एक धागा किश्श्यांचा

Submitted by अरूण on 17 April, 2009 - 00:48

आपल्या पैकी बरेच जण गप्पा मारताना असंख्य किस्से सांगतात. पण ते बहुदा वाहून जाणार्‍या पानावर असल्यामुळे सगळ्यांनाच याचा आनंद घेता येत नाही. म्हणून हा धागा सुरु करत आहे.

तरी आपण सर्वांनी आपापले किस्से इथे लिहावेत, म्हणजे सगळ्यांना ते वाचता येतील.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षापूर्वीची गोष्ट ....
आई बाबा दोघेही कामावर गेले होते. दुपारी चारला मी आपल्या टुकार्या करून घरी परार आलो.
टेबलावर एक साखरपुड्याची निमंत्रण पत्रिका होती.
मुलीचे नाव वृषाली ! म्हटले छान नाव आहे. कोणाची मुलगी आहे पाहावे.
खाली चक्क मुलीचे वडील म्हणून माझ्या बाबांचे नाव !! मला बहिण असल्याचे माझ्यातरी ऐकिवात न्हवते.
डोक्यात शंका म्हटले बापाचा दुसरा घरोबा तर नाही !?
पुढे मुलीच्या आईचे नाव वाचले .... तिथेपण माझ्याच आईचे नाव.
आता मात्र माझे डोके सरकले .. म्हटले ... मला एक सख्खी बहिण आहे.
तिचा साखरपुडा होण्याइतकी ती मोठी पण झाली आणि मला माहित पण नाही.
मला कुठे दिसली कशी नाही ? कुठे राहते मग ती ?
मी विचार केला कि आई बाबा आले कि जाब विचारावा.
संध्याकाळी मी आईला विचारले.
आईने मग कॅजुअली सांगिलते कि काही नाही रे .provident fund मधुन पैसे काढण्या साठी सरकारला कारण सांगितले होते कि मुलीचा साखरपुडा आहे ... आणि प्रूफ म्हणून एकच पत्रिका बनवून घेतली होती

कॉलेजमधे असताना आम्ही बसचा मंथली पास काढायचो. नवीन वर्ष सुरु झाले की पालकांची सही असलेला अर्ज द्यावा लागायचा. एके वर्षी मला चांगला २-३ आठवडे उशीर झाला पास काढायला. एक दिवशी मुहुर्त लागला आणि मी रांगेत उभी राहिले. रांग अर्धी संपल्यावर लक्षात आले की बाबांची सही घेतलीच नाहीये. परत जायचे पण जीवावर आले. बाबा लेफ्टी आहेत त्यामुळे त्यांच्या सहीची नक्कल करणे अवघड आहे. मी तरी कशीबशी सही ठोकली. अर्ज दिल्यावर खिडकीतला माणूस म्हणाला की ही सही खोटी आहे, पास मिळणार नाही. मी सांगितलं की ती माझ्या बाबांनीच केलेली सही आहे. तसा तो मला सांगतो, 'अहो ताई तुमच्या वडिलांच्या सहीनेच ही नोकरी मला मिळालीये. मी जन्मात विसरणार नाही त्यांची सही. पास मिळणार नाही, घरी जा' Uhoh

सुनील जोगांनी लिहील्याप्रमाणे व पुणेकर, मुंबईकर की नागपुरकर या कथेत पुलंनी म्हणल्याप्रमाणे पुणेकर दुकानदारांना ग्राहकाची त्याच्या मनाची त्याच्या पैशाची अजिबात किंमत नसते.

एक माझ्या बाबतीत घडलेला किस्सा असा. माझ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी माझ्या पत्नीने मला गिफ्ट म्हणुन एका नवीन प्रकारच्या मटेरीअलचा स्वेटरसारखा जर्किन विकत घेतला. दुकानदारीण बाई आम्हाला ओळखणार्‍या होत्या. मला नाही पसंत पडला तर बदलुन घेण्याची बोली आधीच केली होती. बोली अशी होती की उद्याच तो हवा असेल तर बदलुन मिळेल. लोक थोडा वापरुन मग बदलायला येतात अशी सबब कारण नसताना माझ्या पत्नीला ऐकवली ते वेगळेच.

मला त्या जर्किनचा रंग खुपच आवडला पण त्याला कॉलर ऐवजी टोपी होती ती मला आवडली नव्हती. दुसर्‍याच दिवशी म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी आणि माझी पत्नी तो बदलायला गेलो. आम्हाला पहाताच दुकानल्या नोकराने कपाळाला आठ्या घालत नापसंती दर्शविली त्यावर मालकिणबाई म्हणाल्या अरे नाईलाज असतो सकाळी सकाळी बदलीच गिर्‍हाईक याव की नाही हे काय आपल्या हातात नसत ?

माझ डोक सटकल होत पण काम झाल नव्हत म्हणुन मी काबु ठेवला. मी सांगितल मला हा जर्किन नको त्या ऐवजी याच रंगाचा याच साईझचा कॉलरवाला हवा आहे. एका मिनीटात मला हवा तसा जर्किन मिळाला. मी तो घालुन पाहिल्यावर माझ्या मापाचा आहे हे समजले. आता किंमत विचारणा झाली. आधीचा १७५ रुपयांचा होता. कॉलरवाला २५० रुपयांचा होता. ( २००३ सालातले भाव ) मी ७५ रुपये दिले. आता मी बोलायचे ठरवले.

मी म्हणालो आम्ही आल्या आल्या तुम्ही काय म्हणालात ? त्यावर मालकिणबाईंनी मला लॉजीक सांगायला सुरवात केली. सकाळी पहीला ग्राहक जर बदलीचा मिळाल तर दिवसभर अशीच गोष्ट घडत रहाते.

