पाककृती हवी आहे - भाग ५

Submitted by मेधा on 14 January, 2022 - 12:05

भाग ४ मधे देखील २००० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने हा पाचवा धागा सुरु केला आहे

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

आधीचे धागे

https://www.maayboli.com/node/2549
https://www.maayboli.com/node/24273
https://www.maayboli.com/node/42617
https://www.maayboli.com/node/56005

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाटण किंवा कांदा लसूण न वापरता कटाची आमटी कशी करतात? कोणाकडे केलेली आठवत नाही, पण फक्त आमसूल, हळद ,लाल तिखट टाकून केलेली. नक्की आठवत नाहिये.

कटाची आमटी हे सर्व न टाकता मजा आणत नाही...
पण तरी बनवायची असल्यास जिरे मोहरी हिंगाची फोडणी देऊन , मग त्यात मसाला आणि गरम मसाला , कढीपत्ता टाकून मग त्यावर कट आणि थोडं वाटलेले पुरण मिक्स करायचं... उकळू द्यायचं. मीठ घालून वरून कोथिंबीर घालायची...
आणि टेस्ट करून पहायची. जर चांगली लागली तर पिऊन टाकायची

नेहमीची मोहरी , हिंग, हळद , कडीपत्ता ची फोडणी करायची . त्यात कट आणि जितकी पातळ हवी तेवढे पाणी घालायचे . मीठ , आमसूल , लाल तिखट घालायचे . छान उकळी येऊ द्यायची . हवे असल्यास फोडणीत थोडा सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा .मी अशी करते . सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी असे पण करतात . खोबऱ्याची वाटी गॅसवर ठेऊन थोडी काळी होईपर्यंत भाजून घ्यायची . ते खोबरे आणि जिरे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे . ते फोडणीत परतायचे .

कटाची आमटी आमच्याकडे नैवेद्याला करतात त्यामुळे कांदा लसूण घालत नाहीत. पण त्याने त्याची मजा अजिबात कमी होत नाही. मी अशी करते:
कट बाजूला करून त्यात दीड दोन चमचे चिंचेचा कोळ मिक्स करून घेऊन त्याला २-३ लवंगा, ४-५ मिरी, दालचिनीचा तुकडा, तमाल पत्र, जिरे, कढिपत्ता, हळद , हिंगाची फोडणी द्यायची. वरून अजून गरम मसाला पावडर, तिखट,गूळ , मिठ इ. घालून मस्त उकळी आणायची. वरून कोथिंबीर.
मस्त चटकदार, तिखट , थोडी आंबट्गोड अशी आमटी होते.

धन्यवाद. मी नेहमी कांदा लसुण टाकून करते. पण अशी वाटणाशिवाय पहिल्यांदा खाल्ली आणि ती आंबट गोड चव प्रचंड आवडली. एकदा ट्राय करून बघते.

फक्त आमसूल, हळद ,लाल तिखट टाकून केलेली. >>> आई फोडणीत हळद तिखट, कढीलिंब घालायची प्लस गोडा मसाला, आमसुल, शेवटी कोथिंबीर घालायची. सासरी ओलं खोबरंही घालतात .

आमच्याकडे कांदा लसूण विरहित करतात कारण पुरणपोळी असते तेव्हा करतात आणि ती सणासुदीला करतात (होळी, श्रावण महिना) आणि नैवेद्य दाखवतात. नैवेद्य असतो तेव्हा कांदा लसूण चालत नाही आमच्याकडे. मला खूप उशिरा कांदा लसूण, वाटण घालून कटाची आमटी करतात हे समजलं.

दोन्ही प्रकार आवडतात.

वर अश्विनी आणि मैत्रेयी यांची रेसिपीही छान वाटतेय.

मला खूप उशिरा कांदा लसूण, वाटण घालून कटाची आमटी करतात हे समजलं.>>> मला इथे वरच्या पोस्टस वाचुनच समजल कारण तेच पुपो म्हणजे नैवेद्य आलाच आणि नैवेद्याला कान्दा-लसुण चालत नाही.
मी कटात चिन्चेचा कोळ,गोडा मसाला, थोड कोरड खोबर भाजुन जिर्‍याबरोबर वाटून, तिखट्,गुळ सगळ घालुन छान उकळायच त्यावर कढिपत्त्याची फोडणी.

