एक धागा किश्श्यांचा

Submitted by अरूण on 17 April, 2009 - 00:48

आपल्या पैकी बरेच जण गप्पा मारताना असंख्य किस्से सांगतात. पण ते बहुदा वाहून जाणार्‍या पानावर असल्यामुळे सगळ्यांनाच याचा आनंद घेता येत नाही. म्हणून हा धागा सुरु करत आहे.

तरी आपण सर्वांनी आपापले किस्से इथे लिहावेत, म्हणजे सगळ्यांना ते वाचता येतील.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंदू धर्मात सांगितलेलं खरं असेल तर आणखी फक्त ६ जन्म बरोबर काढायचे आहेत >>> Lol

योग, दिनेशदा, अजय....
सही किस्से आहेत.

माझ्याबाबतीत घडलेला एक किस्सा आठवला.

दहावीत असताना एका ठिकाणी (नेरळला) आमच्या (कर्जतच्या) शाळेतर्फे प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेतला होता.
प्रश्न आला : सकाळी ७.०५ वाजता लागणार्‍या मराठी बातम्या कोणत्या केंद्रावरुन प्रसारित होतात ? त्या केंद्राची वारंवारता (frequency) काय ?

माझे उत्तर : पुणे केंद्र. ८०० MHz वरुन
पुन्हा प्रश्न : कशावरुन ?
उत्तर : त्यांची सुरुवात, 'आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे (किंवा भालचंद्र जोशी) प्रादेशिक बातम्या देत आहेत' अशी असते
परिक्षक : उत्तर चूक आहे. या बातम्या सकाळी मुंबई केंद्रावर लागतात ५५० MHz वर

मी : मुंबई केंद्र त्या बातम्या फक्त सहप्रसारित करते, सादर करत नाही.
परिक्षक : तुम्ही आकाशवाणी नीट ऐकत नाही. पुढचा प्रश्न.......

अशा रितीने, बरोबर उत्तर देण्याबद्दल माझे गुण कापण्यात आले. Happy

किस्सा कालचाच..........
काल नाग पंचमी.
सकाळी उठलो, नास्ता झाला, बायको म्हणाली, गायीचे दुध देवु का प्यायला?
म्हटल, आज दुध नको, चहाच दे. Happy

अनेSSक वर्षांपूर्वीची गोष्ट. बहुधा १९७३ च्या आसपास. अमेरिकेत, न्यू जर्सीत श्री. सुरेश वाडकर आले होते गाण्याच्या कार्यक्रमाला. तेंव्हा त्यांच्याबद्दल इथल्या लोकांना काहीच माहिती नव्हती. कारण आत्तासारखे इंटरनेट, भारतातील वर्तमानपत्रे, बातम्या इ. इथे काहीच नव्हते. शिवाय फोन सुद्धा फार तर फार वर्षातून दोन तीनदा, तोसुद्धा घरच्या चौकश्यांसाठी. असो.
श्री. वाडकर यांच्या कार्यक्रमाला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता, कारण ती गाणी इथे माहिती नव्हती. तसे त्यांना व्यवस्थापकांनी सांगितले, आणि म्हणाले आता मध्यंतरानंतर तुमची माहिती सांगू. मध्यंतर संपले, नि व्यवस्थापक बाई बोलायला उभ्या राहिल्या. 'मंडळी, मला कल्पना आहे आपण सर्व श्री अजित वाडेकर यांची गाणी ऐकायला उत्सुक आहात,' अन् एव्हढ्यात मोठा हंशा पिकला. क्रिकेटप्रेमी लोकांना अजित वाडेकर चे नाव ठाउक होते. वाडकरांचे नाव तेंव्हा एव्हढे प्रसिद्ध नव्हते.