मी म्हणालो बदली तुम्ही देता हे तुम्हाला मान्य आहे ना ? त्यावर त्यांनी मान होकारार्थी हलवली. मी बदली वस्तु कमी किंमतीची मागीतली नाही किंवा पैसे ही परत मागीतले नाही उलट तुमच्या गल्यात ७५ रुपये आले हे बरोबर ना ?
याला तुम्ही भवानी का नाही मानत ? त्यावर मालकिणबाईंनी गळा काढला " अहो आजकाल फार अडचणीत आहोत आम्ही. डिसेंबर उजाडला तरी थंडी पडलीच नाही. सगळा माल पडुन आहे त्यात बदलीच ग्राहक आल की दिवस खराब जातो."

मी म्हणालो पण आज बदलीच्या ग्राहकासाठी गल्ल्यातुन पैसे न जाता उलटे आले. मी १०० रुपये देऊन २५ परत मागीतले नाहीत उलट सुट्टे ७५ रुपये दिले अस असताना माझ्या वाढदिवसाला तुम्ही मला नको ते ऐकवले. तुमच्या दुकानात बदलीची वेळ लिहीलेली नाही किंवा काल बदलीचा वादा करताना दुपारच्या वेळी या असे ही तुम्ही सांगीतले नाही आणी सकाळी आम्हाला कारण नसताना हे ऐकवले. याचा परीणाम म्हणुन मी तुमच्या दुकानची पायरी या पुढे चढणार नाही.

यावर मालकिणबाई आपले चुकले म्हणतील. अस करु नका, माझ्या ही गोष्ट लक्षात आली नाही म्हणतील असे वाटले. मला त्यांनी माफी मागावी असे वाटत नव्हते. कोरडेपणाने त्या ठिक आहे म्हणाल्या.

मी माझे म्हणणे खरे करण्याचा दुराग्रह धरला नाही. मराठी माणसांनी व्यवसायात पडण्याचे धाडस दाखवले म्हणुन हा राग मी गिळला.

ईईईईईईईईईई पा~ल लेखावरून आठवलेला हा गमतीशीर किस्सा :

माझ्या वडीलांचा मजेदार अनुभव सांगते. त्यांच्या हापिसात एकदा एक नवा शेतकरी ग्राहक आला होता. वडील त्यावेळी हापिसातल्या पालींमुळे बरेच त्रस्त झाले होते. १५ बाय १२ च्या जागेत तब्बल चार लठ्ठ पाली हिंडत होत्या. त्यांचा चकचकाट, ओंगळ दर्शन, विष्ठा यामुळे वडीलांची चिडचिड झाली होती. त्या शेतकर्‍याला पालीबद्दल कळल्यावर त्याने वडीलांना गळच घातली, ''साहेब, मला पालीचा लई पावरबाज मंत्र ठावं हाय.... मी मस मंत्र घालतुया, तुम्ही कायबी काळजी करू नगं सा.... पाल आता ह्याफुडं हितं फिरकायची न्हाय....'' वडीलांना खरे तर त्याच्या बोलण्यात काही तथ्य वाटत नव्हते... तो शेतकरी तर फारच गळ घालत होता. शेवटी 'गिर्‍हाईकं वाक्यं प्रमाणम् |' ह्या धर्तीवर त्यांनी त्या शेतकर्‍याला सांगितले...''ए बाबा, तुला जे काय करायचं ते कर रे!''

शेतकर्‍याने दोन मिनिटं डोळे मिटून पुटपुट केली, हातवारे - इशारे केले आणि म्हणाला, ''आता पाल हितं फिरकणार न्हाय!''

त्या घटनेला आज दोन वर्षे होत आली. खरोखरी तेथील सर्व पाली गायब झाल्या आहेत!! Uhoh

मध्यंतरी आमच्या एका परिचितांना माझे वडील आपल्या हापिसाच्या बाहेर उभे राहून हातात झाडू परजलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी ''काय हो कुलकर्णी, हे काय नवीन? हातात झाडू घेऊन असे बाहेर काय करताय?'' विचारल्यावर वडीलांनी मूकपणे हापिसाच्या खिडकीबाहेर असलेल्या एका पालीकडे झाडूने निर्देश केला. परिचितांनी विचारले, ''पालीला खिडकीपासून दूर हाकलायचे सोडून भलतीकडेच काय हाकलताय?''
कारण माझे वडील त्या पालीला हापिसाच्या दिशेने हुसकत होते! त्यांना आता ती पाल हापिसातल्या झुरळांचा चट्टामट्टा करण्यासाठी हापिसात यायला हवी होती!! पण ह्याही खेपेस आधीसारखाच इतर पालींप्रमाणे ह्याही पालीने दगा दिला व ती विरुध्द दिशेने पसार झाली. तेव्हापासून वडील त्या अनोख्या शेतकरी गिर्‍हाईकाच्या मागावर आहेत. तो भेटला की त्याला सांगणार आहेत, ''अरे बाबा, घेऊन जा तुझा मंत्र परत! आणि मला परत मिळवून दे माझ्या लाडक्या पाली!!'' Proud

आमच्या श्रीरामपूरच्या घरी नेहेमी मांजरी असतात त्यामुळे बाहेरुन येणार्‍या पाली आणि झुरळं दोन्हीचा बंदोबस्त झाला आहे. पण पाली कोळी खातात. त्यामुळे आता घरात सारखी जाळी लागतात Proud

अकु, तुमच्या वडिलांना मांजर पाळायला सांगा आणि त्या शेतकर्‍याला म्हणावं एक गाय नाहीतर म्हैस पाळ Wink

माजी केंद्रीय मंत्री आणि राजदचे खासदार रघुवंश प्रसाद यांच्या वेंधळेपणाबद्दल कुणी वाचले की नाही. रूमचे दार उघडता न आल्याने त्यांनी राष्ट्रपतींना २० मिनिटे विमानात खोळंबून ठेवले.

