एक धागा किश्श्यांचा

Submitted by अरूण on 17 April, 2009 - 00:48

आपल्या पैकी बरेच जण गप्पा मारताना असंख्य किस्से सांगतात. पण ते बहुदा वाहून जाणार्‍या पानावर असल्यामुळे सगळ्यांनाच याचा आनंद घेता येत नाही. म्हणून हा धागा सुरु करत आहे.

तरी आपण सर्वांनी आपापले किस्से इथे लिहावेत, म्हणजे सगळ्यांना ते वाचता येतील.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्म्म. पण आम्ही घाबरलो होतो जाम तेव्हा. असं कुणीच्या कुणी येतं काय, काहीही सांगतं काय, एकीकडे 'बायकांना मज्जाव' असणार्‍या त्या ठिकाणी आम्हा स्त्रियांना बिनबोभाट प्रवेश मिळतो काय.... सगळाच डोके चक्रावणारा प्रकार! आणि पैसे वगैरे काही घेतले नाहीत त्या बाबानं....त्यामुळे तसे बोलायला पण जागा नाही!! आम्हीही शेवटी त्या अनुभवाचा फारसा अ‍ॅनॅलिसिस करायच्या भानगडीत पडलो नाही. एकतर त्या 'कबरी' असल्यामुळे, व ऐतिहासिक वास्तूच्या टप्प्यात असल्यामुळे त्यांचे खरे-खोटे ताडायला काही मार्ग नाही. ( म्हणजे खोदाईला परवानगी मिळेल ह्याची सुतराम शक्यता नाही. ) त्यासंदर्भातली काही कागदपत्रे, नोंदी अस्तित्वात असतील तर त्यांचा आम्हाला पत्ता नाही. आणि त्या फकिराच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा की नाही, तर ती 'मधली' लटकेश अवस्था असते ना, तसल्यातली गत! Happy