कटाच्या आमटीत काय बाकी ही कित्येक पदार्थात कांदा लसूण घालतात हे माहीत नव्हते , हल्लीच कळलंय.

मै ने लिहिलय तशीच आम्ही ही करतो कटाची आमटी , लवंग वगैरे घालून आणि भारी लागते ती. अजून कांदा लसूण घालून करून बघितली नाहीये, पण बघितली पाहिजे, आवडेल पण कदाचित.

मी पण कधी वाटण करतच नाही.
कधी कधी युट्यूबवर बघून हौसेहौसेनं तर्री किंवा चमचमीत मसाल्याच्या वाटणाची भाजी केली तरी म्हणावा तो ठसका किंवा झटकाच येत नाही त्याला. मग जाऊद्या म्हणून करणंच थांबवलंय आता.

कटाच्या आमटीत कांदा लसूण घालत नाही. सणासुदीला कांदा,लसूण नसते.
पण एका शेजारणीने कांदा लसूण मसाला(हा एक वेगळा मसाला असतो) घातलेली आमटी पुपोबरोबर दिली होती.भन्नाट लागते.

आमच्या शेजारी रहातात त्यांच्याकडे कटाची आमटी कां ल, वाटणाची करतात. ते देतात आम्हाला. सत्यनारायण पुजा असेल तेव्हा मेहूण म्हणून बोलावतात, त्यांच्याकडे देवाला नैवेद्य चालतो कांदा लसणीचा. आम्हीही तेच जेवतो मेहुण म्हणून.

छान आहे की मग!
आता पुपो आणि कां ल वली कटाची आमटी करून खाल्ली पाहिजे.
माहेरी, दूधसाखर त्यात थोडे तूप घालून खायचे.त्यावेळी तूप आवडायचे नाही.आता तुपात भिजलेली पुपो आवडते.

भाग ४ वरचं इथे आणत आहे.

हमखास यशस्वी शाकाहारी चायनीज सूप व चिलीपनीरची पाककृती हवी आहे. माझी चांगली होत नाही.

रणवीर ब्रार ची चांगली आहे आणि एक स्पाईस इट्सची चिली चिकनची मी वापरून बघितलेली आहे. ती पनीर बरोबर करू शकता

https://www.youtube.com/watch?v=P7ZGxWKJkX8

https://www.youtube.com/watch?v=PaOmHFjehkY

पर्सनली संजोत किर ची चिकन मंचोव सूप ची रेसिपी हमखास सुपरहिट झाली आहे.

व्हेज व्हर्जन हि चान्गली बनते (चिकन ऐवजी टोफू घालून).

राजगिऱ्याची भाजी आणली आहे, बहुतेक. हिरवी पानं मधे हिंट ऑफ राणी कलर. कृती हवी आहे. कुणाला माहिती आहे का ?

लसूण फोडणीला घालून ओली मिरची+ कांदा तेलावर परतून घे.त्यात चिरलेली भाजी घालून शिजव.वरून ओले खोबरे घाल. ओल्या khobarya ऐवजी दाण्याचे कूट वापरले तरी चालेल.चिमूटभर साखर हवीच.

IMG-20230323-WA0004.jpg

कल्पना नाही सायो, नेपाळी दुकानदार राजगिऱ्याची भाजीच म्हणाला. हा फोटो.
धन्यवाद देवकी तै. लगेच करतेय. Happy

मी ही भाजी अगदी साध्या पद्धतीने करते. हिंग, मोहरीची फोडणी करून त्यावर मिरची आणि उभा चिरलेला कांदा घालते. कांदा ट्रान्स्परंट झाला की त्यावर हळद घालते. अर्धं मिनीट हळद परतून त्यावर चिरलेली भाजी घालते, नीट परतून घेते आणि एक मिनीट वाफ काढून घेते. मग त्यात मीठ घालून हलवून २-३ मिनीटं झाकण ठेवून शिजवते. २-३ मिनीटांनी झाकण काढून चेक करते - भाजीला पाणी सुटलं असेल तर ओके नाहीतर अगदी १ टेबलस्पून पाणी घालून पुन्हा २-३ मिनीटं झाकण ठेवून शिजवते. भाजी शिजली की गॅस बंद करायच्या आधी भाजीत १-२ कच्ची लसणं ठेचून घालते (मोठं लसूण असेल तर एक पुरे), मिक्स करते आणि १-२ मिनीटं झाकण ठेवून अजून एक वाफ काढते. मग गॅस बंद करते आठवणीने Happy

