचे प्रकाशक/संपादक नंतर त्यांच्या अंकाबद्दल जाहीर निकष सांगत नाही.

१. होय. अंकासाठी पाठवलेले कुठलेही साहित्य (यात गद्य आणि पद्य दोन्ही आले) लेखक मायबोलीवर अंक प्रकाशित झाल्यावर करू शकतो. फक्त अंक प्रकाशित होण्याआधी (जर लेखन दिवाळी अंकासाठी विचाराधिन असेल तर) तर ते मायबोलीवर किंवा इतरत्र प्रकाशित करू नये अशी आमची अपेक्षा आहे. हे देखील मुद्रित माध्यमाच्या संकेतांना धरून आहे.

२. या प्रश्नाचे उत्तर सध्याचे संपादक मंडळ जास्त चांगले देऊ शकेल. पण त्यांनी उत्तर दिलेच पाहिजे असे बंधन नाही.

३. हितगुज दिवाळी अंक २०१० संपादक मंडळाचा.

४. हा प्रश्न कुठल्याही निवडीच्या संदर्भात येऊ शकतो. दिवाळी अंक प्रकाशनाच्या काळात गुलमोहरावरही लेखन प्रकाशित करता येत होते. ज्यांनी ते लेखन स्वप्रकाशित न करता दिवाळी अंकासाठी पाठवले त्यांनी एका अर्थाने प्रकाशित करण्याचा निर्णय (दिवाळी अंकापुरता) संपादक मंडळाकडे दिला. त्यामुळे खरोखर कुणाची पात्रता आहे हा प्रश्नच गौण आहे कारण स्वतः लेखकाने (कविने) तो निर्णय दुसर्‍यावर सोपवला आहे.

लेखनाचा दर्जा ही वाचक आणि लेखक या दोघांमधली सापेक्ष गोष्ट आहे. म्हणूनच ज्या वाचकाला जे योग्य वाटेल ते वाचावे.

तसेच संपादकांची पात्रता ही वाचक, लेखक आणि संपादक यातली सापेक्ष गोष्ट आहे. लेखकाला एखाद्या संपादकाबद्दल खूप आदर असला तरी वाचकाला त्या संपादकाच्या निवडीशी काही देणेघेणे असेलच असे नाही. त्यामुळे

- लेखकाला संपादकाच्या चाळणीतून (दिवाळी अंक) किंवा चाळणीशिवाय (थेट गुलमोहर) प्रकाशित करण्याचे स्वातंत्र आहे.
- वाचकाला संपादकाच्या चाळणीतून किंवा चाळणीशिवाय प्रकाशित झालेले वाचण्याचे स्वातंत्र आहे.
- संपादक मंडळाला हवी ती चाळणी लावण्याचे स्वातंत्र आहे.
- त्याच चाळण्या नेहमी लागू नयेत म्हणून संपादक मंडळाच्या सदस्यांवर कालमर्यादेचे बंधन आहे.

अ‍ॅडमिनटीम,
बेफिकीर यांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण दिलेले उत्तर यातून शंकासमाधान होत नाही.

दिवाळी अंकाच्या संपादकीयात खालील वाक्य पाहावे.

"खेदाची गोष्ट एवढीच की, गद्यसाहित्याच्या तोलामोलाचे पद्यसाहित्य पुरेसे न आल्याने पद्यविभाग आम्हांला वगळावा लागला."

याचा अर्थच असाकी कोणीतरी लेखनाला "पात्रअपात्रतेचा" निकष लावलाच आहे. नेमकी ती व्यक्ती कोण? त्या व्यक्तीचे काव्ययोगदान काय? त्यांची काव्य कारकीर्द काय? असा थेट प्रश्न आहे आणि आपण त्याला पद्धतशीर बगल दिली आहे. Happy

गद्यसाहित्याच्या तोलामोलाचे पद्यसाहित्य या अनुषंगाने.

१) मायबोलीवर गिरीश कुळकर्णी,अज्ञात, मिल्या,वैभव जोशी,मुकुंद कर्णिक, उमेश कोठीकर, शरद, बेफिकीर,कौतुक शिरोडकर, छाया देसाई, विशाल कुळकर्णी, प्राजू, उल्हास भिडे, जयवी अंबासकर वगैरे कवी माझ्या नजरेत दिग्गज कवी आहेत. आता हे सर्व कवी "तोलामोलाचे" नाहीत असे मला माझ्या मनाला समजावणे भाग पडत आहे.