आत्ता लिहीताना सुद्धा माझ्या अंगावर काटा उभा राहतोय, असा हा अनुभव.
शंतनूचं पोस्टिंग अखनूरला होतं तेव्हाची गोष्ट. मी जम्मूला एकटीच राहत होते. मुलगी सात महिन्यांची होती फक्त. जम्मूत कॅण्टमध्ये आम्हांला मिळालेलं घर रस्त्याच्या अगदी वळणावरच्या इमारतीत तळमजल्यावर होतं. म्हणजे तीनही बाजूंनी मोकळं. फेब्रुवारीच्या पहिल्या आठव्ड्यात तिथे पोहचलो आणि आठवड्याने मला जरा स्थिर स्थावर करून देऊन शंतनू परत अखनूरला गेला. फेन्सिंग करायला वेळच मिळाला नाही. पुढच्या महिन्यात येईल तेव्हा करू असे ठरले.
मुलगी लहान असल्याने आणि प्रचंड थंडी असल्याने मी सगळी कामे उरकून लवकरच झोपायचे. त्यादिवशी लेकही लवकर झोपली होती. साधारण सादेदहा वाजता आर्मी फोनची रिंग वाजली. मी उचलला तर पलीकडची व्यक्ती घाणेरड्या भाषेत बोलू लागली. मी हादरले , कारण नवरा घरी नाहीये हे त्या व्यक्तीला माहिती होते आणि धमकी देणार्‍या भाषेत बोलत होती.
मी फोन ठेवून दिला आणि मोबाइलवरून नवर्‍याला फोन केला. तो मेसमध्ये जेवत होता. बरोबर कमांडर आणि इतर सिनिअर अस्ल्याने तो हळु बोलत होता. मी त्याला फोनबद्दल सांगितले. त्याचा एक कोर्समेट जम्मूतच सिग्नल्स मध्ये होता. त्यांच्याकडेच ।ई आर्मी फोन्सची जबाबदारी अस्ल्याने नवर्‍याने मला त्याला फोन करायला सांगितले, फोन ट्रेस करता येतोय का ते बघ म्हणाला.
मी नवर्‍याशी बोलून फोन कट केला आणि परत आर्मी फोनची रिंग वाजली. परत तीच व्यक्ती होती आणि यावेळी 'हसबंडको फोन करके क्युं बताया?' अशी सुरुवात करून परत तेच घाणेरडे बोलू लागली. मी पुरती हादरले. मी नवर्‍याला फोन केल्याचे कळले म्हणजे ती व्यक्ती इकडे खिडकीजवळच असणार, ती मला बघू,ऐकू शकतेय, या विचारानेच मी गळून गेले.
मग घाबरत घाबरत नवर्‍याच्या मित्राला फोन केला. त्याच्याकडून फोन ट्रेस करता येत नसल्याचे कळले. त्याची बायको पण गावाला गेली होती, पण त्याने परत फोन आला तर कळवा, मी तिकडे येतो असे सांगितले. मी परत नवर्‍याला फोन करून सांगितले. तो पण जरा घाबरला. पण काय करणार?
मी राहत होते त्या कॉलनीला 'एस एफ कॉलनी' म्हणतात, तिथे ज्यांचे नवरे फिल्डमध्ये असतात अश्या बायका राहतात. म्हणजे जवळपास कोणीच ऑफिसर नव्हता, ज्याला मी बोलावू शकेन, शिवाय नवीनच आलो असल्याने कोणाचे फोन नं. ही नव्हते.
माझ्याच इमारतीत वरच्या मजल्यावर आमच्या कमांडिंग ऑफिसरची बायको राहत होती. तिच्याकडे जायचे मी ठरवले. मुलीला तसेच उचलले आणि मुख्य दरवाज्याजवळ आले. पण दार उघडायचे धाडस होईना. दार उघडले आणि समोराच ती व्यक्ती उभी असेल तर... या विचाराने थरकाप उडाला.
पण काहीतरी करणे भाग होते, जर दरवाजा फोडून कोणी घरात घुसले तर मी काय करणार होते? त्यापेक्षा बाहेर पडले तर निदान आरडाओरडा करू शकेन, असा विश्वास वाटला. हळून दार उघडून अंदाज घेतला आणि जी पळत सुटले ती वरच्या मजल्यावर जाऊनच थांबले. मिसेस घोष नी दार उघडेपर्यंत जीवात जीव नव्हता.
तिकडे नवर्‍याला सारखे फोनवर बोलताना पाहून कमांडरनी विचारले. नवर्‍याने सगळं सांगून दुसरे दिवशी सकाळी लवकर जम्मूला यायची परवानगी मागितली. अखनूर ते जम्मू आहे पाऊण्-एक तासाचे अंतर , पण सहज येता येत नाही. सिंगल गाडी पाठवत नाहीत. बरोबर सिक्युरीटी घेऊन यावे लागते. गाडीसाठी परवाना काढावा लागतो.
पण असे असूनही कमांडर म्हणाले,"अरे, उद्या काय? तू आत्ता निघ. बरोबर जरा चारपाच जण अजून घेऊन जा. त्याला शोधायचा प्रयत्न करा. " त्यांनी आपल्या जबाबदारीवर गाड्या दिल्या. नवर्‍याचा 'मी येतोय' म्हणून फोन आला तेव्हा मी मिसेस घोषच्यी घरची बेल वाजवत होते.
नंतर मध्यरात्री एक वाजता नवरा आला. घराच्या आसपासचा सगळा परिसर धुंडाळला. पण ती व्यक्ती सापडली नाही Sad
नवर्‍याच्या सुभेदार साबने तर "साब, उअसको पहले इधर ले आना, हम अच्छेसे समाचार लेंगे. फिर पुलिसमें देना." असे बजावले होते.
दुसरे दिवशी कॅण्टमध्ये हंगामा... कमांडरनी सकाळी पहिला फोन करून हेडक्वार्टर्समध्ये तक्रार नोंदवली. एकट्या राहणार्‍या लेडीजच्या सुरक्षिततेविषयी अनास्थेवर बराच उहापोह झाला. रोज गस्त घालायची जबाबदारी एका युनिटकडे देण्यात आली.
पण आजही विचार केला तर वाटतं, त्यादिवशी दार उघडल्यावर ती व्यक्ती आत घुसली असती तर.......

