लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by हेमंतकुमार on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही शब्द संदर्भानुसार बरोबर असावेत असे वाटते. परंतु 'लक्षवेधी' हा बृहदकोशाने का दिलेला नाही ते समजत नाही.

लक्ष व लक्ष्य हे वेगळे आहेतच.

@ लक्षवेधी

या धाग्यावर अप्रस्तुत होईल पण ब्रिटिश संसदीय परंपरेतल्या “attention calling motion” ला आपल्याकडे मराठीत “लक्षवेधी प्रस्ताव/सूचना” आणि हिंदीत “ध्यानाकर्षण प्रस्ताव” असे उत्तम पर्यायवाची शब्द तयार झाले आहेत, legislature parleys मधे नेहमीच्या वापरात आहेत.

* “ध्यानाकर्षण प्रस्ताव” >>> छान !

यावरून भारतीय संसदेत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण Zero Hourची आठवण झाली. मराठीत त्याचे शून्य प्रहर असे शब्दशः भाषांतर केलेले आहे. या तासाला 'शून्य' म्हणण्याचे कारण म्हणजे तो लोकसभेत दुपारी बारा वाजता सुरू होतो (अशी गुगल माहिती).
तसेच तो आधीच्या प्रश्नोत्तरांचा तास आणि नंतरचे नियमित कार्यालयीन काम या मधला प्रहर असतो

लक्ष्यवेध असा शब्द आहे. (लक्ष्याचा वेध याचा समास)
त्याला ई हा कर्तृवाचक प्रत्यय लागुन लक्ष्यवेधी झाले असेल.
लक्षवेध असा शब्द नसल्याने त्याचे लक्षवेधी होत नसावे. लक्ष वेधणारे/वेधुन घेणारे अशा अर्थाने लक्षवेधक असा समास होऊ शकेल.

यावरून एक जुना पण या धाग्यावर सूट होणारा 'खासदार अमुक तमुक पाटील यांच्या लक्षवेधी सुनेवर काल विधानसभेत उहापोह करण्यात आला' हा जोक आठवला

वेधक आणि वेधी असे दोन्ही शब्द होऊ शकतात. एकात ण्वुल् आणि एकात णिनि प्रत्यय लागतो. दोन्हीचे अर्थ साधारण सारखेच आहेत.

लक्ष हा शब्द संस्कृतातून जन्मला असला तरी तो संस्कृतात तसाच्या तसा (लक्ष देणे या अर्थाचा) नाही. लक्ष् धातूपासून लक्ष असं नाम तयार होतं का मला माहीत नाही, त्यामुळे पुढे विध् (वेध् ) धातू जोडून त्याला वरीलपैकी कोण्ताही प्रत्यय लावणं कितपत योग्य आहे मला माहीत नाही.

पण मराठीत संस्कृत नसलेल्या नामांना संस्कृत प्रत्यय जोड्ल्याची काही उदाहरणं आहेत. उत्तम उदाहरण म्हण्जे गरजवंत हा शब्द. गरज या फारसीतून आअलेल्या मराठी शब्दाला वतृच् हा संस्कृत प्रत्यय जोड्ला आणि त्याच्या अनेकवचनाचा उपयोग (सं. वान् - वन्तौ - वन्तः) मराठीत एकवचनी केला. जर हा शब्द स्वीकार्य असेल तर लक्षवेधी या शब्दाशी भांडण उकरून काढण्याचं कारण नाही.

नुकतेच निवडणुकांच्या कालावधीत कायप्पावर एक फॉरवर्डेड मेसेज वाचला.
वरती गरजवंत शब्द वाचल्यावर तो आठवला.

ऐनवेळी मोक्याच्या क्षणी एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्याला निसटावंत म्हणतात.

https://www.loksatta.com/maharashtra/hirkani-tigress-released-in-sahyadr...

निसर्गमुक्त हा शब्द कधी ऐकला नव्हता. तो वापरही बरोबर वाटत नाही इथे. वाघिणीला निसर्गात सोडून देणे म्हणजे निसर्गमुक्त? Happy अमुक-मुक्त म्हणजे आता अमुक शिल्लक नाही असा अर्थ लावला जातो सहसा.

Submitted by फारएण्ड on 7 February, 2026 - 20:44>>> यांच्या मनात येतील तसे शब्द बनवतील हे लोक..

मजेशीर आहे. थिओरेटिकली तत्पुरुष समासात विभक्ती कुठलीही वापरता येते, त्यामुळे निसर्गात मुक्त = निसर्गमुक्त असा सप्तमी तत्पुरुष समास होऊ शकतो. पण तसा शब्द प्रचलित नाही आणि वार्तांकन करताना कमीत कमी संदिग्धता असणे आवश्यक आहे. मला वाटत नाही की बातमीदाराने तत्पुरुष, संदिग्धता यापैकी कुठल्याही मुद्द्याचा विचार केला असेल.