हा धागा आजच पहिल्यांदा पाहिला. सगळे किस्से सवडीने वाचेन पण झक्कींनी लिहिलेला किस्सा वाचून मलाही एक किस्सा आठवला. काही वर्षांपूर्वी झी मराठी ( तेव्हा अल्फा मराठी ) वर शाळेतल्या मुलांसाठी प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम असायचा ( बोर्नव्हिटा क्विझ कॉन्टेस्ट सारखा ) त्याचं सूत्रसंचालन तुषार दळवी करायचे. एकदा त्यातल्या एका टीमला त्यांनी प्रश्न विचारला, " भीमसेन जोशी ह्यांचं गाण्यातलं घराणं कुठलं ?" त्या मुलानं एक क्षण विचार केला आणि प्रश्नार्थक स्वरात विचारलं "जोशी घराणं ?" ( किराणा घराणं हे उत्तर अपेक्षित होतं ) त्याचं उत्तर ऐकून तुषार दळवी ह्यांना हसू दाबणं खूप कठीण गेलं होतं ... आणि घरी बसून बघणार्‍या आम्हालाही Happy

गायकांवरून आठवलं..
आमच्या फॅमिली फ्रेंड्सच्या घरी लग्नानिमित्त राहुल देशपांडेची मैफिल होती. राहूल देशपांडेचे गाणे ते ही अगदी पहिल्या दुसर्‍या रांगेतून ऐकायला मिळणार म्हणून मी आणि आई जाम खूष होतो. राहूल मध्ये मध्ये बोलताना आजोबांच्या आठवणी सांगून गाणी गात होता. बगळ्यांची माळ फुले तर सहीच गायले त्याने.. इत्यादी इत्यादी...
हे सर्व झाल्यावर लोकं काही प्रश्न विचारत होते तो बोलत होता.
मध्येच आमचे ( संगीताचे औरंगजेब ) बाबा त्याला अतिशय निरागसपणे प्रश्न विचारते झाले :
" तुम्ही फारच छान गायलात हो. पण तुमचे नाव काय ? " Uhoh Lol
अजुनही राहुलचे ते १ सेकंदात बदललेले एक्स्प्रेशन्स व ब्लॅंक चेहरा आठवून हसू येते.
(आम्ही नंतर बाबांना झापले काय हे बाबा.. आम्हाला विचारायचेत ना.. असं काय सर्वांसमक्ष? ते आपले परत निरागसपणे.. नाही माहीत मला.. मग विचारलं त्यालाच. काय बिघडले.. ? Happy बर, उत्तर कळल्यावरही त्यांची इच्छा होती काहीतरी विचारयची बहुधा. ती त्यांनी नंतर पूर्ण केली नशिबाने. आम्हाला नंतर विचारतायत. कोण वसंत देशपांडे? आपल्या कॉलनीतला ?? Uhoh )
आमचे पिताश्री अ‍ॅक्टींग व आईला उचकवण्याचे काम छान करतात, त्यामुळे त्यांचे खरंच अज्ञान होते की मजा करत होते कोण जाणे! पण मजा आली होती!! Happy )

Rofl
आमचे पुज्य पिताश्री पण असेच. टिव्ही बघायला त्यांच्या बरोबर बसण्यात काही पाँइटच नाही.
मधनच "हा कोण? तो त्या मुलीचा नवरा का? पण तो मेलेला ना ?" मग आई "नाही,नाही. तो वेगळा प्रोग्रॅम. यात त्याचा पुनर्जन्म झालाय आणि त्यात तो मेलाय " वगैरे सांगुन एक्सप्लेन करु पर्यंत ते पेपरात डोक खुपसुन बसणार. तो वर प्रोग्रॅम पण संपुन गेलेला असतो. Angry

कोण वसंत देशपांडे? आपल्या कॉलनीतला ?? >> Lol
त्यामुळे त्यांचे खरंच अज्ञान होते की मजा करत होते कोण जाणे! >> अशी लोकंच जास्त मजा आणतात! Happy

गेल्या डिसें.मधला किस्सा.
आम्ही एकदम दोन एलायसी पॉलिसीज घेतल्या. एजंटने पॉलिसीची कागदपत्रं एका छानश्या फाइल कव्हरमध्ये घालून आम्हांला दिल्या आणि सांगितलं की,"एकच फाइल कव्हर देतोय, कारण कव्हर्स संपली आहेत. पुढच्या आठवड्यात नवीन येतील, तेव्हा घेऊन जा."
त्याप्रमाणे माझ्या दिराला ऑफिसमधून येतायेता फाइल कव्हर घेऊन यायला सांगितलं. तो गेला आणि तिकडच्या एजंट बाईला म्हणाला,"अहो, ते पॉलिसीचं कव्हर हवं होतं". तिने कीबोर्डवर काहीतरी बडवलं आणि मॉनिटरकडे बघत म्हणाली,"३ लाख." दीर अवाक्.
मग त्याच्या लक्षात आलं काय घोळ झाला तो :).
परत म्हणाला," अहो, ते कव्हर नाही, फाइल कव्हर हवं होतं." Proud