प्राची, अनोळखी जागा, लहान मूल, एकटी बाईमाणूस, नवरा बाहेरगावी आणि अपरात्री असा घाणेरडा फोन.... तुझ्या डेअरिंगचं कौतुक की त्या परिस्थितीतही तू प्रसंगावधान राखून पटापट निर्णय घेतलेस....!! प्रसंग बाका होता हे मात्र नक्की!!
अवांतर : माझ्या आईची मैत्रिण आर्मी वाईफ असल्याने ती कायम सांगत असते, नवरे जेव्हा बॉर्डर वर किंवा पोस्टिंगवर दुसर्‍या ठिकाणी जातात तेव्हा त्या बाईला कशाकशाला तोंड द्यायला लागतं ते.... अगदी घरातल्या नोकर चाकरांच्या असहकारापासून ते आर्मी स्टाईलने पूर्ण घर मॅनेज करणं, मुलांची जबाबदारी, नोकरी करत असल्यास तो व्याप इ.इ.इ. पण ती हेही आवर्जून सांगते की इतर आर्मी कुटुंबे अशा परिस्थितीत तुम्हाला शक्य तेवढी मदत करतात, कम्युनिटी स्पिरिट जबरदस्त असते.

प्राची, अगा बाबौ!!!

खरच अशावेळी काय कराव हेच सुचत नाही.

पुढे तो मनुष्य सापडला असेल तर त्याला बरी अद्दल घडवायलाच पाहिजे होती.

ह्म्म्म्म, त्या प्रसंगाने चांगलीच हिम्मत दिली मला. आता बिनधास्त राहते एकटी. असे फोन बिन आले तर उलट त्यालाच पोलीसांच्या धमक्या द्यायलाही शिकलेय आता. Happy

पण ती हेही आवर्जून सांगते की इतर आर्मी कुटुंबे अशा परिस्थितीत तुम्हाला शक्य तेवढी मदत करतात, कम्युनिटी स्पिरिट जबरदस्त असते.
>>>> अगदी खरं. एका कुटूंबासारखेच राहतो आम्ही. या प्रसंगाच्या आधी आणि नंतरही मी एकटी राहिलेय. पण कधी काही त्रास झाला नाही.

बाप रे प्राची!! तुझ्या धाडसाचं कौतुक तर आहेच पण ती फोन करणारी व्यक्ती सुद्धा धाडसीच म्हणायला हवी. पकडलो गेलो तर काय अशी शंकाही त्याला आली नाही. विकृती इतर सगळ्या भावनांवर मात करते हेच खरं Sad

प्राची - बापरे!!! लई डेंजर!!!
अरुंधती - भारी भारी किस्से आहेत तुझ्याकडे - शेअर कर नक्की!

प्राची, बापरे... लहान बाळ असताना पण तू प्रसंगावधान राखलंस!!

अरुंधती, काय जबरा अनुभव असेल तो. पुढच्या वेळेला विजापूरला गेले की त्या कबरी शोधून तिथे माहिती मिळवायचा प्रयत्न करेन Proud

नन्दिनी, नक्की! Proud काल रात्री बाबांना विचारून खात्री केली - त्या जोड घुमट परिसरातच आहेत - समोर गुरुंची कबर व त्यांच्या पायाशी शिष्य व त्यांचे कुटुम्बिय !!! फक्त तिथे स्त्रियांना प्रवेश देत नव्हते आम्ही गेलो होतो तेव्हा... आत्ताचे माहित नाही.