'अहो ताई तुमच्या वडिलांच्या सहीनेच ही नोकरी मला मिळालीये. मी जन्मात विसरणार नाही त्यांची सही. पास मिळणार नाही, घरी जा'
मग तर पास द्यायला पहिजे होता .....नोकरी मिळाली म्हणुन तरी !

माझी आजी कोकणातली. तिच्या वयाची दहा-बारा वर्षे तिने कोकणात घालवलेली. घरची थोडीफार शेतीवाडी. त्यामुळे शेतात, गोठ्यात काम ओघाने आलेच! त्या काळात, म्हणजे १९१६ ते १९२२ सालातील कोकण, तिने खूप साप, नाग हाताळले. विंचूही हाताळले. अगदी सराईतासारखी ती साप पकडण्याची खास दोन टोकाची, बेचका असलेली काठी असते ती काठी घेऊन साप पकडायची. कधीकधी तर नुसत्या हातानेही.... शक्यतो त्यांना मारायचे नाही. मात्र फुरसे असेल तर अजिबात सोडायचे नाही, ठेचायचे त्याला, ही तेथील पध्दत. बरं, सापाला ''साप'', ''नाग'' असे उघड उघड म्हणायचे नाही... त्याला जनावर, किरडू, वळवळं असं काहीतरी सांकेतिक नावाने संबोधायचं म्हणे!

आजीच्या ह्या सर्पकथा मी खूप वर्षे ऐकत आले होते. पण पाहाण्याचा योग कधी आला नव्हता.

एक दिवस मात्र तिच्या ह्या कसबाचे दर्शन घडले.

आमच्या घरासमोर एका शाळेची कंपाऊंड भिंत होती. पलिकडच्या बाजूला शाळेचा सायकल स्टॅन्ड, बरेच माजलेले काँग्रेस गवत आणि तुरळक झाडी होती.
एक दिवस सक्काळी सक्काळी घरासमोरच्या कंपाऊंड भिंतीजवळ लोकांची गर्दी दिसली. आजी तेव्हा गॅसवर चहाचे आधण ठेवत होती. तिने मला कसला गलका आहे ते खिडकीतून पाहून यायला सांगितले. मला तर खिडकीतून समोर काय चालले आहे काहीच कळत नव्हते. पण बरीच माणसे हातात काठ्या, दगड घेऊन उभी होती. त्यांच्यात चर्चा चालू होती. मी आजीला हे सांगितल्यावर आजीने चहाचा गॅस बंद केला व तीही उत्सुकतेने खिडकीपाशी आली. तोपर्यंत लोकांचा तो घोळका जरा एका बाजूला सरकला होता व समोर काय चाललंय हे स्पष्ट दिसू लागलं होतं.
कंपाऊंड भिंतीच्या एका कपारीत रात्रभर एक सर्प महाशय पहुडले होते. कात टाकत होते. आता त्यांची कात टाकणे पूर्ण झाल्यावर त्यांनी हालचालीला सुरुवात केली होती. त्यांना पाहिल्यावर आजूबाजूच्या वस्ती-दुकानांमधील माणसे सापाला मारण्याच्या उद्देशाने तिथे जमा झाली होती.

सर्प महाशय एका कपारीच्या तोंडाशी उगवलेल्या झुडुपाच्या आड लपले होते त्यांना एकाने काठीने हुसकले व खाली पाडले. लोक आता ह्या सापाला मारणार याची खात्री झाल्यावर माझी आजी ''थांब, आलेच मी जरा...'' करत ओचे पदर खोचून बघता बघता घरातून गायब झाली आणि त्या समोरच्या जमावात हजर झाली!
एका माणसाकडून तिने काठी घेतली, लोकांना बाजूला व्हायला सांगितले.... कोणाला तरी पोते आणायला पिटाळले. अक्षरशः काही मिनिटात तो माणूस धापा टाकत पोते घेऊन हजर झाला.... मग आजीने एव्हाना डिवचले गेल्याने चिडलेल्या व आक्रमक झालेल्या सापाला झुरळ जसे सहज उचलावे तसे काठीने उचलले व त्याची शेपटीची बाजू हातात धरून पोत्यासाठी इशारा केला. त्या माणसाने पोत्याचे तोंड उघडे ठेवलेच होते. मोठ्या चपळाईने आजीने त्या सापाला पोत्यात बंदिस्त केले, पोत्याचे तोंड आवळले आणि गर्दीतल्या एकाला त्या सापाला दूर नदीकाठी झाडीत सोडून यायला सांगितले.

हे सर्व झाल्यावर लोक तिथेच चर्चा, गप्पा, आश्चर्य वगैरे करत उभे होते. आजी मात्र जणू काहीच घडले नाही अशा थाटात तडक घरी आली. हात-पाय धुतले, गॅस पेटवून चहा उकळला, गाळला आणि हातात गरमागरम चहाच्या कपबश्या घेऊन आजी व नात पुन्हा खिडकीपाशी आता लोक काय करत आहेत बघायला आलो! Proud

आजीला सापाची भीती वाटत नाही हे त्या दिवशी मला ठळकपणे जाणवले. त्याखेरीज ती उंदीर, पाली, झुरळे हातात पकडत असे आणि त्यांना घराबाहेर सोडून देत असे. तिला विचारले की तुला भीती वाटत नाही का, की ती फक्त खुदूखुदू हसत असे!

