एक धागा किश्श्यांचा

Submitted by अरूण on 17 April, 2009 - 00:48

आपल्या पैकी बरेच जण गप्पा मारताना असंख्य किस्से सांगतात. पण ते बहुदा वाहून जाणार्‍या पानावर असल्यामुळे सगळ्यांनाच याचा आनंद घेता येत नाही. म्हणून हा धागा सुरु करत आहे.

तरी आपण सर्वांनी आपापले किस्से इथे लिहावेत, म्हणजे सगळ्यांना ते वाचता येतील.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

आम्ही फिरोजपूरला होतो तेव्हाची गोष्ट. तेव्हा ऑप. पराक्रम चालू होतं.(संसदेवरील हल्ल्यानंतर आर्मीला युद्धासाठी सज्ज केलं होतं.) नुकतीच थोडीशी सूट दिल्याने ऑफिसर्स बंकरमधून घरी परतले होते. तरी कधीही युद्ध सुरु होईल अशीच हवा होती.

एका रात्री सुमारे २.३० वाजता घराची बेल वाजली, अगदी जोरजोरात. शंतनु ढिम्म.. हालायला तयार नाही. मग मीच उठून गेले आणि अंदाज घेत दार उघडले. आमच्याच युनिटमधले कॅ. थोरात दारात उभे.
"मॅम, कहाँ हो आप लोग? कबसे फोन ट्राय कर रहा हूं" आमच्याकडे बीएसएनएलचा फोन होता जो महिन्यातले १५ दिवस मेलेला असायचा, नेमका तेव्हाही तो मेलेलाच होता. मी त्यांना तसे सांगून आत बोलावले. "मॅम, टाइम नही है, सर कहाँ है? उनको बुलाओ. अर्जंट मिटींग है, जीओसी के घर बुलाया है."
मी गडबडीने आत गेले. शंतनुला उठवले आणि थोरात आल्याचे सांगितले. तोही गडबडीने उठला, युनिफॉर्म शोधू लागला.
"सर, जो मिल रहा है वही युनिफॉर्म पहनो, जल्दी चलो, सब वहां पहुंच गये है, मैं आपको लेने आया हूं"-थोरात
शंतनु घाईत तयार झाला. शुज घालत होता, तेवढ्यात थोरात 'आत्ता येतो' म्हणून बाहेर गेला. मीही आत येऊन बसले.
परत बेल वाजली. तीन चार वेळा वाजली. मी जाऊन दार उघडले तर दारात थोरात आणि अजून ७-८ ऑफिसर्स उभे.
"मॅम, सरप्राइझ... मॅगी खिलाओ.." म्हणत हातातले मॅगीचे पॅकेट्स नाचवत सगळे आत घुसले.
शंतनुला युनिफॉर्म घालून तयार उभे पाहून चिडवू लागले,"कहां जा रहे हो इतनी रातको?"

आमच्या लक्षात सगळा प्रकार आला. त्या सगळ्यांनी मिळून आम्हांला उल्लू बनवलं होतं. खरा उद्देश आम्हांला रात्री उठवून मॅगी खाणं हाच होता. ते मिटींग वगैरे सगळं खोटंच होतं.

त्यानंतर मी मॅगी बनवली, कॉफी बनवली. सगळे खाऊन पिऊन निघाले. जाता जाता "मॅम, आज इधर मॅगी खायी है, कल पाकिस्तानमें डिनर करेंगे" म्हणून गेले. हा डायलॉग त्या दिवसांत फारच फेमस होता.

त्या १०-१५मिनिटांत मी खरंच असा अर्जंट कॉल आला, तर बायकांची मनःस्थिती काय होत असेल ते अनुभवले. Happy

>>>>> त्या १०-१५मिनिटांत मी खरंच असा अर्जंट कॉल आला, तर बायकांची मनःस्थिती काय होत असेल ते अनुभवले.
कदाचित, म्यागी हे निमित्त असुन तो "ट्रेनिन्गचाच" एक भागही असेल! Happy
काय सान्गाव या मिल्ट्रीवाल्यान्चे? त्यान्चे एचार भारीच पॉवरफुल्ल असणार! Wink

अरुन्धती, त्या मालकिणबाई कोब्रा होत्या का? (तस असेल तर त्या किश्श्यात काय विशेष? Proud )

लिंबुटिंबु : कसं ओळखलंत? Proud
चांगल्या माहेरून एकारान्त दोन अक्षरी व सासरहून एकारान्त तीन अक्षरी आडनावाच्या होत्या!!!