२) माझ्या माहितीप्रमाणे किमान ६ मायबोलीकर कविंचे काव्यसंग्रह आणि किमान ४ मायबोलीकर कविंचे अल्बम प्रकाशीत झाले आहे. तेही "तोलामोलाचे" नसावेत.

३) संपादक मंडळात कुणी कवी आहे काय?

४) माबोवरचा माझा वावर फक्त १ वर्षाचा असताना मला संपादक,सल्लागार मंडळातील किमान एक व्यक्ती मला "काव्यमत्सरी/कवीमत्सरी" आढळून आली आहे. आपल्याला तसे जाणवले नाही काय?

असो,
काव्य हेच अस्सल साहित्य असते. आणि साहित्याचा उगमही काव्यापासूनच झाला. त्याला टाळून साहित्यजगताला पुढे जाताच येणार नाही. एवढे भान स्वतःला उच्चअभिरुचीसंपन्न समजणार्‍या साहित्यप्रेमींना असायलाच हवे.

एवढाच या निमित्ताने अनाहूत सल्ला.

खरोखर या निमीत्ताने एक काही सांगावेसे वाटते.
जनसामान्यात साहित्य म्हणजे केवळ लेख अन कथा कादंबरी आहे असेच समजले जाते. तुलनेने कवि मंडळींकडे कुजक्या नजरेने बघीतले जाते. त्यांची टिंगल केली जाते. तसे पाहिले गेल्यास कुणाची कविता चांगली अन कुणाची वाईट असे काही माप उपलब्ध नाही.
तरीही आपण काव्य विभाग वगळला हे योग्य नाही. अर्थात सगळी मालकी हक्क आपलाच असल्याने आपण कराल ते योग्यच असेल. पुढील वर्षी काव्य विभाग टाळू नका.

याची भरपाई एखादा काव्य अंक काढून होवू शकेल काय?

इतरांचे मते वाचनिय ठरावीत.

मुटे, मी यावेळी नाही पण पूवी ३-४ वेळा संपादक मंड्ळात काम केलेय त्यावरून सांगतेय. कुणी एक जण निवडत नाहीत साहित्य. पूर्ण मंडळाचा असतो तो निर्णय - आलेल्या प्रत्येक साहित्यावर.
तुम्ही एक गोष्ट लक्षातच घेत नाहिये. वर तुम्ही दिलेली नावे असतील उत्तम कवी/कवयित्री. पण त्यांनी अंकाला साहित्य पाठवले होते का ? असल्यास ते या अंकाच्या थीम मधे बसणारे होते का याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? उगीच आपले निवडीबाबत आरोप करताय ते?
"मंडळातील किमान एक व्यक्ती मला "काव्यमत्सरी/कवीमत्सरी" आढळून आली आहे" >>> या वाक्यातून तर तुमच्याच मनात काहीतरी आकस आहे हे दिसत आहे !! कारण मला तर कुणीच कवीमत्सरी दिसले नाही त्यात. Happy
तसेही अ‍ॅडमिन टीम ने अथवा संपादकांनी मायबोलीवर कोणतेच काव्य दर्जेदार नाही किंवा एकूण काव्य हा प्रकार दर्जेदार नसतो असे वाक्य म्हटलेले नाहिये त्यामुळे "काव्य हेच अस्सल साहित्य असते. आणि साहित्याचा उगमही काव्यापासूनच झाला. " ही अन तत्सम वाक्ये इथे सरळ निरर्थक आहेत!

मैत्रेयी,

माझा मुद्दा

गद्यसाहित्याच्या तोलामोलाचे पद्यसाहित्य

या वाक्याशी आणि दिवाळी अंकातून काव्याला "डच्चू" देण्याबद्दल आहे. याविषयी पहिले तुम्ही तुमचे मत नोंदवावे.
त्यानंतर पुढील चर्चा करणे योग्य ठरेल.