बापरे प्राची काय अनुभव आहे Sad
मलाही १ ओझरता अनुभव आठवतोय्....जर्मनीला नुकतेच आलेलो असताना, जर्मन अजुन तोडके मोडकेच बोलता येत होते..शुक्रवारी रात्री नवरा उशिरा येणार होता..कसलिशी पार्टि...जळ्ळी मेली पार्टी!!
आम्ही सर्व्हिस अपार्ट्मेंट मधे होतो, खाली फ्लॅट नंबर आणि त्यापुढे बेल होती, सहसा कुणि वाजवायचे नाहि कारण आमचे तिथे कोणि नातलग नव्ह्ते, नवर्याकडे आणि माझ्याकडे चावी होती.
तर त्या शुक्रवारी रात्री २ ला फोन....जर्मन भाषेत अर्धवट कळत होते, मी परोपरी सांगत होते की तुम्ही जा मी दार उघडणार नाहि, व्यक्ती आपली सुरूच्...काहिसे शब्द कळत होते...शुक्रवार ...एकटि काय करतेस...वगैरे..
फोन ठेवला तर व्यक्ती पुन्हा बरळायची (बहुधा नशेत होता) हँगिंग ठेवला तर टोन वाजायचा जो फोन निट न ठेवल्याने वाजतो Sad
गोंधळाने बाळ पण उठ्ला आणि घाबरुन रडायला लागला. शेवटि वायर कनेक्शन काढून टाकले, एव्हाना का सुचले नव्ह्ते कोण जाणे...

आता हे आहेत आमच्या पूर्वीच्या घरमालकीण बाईंचे सुपर-काटकसरीचे किस्से! अतिशयोक्ती अजिबात नाही. तसेच त्यांची हेटाळणी/ बदनामी करण्याचाही उद्देश नाही. पण एकेक नमुनेदार माणसे असतात, त्या तशाच होत्या [आता हयात नाहीत] आणि तरीही अतिशय कर्तृत्ववान बाई! पण हे किस्से वाचून तुमची नक्की करमणूक होईल!!! Happy

तो काळ होता जक्कल-सुतार टोळीने पुण्यात जे हत्याकांड चालवले होते तेव्हाचा. आमचा वाडा ऐन टिळक रोडवर. त्याला ना फाटक ना कसली सुरक्षा. त्यातल्या त्यात खबरदारी म्हणून तीन मजली इमारतीच्या प्रत्येक जिन्याच्या सुरुवातीला व शेवटी असे जाळीचे दरवाजे बसवून घेतले होते. रोज रात्री दहा वाजता घरमालक त्यांना कुलुपे ठोकत असत आणि ती कुलुपे थेट दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसहा-सात वाजता खोलली जात.
आम्ही तिसर्‍या मजल्यावर राहायचो. आमच्याकडे दूध घालणारा भैया सकाळी साडेपाचला यायचा. मालकीण बाईंनी सांगितले (त्या दुसर्‍या मजल्यावर राहायच्या) की आम्ही तुमच्या वाटचे दूध घेत जाऊ, तुम्ही फक्त रात्री झोपण्यापूर्वी दुधाचे पातेले खाली आणून देत जा! आई किंवा बाबा रोज रात्री दुधाचे पातेले नियमितपणे खाली घरमालकांकडे ठेवून येत. असे काही महिने गेले. एक दिवस घरमालक व मालकिण बाईंचे कडाक्याचे भांडण चालले होते. आई-बाबा नेहमीप्रमाणे मध्यस्थी करायला गेले. दोघे मालक व मालकिणबाई एकमेकांवर मुक्तकंठाने दोषारोप करत होते. मधेच घरमालक बाबांकडे वळून म्हणाले, ''तुम्हाला माहित नाही, पण रोज तुमच्याकडे जे दूध येते त्यातले एक कप दूध ही काढून घेते आणि त्यात कपभर पाणी मिसळते!!!'' आई-बाबा गार! वर घर-मालकीण बाई खांदे उडवून म्हणाल्या, ''त्यात काय एवढं!! त्यांचेच तर कष्ट वाचवते ना मी रोज सकाळी त्यांच्या वाटचे उठून, मग घेतलं कपभर दूध तर बिघडलं कुठं म्हणते मी!!'' ......... आता बोला!!!