डिस्क्लेमर : मला आलेला एक अनुभव मी एक किस्सा म्हणूनच लिहितेय, यात कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा हेतू नाही. Happy

शंतनु अखनुरला होता तेव्हाची गोष्ट. त्याचे हेडक्वार्टर नारियाला होते. (हे नारिया म्हणजे सांबा सेक्टर आणि राजौरीच्या मध्ये येते.) आम्ही अधून्मधून तिकडे राहायला जायचो.
राजौरीजवळ एक पलमा नावाचे छोटेसे गाव आहे. तिथे डोंगरावर एक संतोषीमातेचे देऊळ आहे. त्या देवळात एक 'माता' आहे. माता म्हणजे एक सामान्य पंजाबी बाई आहे, ती त्या देवळाच्या गाभार्‍यात गेली की तिच्या अंगात माता येते असे मानले जाते. अंगात येते म्हणजे ती घुमायला लागते असे नाही :), तर ती शांतच असते, एकदम नॉर्मल असते, नेहमीसारखीच बोलते वगैरे. पण त्या काळात ती काही वेगळीच असते. ती तुमच्या प्रश्नांना उत्तरं देते,तुमच्या समस्यांवर तोडगे सांगते, पण गाभार्‍यातून बाहेर आली की तिला काही आठवत नाही. तुम्ही तिला भेटून काय सांगितलेत ते तिला आठवत नाही. असं काहीसं आहे.
तर ही 'माता' आसपासच्या फौजींमध्ये फार मानली जाते. (सतत मृत्युच्या छायेत वावरत असल्याने असेल, पण फौजींमध्ये अशी देवळं, पीरबाबा यांना फार मानलं जातं.) त्या देवळाच्या देखरेखीवर लक्ष ठेवायला काही जवान नियुक्त केलेले आहेत. पार जनरल साहेबापासून ते जवानापर्यंत सगळे हजेरी लावून असतात.
असो. तर आम्हीही जेव्हा जेव्हा नारियाला जायचो, तेव्हा पलमामातालाही चक्कर मारायचो. अगदी काही प्रश्न घेऊन नाही, तरी एका श्रद्धेने देवळात जायचो. आमचे पोस्टिंग आले तेव्हा डायनिंग आऊटसाठी आम्ही नारियाला गेलो. दुसरे दिवशी परत निघणार होतो. जाताजाता एकदा पलमाला जाऊन यावे म्हणून निघालो. आमचा सहाय्यक बरोबर होता. तो पहिल्यांदाच तिकडे येत होता. आम्ही पलमाला दुकानातून नारळ, पिवळी मोहरी आणि इतर पुजा साहित्य घेतले आणि देवळात गेलो. गाभार्‍यात एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकते. मी जाऊन आले, माझ्यानंतर शंतनु गेला आत. त्याच्या मागे दोन्तीन माणसं सोडून सहाय्यक उभा होता. शंतनु आत गेला आणि माता त्याला म्हणाल्या,"२-३ लोग छोडकर जो बंदा खडा है, वो आपके साथ है ना? उसका नारियल सुखा है. उसको बोलो, दुकानमें वापस करेगा. यहा सुखा नारियल नही चढाते."
शंतनुनी बाहेर आल्यावर सहाय्यकला सांगितलं सगळं. सहाय्यककडे असलेला नारळ घेऊन फोडून पाहिला तर खरंच तो पूर्णपणे सुकलेला होता.
आम्ही सगळेच चकित झालो. 'माता'ना कसं कळलं नारळ सुका आहे ते? Uhoh

माझ्या एका मैत्रिणीच्या ६ महिन्याच्या मुलीला मालिश करायला येणार्‍या बाईला त्या मत्रिणीची सासू (म्हणजे बाळाची आजी) सांगत होती की "आमची बाळी हल्ली थंडी पडायला लागल्यापासून खूप शू शू करते. सारखे लंगोट बदलावे लागतात."
तर यावर ती मालिशवाली बाई म्हणाली की "यावर उपाय म्हणून जायफळ बांधायचं".

मैत्रिणीच्या साबांना ही माहिती नवीच होती. त्यामुळे त्यांनी आश्चर्याने त्यांनी विचारलं की "जायफळ बांधल्यामुळे खरंच कमी होईल का सारखे शू ला होण्याचा त्रास???" Uhoh

तर यावर त्या महान बाई उत्तरल्या " तर मग काय! ती तुमच्या खालच्या मजल्यावरची वैशाली पण बांधते तिच्या बाळाला जायफळ".

आता बाळाला जायफळ बांधायचे म्हणजे नक्की कुठे असा प्रश्न पडून मैत्रीणीच्या साबा त्या मालिशवाल्या बाईकडून या शंकेचे निरसन करून घेणार तितक्यात त्या बाईच्याच तोंडच्या पुढील टकळीतून त्यांना अंदाज आला की तिला जायफळ नव्हे तर "डायपर" म्हणायचे होते Rofl

त्या बाईच्या तोंडात दात नसल्याने जरा बोबडी बोलते. Biggrin

नशीब की साबांना वेळीच लक्षात आले. नाहीतर खरंच बाळाच्या कंबरेला जायफळ वगैरे बांधले असते. Happy
मैत्रीणीने नंतर हा किस्सा तिच्या नवर्‍याला सांगितला तर तिव्हा नवरा उद्गारला की कधी कधी आपण कितीतरी अचाट आणि अतर्क्य प्रथा/रुढी पाळत बसतो त्या सुरु होण्यालाही कदाचित असेच एखादे कारण किंवा घटना घडलेली असू शकते.