परीक्षा चालू आहेत मुलीच्या शेजारी एक पाचवीतील मुलगी बसली होती.
हिन्दीच्या पेपर मध्ये मामाला पत्र नावाचा प्रशन होता. ही बाइ आपला पेपर संपवून तिचे लिहिणे बघत होती.
त्यामुलीने लिहिले मामाजी पत्र. व शेवटी तुम्हारी सेवा में च्या ऐवजी तुम्हार सेव में. मुलगी घरी येऊन म्हणे मम्मा ती मुलगी भोजपुरीत पास होइल! आजकाल आम्ही गंमतीने तुम्हार सेव में म्हणतो काही काम असले की.

वडीलांच्या बाबतीत घडलेला किस्सा : आजही तो किस्सा ऐकताना अंगावर सर्र काटा येतो.

वडील व्यवसायानिमित्त खेड्यांतून, तालुक्यांतून हिंडणारे. एका गावच्या पाटीलबुवांच्या शेतीचे काम होते. बरीच मोठी शेतजमीन होती पण पाण्याचा प्रश्न होता. वडील सकाळीच शेतावर पोचले. दिवसभर सर्वेक्षणानंतर त्यांना पाण्यासाठी काही जागा प्रॉमिसिंग वाटल्या. सर्वेक्षण होईस्तो सायंकाळ झालेली. पाटीलबुवांनी मुक्कामाचा आग्रह केला. शेवटी वडील राजी झाले.
पाटलांचे चांगले दुमजली ऐसपैस घर होते. खालच्या मजल्यावर बायकांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम चालू होता. वडीलांची सोय माडीवरच्या खोलीत केलेली. एका गड्याने त्यांचे सामान वरच्या खोलीत नेऊन ठेवले. पाटलांना काहीतरी अर्जंट काम आल्यामुळे त्यांनी वडीलांना, ''साहेब, तुम्ही आराम करा जरा वाईच. मी जाऊन येतो. आमचा गडी तुमाला काय हवं नको ते बघेल,'' असे सांगितले व ते बाहेर गेले. अंधारून आले होते. वडीलांना काही तिथे एकट्याने करमेना. त्यांनी नोकराला, ''मी जरा चक्कर मारून येतो आजूबाजूला,'' असे सांगितले आणि पाय मोकळे करायला बाहेर पडले.
घराच्या बाजूला एक-दोन शेड्स होत्या, मागच्या बाजूला गोठा होता, थोडीफार झाडे होती. जरा तिकडे जाऊन चक्कर मारून येऊ असा विचार करत वडील निवांतपणे गोठ्याच्या रोखाने निघाले. अंधार होत आला तरी त्या बाजूला दिवेलागणी झाली नव्हती. शेड्सपण अंधारातच होत्या. वडील तिथून झपझप जात असतानाच गोठ्याच्या आतल्या भागातून एक म्हातारबाबा हातात कंदिल घेऊन त्यांच्या रोखाने येताना दिसले.
वडीलांपासून काही अंतरावर येऊन थबकले व हातातल्या कंदिलाचा उजेड वडिलांच्या चेहर्‍यावर पडेल अशा तर्‍हेने कंदिल उंचावून धरत त्यांनी थरथरत्या आवाजात विचारले, ''तू कोन रं बाबा? हितं काय करतुयास?''
तसा त्या म्हातारबाबांचा वेष अगदी साधाच दिसत होता. शिवाय गोठ्याच्या आतल्या बाजूनं बाहेर आलेले.... वडीलांना वाटले, जुना नोकर असेल. म्हातारा मोठ्या आपुलकीनं चौकशी करत होता.
त्यांनीही मग तेवढ्याच शांतपणे सांगितले, ''पाटीलसाहेबांनी जमीनीच्या कामाला बोलावलं आहे मला, आज जवळपास संपलंय काम. रात्री मुक्कामाला राहीन आणि उद्या निघेन.''
वडीलांच्या बोलण्यासरशी म्हातारबाबांनी समाधानानं मुंडी हालवली आणि ''बरं बरं, आसु दे. तुमच्यामुळं घरादाराचं कल्याण व्हईल... चांगलं हाय...'' असे काहीसे पुटपुटत ते पुन्हा आत जाण्यासाठी वळले.
वडीलांनीही निरोपादाखल मान हालवली व ते पुढे निघाले. काही पावले चालून गेल्यावर त्यांना आठवले की
म्हातारबाबांना कंदिलासाठी विचारता आले असते. त्यांनी मागे वळून पाहिले. पण म्हातारबाबा आणि त्यांचा कंदिल दोन्ही दिसेनासे झालेले.
घराकडे परत येताना पुन्हा एकदा वडीलांनी गोठ्याकडे नजर टाकली. पण म्हातारबाबा काही दिसले नाहीत.
घरी आले तेव्हा पाटीलबुवापण परत आले होते. घरातला हळदीकुंकवाचा कार्यक्रम संपलेला असल्यामुळे मग दोघे खालच्याच मजल्यावर गप्पा मारत बसले. यथावकाश जेवणे झाली. पुन्हा थोड्या गप्पा झाल्या. मग पाटलांचा नोकर माडीवरच्या खोलीत 'शहरातल्या साहेबांसाठी पाण्याचं तांब्याभांडं, पांघरुण वगैरे नेऊन ठेवलंय' सांगायला आला. सगळेचजण मग उठले. वडीलांना खोलीत सोडायला स्वतः पाटील आलेले....