त्यांचे कंजूषपणाचे किस्से तर इतके प्रसिध्द होते की भिशीमंडळातील त्यांच्या मैत्रिणीही त्यांना खुलेपणाने चिडवायच्या. त्यातलीच एक मैत्रिण माझ्या आईला एकदा रस्त्यावर भेटली. आमच्या घरमालकीणबाईंवर बरीच उखडलेली दिसली. आईने कारण विचारल्यावर मजेशीर कहाणी पुढे आली. : घरमालकीणबाईंच्या नातवांची मुंज होती. [आम्हीही गेलेलो] मुंजीत जेवणावळी घालून झाल्यावर उरलेले पदार्थ मालकीणबाईंनी घरी आणले व फ्रीजमध्ये ठोसले. अर्थात हे आम्हालाही माहित होते, कारण त्या कधी नव्हे तो माझ्या आईला विचारायच्या, देऊ का गं श्रीखंड? आम्हीही ''नाही, नाही,'' करायचो. असेच वीस-पंचवीस दिवस गेले. मालकिणबाईंकडे मैत्रिणींची भिशी होती. मिनी जेवणच होते म्हणा ना! त्या वेळी एका मैत्रिणीने त्यांना थट्टेने विचारले, ''काय गं, तुझ्या नातवांच्या मुंजीतलं तर नाहीए ना जेवण?'' त्यावर मालकीणबाई मंद हसून म्हणाल्या, ''अगं ती सांडग्यांची आमटी आहे ना, ती मुंजीत उरलेली मटकीची उसळ होती ती उन्हात वाळवून त्यांचे सांडगे घातले आणि त्यापासून बनवली. आठवडाभर उसळ खात होतो पण संपेचना गं! मग म्हटलं सांडगे तरी घालावेत!! मस्त लागतीए ना आमटी?!!" तमाम उपस्थित मैत्रिणींचे चेहरे फोटो काढण्यालायक झाले होते!!

आमच्या वाड्यात प्यायच्या पाण्याचे कनेक्शन तळमजल्यावर होते. बाकी वापराच्या पाण्यासाठी छतावर पाण्याची टाकी होती त्यातून सर्व बिर्‍हाडकरूंना [आम्ही सोडून अन्य दोन व मालकीणबाई] पाणीपुरवठा होई.
एकदा आईला वापराच्या पाण्याला कसलातरी घाणेरडा वास येत असल्याचे जाणवले, तिने तसे मालकीणबाईंनाही सांगितले. पण त्यांनी साफ इन्कार केला. [आई शेवटी वापराचे पाणीही तळमजल्यावरून भरू लागली]. दोन दिवस तसेच चालले होते. शेवटी इतर बिर्‍हाडकरू व खुद्द घरमालकही कुरकुरू लागले. मग मालकीणबाईंनी आपल्या लेकाला छतावर शिडी लावून धाडले व काय प्रकार आहे ते पहावयास सांगितले. लेकाने रिपोर्ट दिला, टाकीत साळुंकी मरून पडली आहे! ऐकूनच आम्हाला ओकार्‍या यायचे शिल्लक राहिले होते. गेले तीन दिवस तेच पाणी सर्वजण वापरत होते. मग टाकी स्वच्छ करण्यासाठी सर्वांना नळ खुले सोडण्याचे फर्मान निघाले. साळुंकीची विल्हेवाट लावण्यात आली. दुपारी सगळा निरानिपटा करून मालकीणबाई हाश्श हुश्श करत आमच्याकडे आल्या. आईला चहाचे आधण ठेवायला सांगितले Wink मग चहा पिता पिता म्हणाल्या, ''एवढं सगळं पाणी, वाया कसं घालवायचं.....!!! मी ह्यांना आणि लेकाला सांगितलं, आंघोळी करून घ्या म्हणून.... धुणं पण त्याच पाण्यात धुवून घेतलं.... मग मीसुध्दा डोक्यावरून न्हायले! म्हटलं उगाच पाणी वाया नको जायला!!! '' आईला चहा गेला नाही हे वेगळे सांगायला नको!