डायपर काय!!! जायफळ काय!!!! कशाचा कशाशी संबंध नाही Rofl

बर्‍याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे....तेव्हा चायनीज वगैरे एवढं इन नव्हतं. त्यात आमचं गाव! तिथे एक नवीन हॉटेल सुरू झालं. आमची गँग गेली त्या हॉटेलात.
आव तर खूपच आणला होता हॉटेलवाल्यांनी! माझा धाकटा दीरही होता बरोबर. त्याला जनरली लोक टरकतात. तो तसा नाहीये.....तरी जरा अंगापिंडाने मजबूत...मिश्या वगैरे.....त्यामुळे!
त्याने वेटरचं बौद्धिक घ्यायला सुरवात केली. वेटर बिचारा गडबडला. ऑर्डर घ्यायला लागला.
सूप , स्टार्टर्स सांगितले. नंतर खाणं सुरू झाल्यावर वेटर अवती भोवतीच होता. दीर त्याच्याशी जनरल काहीतरी बोलत होता. बोलता बोलता त्याला विचारलं, " काय रे...चॉपस्टिक्स आहेत का रे?"
तो वेटर पटकन म्हणाला, " सर ते काही एवढं टेस्टी नसतं ना........आम्ही नाही ठेवत. तुम्ही चॉपसुई ट्राय करा त्यापेक्षा सर!"
बिचार्‍याला चॉपस्टिक्स माहितीच नव्हत्या. पण त्याने वेळ मारून नेली!!!!! दीराच्या तावडीतून पटकन सुटका!

हा ४ दिवसांपूर्वी घडलेला किस्सा.
नैरोबीला कधीही म्हणजे कधीही पाऊस पडू शकतो. अगदी चांदण्यात म्हणून गच्चीवर बसून मस्त वाफाळती कॉफी प्यावी. आणि घरात येऊन आवराआवर करावी तेवढ्यात धो धो पाऊस सुरु होतो.
त्या दिवशी असेच झाले. रात्रीचे साडेअकरा झाले असतील. पावसाच्या आवाजाने झोप येत नव्हती, तेवढ्यात माझा फोन वाजला. फोनवर मित्र गयावया करत होता कि खाली येऊन पाण्यात अडकलेली गाडी बाहेर काढायला मदत कर म्हणून. माझ्या घराच्या जवळच त्याची गाडी पाण्यात अडकली होती.
जेमतेम अर्ध्या तासाच्या पावसात, तिथे गुडघाभर पाणी झाले होते. जिथे गाडी अडकली होती, तिथून पन्नास पावलावर फारसे पाणी नव्हते, पण गाडी मात्र नंबरप्लेट पर्यंत पाण्यात बुडली होती.
मी घरातल्या स्लीपर्स घालूनच खाली आलो होतो. आणखी दोन मित्रांना बोलावले. गाडी पुढे ढकलायची का मागे यावर विचार करत आम्ही चौघे, गाडिच्या चार कोपर्‍यावर उभे होतो. मी गाडीच्या पुढे आणि माझा एक उंचीने कमी असलेला मित्र गाडिच्या मागे उभा होता.
झाले काय पाण्याच्या ओढीमूळे माझ्या पायातले स्लीपर्स सटकले आणि मी तोल जाऊन गाडिच्या बॉनेटवर पडलो. पण त्या धक्क्याने गाडी मागे जायला लागली (तरंगत होती का कुणास ठाऊक ) आणि गाडीच्या धक्क्याने आमचा मित्र पाण्यात आडवा !!
आठ दहा सेकंद त्याला पाण्यातून वर काढण्यातच गेले !!
बिचारा धक्का लागूनच पडला होता, तरी झेपत नाही तर पितोस कशाला, म्हणत आम्ही त्याला झापला.

निंबुडा च्या "आवाsssssssssssssssssssssssssज कुणाsssssssचा?" वरुन एक गोष्ट आठवली... माझे जिजाजी एकदा लाल डबा मधुन प्रवास करत होते.. रात्र वैर्‍याची होती... बस कोकणातल्या घाटातुन चालली होती... अचानक आवाज कोणाचा च्या ऐवजी वास कोणाचा म्हणायची वेळ आली... आणि येतच राहीली.... सगळे लोक चुळबुळायला लागले... पण खरा गुन्हेगार कोण कसा ओळखणार? जिजाजीनी बिरबलाची युक्ती वापरली... आणि जोरात ओरडले... "&&*&&!@#@ च्या **@!&#@$#$ कोण पादतय रे? " तेव्ढ्यात एक खवळलेल्या आवाजात आणि चवताळलेल्या अर्विभावात एक मनुष्य मागच्या सीट वरुन ओरडला... "ओ शिव्या द्यायचं काम नाय !!!

आमच्या ऑफिसमधे एक लोन्ढे नावाचे साहेब होते. माणुस अगदी साधा. एकदा असे झाले, त्याच ऑफिसमधे काम करणार्‍या एका मुलीचे लग्न झाले आणि तिच्या सासरचे नाव पण होते लोंन्ढे. या मुलीने आपल्या ऑफिसचा फोन नंबर तिच्या कुणा नातेवाइकाला दिला असावा. एक दिवस ऑफिसमधे लोन्ढे साहेबांना फोन आला. बोलनारा माणुस पोक्त असावा.
माणुसः "हॅलो.. लोन्ढेसाहेब का?"
लोन्ढेसाहेब: "बोलतोय.."
"हा.. नमस्कार.. मि ***बोलतोय. काय कसं चाललंय?"
लोन्ढेसाहेब: "अं.. ठीक आहे."(साहेबांचा चेहेरा प्रश्नार्थक..कंपनीतल्या कुठलाश्या डिपार्ट्मेंटचे कुनी तरी असावे)
" काय बाकी थंडी काय म्हणते?"
लोन्ढेसाहेब: "ठीक आहे.. म्हणजे झालीय आता कमी"
"काही नाहि कालच आलो गावाकडनं म्हटल बघावं जावईबापू कसे हायेत? मग कधी येताय जेवायला आमच्याकडे"

(लोन्ढेसाहेब त्याच्या मित्रांबरोबर १ ला कॅन्टीन मधे असायचे. त्यांना वाटले कूणीतरी मस्करी करीत आहे.)