वाड्याच्या मालकिणबाईंचे कंजूषपणाचे किस्से आधी सांगितले आहेतच!
त्यांची सून सुरुवातीला सासूचा कंजूषपणा पाहून थक्कच झाली! सधन, समृध्द, संपन्न परिवार असतानाही एवढी नको तितकी काटकसर कशासाठी हा प्रश्न तिला नेहमी पडत असे. ती तिच्या मनातलं अनेकदा आमच्याकडे बोलून दाखवत असे. पण सासूबाईंचा घरात एवढा वरचष्मा होता की त्यांच्यापुढे कोणाचीही बोलायची टाप नव्हती.

त्या रोजच्या चहाबरोबर खाण्याची ग्लुकोजची बिस्किटेही पुडा बाजारातून आणल्यावर त्यावरच पेनने खुणा करून रोज किती बिस्किटे हे ठरवत असत. पुड्यावर दर चार/सहा बिस्किटांवर तारीख व खूण करून ठेवत. त्या त्या दिवशी तेवढीच बिस्किटे संपली पाहिजेत. त्यापेक्षा जास्त बिस्किटे संपली की ह्यांचा पारा वर!

एकदा सुनेच्या ओळखीचे कोणी पाहुणे आल्यावर सुनेने चहाबरोबर भरपूर बिस्किटे समोर ठेवली. सासूबाई नजरेने दाबत होत्या पण सुनेला ते कळले नाही/ तिने कळवून घेतले नाही. पाहुण्यांनी बोलता बोलता बिस्किटे संपवली. झाले!! सासूबाई नंतर दोन दिवस धुसफुसत होत्या. सुनेने हे चांगलेच लक्षात ठेवले.

एकदा सून तिच्या माहेरी मुंबईला गेलेली असताना सासूबाईंना काही कामासाठी मुंबईला जावे लागले. व्याह्यांचे घर तिथेच म्हटल्यावर त्यांच्याकडे जाणे ओघाने आलेच! सूनबाई सासूला घेण्यासाठी माहेरची आलिशान मोटार गाडी घेऊन आली होती. तिचे माहेरचे घर मुंबईच्या अतिशय श्रीमंत निवासी भागात होते. घराजवळ आल्यावर तिने अशाच एका पॉश स्टोअर पाशी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. दुकानातून तीन-चार महागड्या, इंपोर्टेड बिस्किटांचे मोठे पुडे घेऊन बाहेर आली. सासूबाईंनी बिस्किट पुडे पाहिल्यावर त्यांना वाटले, आपल्या सरबराईसाठीच हे सर्व चालू आहे.

सुनेच्या माहेरच्या फ्लॅटपाशी पोचल्यावर तिने लॅच उघडली व जोरात आपल्या लाडक्या कुत्र्यांना हाक मारली. दोन धिप्पाड सशक्त डॉबरमन कुत्री तिच्या हाकेसरशी जिभा बाहेर काढून तिच्या समोर नाचू लागली. सुनेने एक बिस्किटाचा पुडा खोलला व उद्गारली, ''कॅच!!!!'' एकामागून एक ती बिस्किटे हवेत फेकत होती व तिची लाडकी कुत्री त्यांना फस्त करत होती. सर्व बिस्किटांचे पुडे संपल्यावर मगच ती शांत झाली. सासूबाई हा सर्व प्रकार आ वासून बघत होत्या. त्यांना अपेक्षाच नव्हती असे काही घडेल म्हणून! सुनेने वरकरणी काही दाखवले नाही, पण तिला सासूला जे सांगायचे होते ते तिने कृतीतून सांगितले होते. कुत्र्यांना खिलवून झाल्यावर तिने सासूबाईंना फ्रेश व्हायला रूम दाखवली.
सासूबाईंचा चेहरा एव्हाना जाम ताणला गेला होता. सुनेने त्यांना न बोलता अप्रत्यक्षपणे चांगलेच सुनावले होते. मग त्या फ्रेश होऊन बाहेर आल्यावर सुनेने राजेशाही थाटात सासूची सरबराई केली व त्यांना अगदी आतिथ्याने लाजवून सोडले!!! हा किस्सा मग सुनेनेच आम्हाला हसत हसत सुनावला!