याचा अर्थच असाकी कोणीतरी लेखनाला "पात्रअपात्रतेचा" निकष लावलाच आहे. नेमकी ती व्यक्ती कोण?>> मुटे मी ह्या वर्षी नसले तरी सुरूवातीची ३-४ वर्षे अंकाचे संपादन केले आहे आणि त्या वेळेपासून हे निर्णय एकत्रितरित्या घेते हा माझा अनुभव. हि प्रथा कधीच बदलली असेल असे वाटत नाही त्यामूळे निर्णय हा एका व्यक्तीचा नसून मंडळाचा आहे हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर.

कवितांचा दर्जा हा अतिशय सापेक्ष मुद्दा आहे हे तुम्ही हि मान्य कराल, तेंव्हा बाकीच्या मुद्द्यांना अर्थच उरत नाहि.

मुटे, अहो त्याबद्दलच म्हटलेय मी, तुम्ही असे इन्टरप्रेट करताय की इथे एवढे उच्च कवी असून आणि काव्य हाच साहित्याचा उगम असून काव्यमत्सरी लोकांनी काव्याचा काटा काढला आहे. प्रत्यक्षात एकमेकाशी संबंध नसलेली ती वाक्ये आहेत. Happy
यावर्षी अंकासाठी पाठवले गेलेले पद्यसाहित्य अंकाच्या थीम अन दर्जाच्या निकषावर बसले नाही त्यामुळे यावर्षी काव्य विभाग ठेवलेला नाही. गद्य विभागातले साहित्य त्यांच्या निकषाला पात्र ठरले त्यामुळे तो विभाग आहे! सिंपल ! यात अवघड काय आहे कळायला?!

मुटेजी, वर जी काही नावे लिहलीत त्यात आपलेही नाव असावे असे प्रकर्षाने जाणवले.
आपणही थोर कवी आहात.
तेवढे पोस्ट एडिट करून आपलेही नाव घाला बरे. Happy
बाकी संपादक मंडळ त्यांचे मत मांडेलच की, थोडी वाट बघाच.

(एक भा.प्र.- बेफिकीर यांच्या सगळ्याच कवीता आपण कुटुंबासोबत शेअर करीत असाल?
संदर्भ- माझ्या विपूशीतले आपले उत्तर, अर्थात साहित्य/कविता(शाकाहारी, मांसाहारी वगैरे) म्हणजे काय च्या बाबतीतले)

अ‍ॅडमीन टीम,

१. प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

२. आपला प्रतिसाद पटला. अंकासाठी असलेली लिखीत / अलिखीत नियमावली योग्य व न्याय्यच आहे हे माहीत होतेही व ते आपल्या प्रतिसादातून सिद्धही झाले आहे.

३. एका गोष्टीकडे मी लक्ष वेधू इच्छितो. आंतरजालीय दिवाळी अंक व मटा, आवाज यासारखे हार्ड कॉपी अंक यात एक महत्वाचा फरक आहे. आंतराजालीय जग कितीही मोठे असले तरीही अजूनसुद्धा इथे असे होते की हे जग एखाद्या छोट्या खेड्याप्रमाणेच असते. येथील लोक एकमेकांना (प्रत्यक्ष किंवा आंतरजालावर) परिचित असतात. इतकेच नाही तर आंतरजालावर तत्क्षणी प्रतिसादाची असलेली सोय ही येथील अनेक सदस्यांमधील मैत्रीसंबंधांवर प्रभावी परिणाम करते. उदाहरणार्थ 'क्ष' हा 'य' चा कायमस्वरुपी साहित्यिक शत्रू होणे हे या प्रतिसादांच्या सोयीमुळे सहज शक्य होते. कंपूबाजीही निर्माण होण्यास प्रतिसाद व अनेकदा मूळ लेखन जबाबदार असू शकते. असे मटा, आवाज हे अंक लायब्ररीतून आणले किंवा विकत घेतले तर होणे अवघड असते. वाचक मूळ लेखकाला अशा अंकामध्ये 'जाहीर' प्रतिसाद देऊ शकत नाही. हे सर्व आंतरजालावर शक्य असल्यामुळे वरील नियमावली न्याय्य असली तरीही या छोट्या खेड्यातील अनेक निवासी संपादक मंडळाबाबत नाराज असू शकतात. तसेच, न्याय्य वागणुक मिळाली नाही अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होणे शक्य असते. तसे माहेर, मटा, आवाज या अंकांसाठी लेखन पाठवणार्‍यांचे होणे बरेचदा अवघड असते.

