पाककृती हवी आहे - भाग ५

Submitted by मेधा on 14 January, 2022 - 12:05

भाग ४ मधे देखील २००० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने हा पाचवा धागा सुरु केला आहे

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

आधीचे धागे

https://www.maayboli.com/node/2549
https://www.maayboli.com/node/24273
https://www.maayboli.com/node/42617
https://www.maayboli.com/node/56005

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरती रानभूली ने दिलेली आलू सब्जी खस्ता कचोरी रेसिपी यम्मी आहे.पण ती कचोरी आहे जर पुरी हवी असेल तर ही https://youtu.be/IAnLc2QHwX0?si=UBWJ1UTybdPa7f94 बेडमी पुरी आलू सब्जी ची रेसीपी आहे

मला एक माहिती हवी होती. एक मुस्लिम रेसिपी आहे - दुधी भोपळा, तूर डाळ आणि तांदूळ असलेली. दाल चावल किंवा असंच काहीतरी नाव आहे. बहुधा बोहरी लोकांकडे करतात. कोणाकडे आहे का ही रेसिपी?

कद्दू का दालचा.

धन्यवाद अनिंद्य. एका मैत्रिणीला हवी होती ही माहिती. अजून काही प्रश्न असेल तर इथे विचारते नंतर.

Welcome !

फेमस हैदराबादी व्हेज डिश आहे ही. भंडारा-सामुदायिक भोज असेल तर हमखास हाच मेन्यू.

Authentic Hyderabad Style हवी असेल तर इंस्टावर “अम्मी के खाने” नावाचे पेज बघा. कद्दू का दालचा नक्की असेल तिकडे.

माझ्या मते बारीक , त्यात तूप खूप असतं त्यामुळे बारीक असला तरी गिच्च होत नाही शिरा उलट बारीक रव्याचा मऊ लुसलुशीत होतो.
मी कधी ही गोडाचा शिरा करताना बारीक रव्याचाच करते, उपमा असेल तर मिडीयम घेते.

हो, ममो इज म्हणिंग द राइट. तूप घालताना हात आखडता घ्यायचा नाही. मग बारीक रव्याचाच काय, कणकेचाही मस्त होतो शिरा! Happy
उलटपक्षी मीडियम किंवा जाड रव्याचा होत नाही असंही नाही - पाण्यादुधाचं प्रमाण आणि शिजण्याचा वेळ (दलिया रवा घेतला तर प्रेशरकुकरमध्ये शिजवावा लागतो!) बदलेल, इतकंच.

मी नेहमी इथे coarse सुजी मिळतो तो घेते. आता तुम्ही सगळे आग्रह करताय तर बारीक रव्याचा करून बघते. माझा शिरा वर्ल्ड फेमस आहे. बघा बरं, रेप्युटेशन दांव पे आहे.

तेरडा आणि आघाड्याची भाजी कशी करायची कोणाला माहिती आहे का? प्लीज रेसिपी सांगा.

कोणी जागूच्या कॉन्टॅक्ट मधे असल्यास प्लीज तिला इकडे चक्कर टाकायला सांगा

कच्च्या पपई चे फाफडा सोबत मिळते ते सांभारा( तारक मेहता मध्ये ऐकले होते) त्याची पाककृती हवी आहे. किंवा कच्च्या पपई चे अजून काय करता येईल?

कच्च्या पपईची आपण बटाट्याची उपवासाची भाजी करतो तशी करता येईल. (साल काढून, फोडी करून, त्या उकडून घ्या. मग जिरं, हि मि, हळद फोडणी घालून वरून मीठ, दा कू, कोथिंबीर)
याशिवाय, पपई किसून कोफ्तेपण चांगले होतात.

पपया नो संभारो

कृती हिंदीतच सांगितली आहे. पूर्वी फरसाणवाले ढोकळा वगैरे सोबत हा सांभारो देत. हल्ली चटण्यांची पाकिटंच देतात.

कच्ची/ हिरवी चिंच आहे घरात.. तिखट मीठ लावून खाऊन झाली आता त्याच काही वेगळं करता येईल का शोध चालू आहे. कोणाला माहीत असल्यास प्लीज कळवा.