सॉलिड किस्से एकेक. प्राची तुझ्या गोष्टींमधून वेगळंच जग बघायला मिळतं.
अरुंधती, तुम्ही सांगितलेले किस्से महान आहेत Happy

अरुंधती, तू लिहिलेले सारे किस्से मस्त! कबरींचा आणि म्हातारबाबांचा भन्नाट!
प्राची, आशू, धीराच्या आहात.

अरुंधती हा किस्साही भारीच.
बर हा एक किस्सा मागच्याच आठवड्ञात घडलेला.
तसं पहायला गेलं तर हॉस्पिटलात वातावरण थोडसं गंभीरच असतं.
पण कधी कधी अभावितपणे विनोद घडतातच. अगदी खोखो हसण्यासारखे नाही तरी स्मितहास्य उमटवणारे नक्कीच.
चिंचवडमधल लहान मुलांच एक हॉस्पिटल. नवजात शिशुपासुन सर्व लहान मुलांवर इथे उपचार होतात.
कमी दिवसात जन्मलेली बाळं किंवा जन्मताच वजन कमी असलेली बाळं याना पेटीत (इन्क्युबेटर?) ठेवतात.
तर अशाच एका बाळाचा डिसचार्ज झाला होता. ते बाळ बर झाल होत. त्याचे बाबा त्याला घेवुन चालले होते. बाबाच्या पाठोपाठ बाळाची आजी. आणि पॅसेजमध्ये जाताना आज्जी म्हणते कशी ये जरा थांब, मला बाळाच तोंड बघु दे. हे आपलच बाळ आहे का ते?
बाळाच्या बाबाच्या चेहर्‍यावर बाळ बरं झाल्याचा आनंद ओसंडून वाहतोय. तो म्हणाला की ते कशाला चुकीच बाळ देतील आपलचं असेल की. त्यावर आजीच प्रत्युत्तर अरे तिथे एवढी बाळं असतात, त्या नर्सने चुकवल असेल तर. Happy
आणं इकडे म्हणुन त्या आज्जीने आधी बाळाचा चेहरा नीट पाहिला मगच त्यांच समाधान झालं.

झकासराव, आज्जीबाईंनी खात्री करुन घेतली!!! Happy

प्राचीच्या किश्शांनी आर्मी लाईफची झलक वाचायला मिळते!

>>>> कसं ओळखलंत?<<<<
कस्च कस्च! आता एका रेकारान्ती कोब्राला दुसर्‍या कोब्रान्ची चाल कळणार नाही तर कुणाला कळणार? नै का?
आम्ही पण "अस्सेच" वागतो, फक्त आमचे शेजारीपाजारी/भाडेकरू इथे मायबोलीवर येतच नाहीत म्हणून! नैतर आमचे किस्से पण इथे आले अस्ते Lol

झकोबा, आज्जीबाई खरोखरच हुषार बर का! Happy तपासुन घेतल तेच बरोबर

आज्जीबाईंवरून आठवला हा किस्सा :

माझ्या बहिणीला एकदा आमच्याच घराच्या गल्लीत एक व्यवस्थित दिसणार्‍या आजीबाईंनी थांबवले. चांगल्या नऊवारी पातळ चापून चोपून नेसलेल्या, पांढर्‍या शुभ्र केसांचा छोटासा अंबाडा घातलेल्या, डोळ्यांना चष्मा असलेल्या ह्या आजीबाईंना रस्ता क्रॉस करून हवा होता. बहिणीला त्यात फार नवल वाटले नाही, कारण ती अशीच अनेक वृध्दांना मदत करत असते. त्यामुळे तिने त्या आजींना क्रॉस करून दिला. ती जायला निघणार एवढ्यात आजींनी तिचा दंड घट्ट पकडला आणि म्हणाल्या, ''मला तुझ्याशी जरा बोलायचंय...''