मालकीणबाईंचा एकुलता एक भाऊ परदेशात, म्हातारपणाने, अविवाहित - बाकी कोणी नाही, असा निवर्तला. सर्व कायदेशीर सोपस्कार होऊन त्याच्या अंतिम इच्छेनुसार त्याचा मृतदेह कॉफिनमधून भारतात आणण्यात आला. तोवर त्याच्या मृत्यूलाही बरेच दिवस होऊन गेलेले. येथे मालकीणबाईंच्या लेकाने मामाचे सर्व और्ध्वदेहिक केले. त्यानंतर आठवडाभराने अशाच आमच्या मालकीणबाई दुपारच्या चहासाठी वर आमच्याकडे आलेल्या. ''बरं झालं बाई, ह्या वर्षापासून साठवणीच्या गव्हाला कशात ठेवायचं प्रश्न मिटला!'' आईने प्रश्नार्थक मुद्रेने पाहिल्यावर त्या पुढे म्हणाल्या, ''अगं ते कॉफिन आहे ना, फार चांगलं आहे गं लाकूड त्याचं.... मी म्हटलं कशाला फेका उगाच.... घेतलं साफ करून आणि आता त्यातच ठेवणार आहे साठवणीचे गहू!!''
त्यानंतर त्यांच्या किचनच्या पोटमाळ्यात लपताना [आमची लाडकी लपण्याची जागा] ते कॉफिन त्या पोटमाळ्यात आरामात पोटात गहू घेऊन विश्रांती घेत बसलेलं दिसे!! Happy

बास.... आज इतकंच.... अजून खूप किस्से आहेत त्यांचे! पण एका दमात नकोत!!

अरुंधती लयी भारी किस्से.
Lol

मनाने निर्मळ असाव्यात त्या. असली उठाठेव करुन परत सगळ्याना सांगत होत्या. Happy

तशाच होत्या त्या....स्वभाव एकदम contradictory.... बाहेर अतिशय व्यवहारी, धूर्त, चाणाक्ष म्हणून प्रसिध्द होत्या.... पण त्यांच्या अक्कलहुशारीची दाद देणारे घरात कोणी नव्हते.... मग आम्ही हक्काचे श्रोते! Happy

आमच्या घरमालकीणबाईंच्या बाबतीत घडलेला अजून एक भारी व विनोदी किस्सा :

त्यांच्या थोरल्या लेकाचे लग्न झाले. सून थोरा-मोठ्या घरची. तिचं माहेर अतिशय गर्भश्रीमंत, मुंबईच्या उच्चभ्रू वर्गातले. माहेरी खानदानी पण आधुनिक वातावरण. सून सासरी नांदायला आली. इथे मालकीणबाईंच्या एका मैत्रिणीला आमच्या मालकीणबाई व त्यांच्या सुनेची फिरकी घ्यायची हुक्की आली. तिने नव्या सूनबाईला बाजूला घेऊन सांगितले, ''तुझे सासरेबुवा म्हणजे लाखात एक माणूस! अगदी पापभिरू हो! सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही त्यांना! अगदी नेमस्त आयुष्य. पण....तुझ्या सासूपासून जरा सावध रहा, बरं का!'' आता नव्या सूनबाईला हे जरा अनपेक्षित होते. त्यामुळे तिने जरा भेदरून विचारले, ''म्हणजे?''
''अग्गो, तुझ्या सासर्‍याला नाही कसलं व्यसन, पण तुझी सासू? रोज संध्याकाळी ''घोट'' लावून बसते की गो! आता माझी मैत्रिण म्हणल्यावर मी तिच्याविषयी खोटं कशाला सांगू? पण तू ह्या घरची नवी सून म्हणून सांगते, संध्याकाळ झाली की सासूपासून जरा चार हात लांबच रहा. एकदा प्यायला लागली की काही भरवसा नसतो तिचा! शिव्या काय देते, अंगावर धावून काय येते..... लाल -लाल डोळे होतात तिचे.... डोळे गरागरा काय फिरवते...झोक काय जातात....तू आपली काळजी घे हो!''