ठेचा करा, हिरवी मिरची, चिंचा , मीठ , गुळ घालून ओबड धोबड वाटायचं आणि वरुन हिंग मोहरी हळद घातलेली तेलाची खमंग फोडणी घालायची. एकदम भारी लागतो. (चिंचोके आणि शिरा दोन्ही कोवळे असतील तर घ्यायचे जून असतील तर काढून टाकायचे. )
ह्या ठेच्याशी माझ्या लहानपणीच्या असंख्य आठवणी जोडलेल्या आहेत. नवरात्रात आमच्या गावच्या गावदेवीची नऊ दिवस छोटीशी जत्रा भरत असे. आणि तिथे कोवळया चिंचा घेऊन बायका विकायला बसत असत. दहा पैशाला एवढा मोठा वाटा मिळत असे.
चिंचेचा ठेचा करायचं काम माझं होतं. आई सगळ साहित्य घालून देत असे आणि मी पाट्यावर ठेचून ठेचा करत असे. आत्ता सुद्धा ते चित्र दिसतंय डोळ्यासमोर आणि ठेच्याच्या आठवणीने ही तोंडाला पाणी सुटलं आहे. आम्ही भावंडं भाजी सारखा खात होतो तो ठेचा.

तुम्ही ही जरूर करून. बघा आवडेल तुम्हाला ही.

नेहमीच्या खोबर्‍याच्या चटणीचे व्हेरिएशन - हिरवी मिरची, ओलं खोबरं आणि चिंच एकत्र वाटा . मग त्यावर मोहरी, हिंग ,कढीपत्ता , एखादी सुकी मिरची अशी फोडणी घाला.

>>कोवळया चिंचा घेऊन बायका विकायला बसत असत. दहा पैशाला एवढा मोठा वाटा मिळत असे.
चिंचेचा ठेचा करायचं काम माझं होतं. आई सगळ साहित्य घालून देत असे आणि मी पाट्यावर ठेचून ठेचा करत असे. आत्ता सुद्धा ते चित्र दिसतंय डोळ्यासमोर आणि ठेच्याच्या आठवणीने ही तोंडाला पाणी सुटलं आहे. आम्ही भावंडं भाजी सारखा खात होतो तो ठेचा.>>
ममो, माझी आठवणही तुमच्यासारखीच आहे. फरक इतकाच की बायका शाळेबाहेर बसत आणि दहा पैशाला तळहाताएवढा वाटा असे. ठेच्यासाठी चिंच आणायच्या म्हणून आई रुपयाची नोट देत असे ती कंपासपेटीत घालून जपून न्यायचेही अप्रुप असे.

कच्ची/ हिरवी चिंच आहे घरात.. तिखट मीठ लावून खाऊन झाली आता त्याच काही वेगळं करता येईल का शोध चालू आहे. कोणाला माहीत असल्यास प्लीज कळवा. >>>

मीठाच्या पाण्यात मुरवूनही छान लागतात. आवळे जसे मीठाच्या पण्यातले करतो ना तसं मी हिरव्या चिंचा, आलं, अगदी छोट्या कैऱ्या कधी कधी बरणीत मीठाच्या पाण्यात टाकून ठेवते.

.. कुणीतरी खाऊगल्लीत खाटा / पांढरा ढोकला receipe टाकली होती….

स्वस्ति ,

माझी ती पोस्ट तशीच्या तशी डकवत आहे. याला रेसिपी म्हणायचे की नाही ते तुम्हीच ठरवा

On demand Short recipe for khata/ rava dhokla for प्राजक्ता, माधव :

खाटा ढोकला सुपर सिंपल आहे. १ पोर्शन रवा + १/२ पोर्शन आंबट दही, एक मोठा चमचा बेसन + पाणी यांची युती. अर्धा तास रेस्ट. किसलेले आले, मीठ आणि ENO एक चमचा टाकून, थोडसेच फेटून तेलाचा हात लावलेल्या ताटलीत १५ मिनिटे वाफवायचे की झाले.

वाफवतांना ढोकल्याचा लेयरचा थिकनेस कमी हवा, दही आंबटच हवे आणि यात आलं पाहिजेच. नाहीतर फसणार.

नीट वाफवले की वरून तीळ + मोहरीची फोडणी, यात हिरव्या मिरच्या किंवा कढीपत्ता टाका, टाकू नका तुमची मर्जी.

हवे ते हवे तितके व्हेरियेशन्स करा. दुल्हन वही जो पिया मन भाए 😀

हा फोटोही होता :

842b30d9-e62e-44b1-b5c9-7d01e746fa16.jpeg

लग्नाच्या पंगतीत किंवा महाप्रसादाला मिळतो तसा मसालेभात खायची प्रचंड इच्छा आहे. बऱ्याच रेसिपीज ट्राय करून झाल्यात. पण 'ती' टेस्ट काही येईना. पारंपारिक मसालेभाताची रेसिपी मिळेल का? एकदम ब्राह्मणी स्टाईलवाला.