बहिणीला वाटले काही अडचण सांगणार असतील. खरे तर ती घाईत होती, पण उगाच म्हातार्‍या माणसाला कशाला दुखवा म्हणून गप्प बसली. तर आजीबाईंनी जे त्यांची कर्मकहाणी सांगायला सुरुवात केली ते त्यांची गाडी थांबेचना! बहीण अस्वस्थ!! शिवाय तिला आता त्या आजींच्या थोड्याशा असंबध्द बोलण्यावरून भलतीच शंका येऊ लागली होती. त्या मधूनच भूतकाळात जात, मधूनच वर्तमानात येत, मधूनच बहिणीचा आपल्या हातात धरलेला दंड जोरजोरात हालवत, मधूनच त्या काय बोलत होत्या ते विसरत.... एकंदरित त्यांचे मानसिक संतुलन ठीक नसावे असेच वाटत होते!! आणि त्यांनी चांगला अर्धा तास बहिणीला अडकावून ठेवले. तिने अनेकदा ''मला जायचंय'' म्हणून निघायचा प्रयत्न केला, पण त्यांची बोटे तिच्या दंडात अजूनच जोरात रुतत. तिला एक हिसडा देऊन त्यांचा हात सहज वेगळा करता आला असता. पण तिला त्या म्हातारबाईंविषयी कणवही दाटून येत होती.

गल्लीतले आमच्या ओळखीचे लोक जाता-येता त्या दोघींना पाहून हळूच हसत होते व बहिणीला ''अब तो तुम गयी कामसे!'' अर्थी खुणा करत होते. अर्ध्या तासानंतर म्हातारबाईंनी बोलण्यातून जरा उसंत घेताच बहिणीने शिताफीने आपला दंड त्यांच्या पकडीतून सोडविला व तिथून त्यांना घाईघाईत ''बाय'' म्हणून पळ काढला.

पुढे तिला गल्लीतील इतर लोकांकडून कळले की त्या आजीबाई जवळच रहायच्या व त्यांचे मानसिक संतुलन ढासळले होते. त्यामुळे रस्ता क्रॉस करून देण्याच्या निमित्ताने त्या रोज कोणाला तरी पकडत आणि आपली लटकी ''कर्मकहाणी'' सांगत. वस्तुतः त्यांच्या घरची परिस्थिती उत्तम होती, त्यांचे कोणीही हाल करत नव्हते आणि त्यांच्यावर कसलेही दुर्दैवाचे पहाड कोसळले नव्हते. त्या जी कहाणी सांगत त्यातील बरीचशी कहाणी त्यांच्या मनची असे. कारण गल्लीतील एक-दोन कुटुंबांनी त्या आजींच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करायचा प्रयत्न केला होता तेव्हा त्यांना आजींच्या घरच्यांनी खरी परिस्थिती सांगितली होती. बहिणीला असा अनुभव यायच्या अगोदर गल्लीतील अनेकांनी आजीबाईंचा झटका अनुभवला होता. त्यानंतर आम्हाला कधीही त्या आजी रस्त्यात दिसल्या की त्वरेने आम्ही रस्त्याची दुसरी बाजू धरायचो आणि चालण्याचा वेग वाढवत तरातरा पुढे जायचो!

हा हा हा.. माझ्या बहिणीच्या नवर्‍याला अशाच एका म्हातार्‍या बाईनं लिफ्ट मागितली..
आणि गाडीवर बसल्यावर उलटा पालटा पत्ता - उतरायलाच तयार नव्हती!

नानबा, तुझ्या मेव्हण्यांनी कसं हॅन्डल केलं मग? Happy

माझ्या स्वतःच्या आजीला तिच्या शेवटच्या दिवसांत खूप विस्मरण होत असे. तिला रीक्षात बसायला अजिबात आवडत नसे. तिच्या मते देवाने आपल्याला पाय दिलेत तर चालावं, फार तर फार बसनं जावं...पण रीक्षात बसणं म्हणजे तिला पैसे उधळल्यासारखं वाटे! पण आता जर ३-४ किमी अंतर कापायचे असेल तर, आणि तिला कमीत कमी त्रास व्हावा म्हणून आम्ही तिला रीक्षात बसवायला गेलो की ती एका बाजूने आत चढत असे आणि आम्ही रीक्षात चढेपर्यंत दुसर्‍या बाजूने उतरून रस्त्यावरून तरातरा चालत जात असे. की ती पुढे आणि तिच्या मागे पळत पळत आम्ही!!! कसेबसे तिच्या विनवण्या करून तिला रीक्षात बसवावे लागे, पण मग ती जी फुरंगटून बसे लहान मुलासारखी, ते आमच्याशी दिवसभर काही बोलत नसे!