४. पद्य हा विभाग वगळणे - ही एक विस्मयजनकच बाब म्हणावी लागेल. अत्यंत सुमार कविता समाविष्ट केल्या असत्या तरी लोकांनी 'काय या कविता आहेत' इतकाच प्रतिसाद दिला असता. ज्या मायबोलीवर कविता, काकाक, काव्यधारा व गझल या सर्व विभागांमध्ये दिवसाला शेकडो पोस्ट्स पडत असतात व त्यांना हजारो प्रतिसाद येत असतात त्या मायबोलीच्या दिवाळी अंकात काव्यविभागही घेता येत नाही इतके सुमार पद्य आले? मग 'सुमार' किंवा 'तोलामोलाचे नसणे' या संज्ञेचा अर्थ सांगणे हे जरी बंधनकारक नसले तरीही त्याच मायबोलीवर कित्येक कविता पोस्ट करणार्‍यांना उत्सुकता असू शकेल म्हणून किमान दोन कविता उदाहरणार्थ देऊन त्या का समाविष्ट कराव्याश्या वाटल्या नाहीत याचे समर्थन तरी मिळायला नको का? मायबोलीवर असे कोणते कवी किंवा समीक्षक आहेत ज्यांची अभिरुची अशी आहे की पद्यविभागच वगळला जावा? त्यांचे नेमके कविता या क्षेत्राला योगदान काय? हे प्रश्न मला तरी पडलेच. पद्यविभाग वगळला जाणे किंवा वगळावा लागणे यापैकी एक बाब नक्कीच हास्यास्पद आहे. पहिली नसली तर दुसरी!

=====================================================================

मुटे,

तुमच्या कवीमत्सरी या शब्दाचा मी विरोध करतो. मला तरी ते अनावश्यक वाटले.

============================================================

मैत्रेयी व असामी,

आपण लिहीलेले मुद्दे हे बेसिकली अ‍ॅडमीन टीमनेच मांडलेले मुद्दे आहेत व तेही नियमावलीकडेच बोट दाखवतात. ते योग्य आहेतच. माझे मत असे आहे की 'पद्यविभाग वगळलाच गेला किंवा वगळावाच लागला' हा प्रकार होण्याइतके नेमके काय काव्य आले होते ते समजेल का, त्यावर संपादन मंडळाने कसे कसे निर्णय घेतले वगैरे! अर्थात, ते करण्यास ते बांधील नाहीत हे समजलेले आहेच, पण हे सगळे विस्मयजनक वाटते खरे!

====================================================

अर्ज / ए आर जे,

१. मला भा.प्र. म्हणजे काय ते माहीत नाही.

२. माझ्या सर्व कविता कुटुंबासोबत शेअर करता येतील काय - याबाबत!

मुळात मी अंकासाठी काही पाठवले नाही. तरीही, आपले हे विधान फक्त आणि फक्त व्यक्तीगत स्वरुपाचे आहे व मी वर अ‍ॅडमीनला जे लिहीले आहे त्याचाच पुरावा आहे. आपले हे विधान येथे सुसंगत वाटत नाही आहे व आपण संपादक मंडळावर असलात आणि वरील विधान हे एक निकष म्हणून लिहीले असलेत तर ते आणखीनच हास्यास्पद आहे. (अवांतर - मुटेंना पोस्ट एडिट करून स्वतःचे नाव घालायचा सल्ला हाही मला व्यक्तीगत रोख असलेलाच वाटला. पण हे अवांतर आहे. )

-'बेफिकीर'!

बेफिकीर,

तुमचा ३ रा मुद्दा पटला. तशी कंपूबाजी काही प्रमाणात होऊ शकते (पण नेहमीच होते असे नाही). पण ती होऊ नये म्हणून असलेले काही नियम (कालमर्यादा, दिवाळी अंकासाठी किंवा गुलमोहर अशा दोन्ही ठिकाणी पाठवायचे स्वातंत्र्य) त्यावर काही प्रमाणात बंधन घालतात. आणि अगदी कविता विभाग असता तरी त्यात कुठल्या कविच्या कविता येणार यावरूनही मतभेद किंवा कंपूबाजीचे आरोप होऊ शकतात.
पण हे नवीन नाही. अगदी सत्यकथेसारखे प्रकाशनही कंपूबाजीच्या आरोपातून निसटले नव्हते. (नवकथेवरचे वाद आठवा).
कंपूबाजी वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि कळत/नकळत होऊ शकते : माझी आवडती/नावडती व्यक्ती पासून ते माझ्या आवडत्या/नावडत्या विषयापर्यंत, शैलीपर्यंत. (उदा. मुक्तछंदातल्या कविता/हझल/हायकू/रसग्रहण अमूक संपादकाला भावत नाहीत) त्यामुळे नेमके कशाला कंपूबाजी म्हणायचे हे ही सापेक्ष.