ब्राह्मणी मसाले भातात मसाला हा खरा राजा. तो मसाला ताजाच करायचा .धने + लाल सुकी मिर्ची + दालचिनी + काळी मिरी + सुके खोबरे + कोथिंबीर असे कच्चेच वाटायचे. कोथिंबीर जरा जास्तच घ्याची म्हणजे तो टिपीकल काळसर हिरवा रंग येतो नंतर फोडणीत परतून घ्यायचे. नंतर तांदूळ परतून झाले की आपल्या अंदाजानुसार गोडा मसाला घालायचा लिंबू पिळून चिमूटभर साखर घालायची.
यात तू तोंडली वांगी मटार घालू शकतेस. काजू मला लागतातच...
करून बघ आणी सांग कसा झालेला

वरच्या वाटणात आले पण घाला. मला आधी माहित नव्हते पण कुठेतरी रील मधे पाहिले आणि करून पाहिला, पर्फेक्ट फ्लेवर आला.

मुंबै मसाला असेच काहीतरी नाव असलेल्या एका वेबसाईटवर मला मसालेभाताची रेसिपी मिळाली होती आणि ती वापरुन अगदी हव्या तश्या चवीचा मसालेभात बनवण्यात मला यश आले होते असे आठवतेय. आता ती वेबसाईट सापडत नाहीय. Sad

सायोच्या रेसिपीने केला होता का आठवत नाहीय. करुन बघेन एकदा. मसालेभात हा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे Happy

ब्राह्मणी मसाले भातात मसाला हा खरा राजा. >>>>> पर्फेक्ट. तो मसालाच राजा. मला आठवतेय त्यानुसार आधी सगळ्या भाज्या व तांदुळ अनुक्रमे हिरव्या वाटपात चांगले परतुन घेतले आणि पाणी घालुन अर्धवट शिजल्यावर वरचे ते सुके खोबरे वाटप त्यात टाकुन म भा पुर्ण शिजवला अशी रेसिपी होती. बासमती किंवा अन्य लांब होणारा तांदुळ अजिबात वापरत नाहीत. बुटका पण चिकटगोळा न होणारा तांदुळ हवा. आणि पाणी आधनाचेच घालायचे. चांगल्या परतलेल्या तांदळात थंड पाणी ओतणे म्हणजे सगळ्याच किया करायावर पाणी… Happy

घरातील एका उत्साही मेंबराने माझ्या उरावर ग्लूटेन फ्री मिश्र पीठ आणून ठेवले आहे. प्रयोग. तर ते कसेही भिजवले तरी रोडगे होत आहेत. चवीला मला आवडले. बाकी कुणालाच नाही. थालीपीठ होते आहे आणि खपतेय पण मला रोजचा उद्धार करायचा आहे. मला स्वतःला सुद्धा ग्लुटन फ्री कडे वळायचं आहे हळूहळू. तर सांगा. त्यात नाचणी, शिंगाडा, ज्वारी, मका असं गहू सोडून सगळे दिसतेय. त्याची भाकरी, पोळी कशी करता येईल. गरम पाणी, तूप, तेल, थोडं दूध हे प्रयोग झालेत.

Xanthan gum अशा पीठांसाठी वापरता येतो. ( पण मिक्स्ड पीठाबद्दल वाचले नाही, इतर सिंगल मिलेट पीठांबद्दल वाचलेय.) मी स्वतः अजुन हे करुन पाहिले नाही. ग्वार गम वापरुन पाहिला त्याने जमले नाही. मग कळाले की ग्वार गम हा बेकिंग - ब्रेड (यात मग पोळी भाकरी वगैरे ही अध्याहृत असावे) साठी एवढे उपयुक्त नाही, त्या ऐवजी Xanthan gum वापरावे, ग्वार गम थंड पदार्थांसाठी. पण अजुन मी Xanthan gum ऑर्डर केला नाहीय, आता आठवले तर करतो. याबद्दल तुम्ही शोधुन वाचुन बघा आधी, मग ठरवा प्रयोग करायचा की नाही ते.
-----
(संपले एकदाचे संपादन, आता वाचु शकता.)

झॅन्थॅन गमबद्दल अनुमोदन. मी वापरलेला नाही, पण अगदी किंचितच (चमच्याने नाही, चिमटीने!) घालावा असं वाचलं आहे.