लोकार्पण हा शब्द पण असाच कैच्याकै वाटतो. ओढूनताणून जमवलेला समास आणि आता तो तसाच प्रचलित पण केला जात आहे.

* लोकार्पण हा शब्द पण असाच
>>>> या मुद्द्यावर मागे एक चर्चा वाचली होती. त्यात एक मत असे होते की एखादी सार्वजनिक गोष्ट ही लोकांच्याच पैशातून निर्माण केलेली असते. मग ती लोकांना अर्पण करण्याचा प्रश्न येतो कुठून ?
( एखादी खाजगी मालमत्ता जनतेला दिली तर तो ठीक राहील).

अर्थात व्याकरणाचा मुद्दा वेगळाच.

>>> एखादी खाजगी मालमत्ता जनतेला दिली तर तो ठीक राहील >>>

ह्या दृष्टिकोनातून प्राणार्पण शब्द बरोबर आहे असे वाटते.

एका व्याघ्रप्रकल्पातून दुसऱ्या व्याघ्रप्रकल्पात स्थलांतर केले असल्याने खरं तर इथे निसर्गात सोडुन दिले हा केलेला बदल नाहीच. पेंच व्याघ्रपकल्पात सुद्धा निसर्गात सोडुन दिलेले असतात.

अभयारण्य शब्द हल्ली वापरत नाहीत का ? निसर्गमुक्त इंग्रजीवरून मराठी केल्या सारखा वाटतोय. Roaming freely in Nature - सारखं. अभयारण्यात सोडले सोपा आहे.

अभयारण्यात सोडले सोपा आहे >> +१

अभयारण्य हा शब्द हिंदीत तितकासा प्रचलित नसावा. एआयचा मराठी फीडपण हिंदीवर आधारित असल्याने कृत्रिम भाषांतरात तो शब्द सुचवला जाण्याची शक्यता कमी.

या दोन बातम्यामधला ठळक केलेला शब्द पहा :
१. हडपसर टर्मिनलवर चौथा प्लॅटफॉर्म तयार होत असून . . .
https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/pune-land-acquisition...
..
२. . . . पुणेकरांसाठी आणखी एक टर्मिनस (=हडपसर)
https://www.mumbaitak.in/city-news/pune/story/pune-news-hadapsar-railway...
या दोन्ही ठळक शब्दांमध्ये शब्दजातीचा फरक आहे; टर्मिनस हे नाम तर टर्मिनल हे विशेषण आहे. हडपसरचा उल्लेख करताना यापैकी कोणता शब्द बरोबर की दोन्ही बरोबर, हा थोडा काथ्याकुटाचा विषय आहे. या संदर्भात एका रेल्वे चर्चामंचावर शिस्तीत उत्तर दिलेले आढळते :
https://indiarailinfo.com/faq/post/what-is-the-difference-between-a-term...
त्यानुसार,
'Terminus' is a rigid word only referring to the final station on a line. 'Terminal' is not so rigid, and can slightly change its meaning based on the context.

अर्थात ‘छ. शि. म. टर्मिनस’ असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या रेल्वे-संकल्पनेचा संपूर्ण अर्थही लगेच नजरेसमोर येतो.
टर्मिनचा एक अर्थ ‘रेल्वे (किंवा अन्य) स्थानकावरील प्रवाशांची ये-जा करण्याची इमारत’ हा सुद्धा होतो (केंब्रिज कोश).

HBdeuC_bUAEmqvA.jpg

हे बरोबर आहे का चूक?

मुळात विशेषण हवेच कशाला? नगरपरिषदेचा बोर्ड आहे तो जनतेकरताच असेल. आणि खाजगी असेल तर जाहीर बोर्ड कशाला लावतील. इतरत्र टॉयलेट्स असतात तेथे कोठे सार्वजनिक वगैरे आवर्जून लिहीतात Happy

टर्मिनल व टर्मिनसचे वरचे वर्णन बरोबर वाटले. परदेशात टर्मिनलचा वापर पाहिला आहे पण तो जनरल स्टेशन्स करता, आणि बहुतांश फेरी ई करता. भारतात रेल्वेच्या बाबतीत "टर्मिनल" शब्दाचा वापर लक्षात नाही.

हडपसर च्या बाबतीत - संदर्भानुसार वापर करतील असे वाटते. दादर च्या मध्य रेल्वेच्या स्टेशनाबद्दल "दादर टीटी" असे उल्लेख ऐकले आहेत. पण ते ही कदाचित जेथे मार्ग संपणारे प्लॅटफॉर्म असतील त्या भागाबद्दल असेल.

Pages