गंगाधर मुटे,पाषाणभेद,
"In Democracy, decisions are made by those show up" असे एक वाक्य आहे. थोडा बदल करून मायबोलीवर "Decisions are made by those volunteer" असे म्हणावे लागेल.

माझ्या गावातली एक घटना सांगतो. गावात एक स्कूल कमिटी आहे. शाळेच्या कुठल्या उपक्रमाला किती पैसे द्यायचे, बजेट पास करायचे वगैरे कामे त्या कमिटीकडे असतात. कमीटीवर गेल्यावर पैसे मिळत नसल्यामुळे ज्यांना हे काम करायची आवड आहेत त्याच व्यक्ती सहसा या फंदात पडतात.
गावातली शाळा खूप नावाजलेली शाळा आहे.
गावात संगिताच्या क्षेत्रात जागतिक नाव असलेले अनेक कलाकार आहेत. त्यांच्याकडे भरपूर पैसे असूनही (आणि इतर शाळांमधे मुलं पाठवायची ऐपत असूनही) ते गावातल्या शाळेतच मुलांना पाठवतात. काहीजण त्या शाळेत मुलांना पाठवता यावे म्हणूनच आमच्या गावात राहतात.

गेल्यावर्षी आर्थिक मंदीमुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे स्कूल कमिटीला काही अवघड निर्णय घ्यावे लागले.
त्यातला एक टोचणारा निर्णय म्हणजे शाळेतला संगिताचा विभाग बंद करणे. हा विभाग बंद करण्याअगोदर, कमिटीने मुलांना संगित शिकवण्यासाठी कुणी स्वयंसेवक मिळतात का या प्रयत्न केला होता. पण कुणि मिळाले नाही. सगळे नावाजलेले कलाकार आपआपल्या कार्यात व्यस्त असल्यामुळे वेळ देऊ शकत नव्हते.

संगीत विभाग बंद केल्यावर बराच गदारोळ झाला. कारण ज्या गावात जागतिक प्रसिद्धी मिळालेले इतके कलाकार त्या गावातल्या शाळेत संगीत विभाग बंद पडला.
काही मोठ्या कलाकारांचा स्कूल कमिटीवरचा (त्यातल्या लोकांच्या पात्रतेवरचा) विश्वास उडाला आणि त्यांनी गाव सोडण्याचा किंवा मुलांना दुसर्‍या शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला.
काही कलाकारांनी तो विभाग पुन्हा चालू होईपर्यंत जेंव्हा शक्य असेल तेंव्हा फक्त मुलांसाठी संगीताचे कार्यक्रम केले ज्यामुळे चांगलं संगीत त्यांच्या कानावर पडत राहील.
काही कलाकारांनी , ज्यांना संगीताची चांगली जाण आहे अशा आपल्या चाहत्यांना स्कूल कमिटीवर जायला प्रोत्साहित केले.

आज शाळेतला संगीताचा विभाग पुन्हा सुरु आहे.

अगदी जश्यास तसे नसले तरी ही घटना आणि आपली वरची चर्चा/घटना समांतर आहेत असे मला वाटते. कारणे वेगळी असली तरी आपल्याला नक्कीच काहितरी शिकण्यासारखे आहे.

चला, म्हणजे जे जुन्या काळी अन छापील मिडीयामध्ये वाद होते तसेच वाद आंतरजालावरील मिडीयात होत असतात तर. आता पुढच्या अंकात आपण कविता हे सदर राहिल अशी आशा करूया. (पण परत काहीतरी थिम असेल अन कविता मिळाल्या नाही तर?)