बँकेत पेन्शन आणायला गेल्यावर आपण तिथे का आलोत तेच ती अनेकदा विसरत असे. मग ते विचारायला पुन्हा घरी. मग पुन्हा बँकेत. बरं, तिच्याबरोबर जावं तर ते फार स्वाभिमानी, स्वावलंबी प्रकरण! त्यामुळे आपण कोणावर अवलंबून आहोत म्हणजे अब्रम्हण्यम! त्यात तिचेच खूप हाल व्हायचे आणि आम्हा नातवंडांनाही खूप वाईट वाटायचे.... कधी कधी गुपचूप तिच्या मागोमाग जायचो. पण तिला त्याची खबरबात लागली की मग आमची शाब्दिक चंपी असायची!

बँकेत, पोस्टात कर्मचार्‍यांना माहित होते सगळे म्हणून ठीक! तरी मग शेवटी शेवटी तिचे विस्मरण खूपच वाढले. हात देखील सही करताना खूप थरथरायचा. आजीचा सगळा विश्वास माझ्या आईवर. तिला खात्री होती की ही सून आपल्या पश्चात सर्वकाही व्यवस्थित पार पाडेल. आणि शेवटी तिने केलेही तसेच. तिच्यानंतर ज्या काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या होत्या त्यासाठी तिने आईची निवड केली आणि मगच डोळे मिटले.

अरू किती गोड होती तुझी आजी. माझी आजी सतत बोलत असते, कुणी ऐको वा न ऐको, समोरचा निघून जाउन पुन्हा अर्ध्या तासाने त्या खोलित आला तरी अजुन तिचं त्याच गोष्टीवरचं दळण कानावर पडायचं.
Happy
लांबच लांब कमरेच्याही खालि असलेले पांढरे केस्...आम्ही मुद्दाम तिला चिडवायला तिच्या केसांना क्लिपा लावायचो..मग ती आमच्या भोन्ड्या केसांवरून आम्हाला बोल लावायची.

अजुनही ती आहे पण तिला मुळिच ऐकु येत नाहि, फोनवर पलिकडे मी बोलतिये म्हटल्यावर जाम खुश होते पण मी काय बोलतिये ते तिला मुळिच ऐकु येत नाहि Sad

सॉरी विषयांतर झालं.

आशू, तुझ्या आजीला नातीचा फोन आलाय हेच खूप खुश करते! अगं, ही तर मनाची भाषा!! Happy तुम्ही आजीच्या केसांना क्लिपा लावायचात हे वाचून मजा वाटली!! आमच्याकडे आमची टाप नव्हती असले काहीही उद्योग करायची! पण नंतर आजी जेव्हा अंथरुणाला खिळली होती तेव्हा तिला संध्याकाळी तिच्या नर्सबाई टिकूमिकू करायच्या, तिचे केस विंचरायच्या, चेहर्‍यावर हलकेच पावडरचा पफ फिरवायच्या (जी पावडर तिने आयुष्यात लावली नाही!) आणि मग तिला आरसा दाखवायच्या! आजी आरशात आपले आवरलेले प्रतिबिंब पाहून इतकी गोड खुदकन हसायची की बास! Happy

नानबा, तुझ्या मेव्हण्यांनी कसं हॅन्डल केलं मग
>> थांब त्यालाच टाकायला सांगते.. तो हा किस्सा जबरा खुलवून सांगतो (ज्याचं जळतं त्यालाच कळतं ह्या न्यायानं असावं Wink )

माझ्या आईची एक शुभांगी नावाची train group ची मैत्रिण आहे. खूपच गप्पिष्ट आणि थट्टेखोर स्वभाव आहे तिचा! संध्याकाळी office मधून येताना दोघी एकत्रच एका train ला असत. सोबत त्या train चा regular group ही असे. गाणी, jokes, गप्पा-गोष्टी , अनुभवांची देवाण-घेवाण अशी मजा मजा चालत असे. एकदा त्या train मध्ये घडलेला एक जबरी किस्सा मला आईने सांगितला.
झालं काय की एकदा train कुठल्यातरी २ stations च्या दरम्यान अचानक थांबली. बराच वेळ चालूही होईना. हे तर नेहेमीचेच आहे त्यामुळे बायकांच्या डब्यातला चिवचिवाट अखंडीत राहिला. मध्येच अचानक train मधले दिवे गेले. बाहेर गुडुप अंधार आणि आतही अचानक दिवे गेले. त्यामुळे क्षणात सर्व बायका चिडिचूप झाल्या. अख्खा डबा सामसूम! आणि अचानक डब्यातूनच कुठूनतरी "पुर्रर्रर्रर्रर्रर्र sssssssssssssssssss" असा आवाज आला. आणि ज्या area तून तो आवाज आला तिथल्या बायकांनी लगेच नाकाला रुमाल लावले. आता प्रताप नक्की कुणी केला कळायला काहीच मार्ग नव्हता. तितक्यात शुभांगी मावशी जीव खाऊन ओरडली "आवाsssssssssssssssssssssssssज कुणाsssssssचा?"
सगळ्या बायकांमध्ये असा काही हशा उसळला की बास रे बास!!!!