नवी सून टेन्शनमध्ये! ही बातमी कन्फर्म तरी कोणाकडे व कशी करणार? नवर्‍यासकट सर्वच अपरिचित!
शिवाय सूनबाई लहानपणापासून मुंबईच्या अत्याधुनिक वर्तुळात वावरल्यामुळे क्लबिंग करणार्‍या, व्यसनी बायका तिच्या परिचयाच्या होत्या. आता आपली सासूच अशी म्हटल्यावर तिच्या तोंडचे पाणीच पळाले!

वस्तुस्थिती अशी होती की मालकीणबाईंना खरोखरी सुपारीच्या खांडाचेही व्यसन नव्हते. पण त्यांच्या पतिदेवांना मात्र रोज सायंकाळी घोट लावून बसण्याची सवय होती. व्हिस्कीचे दोन-तीन पेग झाले की मग त्यांचे विमान चांगलेच हवेत तरंगू लागे. एरवी गप्प बसणार्‍या त्यांच्या जिव्हेवर मग वीज खेळू लागे. परिणिती धुसफूस, भांडणे, शिव्याशाप इत्यादी इत्यादी मध्ये होई.

आता नव्या सुनेसमोर तमाशे नकोत म्हणून मालकीणबाईंनी नवर्‍याला सज्जड दम भरला होता. पण इकडे सूनबाई तर सासूच्या समोर टिकतच नव्हती. आली तरी चार पावले दूर. संध्याकाळी तर जणू लपाछपीचा खेळ चालू असे. सासू ज्या खोलीत येई त्या खोलीतून सूनबाई छू!!!!! त्यांनी काही कामासाठी बोलावले की ती आपल्या ऐवजी नवर्‍याला पिटाळत असे. सासर्‍यांशी नीट बोलत असे पण सासूबाई आल्या की एकदम गप्प!
सुरुवातीला मालकीणबाईंना काही जाणवले नाही. पण मग मात्र त्यांना ''दाल में कुछ काला है'' चा वास येऊ लागला. त्यांनी आपल्या मुलाला विचारले. त्याला तर काहीच माहिती नव्हती. पण त्यालाही काहीतरी वेगळे जाणवले. त्याने आपल्या बायकोला खोदून खोदून विचारले तशी तिने 'सांगू की नको' आविर्भावात त्याला जे जे घडले ते सांगितले अन सत्य सामोरे आले. त्याने त्याच्या आईला सर्व प्रकार सांगितल्यावर त्यांना आपल्या मैत्रिणीने आपली व नव्या सुनेची कशी फिरकी घेतली ते लक्षात आले. सुनेला सत्य परिस्थिती समजल्यावर तिने सुटकेचा नि:श्वास टाकला आणि सासूबाई आता मैत्रिणीच्या फिरकीचे उट्टे कसे काढायचे ह्या योजनेत गर्क झाल्या! Happy

मी पानिपतला असताना तिथला एक डॉक्टर कलिग मला रोज चिडवत होता..'आप दो बच्चोवाली मां से शादी करना...; ( माझी तिशी ओलांडली होती, तरी लग्न झाले नव्हते, तिकडे लोक लग्न फार लवकर करतात.. म्हणून हा चिडवण्याचा विषय झाला होता.)

बरेच दिवस हा प्रकार सुरु होता.

एकदा सगळ्या स्टाफसमोर त्याने पुन्हा ते वाक्य म्हटले... सगळे हसले , मीही हसलो आणि त्याला एकच प्रश्न विचारला,'तुम्हे कितने बच्चे है?'

तोही बिनडोक, बथ्थड.. Proud . सरळ सांगून मोकळा झाला.. मुझे एक बच्चा है..

'तो जब तुम्हे दूसरा बच्चा हो जायेगा तो मुझे फोन करना, तेरी सारी तमन्ना पूरी कर दूंगा..' मी म्हणालो आणि मग ती चेष्टा कायमची बंद पडली... Happy

Pages