धन्यवाद अ‍ॅडमिनटीम,
आमच्या मुद्यांना विस्तृत उत्तर दिल्याबद्दल आभार.
आपली पहिली पोष्ट "मंत्र्याना पाठीशी घालतांना पंतप्रधान सारवासारव करतात" तशी वाटली. पण आपल्या दुसर्‍या पोष्टवरून आपण यासंदर्भात गंभीर आहात हे दिसले. शिवाय आपल्या पोष्टने चर्चेची पातळीही उंचावली. त्यामुळे मला काय म्हणायचे होते, हे मी सांगण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही.

एखादा विशेषांक काढायचा झाल्यास तो आपल्याला हवा तसा काढता येतो, पण आपण काढलाय त्याचे नाव "हितगुज दिवाळी अंक २०१० असे आहे". दिवाळी अंकाला स्वत:ची एक परपंरा आहे. त्यात काव्यालाही वरचे स्थान आहे. शिवाय मायबोलीचा हितगुज विभाग व्यापून टाकणारे लेखन "कविता" याच विभागात होत असते, हेही नाकारून उपयोगाचे नाही.
असे असताना दिवाळी अंकात काव्य विभागाला "डच्चू" देणे, ही फ़ार चांगली बाब नाही.
मग दिलेला "डच्चू" जाणूनबुजून की अपरीहार्यता याचाही विचार करणे गरजेचे आहे.
जाणूनबुजून असेल तर ती गंभीर आणि अक्षम्य बाब ठरेल, याबद्दल तुम्ही सहमत व्हायला हरकत नसावी.
पण ही जाणूनबुजून केलेली कृती नाही, असे मान्य करून हा विषय येथेच थांबवतो.
मग उरते अपरीहार्यता.
१) यंदाच्या दिवाळी अंकासाठी लेखनाचे बाबतीत थिम दिली होती. विषय किंवा थिम देवून निबंध लिहिले जातात, लेख, ललीत,कथा लिहील्या जाऊ शकतात. पण काव्यही याच थिममध्ये अपेक्षित होते. "अभिजात काव्य हे उत्सुर्त असते, अभिजात काव्य विषय किंवा थिम घेऊन लिहीले जाऊ शकत नाही" हे कळायला संपादक मंडळात किमान २-४ कवी किंवा काव्याची जाणकार मंडळी असायला हवी होती. तसे असते तर त्यांनी थिम सारखी कल्पना काव्यावर लादली नसती.(कारण हा दिवाळी अंक आहे, स्पर्धा किंवा एखादी काव्य-कार्यशाळा नाही.) पण जर का लादलीच असती तर थिम घेऊन "तोलामोलाचे काव्य" कसे रचावे याचा धडा घालून देण्यासाठी त्या कवी संपादकांनी स्वत:च प्रत्येकी २ अशा किमान ८ कविता सादर करून उदाहरण पेश केले असते. आणि "काव्य विभागही" शाबूत राहीला असता.
२) थिम घेऊन कविता लिहून ज्यांनी पाठवल्या त्या संपादक मंडळाला "गद्यसाहित्याच्या तोलामोलाच्या" वाटल्या नाहीत.
३) माझ्या दोन नंबरच्या पोष्टमध्ये मी मायबोलीवरील कविंची यादी दिली आहे. पण यांनी दिवाळी अंकासाठी कविता पाठविल्या की नाही हे माहीत नाही. मायबोलीवरील शेकडो कविंपैकी निदान ५-६ कविंनी रचना पाठवल्या असत्या तरी "काव्य विभाग" शाबूत राहीला असता.
मग एकतर पाठवल्या असणार पण "गद्यसाहित्याच्या तोलामोलाच्या" नसल्यामुळे कचरापेटीत गेल्या असणार किंवा पाठवल्याच नसणार, केवळ दोनच शक्यता.
अ) ज्यांनी पाठविल्या त्या जर दर्जेदार नसतील तर तो त्यांचा दोष नाही. थिम घेऊन लिहिलेले काव्य उपजत अथवा अभिजात असू शकणार नाही, हे ध्यानात घ्यायलाच हवे. (तरीही त्यांनी रचना पाठविल्या असतील तर, आता यापुढे मात्र ते असे करण्यापुर्वी दहादा विचार करतील.)
याउपरही ज्याला कोणाला असे वाटते की थिम घेऊन तोलामोलाचे काव्य रचले जाऊ शकते, त्याला माझे आवाहन आहे की त्याने मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी दिलेली थिम घेऊन एखादी "तोलामोलाची" रचना लिहून येथे,याच बाफ़वर सादर करावी.
ब) ज्यांनी पाठविल्याच नाहीत त्याची अनेक अलग-अलग कारणे असू शकतात. पण ज्यांची पाठवायची इच्छा होती तरी पाठविली नाही, त्यांना "निकालाचा अंदाज" माहित असावा, असे असेल तर ती आनंदाची बाब खचितच नाही.
.........
माझा मुख्य आक्षेप
"खेदाची गोष्ट एवढीच की, गद्यसाहित्याच्या तोलामोलाचे पद्यसाहित्य पुरेसे न आल्याने पद्यविभाग आम्हांला वगळावा लागला."
या वाक्यातील गद्यसाहित्याच्या तोलामोलाचे पद्यसाहित्य या शब्दाविषयी होते.
मुळात गद्य आणि पद्य यात तुलना होऊ शकते काय?
मुळात पद्य हेच अभिजित साहित्यकृती असते. ज्ञानेश्वरीतील किंवा कोणत्याही पद्यातील दोन ओळीवर गद्य स्वरूपातील हजारो प्रबंध लिहून पीएचड्या घेता येऊ शकतात. कवितेच्या दोन ओळीचा गद्य स्वरूपात अर्थ लिहायला शेकडो ओळी खर्ची पडू शकतात. असे एखादे उदाहरण आहे का, की एखाद्याने एक गद्य लेख लिहिला आणि त्या गद्यलेखाच्या आधारे हजारो कवितांची निर्मिती झाली? पद्यलेखनाच्या तुलनेने गद्यलेखन हे दुय्यमच असावे कदाचित. त्यामुळे गद्य आणि पद्य यात तोलामोलाची तुलना होऊच शकत नाही.
"पुलंची बटाट्याची चाळ हे गद्य आणि जितेंद्र गावंडेची कविता" एवढे दोनच पर्याय उपलब्ध असतील तर दोन्हीही रचना श्रेष्ट आहेत असेच म्हणावे लागेल. जितेंद्र गावंडेची कविता दर्जेदार नसेल तर ती इतर कवितांच्या तुलनेने नसेल पण गद्याच्या तुलनेने ते काव्य म्हणून श्रेष्टच असते.
........
असो.
अ‍ॅडमिनटीम,
कवितेला भविष्य असलेच पाहिजे एवढे जरी आपणांस वाटत असेल तर दिवाळी अंकात काव्य विभाग नसणे ही चूकच झाली असे गृहित धरून पुढील वाटचाल व्हायला हवी, असे माझे व्यक्तिश: प्रांजळ मत.
.
गंगाधर मुटे
..............................................................