लोन्ढेसाहेब: "येतो..१ ला" (लोन्ढेसाहेब त्याच्या मित्रांबरोबर १ ला कॅन्टीन मधे असायचे)
"काय राव स्वभाव चांगला विनोदी हे तुमचा"
लोन्ढेसाहेब : ???
"मी काय म्हनतो या की या रवीवारी.. चिकनचा बेत ठेवतो"
लोन्ढेसाहेब :"... ओके.. ते जाउ देत.. बोला आता" (कामाचे बोला)
असं अजुन थोडा वेळ चाललं.. लोन्ढेसाहेबांच्या तोडक्या उत्तराना कंटाळून मग न राहवून त्या माणसाने विचारले "तुम्ही लोन्ढेसाहेबच बोलताय ना?"
लोन्ढेसाहेब : " हो .. मी ***कंपनीतुन लोन्ढेच बोलतोय, तुम्हाला कोण हवय?"
"***कंपनी..??? माझा राँग नंबर लागला वटतं".. .........फोन कट.

महिला दिनानिमित्त आमच्या गावात एके ठिकाणी छान कार्यक्रम झाला.
लालन सारंग आणि विजया वाड यांच्या मुलाखती. दोघींनी आपापला प्रवास छान शब्दात उलगडून दाखवला. लालन सारंग ...त्या विजया वाड यांच्या मानाने कमी बोलत होत्या. कारण विजया वाड या साहित्यिक असल्याने आणि हाडाच्या शिक्षिका असल्याने त्यांची एक्स्प्रेशन पॉवर जबरदस्त होती. आणि एक स्त्री म्हणून सर्व स्त्रियांना अगदी कळकळीने आपल्या हक्कांची जाणीव करून देत होत्या. त्यांच्या भाषेला एक छान नर्म विनोदी झालरही होती. आणि बुद्धिमत्तेची चमक!

लालनताईंना मुलाखतीतच सखाराम बाइंडरमधील "चंपा" करून दाखवायची विनंती झाली. ती त्यांनी उत्तम केली. त्यासंदर्भातले काही किस्से सांगितले.

सर्वात शेवटी श्रोत्यांना माईक दिला. श्रोत्यांमधे अर्थातच स्त्रियाच जास्त होत्या. २/३ जुजुबी प्रश्न विचारले गेले. कारण मुलाखतकार गौरी कुलकर्णी यांनी मुलाखातच उत्तम घेतली होती. विचारण्यासारखं फार काही राहिलंच नव्हतं!
एका बाईंनी हातात माईक आल्यावर काय प्रश्न विचारावा?
"मला विजयाबाईंना एक विनंती करायची आहे. लालनताईंनी कसा छान पफॉर्मन्स दिला..(इडियट बॉक्सवरच्या रिअ‍ॅलिटी शोजमुळे हल्ली "गाणं" "नाच" असं काही आता राहिलंच नाही...आणि आता त्याचा पफॉर्मन्स झाला आहे....त्यातलाही "प" नंतरचा "र" एकदम म्हणजे एकदमच सायलेंट झाला आहे. )..आता विजयाबाईंनीही आमच्यासाठी काही तरी पफॉमन्स द्यावा अशी मी विनंती करते."
इकडे विजया वाडच काय पण बरेचजण अवाक.
त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की ..."मी माझा प्रवास तुम्हाला उलगडून दाखवला. मला कुमार विश्वकोश करताना अगदी पिढी घडवल्याचं समाधान मिळालं".
तरी या बाई ऐकायलाच तयार नाहीत. डोक्यावरचा कडक आणि भडक साडीचा पदर हाताने सावरत म्हणाल्या..." नाही नाही ...असं चालणार नाही तुमचं एखादं कॅरॅक्टर वगैरे करून दाखवा ना." आम्ही.........ज्यांना विजया वाड हे काय रसायन आहे हे महिती आहे अश्या सर्व बायकाही.......अवाक झालो........वाटलं...अरे.....कुणी तरी माईक काढून घ्या रे तिच्या हातातला.
काही गोष्टी अनुभवायच्या असतात..काही गोष्टी समजून घ्यायच्याही असतात..कधी कधी पुस्तकंही वाचायची असतात....पण या बाईंना फक्त पफॉमन्स बघण्याचीच सवय असेल तर? आणि बेसिकली त्यांनी "विजया वाड" हे नावच आजच पहिल्यांदा ऐकले असणार याची मला खात्री आहे.

सुरेखा कुलकर्णी | 2 March, 2011 - 21:36
कधी कधी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात असे कांही लहान मोठे प्रसंग सहज होऊन जातात कि
त्याची आठवण आपल्याला कायम हसू आणते.मग आपण रस्त्यात असू किंवा घरात. आपल्याला हसू
आवरत नाही आणि विनाकारण लोकांचे गैरसमज होतात. आज असे प्रसंग विरंगुळा म्हणून सांगायचे
ठरवले आहे. बघा तुमच्याहि कांही आठवणींना उजाळा मिळतो का ?

***********************************************

एकदा मी आणि माझी मैत्रीण तिच्या अंगणांत गप्पा मारत बसलो होतो. एवढ्यात चप्पल घासत
कुणितरी चालल्याचा आवाज आला. मैत्रीणीच्या आईने विचारले," कोण येतय गं चपला घासत अशा?"
माझी मैत्रीण म्हणाली,"गोन्द्याच असंल. दुसरं कोण असणार आहे. चपला घासत चालायची त्यालाच
सवय आहे" (तिच्या भावांचं नांव गोविन्द होतं.) असे म्हणून समोर पाहिले तर शेजार्‍यांकडे नेहमी येणारे
गृहस्थ होते. त्यांनी ते ऐकलं होतं आणि ते हसत होते. त्यांना बघून माझी मैत्रीण घाबरून आंत पळून
गेली. मी नंतर आत गेले तर ती पोट धरून हसत होती, करण त्या गृहस्थाचे नाव होते. "गोविन्दराव
बरापुते."