ट्यूबलाईटच्या उजेडात वडीलांनी खोली पहिल्यांदाच नीट बघितली. चांगली मोठी होती. भिंतींवर काही तैलचित्रे लावली होती. त्यातील एका चित्रातील माणूस त्यांना फार ओळखीचा वाटला. जवळ जाऊन पाहिलं तर गोठ्यात भेटलेल्या म्हातारबाबांची हुबेहूब प्रतिकृती! फक्त इथे त्या माणसाच्या अंगावर कोट, डोक्याला फेटा होता.

वडीलांनी चित्राकडे अंगुलीनिर्देश करून विचारलं, ''हे आजोबा दिसले नाहीत जेवायच्या वेळेस....इथेच राहतात ना ते?''
पाटील वडीलांकडे चमत्कारिक नजरेने पाहू लागले. शेवटी त्यांनी विचारलेच, ''तुम्हाला कुठं भेटला म्हातारा?''
''हेच आपलं, संध्याकाळी मी नव्हतो का पाय मोकळे करायला गेलेलो....तेव्हा गोठ्यापाशी भेटले होते. का हो?'' वडीलांनी गोंधळून विचारले.
पाटील अजून बोलायला तयार नव्हते. त्यांचे प्रश्न मात्र चालूच होते. ''काय म्हनत काय व्हता म्हातारा?''
वडीलांना पाटलांचे प्रश्न ऐकून काही उलगडत नव्हते. तरीही त्यांनी काय तो वृत्तांत सांगितला.

सगळं ऐकल्यावर पाटलांनी मुंडी हालवली, खोलीच्या एका कोनाड्यात ठेवलेल्या उदबत्तीच्या पुड्यातून उदबत्त्यांचा जुडा बाहेर काढला, काडेपेटीने उदबत्त्या पेटवल्या आणि त्या तैलचित्राच्या समोर जाऊन त्या म्हातारबाबांच्या चित्राला ओवाळले. मग नमस्कार करुन त्या उदबत्त्या कोपर्‍यात खोचल्या आणि शांतपणे वळून वडीलांना म्हणाले, '' त्यो म्हातारा खपून पण आज वीस-पंचवीस वरसं झाली आसत्याल! माझा आजा व्हता त्यो. त्याला घराची, शेताची, गावाची लई काळजी बघा. म्हनूनच आज तुमाला भेटायले आला.''
खपून वीस-पंचवीस वर्षे? मग आपल्याला भेटला तो कोण होता? विचारांनी वडीलांना एव्हाना चांगलाच घाम फुटलेला. त्यांनी जरासे चाचरतच विचारले, ''म्हणजे???"
''आमचा म्हातारा लई चौकस. गावात येनार्‍या प्रत्येक मानसाची खबरबात ठेवायचा. त्यो खपल्यावर गावात समद्यांना लई चुकल्याचुकल्या सारखं व्हायचं. पन मग गावात नवा डागदर आला, त्याला हा भेटला. आमचं साडू जनावराचं डागदर. ते आले व्हते हितं तवा त्यांना भेटला. त्यांनी गावात प्रॅक्टीस करावी म्हनून. आन तो आसाच भेटत राहातो कुनाकुनाला.... जास्त करुन अशा लोकांना जे गावाच्या, ह्या घराच्या भल्यासाठी येतात. त्यास्नी आशीर्वाद देतुया आमचा म्हातारा....,'' पाटलांच्या चेहर्‍यावर गहिवरल्याचे भाव होते.
वडीलांच्या पोटात मात्र भीतीने कालवाकालव होत होती. न जाणो रात्रीतून परत भेटायला आला म्हातारा तर काय करायचे?!!!!
ती रात्र त्यांनी कशीबशी, तळमळत, तैलचित्रातील म्हातार्‍याकडे न बघण्याचा अथक प्रयत्न करत आणि अधुन मधुन रामरक्षा म्हणत घालवली.

दुसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा ते परत निघाले तेव्हा गावातील आठ-दहा बुजुर्ग खास त्यांना भेटायला आले होते. त्यांना म्हातार्‍यानं 'गाठलेला' साह्येब बघायचा होता!!! त्यानंतर मात्र वडीलांनी परत कधी त्या गावी जाण्याचे नाव घेतले नाही!!!

अरुन्धती, ग्रेट किस्सा! Happy
(अर्थात तरीही लोक सान्गोवान्गीच्या गप्पा - थोतान्ड असे म्हणणारच! असो)
(वडिलान्च्या कामाचे नेमके स्वरुप मात्र लक्षात आले नाही)

[एक धागा सुखाचा शम्भर धागे दु:खाचे
या चालीवर हल्ली नविन लेखनाचे पान बघितले की मला
एक धागा किश्श्याचा, शम्भर धागे कवितान्चे
अस मोठ्यान्ने गळा काढून ओरडावस वाटत Biggrin ]

हा हा हा..... वडीलांचा व्यवसाय भूजलसंशोधन, सल्ला व मार्गदर्शन! ते शब्दशः बारा गावचं पाणी प्यायल्यामुळे, १९७२पासून सतत भ्रमन्ती करत असल्यामुळे त्यांना कायमच असे चित्र-विचित्र, गमतीशीर, तर्‍हेवाईक अनुभव येत असतात.

अरूंधती सॉलिड आहे किस्सा....
पण तुझे वडील भल्या कामासाठी गेले होते, आणि म्हातारा पण चांगल्या मनाचा होता
ते बरं.

अरुंधती, तुझ्या बाबांचा किस्सा म्हणजे किस्साच आहे. एकदम सॉलिड! काटा आला अंगावर वाचताना!

धन्स मंडळी! Happy म्हातारबाबा चांगल्या मनाचे होते, म्हणूनच ठीक!

आता हा किस्सा विजापूरला घडलेला. वडीलांचे तिथल्या एका शेतकर्‍याने शेतजमीन सर्वेक्षणासाठी बोलावल्याने विजापूरला जायचे नक्की झालेले. आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. मग ठरले की सकुटुंब सपरिवार विजापूरला जायचे, वडील त्यांचे काम आटोपतील आणि मग आम्ही त्यांच्याबरोबर विजापूर-दर्शन करू.

ठरल्याप्रमाणे आम्ही चौघे लाल डब्ब्यातून विजापूरला रवाना झालो. तिथल्याच एका बर्‍यापैकी लॉजमध्ये उतरलो. वडीलांची विजापुरात त्यांचे शेतकरी ग्राहक सोडले तर फार कोणाशीच ओळख नव्हती. त्यांचे काम अंदाजाप्रमाणे एका दिवसात आटोपले. आता कल्ला!! मग काय, आमची विजापूर-भ्रमन्ती सुरु झाली. कधी पायी, कधी सायकल-रीक्षा (की रीक्षा?) यांनी तेथील प्रेक्षणीय स्थळे पालथी घालायला सुरुवात केली. सोबत आईसक्रीम डायट! अहाहा!!

तर असेच फिरत फिरत आम्ही गोल घुमटापाशी आलो. तेथील आवाज घुमण्याची अद्भुतता अनुभवून झाली. मग तेथील थडगी पाहून झाली. Sad मला तर कधी एकदा तिथून निघतोय असे झाले होते!
त्यानंतर जोड घुमट पाहिला. तिथून निघत होतो.... दुपारचे ऊन चांगलेच होरपळत होते. घशाला कोरड जाणवत होती. आता रीक्षात बसायचे आणि थेट लॉज गाठायचे असा प्लॅन चाललेला असतानाच एक खणखणीत आवाजातील हाक ऐकू आली, ''कुलकर्णी साब, ओ कुलकर्णी साब.....''