>> असे एखादे उदाहरण आहे का, की एखाद्याने एक गद्य लेख लिहिला आणि त्या गद्यलेखाच्या आधारे हजारो कवितांची निर्मिती झाली?

मला दोन तरी उदाहरणं माहिती आहेत.. पहिलं.. रामायणावरून झालेली गीतरामायणाची निर्मिती. दुसरं.. ऑथेल्लो या नाटकावरून झालेली ऑथेल्लोच्या ऑप्राची निर्मिती.. ऑप्रा मधील सर्व संवाद गाण्यात असतात.. अधिक माहिती... http://en.wikipedia.org/wiki/Othello

>>ज्या मायबोलीवर कविता, काकाक, काव्यधारा व गझल या सर्व विभागांमध्ये दिवसाला शेकडो पोस्ट्स पडत असतात व त्यांना हजारो प्रतिसाद येत असतात त्या मायबोलीच्या दिवाळी अंकात काव्यविभागही घेता येत नाही इतके सुमार पद्य आले?
इथे आयडीप्रियता आणि दर्जा यांची गल्लत होती आहे असे मला वाटतय.... भरभरुन प्रतिसाद आलेली एखादी कविता अथवा लेख मुद्दाम उघडुन वाचायला जावे तर तिथे बर्‍याचदा निराशा होते.... आणि मग लक्षात येते की प्रतिसाद पोत्याने आले असले तरी त्यातले विषयाला धरुन आणि ठोस काहीतरी मांडणारे प्रतिसाद फार कमी असतात!
आणि दर्जाची चाळणी गुलमोहराला लावली तर गुलमोहरावरचा वावर फारच सुसह्य होइल पण मायबोली हा खुला मंच असल्यामुळे हे शक्य नाही Sad