********************************

एकदा माझी आई आणि शेजारच्या काकू रोजच्याप्रमाणे देवळात गेल्या. समोर आरती चालू
होती म्हणून एका खिडकीपाशी उभ्या रहिल्या. एक गृहस्थ सारखा त्या दोघींना बाजुला ढकलून खिडकीतून
बाहेर बघायचा. दोन तीन वेळा असे झाल्यावर काकू चिडून म्हणाल्या," ह्या मेल्याला एवढी काय घाई
झाली आहे बायकांना ढकलून खिडकीतून बघायची." त्यावर तो गृहस्थ हात जोडून म्हणाला,"धक्का
लागला असेल तर माफ करा. मी माझी केळाची बंडी व्यवस्थित आहे का ते पहातो आहे खिडकीतून"
तो केळाची बंडी उभी करून दर्शनाला आला होता. आणि त्याला मराठी येत होते. काकूना आणि
आईला शरमल्या सारखं झालं.

************************************

आमच्या बर्‍याच मोठ्या पारिवारिक मित्रमंडळीमध्ये देशपांडे आणि कुलकर्णी ही दोन कुटुम्ब म्हणजे
धमाल हसणारी आणि हसवणारी.

एकदा देशपांडे नवराबायको बाहेर खरेदीला गेले. बसस्टॉपवर जायचे म्हणून रस्ता क्रॉस करून
जायचे होते. खूप भयानक गर्दी होती. रस्ता ओलांड्ण्यासाठी लोकांचा घोळका उभा होता. एकदम
थोडी गर्दी कमी झाली म्हणून लोक निघाले. मिसेस देशपांडे ह्यानीहि देशपांडे ह्यांचा हात धरला भराभरा
रस्ता ओलांडला. रस्ता ओलांडल्यावर हात सोडला अन कांही तरी बोलणार तेवढ्यात देशपांडे गायब. त्या
गोंधळून इकडेतिकडे बघायला लागल्या तर काय? देशपांडे त्यांच्याकडे मोठ्ठे मोठ्ठे डोळे करून पहात
रस्ता ओलांडून येत होते. "ऐ, तुम्ही तर इथे आहात मग मी कुणाचा हत धरून आले" असे म्हणून त्या
वळल्या तर त्यांनी चुकून ज्याचा हात धरला होता तो माणूस गालांत हसत होता.

******************************
एकदा मी आणि माझी एक मैत्रीण बाहेर जायचे म्हणून बसमध्ये चढलो. बस मध्ये अजिबात
गर्दी नव्हती. आम्ही दोघी ड्राइव्हरच्या मागच्या सीट्वर बसलो. आमच्या समोरच्या सीट्वर लेडी
कंडक्टर काम करत बसली. माझ्या मैत्रीणीला हातवारे करत, कुणाची नक्कल वगैरे करत
बोलायची सवय. आम्ही तिला अभिनेत्री म्हणून चिडवायचो. पण तिच्या लक्षातच यायचे नाही.ती मला
हातवारे करून काहीतरी सांगत होती. सांगताना एकदम म्हणाली,"त्यानी एवढी जोरात लाथ मारली"
असे म्हणून लाथ मारायचा अविर्भाव करत पाय झटकला. त्यासरशी तिच्या पायातली चप्पल निसटली
आणि समोर बसलेल्या कंडक्टरच्या तोंडावर फाड्कन लागली ती चवताळून उठली.मी तर घबरूनच
गेले. काही लोक गोंधळून बघायला लागले आणि जे अगोदरपासूनच हसत होते ते जास्त हसायला
लागले. कंडक्टर उठली आणि तेलुगुमध्ये बडबडत मागे जाऊन बसली. थोडक्यातच निभावले. आम्ही
काही न बोलता आमचा स्टॉप येइपर्यंत बसलो. खाली उतरल्यावर मात्र तो प्रसंग आठवून खूप हसलो.

*******************************

माझ्या एका मैत्रीणीच्या सासूबाई चांगल्या शिकलेल्या, खूप हुशार,व्यवस्थीत,बोलायला वगैरे
खूप चांगल्या. पण त्या कधी जास्त बाहेर जात नसत, त्यामुळे त्यांना चप्पलची जास्त सवय नव्हती.
त्यामुळे कधी प्रवचन, किर्तनाला सार्वजनिक ठिकाणी गेल्या तर स्वतःची चप्पल सोडून दुसर्‍याचीच
चप्पल ती पण जुनी घालून यायच्या. त्यांना स्वतःची चप्पल सापडायचीच नाही. एकदा माझ्या मैत्रीणीने
त्यांना चांगली महागाची चप्पल आणली. त्यांनी हरवेल ह्या भीतिने दोनतीन महिने वापरलीच नाही. एकदा
कुठेतरी प्रवचन होतं म्हणून त्या निघाल्या तर माझ्या मैत्रीणीने सांगितले," आई चप्पल तुम्ही मांडीखाली
घेऊन बसा कारण ते काही देऊळ नाही. त्या बरं म्हणाल्या. तिथे गेल्यावर त्यांनी चप्पल मांडीखाली ठेवली.
प्रवचन संपले त्या निघाल्या. एका बाईने त्यांना विचारले," अहो ताई ही चप्पल तुमची आहे का?" त्या
लगेच हात झटकत म्हणाल्या, "नाही नाही माझी नाही ही चप्पल" थोडे पुढे गेल्यावर त्यांच्या बरोबर
असणार्‍या बाई म्हणाल्या," आहो ताई तुम्ही चप्पल मांडीखाली ठेवली होती ना". तेंव्हा त्यांना आठवलं
कि ती चप्पल आपलीच होती. त्या म्हणे," आगबाई हो की. ती चप्पल माझीच होती ना हो." चला पाहूया
त्या बाईला. तोपर्यंत ती बाई पसार झाली होती. पुन्हा सगळे जाई पर्यंत ह्यानी वाट पाहिली आणि
उरलेली जुनी चप्पल घालून आल्या. भेटल्यानंतर हसून हसून हा किस्सा आम्हाला सांगितला.आणि
म्हणाल्या, " अगं मी ती चप्पल दोनतीन महिने न वापरल्यामुळे कशी आहे तेच विसरून गेले होते."