वडीलांनी लक्ष दिले नाही. थोड्या अंतरावर इतरही प्रवासी रेंगाळत उभे होते. त्यांना वाटले, त्यापैकीच कोणाला तरी हाळी दिली असेल.

ह्या खेपेस हाक स्पष्ट व खणखणीत होती....'' ओ कुलकर्णी साब....थोडा रुकिये |'' नकळत वडीलांची व त्यासोबत आमची पावलेही थबकली. आमच्यासमोर एक उंचापुरा, हिरवी कफनी घातलेला, हातात मोरपीसाचा झाडू घेतलेला, डोक्याला हिरव्या रंगाचे फडके गुंडाळलेला फकीर उभा होता. सुरमा घातलेले त्याचे डोळे भेदक होते. वडीलांना वाटले, ह्याला काही पैसे वगैरे हवे असतील, म्हणून त्यांनी खिशात हात घातला. त्याबरोबर त्या फकीराने त्यांना थांबायची खूण केली. ''हमें आपसे कुछ नही चाहिए|'' (मग कशाला थांबवलं?)
जणू आमच्या मनातला प्रश्न ओळखून तो फकीरबाबा वडीलांना म्हणाला, '' आपका पूरा नाम फलाना फलाना है, आप पूनासे आये है |'' (बरोबर आहे बाबा तुझं, आता मुद्द्यावर येशील का? आणि तुला ही माहिती कोणी दिली?)
आमच्या चेहर्‍यावर जणू प्रश्नचिन्हे कोरली गेली होती. आपले बोलणे तसेच पुढे चालू ठेवून तो बाबा उद्गारला, '' लेकिन आप असल में पूनाके नही है | आपका मूल ग्राम फलाना फलाना है | आपके पिताजीका पूरा नाम फलाना फलाना था, दादाजीका नाम फलाना फलाना था |'' आता आम्ही केवळ भोवळ येऊन खाली पडायचेच शिल्लक राहिलो होतो. ह्या बाब्याला आपलं नाव, गाव, व्यवसाय, पूर्वजांची नावं हे सगळं कोठून समजलं? कोणी सांगितलं? ही असली कसली थट्टा?
पण खरी भोवंडायची वेळ नंतरच येणार होती!!
आमच्या गोंधळलेल्या चेहर्‍यांकडे बघत त्या फकिराने एकदम वडीलांच्या नजरेला नजर भिडवली आणि म्हणाला, ''हम यह सब जानते है क्योंकि बहुत साल पहले आपके दादा-परदादाजीसे पहले, आपके पुरखोंमेंसे एक बडे नेक और पाक इन्सान अपने संगीत- गुरुके खातिर, मरनेसे पहले अपने पूरे परिवारके साथ मुस्सलमान धरमको अपनाए थे | उन सबकी कबरें यहां है, आए, उन्हे मिले |'' त्याने आपल्या हाताने आम्हाला त्याच्याबरोबर चलायची खूण केली.
आता थरथरायची आमची पाळी होती. कोण कुठला फकीर, अचानक उगवतो काय, काहीच्याबाही बरळतो काय, आणि आता तर आम्हाला कोठेतरी चलण्याची जवळपास आज्ञाच करतो!!
त्याने नेलेल्या ठिकाणी बाहेर स्पष्ट शब्दांत स्त्रियांनी प्रवेश करायला मनाई आहे असे लिहिले होते. आई व आम्ही दोघी बहिणी तिथेच घुटमळलो. तसे तो फकीर आमच्याकडे वळून म्हणाला, ''आप भी आईए, यह सब तो आपकेही लोग है | झिझकना मत, बेखौफ आना |'' अरे बाबा, तू असं काय म्हणून राहिला? तुला कळतंय का तू काय बोलतो आहेस ते? इति आम्ही, अर्थात मनातल्या मनात.