>>याचा अर्थच असाकी कोणीतरी लेखनाला "पात्रअपात्रतेचा" निकष लावलाच आहे. नेमकी ती व्यक्ती कोण? त्या व्यक्तीचे काव्ययोगदान काय? त्यांची काव्य कारकीर्द काय? असा थेट प्रश्न आहे
असा थेट प्रश्न विचारुन प्रशासकांकडून पारदर्शीपणाची अपेक्षा ठेवणार्‍यांनी त्यांना आढळलेल्या "काव्यमत्सरी/कवीमत्सरी" संपादकाचे/सल्लागाराचे नावही तितक्याच खुलेपणाने जाहीर करावे ना!

बाकी पुल आणि जिगा यांच्या साहित्याची तुलना फारच हास्यास्पद Sad

चिमनजी,

ऑथेल्लो बद्दल मला काहीही माहीत नाहीये.

पण नाटक किंवा चित्रपट यांना निव्वळ गद्य म्हणता येणार नाही.
नाटक आणि चित्रपट यात गद्य आणि पद्याची सुंदर सांगड घातलेली असते.

एखाद्या थोर गद्य लेखकाच्या कथानकावर जरी चित्रपट काढायचा असेल तर ती कथा आहे तशी वापरली जात नाही.
प्रथम कथेचे रुपांतर पटकथेत केले जाते आणि मग गद्यकथेचे रुपांतर संवाद व गीते यात केले जाते.
गीत हे पद्य असतेच पण संवाददेखील लयबद्ध होऊन पद्याकडे झुकायला लागतात.
संवाद उच्चारण देखील सपाट गद्य स्वरूपात केले जात नाही. त्यात नादमाधुर्य आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो.
संवाद फेक जर पुरेशी नादमधूर येत नसेल तर अशावेळी त्याला पार्श्वसंगीताची जोड देवून कर्णप्रिय केले जाते.
आणि नायक संवादफेक करतांना त्यात जेवढे पद्यमय नादमधूर आभास निर्माण करील त्यावर त्याचे यश अवलंबून असते.
उदाहरणार्थ :
" अरे ओ सांबा, कितने आदमी थे" हा संवाद नादमधूर लयबद्धतेत उच्चारला गेला म्हणून तो कर्णप्रिय झाला.आणि प्रसिद्ध पावला. त्याची गोडी आजही टीकून आहे.
" अरे पिन्ट्या, तुझ्या शाळेत कीती शिक्षक आहे रे" असे आपण जेव्हा मुलाला विचारतो, तेव्हा त्याचे उच्चारण निखालस, निर्भेळ गद्यात असते म्हणून ते ऐकताना पिण्ट्या सुद्धा फारसे मन लावून ऐकत नाही. आणि बाबा, तुम्ही आता जे म्हणाले ते वन्समोअर होउन जावू द्या, असेही म्हणत नाही.
...
पद्याविना गद्य निरसच असते.
तोलामोलाची गोष्ट तर फारच लांब.
.
गंगाधर मुटे

इथे आयडीप्रियता आणि दर्जा यांची गल्लत होती आहे असे मला वाटतय.>>> सहमत आहे.

(अवांतर - आपली मते मला खरोखरच नेहमीच आवडलेली आहेत.)

यावरून पुन्हा सिद्ध व्हावे, गुलमोहरातील बहुतांशी कविता सुमार असतात. त्या मायबोलीच्या खुल्या पॉलिसीमुळे प्रकाशित होऊ शकतात. व्हेअरअ‍ॅज, दर्जाचा निकष लावायचा झाल्यास मायबोलीवरील (तात्कालिन) संपादक मंडळाला एकही कविता घ्यावीशी वाटू शकत नाही. यावरून, गुलमोहरातील कवितांना येणारे स्तुतीपर प्रतिसादही हेतूपुरस्पर दिलेले असण्याची शक्यता अधिक आहे व यामुळेच प्रतिसादांमध्ये सॅन्क्टिटी नसते हे मत बनण्यास कारणे निर्माण होतात.

-'बेफिकीर'!

Pages