बाकी धिरडी/डोसे, ढोकळा, मोकळ वगैरेही करता येईल.

Xanthan gum कुठं मिळेल ते पहावे लागेल आणि पुन्हा त्यात काय आहे हेही. सध्या हिरोईनच्या डायेट वर आहे. त्यामुळे हेही करून पाहेन. पण उकळत्या पाण्यात, शिजवून वगैरे उकडीच्या पोळ्या करता येतील का. पोळ्या प्रकरणाचा फार ड्रामा चालू आहे एवीतेवी. पोळ्याला सोपं रिप्लेसमेंट सुद्धा शोधतेय. स्वयंपाकघरातून सेमी संन्यास घेऊन तो वेळ चांगल्या गोष्टींवर घालवायचा आहे.

धन्यवाद दोघांनाही. Happy भाजी, वरणासोबत सुद्धा खायचं आहे गं. पोट नाही भरत त्याशिवाय.

https://www.amazon.com/NOW-real-Food-Xanthan-6-Ounce/dp/B0014UH7J2/ref=m... सापडले.

ही चिटिंग होईल पण तरी चालणार असेल तर पुढे वाचा.
मला भारतातून आणलेल्या ज्वारीच्या पिठाच्या भाकर्‍या (हो) जमतात, पण इथल्या ज्वारीच्या पिठाच्या केल्या तर अगदी वातड, कोरड्या आणि दुष्काळी भेगाळलेल्या अशा होतात. तोंडात घास मिळुनच येत नाहीत. त्यावर एक जालिम नाही, पण खाणेबल इलाज म्हणजे ज्वारीत थोडी कणिक घालायची, गरम पाणी आणि तेल घालुन मळायचं. मी हातानेच मळतो पण मिक्सर असेल, आणि तो धुवायची आणि आवरायची हौस असेल तर त्यात टाकुन गोल गोल फिरवलं तर आणखी थोडं ग्लूटन तयार होईल.
याने १००% मिलेट्स पोटात जात नाहीत, पण पहिले दोन दिवस १००% मिलेट्स आणि मग दोन महिने १००% गहू पोटात जाण्यापेक्षा खाणेबल असल्याने जास्त काळ ८०% ज्वारीची भाकरी पोटात जाऊ शकते. घरातील आपण सोडून आणखी एक किंवा दोन मेंब्रांना एका फटक्यात महाभयंकर हेल्दी देण्यापेक्षा थोडंं हेल्दी दिल्याने त्यांची खाण्याची इच्छा न मारता आठवड्यात दोन - तीन दिवस तरी असं अन्न पोटात जाताना जरा कमी कटकट सहन करण्याचे धारिष्ट्य अंगी येते.
मी सिंगल ग्रेनला ट्राय केलंय. मल्टी ग्रेनने प्रॉब्लेम्स मल्टिप्लाय होत असतील तर कल्पना नाही Happy

हो, बाइंडिंग कमी असतं इथल्या ज्वारीच्या पिठाला, थोडं सरसरीतही असतं आणि बहुतेक शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी प्रोसेस्ड असतं.
पण जलापुर ब्रॅन्डचं बाजरीचं पीठ गुळगुळीत आणि बाइंडिंग असणारं आहे - ते ज्वारीपिठात मिसळून बघ.
काहीजण उडदाचं पीठही घालतात.

अस्मिता, हो, उकड काढून बघ किंवा ही वरची पिठं मिसळून बघ.

अमित, मी एक दोन वाट्या ज्वारीचं पीठ असेल तर एक दोन चमचे कणीक घालते. फक्त उकड करते त्या पीठाची भाकरीकरता. आणि लाटून करते भाकरी.

उकड काढून आणि पीठ मिसळून बघेन. धन्यवाद. Happy
पण ते झॅंथॅन गम आधी ऑर्डर करून बघेन. एवढं 'गम' आहे दुनियेत, त्यात अजून एक. उपयोग झाला तर काम सोपे होईल. मला पोषणमुल्यांसोबत कामही कमी करायचं आहे. मी करून पाहून सांगेन एकेक.

घरातील मेंब्रांना नाही खाल्लं तर कॉस्कोचे चिकन कबाब वगैरे देऊन पोट भरवेन. PPN तत्त्वावर. पादा पण नांदा! सगळ्या पालकत्वाचा मूलमंत्र आहे. Proud घरी मी एकटीच शाकाहारी आहे.

Pages