जोड घुमटाच्या जवळच असलेला हा भाग जवळपास निर्जन होता. समोर तंबूवजा कनात दिसत होती. हिरव्यागार रंगाची. नक्षीदार वेलबुट्टी, भरजरी काम केलेले पडदे आजूबाजूला सोडलेले. आत शिरल्यावर ऊद, धूपाचा दर्ग्याजवळ येणारा सुवास चारी अंगांनी वेढत होता. भर उन्हातही इथे एक प्रकारचा गारवा भरून राहिला होता. मोरपीसाच्या चवर्‍या की पंखे घेऊन अजून दोन -तीन फकिरासारखी दिसणारी माणसे तेथील काही कबरी (की पीर)वर चवर्‍या ढाळत होती. आम्हाला पाहून कोणीही आश्चर्य दाखवले नाही, की खास स्वागतही केले नाही. आपापल्या जागाही सोडल्या नाहीत. हुश्श!
आम्हाला भेटलेला फकिरबाबा तोवर कोपर्‍यात असलेल्या एका कबरींच्या समूहाकडे आम्हाला घेऊन गेला होता. तिथे गेल्यावर थबकून त्या कबरींकडे अंगुलीनिर्देश करून त्याने सांगितले की हेच आहेत तुमचे पूर्वज.
त्याही पुढे जाऊन प्रत्येक कबरीपाशी जाऊन त्याने ती कबर कोणाची आहे हे सांगितले. त्यांचे आधीचे नाव व धर्म बदलल्यावर घेतलेले नावही सांगितले. सर्वात शेवटी त्या परिवारातील कुटुंबप्रमुखाच्या थडग्यापाशी येऊन तो थांबला आणि नाट्यमय सुरात म्हणाला, ''यह आपका कबसे इंतजार कर रहे है |''
हे राम!!!!!! एव्हाना आम्हाला अगदी पिक्चरच्या सेटवर गेल्यासारखं वाटायला लागलेलं! भांबावून जाणं का काय असतं म्हणतात ना, ते अगदी सहीच्या सही अनुभवलं तिथं.
वडीलांनी समयसूचकता दाखवून त्या कबरीला प्रणाम केला, चक्क साष्टांग प्रणिपातच घातला म्हणेनात! त्यांच्या वागण्याचा अर्थ ओळखून आम्हीही वाकलो व यथोचित नमस्कार केले. नंतर त्या फकीरबाबालाही दंडवत घातला. त्याने मोठ्या तोंडाने आशीर्वाद दिले. आम्हाला सोडायला परत कनातीच्या दारापर्यंत आला.
वडीलांनी पुन्हा एकदा त्याला काहीतरी पैसे द्यावेत म्हणून खिशात हात घातल्यावर त्याने पुन्हा एकदा ठाम नकार दिला. ''फिरसे आना |'' आम्ही हात हालवून निरोप घेत असताना तो जोरात उद्गारला.
जवळपास पळत पळतच आम्ही रीक्षा स्टँड गाठला. तिथून थेट लॉज! घडलेल्या प्रकाराविषयी कोणीच बोलत नव्हते. आईने वडीलांना फक्त त्यांचा खिसा चाचपून पैशाचे पाकिट वगैरे सुरक्षित आहे ना हे पहायला सांगितले. सर्वकाही जिथल्या तिथे होते. जागेवर नव्हती ती आमची मने! ह्या अकल्पित माहितीला खरे-खोटे पडताळायला कोणी जुन्या पिढीची माणसेही उरली नव्हती, ना कागदपत्रे! गांधीजींच्या खुनानंतर आमच्या मूळ गावी उडालेल्या दंगलींत सर्व ब्राह्मणवस्ती पेटवून देण्यात आली होती, त्यात ती कागदपत्रेही नष्ट झाली होती.

अजूनही आम्हाला जे घडले, जी माहिती मिळाली ती सत्य की असत्य की आभास की अजून काही, ह्याबद्दल खात्री नाही. पण मिळालेला अनुभव मात्र जाम थरारक होता, जो या जन्मात विसरणे शक्य नाही!!

(वरील संवाद मी माझ्या तुटपुंज्या हिंदीच्या तोकड्या आधाराने लिहायचा प्रयत्न केलाय. तेव्हा चु.भू.दे.घे.)

अरुन्धती, केवळ अविश्वसनीय, पण तू सान्गतेस तर विश्वास ठेवायलाच हवा! Happy
बर, हे सान्गण्यात, त्यान्ची काही टोळी/रॅकेट असेल अस म्हणाव तर त्यान्नी पैसे घेतले नाहीत.

Pages