********************************

कुलकर्णी आणि आम्ही शेजारी शेजारी होतो. देशपांडे थोडे लांब रहात असत. पण तशी त्या
दोघांची रोजच चक्कर असे. एकदा ते एकटेच आले. आमच्याकडे थोडा वेळ बसून कुलकर्णीकडे जायला
निघाले. मीही बोलत बोलत त्यांच्याबरोबर गेले. कुलकर्णी अजून यायचे होते. कुलकर्णींच्या घरांत बाहेरच्या
खोलीत कोपर्‍यात एक साधारण कमरेइतका दिड दोन फूट रुन्दीचा खोल खड्डा होता. मालकाने तो काय
उद्देशाने केला होता काय माहित? त्यामुळे जागा खूप आडली जायची. त्यात कुलकर्ण्यांची बायको पांघरूणाच्या घड्या टाकायची अन त्यावर एक फळी टाकायची.आणि अगदी त्याला टेकून पलंग ठेवलेला होता.त्या दिवशी
ती फळी टाकायची विसरली. आम्ही गेलो तेंव्हा ती आंत होती. मी तिला हाक मारली. ती बाहेर आली
आणि, " अहो देशपांडे तिकडे बसू नका" म्हणेपर्यंत देशपांडे त्या खड्ड्याच्या वितभर काठावर पाय देऊन
पलंगावर इतक्या कडेला बसले की कांही बोलायच्या आत सर्रर्रकन घसरले आणि भस्सकन त्या खड्ड्यात
घुसले.त्यांची घडीच झाली होती. पाय कपाळाला चिकटले होते आणि हात वर होते. आम्हाला हसू आवरेना. आम्ही खाली बसून पोट धरधरून हसत राहिलो. ते बिचारे वर येण्याचा प्रयत्न करत होते आणि आम्ही
नुसत्याच हसत होतो. शेवटी ते म्हणाले," अहो वहिनी नुसत्या हसत काय राहिलात मला वर काढा ना ".
आम्ही दोघीनी त्यांचे हात धरले आणि त्यांना वर काढले. त्यांनी सगळ्याना हा किस्सा सांगून खूप हसवले. थोड्यावेळाने त्यांची बायको आली, आम्ही तिला सांगितले तेंव्हा ती तिच्या नेहमीच्या (बीड) सुरात म्हणाली,
" पडले का. काय माय, नेहमी जिथं जातेत तिथं पडूनच येतेत." आणि पुन्हा एकदा हास्यकल्लोळ
सुरु झाला.

आता मलाहि ते दृष्य आठवून खूप हसू येत आहे. पण हसून चालणार नाही कारण कामं खूप
आहेत. तेंव्हा आता इथेच थांबू. अजून खूप किस्से आहेत पण पुन्हा कधीतरी बोलू. तोपर्यंत तुम्ही
तुमचे काही किस्से आठवा आणि हसा.

निवडक १० त नोंदवा विनोदी लेखनविरंगुळा

ammi | 2 March, 2011 - 21:43

अरुंधती कुलकर्णी | 2 March, 2011 - 21:44

आवळा | 2 March, 2011 - 22:42
नेहमीच्या (बीड) सुरात म्हणाली,
" पडले का. काय माय, नेहमी जिथं जातेत तिथं पडूनच येतेत." >>>>

खुप दिवसानी गावची भाषा वाचायला मिळाली

वर्षू नील | 2 March, 2011 - 22:48
मस्तैत एकेक किस्से

नंद्या | 2 March, 2011 - 22:51
एक धागा किश्श्यांचा इथे असे किस्से टाकता येतील, तसेच वाचता येतील.

anjali_12 | 3 March, 2011 - 00:43
शेवटचा किस्सा वाचून डोळ्यात पाणी येईपर्यंत हसले

माफ करा अ‍ॅड्मिन मी नको असलेला भाग डिलिट केला पण
तरीही काही भाग इथे आला आहे. तो कसा डिलिट करता
येईल ते कृपया सांगाल तर बरे होईल.

आमच्या ओळखीच्या एका कुटुंबात घडलेला किस्सा.

घरात आईचे नाव 'चंचल' आणि लेकीचे 'आंचल' लेक वय वर्षं पाच.
तर हे कुटुंब राहायचं एका दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर. खालच्या मजल्यावर राहणार्‍या कुटुंबाशी यांचे चांगले रिलेशन होते, जाणेयेणे होते. मुख्यत्वे लेकीची रोज फेरी असायची.
एकदा हे खालचे कुटुंब गावाला गेले, येताना फक्त नवरा परत आला, बायको मागाहून येणार होती.
दुसर्‍या दिवशी सकाळी वरच्या कुटुंबातील नवरा गॅलरीत उभा .....खालच्या नवरा लॉनवर उन्हात पेपर वाचत बसला आहे. आधी हायहॅलो, घरच्यांची खुशाली इ. बोलणे झाले. मग खालचे श्रीयुत एकदम म्हणाले," अरे यार, वो चंचलको भेज देना जरा हमारे घर. बहोत दिन हुये उसे मिले. बडी याद आ रही थी उसकी. कहां है? अगर फ्री है तो भेज देना. थोडी देर खेल लेगी यहाँ. मेरा मनभी लग जायेगा"

वरचे श्रीयुत तीनताड उडाले....... Lol

Pages