ते नेहमीच करते देवकी तै, कंटाळा आला त्याचा आणि नेहमीच्या पातळभाजीचा. आता तुमची ही कृती नवीन वाटतेयं ती करेन.
रमड, सोपी आहे खरं. धन्यवाद. Happy

माझी आवडती भाजी आहे ही. अगदी सिंपल पद्धतीने करायची भाजी. आधी कांदा, ठेचलेला लसूण ,हिरवी मिरच्या घालून परतते आणि मग हळद घालून वर भाजी घालून परतून घेते. मिठ , किंचित साखर( नसेल आवडत तर स्किप करा) , ऑप्शनल भरड दाण्याचा कूट. तो नसला तरी मस्त लागते ही भाजी गरम गरम खायला.
आता रमड ची पोस्ट पाहिली, साधारण तशीच आहे रेसिपी.

अरे, इकडे मी नेहमी आणते हि भाजी..
साधीच बनवते मी, कांदा, लसूण , हिमी,हळद,शेंगदाणे कुट घालून परतून किंवा लसूण, कांदा,टमाटा,लामिपा घालून परतून.

मैत्रेयीचीच कृती मात्र लसूण चांगला खमंग परतून घ्यायचा. पीठ पेरून पण चांगली लागते. दाकुऐवजी हेम्प सीड्स घातल्या तर जास्त प्रोटीन मिळतं. चवीत अजिबात फरक पडत नाही.

झाली, तिन्ही पोस्टींचा लसावि काढून केली आहे. देठही (अगदी जाड सोडून) घातली, चोरटी असल्याने फार थोडी होईल म्हणून.
IMG-20230323-WA0005.jpg

चौघींना धन्यवाद. Happy चांगली झाली आहे.

मी आता पाहिला हा प्रश्न . पुढच्या वेळी लाल माठ / मायाळू / किंवा ही भाजी आणल्यास कोकणी पद्धतीने करुन पहा.

अर्धी वाटी खोबरे , २-३ सुक्या मिरच्या, १/२ चमचा धणे , २-४ मिरी दाणे बारीक वाटून घ्या.
वाटी भर तूर डाळ शिजवून घ्या
जाडे देठ २ इंच लांब तुकडे करा. बाकी सर्व बारीक चिरून घ्या
थोडे मीठ घालून जाड देठ बुडतील एवढ्या पाण्यात उकळत ठेवा. देठ जरा मऊ झाले की बाकी चिरलेली भाजी पण त्यात घाला. .चिंच घाला चवी पुरती. भाजी थोडी शिजत आली की डाळ घोटून घाला. एक उकळी आली की बारीक वाटलेला मसाला घाला.
सगळे नीट ढवळून एकत्र करा आणि मंद आचेवर एक उकळी येऊ द्या. नारळाचा मसाला घातल्यावर फार ख़ळ्खळ उकळायचे नाही.

मोहरी, सुक्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, हिंग , हळद फोडणी द्या आणि लगेच वाफाळत्या भाताबरोबर सर्व्ह करा

वा अस्मिता काय तोंपासू दिसतेय भाजी. एक भाबडा प्रश्न..पालेभाज्या गाळ शिजवता का? असे केल्याने त्यातले पोषक तत्व मरते का?

मेधा ह्या रेसिपी चा खरंतर बाफं हवा इथे हरवून जाईल..

बटाटेवड्याची रेसिपी शोधते आहे.
इथे एक होती त्याने खूप मस्त व्हायचे.
त्यातील एक टीप आठवते आहे की, अर्धवट तळून परत तळायचे.
बाकी प्रमाण आठवत नाहीये.
कोणाला आठवते आहे का ती रेसिपी?

लालू/ लोला आयडीचा तू तळ मी खाणार आहे नावाने होता एक बीबी.
एकदम परफेक्ट , easy आणि हिट रेसिपी आहे इथे.

https://www.maayboli.com/node/31123 ही लालूची रेसिपी . मी कधी केले नाहीत पण तिने केलेले खाल्ले आहेत बरेचदा . एकदम पर्फेक्ट होतात ( तिच्या हातचे )

Pages