.

आमच्या शाळेत विज्ञान शिकवण्यासाठी रिझबुडबाई म्हणून एक नवीन बाई आल्या होत्या. तशा आमच्या वर्गाला त्या शिकवत नव्हत्या. किंबहुना त्या जेव्हा नवीन आल्या त्याच दिवशी - आमच्या इतिहासाच्या बाई न आल्यामुळे त्या आमच्या वर्गावर आल्या तेव्हा - चुळबुळ केल्याबद्दल त्यांनी मला एक चांगलाच सणसणीत रट्टा हाणला होता. या अनपेक्षीत रट्ट्यामुळे पुढे माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा राग चांगलाच धुसफुसत असायचा. पण पुढे विज्ञानप्रदर्शनात मी भाग घेतला आणि माझ्या मार्गदर्शिका म्हणून हेडबाईंनी मला त्यांच्याच हवाली केले. प्रदर्शनाकरता आम्ही एक प्रकल्प केला आणि त्याकरता आम्हाला तृतीय क्रमांकाचे बक्षीसही मिळाले. या दरम्यान माझ्या मनातली रिझबुडबाईंबद्दलची अढी दूर झाली. मी त्यांचा आवडता विद्यार्थी झालो. पुढे वार्षिक परीक्षा संपल्या आणि आम्हाला सुट्ट्या लागल्या. या सुट्टीत एकेदिवशी सकाळी घरी एकटाच लोळत लोळत वर्तमानपत्र वाचत असताना मी एक बातमी वाचली - रिझबुड दांपत्याचा लहान मुलासह अपघातात मृत्य! बातमी वाचल्यावर थोड्याच वेळात माझ्या मनात शंकांची भूतं नाचायला लागली. हे रिझबुड दांपत्य म्हणजे आपल्या बाई तर नसतील? त्यांना एक लहान मुलगा आहे हे मला ठाऊक होते. माझ्या मनात नको ती भयावह दृश्यं नाचायला लागली. मी रडकुंडीला आलो. या आपल्या बाई नसतील तर किती बरे होईल. काय करावे ते कळेना. ती बातमी मी पुन्हा पुन्हा वाचून काढली. त्यातल्या श्रीयुत रिझबुडांचा उल्लेख 'एस्. रिझबुड' असा केलेला होता. मला काही सुचेना. इतक्यात परीक्षांचा निकाल लागेस्तोवर आम्हाला सुट्टी असली तरी शाळा चालू असतात हे मला आठवले. मी वर्तमानपत्र घेऊन शाळेत जायचे ठरवले. शाळेत गेल्यावर हळूच शिक्षकांच्या खोलीत डोकावलो. रिझबुडबाई इथेच दिसल्या तर बरे होईल. म्हणजे कोणाला काही न बोलता तिथूनच परत जायचे असे मी ठरवले. पण शिक्षकांच्या खोलीत सकाळअधिवेशनाच्या एका शिक्षिकेखेरिज कोणीही नव्हते. मला बिगर-गणवेशात आणि त्या अवतारात बघून त्या उठून बाहेर आल्या आणि काय भानगड आहे ते विचारले. त्यांना कसे सांगायचे हे सगळे? शेवटी मी माझ्या हातातले वर्तमानपत्रच त्यांच्यासमोर धरले. सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी रिझबुडबाईंची चौकशी करायला सुरुवात केली. (त्याकाळी सर्वसामान्यांकडे मोबाईल नसत) पण रिझबुडबाई पूर्ण आठवडा रजेवर असल्याचे त्यांना समजले. मी तर आता रडायचाच बाकी होतो. त्या बाई मला धीर द्यायचा प्रयत्न करत होत्या पण दाखवत नसल्या तरी त्याही मनातून हादरल्या होत्या. त्यांनी माझी कशीबशी समजूत घालून घरी जायला सांगितले. सुदैवाने दुसर्‍याच दिवशी स्टेशनवर रिझबुडबाई घाईघाईने लोकलमध्ये चढताना मला दिसल्या आणि माझा जीव भांड्यात पडला.

एकदा घरी आमचे एक स्नेही आले होते. सर्वसामान्य परिस्थितीतले, घरात एकच मिळवता पुरुष असलेले त्यांचे कुटुंब. सतत कोणती ना कोणती आर्थिक समस्या असायचीच! त्या दिवशीदेखील गप्पांमध्ये तो विषय ओझरता येऊन गेलाच! नंतर थोड्या वेळाने ते सहज उद्गारले, ''परवा मित्राबरोबर सिंगापूरला गेलो होतो. मजा आली प्रवासात!'' आमच्या घरातले लोक सर्द! त्यांना विचारले, ''सहजच की काही कामानिमित्त?'' त्यावर आमच्या स्नेह्यांचा जवाब तयार होता, ''अहो, थोडं काम आणि थोडी मौजमजा! माझ्या मित्राचं सासुरवाडीचं काही काम होतं. मी आपला गेलो होतो असाच सोबत!''

आता त्यांच्या ह्या बोलण्यावर आमच्या घरच्यांकडे उत्तर नव्हते. मगाशी जो माणूस घरातील आर्थिक प्रश्न सांगत होता तोच थोड्या वेळाने मौजमजेसाठी सिंगापुरास जाऊन आल्याचेही बिनधास्त कबूल करत होता. कोणीतरी विचारले, ''काही खरेदी वगैरे केलीत की नाही वहिनींसाठी?'' त्यावर त्यांनी मुंडी हालवून नकार दिला, आणि म्हणाले, ''अहो वेळ पाहिजे ना! आम्ही काय, एक रात्र मुक्काम केला आणि लगेच दुसर्‍या दिवशी परत. ऑफिसात रजा सुध्दा नव्हती ना शिल्लक!'' आई म्हणाली, ''अहो, गेल्यासरशी जरा राहायचेत तिथे, साईटसिईंग वगैरे करायचे. अशी रोज रोज का संधी मिळते?''
आता त्या गृहस्थांचा चेहरा जरा बावचळल्यासारखा दिसू लागला होता. ''वैनी, तिथं कसलं डोंबलाचं साईटसिईंग?!! शेती आन डोंगर आहेत फक्त....''
आता बावचळायची खेप आमच्या घरच्यांची होती. थोडा वेळ असेच हे संदर्भरहित संभाषण कडेकडेने सुरु राहिले.
शेवटी आईला राहावले नाही. तिने विचारलेच! ''अहो भावजी, मगाशी तुम्ही म्हणालात की आधीच्या कर्जाचे हप्ते फेडताना जीव मेटाकुटीला येतोय, मग एवढा महागडा सिंगापूरचा प्रवास कसा काय हो?''

काही क्षण ते स्नेही आईकडे अवाक् होऊन पाहतच राहिले, आणि मग खो खो हसत सुटले.
सर्वजण त्यांच्या चेहर्‍याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघत होते. शेवटी त्यांनी हसू कसेबसे आवरले आणि म्हणाले, ''तुम्हाला काय ते फारिनचं सिंगापूर वाटलं का? अहो, मी एवढा वेळ आपल्या पुणे जिल्ह्यातल्या सिंगापुराविषयी बोलत होतो.... वेल्ह्यापासचं!'' आता आमच्या घरातल्यांचे चेहरे प्रेक्षणीय झाले होते!! Proud

हे असे आमच्या हैद्राबादेत पण होते एक चेन आहे ताज महाल. जिथे आपले दोसे इड्ली मिळते. एक आपले पंचतारांकित. मला एक दिवस त्या साइड्ला काम होते मी बॉस ला म्हण्ले लंच पण करून येते ताज मध्ये.
तो उडलाच. हिला कसे परवड्णार या हिशेबाने. मग मी म्हण्ले अरे डोसा. तुला काय वाट्ले? हीहीहीही

Pages